॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ प्रथमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]वानरसेनेचे प्रस्थान


श्रीमहादेव उवाच
यथावद्‌भाषितं वाक्यं श्रुत्वा रामो हनूमतः ।
उवाचानन्तरं वाक्यं हर्षेण महतावृतः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, हनुमंताने सीतेविषयी जे पाहिले होते ते जसेच्या तसे सांगितले. ते ऐकल्यावर, अतिशय आनंदाने श्रीराम बोलले. (१)

कार्यं कृतं हनुमता देवैरपि सुदुष्करम् ।
मनसापि यदन्येन स्मर्तुं शक्यं न भूतले ॥ २ ॥
"हनुमंताने जे कार्य केलेले आहे ते करणे हे देवांनाही दुष्कर आहे आणि त्याचे मनानेसुद्धा स्मरण करणे हे या भूतलावरील अन्य कुणालाही शक्य नाही. (२)

शतयोजनविस्तीर्णं लङ्‌घयेत्कः पयोनिधिम् ।
लङ्‌कां च राक्षसैर्गुप्तां को वा धर्षयितुं क्षमः ॥ ३ ॥
शंभर योजने विस्तृत असणारा समुद्र उल्लंघून जाईल असा दुसरा कोण आहे बरे ? तसेच राक्षसांकडून रक्षिली गेलेली लंका उध्वस्त करण्यास दुसरा कोण बरे समर्थ आहे ? (३)

भृत्यकार्यं हनुमता कृतं सर्वमशेषतः ।
सुग्रीवस्येदृशो लोके न भूतो न भविष्यति ॥ ४ ॥
सेवक म्हणून हनुमंताने सुग्रीवाचे सर्व कार्य पूर्णपणे केले आहे. हनुमानासमान असा कोणी या जगात नाही आणि पुढे होणारही नाही. (४)

अहं च रघुवंशश्च लक्ष्मणश्च कपीश्वरः ।
जानक्या दर्शनेनाद्य रक्षिताः स्मो हनूमता ॥ ५ ॥
जानकीची भेट घेऊन या हनुमंताने आज नक्कीच मी, माझा रघुवंश, लक्ष्मण आणि वानरराज सुग्रीव यांचे रक्षण केले आहे. (५)

सर्वथा सुकृतं कार्यं जानक्याः परिमार्गणम् ।
समुद्रं मनसा स्मृत्वा सीदतीव मनो मम ॥ ६ ॥
जानकीचा शोध करण्याचे कार्य आता चांगल्याप्रकारे पार पडले आहे. तथापि समुद्राची आठवण मनात आल्यावर, माझे मन जणू खचून जात आहे. (६)

कथं नक्रझषाकीर्णं समुद्रं शतयोजनम् ।
लङ्‌घयित्वा रिपुं हन्यां कथं द्रक्ष्यामि जानकीम् ॥ ७ ॥
मगर आणि सुसरी यांनी भरलेला आणि शंभर योजने विस्तीर्ण असलेला समुद्र उल्लंधून जाऊन मी शत्रूला कसा मारू ? आणि जानकीला कसा भेटू ?" (७)

श्रुत्वा तु रामवचनं सुग्रीवः प्राह राघवम्
समुद्रं लङ्‌घयिष्यामो महानक्रझषाकुलम् ॥ ८ ॥
श्रीरामांचे वचन ऐकल्यावर सुग्रीव राघवांना म्हणाला, "प्रचंड नक्र आणि मगरी यांनी भरलेला समुद्र आपण नक्कीच उल्लंघन करून जाऊ. (८)

लङ्‌कां च विधमिष्यामो हनिष्यामोऽद्य रावणम् ।
चिन्तां त्यज रघुश्रेष्ठः चिन्ता कार्यविनाशिनी ॥ ९ ॥
तसेच आपण लंकेचा विध्वंस करू आणि लगेच रावणाचाही वध करू. हे रघुश्रेष्ठा, चिंता सोडा. कारण चिंता ही कार्याचा नाश करणारी असते. (९)

एतान्पश्य महासत्त्वान् शूरान्वानरपुङ्‌गवान् ।
त्वत्प्रियार्थं समुद्युक्तान् प्रवेष्टुमपि पावकम् ॥ १० ॥
हे श्रीरामा, हे महापराक्रमी, शूर, वानरश्रेष्ठ पाहा. तुमचे प्रिय करण्यासाठी ते अग्नीतसुद्धा प्रवेश करण्यास तयार आहेत. (१०)

समुद्रतरणे बुद्धिं कुरुष्व प्रथमं ततः ।
दृष्ट्वा लङ्‌कां दशग्रीवो हत इत्येव मन्महे ॥ ११ ॥
म्हणून प्रथम समुद्र कसा पार करावयाचा याचा विचार करा. मग लंका पाहिल्यावर दशानन रावण मेलाच असे आम्ही समजतो. (११)

नहि पश्यामहं कञ्चित् त्रिषु लोकेषु राघव ।
गृहीतधनुषो यस्ते तिष्ठेद् अभिमुखो रणे ॥ १२ ॥
हे राघवा, धनुष्य घेऊन युद्धास सत्य झाल्यावर तुमच्यापुढे रणांगणात उभा ठाकेल असा कोणीही त्रैलोक्यातसुद्धा मला दिसत नाही. (१२)

सर्वथा नो जयो राम भविष्यतो न संशयः ।
निमित्तानि च पश्यामि तथा भूतानि सर्वशः ॥ १३ ॥
हे रामा, आपला संपूर्ण जय होणार यात काहीही संशय नाही. आपला विजय सुचविणारी तशा प्रकारची शुभ चिन्हे मला सगळीकडे दिसत आहेत." (१३)

सुग्रीववचनं श्रुत्वा भक्तिवीर्यसमन्वितम् ।
अङ्‌गीकृत्यात्ब्रवीद्‍रामो हनूमन्तं पुरःस्थितम् ॥ १४ ॥
भक्ती आणि सामर्थ्य यांनी भरलेले ते सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर, त्याचा स्वीकार करून, पुढे उभ्या असलेल्या हनुमंताला श्रीराम म्हणाले. (१४)

येन केन प्रकारेण लङ्‌घयामो महार्णवम् ।
लङ्‌कास्वरूपं मे ब्रूहि दुःसाध्यं देवदानवैः ॥ १५ ॥
"अरे मारुती, आपण कोणत्याही प्रकाराने हा महासागर उलंधून जाऊच. पण तत्पूर्वी देव आणि दानव यांनाही प्रवेश करण्यास कठीण असणाऱ्या लंकेचे स्वरूप तू मला सांग. (१५)

ज्ञात्वा तस्य प्रतिकारं करिष्यामि कपीश्वरः ।
श्रुत्वा रामस्य वचनं हनूमान्विनयान्वितः ॥ १६ ॥
उवाच प्राञ्जलिर्देव यथा दृष्टं ब्रवीमि ते ।
लङ्‌कां दिव्या पुरी देव त्रिकूटशिखरे स्थिता ॥ १७ ॥
ते कळल्यावर, हे कपिश्रेष्ठा, त्याचा उपाय मी शोधीन." रामांचे वचन ऐकल्यावर, हनुमान विनयपूर्वक आणि हात जोडून रामांना म्हणाला, "हे देवा, जसे मी पाहिले आहे तसे तुम्हांला सांगतो. हे देवा, ती दिव्य लंकापुरी त्रिकूट पर्वताच्या शिखरावर वसलेली आहे. (१६-१७)

स्वर्णप्राकारसहिता स्वर्णाट्टलकसंयुता ।
परिखाभिः परिवृता पूर्णाभिर्निर्मलोदकैः ॥ १८ ॥
तिला सोन्याचे तट आहेत. सोन्याचे बुरुज आहेत. स्वच्छ पाण्याने भरलेल्या खंदकांनी ती सर्व बाजूंनी वेढलेली आहे. (१८)

नानोपवनशोभाढ्या दिव्यवापीभिरावृता ।
गृहैर्विचित्रशोभाढ्यैः मणिस्तम्भमयैः शुभैः ॥ १९ ॥
नाना उपवनांनी ती शोभासंपन्न आहे. तिच्यामध्ये अनेक दिव्य वापी आहेत. चित्रविचित्र शोभेने समृद्ध, मणिस्तंभयुक्त आणि सुंदर घरे त्या लंकेत आहेत. (१९)

पश्चिमद्वारमासाद्य गजवाहाः सहस्रशः ।
उत्तरे द्वारि तिष्ठन्ति साश्ववाहाः सपत्तयः ॥ २० ॥
तिष्ठन्त्यर्बुदसङ्‌ख्याकाः प्राच्यामपि तथैव च ।
रक्षिणो राक्षसा वीरा द्वारं दक्षिणमाश्रिताः ॥ २१ ॥
तिच्या पश्चिम द्वाराला लागून हजारो गजवाहक, उत्तरद्वाराजवळ पायदळ सेनेसह घोडेस्वार, तसेच पूर्वेकडील दाराशी दहा कोटी रक्षक वीर आणि दक्षिणेकडील दारातही तितकेच रक्षकवीर आहेत. (२०-२१)

मध्यकक्षेऽप्यसङ्‌ख्याता गजाश्वरथपत्तयः ।
रक्षयन्ति सदा लङ्‌कां नानास्त्रकुशलाः प्रभो ॥ २२ ॥
हे प्रभो, (लंकेच्या) मध्यभागी, असंख्य गज, अश्व, रथ आणि पायदळ असून अनेक शस्त्रास्त्रांत कुशल असलेले सैनिक लंकेचे सदा रक्षण करतात. (२२)

सङ्‌क्रमैर्विविधैर्लङ्‌का शतघ्नीभिश्च संयुता ।
एवं स्थितेऽपि देवेश शृणु मे तत्र चेष्टितम् ॥ २३ ॥
लंकेमध्ये जाण्याचे मार्ग नाना प्रकारच्या पुलांनी तसेच तोफांनी युक्त आहेत. परंतु हे देवेश्वरा, असे सर्व असतानासुद्धा मी तेथे काय केले, ते तुम्ही ऐका. (२३)

दशनानबलौघस्य चतुर्थांशो मया हतः ॥ ।
दग्ध्वा लङ्‌कां पुरीं स्वर्ण-प्रासादो धर्षितो मया ॥ २४ ॥
रावणाच्या सैन्याचा एक चतुर्थांश भाग मी ठार केला आहे. लंका नगरी जाळून, मी रावणाचा सोन्याचा प्रासाद उध्वस्त केला आहे. (२४)

शतघ्न्यः सङ्‌क्रमाश्चैव नाशिता मे रघूत्तम ।
देव त्वद्दर्शनादेव लङ्‌का भस्मीकृता भवेत् ॥ २५ ॥
हे रघूत्तमा, तोफा आणि पूल मी नष्ट केले आहेत. हे देवा, मला वाटते तुमची दृष्टी पडताच उरलेली लंका जळून जाईल. (२५)

प्रस्थानं कुरु देवेश गच्छामो लवणाम्बुधेः ।
तीरं सह महावीरैः वानरौघैः समन्ततः ॥ २६ ॥
हे देवेश्वरा, जाण्यासाठी प्रस्थान ठेवा. थोर वीर असणाऱ्या वानरांच्या समूहासह आपण सर्व बाजूंनी समुद्राच्या तीरावर जाऊ या." (२६)

श्रुत्वा हनूमतो वाक्यं उउवाच रघुनन्दनः ।
सुग्रीव सैनिकान्सर्वान् प्रस्थानायाभिनोदय ॥ २७ ॥
इदानीमेव विजयो मुहुर्तः परिवर्तते ।
अस्मिन्मुहुर्ते गत्वाहं लङ्‌कां राक्षससङ्‌कुलाम् ॥ २८ ॥
सप्राकारां सुदुर्धर्षां नाश्यामि सरावणाम् ।
आनेष्यामि च सीतां मे दक्षिणाक्षि स्फुरत्यधः ॥ २९ ॥
हनुमानाचे वचन ऐकल्यावर रघुनंदन म्हणाले, "अरे सुग्रीवा, सर्व सैनिकांना कूच करण्याची आज्ञा दे. कारण आत्ताच विजय (नावाचा) मुहूर्त आहे. याच मुहूर्तावर, राक्षसांनी भरलेल्या, तटबंदी असणाऱ्या, अतिशय दुर्गम अशा लंकेत जाऊन, रावणासकट तिचा मी नाश करीन आणि सीतेला परत आणीन. या वेळी माझा उजवा डोळा खालच्या बाजूने लवत आहे. (२७-२९)

प्रयातु वाहिनी सर्वा वानराणां तरस्विनाम् ।
रक्षन्तु युथपाः सेनां अग्रे पृष्ठे च पार्श्वयोः ॥ ३० ॥
वेगवान आणि बलिष्ठ वानरांची संपूर्ण सेना कूच करू दे. जे गटाधिकारी असतील त्यांनी आपल्या आपल्या गटाचे मागे, पुढे व दोन्ही बाजूंनी रक्षण करावे. (३०)

हनूमन्तमथ आरुह्य गच्छाम्यग्रेऽङ्‌गदं ततः ।
आरुह्य लक्ष्मणो यातु सुग्रीवं त्वं मया सह ॥ ३१ ॥
हनुमंताच्या खांद्यावर आरोहण करून मी सर्वांत पुढे जाईन, नंतर माझ्यामागे अंगदाच्या खांद्यावर चढून लक्ष्मण येऊ दे. हे सुग्रीवा, तू मात्र माझ्याबरोबर चल. (३१)

गजो गवाक्षो गवयो मैन्दो द्विविद एव च ।
नलो नीलः सुषेणश्च जाम्बवांश्च तथापरे ॥ ३२ ॥
सर्वे गच्छन्तु सर्वत्र सेनायाः शत्रुघातिनः ।
इत्याज्ञाप्य हरीन् रामः प्रतस्थे सहलक्ष्मणः ॥ ३३ ॥
गज, गवाक्ष, गवय, मैंद तसेच द्विविद, नल, नील, सुषेण, जांबवान् तसेच शत्रूचा वध करणारे इतर सर्व वानर आणि सेनेचे अधिपती हे सैन्याच्या सर्व बाजूंनी जाऊ देत." वानरांना अशी आज्ञा करून श्रीराम लक्ष्मणासह निघाले. (३२-३३)

सुग्रीवसहितो हर्षात् सेनामध्यगतो विभुः ।
वारणेन्द्रनिभाः सर्वे वानराः कामरूपिणः ॥ ३४ ॥
क्ष्वेलन्तः परिगर्जन्तो जग्मुस्ते दक्षिणां दिशम् ।
भक्षयन्तो ययुः सर्वे फलानि च मधूनि च ॥ ३५ ॥
सुग्रीवासह प्रभू राम हे आनंदाने सेनेच्या मध्यभागी चालत होते. गजराजाप्रमाणे असणारे आणि इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे, आणि उड्या मारीत गर्जना करीत असणारे ते सर्व वानर दक्षिण दिशेने निघाले. वाटेत फळे खात आणि मध पीत ते सर्व जात होते. (३४-३५)

ब्रुवन्तो राघवस्याग्रे हनिष्यामोऽद्य रावणम् ।
एवं ते वानरश्रेष्ठा गच्छन्त्यतुलविक्रमाः ॥ ३६ ॥
"श्रीरामांच्या देखतच आज आम्ही रावणाला मारतो." असे बोलत ते अतुल पराक्रमी वानरश्रेष्ठ जात होते. (३६)

हरिभ्यामुह्यमानौ तौ शुशुभाते रघुत्तमौ ।
नक्षत्रैः सेवितौ यद्वत् चन्द्रसूर्यौ इवाम्बरे ॥ ३७ ॥
हनुमान आणि अंगद यांच्या खांद्यावरून जाणारे ते दोन रघूत्तम श्रीराम आणि लक्ष्मण हे आकाशात नक्षत्रांकडून सेवा केल्या जाणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे शोभत होते. (३७)

आवृत्य पृथिवीं कृत्स्नां जगाम महती चमूः ।
प्रस्फाटयन्तः पुच्छाग्रान् उद्वहन्तश्च पादपान् ॥ ३८ ॥
शैलान् आरोहयन्तश्च जग्मुर्मारुतवेगतः ।
असङ्‌ख्याताश्च सर्वत्र वानराः परिपूरिताः ॥ ३९ ॥
संपूर्ण पृथ्वीला झाकून टाकून ती प्रचंड सेना चालली होती. काही वानर आपल्या शेपटीची टोके आपटीत होते. काही वृक्ष उपटून हातात घेऊन जात होते. काही पर्वतावर चढले होते. अशा प्रकारे ते वानर वायुवेगाने जात होते. पृथ्वीवर सर्वत्र असंख्य वानर भरून गेले होते. (३८-३९)

हृष्टास्ते जग्मुरत्यर्थ रामेण परिपालिताः ।
गता चमूर्दिवारात्रं क्वचित् न्न् असज्जत क्षणम् ॥ ४० ॥
श्रीरामांनी रक्षिलेले ते वानर अतिशय आनंदाने जात होते. ती सर्व वानर सेना रात्रंदिवस चालत होती. एक क्षणभरही ती थांबली नाही. ४०

काननानि विचित्राणि पश्यन् मलयसह्ययोः ।
ते सह्यं समतिक्रम्य मलयं च तथा गिरिम् ॥ ४१ ॥
आययुश्चानुपूर्व्येण समुद्रं भीमनिःस्वनम् ।
अवतीर्य हनूमन्तं रामः सुग्रीवसंयुतः ॥ ४२ ॥
सलिलाभ्याशमासाद्य रामो वचनमब्रवीत् ।
आगताः स्मो वयं सर्वे समुद्रं मकरालयम् ॥ ४३ ॥
मलय आणि सह्य या पर्वतावरील विचित्र अरण्ये पाहात श्रीराम सेनेसह चालत होते. नंतर सह्य आणि मलय पर्वतांना ओलांडून, ते सर्व जण भयंकर गर्जना करणाऱ्या समुद्राजवळ येऊन पोहोचले. त्यानंतर हनुमंताच्या हांद्यावरून उतरून श्रीराम सुग्रीवासह सागराच्या पाण्याजवळ गेले आणि म्हणाले, "मगरींचे वसतिस्थान असणार्‍या या समुद्राजवळ आपण सर्व जण येऊन पोचलेलो आहोत. (४१-४३)

इतो गन्तुमशक्यं नो निरुपायेन वानराः ।
अत्र सेनानिवेशोऽस्तु मंत्रयामोऽस्य तारणे ॥ ४४ ॥
हे वानरांनो, आता क हीतरी उपाय शोधल्याशिवाय यापुढे जाणे आपणांस अशक्य आहे. तेव्हा येथेच सैन्याची छावणी करूया. आणि समुद्र कसा तरून जावयाचा याचा विचार करूया." (४४)

श्रुत्वा रामस्य वचनं सुग्रीवः सागरान्तिके ।
सेनां न्यवेश्यत्क्षिप्रं रक्षितां कपिकुञ्जरैः ॥ ४५ ॥
रामांचे वचन ऐकल्यावर सुग्रीवाने सागराजवळच त्वरित सैन्याची छावणी ठोकली. मोठमोठे वानर तिचे रक्षण करू लागले. (४५)

ते पश्यन्तो विषेदुस्तं सागरं भीमदर्शनम् ।
महोन्नततरङ्‌गाढ्यं भीमनक्रभयंकरम् ॥ ४६ ॥
भयंकर दिसणारा, अतिशय उंच अशा लाटा येत असलेला आणि भयानक सुसरी इत्यादींनी भयंकर वाटणारा तो सागर पाहून सर्व जण विषण्ण झाले. (४६)

अगाधं गगनाकारं सागरं वीक्ष्य दुःखिताः ।
तरिष्यामः कथं घोरं सागरं वरुणालयम् ॥ ४७ ॥
आकाशाप्रमाणे अनंत व अगाध असा सागर पाहून ते दुःखी कष्टी झाले, ते विचार करू लागले की 'वरूणाचे निवासस्थान असणारा हा भयानक समुद्र आपण कसा बरे तरून जाणार ? (४७)

हन्तव्योऽस्माभिरद्यैव रावणो राक्षसाधमः ।
इति चिन्ताकुलाः सर्वे रामपार्श्वे व्यवस्थिता ॥ ४८ ॥
आणि त्या राक्षसाधम रावणाला तर आजच ठार करावयाचे आहे.' अशा चिंतेने व्याकूळ झालेले सर्वजण श्रीरामांच्या बाजूला बसले होते. (४८)

रामः सीतामनुस्मृत्य दुःखेन महतावृतः ।
विलप्य जानकीं सीतां बहुधा कार्यमानुषः ॥ ४९ ॥
सीतेची आठवण काढून श्रीराम अतिशय दुःखी झाले होते. तसेच विशिष्ट कार्य करण्यासाठी त्यांनी मनुष्याचे रूप धारण केले असल्यामुळे, ते जनककन्या सीतेसाठी नाना प्रकारे शोक करू लागले. (४९)

अद्वितीयश्चिदात्मैकः परमात्मा सनातनः ।
यस्तु जानाति रामस्य स्वरूपं तत्त्वतो जनः ॥ ५० ॥
तं न स्पृश्यति दुःखादि किमुतानन्दमव्ययम् ।
दुःखहर्षभयक्रोध लोभमोहमदादयः ॥ ५१ ॥
अज्ञानलिङ्‌गन्येतानि कुतः सन्ति चिदात्मनि ।
देहाभिमानिनो दुःखं न देहस्य चिदात्मनः ॥ ५२ ॥
खरे म्हणजे श्रीराम हे अद्वितीय, चैतन्य-स्वरूप, एकमेव, सनातन, परमात्मा आहेत. जो माणूस रामांचे हे स्वरूप तत्त्वतः खरेखुरे जाणतो, त्याला दुःख इत्यादींचा स्पर्श होतच नाही. मग आनंदस्वरूप, अविनाशी रामांना दुःख इत्यादींचा स्थर्श कसा होईल बरे ? (कारण) दुःख, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, मद इत्यादी सर्व अज्ञानाची चिन्हे आहेत; ती ज्ञानस्वरूप रामांच्या ठिकाणी कशी बरे असतील ? देहाचा अभिमान बाळगणाऱ्यालाच देहाचे दुःख होते; ते दुःख चिदात्म्याला मुळीच होत नाही. (५०-५२)

सम्प्रसादे द्वयाभावात् सुखमात्रं हि दृश्यते ।
बुद्ध्याद्यभावात्संशुद्धे दुःखं तत्र न दृश्यते ।
अतो दुःखादिकं सर्वं बुद्धेरेव न संशयः ॥ ५३ ॥
समाधीच्या स्थितीत (आत्मसाक्षात्कार झाला असताना,) द्वैताचा अभाव होत असल्याने, तेथे केवळ सुखच दिसून येते. त्या आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत बुद्धी इत्यादींचा अभाव असल्यामुळे, दुःख कधीही दिसून येत नाही, म्हणून दुःख इत्यादी सर्व काही बुद्धीचेच गुणधर्म आहेत, यात संशय राहात नाही. (५३)

रामः परात्मा पुरुषः पुराणो
    नित्योदितो नित्यसुखो निरीहः ।
तथापि मायागुणसङ्‌गतोऽसौ
    सुग्रीव दुःखीव विभाव्यतेऽबुधैः ॥ ५४ ॥
श्रीराम हे पुराणपुरुष, परमात्मा, नित्य प्रकाशमान, नित्य सुखस्वरूपी आणि कामनारहित आहेत. तथापि मायेच्या गुणांशी संग झाल्यामुळे ते सुखी अगर दुःखी आहेत, असे अज्ञानी माणसांना वाटत असते. (५४)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥
इति श्रीमद्‌अ्‍अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥


GO TOP