[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। अष्टनवतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतकर्तृका श्रीरामाश्रममन्वेष्टुं व्यवस्था तेनाश्रमस्य दर्शनं च -
भरताच्या द्वारा श्रीरामांच्या आश्रमाच्या शोधाचा प्रबंध आणि त्यांना आश्रमाचे दर्शन -
निवेश्य सेनां तु विभुः पद्‌भ्यां पादवतां वरः ।
अभिगन्तुं स काकुत्स्थमियेष गुरुवर्तकम् ॥ १ ॥

निविष्टमात्रे सैन्ये तु यथोद्देशं विनीतवत् ।
भरतो भ्रातरं वाक्यं शत्रुघ्नमिदमब्रवीत् ॥ २ ॥
याप्रकारे सैन्याला थांबवून जंगम प्राण्यांमध्ये श्रेष्ठ तसेच प्रभावशाली भरतांनी गुरुसेवापरायण (तसेच पित्याचे आज्ञापालक) काकुत्स्थापाशी जाण्याचा विचार केला. ज्यावेळी सर्व सेना विनीत भावाने यथास्थान उतरली तेव्हा भरतांनी आपला भाऊ शत्रुघ्न यास याप्रकारे सांगितले - ॥ १-२ ॥
क्षिप्रं वनमिदं सौम्य नरसङ्‌घैः समन्ततः ।
लुब्धैश्च सहितैरेभिस्त्वमन्वेषितुमर्हसि ॥ ३ ॥
सौम्या ! बर्‍याचशा मनुष्यांना बरोबर घेऊन तसेच या निषादांनाही बरोबर घेऊन तुम्ही लवकरच या वनात चारी बाजून श्रीरामांचा शोध घेतला पाहिजे. ॥ ३ ॥
गुहो ज्ञातिसहस्रेण शरचापासिपाणिना ।
समन्वेषतु काकुत्स्थावस्मिन् परिवृतः स्वयम् ॥ ४ ॥
’निषादराज गुह स्वयंही धनुष्य बाण आणि तलवार धारण करणार्‍या आपल्या हजारो बंधु-बांधवांनी घेरलेले जाऊ देत आणि या वनात काकुत्स्थ श्रीराम आणि लक्ष्मणांचा शोध करू देत. ॥ ४ ॥
अमात्यैः सह पौरैश्च गुरुभिश्च द्विजातिभिः ।
वनं सर्वं चरिष्यामि पद्‌भ्यां परिवृतः स्वयम् ॥ ५ ॥
’मी स्वतः, मंत्री, पुरवासी, गुरुजन तसेच ब्राह्मणांना बरोबर घेऊन सर्वांनी घेरलेला राहून पायीच सर्व वनात विचरण करीन. ॥ ५ ॥
यावन्न रामं द्रक्ष्यामि लक्ष्मणं वा महाबलम् ।
वैदेहीं वा महाभागां न मे शान्तिर्भविष्यति ॥ ६ ॥
जोपर्यंत मला श्रीराम, महाबली लक्ष्मण व महाभागा विदेहराजकुमारी सीतादेवीचे दर्शन होत नाही, तो पर्यंत माझ्या चित्ताला शांति मिळणार नाही ॥ ६ ॥
यावन्न चन्द्रसंकाशं तद् द्रक्ष्यामि शुभाननम् ।
भ्रातुः पद्मविशालाक्षं न मे शान्तिर्भविष्यति ॥ ७ ॥
’जो पर्यंत आपला पूज्य भ्राता श्रीरामांच्या कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या सुंदर मुखचंद्राचे दर्शन करणार नाही तो पर्यंत माझ्या मनाला शांति प्राप्त होणार नाही. ॥ ७ ॥
सिद्धार्थः खलु सौमित्रिर्यश्चन्द्रविमलोपमम् ।
मुखं पश्यति रामस्य राजीवाक्षं महाद्युति ॥ ८ ॥
’निश्चितच सौमित्र लक्ष्मण कृतार्थ झाले आहेत, जे श्रीरामचंद्रांच्या त्या कमल सदृश नेत्र असणार्‍या महातेजस्वी मुखाचे निरंतर दर्शन करीत आहेत, जे चंद्रमाप्रमाणे निर्मल आल्हाद प्रदान करणारे आहे. ॥ ८ ॥
यावन्न चरणौ भ्रातुः पार्थिवव्यञ्जनान्वितौ ।
शिरसा प्रग्रहीष्यामि न मे शान्तिर्भविष्यति ॥ ९ ॥

यावन्न राज्ये राज्यार्हः पितृपैतामहे स्थितः ।
अभिषिक्तो जलक्लिन्नो न मे शान्तिर्भविष्यति ॥ १० ॥
’ जोपर्यंत मी बंधु श्रीरामांच्या राजोचित लक्षणांनी युक्त चरणारविंदास आपल्या मस्तकावर धारण करणार नाही तो पर्यंत मला शांति मिळणार नाही. जो पर्यंत राज्याचे खरे अधिकारी आर्य श्रीराम पिता-पितमहांच्या राज्यावर प्रतिष्ठीत होऊन अभिषेकाच्या जलाने आर्द्र होणार नाहीत तोपर्यंत माझ्या मनाला शांति मिळणार नाही. ॥ ९-१० ॥
कृतकृत्या महाभागा वैदेही जनकात्मजा ।
भर्तारं सागरान्तायाः पृथिव्या यानुगच्छति ॥ ११ ॥
’जी समुद्रपर्यंत पृथ्वीचे स्वामी असलेल्या आपल्या पतिदेवांचे श्रीरामचंद्रांचे अनुसरण करीत आहे ती जनककिशोरी वैदेही महाभागा सीता आपल्या या सत्कर्माने कृतार्थ झाली आहे, ॥ ११ ॥
सुभगश्चित्रकूटोऽसौ गिरिराजसमो गिरिः ।
यस्मिन् वसति काकुत्स्थः कुबेर इव नन्दने ॥ १२ ॥
’ज्याप्रमाणे नंदनवनात कुबेर निवास करतात त्याच प्रमाणे ज्याच्या वनात काकुत्स्थ श्रीरामचंद्र विराजत आहेत तो चित्रकूट परम मंगलकारी तसेच गिरिराज हिमालय आणि वेंकटाचल समान श्रेष्ठ पर्वत आहे, ॥ १२ ॥
कृतकार्यमिदं दुर्गवनं व्यालनिषेवितम् ।
यदध्यास्ते महाराजो रामः शस्त्रभृतां वरः ॥ १३ ॥
’हे सर्पसेवित दुर्गम वनही कृतार्थ झाले आहे, जेथे शस्त्रधारींच्या मध्ये श्रेष्ठ महाराज श्रीराम निवास करीत आहेत’ - ॥ १३ ॥
एवमुक्त्वा महाबाहुर्भरतः पुरुषर्षभः ।
पद्‌भ्यामेव महातेजाः प्रविवेश महद् वनम् ॥ १४ ॥
असे म्हणून महातेजस्वी पुरुषप्रवर महाबाहु भरतांनी त्या विशाल वनात पायीच प्रवेश केला. ॥ १४ ॥
स तानि द्रुमजालानि जातानि गिरिसानुषु ।
पुष्पिताग्राणि मध्येन जगाम वदतां वरः ॥ १५ ॥
वक्त्यांमध्ये श्रेष्ठ भरत पर्वत शिखरावर उत्पन्न झालेल्या, आणि ज्यांच्या शाखांचे अग्रभाग कुलांनी भरलेले होते अशा वृक्षसमूहांच्या मध्यभागातून निघाले. ॥ १५ ॥
स गिरेश्चित्रकूटस्य सालमारुह्य सत्वरम् ।
रामाश्रमगतस्याग्नेर्ददर्श ध्वजमुछ्रितम् ॥ १६ ॥
पुढे जाऊन ते अत्यंत वेगाने चित्रकूट पर्वताच्या एका शालवृक्षावर चढून गेले आणि तेथून त्यांनी श्रीरामचंद्रांच्या आश्रमात पेटविलेल्या अग्निचा वर आकाशात जाणारा धूर पाहिला. ॥ १६ ॥
तं दृष्ट्‍वा भरतः श्रीमान् मुमोद सहबान्धवः ।
अत्र राम इति ज्ञात्वा गतः पारमिवाम्भसः ॥ १७ ॥
तो धूर पाहून श्रीमान् भरतांना आपला बंधु शत्रुघ्नासहित फारच प्रसन्नता वाटली आणि ’तेथेच श्रीराम आहेत’ हे जाणून त्यांना अथांग जलातून पार व्हावे तसा संतोष झाला. ॥ १७ ॥
स चित्रकूटे तु गिरौ निशम्य
     रामाश्रमं पुण्यजनोपपन्नम् ।
गुहेन सार्धं त्वरितो जगाम
     पुनर्निवेश्यैव चमूं महात्मा ॥ १८ ॥
या प्रकारे चित्रकूट पर्वतावर पुण्यात्मा महर्षिंनी युक्त श्रीरामांचा आश्रम पाहून महात्मा भरतांनी शोध घेण्यासाठी आलेल्या सेनेला पुन्हा पूर्वस्थानांवर थांबवून ठेवले आणि ते स्वयं गुहाबरोबर शीघ्रतापूर्वक आश्रमाकडे जाण्यास निघाले. ॥ १८ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डेऽष्टनवतितमः सर्गः ॥ ९८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा अठ्ठ्याण्णवावा सर्ग पूरा झाला ॥ ९८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP