॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय पाचवा ॥
रावण - सुग्रीव यांचे युद्ध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सुवेळेवरुन सुग्रीव लंकेत उडून गेला :

सुवेळे बैसल्या रघुकुळटिळका । मनोहर दिसताहे लंका ।
संमुख देखोनि दशमुखा । केला आवांका सुग्रीवें ॥ १ ॥


ततो रामः सुवेलाग्रं योजनद्वयमंडलम् ।
आरुरोह ससुग्रीवो हरियूथैः समन्वितः ॥१॥
ददर्श लंका सुव्यक्तां रम्यकाननशोभिताम् ।
तस्यां गोपुरशृंगस्थं राक्षसेंद्रं दुरासदम् ॥२॥
श्वेतचामरपर्यस्तं विजयच्छत्रशोभितम् ।
पश्यतां वानरेंद्राणां राघवस्थापि पश्यतः ॥३॥
दर्शनादाक्षसेंद्रस्य सुग्रीवः सहसोत्थितः ।
अचलाग्रादथोत्थाय पुष्लुवे गोपुरस्थले ॥४॥


श्रीराम चढला सुवेळेवरी । सहित सुग्रीव कपिसंभारीं ।
दोनी योजनें सुवेळाग्री । सभा वानरीं शोभत ॥ २ ॥
तंव देखिलें लंकानगर । वनीं काननीं अति सुंदर ।
त्यामाजी रावणाचें गोपुर । दीर्घ मनोहर रमणीय ॥ ३ ॥
श्रीरामसेना वानरसंभार । आले देखोनि अपार ।
ते पहावया दशशिर । सवेग गोपुर वळंघला ॥ ४ ॥
रावण अंजनाभ काळा । सुवर्णभूषणीं सोज्वळा ।
कांसे आरक्त पाटोळा । आरक्त माळा रत्‍नाढ्य ॥ ५ ॥
सवें निशाचरांचा भार । युग्मचामर श्वेतातपत्र ।
ऐसा देखोनि दशशिर । सुग्रीव वीर क्षोभला ॥ ६ ॥
माझ्या स्वामीची चोरिली कांता । कायसें छत्र याचिया माथां ।
याच्या करीन मी घाता । साटोपता खवळला ॥ ७ ॥
वळिला पुच्छाचा आंकोडा । रोमें थरकती चहूंकडां ।
वेग न धरवे गाढा । अति वेगाढा उडाला ॥ ८ ॥
श्रीरामासी न पुसतां । कोणासी न विचार सांगतां ।
गेला गोपुराआंतौता । लंकानाथा संमुख ॥ ९ ॥


स्थित्वा मुहूर्तं संप्रेक्ष्य निर्भयेनांतरात्मना ।
तृणीकृत्य च तद्रक्षः सोब्रवीत्परुषं वचः ॥५॥
लोकनाथस्य रामस्य सखा दासोस्मि राक्षस ।
न मया मोक्ष्यसेऽद्य त्वंपार्थिवेंद्रस्य तेजसा ॥६॥
इत्युक्त्वा सहसोत्पत्य पुप्लुवे तस्य चोपरि ।
आकृष्य मुकुटं चित्रं पातयामास तद् भवि ॥७॥

रावण व सुग्रीवाची झटापटः

पडतां सुग्रीवाची उडी । निशाचरें झालीं वेडीं ।
रावणासी शंका गाढी । वळली बोबडी सर्वांची ॥ १० ॥
खुंटली राक्षसांची युक्ती । सुग्रीव गर्जे रावणाप्रती ।
श्रीरामाचा सखा सांगती । जाण निश्चितीं सेवक ॥ ११ ॥
सुग्रीव तो मी विख्यात । तुझा करुं आलो घात ।
माझेनि हातें लंकानाथ । आजि जिवंत वांचेना ॥ १२ ॥
ऐसें बोलोनि निष्ठुर । निःशंक उभा सुग्रीव वीर ।
कोणा न बोलवे उत्तर । अधोमुख राक्षस ॥ १३ ॥
सुग्रीव उभा मुहूर्त । कांही न बोले लंकानाथ ।
उडोनि उरावरी देत लात । मुकुटा हात घातला ॥ १४ ॥
मुकुट आंसुडिंता तत्काळीं । दोघे जण आतुर्बळी ।
आदळते क्षितितळीं । रावण ते काळीं मुर्च्छित ॥ १५ ॥
मुकुट घेवोनियां जाण । सुग्रीव निघतां त्वरा करुन ।
सावध होवोनि रावण । काय बोलत ॥ १६ ॥


समीक्ष्य तृर्णमायांतं तं बभाषे निशाचरः ।
सुग्रीव त्वं परोक्षे मे हीनग्रीवो भविष्यसि ॥८॥
इत्युक्त्वोत्थाय तं क्षिप्रं बाहुभ्यामाक्षिपत्तले ।
कंदुवत्स समुत्थाय बाहुभ्यामाक्षिपद्धरिः॥९॥
परस्परं स्वेदविदिग्धगात्रौ
परस्परं श्लिष्टनिरुद्धचेष्टौ ।
परस्परं शोणितरक्तदेहौ
परस्परं शाल्मलिकिंशुकौ यथा ॥ १० ॥
मुष्टिप्रहारैश्च तलप्रहारैरंघ्रिप्रपातैश्च कराग्रपातैः ।
तौ चक्रतुर्युद्धमसह्यरुपौ महाबलौ वानरराक्षसेंद्रौ ॥ ११ ॥


मुकुटेंसीं सुग्रीव जात । त्यासी पाचारी लंकानाथ ।
मी दुश्चित होतों मुर्च्छित । युद्ध न करितां तूं केवी जासी ॥ १७ ॥
मजवरी घालोनियां उडी । आतां पळतोसी तांतडी ।
कराग्रें हाणोनियां थापडी । ग्रीवा रोकडी पाडीन ॥ १८ ॥
जरी आहे आंगवण । परत करावयासी रण ।
पुढें जासी तैं काळें वदन । कोपें रावण अनुवादे ॥ १९ ॥
वेगें उडोनियां लंकानाथ । सुग्रीवातें आंसुडित ।
तेणें तो गदगदां हांसत । तुझा पुरुषार्थ इतकाचि ॥ २० ॥
सुग्रीवें आंसुडितां रावण । तोंडघसीं पडला जाण ।
विसही बाहु स्वयें टेंकून । दशानन ऊठिला ॥ २१ ॥
तेणें रागें पैं रावण । सांडोनियां शस्त्रास्त्रीं रण ।
आंगीं आदळला आपण । विचार आन कल्पूनी ॥ २२ ॥
वानराअंगीं दोनचि हात । विसां हातीं मी समर्थ ।
कळा लावोनि सर्वांगांत । कपि निश्चित मारीन ॥ २३ ॥
पालेखाईर वानर किती । याचे अंगीं कायसी शक्ती ।
मी सबळ बळें लंकापती । हातोहातीं मारीन ॥ २४ ॥
तंव तो वानर आतुर्बळी । विसां हातांचि पैं मौळी ।
पुच्छीं बांधिली तत्काळीं । रावण ते वेळीं गजबजिला ॥ २५ ॥
ते काळीं दशानन । पुच्छासीं डसला आपण ।
तेव्हा सुग्रीवें हांसोन । दिधला सोडून उपेक्षूनी ॥ २६ ॥
मल्लविद्येच्या निर्वडीं । दोघे भिडतां पडिपाडी ।
उलट लोट घाय घडमोडी । गुप्त थापडी करघात ॥ २७ ॥
झोंबी घेता अत्युद्‌भत । स्वेदें न्हाले डवडवित ।
कळा लाविंतां वर्मस्थ । निचेष्टित होती दोघे ॥ २८ ॥
नखक्षतांचे महामार । दोघांही अंगी वाहे रुधिर ।
वसंतीं फुंलले किंशुक तरुवर । तैसे महावीर भासती ॥ २९ ॥
तळपोनियां मुष्टिघात । परस्परां वंचोनियां देत ।
चुकवितां मुष्टिघात । पांपर हणित साटोपें ॥ ३० ॥
पांपर चुकवितां तेथ । उठतां हाणिती तळाघात ।
तळाघातें तळीं पाडित । मग हाणित हुमण्या ॥ ३१ ॥
पदाभिघाताची पैं थोरी । तडवे हाणिती परस्परीं ।
उलट लोट देती उरी । हाणिती शिरीं कराघात ॥ ३२ ॥
दोघांचें युद्ध घोरांदर । सुरांसुरां अति दुर्धर ।
वानर आणि निशाचर । करिती विचित्र मंडळें ॥ ३३ ॥
गोपुरभूमिका समस्थळ । दोघीं युद्ध केलें चिरकाळ ।
युद्ध देखोनि कळिकाळ । धाकें चळचळ कांपती ॥ ३४ ॥


कृत्वा नियुद्धं भृशमुग्रवेगौ ।
कालं चिरं गोपुखेदिमध्ये ।
उत्क्षिप्य चोत्क्षिप्य विनम्रदेहौ ।
पादक्रमाद्रोपुखेदिलग्नौ ॥१२॥
अन्योन्यमापीड्य विलग्नदेहौ
तौ पेततुः सालनिखातमध्ये ।
उत्पेततुर्भूतलमस्पृशंतौ स्थित्वा
मुहूर्तं त्वभिनिःश्वसंतौ ॥१३॥


गोपुरभुमिकेमाझारां । युद्ध तगटल्या दोनी धुरा ।
उपटूं धांवती येरयेरां । मल्लविद्याद्वारा तळपोनी ॥ २५ ॥
येरयेरां निघोनि तळीं । उपटितां आतुर्बळी ।
तोही तळपोनि तत्काळीं । दुजा आकळी उपटावया ॥ ३६ ॥
येरयेरां झोंबी घेती । झोंबल्या युक्ती आकळिती ।
कंटी कंठी कळा लाविती । दोघे राहती निचेष्टित ॥ ३७ ॥
खवळोनि दोघे दुर्धर । वाम सव्य चमत्कार ।
उलट टोले देतां पांपर । येरयेरां मिसळले ॥ ३८ ॥
उरीं शिरीं खांदां कोपरीं । घाय देती उदरोदरीं ।
हुमणी हाणोनि मुखावरी । चक्रकारीं भोंवंडिती ॥ ३९ ॥
खचोनियां गोपुरीहूनि अवनीं । दोघे पडले सभास्थानीं ।
अंग न लागतां धरणीं । उडोनि गगनीं भीडती ॥ ४० ॥
आकाशगती स्वयें वानर । दुजा सहजचि खेचर ।
दोघे भिडती निराधारा । सुरासुर विस्मित ॥ ४१ ॥


आलंग्य चालिंग्य च बाहुयोक्तेः सयोजयामासतुराहवे तौ ।
संरंभशिक्षाबलसंप्रयुक्तौ सुचेरतुः संप्रति युद्धमार्गे ॥१४॥
शार्दूलसिंहाविव जातदंष्ट्रौ गजेंद्रपोताविव संप्रयुक्तौ ।
संहत्य संवेद्य च तौ कराभ्यां तौ पेततुर्वै युगपद्धरायाम् ॥१५॥
उद्यम्य चान्योन्यमधिक्षिपंतौ संचक्रमाते बहुयुद्धमार्गे
व्यायामशिक्षाबलसंप्रयुक्तौ क्लमं न तौ जग्मतुराशु वीरौ ॥१६॥
बाहूत्तमैर्वारणवारणाभैर्निवारयन्तौ परवारणाभौ ।
चिरेण कालेन भृशं प्रयुद्धौ संचेरतुर्मंडलमार्गमाशु ॥१७॥


मुहूर्तमात्र राहोनि स्थिर । धांपा जिरवोनि महावीर ।
युद्धा मिसळले दुर्धर । येरयेरां हांकोनी ॥ ४२ ॥
बाहुबळें लावूनि वेसणी । आंसडोनि आणितां धरणीं ।
येरयेरां नाकळे कोणी । समान दोन्ही संग्रामीं ॥ ४३ ॥
वीस भुजीं लावितां झडका । सुग्रीवें हाणिल्या थडका ।
दाहीं शिरीं उठिल्या तिडका । तेणें दशमुखा आकांत ॥ ४४ ॥
वानर नाटोपे पैं देखा । ऐसें कळलें लंकानायका ।
तरी युद्धाचा आवाका । स्वयें दशमुखा न सांडवे ॥ ४५ ॥
साटोपोनियां रावण । पुढती करुं आला रण ।
थरक सरक वेगविंदान । रणप्रवीण ते दोघे ॥ ४६ ॥
घात पात चपेट आघात । उलट पांपरा प्राणांत ।
ऐसे मल्लविद्यासंकेत । दोघे दावित रणमारें ॥ ४७ ॥
दोघे वीर अति दुर्धर । रगडोनि हाडें करावया चूर ।
खेंव देतां पैं सत्वर । अति विचित्र तेथें झालें ॥ ४८ ॥
विसां भुजांचे बंधन । द्विभुजी सांडिलें आकळून ।
कळ लागली दारुण । दशानन कुसमुसी ॥ ४९ ॥
कळ लावितां दारुण । न वांचे रावणाचा प्राण ।
सुग्रीवें देतांचि सोडून । पुढती रण करुं आला ॥ ५० ॥
उरीं उराड हाणिती देखा । शिरीं शिरासी हाणिती थडका ।
दंडी मुंडपीं हाणिती ढका । लाविती सडका पदबंधे ॥ ५१ ॥
पदबंधाच्या कुसरीं । भिडतां गोपुरवेदिकेवरी ।
दोघे जण एकसरीं । धरेवरी आदळले ॥ ५२ ॥
सवेंचि उठोनियां जाण । वोटवडीचें दाविती रण ।
हिंका दाविती थरकोन । मुष्टिपात न उचाटे ॥ ५३ ॥
उलट लोट विकट रण । हेटकीचें युद्ध दारुण ।
विविध बंधांचें निर्वाण । रणविंदान दोघांचें ॥ ५४ ॥

रणविद्या व मल्लविद्या :

दोघे राजे व्यमधारी । शिक्षा दीक्षा जाणोनि खरी ।
भवंडितां चक्राकारीं । नये गिरिगिरी भवंडीचे ॥ ५५ ॥
रणविद्येचा उद्वोध । युद्ध करितां न बाधी खेद ।
युद्धसमयीं परम आल्हाद । दोघां रणमद युद्धाचा ॥ ५६ ॥
गजदंतीं गज जाण । युद्ध करिती खणाण ।
तेंवी हे वीर दोघे जण । करिती रण बाहुबळें ॥ ५७ ॥
दोघां दुर्धर रणकल्लोळ । दोघीं युद्ध केलें चिरकाळ ।
दोघां श्रम नाहीं अळुमाळ । दोघे प्रबळ युद्धार्थी ॥ ५८ ॥
दाविती क्रौचाकार मंडळ । चक्राकार फिरती प्रबळ ।
रंजकाकार उपटिती सबळ । रण तुंबळ कंदनप्राय ॥ ५९ ॥
युद्ध करितां मृगगती । सवेंचि दाविती छागगती ।
निराधारें श्येनगती । दोघे गजगतीं दाविती रण ॥ ६० ॥
कुक्कुटाचिये निजगतीं । युद्धीं माघारे न सरती ।
नातरी केसरीच्या स्थितीं । उडी घालिती साटोपें ॥ ६१ ॥
दोघां पूर्ण युद्धव्युत्पती । नाना मंडळें नाना गती ।
दोघे जण रणमारार्थी । निजविजयार्थी । निजविजयार्थी उन्मत्त ॥ ६२ ॥


तै परस्परमासाद्य यतावन्योन्यसूदने ।
मार्जाराविव भक्षार्थे वितस्थाते मुहुर्मुहुः ॥१८॥
मंडलानि विचित्राणि स्थानानि विविधानि च ।
परिमोक्षं प्रहाराणां वर्जनं परिधावनम् ॥१९॥


मल्लविद्येच्या विंदानीं । दोघे भिडती सर्वांगग्रहणीं ।
येरयेरांतें मारावें रणीं । घाय निर्वाणीं हाणिती ॥ ६३ ॥
तिरकस तिरकस थरकती । चक्राकृती झोले देती ।
पदाभिघाताच्या व्युत्पत्ती । घाय चुकविती तळपोनी ॥ ६४ ॥
बिडाळ बिडाळाच्या परी । गुरगुरती एकएकांवरी ।
तैसेचि हेही परस्परीं । येरयेरांवरी मिसळले ॥ ६५ ॥
छागाच्या परी मागें सरती । सवेंचि येऊनि दोघे भिडती ।
नाना परींच्या गति विगती । रणव्युत्पत्ती मारांगी ॥ ६६ ॥
स्थान मान विविध गती । नाना मंडळें व्युत्पत्ती ।
गोमूत्रिकावक्र गती । दोघे दाविती थरकोनी ॥ ६७ ॥
युद्धामाजील गतागत । येरयेरांवरी उसळत ।
येरयेरांतळी तळपत । पदाभिघात पदबंधें ॥ ६८ ॥
एक एकातें पाडोनि अवनीं । दिसे जैसा मारिला रणीं ।
तंव तो पादाघातें उलथोनी घोळसी धरणीवरी लातें ॥ ६९ ॥
भिडती पडती तडकती । तळीं तळपोनि उसळती ।
येरयेरांतें आकळिती । कळा लाविती वर्मस्थ ॥ ७० ॥
वर्मी लाविताती कळे । वीर उलथोनि आदळे ।
आदळता तो सवेंचि उसळे । वक्षःस्थळें ताडिती ॥ ७१ ॥
अष्टांगें मोकळीं सोडिती । सवेंचि तळाघातें पाडिती ।
येरयेरांतें आंसुडिती । झिंझाडिती सर्वांगें ॥ ७२ ॥
धरणें मारणें सोडणें । सवेंचि पदबंधें पाडणें।
अष्टांगेंसीं झाडणें । आंसुडणें आक्रोशें ॥ ७३ ॥
झाला युद्धाचा शेवट । ऐसें वानिती सुर वरिष्ठ ।
तरी दोघे वीर उद्‌भट । कडकडाट युद्धाचा ॥ ७४ ॥


अभिद्रावणमाप्लावमवस्थानं सविग्रहम् ।
परावृत्तमपद्रुतमवप्लुतम् ॥२०॥
उपन्यस्तमपन्यस्तं युद्धमार्गविशारदौ ।
तौ विचेरतुरन्योन्यं वानरेंद्रश्च रावणः ॥२१॥
एतस्मिन्नंतरे रक्षो मायाबलमथात्मनः ।
आरब्धुमुपसंपेदे ज्ञात्वा तं वानराधिपः ॥२२॥
उत्पपात तदाकाशं जितकाशी जितक्लमः ।
रावणः स्थित एवात्र हरिराजेन वंचितः ॥२३॥


दोघे आवेशें धांवती । वोसरोनि आदळिती ।
प्रतिज्ञेच्या ठाया नेती । तेथें बैसविती साटोपें ॥ ७५ ॥
बैसलिया ठायाप्रती । उठतां नुठवे निजशक्तीं ।
येणे बळें पैं दाटती । शौर्यशक्ति साटोपें ॥ ७६ ॥
पाठिमोरे तळपती । सवेंचि संमुख भिडती ।
येरयेरांतें कांपाविती । मग पाडिती साटोपें ॥ ७७ ॥
पडतपडतांचि क्षितीं । दोघे गगना उसळती ।
थरकती सरकती । नाना व्युत्पत्ती युद्धाची ॥ ७८ ॥
गुडघा कोंपर मुष्टिघात । मुंडपीं मुंडप मुरडित ।
ते ते घाय शून्य करित । अंग चुकवित लघुविद्या ॥ ७९ ॥
दोघे वीर विचक्षण । दोघे युद्धीं अति प्रवीण ।
दोघे करितां निर्वाण । सुग्रीवें रावण क्षीण केला ॥ ८० ॥
रावणें आणोनि मायाशक्ती । सुग्रीव धरावा कपटगतीं ।
जाणोनि कपिपतीं । केली युक्ती ते ऐका ॥ ८१ ॥
बाहु बाहुसीं कवळित । पदीं पदा आकळित ।
शिरीं शिरातें आदळत । पुच्छ नाकांत सुदलें ॥ ८२ ॥
रावण सटसटां शिंकी । सुग्रीव हाणी बुक्या बुकी ।
तेणें लंकेश अति दुःखी । अधोमुखीं पाडिला ॥ ८३ ॥
दहाहीं कंठीं तत्काळ । पुच्छें लावोनियां कळ ।
रावण सर्वांगें विकळ । पाडिला तत्काळ सुग्रीवें ॥ ८४ ॥

शेवटी रावण मूर्च्छिंत; त्याला ठार करावयाचे नसल्याने सुग्रीव त्याचा मुकुट घेऊन येतो :

रावण पडिला अचेतन । यासी मारितां न लगे क्षण ।
जीवें मारितांचि रावण । राम संपूर्ण क्षोभेल ॥ ८५ ॥
श्रीरामें वाहिली असे आण । स्वहस्तें मारावा रावण ।
त्यासी मारितां आपण । श्रीराम दारुण कोपेल ॥ ८६ ॥
श्रीरामाची हे पतिज्ञा । मिथ्या करणें हे अवज्ञा ।
हें कळलें सुग्रीव सर्वज्ञा । दशानना न मारीच ॥ ८७ ॥
मारितांचि रावणासी । द्रोही व्हावें श्रीरामासीं ।
वृथा अंतरणें सेवेसी । यालागीं त्यासी न मारीच ॥ ८८ ॥
रणीं गांजोनि रावण । मुकुट घेवोनियां जाण ।
सुग्रीव जातों मी आपण । केलें गर्जन लंकेसीं ॥ ८९ ॥
इंद्रजित आणि कुंभकर्ण । निधडे वीर प्रधान ।
ज्यांसीं असेल आंगवण । करावया रण तिंही यावें ॥ ९० ॥
कुंभकर्णा निद्रापन्न । इंद्रजित धाकें कंपायमान ।
लपाले ससैन्य प्रधान । पडिलें मौन राक्षसां ॥ ९१ ॥
ऐसें गर्जोनि लंकेसीं । घेवोनि रावणाचे मुकुटासी ।
सुग्रीव उडाला आकाशीं । श्रीरामापासीं यावया ॥ ९२ ॥
सुग्रीव निधडा, वीर परम । नाहीं संग्रामीं स्वेद श्रम ।
अपार क्रमोनियां व्योम । आला श्रीराम ठाकूनी ॥ ९३ ॥
मूर्च्छित पाडोनियां रावणासी । मुकुट घेतला न कळतां त्यासीं ।
सुग्रीव आला श्रीरामापासीं । विजयभिनिवेशीं डुल्लत ॥ ९४ ॥


अथ हरिवरनाथः प्राप्तसंग्रामकीर्त िर्निशिचरपतिमाजौ योजायित्वा श्रमेण ।
गगनमतिविशालं लंघयित्वार्कसूनु र्हरिगणबलमध्ये रामपार्श्वे जगाम ॥२४॥
इति स सवितृसूनुस्तत्र तत्कर्म कृत्वा पवनगतिरनीकं प्राविशत्संप्रहृष्टः ।
रघुवरनृपसूनोर्वर्धयन्युद्धहर्ष मृगतरुगणमुख्यैः पूज्यमानो हरिंद्रः ॥२५॥

सुग्रीवाचा जयजयकार, सर्वांना आनंद :

वानरांचा राज्यधर । जो कां सुग्रीव राजेंद्र ।
तेणें संग्रामीं दशशिर । स्वयें दुर्धर जिंकिला ॥ ९५ ॥
जो नाटोपे सुरां असुरां । जो नाटोपे यक्षकिन्नरां ।
जो नाटोपे नृपां नरवरां । जो विखारां नाटोपे ॥ ९६ ॥
नाटोपे दानवां घोरांदरां । नाटोपे दैत्यां दुर्धरां ।
ज्याचा त्रैलोकीं दरारा । त्या दशशिरा जिंकिलें ॥ ९७ ॥
सुग्रीवसंग्रामाची कीर्ती । असुर सुर नर वानिती ।
येवढी पावोनि विजयकीर्ती । आला कपिपति रामाजवळी ॥ ९८ ॥
उडोनियां सावकाशीं । अपार क्रमोनि आकाशीं ।
सुग्रीव आला कपिसेनेसीं । श्रीरामासी वंदावया ॥ ९९ ॥
सुग्रीव जो कां सूर्यसुत । रावणविजयें अति विख्यात ।
वंदावया श्रीरघुनाथ । आर्तभूत स्वयें आला ॥ १०० ॥
रावणाच्या मुकुटासी । ठेवोनि श्रीरामपायांपासीं ।
सुग्रीव लागला पायांसी । अति उल्हासीं स्वानंदें ॥ १ ॥
देखोनि सुग्रीवाची ख्याती । एकांगे जिणोनि लंकापती ।
तेणें वानर उल्लासती । पायां लागती जयशब्दें ॥ २ ॥
विजयी जाला सुग्रीववीर । सुखावला श्रीरामचंद्र ।
वानरांचा जयजयकार । केला गजर हरिनामें ॥ ३ ॥
श्रीरामाच्या कृपादृष्टीं । सुग्रीवासी विजयपुष्टी ।
एकला न माये सृष्टीं । स्वानंदकोटि आल्हादें ॥ ४ ॥
रघुवंशींचा रघुनाथ । त्यासी द्यावया सुखार्थ ।
सुग्रीवें जिकिला लंकानाथ । तेणें कपि पूजित कपिनाथा ॥ ५ ॥


अथ तस्मिन्निमित्तानि दृष्ट्वा लक्ष्मणपूर्वज ।
सुग्रीवं संपरिष्वज्य रामो वचनमब्रवीत् ॥२६॥
असंमंत्र्य मया सार्द्धं तदिदं साहसं कृतम ।
एवं साहसमत्युग्रं न कुर्वति जनेश्वराः ॥२७॥
संशये स्थाप्य मां चेदं बलं चेमं बिभीषणम् ।
कष्टं कृतमिदं वीर साहसं साहसप्रिय ॥२८॥
इदानीं मा कृथा वीर एवंविधमरिंदम ।
त्वयि किंचित्समापन्ने किं कार्य सीतया मम ॥२९॥
भरतेन महाबाहो लक्ष्मणेन बलीयसा ।
शत्रुघ्नेन च शत्रुघ्न स्वशरीरेण वा पुनः ॥३०॥

परवानगीशिवाय गेल्याबद्दल श्रीराम सुग्रीवाची कान‍उघाडणी करतातः

युद्धाभिघात कपिपती । तें देखोनि रघुपती ।
आलिंगोनि अति प्रीतीं । काय त्याप्रती बोलत ॥ ६ ॥
सुग्रीव राजा तूं आपण । मजसीं न पुसतांचि जाण ।
एकल्या जावोनि केलें रण । धुरेचें लक्षण हें नव्हे ॥ ७ ॥
आजि माझें भाग्य समर्थ । जें तूं आलासी जीवें जीत ।
जैं तुज मारिता लंकानाथ । तैं मज प्राणांत ओढवता ॥ ८ ॥
भिडतां सुग्रीव लंकानाथ । मज निःसंदेहो पैं प्राणांत ।
बिभीषणासी अति कल्पांत । वृथा पुरुषार्थ संग्रामीं ॥ ९ ॥
एकाकी संग्रामागोष्टी । हे तंव तुझी बुद्धि खोटी ।
असतां सैन्य कोट्यानुकोटी । वृथा अटाटी का केली ॥ ११० ॥
सुग्रीवा मारिल्या शरणागता । भरत शत्रुघ्न तिघी माता ।
प्राप्त जालियाही सीता । प्राण सर्वथा राखीना ॥ ११ ॥
शरणागताचें जें मरण । तेंचि माझें प्राणोत्क्रमण ।
सखा असतांही लक्ष्मण । प्राण सर्वथा राखितोंना ॥ १२ ॥
मज सांडितांचि प्राण । निमती सीता लक्ष्मण ।
निमते भरत शत्रुघ्न । सूर्यवंशी कंदन सर्वांतें ॥ १३ ॥
रावण सुग्रीव करिता घात । तैं सूर्यवंशा होता अंत ।
दैवें चुकविला कुळकंदनार्थ । पुढें ऐसें कृत्य न करावे ॥ १४ ॥
सुग्रीव युद्धीं अति समर्थ । तुझा जाणें मी पुरुषार्थ ।
जेणे होय कुळकंदनार्थ । तैसा अनर्थ न करावा ॥ १५ ॥


तमेवंवादिनं रामं सुग्रीवः प्रत्यभाषत ।
तव भार्यापहर्तारं दृष्ट्वा राघव रावणम् ॥३१॥
मर्षयामि कथं वीर ज्ञात्वा पौरुषमात्मनः ।
इत्येवंवादिनं वीरमभिनंद्य स राघवः ॥३२॥
लक्ष्मणं लक्ष्मिसंपन्नमिदं वचनमब्रवीत् ॥३३॥

सुग्रीव क्षमा मागतो :

ऐकोनि श्रीरामाचें वचन । सुग्रीवे घातलें लोटांगण ।
मस्तकीं वंदोनियां चरण । काय आपण बोलत ॥ १६ ॥
तुझी भार्या चोरोनि नेतां । त्या देखोनिं लंकानाथा ।
धीर न धरवेचि पुरुषार्था । करावया घाता खवळलों ॥ १७ ॥
पूर दाटला पुरुषार्था । तुज पुसावें नाठवे चित्ता ।
रणीं मारावें लंकानाथा । सवेग या अर्था उडालों ॥ १८ ॥
अंगीं असतां आंगवण । धीर न धरवे अर्धक्षण ।
हेचि पुरुषार्थाचें लक्षण । सत्य जाण श्रीरामा ॥ १९ ॥
ऐकोनि सुग्रीवभाषण । पुरुषार्थाचें निजलक्षण ।
तेणें संतोषोनि रघुनंदन । दे आलिंगन स्वानंदें ॥ १२० ॥
लक्ष्मणा लक्ष्मीवंता । सुग्रीवा निजविजयार्था ।
फळें पुष्पें अति उत्तमता । होय अभिषिंचिता श्रीराम ॥ २१ ॥
एका जनार्दना शरण । जालें सुग्रीवरावणरण ।
पुढें करील श्रीरघुनंदन । रणकंदन अवधारा ॥ १२२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सुग्रीव-रावणयुद्धप्रसंगो नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
ओंव्या ॥ १२२ ॥ श्लोक ॥ ३३ ॥ एवं ॥ १५५ ॥


GO TOP