[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्विनवतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतेन भरद्वाजाद् गन्तुमनुज्ञाग्रहणं श्रीरामस्याश्रमे मार्गस्य परिचयग्रहणं मुनये मातॄणां परिचयं दत्त्वा ततश्चित्रकूटं गन्तुं ससैन्यस्य भरतस्य प्रस्थापनम् -
भरतांनी भरद्वाज मुनींकडून जाण्याची आज्ञा घेऊन श्रीरामांच्या आश्रमाकडे जाण्याचा मार्ग जाणून घेणे आणि मुनींना आपल्या मातांचा परिचय करून देऊन तेथून चित्रकूटासाठी सेनेसहित प्रस्थान करणे -
ततस्तां रजनीं व्युष्य भरतः सपरिच्छदः ।
कृतातिथ्यो भरद्वाजं कामादभिजगाम ह ॥ १ ॥
परिवारासहित भरत इच्छेनुसार मुनींचे आतिथ्य स्वीकारून रात्रभर आश्रमातच राहिले. नंतर सकाळी जाण्याची आज्ञा घेण्यासाठी ते महर्षि भरद्वाजांच्या जवळ गेले. ॥ १ ॥
तमृषिः पुरुषव्याघ्रं प्रेक्ष्य प्राञ्जलिमागतम् ।
हुताग्निहोत्रो भरतं भरद्वाजोऽभ्यभाषत ॥ २ ॥
पुरुषसिंह भरतांना हात जोडून आपल्याजवळ आलेला पाहून भरद्वाजांनी अग्निहोत्राचे कार्य करून त्यांना म्हटले - ॥ २ ॥
कच्चिदत्र सुखा रात्रिस्तवास्मद्विषये गता ।
समग्रस्ते जनः कच्चिदातिथ्ये शंस मेऽनघ ॥ ३ ॥
निष्पाप भरता ! आमच्या या आश्रमात तुमची ही रात्र सुखाने गेली आहे ना ? तुमच्या बरोवर आलेले सर्व लोक या आतिथ्याने संतुष्ट झाले आहेत ना ? हे सांगा. ॥ ३ ॥
तमुवाचाञ्जलिं कृत्वा भरतोऽभिप्रणम्य च ।
आश्रमादुपनिष्क्रान्तमृषिमुत्तमतेजसम् ॥ ४ ॥
त्यावेळी भरतांनी आश्रमाच्या बाहेर आलेल्या त्या उत्तम तेजस्वी महर्षिंना प्रणाम करून हात जोडीत म्हटले - ॥ ४ ॥
सुखोषितोऽस्मि भगवन् समग्रबलवाहनः ।
बलवत्तर्पितश्चाहं बलवान् भगवंस्त्वया ॥ ५ ॥
’भगवन् ! मी संपूर्ण सेना आणि वाहने यांच्यासह येथे सुखपूर्वक राहिलो आहे आणि सैनिकांसहित मला पूर्णपणे तृप्त केले गेले आहे. ॥ ५ ॥
अपेतक्लमसंतापाः सुभिक्षाः सुप्रतिश्रयाः ।
अपि प्रेष्यानुपादाय सर्वे स्म सुसुखोषिताः ॥ ६ ॥
’सेवकांसहित आम्ही सर्व लोक ग्लानि आणि संताप रहित होऊन उत्तम अन्नपान ग्रहण करून सुंदर गृहांचा आश्रय घेऊन मोठ्या सुखाने रात्रभर राहिलो. ॥ ६ ॥
आमन्त्रयेऽहं भगवन् कामं त्वामृषिसत्तम ।
समीपं प्रस्थितं भ्रातुर्मैत्रेणेक्षस्व चक्षुषा ॥ ७ ॥
’भगवन् ! मुनिश्रेष्ठ ! आता मी आपल्या इच्छेनुसार आपली आज्ञा घेण्यासाठी आलो आहे आणि आपल्या भावाकडे प्रस्थान करीत आहे; आपण माझ्याकडे स्नेहपूर्ण दृष्टीने पहावे. ॥ ७ ॥
आश्रमं तस्य धर्मज्ञ धार्मिकस्य महात्मनः ।
आचक्ष्व कतमो मार्गः कियानिति च शंस मे ॥ ८ ॥
धर्मज्ञ मुनिश्वर ! सांगावे की धर्मपरायण महात्मा श्रीरामांचा आश्रम कोठे आहे ? किती दूर आहे ? आणि तेथे पोचण्यासाठी कुठला मार्ग आहे ? या सर्वाचे माझ्याजवळ स्पष्ट वर्णन करावे’. ॥ ८ ॥
इति पृष्टस्तु भरतं भ्रातुर्दर्शनलालसम् ।
प्रत्युवाच महातेजा भरद्वाजो महातपाः ॥ ९ ॥
अशा प्रकारे विचारले गेल्यावर महातपस्वी, महातेजस्वी भरद्वाज मुनींनी भावाच्या दर्शनाची लालसा असलेल्या भरतास याप्रमाणे उत्तर दिले - ॥ ९ ॥
भरतार्धतृतीयेषु योजनेष्वजने वने ।
चित्रकूटगिरिस्तत्र रम्यनिर्झरकाननः ॥ १० ॥
’ भरता ! येथून अडीच योजने (दहा कोसाच्या**) अंतरावर एका निर्जन वनात चित्रकूट नामक पर्वत आहे जेथील निर्झर आणि वन अत्यंत रमणीय आहेत. (प्रयाग पासून चित्रकूटचे आधुनिक अंतर जवळ जवळ २८ कोस आहे). ॥ १० ॥
[** सर्ग ५४ च्या श्लोक २८ मध्ये मूळ ग्रंथात दहा कोसांचे अंतर दिले आहे आणि येथे अडीच योजन म्हटले आहे. दोन्ही स्थळी दहा कोसांचाच संकेत आहे. ’रामायणशिरोमणि’ नामक व्याख्येत दोन्ही जागी कपि-जलाधिक करण न्यायाने अथवा एकशेषाच्या द्वारा हे अंतर तिप्पट करून दाखविले गेले आहे. रामायणशिरोमणिकारांच्या मान्यतेनुसार ३० कोसाचे अंतर आणि हे अंतर यात अधिक फारसा फरक नाही. मैलाचे माप जुन्या कोश-मानापेक्षा लहान आहे म्हणून ७० मैलाचे हे अंतर मानले जाते.]
उत्तरं पार्श्वमासाद्य तस्य मन्दाकिनी नदी ।
पुष्पितद्रुमसञ्छन्ना रम्यपुष्पितकानना ॥ ११ ॥

अनन्तरं तत्सरितश्चित्रकूटं च पर्वतम् ।
तयोः पर्णकुटीं तात तत्र तौ वसतो ध्रुवम् ॥ १२ ॥
त्याच्या उत्तर किनार्‍यापासून मंदाकिनी नदी वाहात आहे, जी फुलांनी लगडलेल्या सघन वृक्षांनी आच्छादित राहते. तिच्या आसपासचे वन फारच रमणीय आणि नाना प्रकारच्या पुष्पांनी सुशोभित आहे. त्या नदीच्या दुसर्‍या बाजूस चित्रकूट पर्वत आहे. तात ! तेथे पोहोचून तुम्ही नदी आणि पर्वत यांच्यामध्ये श्रीरामांची पर्णकुटी पहाल. ते दोघे भाऊ राम आणि लक्ष्मण निश्चितच तेथे निवास करीत आहेत. ॥ ११-१२ ॥
दक्षिणेन च मार्गेण सव्यदक्षिणमेव च ।
गजवाजिसमाकीर्णां वाहिनीं वाहिनीपते ॥ १३ ॥

वाहयस्व महाभाग ततो द्रक्ष्यसि राघवम् ।
"सेनापति ! तुम्ही येथून हत्ती-घोड्यांनी भरलेली आपली सेना घेऊन प्रथम यमुनेच्या दक्षिण किनार्‍याने जो मार्ग गेला आहे त्याने जा. पुढे जाऊन दोन रस्ते दिसतील. त्यापैकी जो रस्ता उजवीकडे वळून दक्षिण दिशेला गेला आहे त्याने सेनेला घेऊन जा. महाभाग ! या मार्गाने जाऊन तुम्ही लवकरच राघवांचे दर्शन घेऊ शकाल. ॥ १३ १/२ ॥ "
प्रयाणमिति च श्रुत्वा राजराजस्य योषितः ॥ १४ ॥

हित्वा यानानि यानार्हा ब्राह्मणं पर्यवारयन् ।
’आता इथून प्रस्थान करायचे आहे’ हे ऐकून महाराज दशरथांच्या स्त्रिया, ज्या वाहनांवरच बसण्यास योग्य होत्या, वाहने सोडून ब्रह्मर्षि भरद्वाजांना प्रणाम करण्यासाठी त्यांना चारी बाजूंनी घेरून उभा राहिल्या. ॥ १४ १/२ ॥
वेपमाना कृशा दीना सह देव्या सुमित्रया ॥ १५ ॥

कौसल्या तत्र जग्राह कराभ्यां चरणौ मुनेः ।
उपवासामुळे अत्यंत दुर्बल आणि दीन झालेल्या कौसल्यादेवीने, जी कांपत होती, सुमित्रा देवीसह आपल्या दोन्ही हातांनी भरद्वाज मुनींचे पाय धरले. ॥ १५ १/२ ॥
असमृद्धेन कामेन सर्वलोकस्य गर्हिता ॥ १६ ॥

कैकेयी तस्य जग्राह चरणौ सव्यपत्रपा ।
तं प्रदक्षिणमागम्य भगवन्तं महामुनिम् ॥ १७ ॥
अदूराद् भरतस्यैव तस्थौ दीनमनास्तदा ।
त्यानंतर आपल्या असफल कामनांच्या मुळे जी सर्व लोकांकडून निंदीत झालेली होती त्या कैकयीने लज्जित होऊन तेथे मुनींच्या चरणांना स्पर्ष केला; आणि त्या महामुनि भगवान् भरद्वाजांची परिक्रमा करून ती दीनचित्त होऊन त्या समयी भरताजवळच येऊन उभी राहिली. ॥ १६-१७ १/२ ॥
ततः पप्रच्छ भरतं भरद्वाजो महामुनिः ॥ १८ ॥

विशेषं ज्ञातुमिच्छामि मातॄणां तव राघव ।
तेव्हा महामुनि भरद्वाजांनी तेथे भरतास विचारले, "राघव ! तुमच्या या मातांचा विशेष परिचय काय आहे, हे मी जाणू इच्छितो". ॥ १८ १/२ ॥
एवमुक्तस्तु भरतो भरद्वाजेन धार्मिकः ॥ १९ ॥

उवाच प्राञ्जलिर्भूत्वा वाक्यं वचनकोविदः ।
भरद्वाजांनी या प्रकारे विचारल्यावर बोलण्याच्या कलेत कुशल धर्मात्मा भरतांनी हात जोडून सांगितले - ॥ १९ १/२ ॥
यामिमां भगवन् दीनां शोकानशनकर्शिताम् ॥ २० ॥

पितुर्हि महिषीं देवीं देवतामिव पश्यसि ।
एषा तं पुरुषव्याघ्रं सिंहविक्रान्तगामिनम् ॥ २१ ॥

कौसल्या सुषुवे रामं धातारमदितिर्यथा ।
"भगवन् ! आपण जिला शोक आणि उपवासामूळे अत्यंत दुर्बल आणि दुःखी पहात आहात, जी देवीसारखीच दृष्टिगोचर होत आहे, ती माझ्या पित्याची सर्वात मोठी महाराणी कौसल्या आहे. जसे अदितिने धाता नामक आदित्याला उत्पन्न केले होते त्याचा प्रकारे या कौसल्यादेवीने सिंहासमान पराक्रम, सूचक गतिने चालणार्‍या पुरुषसिंह श्रीरामास जन्म दिला आहे. ॥ २०-२१ १/२ ॥
अस्या वामभुजं श्लिष्टा या सा तिष्ठति दुर्मनाः ॥ २२ ॥

इयं सुमित्रा दुःखार्ता देवी राज्ञश्च मध्यमा ।
कर्णिकारस्य शाखेव शीर्णपुष्पा वनान्तरे ॥ २३ ॥

एतस्यास्तौ सुतौ देव्याः कुमारौ देववर्णिनौ ॥
उभौ लक्ष्मणशत्रुघ्नौ वीरौ सत्यपराक्रमौ ॥ २४ ॥
’हिच्या डाव्याबाजूस जी चिकटून उदास मनाने उभी आहे, तसेच दुःखाने आतुर होत व्यथित होत आहे; आणि आभूषण शून्य झाल्यामुळे वनात फुले झडून गेलेल्या कण्हेरीच्या फांदीप्रमाणे दिसत आहे ती महाराजांची मधली राणी देवी सुमित्रा आहे. सत्यपराक्रमी वीर तसेच देवतातुल्य कांतीमान् दोघे बंधु राजकुमार लक्ष्मण आणि शत्रुघ्न याच सुमित्रा देवीचे पुत्र आहेत. ॥ २२-२४ ॥
यस्याः कृते नरव्याघ्रौ जीवनाशमितो गतौ ।
राजा पुत्रविहीनश्च स्वर्गं दशरथो गतः ॥ २५ ॥

क्रोधनामकृतप्रज्ञां दृप्तां सुभगमानिनीम् ।
ऐश्वर्यकामां कैकेयीमनार्यामार्यरूपिणीम् ॥ २६ ॥

ममैतां मातरं विद्धि नृशंसां पापनिश्चयाम् ।
यतो मूलं हि पश्यामि व्यसनं महदात्मनः ॥ २७ ॥
’आणि जिच्यामुळे पुरुषसिंह राम आणि लक्ष्मण येथून प्राणसंकटाच्या अवस्थेत वनवासात जाऊन पोहोचले आहेत; तसेच महाराज दशरथ पुत्रवियोगाचे कष्ट प्राप्त झाल्यामुळे स्वर्गवासी झाले आहेत; जी स्वभावानेच क्रोध करणारी, अशिक्षित बुद्धीची, गर्विष्ठ, आपणा स्वतःलाच सर्वात अधिक सुंदर आणि भाग्यवान् समजणारी आणि राज्याचा लोभ ठेवणारी आहे; जी दिसण्यात आर्या असूनही वास्तविक अनार्या आहे; या कैकयीला माझी माता समजावे. ही फारच क्रूर आणि पापपूर्ण विचार ठेवणारी आहे. मी आपल्या स्वतःवर जे महान संकट आलेले पहात आहे, याचे मूळ कारण हीच आहे. ॥ २५-२७ ॥
इत्युक्त्वा नरशार्दूलो बाष्पगद्‌गदया गिरा ।
विनिःश्वस्य स ताम्राक्षः क्रुद्धो नाग इव श्वसन् ॥ २८ ॥
अश्रु गद्‌गद वाणीने या प्रकारे सांगून लाल डोळे करून पुरुषसिंह भरत शेषाने फुत्कारणार्‍या सर्पाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊ लागले. ॥ २८ ॥
भरद्वाजो महर्षिस्तं ब्रुवन्तं भरतं तथा ।
प्रत्युवाच महाबुद्धिरिदं वचनमर्थवित् ॥ २९ ॥
त्यासमयी असे बोलणार्‍या भरताला, श्रीरामावताराचे प्रयोजन जाणणारे महाबुद्धिमान् महर्षि भरद्वाजांनी असे म्हटले - ॥ २९ ॥
न दोषेणावगन्तव्या कैकेयी भरत त्वया ।
रामप्रव्राजनं ह्येतत् सुखोदर्कं भविष्यति ॥ ३० ॥
"भरत ! तू कैकयी संबंधी दोषदृष्टी ठेवू नकोस. श्रीरामांचा हा वनवास भविष्यात फारच सुखद होईल. ॥ ३० ॥
देवानां दानवानां च ऋषीणां भावितात्मनाम् ।
हितमेव भविष्यद्धि रामप्रव्राजनादिह ॥ ३१ ॥
"श्रीरामांच्या वनात जाण्यामुळे देवता, दानव तसेच परमात्म्याचे चिंतन करणार्‍या महर्षिंचे या जगात हितच होणार आहे". ॥ ३१ ॥
अभिवाद्य तु संसिद्धः कृत्वा चैनं प्रदक्षिणम् ।
आमन्त्र्य भरतः सैन्यं युज्यतामिति चाब्रवित् ॥ ३२ ॥
श्रीरामांचा पत्ता जाणून आणि मुनींचा आशीर्वाद पावून कृतकृत्य होऊन भरताने मुनींना मस्तक नमवून, त्यांची प्रदक्षिणा करून जाण्याची आज्ञा घेतली आणि सेनेला कूच करण्यासाठी तयार होण्याचा आदेश दिला. ॥ ३२ ॥
ततो वाजिरथान् युक्त्वा दिव्यान् हेमविभूषितान् ।
अध्यारोहत् प्रयाणार्थं बहून् बहुविधो जनः ॥ ३३ ॥
त्या नंतर अनेक प्रकारची वेषभूषा केलेले लोक बर्‍याचश्या दिव्य घोड्यांना आणि रथांना (जे सुवर्णांनी विभूषित होते) जुंपून यात्रेसाठी त्यांच्यावर स्वार झाले. ॥ ३३ ॥
गजकन्या गजाश्चैव हेमकक्ष्याः पताकिनः ।
जीमूता इव घर्मान्ते सघोषाः सम्प्रतस्थिरे ॥ ३४ ॥
बरेचसे हत्ती आणि हत्तीणी, ज्यांना सोनेरी रस्सीने कसून बांधलेले होते आणि ज्यांच्यावर पताका फडकत होत्या; वर्षाकालच्या गरजणार्‍या मेघांप्रमाणे घण्टानाद करीत तेथून प्रस्थान करते झाले. ॥ ३४ ॥
विविधान्यपि यानानि महान्ति च लघूनि च ।
प्रययुः सुमहार्हाणि पादैरपि पदातयः ॥ ३५ ॥
नाना प्रकारच्या लहान मोठ्या बहुमूल्य वाहनांवर स्वार होऊन त्यांचे अधिकारी चालले होते आणि पायदळातील सैनिक पायींच यात्रा करू लागले. ॥ ३५ ॥
अथ यानप्रवेकैस्तु कौसल्याप्रमुखाः स्त्रियः ।
रामदर्शनकाङ्‌क्षिण्यः प्रययुर्मुदितास्तदा ॥ ३६ ॥
तत्पश्चात कौसल्या आदि राण्या उत्तम वाहनात बसून श्रीरामांच्या दर्शनाच्या अभिलाषेने प्रसन्नतापूर्वक निघाल्या. ॥ ३६ ॥
चंद्रार्कतरुणाभासां नियुक्तां शिबिकांशुभाम् ।
आस्थाय प्रययौ श्रीमान् भरतः सपरिच्छदः ॥ ३७ ॥
याप्रकारे श्रीमान् भरत नवोदित चंद्रमा आणि सूर्याप्रमाणे कांतिमान् शिबिकेत बसून आवश्यक सामुग्रीसह प्रस्थान करते झाले. त्या शिबिकेला कहारांनी आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते. ॥ ३७ ॥
सा प्रयाता महासेना गजवाजिसमाकुला ।
दक्षिणां दिशमावृत्य महामेघ इवोत्थितः ॥ ३८ ॥
हत्ती घोडे यांनी भरलेली ती विशाल वाहिनी दक्षिण दिशेस घेरून उसळणार्‍या महामेघांच्या घटेप्रमाणे चालू लागली. ॥ ३८ ॥
वनानि तु व्यतिक्रम्य जुष्टानि मृगपक्षिभिः ।
गङ्‌गायाः परवेलायां गिरिष्वथ नदीष्वपि ॥ ३९ ॥
गंगेच्या दुसर्‍या तटावरील पर्वत आणि नद्यांच्या निकटवर्ती वनांना, जी पशुपक्ष्यांनी सेवित होती, ओलांडून ती सेना पुढे चालू लागली. ॥ ३९ ॥
सा सम्प्रहृष्टद्विजवाजियूथा
    वित्रासयन्ती मृगपक्षिसङ्‌घान् ।
महद्वनं तत् प्रतिगाहमाना
    रराज सेना भरतस्य तत्र ॥ ४० ॥
त्या सेनेतील हत्ती आणि घोड्यांचे समुदाय फार प्रसन्न होते. जंगलातील मृगांना आणि पक्षीसमूहांना भयभीत करीत भरताची ती सेना त्या विशाल वनात प्रवेश करून तेथे फार शोभून दिसू लागली. ॥ ४० ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्विनवतितमः सर्गः ॥ ९२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्या काण्डाचा ब्याण्णवावा सर्ग पूरा झाला ॥ ९२ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP