श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकोनत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणस्य देवसेनामध्यतो निर्गमनं, तं निग्रहीतुं देवानां प्रयत्‍नोव, मेघनादस्य माययेन्द्रस्य निग्रहणं, विजयं उपेतस्य तस्य सेनाया सह लङ्‌कां प्रति प्रस्थानम् -
रावणाचे देवसेनेतून मधून जाऊन बाहेर निघणे, देवतांनी त्याला कैद करण्याचा प्रयत्‍न करणे, मेघनादाने मायेच्या द्वारा इंद्रांना बंदी बनविणे आणि विजयी होऊन सेनेसहित लंकेस परतणे -
ततस्तमसि सञ्जाते सर्वे ते देवराक्षसाः ।
अयुद्ध्यन्त बलोन्मत्ताः सूदयन्तः परस्परम् ॥ १ ॥
जेव्हा सर्व बाजूस अंधकार पसरला तेव्हा बलाने उन्मत्त झालेल्या त्या समस्त देवता आणि राक्षस एक दुसर्‍याला मारीत परस्परात युद्ध करू लागले. ॥१॥
ततस्तु देवसैन्येन राक्षसानां बृहद् बलम् ।
दशांशं स्थापितं युद्धे शेषं नीतं यमक्षयम् ॥ २ ॥
त्या समयी देवांच्या सेनेने राक्षसांच्या विशाल सैन्य-समूहाचा केवळ दहावा हिस्सा युद्धभूमीत उभा राहू दिला. शेष सर्व राक्षसांना यमसदनी पोहोचविले. ॥२॥
तस्मिंस्तु तामसे युद्धे सर्वे ते देवराक्षसाः ।
अन्योन्यं नाभ्यजानन्त युध्यमानाः परस्परम् ॥ ३ ॥
त्या तामस युद्धात समस्त देवता आणि राक्षस परस्पराशी झुंजत असतांना एक दुसर्‍याला ओळखू शकत नव्हते. ॥३॥
इन्द्रश्च रावणश्चैव रावणिश्च महाबलः ।
तस्मिंस्तमोजालवृते मोहमीयुर्न ते त्रयः ॥ ४ ॥
इंद्र, रावण आणि रावणपुत्र महाबली मेघनाद - हे तिघेही त्या अंधकाराच्छन्न समरांगणामध्ये मोहित झाले नव्हते. ॥४॥
स तु दृष्ट्‍वा बलं सर्वं रावणो निहतं क्षणात् ।
क्रोधमभ्यगमत् तीव्रं महानादं च मुक्तवान् ॥ ५ ॥
रावणाने पाहिले, माझी सारी सेना क्षणभरात मारली गेली आहे, तेव्हा त्याच्या मनात फार क्रोध आला आणि त्याने फार मोठ्‍याने गर्जना केली. ॥५॥
क्रोधात् सूतं च दुर्धर्षः स्यन्दनस्थमुवाच ह ।
परसैन्यस्य मध्येन यावदन्तो नयस्व माम् ॥ ६ ॥
त्या दुर्जय राक्षसाने (निशाचराने) रथावर बसलेल्या आपल्या सारथ्याला क्रोधपूर्वक म्हटले -सूता ! शत्रुंच्या या सेनेचा जेथे शेवट आहे तेथपर्यंत तू या सेनेच्या मधून मला घेऊन चल. ॥६॥
अद्यैतान् त्रिदशान् सर्वान् विक्रमैः समरे स्वयम् ।
नानाशस्त्रमहासारैः नयामि यमसादनम् ॥ ७ ॥
आज मी स्वतः आपल्या पराक्रमाद्वारे नाना प्रकारच्या शस्त्रांची महान्‌ धारावाहिक वृष्टि करीत या सर्व देवतांना यमलोकी पोहोचवीन. ॥७॥
अहमिन्द्रं वधिष्यामि धनदं वरुणं यमम् ।
त्रिदशान् विनिहत्याशु स्वयं स्थास्याम्यथोपरि ॥ ८ ॥
मी इंद्र, कुबेर, वरुण आणि यमाचाही वध करीन. सर्व देवतांचा शीघ्र संहार करून स्वतः सर्वांच्या वर स्थित होईन. ॥८॥
विषादो नैव कर्तव्यः शीघ्रं वाहय मे रथम् ।
द्विः खलु त्वां ब्रवीम्यद्य यावदन्तं नयस्व माम् ॥ ९ ॥
तू विषाद करता कामा नये. शीघ्र माझा रथ घेऊन चल. मी तुला दोनदां सांगत आहे की देवतांच्या सेनेचा जेथपर्यंत अंत आहे तेथ पर्यंत मला आत्ता घेऊन चल. ॥९॥
अयं स नन्दनोद् देशो यत्र वर्तामहे वयम् ।
नय मामद्य तत्र त्वं उदयो यत्र पर्वतः ॥ १० ॥
हा नंदनवनाचा प्रदेश आहे, जेथे या समयी आपण दोघे उपस्थित आहोत. येथून देवतांच्या सेनेचा आरंभ होत आहे. आता तू मला त्या स्थानापर्यंत घेऊन चल जेथे उदयाचल आहे. (नंदनवनापासून उदयाचलापर्यंत देवतांची सेना पसरलेली आहे.) ॥१०॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा तुरगान् स मनोजवान् ।
आदिदेशाथ शत्रूणां मध्येनैव च सारथिः ॥ ११ ॥
रावणाचे ते वचन ऐकून सारथ्याने मनासमान वेगवान्‌ घोड्‍यांना शत्रुसैन्याच्या मधून हाकले. ॥११॥
तस्य तं निश्चयं ज्ञात्वा शक्रो देवेश्वरस्तदा ।
रथस्थः समरस्थस्तान् देवान् वाक्यमथाब्रवीत् ॥ १२ ॥
रावणाचा हा निश्चय जाणून समरभूमीमध्ये रथावर बसलेल्या देवराज इंद्रांनी त्या देवतांना म्हटले- ॥१२॥
सुराः शृणुत मद्वाक्यं यत् तावन्मम रोचते ।
जीवन्नेव दशग्रीवः साधु रक्षो निगृह्यताम् ॥ १३ ॥
देवगणांनो ! माझे वाक्य ऐका. मला तर हेच चांगले वाटत आहे की या निशाचर दशग्रीवाला जीवित अवस्थेतच उत्तम प्रकारे कैद केले जावे. ॥१३॥
एष ह्यतिबलः सैन्यै रथेन पवनौजसा ।
गमिष्यति प्रवृद्धोर्मिः समुद्र इव पर्वणि ॥ १४ ॥
हा अत्यंत बलशाली राक्षस वायुसमान वेगवान्‌ रथाद्वारा या सेनेच्या मधूनच जाऊन ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी उत्तान तरंगांनी युक्त समुद्र जसा वाढतो, तसा पुढे जात राहील. ॥१४॥
नह्येष हन्तुं शक्योऽद्य वरदानात् सुनिर्भयः ।
तद् ग्रहीष्यामहे रक्षो यत्ता भवत संयुगे ॥ १५ ॥
हा आज मारला जाऊ शकत नाही कारण की ब्रह्मदेवांच्या वरदानाच्या प्रभावाने तो पूर्णतः निर्भय होऊन चुकला आहे. म्हणून आपण या राक्षसाला पकडून कैद करू या. तुम्ही लोक युद्धात या गोष्टीसाठी पूर्ण प्रयत्‍न करा. ॥१५॥
यथा बलौ निरुद्धे च त्रैलोक्यं भुज्यते मया ।
एवमेतस्य पापस्य निरोधो मम रोचते ॥ १६ ॥
जसे राजा बलि बांधला गेल्यावरच मी तीन्ही लोकांच्या राज्याचा उपभोग करीत आहे, त्याच प्रकारे या पापी निशाचराला बंदी बनविले जावे हेच मला योग्य वाटत आहे. ॥१६॥
ततोऽन्यं देशमास्थाय शक्रः सन्त्यज्य रावणम् ।
अयुध्यत महाराज राक्षसान् त्रासयन् रणे ॥ १७ ॥
महाराज श्रीराम ! असे म्हणून इंद्राने रावणाबरोबर युद्ध करणे सोडून दिले आणि दुसरीकडे जाऊन समरांगणात राक्षसांना भयभीत करीत ते त्यांच्याशी युद्ध करू लागले. ॥१७॥
उत्तरेण दशग्रीवः प्रविवेशानिवर्तकः ।
दक्षिणेन तु पार्श्वेन प्रविवेश शतक्रतुः ॥ १८ ॥
युद्धात मागे न सरणार्‍या रावणाने उत्तरेकडून देवसेनेमध्ये प्रवेश केला आणि देवराज इंद्रांनी दक्षिणेकडून राक्षससेनेमध्ये प्रवेश केला. ॥१८॥
ततः स योजनशतं प्रविष्टो राक्षसाधिपः ।
देवतानां बलं सर्वं शरवर्षैरवाकिरत् ॥ १९ ॥
देवतांची सेना चारशे कोसपर्यंत पसरलेली होती. राक्षसराज रावणाने तिच्यामध्ये घुसून संपूर्ण देवसेनेला बाणांच्या वृष्टिने झांकून टाकले. ॥१९॥
ततः शक्रो निरीक्ष्याथ प्रनष्टं तु स्वकं बलम् ।
न्यवर्तयद् असम्भ्रान्तः समावृत्य दशाननम् ॥ २० ॥
आपली विशाल सेना नष्ट होत आहे हे पाहून इंद्रानी जराही न कचरता दशमुख रावणाचा सामना केला आणि त्याला चोहो बाजुनी घेरून युद्धापासून विमुख केले. ॥२०॥
एतस्मिन्नन्तरे नादो मुक्तो दानवराक्षसैः ।
हा हताः स्म इति ग्रस्तं दृष्ट्‍वा शक्रेण रावणम् ॥ २१ ॥
यासमयी रावणाला इंद्राच्या तावडीत सापडलेला पाहून दानव आणि राक्षसांनी हाय ! आम्ही मारले गेलो ! असे म्हणून फार जोराने आर्तनाद केला. ॥२१॥
ततो रथं समास्थाय रावणिः क्रोधमूर्च्छितः ।
तत्सैन्यं अतिसंक्रुद्धः प्रविवेश सुदारुणम् ॥ २२ ॥
तेव्हा रावणाचा पुत्र मेघनाद क्रोधाने जणु बेभान झाला आणि रथावर बसून अत्यंत कुपित होऊन त्याने शत्रूंच्या भयंकर सेनेमध्ये प्रवेश केला. ॥२२॥
तां प्रविश्य महामायां प्राप्तां पशुपतेः पुरा ।
प्रविवेश सुसंरब्धः तत्सैन्यं समभिद्रवत् ॥ २३ ॥
पूर्वी पशुपति महादेवांकडून त्याला जी तमोमय माया प्राप्त झाली होती तिच्यात प्रवेश करून त्याने स्वतःला लपविले आणि अत्यंत क्रोधपूर्वक शत्रुसेनेमध्ये घुसून तिला पिटाळून लावण्यास आरंभ केला. ॥२३॥
स सर्वा देवतास्त्यक्त्वा शक्रमेवाभ्यधावत ।
महेन्द्रश्च महातेजा नापश्यच्च सुतं रिपोः ॥ २४ ॥
तो सर्व देवतांना सोडून इंद्रावर तुटून पडला. परंतु महातेजस्वी इंद्र आपल्या शत्रूच्या त्या पुत्राला पाहू शकले नाहीत. ॥२४॥
विमुक्तकवचस्तत्र वध्यमानोऽपि रावणिः ।
त्रिदशैः सुमहावीर्यैः न चकार च किञ्चन ॥ २५ ॥
महापराक्रमी देवतांकडून मार खाऊन जरी तेथे रावणकुमाराचे कवच नष्ट झाले होते तथापि त्याने आपल्या मनात जराही भय उत्पन्न होऊ दिले नाही. ॥२५॥
स मातलिं समायान्तं ताडयित्वा शरोत्तमैः ।
महेन्द्रं बाणवर्षेण भूय एवाभ्यवाकिरत् ॥ २६ ॥
त्याने आपल्या समोर येणार्‍या मातलिला उत्तम बाणांनी घायाळ करून सायकांची झड लावून पुन्हा देवराज इंद्रालाही झाकून टाकले. ॥२६॥
ततस्त्यक्त्वा रथं शक्रो विससर्ज च सारथिम् ।
ऐरावतं समारुह्य मृगयामास रावणिम् ॥ २७ ॥
तेव्हा इंद्रांनी रथ सोडून सारथ्याला निरोप दिला आणि ऐरावत हत्तीवर आरूढ होऊन ते रावणकुमाराचा शोध घेऊ लागले. ॥२७॥
स तत्र मायाबलवान् अदृश्योऽथान्तरिक्षगः ।
इन्द्रं मायापरिक्षिप्तं कृत्वा स प्राद्रवच्छरैः ॥ २८ ॥
मेघनाद आपल्या मायेमुळे फार प्रबळ झाला होता. तो अदृश्य होऊन आकाशात विचरू लागला आणि इंद्रांना मायेने व्याकुळ करून बाणांच्या द्वारा त्यांच्यावर त्याने आक्रमण केले. ॥२८॥
स तं यदा परिश्रान्तं इन्द्रं जज्ञेऽथ रावणिः ।
तदैनं मायया बद्ध्वा स्वसैन्यमभितोऽनयत् ॥ २९ ॥
रावणकुमाराला जेव्हां इंद्र फार थकून गेले आहेत हे उत्तम प्रकारे कळले तेव्हा मायेने त्यांना बांधून तो आपल्या सेनेमध्ये घेऊन आला. ॥२९॥
तं तु दृष्ट्‍वा बलात् तेन नीयमानं महारणात् ।
महेन्द्रममराः सर्वे किं नु स्यादित्यचिन्तयन् ॥ ३० ॥
महेंद्रांना त्या महासमरात मेघनाद द्वारा बलपूर्वक नेले जात आहे हे पाहून देवता विचार करू लागल्या की आता काय होणार आहे ? ॥३०॥
दृश्यते न स मायावी शक्रजित् समितिञ्जयः ।
विद्यावानपि येनेन्द्रो माययापहृतो बलात् ॥ ३१ ॥
हा युद्धविजयी मायावी राक्षस स्वतःतर दिसून येत नाही आहे म्हणूनच इंद्रावर विजय मिळविण्यात सफल झाला आहे. यद्यपि देवराज इंद्र राक्षसी मायेचा संहार करण्याची विद्या जाणतात, तथापि या राक्षसाने मायाद्वारे बलपूर्वक यांचे अपहरण केले आहे. ॥३१॥
एतस्मिन्नन्तरे क्रुद्धाः सर्वे सुरगणास्तदा ।
रावणं विमुखीकृत्य शरवर्षैरवाकिरन् ॥ ३२ ॥
असा विचार करून त्या सर्व देवता त्या समयी रोषाने भरून गेल्या आणि रावणाला युद्धापासून विमुख करून त्याच्यावर बाणांची वृष्टि करू लागल्या. ॥३२॥
रावणस्तु समासाद्य आदित्यांश्च वसूंस्तदा ।
न शशाक स संग्रामे योद्धुं शत्रुभिरर्दितः ॥ ३३ ॥
रावण आदित्य आणि वसुंचा सामना करण्याची वेळ आल्यावर त्यांच्यापुढे युद्धात उभा राहू शकला नाही कारण की शत्रुनी त्याला फारच पीडित करून टाकले होते. ॥३३॥
स तं दृष्ट्‍वा परिम्लानं प्रहारैर्जर्जरीकृतम् ।
रावणिः पितरं युद्धे दर्शनस्थोऽब्रवीदिदम् ॥ ३४ ॥
मेघानादाने पाहिले की पित्याचे शरीर बाणांच्या प्रहाराने जर्जर झाले आहे आणि ते युद्धात उदास दिसून येत आहेत, तेव्हा तो अदृश्य राहूनच रावणास याप्रकारे म्हणाला - ॥३४॥
आगच्छ तात गच्छामो रणकर्म निवर्तताम् ।
जितं नो विदितं तेऽस्तु स्वस्थो भव गतज्वरः ॥ ३५ ॥
बाबा ! चला या. आता आपण घरी जाऊ या. युद्ध बंद केले जावे. आमचा जय झाला आहे; म्हणून आपण स्वस्थ, निश्चिंत आणि प्रसन्न व्हावे. ॥३५॥
अयं हि सुरसैन्यस्य त्रैलोक्यस्य च यः प्रभुः ।
स गृहीतो दैवबलाद्‌ भग्नदर्पाः सुराः कृताः ॥ ३६ ॥
मी जे देवतांची सेना तसेच तीन्ही लोकांचे स्वामी इंद्र आहेत, त्यांना देवसेनेच्या मध्ये कैद केलेले आहे. असे करून मी देवतांचा दर्प नष्ट करून टाकला आहे. ॥३६॥
यथेष्टं भुङ्‌क्ष्व लोकांन् त्रीन् निगृह्यारातिमोजसा ।
वृथा किं ते श्रमेणेह युद्धमद्य तु निष्फलम् ॥ ३७ ॥
आपण आपल्या शत्रुला बलपूर्वक कैद करून इच्छेनुसार त्रैलोक्याचे राज्य भोगावे. येथे व्यर्थ श्रम करून आपल्याला काय लाभ ? आता युद्धाशी काही प्रयोजन नाही आहे. ॥३७॥
ततस्ते दैवतगणा निवृत्ता रणकर्मणः ।
तच्छ्रुत्वा रावणेर्वाक्यं शक्रहीनाः सुरा गताः ॥ ३८ ॥
मेघनादाचे हे बोलणे ऐकून सर्व देवता युद्धापासून निवृत्त झाल्या आणि इंद्राला बरोबर न घेताच परत गेल्या. ॥३८॥
अथ रणविगतः स उत्तमौजाः
त्रिदशरिपुः प्रथितो निशाचरेन्द्रः ।
स्वसुतवचनमादृतः प्रियं तत्
समनुनिशम्य जगाद चैव सूनुम् ॥ ३९ ॥
आपल्या पुत्राचे हे प्रिय वचन आदरपूर्वक ऐकून महान्‌ बलशाली देवद्रोही तसेच सुविख्यात राक्षसराज रावण युद्धापासून निवृत्त झाला आणि आपल्या मुलाला म्हणाला - ॥३९॥
अतिबलसदृशैः पराक्रमैस्त्वं
मम कुलवंशविवर्धनः प्रभो ।
यदयमतुल्यबलस्त्वयाद्य वै
त्रिदशपतिस्त्रिदशाश्च निर्जिताः ॥ ४० ॥
सामर्थ्यशाली पुत्रा ! आपल्या अत्यंत बलाच्या अनुरूप पराक्रम प्रकट करून आज तू जे या अनुपम बलशाली देवराज इंद्राला जिंकले आहेस आणि देवतांनाही परास्त केले आहेस, यामुळे हे निश्चित ठरले आहे की तू माझे कुळ आणि वंश यांचे यश आणि सन्मानाची वृद्धि करणारा आहेस. ॥४०॥
नय रथमधिरोप्य वासवं नगरं
इतो व्रज सेनया वृतस्त्वम् ।
अहमपि तव पृष्ठतो द्रुतं
सह सचिवैरनुयामि हृष्टवत् ॥ ४१ ॥
मुला ! इंद्राला रथावर बसवून तू सेनेसह येथून लंकापुरीला चल. मी ही आपल्या मंत्र्यांसह तुझ्या मागोमाग येतो आहे. ॥४१॥
अथ स बलवृतः सवाहनः
त्रिदशपतिं परिगृह्य रावणिः ।
स्वभवनमभिगम्य वीर्यवान्
कृतसमरान् विससर्ज राक्षसान् ॥ ४२ ॥
पित्याची ही आज्ञा मिळतांच पराक्रमी रावणकुमार मेघनाद देवराजाला बरोबर घेऊन आणि वाहनांसकट आपल्या निवासस्थानी परत आला . तेथे पोहोचून त्याने युद्धामध्ये भाग घेतलेल्या सर्व निशाचरांना निरोप दिला. ॥४२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ २९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकोणतिसावा सर्ग पूरा झाला. ॥२९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP