श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। त्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामकर्तृकं विश्वामित्रयज्ञस्य संरक्षणं राक्षसानां संहरणं च - श्रीरामद्वारा विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण तथा राक्षसांचा संहार -
अथ तौ देशकालज्ञौ राजपुत्रावरिन्दमौ ।
देशे काले च वाक्यज्ञावब्रूतां कौशिकं वचः ॥ १ ॥
तदनंतर देश आणि काल यांना जाणणारे शत्रुदमन राजकुमार श्रीराम अणि लक्ष्मण जे देश आणि काल यांना अनुसरून बोलण्यायोग्य वचनांचे मर्मज्ञ होते, कौशिक मुनिंना या प्रकारे म्हणाले - ॥ १ ॥
भगवञ्छ्रोतुमिच्छावो यस्मिन् काले निशाचरौ ।
संरक्षणीयौ तौ ब्रूहि नातिवर्तेत तत्क्षणम् ॥ २ ॥
"भगवन् ! आता आम्ही दोघे हे जाणू इच्छितो की त्या दोघा निशाचरांचे आक्रमण कुठल्या वेळी होते ? कारण आम्हाला त्या दोघांना यज्ञभूमिमध्ये येण्यापासून रोखून ठेवायचे आहे. असे न व्हावे की बेसावधपणामुळे ती वेळ हातून निघून जाईल, म्हणून आपण सांगावे." ॥ २ ॥
एवं ब्रुवाणौ काकुत्स्थौ त्वरमाणौ युयुत्सया ।
सर्वे ते मुनयः प्रीताः प्रशशंसुर्नृपात्मजौ ॥ ३ ॥
असे बोलून युद्धाच्या इच्छेने उतावळे झालेल्या त्या काकुत्स्थवंशी दोन्ही राजकुमारांकडे पाहून ते सर्व मुनि अत्यंत प्रसन्न झाले आणि त्या दोन्ही बंधुंची भूरि भूरि प्रशंसा करू लागले. ॥ ३ ॥
अद्यप्रभृति षड्रात्रं रक्षतं राघवौ युवाम् ।
दीक्षां गतो ह्येष मुनिर्मौनित्वं च गमिष्यति ॥ ४ ॥
ते म्हणाले - "मुनिवर विश्वामित्र यज्ञाची दीक्षा घेऊन चुकले आहेत म्हणून ते आता मौनात राहतील. आपण दोघे रघुवंशी वीर सावधान होऊन आजपासून सहा रात्रीपर्यंत यांच्या यज्ञाचे रक्षण करीत राहावे. ॥ ४ ॥
तौ च तद्वचनं श्रुत्वा राजपुत्रौ यशस्विनौ ।
अनिद्रं षडहोरात्रं तपोवनमरक्षताम् ॥ ५ ॥
मुनींचे हे वचन ऐकून ते दोन्ही यशस्वी राजकुमार सहा दिवस आणि सहा रात्रिपर्यंत त्या तपोवनाचे रक्षण करीत राहिले. या कालावधित त्यांनी झोपही घेतली नाही. ॥ ५ ॥
उपासांचक्रतुर्वीरौ यत्तौ परमधन्विनौ ।
ररक्षतुर्मुनिवरं विश्वामित्रमरिंदमौ ॥ ६ ॥
शत्रूंचे दमन करणारे ते परम धनुर्धर वीर सतत सावधान राहून मुनिवर विश्वामित्रांच्या जवळ उभे राहून त्यांचे आणि त्यांच्या यज्ञाचे रक्षण करीत राहिले होते. ॥ ६ ॥
अथ काले गते तस्मिन् षष्ठेऽहनि तदागते ।
सौमित्रिमब्रवीद् रामो यत्तो भव समाहितः ॥ ७ ॥
या प्रकारे काही काल गेल्यावर जेव्हां सहावा दिवस आला तेव्हां श्रीरामांनी सुमित्राकुमार लक्ष्मणास म्हटले - "सुमित्रानंदन ! तूं आपल्या चित्ताला एकाग्र करून सावधान हो.' ॥ ७ ॥
रामस्यैवं ब्रुवाणस्य त्वरितस्य युयुत्सया ।
प्रजज्वाल ततो वेदिः सोपाध्यायपुरोहिता ॥ ८ ॥
युद्धाच्या इच्छेने शीघ्रता करीत श्रीराम याप्रकारे बोलतच होते इतक्यात उपाध्याय (ब्रह्मा) पुरोहित (उपद्रष्टा) आणि अन्यान्य ऋषिंनी घेरलेली यज्ञाची वेदी एकाएकी प्रज्वलित झाली. वेदीचे हे प्रज्वलन राक्षसांच्या आगमनाचा सूचक उत्पात होता. ॥ ८ ॥
सदर्भचमसस्रुक्का ससमित्कुसुमोच्चया ।
विश्वामित्रेण सहिता वेदिर्जज्वाल सर्त्विजा ॥ ९ ॥
यानंतर कुश, चमस, स्रुक्, समिधा आणि फुलांच्या राशींनी सुशोभित होणारी विश्वामित्र आणि ऋत्विजांसहित यज्ञाची जी वेदी होती, तिच्यावर आहवनीय अग्नि प्रज्वलित झाला. अग्निचे हे प्रज्वलन यज्ञाच्या उद्देशाने झाले होते. ॥ ९ ॥
मन्त्रवच्च यथान्यायं यज्ञोऽसौ संप्रवर्तते ।
आकाशे च महाञ्छब्दः प्रादुरासीद् भयानकः ॥ १० ॥
नंतर तर शास्त्रीय विधिनुसार वेद मंत्रांचे उच्चारपूर्वक त्या यज्ञ कार्यास आरंभ झाला त्यावेळी आकाशातून फार मोठा आवाज ऐकू आला, जो फारच भयानक होता. ॥ १० ॥
आवार्य गगनं मेघो यथा प्रावृषि दृष्यते ।
तथा मायां विकुर्वाणौ राक्षसावभ्यधावताम् ॥ ११ ॥

मारीचश्च सुबाहुश्च तयोरनुचरास्तथा ।
आगम्य भीमसंकाशा रुधिरौघानवासृजन् ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे मेघांचा समूह सर्व आकाशाला घेरून सर्वत्र व्याप्त दिसून येतो त्याप्रमाणेच मारीच आणि सुबाहु नामक राक्षस सर्व बाजूस आपली माया पसरवीत यज्ञमण्डपाकडे धावत येऊ लागले. त्यांचे अनुचरही त्यांचे बरोबर होते. त्या भयंकर राक्षसांनी तेथे येऊन रक्ताच्या धारांचा वर्षाव करण्यास आरंभ केला. ॥ ११-१२ ॥
तां तेन रुधिरौघेण वेदीं वीक्ष्य समुक्षिताम् ।
सहसाभिद्रुतो रामस्तानपश्यत् ततो दिवि ॥ १३ ॥

तावपतन्तौ सहसा दृष्ट्‍वा राजीवलोचनः ।
लक्ष्मणं त्वभिसम्प्रेक्ष्य रामो वचनमब्रवीत् ॥ १४ ॥
रक्ताच्या त्या प्रवाहाने यज्ञाच्या वेदीच्या आसपासची सर्व जमीन भिजून गेलेली पाहून श्रीरामचंद्र सहसा धावत आले आणि इकडे तिकडे दृष्टि टाकल्यावर त्यांनी त्या राक्षसांना आकाशात स्थित असलेले पाहिले. मारीच आणि सुबाहूला एकाएकी येताना पाहून कमलनयन श्रीरामांनी लक्ष्मणाकडे पाहून म्हटले - ॥ १३-१४ ॥
पश्य लक्ष्मण दुर्वृत्तान् राक्षसान् पिशिताशनान् ।
मानवास्त्रसमाधूताननिलेन यथा घनान् ॥ १५ ॥

करिष्यामि न सन्देहो नोत्सहे हन्तुमीदृशान् ।
'लक्ष्मणा ! ते पहा मांसभक्षण करणारे दुराचारी राक्षस येऊन पोहोचले आहेत. मी मानवास्त्राने या सर्वांना अशा प्रकारे मार देऊन पळवून लाविन की वायुच्या वेगाने मेघ जसे छिन्न भिन्न होतात, तशी त्यांची अवस्था होईल. मी हे जे सांगत आहे त्यात शंकेला जराही वाव नाही. अशा भ्याडांना मी मारू इच्छित नाही." ॥ १५ १/२ ॥
इत्युक्त्वा वचनं रामश्चापे संधाय वेगवान् ॥ १६ ॥

मानवं परमोदारमस्त्रं परमभास्वरम् ।
चिक्षेप परमक्रुद्धो मारीचोरसि राघवः ॥ १७ ॥
असे म्हणून वेगवान श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर परम उदार मानवास्त्राचे संधान केले. ते अस्त्र अत्यंत तेजस्वी होते. श्रीरामांनी अत्यंत रोषाने युक्त होऊन मारीचाच्या छातीत त्या बाणाचा प्रहार केला. ॥ १६-१७ ॥
स तेन परमास्त्रेण मानवेन समाहतः ।
संपूर्णं योजनशतं क्षिप्तः सागरसम्प्लवे ॥ १८ ॥
त्या उत्तम मानवास्त्राचा जोरदार आघात होताच मारीच शंभर योजने दूर समुद्राच्या जलात जाऊन पडला. ॥ १८ ॥
विचेतनं विघूर्णन्तं शीतेषुबलपीडितम् ।
निरस्तं दृश्य मारीचं रामो लक्ष्मणमब्रवीत् ॥ १९ ॥
शीतेषु नामक मानवास्त्राने पीडित होऊन मारीच निश्चेष्ट होऊन गोल गोल फिरत फिरत दूर निघून जात आहे हे पाहून श्रीरामांनी लक्ष्मणास म्हटले - ॥ १९ ॥
पश्य लक्ष्मण शीतेषुं मानवं मनुसंहितम् ।
मोहयित्वा नयत्येनं न च प्राणैर्वियुज्यते ॥ २० ॥
"लक्ष्मणा ! नवल पहा, मनुच्या द्वारा प्रयुक्त शीतेषु नामक मानवास्त्र या राक्षसाला मूर्छित करून दूर घेऊन जात आहे, परंतु त्याचा प्राण घेत नाही. ॥ २० ॥
इमानपि वधिष्यामि निर्घृणान् दुष्टचारिणः ।
राक्षसान् पापकर्मस्थान् यज्ञघ्नान् रुधिराशनान् ॥ २१ ॥
आता यज्ञात विघ्न आणणार्‍या या दुसर्‍या निर्दय, दुराचारी, पापकर्मी आणि रक्तभोजी राक्षसांना मी मारून टाकतो." ॥ २१ ॥
इत्युक्त्वा लक्ष्मणं चाशु लाघवं दर्शयन्निव ।
विगृह्य सुमहच्चास्त्रमाग्नेयं रघुनन्दनः ॥ २२ ॥

सुबाहूरसि चिक्षेप स विद्धः प्रापतद् भुवि ।
शेषान् वायव्यमादाय निजघान महायशाः ।
राघवः परमोदारो मुनीनां मुदमावहन् ॥ २३ ॥
लक्ष्मणास असे बोलून रघुनंदन श्रीरामाने आपल्या हाताची चलाखी दाखवीतच जणु शीघ्रच महान् आग्नेयास्त्राचे संधान करून त्यास सुबाहुच्या छातीत मारले. त्याचा प्रहार होताच तो मरून पृथ्वीवर पडला. नंतर महायशस्वी परम उदार रघुवीराने वायव्यास्त्र घेऊन शेष निशाचरांचाही संहार करून टाकला आणि मुनींना परम आनंद प्रदान केला. ॥ २२-२३ ॥
स हत्वा राक्षसान् सर्वान् यज्ञघ्नान् रघुनन्दनः ।
ऋषिभिः पूजितस्तत्र यथेन्द्रो विजये पुरा ॥ २४ ॥
या प्रकारे रघुकुलनंदन श्रीरामांनी यज्ञात विघ्न आणणार्‍या समस्त राक्षसांचा वध करून तेथे ऋषिंच्या द्वारा ते, पूर्वकाली असुरांवर विजय मिळवून देवराज इंद्र जसे महर्षिंच्या द्वारा पूजित झाले होते, त्याप्रमाणे सन्मानित झाले. ॥ २४ ॥
अथ यज्ञे समाप्ते तु विश्वामित्रो महामुनिः ।
निरीतिका दिशो दृष्ट्‍वा काकुत्स्थमिदमब्रवीत् ॥ २५ ॥
यज्ञ समाप्त झाल्यावर महामुनि विश्वामित्रांनी सर्व दिशांना विघ्नरहित, बाधारहित पाहून श्रीरामचंद्रास म्हणाले - ॥ २५ ॥
कृतार्थोऽस्मि महाबाहो कृतं गुरुवचस्त्वया ।
सिद्धाश्रममिदं सत्यं कृतं वीर महायशः ।
स हि रामं प्रशस्यैवं ताभ्यां संध्यामुपागमत् । २६ ॥
"महाबाहो ! तुझी प्राप्ति झाल्याने मी कृतार्थ झालो आहे. तू गुरुच्या आज्ञेचे पूर्णरूपाने पालन केले आहेस. महायशस्वी वीरा ! तू या सिद्धाश्रमाचे नाम सार्थक केले आहेस. या प्रकारे श्रीरामचंद्रांची प्रशंसा करून मुनींनी त्या दोघा भावांसह संध्योपासना केली. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे त्रिंशः सर्गः ॥ ३० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा तिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP