श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकत्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्य मायामयं छिन्नं मस्तकं संदर्श्य रावणेन सीताया मोहनम् - मायारचित श्रीरामांचे कापलेले मस्तक दाखवून रावणद्वारा सीतेला मोहात पाडण्याचा प्रयत्‍न -
ततस्तमक्षोभ्यबलं लङ्‌कायां नृपतेश्चराः ।
सुवेले राघवं शैले निविष्टं प्रत्यवेदयन् ॥ १ ॥

चाराणां रावणः श्रुत्वा प्राप्तं रामं महाबलम् ।
जातोद्वेगोऽभवत् किञ्चित् सचिवानिदमब्रवीत् ॥ २ ॥
राक्षसराज रावणाच्या गुप्तचरांनी जेव्हा लंकेत परत येऊन राघवांची सेना सुवेल पर्वतावर येऊन उतरली असल्याचे सांगितले आणि तिच्यावर विजय मिळविणे असंभव आहे असे म्हटले तेव्हा त्या गुप्तचरांचे म्हणणे ऐकून आणि महाबली श्रीराम आलेले आहेत हे जाणून रावणाला काहीसा उद्वेग वाटला. त्याने आपल्या मंत्र्यांना याप्रकारे म्हटले- ॥१-२॥
मंत्रिणः शीघ्रमायान्तु सर्वे वै सुसमाहिताः ।
अयं नो मंत्रकालो हि संप्राप्त इति राक्षसाः ॥ ३ ॥
माझ्या सर्व मंत्र्यांनी एकाग्रचित्त होऊन येथे यावे. राक्षसांनो आपल्यासाठी हा गुप्त मंत्रणा करण्याचा समय आलेला आहे. ॥३॥
तस्य तच्छासनं श्रुत्वा मंत्रिणोऽभ्यागमन् द्रुतम् ।
ततः स मंत्रयामास सचिवै राक्षसैः सह ॥ ४ ॥
रावणाचा आदेश ऐकून समस्त मंत्री शीघ्रतापूर्वक तेथे आले. तेव्हा रावणाने त्या राक्षसजातीय सचिवांबरोबर बसून आवश्यक कर्तव्यासंबंधी विचार केला. ॥४॥
मंत्रयित्वा तु दुर्धर्षः क्षमं यत् तदनन्तरम् ।
विसर्जयित्वा सचिवान् प्रविवेश स्वमालयम् ॥ ५ ॥
दुर्धर्ष वीर रावणाने जे उचित कर्तव्य होते त्या विषयी लगेचच विचार-विमर्श करून त्या सचिवांना निरोप दिला आणि आपल्या भवनात प्रवेश केला. ॥५॥
ततो राक्षसमादाय विद्युज्जिह्वं महाबलम् ।
मायाविदं महामायं प्राविशद् यत्र मैथिली ॥ ६ ॥
नंतर त्याने महाबली, महामायावी, मायाविशारद राक्षस विद्युज्जिव्हाला बरोबर घेऊन जेथे मैथिली सीता विद्यमान होती त्या प्रमदावनात प्रवेश केला. ॥६॥
विद्युज्जिह्वं च मायाज्ञं अब्रवीद् राक्षसाधिपः ।
मोहयिष्यावहे सीतां मायया जनकात्मजाम् ॥ ७ ॥
त्या समयी राक्षसराज रावणाने माया जाणणार्‍या विद्युतज्जिव्हास म्हटले - आपण दोघे मायेच्या द्वारे जनकनंदिनी सीतेला मोहित करू. ॥७॥
शिरो मायामयं गृह्य राघवस्य निशाचर ।
त्वं मां समुपतिष्ठस्व महच्च सशरं धनुः ॥ ८ ॥
निशाचरा ! तू राघवाचे मायानिर्मित मस्तक घेऊन एक महान्‌ धनुष्य-बाणासह माझ्या जवळ ये. ॥८॥
एवमुक्तस्तथेत्याह विद्युज्जिह्वो निशाचरः ।
दर्शयामास तां मायां सुप्रयुक्तां स रावणे ॥ ९ ॥
रावणाची ही आज्ञा मिळताच निशाचर विद्युतज्जिव्हाने म्हटले- फार चांगले ! नंतर त्याने रावणाला मोठ्‍या कुशलतेने प्रकट केलेली आपली माया दाखवली. ॥९॥
तस्य तुष्टोऽभवद्राजा प्रददौ च विभूषणम् ।
अशोकवनिकायां तु सीतादर्शनलालसः ॥ १० ॥
यामुळे राजा रावण त्याच्यावर फार प्रसन्न झाला आणि त्याला आपले आभूषण उतरवून बक्षीस म्हणून देऊन टाकले. नंतर तो महाबली राक्षसराज सीतेच्या दर्शनाच्या लालसेने अशोकवाटिके मध्ये गेला. ॥१०॥
नैर्ऋतानामधिपतिः संविवेश महाबलः ।
ततो दीनामदैन्यार्हां ददर्श धनदानुजः ॥ ११ ॥

अधोमुखीं शोकपरां उपविष्टां महीतले ।
भर्तारं समनुध्यायन्तीं अशोकवनिकां गताम् ॥ १२ ॥
कुबेराचा लहान भाऊ रावण याने तेथे जी दीनतेस योग्य नव्हती त्या सीतेला दीन दशेत पडलेली पाहिली. ती अशोक वाटिकेत राहूनही शोकमग्न होती आणि मस्तक खाली नमवून पृथ्वीवर बसून आपल्या पतिदेवाचे चिंतन करत होती. ॥११-१२॥
उपास्यामानां घोराभी राक्षसीभिरअदूरतः ।
उपसृत्य ततः सीतां प्रहर्षं नाम कीर्तयन् ॥ १३ ॥

इदं च वचनं धृष्टं उवाच जनकात्मजाम् ।
तिच्या आसपास बर्‍याचशा भयंकर राक्षसीणी बसलेल्या होत्या. रावणाने अत्यंत हर्षाने आपले नाव सांगून जनककिशोरी सीतेजवळ जाऊन धृष्टतापूर्ण वचनात म्हटले- ॥१३ १/२॥
सांत्व्यमाना मया भद्रे यमाश्रित्य विमन्यसे ॥ १४ ॥

खरहन्ता स ते भर्ता राघवः समरे हतः ।
भद्रे ! मी वारंवार सांत्वना दिली आणि प्रार्थना केली असताही तू ज्यांचा आश्रय घेऊन माझे म्हणणे मान्य केले नाहीस, ते खराचा वध करणारे तुझे पतिदेव राघव समरभूमी मध्ये मारले गेले आहेत. ॥१४ १/२॥
छिन्नं ते सर्वथा मूलं दर्पश्च निहतो मया ॥ १५ ॥

व्यसनेनात्मनः सीते मम भार्या भविष्यसि ।
विसृजैतां मतिं मूढे किं मृतेन करिष्यसि ॥ १६ ॥
तुझे जे मूळ होते ते सर्वथा कापले गेले आहेत. तुझा दर्प मी पूर्ण नाहीसा केला आहे. आता आपल्यावर आलेल्या या संकटामुळे विवश होऊन तू स्वत: माझी भार्या बनून जाशील. मूढ सीते ! आता हे रामाविषयीचे चिंतन सोडून दे. त्या मेलेल्या रामाला घेऊन काय करणार आहेस ? ॥१५-१६॥
भवस्व भद्रे भार्याणां सर्वासामीश्वरी मम ।
अल्पपुण्ये निवृत्तार्थे मूढे पण्डितमानिनि ।
शृणु भर्तृवधं सीते घोरं वृत्रवधं यथा ॥ १७ ॥
भद्रे ! माझ्या सर्व राण्यांची स्वामिनी बनून जा. मूढे ! तू आपल्याला फार बुद्धिमान्‌ समजत होतीस ना ? तुझे पुण्य फार कमी झालेले होते, म्हणून असे झाले आहे. आता राम मारले गेल्याने तुझे जे त्यांची प्राप्तीरूप प्रयोजन होते, ते समाप्त झालेले आहे. सीते ! जर तुझी ऐकण्याची इच्छा असेल तर वृत्रासुर वधाच्या भयंकर घटने समान आपल्या पतिच्या मारले जाण्याचा घोर वृत्तांत ऐक. ॥१७॥
समायातः समुद्रान्तं हन्तुं मां किल राघवः ।
वानरेन्द्रप्रणीतेन बलेन महता वृतः ॥ १८ ॥
असे सांगितले जाते की राघव मला मारण्यासाठी समुद्र किनार्‍यापर्यंत आले होते. त्यांच्या बरोबर वानरराज सुग्रीवांनी आणलेली विशाल सेनाही होती. ॥१८॥
संनिविष्टः समुद्रस्य पीड्य तीरमथोत्तरम् ।
बलेन महता रामो व्रजत्यस्तं दिवाकरे ॥ १९ ॥
त्या विशाल सेनेच्या द्वारा श्रीराम समुद्राच्या उत्तर तटास पीडित करून तेथे थांबले. त्यावेळी सूर्यदेव अस्ताचलास निघून गेले होते. ॥१९॥
अथाध्वनि परिश्रान्तं अर्धरात्रे स्थितं बलम् ।
सुखसंसुप्तमासाद्य चारितं प्रथमं चरैः ॥ २० ॥
जेव्हा अर्धी रात्र झाली, त्यासमयी प्रवासाने थकली-भागलेली सर्व सेना सुखपूर्वक झोपलेली होती. अशा अवस्थेत तेथे पोहोचून माझ्या गुप्तचरांनी प्रथम तर तिचे चांगल्या प्रकारे निरीक्षण केले. ॥२०॥
तत्प्रहस्तप्रणीतेन बलेन महता मम ।
बलमस्य हतं रात्रौ यत्र रामः सलक्ष्मणः ॥ २१ ॥
नंतर प्रहस्ताच्या सेनापतित्वा खाली तेथे गेलेल्या माझ्या फार मोठ्‍या सेनेने रात्री जेथे राम आणि लक्ष्मण होते त्या वानर सेनेला नष्ट करून टाकले. ॥२१॥
पट्टिशान् परिघांश्चक्रान् ऋष्टीन् दण्डान् महायसान् ।
बाणजालानि शूलानि भास्वरान् कूटमुद्‌गरान् ॥ २२ ॥

यष्टिश्च तोमरान् प्रासान् चक्राणि मुसलानि च ।
उद्यम्योद्यम्य रक्षोभिर्वानरेषु निपातिताः ॥ २३ ॥
त्या समयी राक्षसांनी पट्टिश, परिघ, चक्र, ऋष्टि, दंड, मोठमोठी आयुधे, बाणांचे समूह, त्रिशूल, चमकणारे कूट आणि मुद्‌गर, दांडे, तोमर, प्रास तसेच मुसळे उचलून उचलून वानरांवर प्रहार केले होते. ॥२२-२३॥
अथ सुप्तस्य रामस्य प्रहस्तेन प्रमाथिना ।
असक्तं कृतहस्तेन शिरश्छिन्नं महासिना ॥ २४ ॥
तदनंतर शत्रूंना मथून टाकणार्‍या प्रहस्ताने ज्याचे हात खूप सरावलेले आहेत, फार मोठी तलवार हातात घेऊन त्याने कुठल्याही अडथळ्याशिवाय रामाचे मस्तक कापले. ॥२४॥
विभीषणः समुत्पत्य निगृहीतो यदृच्छया ।
दिशः प्रव्राजितः सैन्यैः लक्ष्मणः प्लवगैः सह ॥ २५ ॥
नंतर अकस्मात्‌ उडी मारून त्याने विभीषणाला पकडले आणि वानरसैनिकांसहित लक्ष्मणास विभिन्न दिशांना पळून जाणे भाग पाडले. ॥२५॥
सुग्रीवो ग्रीवया सीते भग्नया प्लवगाधिपः ।
निरस्तहनुकः सीते हनुमान् राक्षसैर्हतः ॥ २६ ॥
सीते ! वानरराज सुग्रीवाची ग्रीवा कापली गेली, हनुमानाची हनु नष्ट करून त्याला राक्षसांनी मारून टाकले. ॥२६॥
जाम्बवानथ जानुभ्यां उत्पतन् निहतो युधि ।
पट्टिशैर्बहुभिश्छिन्नो निकृत्तः पादपो यथा ॥ २७ ॥
जांबवान्‌ वर उसळी मारत होते त्याच समयी युद्धस्थळावर राक्षसांनी बर्‍याचशा पट्टिशांच्या द्वारे त्यांच्या दोन्ही गुड्‍घ्यांवर प्रहार केला. ते छिन्न-भिन्न होऊन तोडलेल्या वृक्षाप्रमाणे धराशायी झाले. ॥२७॥
मैन्दश्च द्विविदश्चोभौ निहतौ वानरर्षभौ ।
निःश्वसन्तौ रुदन्तौ च रुधिरेण परिप्लुतौ ॥ २८ ॥

असिना व्यायतौ छिन्नौ मध्ये ह्यरिनिषूदनौ ।
मैंद आणि द्विविद दोन्ही श्रेष्ठ वानर रक्ताने न्हाऊन रणांत पडलेले आहेत. ते दीर्घ श्वास घेत होते आणि रडत होते. त्याच अवस्थेत त्या दोन्ही विशालकाय शत्रुसूदन वानरांना तलवारीने मध्येच छाटून टाकले गेले आहे. ॥२८ १/२॥
अनुश्वसिति मेदिन्यां पनसः पनसो यथा ॥ २९ ॥

नाराचैर्बहुभिश्छिन्नः शेते दर्यां दरीमुखः ।
कुमुदस्तु महातेजा निष्कूजः सायकैर्हतः ॥ ३० ॥
पुनस नावाचा वानर पिकून फुटलेल्या फणसा प्रमाणे पृथ्वीवर पडल्या पडल्या अंतिम श्वास घेत आहे. दहीमुख अनेक नाराच्यांनी छिन्न-भिन्न होऊन कुठल्या कंदरेत पडून झोपी गेला आहे. महातेजस्वी कुमुद सायकांनी अत्यंत घायाळ होऊन रडत ओरडत किंचाळत मरून गेला. ॥२९-३०॥
अङ्‌गदो बहुभिश्छिन्नः शरैरासाद्य राक्षसैः ।
पतितो रुधिरोद्‌गारी क्षितौ निपतिताङ्‌गदः ॥ ३१ ॥
अंगदधारी अंगदावर आक्रमण करून बर्‍याचशा राक्षसांनी त्यांना बाणांद्वारे छिन्न-भिन्न करून टाकले आहे. तो सर्व अंगांतून रक्तस्त्राव होत असल्याने पृथ्वीवर पडलेला आहे. ॥३१॥
हरयो मथिता नागै रथजालैस्तथाऽपरे ।
शयाना मृदितास्तत्र वायुवेगैरिवाम्बुदाः ॥ ३२ ॥
ज्याप्रमाणे वार्‍याच्या वेगाने ढग छिन्न-भिन्न होऊन जातात त्याप्रमाणे हत्तींनी आणि रथांच्या समुदायांनी तेथे झोपलेल्या वानरांना चिरडून टाकलेले आहे. ॥३२॥
प्रहृताश्च परे त्रस्ता हन्यमाना जघन्यतः ।
अनुद्रुतास्तु रक्षोभिः सिंहैरिव महाद्विपाः ॥ ३३ ॥
जसे सिंहाच्या डरकाळ्यांनी मोठ मोठे हत्ती पळून जातात, त्याप्रकारे राक्षसांनी पाठलाग केल्यावर बरेचसे वानर पाठीवर बाणांचा मारा सहन करीत पळून गेले आहेत. ॥३३॥
सागरे पतिताः केचित् केचिद्‌गगनमाश्रिताः ।
ऋक्षा वृक्षानुपारूढा वानरीं वृत्तिमाश्रिताः ॥ ३४ ॥
काहींनी समुद्रात उड्‍या मारल्या, आणि काही आकाशांत उडाले. बरीचशी अस्वले वानरी वृत्तीचा अवलंब करून झाडांवर चढून गेली आहेत. ॥३४॥
सागरस्य च तीरेषु शैलेषु च वनेषु च ।
पिङ्‌गलास्ते विरूपाक्षै राक्षसैर्बहवो हताः ॥ ३५ ॥
विकराळ नेत्रांच्या राक्षसांनी या बहुसंख्य भूर्‍या वानरांना समुद्रतट, पर्वत आणि वनात दूर पिटाळून लावून मारून टाकले आहे. ॥३५॥
एवं तव हतो भर्ता ससैन्यो मम सेनया ।
क्षतजार्द्रं रजोध्वस्तं इदं चास्याहृतं शिरः ॥ ३६ ॥
या प्रकारे माझ्या सेनेने सैनिकांसहित तुझ्या पतिला मृत्युच्या मुखात ढकलेले आहे. रक्तांनी भिजलेले आणि धुळीने माखलेले त्यांचे हे मस्तक येथे आणले गेले आहे. ॥३६॥
ततः परमदुर्धर्षो रावणो राक्षसेश्वरः ।
सीतायां उपशृण्वन्त्यां राक्षसीमिदमब्रवीत् ॥ ३७ ॥
असे म्हणून अत्यंत दुर्जन राक्षसराज रावणाने सीता ऐकत असताच एका राक्षसीला म्हटले- ॥३७॥
राक्षसं क्रूरकर्माणं विद्युज्जिह्वं समानय ।
येन तद् राघवशिरः संग्रामात् स्वयमाहृतम् ॥ ३८ ॥
तू क्रूरकर्मा राक्षस विद्युज्जिव्हला बोलावून आण, ज्याने स्वत: रणभूमीतून रामाचे छाटलेले शिर येथे आणले आहे. ॥३८॥
विद्युज्जिह्वस्तदा गृह्य शिरस्तत् सशरासनम् ।
प्रणामं शिरसा कृत्वा रावणस्याग्रतः स्थितः ॥ ३९ ॥

तमब्रवीत्ततो राजा रावणो राक्षसं स्थितम् ।
विद्युज्जिह्वं महाजिह्वं समीपपरिवर्त्तिनम् ॥ ४० ॥
तेव्हा विद्युज्जिव्ह धनुष्यासहित ते मस्तक घेऊन आला आणि मस्तक नमवून रावणाला प्रणाम करून त्याच्या समोर उभा राहिला. त्या समयी आपल्या जवळ उभा असलेल्या विशाल जिव्हा असणार्‍या राक्षस विद्युज्जिव्हाला राजा रावण असे म्हणाला- ॥३९-४०॥
अग्रतः कुरु सीतायाः शीघ्रं दाशरथेः शिरः ।
अवस्थां पश्चिमां भर्तुः कृपणा साधु पश्यतु ॥ ४१ ॥
तू दाशरथि रामाचे मस्तक लगेचच सीतेच्या समोर ठेव, ज्यायोगे ती बिचारी आपल्या पतिच्या अंतिम अवस्थेचे चांगल्या तर्‍हेने दर्शन करू शकेल. ॥४१॥
एवमुक्तं तु तद् रक्षः शिरस्तत् प्रियदर्शनम् ।
उपनिक्षिप्य सीतायाः क्षिप्रं अंतरधीयत ॥ ४२ ॥
रावणाने असे सांगितल्यावर तो राक्षस ते सुंदर मस्तक सीतेच्या जवळ ठेवून तात्काळ अदृश्य झाला. ॥४२॥
रावणश्चापि चिक्षेप भास्वरं कार्मुकं महत् ।
त्रिषु लोकेषु विख्यातं रामस्यैतदिति ब्रुवन् ॥ ४३ ॥
रावणाने ते विशाल चमकदार धनुष्य हेच रामाचे त्रिभुवन विख्यात धनुष्य आहे असे म्हणून ते सीतेच्या समोर ठेवून दिले. ॥४३॥
इदं तत् तव रामस्य कार्मुकं ज्यासमायुतम् ।
इह प्रहस्तेनानीतं हत्वा तं निशि मानुषम् ॥ ४४ ॥
नंतर म्हणाला- सीते ! हेच तुझ्या रामाचे प्रत्यञ्चेसहित धनुष्य आहे. रात्रीच्या वेळी त्या मनुष्याला मारून प्रहस्त या धनुष्याला येथे घेऊन आला आहे. ॥४४॥
स विद्युजिह्वेन सहैव तच्छिरो
धनुश्च भूमौ विनीकीर्यमाणः ।
विदेहराजस्य सुतां यशस्विनीं
ततोऽब्रवीत् तां भव मे वशानुगा ॥ ४५ ॥
जेव्हा विद्युज्जिव्हाने मस्तक तेथे ठेवले, तेव्हा त्याच्याच बरोबर रावणाने ते धनुष्यही पृथ्वीवर ठेवले. त्यानंतर तो वैदेही सीतेला म्हणाला- आता तू मला वश हो. ॥४५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकत्रिंशः सर्गः ॥ ३१ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा एकतीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP