श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चविंशत्यधिक शततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हनुमता निषादराजं गुहं श्रीभरतं चोपगम्य श्रीरामागमनस्य सूचनं ततः प्रसन्नेन भरतेन तस्मा उपहारं दातुं उद्घोतषणां च -
हनुमानांनी निषादराज गुह तसेच भरतांना श्रीरामांच्या आगमनाची सूचना देणे आणि प्रसन्न झालेल्या भरतांनी त्यांना उपहार देण्याची घोषणा करणे -
अयोध्यां तु समालोक्य चिन्तयामास राघवः ।
प्रियकामः प्रियं रामः ततस्त्वरितविक्रमः ॥ १ ॥
(भरद्वाज आश्रमावर उतरण्यापूर्वी) विमानांतूनच अयोध्यापुरीचे दर्शन करून अयोध्यावासी लोक आणि सुग्रीव आदिंचे प्रिय करण्याची इच्छा असणार्‍या शीघ्र पराक्रमी राघवांनी असा विचार केला की या सर्वांचे प्रिय कसे होईल ? ॥१॥
चिन्तयित्वा ततो दृष्टिं वानरेषु न्यपातयत् ।
उवाच धीमान् तेजस्वी हनूमन्तं प्लवंगमम् ॥ २ ॥
विचार करून तेजस्वी आणि बुद्धिमान्‌ श्रीरामांनी वानरांवर दृष्टि टाकली आणि वानरवीर हनुमानास म्हटले- ॥२॥
अयोध्यां त्वरितो गत्वा शीघ्रं प्लवगसत्तम ।
जानीहि कच्चित् कुशली जनो नृपतिमन्दिरे ॥ ३ ॥
कपिश्रेष्ठ ! तू शीघ्रच अयोध्येत जाऊन पत्ता लाव की राजभवनात सर्व लोक सकुशल तर आहेत ना ? ॥३॥
शृंगवेरपुरं प्राप्य गुहं गहनगोचरम् ।
निषादाधिपतिं ब्रूहि कुशलं वचनान्मम ॥ ४ ॥
शृंगवेरपुरात पोहोचून वनवासी निषादराज गुहाला भेट आणि माझ्या वतीने कुशल सांग. ॥४॥
श्रुत्वा तु मां कुशलिनं अरोगं विगतज्वरम् ।
भविष्यति गुहः प्रीतः स ममात्मसमः सखा ॥ ५ ॥
मी सकुशल, निरोगी आणि चिंतारहित आहे हे ऐकून निषादराज गुहाला प्रसन्नता वाटेल कारण तो माझा मित्र आहे. माझ्यासाठी आत्म्याप्रमाणे आहे. ॥५॥
अयोध्यायाश्च ते मार्गं प्रवृत्तिं भरतस्य च ।
निवेदयिष्यति प्रीतो निषादाधिपतिर्गुहः ॥ ६ ॥
निषादराज गुह प्रसन्न होऊन तुम्हाला अयोध्येचा मार्ग आणि भरताचा समाचार सांगतील. ॥६॥
भरतस्तु त्वया वाच्यः कुशलं वचनान्मम ।
सिद्धार्थं शंस मां तस्मै सभार्यं सहलक्ष्मणम् ॥ ७ ॥
भरताजवळ जाऊन तू माझ्या वतीने त्यांचे कुशल विचार आणि त्यांना सीता तसेच लक्ष्मणासह मी सफल मनोरथ होऊन परत आल्याचा समाचार सांग. ॥७॥
हरणं चापि वैदेह्या रावणेन बलीयसा ।
सुग्रीवेण च संवादं वालिनश्च वधं रणे ॥ ८ ॥

मैथिल्यन्वेषणं चैव यथा चाधिगता त्वया ।
लङ्‌घयित्वा महातोयं आपगापतिमव्ययम् ॥ ९ ॥

उपयानं समुद्रस्य सागरस्य च दर्शनम् ।
यथा च कारितः सेतू रावणश्च यथा हतः ॥ १० ॥

वरदानं महेन्द्रेण ब्रह्मणा वरुणेन च ।
महादेवप्रसादाच्च पित्रा मम समागमम् ॥ ११ ॥
बलवान्‌ रावणांच्या द्वारे झालेले सीतेचे हरण, सुग्रीवाशी झालेला संवाद, रणभूमीवर झालेला वालीचा वध, सीतेचा शोध, तुम्ही जो महान्‌ जलराशीने भरलेला अपार महासागर उल्लंघून ज्याप्रकारे सीतेचा शोध लावला होता त्याचे, नंतर मी समुद्रतटावर गेल्याचे, सागराने दर्शन दिल्याचे, त्यावर पूल बनविण्याचे, रावणाच्या वधाचे, इंद्र, ब्रह्मदेव आणि वरूण यांच्या झालेल्या भेटीचे तसेच वरदान प्राप्त झाल्याचे आणि महादेवांच्या प्रसादाने पित्याचे दर्शन झाल्याचे वगैरे सर्व वृत्त त्यांना ऐकवा. ॥८-११॥
उपयातं च मां सौम्य भरतस्य निवेदय ।
सह राक्षसराजेन हरीणां ईश्वरेण च ॥ १२ ॥

जित्वा शत्रुगणान् रामः प्राप्य चानुत्तमं यशः ।
उपायाति समृद्धार्थः सह मित्रैर्महाबलैः ॥ १३ ॥
सौम्य ! नंतर हे ही निवेदन करा की श्रीराम शत्रूंना जिंकून, परम उत्तम यश मिळवून, सफल मनोरथ होऊन राक्षसराज विभीषण, वानरराज सुग्रीव तसेच आपल्या अन्य महाबली मित्रांसह येत आहेत आणि प्रयागापर्यंत येऊन पोहोचले आहेत. ॥१२-१३॥
एतच्छुत्वा यमाकारं भजते भरतस्ततः ।
स च ते वेदितव्यः स्यात् सर्वं यच्चापि मां प्रति ॥ १४ ॥
ही गोष्ट ऐकतांना भरताची जशी मुख-मुद्रा होईल, त्यावर लक्ष ठेवा आणि समजून घ्या तसेच भरताचे माझ्या प्रति जे कर्तव्य अथवा वर्तन असेल ते ही जाणून घेण्याचा प्रयत्‍न करा. ॥१४॥
ज्ञेयाः सर्वे च वृत्तान्ता भरतस्येङ्‌गितानि च ।
तत्त्वेन मुखवर्णेन दृष्ट्या व्याभाषितेन च ॥ १५ ॥
तेथील सर्व वृत्तांत तसेच भरताचे आचरण तुम्ही यथार्थरूपाने जाणून घेतले पाहिजे. मुखाची कान्ति, दृष्टि आणि संभाषणाने त्यांचा मनोभाव समजण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. ॥१५॥
सर्वकामसमृद्धं हि हस्त्यश्वरथसङ्‌कुलम् ।
पितृपैतामहं राज्यं कस्य नावर्तयेन्मनः ॥ १६ ॥
समस्त मनोवांछित भोगांनी संपन्न तसेच हत्ती, घोडे आणि रथांनी परिपूर्ण बाप-आज्यांचे राज्य सुलभ झाले तर ते कुणाच्या मनात बदल घडविणार नाही ? ॥१६॥
सङ्‌गत्या भरतः श्रीमान् राज्येनार्थी स्वयं भवेत् ।
प्रशास्तु वसुधां कृत्स्नां अखिलां रघुनन्दनः ॥ १७ ॥
जर कैकेयीची संगति आणि चिरकाळपर्यंत संसर्ग होण्याने श्रीमान्‌ भरत स्वतःच राज्य प्राप्त करण्याची इच्छा करत असतील तर ते रघुनंदन भरत खुशाल समस्त भूमण्डाचे राज्य करोत. (मला ते राज्य घ्यावयाचे नाही. अशा स्थितीत आम्ही अन्यत्र कोठे तरी जाऊन तपस्वी जीवन व्यतीत करू.) ॥१७॥
तस्य बुद्धिं च विज्ञाय व्यवसायं च वानर ।
यावन्न दूरं याताः स्मः क्षिप्रमागन्तुमर्हसि ॥ १८ ॥
वानरवीर ! तुम्ही भरतांचे विचार आणि निश्चय जाणून घेऊन जो पर्यंत आम्ही या आश्रमापासून दूर निघून जात नाही, तत्पूर्वी शीघ्र परत यावे. ॥१८॥
इति प्रतिसमादिष्टो हनुमान् मारुतात्मजः ।
मानुषं धारयन् रूपं अयोध्यां त्वरितो ययौ ॥ १९ ॥
श्रीरघुनाथांनी या प्रकारे आदेश दिल्यावर पवनपुत्र हनुमान्‌ मनुष्याचे रूप धारण करून तीव्रगतिने अयोध्येकडे जाण्यास निघाले. ॥१९॥
अथोत्पपात वेगेन हनुमान् मारुतात्मजः ।
गरुत्मानिव वेगेन जिघृक्षन् उरगोत्तमम् ॥ २० ॥
ज्याप्रमाणे गरूड एखाद्या श्रेष्ठ सर्पाला पकडण्यासाठी अत्यंत वेगाने झडप घालतो त्याप्रमाणे पवनपुत्र हनुमान्‌ तीव्र वेगाने उडत निघाले. ॥२०॥
लङ्‌घयित्वा पितृपथं भुजगेन्द्रालयं शुभम् ।
गङ्‌गायमुनयोर्भीमं समतीत्य समागमम् ॥ २१ ॥

शृङ्‌गिबेरपुरं प्राप्य गुहमासाद्य वीर्यवान् ।
स वाचा शुभया हृष्टो हनुमानिदमब्रवीत् ॥ २२ ॥
आपला पिता- वायु याच्या मार्गाने, जे पक्षिराज गरूडाचे सुंदर गृह आहे त्या आंततिक्षाला ओलांडून गंगा आणि यमुनेच्या वेगशाली संगमाला पार करून शृंगवेरपुरात पोहोचून पराक्रमी हनुमान्‌ निषादराज गुहाला भेटले आणि अत्यंत हर्षाने सुंदर वाणीमध्ये म्हणाले - ॥२१-२२॥
सखा तु तव काकुत्स्थो रामः सत्यपराक्रमः ।
सहसीतः ससौमित्रिः स त्वां कुशलमब्रवीत् ॥ २३ ॥

पञ्चमीमद्य रजनीं उषित्वा वचनान्मुनेः ।
भरद्वाजाभ्यनुज्ञातं द्रक्ष्यस्यत्रैव राघवम् ॥ २४ ॥
तुमचे मित्र सत्यपराक्रमी काकुत्स्थ श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासहित येत आहेत आणि त्यांनी तुम्हांला आपला कुशल समाचार कळविला आहे. ते प्रयागमध्ये आहेत आणि भरद्वाज मुनिंच्या सांगण्यावरून त्यांच्याच आश्रमात आज पञ्चमीची रात्र घालवून उद्या त्यांची आज्ञा घेऊन ते तेथून निघतील. तुम्हांला येथेच राघवांचे दर्शन होईल. ॥२३-२४॥
एवमुक्त्वा महातेजाः सम्प्रहृष्टतनूरुहः ।
उत्पपात महावेगाद् वेगवानविचारयन् ॥ २५ ॥
गुहाला असे सांगून महातेजस्वी आणि वेगवान्‌ हनुमान्‌ काहीही विचार न करता अत्यंत वेगाने पुढे उडत निघाले. त्या समयी त्यांच्या सर्व अंगावर हर्षजनित रोमाञ्च येत होते. ॥२५॥
सोऽपश्यद् रामतीर्थं च नदीं वालुकिनीं तथा ।
गोमतीं तां च सोऽपश्यद् भीमं सालवनं तथा ॥ २६ ॥
मार्गात त्यांना परशुराम तीर्थ, बालुकिनी नदी, वरूथी, गोमती (नदी) आणि भयानक सालवनाचे दर्शन झाले. ॥२६॥
प्रजाश्च बहुसाहस्रीः स्फीतान् जनपदानपि ।
स गत्वा दूरमध्वानं त्वरितः कपिकुञ्जरः ॥ २७ ॥

आससाद द्रुमान् फुल्लान् नन्दिग्रामसमीपगान् ।
सुराधिपस्योपवने यथा चैत्ररथे द्रुमान् ॥ २८ ॥
कित्येक सहस्त्र प्रजा तसेच समृद्धिशाली जनपदांना पहात कपिश्रेष्ठ हनुमान्‌ तीव्रगतीने फार दूरवरचा रस्ता ओलांडून गेले आणि नंदिग्रामाच्या समीपवर्ती फुललेल्या वृक्षांच्या जवळ जाऊन पोहोचले. ते वृक्ष देवराज इंद्रांच्या नंदनवन आणि कुबेरांच्या चैत्ररथ वनांतील वृक्षांप्रमाणे सुशोभित होत होते. ॥२७-२८॥
स्त्रिभिः सपुत्रैः पौत्रैश्च रममाणेः स्वलंकृतैः ।
क्रोशमात्रे त्वयोध्यायाः चीरकृष्णाजिनाम्बरम् ॥ २९ ॥

ददर्श भरतं दीनं कृशमाश्रमवासिनम् ।
जटिलं मलदिग्धाङ्‌गं भ्रातृव्यसनकर्शितम् ॥ ३० ॥

फलमूलाशिनं दान्तं तापसं धर्मचारिणम् ।
समुन्नतजटाभारं वल्कलाजिनवाससम् ॥ ३१ ॥

नियतं भावितात्मानं ब्रह्मर्षिसमतेजसम् ।
पादुके ते पुरस्कृत्य प्रशासन्तं वसुन्धराम् ॥ ३२ ॥
त्यांच्या आसपास बर्‍याचशा स्त्रिया आपल्या वस्त्राभूषणांनी उत्तमप्रकारे अलंकृत झालेल्या पुत्र आणि पौत्रांसह विचरत होत्या आणि त्या वृक्षांची फुले वेचत होत्या. अयोध्येपासून एक कोसाच्या अंतरावर त्यांनी आश्रमवासी भरतांना पाहिले. ज्यांनी चीरवस्त्र आणि काळे मृगचर्म धारण केलेले असून जे दुःखी तसेच दुर्बळ दिसून येत होते. त्यांच्या मस्तकावर जटा वाढलेल्या होत्या, शरीर मळलेले होते, भावाच्या वनवासाच्या दुःखाने त्यांना फारच कृश करून टाकले होते; फळे मूळे हेच त्यांचे भोजन होते. ते इंद्रियांचे दमन करून तपस्येमध्ये लागलेले होते आणि धर्माचे आचरण करत होते. मस्तकावरील जटाभार फारच उंच दिसत होता, वल्कले आणि मृगचर्माने त्यांचे शरीर झाकलेले होते. ते अत्यंत नियमपूर्वक राहात होते. त्यांचे आंतःकरण शुद्ध होते आणि ते ब्रह्मर्षिप्रमाणे तेजस्वी वाटत होते. राघवांच्या दोन्ही चरण पादुकांना पुढे ठेवून ते पृथ्वीचे शासन करत होते. ॥२९-३२॥
चातुर्वर्ण्यस्य लोकस्य त्रातारं सर्वतो भयात् ।
उपस्थितममात्यैश्च शुचिभिश्च पुरोहितैः ॥ ३३ ॥

बलमुख्यैश्च युक्तैश्च काषायाम्बरधारिभिः ।
भरत चारी वर्णांच्या प्रजांना सर्व प्रकारच्या भयापासून सुरक्षित ठेवत होते. त्यांच्या जवळील मंत्री, पुरोहित आणि सेनापतिही योगयुक्त होऊन राहात होते आणि भगवी वस्त्रे नेसत होते. ॥३३ १/२॥
न हि ते राजपुत्रं तं चीरकृष्णाजिनाम्बरम् ॥ ३४ ॥

परिभोक्तुं व्यवस्यन्ति पौरा वै धर्मवत्सलाःम् ।
अयोध्येचे ते धर्मानुरागी पुरवासी सुद्धा त्या चीर आणि काळे मृगचर्म धारण करणार्‍या राजकुमार भरताला या दशेत सोडून स्वयं भोग भोगण्याची इच्छा करीत नव्हते. ॥३४ १/२॥
तं धर्मं इव धर्मज्ञं देहबन्धं इन्तमिवापरम् ॥ ३५ ॥

उवाच प्राञ्जलिर्वाक्यं हनुमान् मारुतात्मजः ।
मनुष्यदेह धारण करून आलेल्या दुसर्‍या धर्माप्रमाणे ते त्या धर्मज्ञ भरताजवळ पोहोचले आणि पवनपुत्र हनुमान‌ हात जोडून म्हणाले - ॥३५ १/२॥
वसन्तं दण्डकारण्ये यं त्वं चीरजटाधरम् ॥ ३६ ॥

अनुशोचसि काकुत्स्थं स त्वां कौशलमब्रवीत् ।
प्रियमाख्यामि ते देव शोकं त्यज सुदारुणम् ॥ ३७ ॥

अस्मिन् मुहूर्ते भ्रात्रा त्वं रामेण सह सङ्‌गतः ।
देवा ! आपण दण्डकारण्यात चीर-वस्त्रे आणि जटा धारण करून राहिलेल्या ज्या काकुत्स्थांसाठी निरंतर चिंतित राहात होतात, त्यांनी आपल्याला स्वतःचा कुशल-समाचार कळविला आहे आणि आपलाही विचारला आहे. आता आपण या अत्यंत दारूण शोकाचा त्याग करावा. मी आपल्याला अत्यंत प्रिय समाचार ऐकवीत आहे. आपण अगदी लवकरात लवकर आपले भाऊ श्रीरामास भेटाल. ॥३६-३७ १/२॥
निहत्य रावणं रामः प्रतिलभ्य च मैथिलीम् ॥ ३८ ॥

उपयाति समृद्धार्थः सह मित्रैर्महाबलैः ।
लक्ष्मणश्च महातेजा वैदेही च यशस्विनी ।
सीता समग्रा रामेण महेन्द्रेण शची यथा ॥ ३९ ॥
भगवान्‌ श्रीराम रावणाला मारून मैथिलीला परत प्राप्त करून सफल मनोरथ होऊन आपल्या महाबली मित्रांसह येत आहेत. त्यांच्या बरोबर महातेजस्वी लक्ष्मण आणि यशस्विनी वैदेही सुद्धा आहे. ज्याप्रमाणे देवराज इंद्रांच्या बरोबर शची शोभा प्राप्त करते त्याप्रमाणे श्रीरामांच्या बरोबर पूर्णकामा सीताही सुशोभित होत आहे. ॥३८-३९॥
एवमुक्तो हनुमता भरतः कैकयीसुतः ।
पपात सहसा हृष्टो हर्षान्मोहं उपागमत् ॥ ४० ॥
हनुमानांनी असे म्हटल्यावर कैकेयीकुमार भरत एकाएकी आनंदविभोर होऊन पृथ्वीवर पडले आणि हर्षाने मूर्च्छित झाले. ॥४०॥
ततो मुहूर्तादुत्थाय प्रत्याश्वस्य च राघवः ।
हनुमन्तं उवाचेदं भरतः प्रियवादिनम् ॥ ४१ ॥

अशोकजैः प्रीतिमयैः कपिमालिङ्‌ग्य सम्भ्रमात् ।
सिषेच भरतः श्रीमान् विपुलैरश्रुबिन्दुभिः ॥ ४२ ॥
त्यानंतर एका मुहूर्ताने ते शुद्धिवर आले आणि ते उठून उभे राहिले. त्या समयी राघव श्रीमान्‌ भरतांनी प्रियवादी हनुमानांना वेगाने पकडून दोन्ही भुजांनी हृदयाशी धरले आणि शोक-संसर्ग रहित परमानंदजनित विपुल अश्रुबिंदुनी त्यांना न्हाऊ घालू लागले. मग याप्रकारे बोलले - ॥४१-४२॥
देवो वा मानुषो वा त्वं अनुक्रोशादिहागतः ।
प्रियाख्यानस्य ते सौम्य ददामि ब्रुवतः प्रियम् ॥ ४३ ॥
हे बंधो ! तुम्ही कुणि देवता आहात की मनुष्य आहात जे माझ्यावर कृपा करून येथे आला आहात ? तुम्ही हा जो प्रिय संवाद ऐकविला आहे याच्या बदल्यात मी तुम्हांला कोणती प्रिय वस्तु प्रदान करूं ? (मला तर असा कोणताही बहुमूल्य उपहार दिसून येत नाही जो या प्रिय संवादाची बरोबरी करु शकेल.) ॥४३॥
गवां शतसहस्रं च ग्रामाणां च शतं परम् ।
सुकुण्डलाः शुभाचारा भार्याः कन्याश्च षोडश ॥ ४४ ॥

हेमवर्णाः सुनासोरूः शशिसौम्याननाः स्त्रियः ।
सर्वाभरणसम्पन्नाः सम्पन्नाः कुलजातिभिः ॥ ४५ ॥
(तथापि) मी तुम्हांला यासाठी एक लाख गाई, शंभर उत्तम गावे आणि उत्तम आचार-विचाराच्या सोळा कुमारी कन्या पत्‍नींच्या रूपामध्ये समर्पित करीत आहे. त्या कन्यांच्या कानांमध्ये सुंदर कुण्डले झगमगत असतील. त्यांची अंगकांति सुवर्णासमान असेल. त्यांची नासिका सुघडत, उरू मनोहर आणि मुखे चंद्रम्यासमान सुंदर असतील. त्या कुलीन असण्याबरोबरच सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित असतील. ॥४४-४५॥
निशम्य रामागमनं नृपात्मजः
कपिप्रवीरस्य तदाद्‌भुवतोपमम् ।
प्रहर्षितो रामदिदृक्षयाभवत्
पुनश्च हर्षाद् इदमब्रवीद् वचः ॥ ४६ ॥
त्या प्रमुख वानर-वीर हनुमानांच्या मुखाने श्रीरामांच्या आगमनाचा अद्‍भुत समाचार ऐकून राजकुमार भरतांना श्रीरामांच्या दर्शनाच्या इच्छेने अत्यंत हर्ष झाला आणि त्या हर्षातिरेकाने ते परत या प्रकारे बोलले - ॥४६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चविंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशें पंचविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP