॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अयोध्याकाण्ड

॥ अध्याय दुसरा ॥
श्रीरामराज्याभिषेक प्रारंभ

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामराज्यभिषेकाची तयारी, प्रजाजन व राजे यांची सभा :

राज्याभिषेक श्रीरामासी । करावया उल्लास दशरथासी ।
बोलावोनि ज्येष्ठां श्रेष्ठासी । गुह्य त्यांपासीं सांगतु ॥१॥
उदार वसिष्ठादि महाॠषींसी । पृथ्वीपाळ नृपवरांसी ।
सेनापती समग्रांसी । गुह्य त्यांपासीं सांगत ॥२॥
अष्टादश निजप्रजांसी । बोलोवोनि अति प्रीतीसीं ।
बसवोनि सन्मानेंसीं । त्यांपासीं काय मग बोले ॥३॥

परिश्रान्तोऽस्मि लोकस्य गुर्वीं धर्मधुरं वहन् ।
सोऽहं विश्राममिच्छामि पुत्रं कृत्वा प्रजाहिते ॥१॥
भवभ्दिरपि तत्सर्वमनुवर्तध्वमद्य वै ।
अनुजातो हि मां सर्वैर्गुणैः श्रेष्ठा ममात्मजः ॥२॥
पुरंदरसमो वीर्ये रामः परपुरंजयः ।
तं चंद्रमिव पुष्येण युक्तं धर्मभृतां वरम् ॥३॥
यौवराज्ये नियोक्तास्मि प्रातः पुरुषपुंगवम् ।
अनुरुपः स वो नाथो लक्ष्मीवाल्लक्ष्मणाग्रजः ॥४॥
त्रैलोक्यमपि नाथेन येन स्यान्नाथवत्तरम् ।
अनेन श्रेयसा सद्यः संयोक्षेऽहमिमां महिम् ॥५॥
गतक्लेशो भविष्यामि सुते तस्मिन्निवेश्य वै ।
इति ब्रुवंत मुदिताः प्रत्यदन्दन्नृपा नृपम् ॥६॥
वृष्टिमन्तं महामेघं नर्दत इव बर्हिणः ।
तस्य तव्दचनं श्रुत्वा सर्वकल्पस्य धीमतः ॥७॥

राज्यसभेत दशरथाचे भाषण :

समस्तांसी सांगे दशरथ । राज्यीं अभिषेकाचा रघुनाथ ।
हा माझा दृढ मनोरथ । तुम्हांसी अर्थ मानला कीं ॥४॥
समस्तांसी संमत । जो कीजे तो दृढ कार्यार्थ ।
तुम्ही माझे परम आप्त । निश्चितार्थ मज सांगा ॥५॥
ऐकें वसिष्ठा विशेषज्ञा । ममांगी बाणली वार्धक्यसंज्ञा ।
अझूनि राज्यभोगाची प्रज्ञा । कायसी सर्वज्ञा मज आतां ॥६॥
दुष्टनिर्दळणीं अति पुरुषार्थ । गोब्राम्हणादि प्रजा समस्त ।
नित्य राखितां सुखस्वार्थ । राज्यभारें श्रांत मी झालों ॥७॥
ते श्रांततेसी विश्रांतता । राज्याभिषेक श्रीरघुनाथा ।
त्या श्रीरामाची योग्यता । तुम्हां समस्तां विदित असे ॥८॥
श्रीराम माझा ज्येष्ठांत ज्येष्ठ । श्रीराम वरिष्ठां वरिष्ठ ।
श्रीराम बळिष्ठां बळिष्ठ । श्रीराम वरिष्ठ वंदनीय ॥९॥
श्रीराम सर्वगुणी संपूर्ण । राज्यलक्षणीं सुलक्षण ।
साधुसेवेसी आल्हाद पूर्ण । गुरुवचन ब्रह्मतुल्य ॥१०॥
श्रीरामाचे प्रौढीचेनि पडिपाडें । यम ईंद्र वरुण बापुडे ।
श्रीरामप्रजापतेजापुढें । खद्योतपाडे शशिसूर्य ॥११॥
श्रीरामाची सुंदर शोभा । लाजें मदन विरे उभा ।
श्रीराम वल्लभियां वल्लभा । लावण्यगाभा श्रीराम ॥१२॥
श्रीरामनिधडा रणरंगधीर । सुबाहु मारिला अति दुर्धर ।
त्र्यंबकभंगाचा अति बडिवार । शूरवीर श्रीराम ॥१३॥
श्रीरामभुजांचा प्रतापपुंज । जिंतिला प्रतापी भार्गव द्विज ।
श्रीरामभयेंचि निर्भय मज । होईन पूज्य त्रैलोक्यीं ॥१४॥
चैत्रमासीं पुष्पनक्षत्र । राज्याभिषेक श्रीरामचंद्र ।
त्रैलोक्य भोगिजे तेणें नरेंद्र । हें भाष्य निर्धार गुरुवाक्याचें ॥१५॥
माझा गुरु वसिष्ठ । ओ त्रैलोक्यीं परम श्रेष्ठ ।
त्यांचे वचन मज वरिष्ठ । रामा राज्यपट्ट प्रभाते ॥१६॥
प्रातःकाळीं श्रीरघुनाथ । अभिषिंचणें हा निश्चितार्थ ।
गर्जोनि बोले दशरथ । तेणें समस्त आल्हादले ॥१७॥

सभाजनांची एकमुखाने संमती :

राजे प्रजा सेना प्रधान । नगर नागरिकजन ।
ऎकोनि रायांचें वचन । उल्लासपूर्ण रामराज्यें ॥१८॥
ऐकोनियां घनगर्जित । मयूर थैकारें नाचत ।
तेंवि रामराज्यें समस्त । उल्लासत जन अवघे ॥१९॥
सुखावोनि संपूर्ण । अवघे बोलती आपण ।
श्रीराम रायां शिरोरत्न । गुणनिधान श्रीराम ॥२०॥
राम सत्यवादी पवित्र परम । असत्यवादी जपता रामनाम ।
तेही पावन होती निःसीम । सत्यासी विश्राम श्रीरामें ॥२१॥
श्रीराम धर्मात्मा धीर परम । श्रीराम धर्माचें विश्रामधाम ।
धार्मिकी धर्मात्मा श्रीराम । धर्माश्रम श्रीराम ॥२२॥
गुणी गुणातीत श्रीराम । श्रीराम गुणांचे निजधाम ।
अप्रमेय आत्माराम पुरुषोत्तम श्रीराम ॥२३॥
श्रीरामाची नवलस्थिती । नित्य नवी ब्राम्हणभक्ती ।
तेणें षडगुण रण येती । यश कीर्ति अतुलत्त्वे ॥२४॥
श्रीरामासी समसमान । तिही लोही न दिसे आन ।
मग त्याहुनि अधिक कोण । प्रमाणीं प्रमाण नव्हे राम ॥२५॥
ऐसें जाणोनियां श्रीरामातें । श्रीराम राजा जी आमुतें ।
आम्हीं अभिषिंचिला चित्तें । जाण निश्चित पूर्वीच ॥२६॥
त्या अभिषेकाची सत्यता । घरोघरीं हेचि कथा ।
श्रीराम राजा जी तत्वतां । जनीं वार्ता रामराज्याची ॥२७॥
प्रातःअभिषेकी रघुनाथ । सुमुहूर्तें सोहळा वेदोक्त ।
तोही पहावया उल्लसयुक्त । रामानुगत सर्वस्वें ॥२८॥
ऐसें बोलतां सकळां । त्यांचीं वाक्यें सुमनमाळा ।
रायें आवडीं घातली गळां । पुत्रसोहळाउत्साहें ॥२९॥

इति प्रत्यर्चितान्राजा ब्राह्मणानिदमब्रवीत् ।
वसिष्ठं वामदेवं च तेषोमेवोपशृण्वताम् ॥९॥
चैत्रः श्रीमानयं मासः पुण्यः पुष्पितकाननः ।
यौवराज्याय रामस्य सर्वमेवोपकल्प्यताम् ॥१०॥
राज्ञस्तूपरते वाक्ये जनघोषो महानभूत ।
शनैस्तस्मिन्प्रशांते च जनघोषे जनाधिपः ॥११॥
वसिष्ठं मुनिशार्दूलं राजा वचनमब्रवीत् ।
अभिषेकाय रामस्य यत्क्रर्म सपरिच्छदम् ॥१२॥
तदद्य भगवन्सर्वमाज्ञापयितुमर्हसि ।
ततशृत्वा भूमिपालस्य वसिष्ठों मुनिसत्तम ॥१३॥
आदिदेशाग्रतो राज्ञः स्थितान्युक्तान्कृतांजनीन् ।
सुवर्णादीनि रत्‍नानि बलीन्सवौंषधीरपि ॥१४॥

दशरथ बोले हर्षनिर्भर । वसिष्ठवामदेवादि ऋषीश्वर ।
तुम्ही अवधारा समग्र । निजनिर्धार अभिषेका ॥३०॥
चैत्रमास अति पवित्र । वसंते वनशोभा विचित्र ।
गुरुपुष्य शुभनक्षत्र । श्रीरामचंद्रा अभिषेक ॥३१॥
ऐसा माझा निजनिर्धार । तुम्हांस मानेल साचार ।
तरी प्रातःकाळी श्रीरामचंद्र तुम्ही समग्र अभिषेक ॥३२॥
ऐकोनि रायाचें उत्तर । राजे प्रजा आणि नगरनर ।
मनें वचनें राजा रघुवीर । आम्हीं साचार अभिषिंचिला ॥३३॥
ऐसें बोलोनि समग्र । उल्लासें करिती जयजयकार ।
नादें कोंदले अंबर । शब्द सर्वत्र सुखें गर्जे ॥३४॥
नांदे सुखेंसी सुलीन होत । अवघे बैसले हर्षयुक्त ।
ते वेळी उठोनियां दशरथ । अभिवंदित सद्‌गुरुसी ॥३५॥
वंदोनि वसिष्ठाचे पाये । म्हणॆ रामाभिषेका पाहिजे काय ।
तें सांगावया पाहें । सामर्थ्य आहे तुजपाशीं ॥३६॥
राजे प्रज्ञाप्रधानयुक्त । मजसकट समस्त ।
आम्ही तुझे आहों आज्ञांकित । तुम्हीं रघुनाथ अभिषिंचावा ॥३७॥
ऐकोनि रायांचे वचन । वसिष्ठ उठिला संतोषोन ।
अवलोकिती सभेचे जन । ठेले उथोन कृतांजली ॥३८॥
देशोदेशींचे भूपती । मुकुटकुंडलें छत्रपती ।
रायें आणिले अभिषेकार्थी । ते ते नृपती अवधारा ॥३९॥
पूर्वपश्चिमनृपती । उत्तरराजे चक्रवर्ती ।
दक्षिणदिशेचे भूपती । आले रघुपतिअभिषेका ॥४०॥
पर्वतवासींचे पर्वती । म्लेच्छराजे नेणों किती ।
द्वीपदीपींचे भूपती । आले गडपती गडपाळ ॥४१॥
देखोनी श्रीरामसाटोप । भार्गवजयाचा प्रताप ।
तेणें धाकें सकळही नृप । आपेंआप पैं आले ॥४२॥
तेही राजे अवघे जण । करावया वसिष्ठवचन ।
ठेले अंजलिपुट जोडून । सावधान वचनार्थी ॥४३॥
वसुष्ठमुखींचे वचन । काय देईल आज्ञापन ।
तें ते करावया सावधान । नृप संपूर्ण वचनार्थी ॥४४॥
आणिकहि देशोदेशिक । प्रजा प्रधान सकळिक ।
वसिष्ठवचनाचे चातक । रघुकुळटिळकाभिषेका ॥४५॥

समारंभाची तयारी, दूरदृष्टिने वसिष्ठांच्या योजना :

समस्त देखोनि सावधान । वसिष्ठ बोले अति गर्जोन ।
अवे आणा उपायन । पट्टपुजन रघुनाथा ॥४६॥
शतानुशत कुंभ सुवणें । नानारत्‍नीं परिपूर्ण ।
रायांही आणावे आपण । पट्टपूजन रघुनाथा ॥४७॥
श्वेतवारू श्वेतहस्ती । श्वेतचामरें घेवोनि हाती ।
दशरथादि सकळ नृपती । पूजेप्रती उभे असा ॥४८॥
प्रजा प्रधान देशोदेशिक । तिहीं यथानुशक्ती देख ।
आणावे जी निजकनक । रघुकुळटिळकपट्ट्पूजे ॥४९॥
सपृच्छ सनख व्याघ्रचर्म । सुवर्णशृंगी वृषभोत्तम ।
छत्र पांडुर मनोरम । अति उत्तम आणावें ॥५०॥
प्रातःकाळीं सुमुहूर्त । जे जे उपचार वेदोक्त ।
ते ते आणावे समस्त । अभिषेकार्थ श्रीरामा ॥५१॥
ब्राम्हाणा द्यावें निमंत्रण । उत्तम निपजवावें मिष्टान्न ।
सर्वकर्मी ब्राम्हणभोजन । नित्य निर्विघ्न कार्यार्थीं ॥५२॥
रथ गज वाजी सालंकार । सेना भृंगारावी विचित्र ।
देवालयें अति पवित्र । राममंदिर शृंगारा ॥५३॥
स्वयें वसिष्ठे ऐसी । आज्ञा दिधली समस्तांसी ।
तें तें कार्य शीघ्रतेसीं । अति उल्लसीं पैं केलें ॥५४॥
वैकुंठींची पूर्ण प्रतिमा । राजमंदिरी आणिली शोभा ।
चैतन्यतेजें मिरजे सभा । लाजे उभा कैलास ॥५५॥
देवालयीं मूळारंभा । स्वप्रकाशे प्रकाश गर्भा ।
चिदानंदें शोभे शोभा । गर्भीं पद्मनाभा महापूजा ॥५६॥

सर्वत्र नगरीत आनंद व उत्साह, अयोध्या शृंगारिली :

राजमंदिरीं अगाध थोरी । ध्वजा पताका प्रसादशिखरीं ।
महोत्साह घरोघरीं । द्वारोद्वांरीं रत्‍नदीप ॥५७॥
राजांगणीं वाडेंकोडें । कुंकुमचंदनाचे सडे ।
नाना रंगमाळा चहुकडे । लाजे त्यापुढें वसंत ॥५८॥
राजसभा शोभायमान । शोभेसी नंदनवन शरण ।
लोटांगणीं यें चित्ररथवन । विराजमान श्रीरामें ॥५९॥
वैकुंठींचा श्रीरामरावो । त्याच्या अभिषेकीं उत्साहो ।
वैकुंठींचा सर्व समुदावो । आला पहा हो अयोध्येसी ॥६०॥
दासदासी नगरजन । राजे सेना प्रजा प्रधान ।
वस्त्रीं भूषणीं शोभायमान । वैकुंठभुवनसम शोभा ॥६१॥
राजबिंदी दोहीं हारीं । शोभा शोभे नानाकुसरीं ।
ध्वजा पताका शृंगारीं । रचिल्या वळी दिपमाळा ॥६२॥
कस्तूरीचंदनकर्दमयुक्त । मार्ग शिंपिले सुवासित ।
वासें वसंत होतसे मूर्च्छित । श्रीरघुनाथ निजशोभा ॥६३॥
हाटवाटियाभागीं दोहीं । चिद्रत्‍नें जडित शोभा पाहीं ।
हरिकीर्तनें ठायीं । गर्जती देही हरीनामें ॥६४॥
मखरें शोभती कुसरीं । मुक्ताफ़ळांचिया हारी ।
सुमनमाळा चूतांकुरीं । द्वारोद्वारीं तोरणें ॥६५॥
पूर्ण कळस द्वारोद्वारी । सदीप शोभा तयांवरी ।
गुढिया उभविल्या घरोघरीं । नरनारी उत्सवा ॥६६॥
कोठे अभिषेकाची वार्ता । कोठे करिती रामकथा ।
एकां अत्यंत एकाग्रता । श्रीरघुनाथ पहावया ॥६७॥

दशरथास चिंता, तो रामास निवेदन करतो :

निजनगर शोभायुक्त । सकल जन उल्लासत ।
तें देखोनियां दशरथ । जाला शंकित निजमानासीं ॥६८॥
श्रीरामभिषेकाचा सोहळा । मी काय देखेन आपुलें डोळां ।
हे भाग्य दुर्लभ कपाळा । म्हणोनि डोळां अश्रु आले ॥६९॥
पाचारोनि श्रीरामासी । गुह्य सांगे तयांपासीं ।
म्हणे प्रातःकाळीं गुरुपुष्यासी । तूं यौवराज्यासी अंगीकारीं ॥७०॥
येरे चरणीं ठेविला माथा । तंव गहिंवरू आला दशरथा ।
ऐक बापा श्रीरघुनाथा । गुह्य तत्वतां सांगेन ॥७१॥

दुष्ट ग्रहांचा फेरा :

तुझे अभिषेकाचा निर्धार । जैंपासोनि केला साचार ।
तैंपासोनि ग्रह क्रूर । गगनीं अत्युग्र भासती ॥७२॥

अवष्टब्धं च मे राम् नक्षत्रं दारुणग्रहैः ।
आवेद्यंति दैवज्ञा जन्म्स्थो मां शनैश्वरः ॥१५॥
अपि चाद्याशुभान्माराम स्वप्रान्पश्यामि राघव ।
सनिर्धात दिवोल्काश्च पतंति हि महास्वनाः ॥१६॥
प्रायेण च निमित्तानरामीद्यशानां समुभ्दवे ।
राजा हि मृत्युमाप्नोति घोरां चापदमृच्छति ॥१७॥

माझे राशीस शनैश्वर । सांगती ज्योतिर्विद नर ।
तोही लागत अति क्रूर । पीडा दुर्धर तयाची ॥७३॥
माझें जें का जन्मनक्षत्र । तेथें वक्रीभौमशनैश्वर ।
तयांसी मिनला अतिचार । अति सत्वर गुरु देखा ॥७४॥
मृग नक्षत्रीं माझी उत्पत्ती । पुनर्वसूसीं तुज जन्मप्राप्ती ।
दोघांस दिसताहे ग्रहगती । जाण निश्चितीं रघुनाथा ॥७५॥
सूर्ययुक्त राहु रोहिणींसी । केतु बैसला असे विशाखेसीं ।
ते दोघे वैरी सूर्यासी । रविरोहिणींसी ग्रासूं पाहती ॥७६॥
मृग मिथुन माझीं राशी । बारावा रवि राहु वृषभासीं ।
क्रूर ग्रहगति दिसे ऐसी । विनाशासी निजमूळ ॥७७॥
शनि भौम दोनी वक्री । तेथेचि गुरु आला अतिचारी ।
हे क्रूर माझे राशीवरी । तेचि रामचंद्री बारावे ॥७८॥

अनिष्ट स्वप्ने व त्याची अशुभ फले :

आणिकही एक दुश्चिन्ह । म्यां देखिले दुष्ट स्वप्न ।
पुढिल भाणें वाझिलें संपूर्ण । नेले झडपोन घारीनें ॥७९॥
अभेंवीण अति बोभाटें । विजा पडती अति नेटें ।
जीव जाऊं पाहे कडकडाटें । येणें उभ्दटें अति निःपातु ॥८०॥
सहित मेरु कुळाचळ । भूकंप जाहला अति प्रबळ ।
श्रीरामा या चिन्हाचें फळ । जाण केवळ अनिष्ट ॥८१॥
या चिन्हांचा निजविलास । राज्यभ्रंश कां वनवास ।
अवश्य होय जीवनाश । परम त्रास सुहृदांसी ॥८२॥
यालागीं गा रघुनाथा । यौवराज्यअभिषेकता ।
अंगीकारीं अति शीघ्रता । प्रातःपुष्यता साधूनी ॥८३॥

श्रीरामांचे कौसल्या मंदिरात आगमन :

श्रीराम म्हणे आज्ञा प्रमाण । म्हणोनियां वंदिले चरण ।
रायें संतोषोनि जाण । पाठविला आपण निजधामा ॥८४॥
रामें पुसोनि नृपवरा । आला कौसल्येच्या निजमंदिरा ।
येरी देखोनि श्रीरामचंद्रा । नयनद्वारा निवाली ॥८५॥
श्रीराम सांगे कौसल्येसी । प्रातःकाळीं यौवराज्यासी ।
रायें नेमिलें अभिषेकासीं । तेणें उल्लसी कौसल्या ॥८६॥

राज्याभिषेकवार्तेमुळे कौसल्या व सुमित्रेस आनंद :

श्रीरामराज्याभिषेक । तेणें कौसल्येसी परम हरिख ।
गोमूक्षौमांबरें कनक । विप्रा अनेक देती जाली ॥८७॥
हरिखें आला लक्ष्मण । त्यासी राम बोलिला आपण ।
माझें राज्य तें तुझें जाण । मीतूंपण आम्हां नाहीं ॥८८॥
गोडी गुळाचा विवेक । नांवे दोन स्वरूप एक ।
तैसी आम्हां तुम्हां देख । वेगळीक असेना ॥८९॥
अलंकार आणि कनक । आकार निकार दोनी एक ।
तैसे आम्ही तुम्ही देख । सर्वदा ऐक्य सर्व कर्मीं ॥९०॥
जैसा जीव आणि प्राण । तैसे राम आणि लक्ष्मण ।
ऐकोनि श्रीरामचे वचन । केंले निंबलोण कौसल्यें ॥९१॥
सुमित्रेसी आल्हाद पूर्ण । तिनें देखोनि रामलक्ष्मण ।
ओंवाळोनि दोघे जण । हरिखें आपण धन वाटीं ॥९२॥
श्रीरामासी लोटांगण । घालोनिया लक्ष्मण ।
तुझे सेवेचें सुख संपूर्ण । यास प्रमाण चरण तुझें ॥९३॥
श्रीरामा तुझे सेवेवीण । त्रैलोक्याचें राज्य पूर्ण ।
तें मज ब्रह्मस्वासमान । तुझी आण वाहतसें ॥९४॥
ऐकोनि लक्ष्मणाचे वचन । रामें दिधलें आलिंगन ।
म्हणे तूं जिवलग संपूर्ण । सखा सज्जन सर्वस्वें ॥९५॥

रामांचे स्वगृही गमन, व्रतपरिपालन :

याउपरी रघुनंदन । कौसल्यासुमित्रेसी नमन ।
करोनि लक्ष्मणाची बोळवण । स्वधामा आपण येता जाला ॥९६॥
प्रातःकाळी अभिषिंचन । रामसीतेसी उपोषण ।
सांगावया वसिष्ठ श्रेष्ठ पूर्ण । रायें आपण पाठविला ॥९७॥
सद्‌गुरु आला निजभनासि । श्रीराम अत्यंत उल्हासीं ।
लोटांगण घालोनि तयासी । मग पायांसी लागला ॥९८॥
पूजामधुपर्कविधान । सालंकृतशतगोदान ।
देवोनि केलें चरणक्षाळण । तीर्थप्राशन केलें रामें ॥९९॥
ते वेळीं वसिष्ठें आपण । करविले पुण्याहवाचन ।
श्रीरामसीतेसि उपोषण । केला संपूर्ण संकल्प ॥१००॥
अभिषेकार्थ होमविधान । होमशेषघृतप्राशन ।
कुशास्तरणीं भूमिशयन । दोघांलागून करविलें ॥१०१॥
वसिष्ठ सांगे रायांपाशी । प्रातःकाळीं अभिषेकासी ।
उपोषण श्रीरामसीतेसी । कुशास्तरणीं भूमिशयन ॥१०२॥
राजा वसिष्ठासी करी नमन । म्हणे केल्या रामासी अभिषिंचन ।
ऋणत्रयांपासून मी उत्तीर्ण । सत्य जाण गुरुवर्या ॥१०३॥
वसिष्ठ बोले आल्हादेंसीं । श्रीरामराज्याभिषेकासीं ।
स्वर्गसुख राया देखसी । या वाक्यें उल्लसी दशरथ ॥१०४॥
राज्याभिषेक रघुनाथा । तेणें इंद्रादिदेवां समस्तां ।
मांडलीसे कल्पांतचिंता । तिहीं विधाता प्रार्थिला ॥१०५॥
श्रीराम अभिषेकासी विघ्न । घरचेघरीं उपजेल पूर्ण ।
ते युक्ती सांगेल चतुरानन । दशवदनवधार्था ॥१०६॥
एकाजनार्दना शरण । ब्रह्मरसें नवरस संपूर्ण ।
विघ्नें सुखावे रघुनंदन । तें निरोपण अवधारा ॥१०७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामाभिषेकप्रारंभो नाम द्वितियोध्यायः ॥ २ ॥
॥ ओव्यां १०८ ॥ श्लोक १७ ॥ एवं १२५ ॥



GO TOP