श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्तसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हनुमता निकुम्भस्य वधः -
हनुमान्‌ द्वारा निकुंभाचा वध -
निकुम्भो भ्रातरं दृष्ट्‍वा सुग्रीवेण निपातितम् ।
प्रदहन्निव कोपेन वानरेन्द्रमुदैक्षत ॥ १ ॥
सुग्रीव द्वारा आपला भाऊ कुंभ मारला गेलेला पाहून निकुंभाने वानर राजाकडे जणु त्यांना आपल्या क्रोधाने दग्ध करून टाकील की काय अशा प्रकारे पाहिले. ॥१॥
ततः स्रग्दामसन्नद्धं दत्तपञ्चाङ्‌गुलं शुभम् ।
आददे परिघं वीरो महेन्द्रशिखरोपमम् ॥ २ ॥
त्या धीर वीराने महेन्द्र पर्वताच्या शिखरासारखा एक सुंदर आणि विशाल परिघ हातात घेतला जो फुलांच्या माळांनी अलंकृत होता आणि ज्यामध्ये पाच पाच अंगुळे रूंदीचे लोखंडाचे पत्रे जडविलेले होते. ॥२॥
हेमपट्टपरिक्षिप्तं वज्रविद्रुमभूषितम् ।
यमदण्डोपमं भीमं रक्षसां भयनाशनम् ॥ ३ ॥
त्यात परिघात सोन्याचे पत्रेही जडविलेले होते आणि त्याला हिरे आणि पोवळ्यांनी सुशोभित केले गेले होते. तो परिघ यमदण्डासमान भयंकर आणि राक्षसांच्या भयाचा नाश करणारा होता. ॥३॥
तमाविध्य महातेजाः शक्रध्वजसमौजसम् ।
निननाद विवृत्तास्यो निकुम्भो भीम विक्रमः ॥ ४ ॥
त्या इंद्रध्वजाप्रमाणे तेजस्वी परिघाला गोलगोल फिरवित तो महातेजस्वी भयानक पराक्रमी राक्षस निकुंभ तोंड पसरून जोरजोराने गर्जना करू लागला. ॥४॥
उरोगतेन निष्केण भुजस्थैरङ्‌गदैरपि ।
कुण्डलाभ्यां च चित्राभ्यां मालया च सचित्रया ॥ ५ ॥

निकुम्भो भूषणैर्भाति तेन स्म परिघेण च ।
यथेन्द्रधनुषा मेघः सविद्युत् स्तनयित्‍नुिमान् ॥ ६ ॥
त्याच्या वक्षःस्थळावर सोन्याचे पदक होते. भुजांवर बाजूबंद शोभत होते. कानांत विचित्र कुण्डले झगमगत होती आणि गळ्यात विचित्र माळा झगमगत होती. त्या सर्व आभूषणांनी आणि त्या परिघांनी निकुंभ, विद्युत आणि गर्जनेने युक्त मेघ इंद्रधनुष्याने सुशोभित होतो, त्याप्रमाणे शोभत होता. ॥५-६॥
परिघाग्रेण पुस्फोट वातग्रन्थिर्महात्मनः ।
प्रजज्वाल सघोषश्च विधूम इव पावकः ॥ ७ ॥
त्या महाकाय राक्षसाच्या परिघाच्या अग्रभागाशी टक्कर देऊन प्रवह-आवह आदि सात महावायुंचा संधि तुटून फुटून गेला आणि तो फार मोठ्‍या गडगडाटासह धूमरहित अग्निप्रमाणे प्रज्वलित झाला. ॥७॥
नगर्या विटपावत्या गन्धर्वभवनोत्तमैः ।
सतारगणनक्षत्रं सचन्द्रं समहाग्रहम् ।
निकुम्भपरिघाघूर्णं भ्रमतीव नभस्स्थलम् ॥ ८ ॥
निकुंभाच्या परिघ फिरविण्यामुळे विटपावती नगरी (अलकापुरी), गंधार्वांची उत्तम भवने, तारे, नक्षत्र, चंद्रमा तसेच मोठ मोठ्‍या ग्रहांसह समस्त आकाशमण्डल फिरत असल्याप्रमाणे प्रतीत होत होते. ॥८॥
दुरासदश्च संजज्ञे परिघाभरणप्रभः ।
कपीनां स निकुम्भाग्निः युगान्ताग्निरिवोत्थितः ॥ ९ ॥
परिघ आणि आभूषणे हीच ज्याची प्रभा होती, क्रोध हेच ज्याच्यासाठी इंधनाचे काम करत होता तो निकुम्भ नामक अग्नि प्रलयकाळच्या अग्निप्रमाणे उत्पन्न होऊन अत्यंत दुर्जय झाला. ॥९॥
राक्षसा वानराश्चापि न शेकुः स्पन्दितुं भयात् ।
हनुमांस्तु विवृत्योरः तस्थौ प्रमुखतो बली ॥ १० ॥
त्या समयी राक्षस आणि वानर भयामुळे हालचालही करू शकले नाहीत. केवळ महाबली हनुमान्‌ आपली छाती उघडी करून त्या राक्षसाच्या समोर उभे राहिले. ॥१०॥
परिघोपमबाहुस्तु परिघं भास्करप्रभम् ।
बली बलवतस्तस्य पातयामास वक्षसि ॥ ११ ॥
निकुम्भाच्या भुजा परिघासमान होत्या. त्या महाबली राक्षसाने तो सूर्यतुल्य तेजस्वी परिघ बलवान्‌ वीर हनुमानाच्या छातीवर फेकून मारला. ॥११॥
स्थिरे तस्योरसि व्यूढे परिघः शतधा कृतः ।
विशीर्यमाणः सहसा उल्काशतमिवाम्बरे ॥ १२ ॥
हनुमानाची छाती अत्यंत सुदृढ आणि विशाल होती. तिच्याशी टक्कर होताच त्या परिघाचे एकाएकी शेकडो तुकडे होऊन (सर्वत्र) पसरले जणु आकाशांतून शेकडो उल्का एकाचवेळी पडत असाव्यात. ॥१२॥
स तु तेन प्रहारेण विचचाल महाकपिः ।
परिघेण समाधूतो यथाभूमिचलेऽचलः ॥ १३ ॥
महाकपि हनुमान्‌ त्या परिघाने आहत होऊन ही त्या प्रहाराने विचलित झाले नाहीत, ज्या प्रमाणे भूकंप झाला तरी पर्वत कोसळून पडत नाही त्याप्रमाणे. ॥१३॥
स तथाभिहतस्तेन हनुमान् प्लवगोत्तमः ।
मुष्टिं संवर्तयामास बलेनातिमहाबलः ॥ १४ ॥
अत्यंत महान्‌ बलशाली वानरश्रेष्ठ हनुमानांनी याप्रकारे परिघाचा मार खाऊन बलपूर्वक आपली मूठ वळली. ॥१४॥
तमुद्यम्य महातेजा निकुम्भोरसि वीर्यवान् ।
अभिचिक्षेप वेगेन वेगवान् वायुविक्रमः ॥ १५ ॥
ते महान्‌ तेजस्वी, पराक्रमी, वेगवान्‌ आणि वायुसमान बल-विक्रमाने संपन्न होते. त्यांनी मूठ वळून अत्यंत वेगाने निकुम्भाच्या छातीवर मारली. ॥१५॥
ततः पुस्फोट वर्मास्य प्रसुस्राव च शोणितम् ।
मुष्टिना तेन संजज्ञे ज्वाला विद्युदिवोत्थिता ॥ १६ ॥
त्या मुष्टिप्रहाराने तेथे त्याचे कवच तुटून गेले आणि छातीतून रक्त वाहू लागले; जणु मेघात वीजच चमकली असावी. ॥१६॥
स तु तेन प्रहारेण निकुम्भो विचचाल ह ।
स्वस्थश्चापि निजग्राह हनुमन्तं महाबलम् ॥ १७ ॥
त्या प्रहाराने निकुम्भ विचलित झाला नंतर थोड्‍याच वेळात स्वतःला संभाळून त्याने महाबली हनुमानास पकडले. ॥१७॥
विचुक्रुशुश्च तदा सङ्‌ख्ये भीमं लङ्‌कानिवासिनः ।
निकुम्भेनोद्यतं दृष्ट्‍वा हनुमन्तं महाबलम् ॥ १८ ॥
त्यासमयी युद्धस्थळी निकुंभद्वारा महाबली हनुमानांचे अपहरण होतांना पाहून लंकानिवासी राक्षस भयानक स्वरात विजयसूचक गर्जना करू लागले. ॥१८॥
स तदा ह्रियमाणोऽपि हनूमांस्तेन रक्षसा ।
आजघानानिलसुतो वज्रकल्पेन मुष्टिना ॥ १९ ॥
त्या राक्षसाच्या द्वारे याप्रकारे अपह्रत झाल्यावरही पवनपुत्र हनुमानांनी आपल्या वज्रतुल्य मुष्टिने त्याच्यावर प्रहार केला. ॥१९॥
आत्मानं मोचयित्वाऽथ क्षितावभ्यवपद्यत ।
हनुमानुन्ममाथाशु निकुम्भं मारुतात्मजः ॥ २० ॥
नंतर त्यांनी स्वतःला त्याच्या हातांतून सोडवून घेऊन ते पृथ्वीवर उभे राहिले. त्यानंतर तात्काळच वायुपुत्र हनुमानांनी निकुंभाला पृथ्वीवर आदळले. ॥२०॥
निक्षिप्य परमायत्तो निकुम्भं निष्पिपेष ह ।
उत्पत्य चास्य वेगेन पपातोरसि वीर्यवान् ॥ २१ ॥

परिगृह्य च बाहुभ्यां परिवृत्य शिरोधराम् ।
उत्पाटयामास शिरो भैरवं नदतो महत् ॥ २२ ॥
नंतर त्या वेगवान्‌ वीराने मोठ्‍या प्रयासाने निकुंभाला पृथ्वीवर पाडले आणि खूप रगडले. नंतर वेगाने उडी मारून ते त्याच्या छातीवर चढून बसले आणि दोन्ही हातांनी त्याची मान मुरगळून त्यांनी त्याचे मस्तक उपटून काढले. मान मुरगळली जाते समयी तो राक्षस भयंकर आर्तनाद करत होता. ॥२१-२२॥
अथ विनदति सादिते निकुम्भे
पवनसुतेन रणे बभूव युद्धम् ।
दशरथसुतराक्षसेन्द्रसून्वोः
भृशतरमागतरोषयोः सुभीमम् ॥ २३ ॥
रणभूमीमध्ये वायुपुत्र हनुमान द्वारा गर्जना करणारा निकुंभ मारला गेल्यावर, एक दुसर्‍यावर अत्यंत कुपित झालेल्या श्रीराम आणि मकराक्ष यांच्यामध्ये फार भयंकर युद्ध झाले. ॥२३॥
व्यपेते तु जीवे निकुम्भस्य हृष्टा
विनेदुः प्लवङ्‌गा दिशः सस्वनुश्च ।
चचालेव चोर्वी पफातेव साद्यौः
बलं राक्षसानां भयं चाविवेश ॥ २४ ॥
निकुंभाने प्राणत्याग केल्यावर सर्व वानर फार हर्षाने गर्जना करू लागले. संपूर्ण दिशा कोलाहलाने भरून गेल्या. पृथ्वी चालत असल्यासारखी भासू लागली, आकाश जणु फाटले असावे असे प्रतीत होऊ लागले तसेच राक्षसांच्या सेनेमध्ये भय पसरले. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तसप्ततितमः सर्गः ॥ ७७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्याच्या युद्धकाण्डाचा सत्याहत्तारावा सर्ग पूरा झाला. ॥७७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP