श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रिषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण शत्रुघ्नस्य मधुराराज्येऽभिषेचनं लवणशूलाद् आत्मरक्षां कर्तुं उपायस्य तं प्रति कथनं च -
श्रीरामांच्या द्वारा शत्रुघ्नाचा राज्याभिषेक तसेच त्यांना लवणासुराच्या शूळापासून वाचण्याच्या उपायाचे प्रतिपादन -
एवमुक्तस्तु रामेण परां व्रीडामुपागमत् ।
शत्रुघ्नो वीर्यसम्पन्नो मन्दं मन्दमुवाच ह ॥ १ ॥
श्रीरामांनी असे सांगितल्यावर बल-विक्रम संपन्न शत्रुघ्न फार लज्जित झाले आणि हळू हळू बोलले - ॥१॥
अधर्मं विद्म काकुत्स्थ अस्मिन्नर्थे नरेश्वर ।
कथं तिष्ठत्सु ज्येष्ठेषु कनीयानभिषिच्यते ॥ २ ॥
काकुत्स्थ ! नरेश्वर ! या अभिषेकाचा स्वीकार करण्यात तर मला अधर्म वाटत आहे. मोठे भाऊ असतांना (छोट्‍याचा) लहानाचा अभिषेक कसा केला जाऊ शकतो ? ॥२॥
अवश्यं करणीयं च शासनं पुरुषर्षभ ।
तव चैव महाभाग शासनं दुरतिक्रमम् ॥ ३ ॥
तथापि पुरुषप्रवर ! महाभाग ! आपल्या आज्ञेचे पालन तर मला अवश्य करायलाच पाहिजे. आपले शासन कुणासाठीही दुर्लंघ्य आहे. ॥३॥
त्वत्तो मया श्रुतं वीर श्रुतिभ्यश्च मया श्रुतम् ।
नोत्तरं हि मया वाच्यं मध्यमे प्रतिजानति ॥ ४ ॥
वीरा ! मी आपल्याकडून तसेच वेदवाक्यातूनही ही गोष्ट ऐकली आहे. वास्तविक मधल्या बंधुने प्रतिज्ञा केल्यावर मी काही ही बोलावयास नको होते. ॥४॥
व्याहृतं दुर्वचो घोरं हन्तास्मि लवणं मृधे ।
तस्यैवं मे दुरुक्तस्य दुर्गतिः पुरुषर्षभ ॥ ५ ॥
माझ्या तोंडातून हे फार अनुचित शब्द निघून गेले की मी लवणासुराला मारीन. पुरुषोत्तम ! त्या अनुचित कथनाचाच परिणाम आहे की माझी याप्रकारे दुर्गति होऊन राहिली आहे. (मला वडील बंधु असतांनाही अभिषिक्त व्हावे लागत आहे.) ॥५॥
उत्तरं नहि वक्तव्यं ज्येष्ठेनाभिहिते पुनः ।
अधर्मसहितं चैव परलोकविवर्जितम् ॥ ६ ॥
मोठ्‍या भावाच्या बोलण्यावर मी नंतर काही उत्तर द्यावयास नको होते. (अर्थात भरतदादाने जेव्हा लवणाला मारण्याचा निर्णय केलेला होता, तेव्हा मला त्याच्यात दखल ध्यावयास नको होती.) परंतु मी या नियमाचे उल्लंघन केले म्हणून आपण असा (राज्याभिषेक विषयक) आदेश दिला आहे. जो स्वीकार केल्यावर माझ्यासाठी अधर्मयुक्त असल्याने परलोक लाभापासूनही वंचित करणारा आहे, तथापि आपली आज्ञा माझ्यासाठी दुर्लंघ्य आहे म्हणून मला याचा स्वीकार करावाच लागेल. ॥६॥
सोऽहं द्वितीयं काकुत्स्थ न वक्ष्यामिति चोत्तरम् ।
मा द्वितीयेन दण्डो वै निपतेन्मयि मानद ॥ ७ ॥
काकुत्स्थ ! आता आपली जी आज्ञा होऊन चुकली आहे, तिच्या विरूद्ध मी दुसरे काही उत्तर देणार नाही. मानद ! असे न व्हावे की दुसरे काही उत्तर दिल्यावर मला याहूनही कठोर दण्ड भोगावा लागेल. ॥७॥
कामकारो ह्यहं राजन् तवास्मि पुरुषर्षभ ।
अधर्मं जहि काकुत्स्थ मत्कृते रघुनन्दन ॥ ८ ॥
राजन्‌ ! पुरुषश्रेष्ठ ! रघुनंदन ! मी आपल्या इच्छेला अनुसरूनच कार्य करीन. परंतु यात माझ्यासाठी जो अधर्म प्राप्त होत आहे, त्याचा नाश आपण करावा. ॥८॥
एवमुक्ते तु शूरेण शत्रुघ्नेन महात्मना ।
उवाच रामः संहृष्टो भरतं लक्ष्मणं तथा ॥ ९ ॥
शूरवीर महात्मा शत्रुघ्नाने असे म्हटल्यावर श्रीराम फार संतुष्ट झाले (प्रसन्न झाले) आणि भरत तसेच लक्ष्मण आदिंना म्हणाले - ॥९॥
सम्भारानभिषेकस्य आनयध्वं समाहिताः ।
अद्यैव पुरुषव्याघ्रं अभिषेक्ष्यामि राघवम् ॥ १० ॥
तुम्ही सर्व अत्यंत सावधानतेने राज्याभिषेकाची सामग्री जुळवून घेऊन या. मी आत्ता रघुकुळनंदन पुरुषसिंह शत्रुघ्नाचा अभिषेक करीन. ॥१०॥
पुरोधसंतं च काकुत्स्थ नैगमान् ऋत्विजस्तथा ।
मन्त्रिणश्चैव तान्सर्वान् आनयध्वं ममाज्ञया ॥ ११ ॥
काकुत्स्थ ! माझ्या आज्ञेने पुरोहित, वैदिक विद्वान, ऋत्विज आणि समस्त मंत्र्यांना बोलावून आणा. ॥११॥
राज्ञः शासनमाज्ञाय तथाऽकुर्वन्महारथाः ।
अभिषेकसमारम्भं पुरस्कृत्य पुरोधसम् ॥ १२ ॥

प्रविष्टा राजभवनं राजानो ब्राह्मणास्तथा ।
महाराजांची आज्ञा मिळताच महारथी भरत आणि लक्ष्मण आदिनी तसेच केले. ते पुरोहितांना पुढे घालून अभिषेकाची सामग्री बरोबर घेऊन राजभवनात आले. त्यांच्याच बरोबर बरेचसे राजे आणि ब्राह्मणही तेथे येऊन पोहोचले. ॥१२ १/२॥
तथोऽभिषेको ववृधे शत्रुघ्नस्य महात्मनः ॥ १३ ॥

सम्प्रहर्षकरः श्रीमान् राघवस्य पुरस्य च ।
त्यानंतर महात्मा शत्रुघ्नाचा वैभवशाली अभिषेक आरंभ झाला, जो राघवांचा तसेच समस्त पुरवासी लोकांचा हर्ष वाढविणारा होता. ॥१३ १/२॥
अभिषिक्तस्तु काकुत्स्थो बभौ चादित्यसन्निभः ॥ १४ ॥

अभिषिक्तः पुरा स्कन्दः सेन्द्रैरिव दिवौकसैः ।
जसा पूर्वकाळी इंद्र आणि देवतांनी स्कंदाचा देवसेनापति पदावर अभिषेक केला होता त्याप्रकारे काकुत्स्थ श्रीराम आदिनी तेथे शत्रुघ्नाचा राजाच्या पदावर अभिषेक केला. याप्रकारे अभिषिक्त होऊन शत्रुघ्न सूर्यासमान सुशोभित झाले. ॥१४ १/२॥
अभिषिक्ते तु शत्रुघ्ने रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ १५ ॥

पौराः प्रमुदिताश्चासन् ब्राह्मणाश्च बहुश्रुताः ।
क्लेशरहित कर्म करणार्‍या श्रीरामांच्या द्वारे जेव्हा शत्रुघ्नांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्या नगरातील निवासी लोक आणि बहुश्रुत ब्राह्मणांना फार प्रसन्नता वाटली. ॥१५ १/२॥
कौसल्या च सुमित्रा च मङ्‌गलं केकयी तथा ॥ १६ ॥

चक्रुस्ता राजभवने याश्चान्या राजयोषितः ।
यासमयी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी तसेच राजभवनांतील अन्य राजमहिलांनी मिळून मंगलकार्य संपन्न केले. ॥१६ १/२॥
ऋषयश्च महात्मानो यमुनातीरवासिनः ॥ १७ ॥

हतं लवणमाशंसुः शत्रुघ्नस्याभिषेचनात् ।
शत्रुघ्नांचा राज्याभिषेक होण्याने यमुनातीर निवासी महात्मा ऋषिंचा हा निश्चय झाला की आता लवणासुर मारला गेला. ॥१७ १/२॥
ततोऽभिषिक्तं शत्रुघ्नं अङ्‌कमारोप्य राघवः ।
उवाच मधुरां वाणीं तेजस्तस्याभिपूरयन् ॥ १८ ॥
अभिषेकानंतर शत्रुघ्नाला मांडीवर बसवून राघवांनी त्यांच्या तेजाची वृद्धि करत मधुर वाणीमध्ये म्हटले - ॥१८॥
अयं शरस्त्वमोघस्ते दिव्यः परपुरञ्जयः ।
अनेन लवणं सौम्य हन्ताऽसि रघुनन्दन ॥ १९ ॥
रघुनंदन ! सौम्य शत्रुघ्ना ! मी तुला हा दिव्य अमोघ बाण देत आहे. तू याच्याद्वारे लवणासुराला मारून टाकशील. ॥१९॥
सृष्टः शरोऽयं काकुत्स्थ यदा शेते महार्णवे ।
स्वयम्भूरजितो देवो यन्नापश्यन्सुरासुराः ॥ २० ॥

अदृश्यः सर्वभूतानां तेनायं तु शरोत्तमः ।
सृष्टः क्रोधाभिभूतेन विनाशार्थं दुरात्मनोः ॥ २१ ॥

मधुकैटभयोर्वीर विघाते सर्वरक्षसाम् ।
स्रष्टुकामेन लोकांस्त्रीन् तौ चानेन हतौ युधि ॥ २२ ॥

तौ हत्वा जनभोगार्थे कैटभं तु मधुं तथा ।
अनेन शरमुख्येन ततो लोकांश्चकार सः ॥ २३ ॥
काकुत्स्थ ! मागील प्रलयकालात जेव्हा कुणाकडूनही पराजित न होणार्‍या अजन्मा तसे दिव्यरूपधारी भगवान्‌ विष्णु महान्‌ एकार्णवात जलात शयन करीत होते त्या समयी त्यांना देवता आणि असुर कोणीही बघू शकत नव्हते. ते संपूर्ण भूतांसाठी अदृश्य होते. वीरा ! त्याच वेळी त्या भगवान्‌ नारायणांनी कुपित होऊन दुरात्मा मधु आणि कैटभाच्या विनाशासाठी समस्त राक्षसांच्या संहारासाठी या दिव्य उत्तम तसेच अमोघ बाणाची सृष्टि केली होती. त्या समयी ते तिन्ही लोकांची सृष्टि करण्याची इच्छा करत होते आणि मधु, कैटभ तसेच अन्य सर्व राक्षस त्यात विघ्न उपस्थित करीत होते. म्हणून भगवंतांनी याच बाणानी मधु आणि कैटभ दोघांना युद्धात मारले होते. या मुख्य बाणाने मधु आणि कैटभ दोघांना मारून भगवंतानी जीवांच्या कर्मफळ भोगाच्या सिद्धिसाठी विभिन्न लोकांची रचना केली. ॥२०-२३॥
नायं मया शरः पूर्वं रावणस्य वधार्थिना ।
मुक्तः शत्रुघ्न भूतानां महान् ह्रासो भवेदिति ॥ २४ ॥
शत्रुघ्ना ! पूर्वी मी रावणाचा वध करण्यासाठीही या बाणाचा प्रयोग केला नव्हता, कारण की याद्वारे बर्‍याच प्राण्यांचा नाश होण्याची आशंका होती. ॥२४॥
यच्च तस्य महच्छूलं त्र्यम्बकेण महात्मना ।
दत्तं शत्रुविनाशाय मधोरायुधमुत्तमम् ॥ २५ ॥

तत् संनिक्षिप्य भवने पूज्यमानं पुनः पुनः ।
दिशः सर्वाः समासाद्य प्राप्नोत्याहारमुत्तमम् ॥ २६ ॥
लवणाच्या जवळ जो महात्मा महादेवांचा शत्रुविनाशासाठी दिलेला मधुचा दिव्य, उत्तम आणि महान्‌ शूल आहे, त्याचे तो वारंवार पूजन करीत असतो आणि तो महालातच गुप्तरूपात ठेवून समस्त दिशांमध्ये फिरत आपल्यासाठी उत्तम आहाराचा संग्रह करीत असतो. ॥२५-२६॥
यदा तु युद्धमाकाङ्‌क्षन् कश्चिदेनं समाह्वयेत् ।
तदा शूलं गहीत्वा तं भस्म रक्षः करोति हि ॥ २७ ॥
जर कोणी युद्धाची इच्छा ठेवून त्याला ललकारले तर त्यावेळी तो राक्षस तो शूल घेऊन आपल्या विपक्षीला भस्म करून टाकतो. ॥२७॥
स त्वं पुरुषशार्दूल तमायुधविनाकृतम् ।
अप्रविष्टं पुरं पूर्वं द्वारि तिष्ठ धृतायुधः ॥ २८ ॥
पुरुषसिंह ! ज्यावेळी तो शूल त्याच्याजवळ नसेल आणि तो नगरांतही पोहोचू शकत नसेल, त्यासमयी आधीच नगराच्या द्वारावर जाऊन अस्त्रे-शस्त्रे धारण करून त्याच्या प्रतिक्षेमध्ये तेथे खिळून रहा. ॥२८॥
अप्रविष्टं च भवनं युद्धाय पुरुषर्षभ ।
आह्वयेथा महाबाहो ततो हन्तासि राक्षसम् ॥ २९ ॥
महाबाहु ! पुरुषोत्तम ! जर त्या राक्षसाने महालात घुसण्यापूर्वीच जर तू त्याला युद्धासाठी ललकारलेस तर त्या राक्षसाचा अवश्य वध करू शकशील. ॥२९॥
अन्यथा क्रियमाणे तु अवध्यः स भविष्यति ।
यदि त्वेवं कृते वीर विनाशमुपयास्यति ॥ ३० ॥
असे न केलेस तर तो अवध्य होऊन जाईल. वीरा ! जर तू असे केलेस तर त्या राक्षसाचा विनाश नक्कीच होईल. ॥३०॥
एतत्ते सर्वमाख्यातं शूलस्य च विपर्ययः ।
श्रीमतः शितिकण्ठस्य कृत्यं हि दुरतिक्रमम् ॥ ३१ ॥
याप्रकारे मी तुला त्या शूलापासून वाचण्याचा उपाय तसेच अन्य सर्व आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत, कारण की श्रीमान्‌ भगवान्‌ नीलकण्ठांच्या विधानाला पालटणे फार कठीण काम आहे. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रिषष्टितमः सर्गः ॥ ६३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा त्रेसष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP