श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुंदरकाण्डे
॥ पञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणकर्तृकः प्रहस्तद्वारको हनुमंतं प्रति लंकायामागमन प्रयोजनस्य प्रश्नः; हनुमता रामदूतत्वेनात्मनः परिचयदानम् -
रावणाने प्रहस्ताच्या द्वारे हनुमानास लंकेत येण्याचे कारण विचारणे आणि हनुमंताने आपण श्रीरामाचा दूत असल्याचे सांगणे -
तमुद्वीक्ष्य महाबाहुः पिङ्गाक्षं पुरतः स्थितम् ।
कोपेन महताऽऽविष्टो रावणो लोकरावणः ॥ १॥
समस्त लोकात भय उत्पन्न करणारा तो महाबाहु रावण आपल्या समोर उभा असलेल्या त्या पिंगटवर्णाचे नेत्र असलेल्या हनुमंतास पाहून अत्यंत क्रोधाविष्ट झाला. ॥१॥
शङ्काहतात्मा दध्यौ स कपीन्द्रं तेजसावृतम् ।
किमेष भगवान् नन्दी भवेत् साक्षादिहागतः ॥ २॥

येन शप्तोऽस्मि कैलासे मया प्रहसिते पुरा ।
सोऽयं वानरमूर्तिः स्यात् किंस्विद् बाणोपि वाऽसुरः ॥ ३॥
त्याचबरोबर नाना प्रकारच्या शंकानी तो चिंताग्रस्त झाला आणि त्या तेजस्वी वानरासंबंधी आपल्याशीच या प्रकारे विचार करू लागला - " अरे ! या वानराच्या रूपात साक्षात भगवान नंदी तर येथे आला नाही ना ? कारण पूर्वी मी कैलास पर्वतावर त्याचा उपहास केला होता, तेव्हा त्याने मला शाप दिला होता की माझ्यासारखे ज्याचे मुख आहे अशाच्या हातून तुझा नाश होईल. तो तर वानररूप धारण करून येथे आला नाही ना ? अथवा या रूपात बाणासुराचे तर आगमन झाले नाही ना ? ॥२-३॥
स राजा रोषताम्राक्षः प्रहस्तं मंत्रिसत्तमम् ।
कालयुक्तमुवाचेदं वचो विपुलमर्थवत् ॥ ४॥
या प्रमाणे मनामध्ये शंका आल्यावर क्रोधाने डोळे लाल झालेला तो राजा रावण आपल्या मंत्रीश्रेष्ठ प्रहस्ताशी त्या समयाला अनुरूप, गंभीर आणि अर्थपूर्ण असे भाषण करू लागला. ॥४॥
दुरात्मा पृच्छ्यतामेष कुतः किं वास्य कारणम् ।
वनभङ्गे च कोऽस्यार्थो राक्षसानां च तर्जने ॥ ५॥
तो म्हणाला - " अमात्य ! या दुरात्माला विचारा की तू कोठून आला आहेस ? याच्या येण्याचे कारण काय आहे ? प्रमदावन उध्वस्त करण्यात आणि राक्षसांना मारण्यात याचा काय उद्देश होता ? ॥५॥
मत्पुरीमप्रधृष्यां वै गमने किं प्रयोजनम् ।
आयोधने वा किं कार्यं पृच्छ्यतामेष दुर्मतिः ॥ ६॥
माझ्या या दुर्जय पुरीत जे याचे आगमन झाले आहे त्याचे प्रयोजन काय आहे ? अथवा याने जे राक्षसांबरोबर युद्ध आरंभले आहे त्यात त्याचा काय उद्देश आहे ? ह्या सर्व गोष्टी या दुर्मति वानराला विचारा. ॥६॥
रावणस्य वचः श्रुत्वा प्रहस्तो वाक्यमब्रवीत् ।
समाश्वसिहि भद्रं ते न भीः कार्या त्वया कपे ॥ ७॥
हे रावणाचे भाषण ऐकून प्रहस्त हनुमानास म्हणला - हे वानरा ! तू स्वस्थ रहा, घाबरू नको, तुझे कल्याण असो. तुला भिण्याची आवश्यकता नाही. ॥७॥
यदि तावत् त्वमिन्द्रेण प्रेषितो रावणालयम् ।
तत्त्वमाख्याहि मा ते भूद् भयं वानर मोक्ष्यसे ॥ ८॥
तुला जर इंद्राने रावणाच्या नगरीत धाडले असेल तर ते सारे तू खरे खरे सांग म्हणजे तुझी सुटका होईल. ॥८॥
यदि वैश्रवणस्य त्वं यमस्य वरुणस्य च ।
चाररूपमिदं कृत्वा प्रविष्टो नः पुरीमिमाम् ॥ ९॥
अथवा जर तू कुबेर, यम अथवा वरूण यांचा दूत असशील आणि हे सुंदर रूप धारण करुन तू आमच्या या नगरात घुसला असशील तर तेही स्पष्टपणे सांग. ॥९॥
विष्णुना प्रेषितो वापि दूतो विजयकाङ्‌क्षिणा ।
न हि ते वानरं तेजो रूपमात्रं तु वानरम् ॥ १०॥
अथवा विजयाची अभिलाषा धरणार्‍या विष्णूने तुला दूत बनवून धाडले आहे कां ? तुझे तेज वानराप्रमाणे नाही. केवळ रूप मात्र वानराचे आहे. ॥१०॥
तत्त्वतः कथयस्वाद्य ततो वानर मोक्ष्यसे ।
अनृतं वदतश्चापि दुर्लभं तव जीवितम् ॥ ११॥
हे वानरा ! या वेळी तू जे काही खरे असेल ते सांग तर तुला सोडून दिले जाईल. जर तू खोटे बोललास तर मात्र तुझे जगणे असंभवनीय होऊन जाईल. ॥११॥
अथवा यन्निमित्तस्ते प्रवेशो रावणालये ।
एवमुक्तो हरिवरः तदा रक्षोगणेश्वरम् ॥ १२॥

अब्रवीन्नास्मि शक्रस्य यमस्य वरुणस्य वा ।
धनदेन न मे सख्यं विष्णुना नास्मि चोदितः ॥ १३॥
अथवा इतर सर्व गोष्टी राहू देत. तुझा या रावणाच्या नगरीत येण्याचा उद्देश काय आहे, ते तरी सांग. प्रहस्ताने असे विचारल्यावर त्यावेळी वानरश्रेष्ठ हनुमान राक्षसांचा स्वामी जो रावण त्यास म्हणाले - "मी इंद्र, यम अथवा वरूणाचा दूत नाही आहे. कुबेराशी माझे सख्य नाही आणि भगवान विष्णूनेही मला येथे धाडलेला नाही. ॥१२-१३॥
जातिरेव मम त्वेषा वानरोऽहमिहागतः ।
दर्शने राक्षसेन्द्रस्य तदिदं दुर्लभं मया ॥ १४॥

वनं राक्षसराजस्य दर्शनार्थे विनाशितम् ।
ततस्ते राक्षसाः प्राप्ता बलिनो युद्धकाङ्‌क्षिणः ॥ १५॥

रक्षणार्थं तु देहस्य प्रतियुद्धा मया रणे ।
’मी जन्मानेच वानर आहे आणि राक्षस रावणास भेटण्याच्या उद्देशानेच मी त्याच्या या दुर्लभ वनास उध्वस्त केले आहे. त्यानंतर तुमचे बलवान राक्षस युद्धाच्या इच्छेने माझ्या जवळ आले आणि मी माझ्या शरीराचे रक्षण करण्यासाठी रणभूमीवर त्यांचा सामना केला. ॥१४-१५ १/२॥
अस्त्रपाशैर्न शक्योऽहं बद्धुं देवासुरैरपि ॥ १६॥

पितामहादेष वरो ममापि हि समागतः ।
’देवता अथवा असुरही मला अस्त्राने अथवा पाशाने बांधू शकत नाहीत, यासाठी मला पितामह ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालेले आहे. ॥१६ १/२॥
राजानं द्रष्टुकामेन मयास्त्रमनुवर्तितम् ॥ १७॥

विमुक्तोऽप्यहमस्त्रेण राक्षसैस्त्वभिवेदितः ।
’राक्षसराजास पहाण्याच्या इच्छेनेच मी अस्त्राचे बंधन स्वीकारले होते. जरी मी यावेळी अस्त्रापासून मुक्त आहे तरीही या राक्षसांनी मला बद्ध समजूनच येथे आणून तुमच्या स्वाधीन केले आहे. ॥१७ १/२॥
केनचिद् रामकार्येण आगतोऽस्मि तवान्तिकम् ॥ १८॥

दूतोऽहमिति विज्ञेयो राघवस्यामितौजसः ।
श्रूयतां चापि वचनं मम पथ्यमिदं प्रभो ॥ १९॥
भगवान श्रीरामांच्या काही कार्यासाठी मी तुमच्या जवळ आलो आहे. हे प्रभो ! मी अमित तेजस्वी श्रीराघवाचा दूत आहे, हे जाणून माझ्या या हितावह वचनांना आपण अवश्य ऐका. ॥१८-१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे पञ्चाशः सर्गः ॥ ५०॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा पन्नासावा सर्ग पूर्ण झाला. ॥५०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP