श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रयोविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणस्य निवातकवचैः सह मैत्री, रावणेन कालकेयानां वधो, वरुणपुत्राणां पराजयश्च -
रावण द्वारा निवातकवचांशी मैत्री, कालकेयांचा वध तसेच वरुणपुत्रांचा पराजय -
ततो जित्वा दशग्रीवो यमं त्रिदशपुङ्‌गवम् ।
रावणस्तु रणश्लाघी स्वसहायान्ददर्श ह ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना !) देवेश्वर यमाला पराजित करून युद्धाची हौस असलेला दशग्रीव रावण आपल्या सहायकांना भेटला. ॥१॥
ततो रुधिरसिक्ताङ्‌गं प्रहारैर्जर्जरीकृतम् ।
रावणं राक्षसा दृष्ट्‍वा विस्मयं समुपागमन् ॥ २ ॥
त्याचे सारे अंग रक्ताने न्हाऊन निघाले होते आणि प्रहारांनी जर्जर झाले होते. या अवस्थेत रावणाला पाहून त्या राक्षसांना फार विस्मय वाटला. ॥२॥
जयेन वर्धयित्वा च मारीचप्रमुखास्ततः ।
पुष्पकं भेजिरे सर्वे सान्त्विता रावणेन तु ॥ ३ ॥
महाराजांचा जय असो असे म्हणून रावणाच्या अभ्युदयाची कामना करून ते मारीच आदि सर्व राक्षस पुष्पकविमानावर बसले. त्या समयी रावणाने त्या सर्वांचे सान्त्वन केले. ॥३॥
ततो रसातलं गच्छन् प्रविष्टः पयसां निधिम् ।
दैत्योरगगणाध्युष्टं वरुणेन सुरक्षितम् ॥ ४ ॥
त्यानंतर तो राक्षस रसातलामध्ये जाण्याची इच्छा ठेवून दैत्य आणि नागांच्या द्वारा सेवित तसेच वरुण द्वारा सुरक्षित जलनिधि समुद्रात प्रविष्ट झाला. ॥४॥
स तु भोगवतीं गत्वा पुरीं वासुकिपालिताम् ।
कृत्वा नागान् वशे हृष्टो ययौ मणिमयीं पुरीम् ॥ ५ ॥
नागराज वासुकि द्वारा पालित भोगवती पुरीत प्रवेश करून त्याने नागांना आपल्या वश करून घेऊन तेथून हर्षपूर्वक मणिमयपुरीला प्रस्थान केले. ॥५॥
निवातकवचास्तत्र दैत्या लब्धवरा वसन् ।
राक्षसस्तान् समागम्य युद्धाय समुपाह्वयत् ॥ ६ ॥
त्या पुरीत निवात कवच नामक दैत्य राहात होते, ज्यांना ब्रह्मदेवांकडून उत्तम वर प्राप्त झालेले होते. त्या राक्षसाने तेथे जाऊन त्या सर्वांना युद्धासाठी आव्हान दिले. ॥६॥
ते तु सर्वे सुविक्रान्ता दैतेया बलशालिनः ।
नानाप्रहरणास्तत्र प्रहृष्टा युद्धदुर्मदाः ॥ ७ ॥
ते सर्व दैत्य अत्यंत पराक्रमी आणि बलशाली होते. नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे धारण करत होते तसेच युद्धासाठी सदा उत्साहित तसेच उन्मत्त राहात असत. ॥७॥
शूलैस्त्रिशूलैः कुलिशैः पट्टिशासिपरश्वधैः ।
अन्योन्यं बिभिदुः क्रुद्धा राक्षसा दानवास्तथा ॥ ८ ॥
त्यांचे राक्षसांशी युद्ध आरंभ झाले. ते राक्षस आणि दानव कुपित होऊन एक-दुसर्‍यास शूल, त्रिशूल, वज्र, पट्‍टिश, खङ्‌ग आणि परशुनी घायाळ करू लागले. ॥८॥
तेषां तु युध्यमानानां साग्रः संवत्सरो गतः ।
न चान्यतरयोस्तत्र विजयो वा क्षयोऽपि वा ॥ ९ ॥
त्यांना युद्ध करत असता एक वर्षाहून अधिक समय व्यतीत झाला परंतु त्यांच्यापैकी कुठल्याही पक्षाचा विजय अथवा पराजय झाला नाही. ॥९॥
ततः पितामहस्तत्र त्रैलोक्यगतिरव्ययः ।
आजगाम द्रुतं देवो विमानवरमास्थितः ॥ १० ॥
तेव्हां त्रिभुवनाचे आश्रयभूत अविनाशी पितामह भगवान्‌ ब्रह्मदेव एका उत्तम विमानावर बसून शीघ्र तेथे आले. ॥१०॥
निवातकवचानां तु निवार्य रणकर्म तत् ।
वृद्धः पितामहो वाक्यं उवाच विदितार्थवत् ॥ ११ ॥
वृद्ध पितामहांनी निवातकवचांना त्या युद्ध-कर्मापासून रोखले आणि त्यांना स्पष्ट शब्दात असे वाक्य बोलले - ॥११॥
नह्ययं रावणो युद्धे शक्यो जेतुं सुरासुरैः ।
न भवन्तः क्षयं नेतुं अपि सामरदानवैः ॥ १२ ॥
दानवांनो ! समस्त देवता आणि असुर मिळूनही युद्धात या रावणाला परास्त करू शकत नाहीत. याच प्रकारे समस्त देवता आणि दानव यांनी एकदम आक्रमण केले तरीही ते तुम्हां लोकांचा संहार करू शकत नाहीत. ॥१२॥
राक्षसस्य सखित्वं च भवद्‌भिः सह रोचते ।
अविभक्ताश्च सर्वार्थाः सुहृदां नात्र संशयः ॥ १३ ॥
(तुम्हा दोघांमध्ये वरदानजनित शक्ति एक सारखीच आहे) म्हणून मला तर हेच चांगले वाटत आहे की तुम्हा लोकांशी या राक्षसांची मैत्री व्हावी, कारण की सुहृदांचे सर्व अर्थ (भोग्य पदार्थ) एक दुसर्‍यांसाठी समान असतात - पृथक्‌ पृथक्‌ वाटलेले राहात नाहीत. निःसंदेह अशीच गोष्ट आहे. ॥१३॥
ततोऽग्निसाक्षिकं सख्यं कृतवांस्तत्र रावणः ।
निवातकवचैः सार्धं प्रीतिमानभवत् तदा ॥ १४ ॥
तेव्हा तेथे रावणाने अग्निला साक्षी बनवून निवातकवचांशी मैत्री केली. यामुळे त्याला फार प्रसन्नता वाटली. ॥१४॥
अर्थतस्तैर्यथान्यायं संवत्सरमथोषितः ।
स्वपुरान्निर्विशेषं च प्रियं प्राप्तो दशाननः ॥ १५ ॥
नंतर निवात कवच्यांकडून उचित आदर मिळून तो एक वर्षपर्यंत तेथे टिकून राहिला. त्या स्थानावर दशाननाला आपल्या नगराप्रमाणेच प्रिय भोग प्राप्त झाले. ॥१५॥
ततोपधार्य मायानां शतमेकं समाप्तवान् ।
सलिलेन्द्रपुरान्वेषी भ्रमति स्म रसातलम् ॥ १६ ॥
त्याने निवातकवचांपासून शंभर प्रकारच्या मायांचे ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर तो वरुणाच्या नगराचा पत्ता शोधत रसातलात सर्वत्र फिरू लागला. ॥१६॥
ततोऽश्मनगरं नाम कालकेयैरधिष्ठितम् ।
गत्वा तु कालकेयांश्च हत्वा तत्र बलोत्कटान् ॥ १७ ॥

शूर्पणख्याश्च भर्तारं असिना प्राच्छिनत् तदा ।
श्यालं च बलवन्तं च विद्युज्जिह्वं बलोत्कटम् ॥ १८ ॥

जिह्वया संलिहन्तं च राक्षसं समरे तथा ।
हिंडत फिरत तो अश्म नामक नगरात जाऊन पोहोंचला, जेथे कालकेय नामक दानव निवास करत होते. कालकेय फार बलवान्‌ होते. रावणाने तेथे त्या सर्वांचा संहार करून शूर्पणखेचा पति उत्कट बलशाली आपला मेहुणा महाबली विद्युज्जिव्हालाही, जो त्या राक्षसाला समरांगणात जिभेने चाटून टाकू इच्छित होता, तलवारीने कापून टाकले. ॥१७-१८ १/२॥
तं विजित्य मुहूर्तेन जघ्ने दैत्यांश्चतुःशतम् ॥ १९ ॥

ततः पाण्डुरमेघाभं कैलासमिव भास्वरम् ।
वरुणस्यालयं दिव्यं अपश्यद् राक्षसाधिपः ॥ २० ॥
त्याला परास्त करून रावणाने एका मुहूर्तामध्ये चारशें दैत्यांना मृत्युमुखी धाडले. त्यानंतर त्या राक्षसराजाने वरुणाचे दिव्य भवन पाहिले जे श्वेत मेघाप्रमाणे उज्ज्वल आणि कैलास पर्वतासमान प्रकाशमान्‌ होते. ॥१९-२०॥
क्षरन्तीं च पयस्तत्र सुरभिं गामवस्थिताम् ।
यस्याः पयोभिनिष्यन्दात् क्षीरोदो नाम सागरः ॥ २१ ॥
तेथेच सुरभि नावाची गायही उभी होती, जिच्या स्तनांतून दूध गळत होते. असे म्हणतात की सुरभिच्या दुधाच्या धारांनी क्षीरसागर भरलेला आहे. ॥२१॥
ददर्श रावणस्तत्र गोवृषेन्द्रवरारणिम् ।
यस्माच्चन्द्रः प्रभवति शीतरश्मिर्निशाकरः ॥ २२ ॥
रावणाने महादेवांच्या वाहनभूत महावृषभाची जननी सुरभीदेवीचे दर्शन केले, जिच्या पासून शीतल किरण असणार्‍या निशाकर चंद्रम्याचा प्रादुर्भाव झाला आहे. (सुरभिपासून क्षीरसमुद्र आणि क्षीरसमुद्रापासून चंद्रम्याचा अविर्भाव झाला आहे.) ॥२२॥
यं समाश्रित्य जीवन्ति फेनपाः परमर्षयः ।
अमृतं यत्र चोत्पन्नं स्वधा च स्वधभोजिनाम् ॥ २३ ॥
त्याच चंद्रदेवांच्या उत्पत्तिस्थानाचा क्षीरसमुद्राचा आश्रय घेऊन फेन पिणारे महर्षि जीवन धारण करतात, त्या क्षीरसागरांतूनच सुधा आणि स्वधाभोजी पितरांची स्वधा प्रकट झाल्या आहेत. ॥२३॥
यां ब्रुवन्ति नरा लोके सुरभिं नाम नामतः ।
प्रदक्षिणं तु तां कृत्वा रावणः परमाद्‌भुताम् ।
प्रविवेश महाघोरं गुप्तं बहुविधैर्बलैः ॥ २४ ॥
लोकात जिला सुरभि नामाने संबोधले जाते त्या परम अद्‌भुत गोमातेची परिक्रमा करून रावणाने नाना प्रकारच्या सेनांनी सुरक्षित महाभयंकर वरुणालयात प्रवेश केला. ॥२४॥
ततो धाराशताकीर्णं शारदाभ्रनिभं तदा ।
नित्यप्रहृष्टं ददृशे वरुणस्य गृहोत्तमम् ॥ २५ ॥
तेथे प्रवेश करून त्याने वरुणाचे उत्तम भवन पाहिले, जे सदाच आनंदमय उत्सवांनी परिपूर्ण, अनेक जलधारांनी व्याप्त तसेच शरत्काळच्या मेघांसमान उज्ज्वल होते. ॥२५॥
ततो हत्वा बलाध्यक्षान् समरे तैश्च ताडितः ।
अब्रवीच्च ततो योधान् राजा शीघ्रं निवेद्यताम् ॥ २६ ॥
त्यानंतर वरुणाच्या सेनापतिनी समरभूमीमध्ये रावणावर प्रहार केला. नंतर रावणाने ही त्या सर्वांना घायाळ करून तेथील योद्ध्यांना म्हटले - तुम्ही लोक शीघ्र जाऊन राजा वरुणाला ही गोष्ट सांगा - ॥२६॥
युद्धार्थी रावणः प्राप्तः तस्य युद्धं प्रदीयताम् ।
वद वा न भयं तेऽस्ति निर्जितोऽस्मीति साञ्जलिः ॥ २७ ॥
राजन्‌ ! राक्षसराज रावण युद्धासाठी आलेला आहे, आपण येऊन शीघ्र त्याच्या बरोबर युद्ध करा अथवा हात जोडून आपला पराजय स्वीकार करा. मग आपल्याला काही भय राहाणार नाही. ॥२७॥
एतस्मिन्नन्तरे क्रुद्धा वरुणस्य महात्मनः ।
पुत्राः पौत्राश्च निष्क्रामन् गौश्च पुष्कर एव च ॥ २८ ॥
एवढ्‍या अवधित सूचना मिळताच महात्मा वरुणाचे पुत्र आणि पौत्र क्रोधाने भरून बाहेर पडले. त्यांच्या बरोबर गौ आणि पुष्कर नामक सेनाध्यक्षही होते. ॥२८॥
ते तु वीर्यगुणोपेता बलैः परिवृताः स्वकैः ।
युङ्‌क्त्वा रथान्कामगमान् उद्यद्‌भास्वरवर्चसः ॥ २९ ॥
ते सर्वच्या सर्व सर्वगुणसंपन्न आणि उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. इच्छेनुसार चालणार्‍या रथावर आरूढ होऊन आपल्या सेनांनी घेरलेले ते तेथे युद्धस्थळी आले. ॥२९॥
ततो युद्धं समभवद् दारुणं रोमहर्षणम् ।
सलिलेन्द्रस्य पुत्राणां रावणस्य च धीमतः ॥ ३० ॥
नंतर तर वरुणांचे पुत्र आणि बुद्धिमान्‌ रावण यांच्यामध्ये फार भयंकर युद्ध जुंपले, जे अंगावर काटे आणणारे होते. ॥३०॥
अमात्यैश्च महावीर्यैः दशग्रीवस्य रक्षसः ।
वारुणं तद् बलं कृत्स्नं क्षणेन विनिपातितम् ॥ ३१ ॥
राक्षस दशग्रीवाच्या महापराक्रमी मंत्र्यांनी एकाच क्षणात वरुणाच्या सार्‍या सेनेला मारून टाकले. ॥३१॥
समीक्ष्य स्वबलं संख्ये वरुणस्य सुतास्तदा ।
अर्दिताः शरजालेन निवृत्ता रणकर्मणः ॥ ३२ ॥
युद्धात आपल्या सेनेची ही अवस्था पाहून वरुणाचे पुत्र त्या समयी बाणसमूहांनी पीडित झाल्यामुळे काही वेळपर्यंत युद्धकर्मापासून मागे सरले. ॥३२॥
महीतलगतास्ते तु रावणं दृश्य पुष्पके ।
आकाशमाशु विविशुः स्यन्दनैः शीघ्रगामिभिः ॥ ३३ ॥
भूतलावर स्थित होऊन त्यांनी जेव्हा रावणाला पुष्पक विमानावर बसलेला पाहिला, तेव्हा ते शीघ्रगामी रथांच्या द्वारा तात्काळच आकाशात जाऊन पोहोचले. ॥३३॥
महदासीत् ततस्तेषां तुल्यं स्थानमवाप्य तत् ।
आकाशयुद्धं तुमुलं देवदानवयोरिव ॥ ३४ ॥
आता बरोबरीचे स्थान मिळाल्याने रावणबरोबर त्यांचे फारच युद्ध जुंपले. त्यांचे ते आकाश-युद्ध देव-दानव संग्रामाप्रमाणे भयंकर भासत होते. ॥३४॥
ततस्ते रावणं युद्धे शरैः पावकसन्निभैः ।
विमुखीकृत्य संहृष्टा विनेदुर्विविधान् रवान् ॥ ३५ ॥
त्या वरुण पुत्रांनी आपल्या अग्नितुल्य तेजस्वी बाणांच्या द्वारा युद्धस्थळी रावणाला विमुख करून मोठ्‍या हर्षाने नाना प्रकारच्या स्वरांमध्ये महान्‌ सिंहनाद केला. ॥३५॥
ततो महोदरः क्रुद्धो राजानं दृश्य धर्षितम् ।
त्यक्त्वा मृत्युभयं वीरो युद्धकाङ्‌क्षी व्यलोकयत् ॥ ३६ ॥
राजा रावणाला तिरस्कृत झालेला पाहून महोदराला फार क्रोध आला. त्याने मृत्युचे भय सोडून युद्धाच्या इच्छेने वरुणपुत्रांकडे पाहिले. ॥३६॥
तेन ते दारुणा युद्धे कामगाः पवनोपमाः ।
महोदरेण गदया हता वै प्रययुः क्षितिम् ॥ ३७ ॥
वरुणाचे घोडे युद्धात वायूशी बरोबरी करणारे होते आणि स्वामीच्या इच्छेप्रमाणे चालणारे होते. महोदराने त्यांच्यावर गदेने आघात केला. गदेचा मार बसून ते घोडे धराशायी झाले. ॥३७॥
तेषां वरुणसूनूनां हत्वा योधान् हयाश्च तान् ।
मुमोचाशु महानादं विरथान् प्रेक्ष्य तान् स्थितान् ॥ ३८ ॥
वरुण पुत्रांच्या योद्ध्यांना आणि घोड्‍यांना मारून त्यांना रथहीन झालेले पाहून महोदर तात्काळ जोरजोराने गर्जना करू लागला. ॥३८॥
ते तु तेषां रथाः साश्वाः सह सारथिभिर्हतैः ।
महोदरेण निहताः पतिताः पृथिवीतले ॥ ३९ ॥
महोदराच्या गदेच्या आघाताने वरुण पुत्रांचे ते रथ, घोडे, श्रेष्ठ सारथ्यांसहित चुराडा होऊन पृथ्वीवर कोसळले. ॥३९॥
ते तु त्यक्त्वा रथान् पुत्रा वरुणस्य महात्मनः ।
आकाशे विष्ठिताः शूराः स्वप्रभावान्न विव्यथुः ॥ ४० ॥
महात्मा वरुणांचे ते शूरवीर पुत्र त्या रथांना सोडून आपल्याच प्रभावाने आकाशात उभे राहिले. त्यांना जराही व्यथा झाली नाही. ॥४०॥
धनूंषि कृत्वा सज्जानि विनिर्भिद्य महोदरम् ।
रावणं समरे क्रुद्धाः सहिताः समवारयन् ॥ ४१ ॥
त्यांनी धनुष्यावर प्रत्यञ्चा चढविली आणि महोदराला क्षत-विक्षत करून एकदमच कुपित होऊन रावणाला घेरून टाकले. ॥४१॥
सायकैश्चापविभ्रष्टैः वज्रकल्पैः सुदारुणैः ।
दारयन्ति स्म संक्रुद्धा मेघा इव महागिरिम् ॥ ४२ ॥
नंतर ते अत्यंत कुपित होऊन एखाद्या पर्वतावर जलधारांची वृष्टि करणार्‍या मेघांप्रमाणे धनुष्यातून सुटलेल्या वज्रतुल्य भयंकर सायकांच्या द्वारा रावणाला विदीर्ण करू लागले. ॥४२॥
ततः क्रुद्धो दशग्रीवः कालाग्निरिव निर्गतः ।
शरवर्षं महाघोरं तेषां मर्मस्वपातयत् ॥ ४३ ॥
हे पाहून दशग्रीव प्रलकालच्या अग्निप्रमाणे रोषाने प्रज्वलित झाला आणि त्या वरुण-पुत्रांच्या मर्मस्थानांवर महाघोर बाणांची वृष्टि करू लागला. ॥४३॥
मुसलानि विचित्राणि ततो भल्लशतानि च ।
पट्टिशांश्चैव शक्तीश्च शतघ्नीर्महतीरपि ॥ ४४ ॥

पातयामास दुर्धर्षः तेषामुपरि विष्ठितः ।
पुष्पक विमानावर बसलेल्या त्या दुर्धर्ष वीराने त्या सर्वांवर विचित्र मुसळे, शेकडो भल्ल, पट्‍टिश, शक्ति आणि मोठमोठ्‍या शतघ्निंचा प्रहार केला. ॥४४ १/२॥
अपविद्धास्तु ते वीरा विनिष्पेतुः पदातयः ॥ ४५ ॥

ततस्तेनैव सहसा सीदन्ति स्म पदातयः ।
महापङ्‌कमिवासाद्य कुञ्जराः षष्टिहायनाः ॥ ४६ ॥
त्या अस्त्र-शस्त्रांनी घायाळ होऊन ते पाय-उतार झालेले वीर, पुन्हा युद्धासाठी पुढे सरसावले, परंतु पाय-उतार होण्यामुळे रावणाच्या त्या अस्त्रवर्षावानेच एकाएकी संकटात सापडून फार मोठ्‍या चिखलात फसून साठ वर्षाच्या हत्तीप्रमाणे कष्टी होऊ लागले. ॥४५-४६॥
सीदमानान् सुतान् दृष्ट्‍वा विह्वलान् स महाबलः ।
ननाद रावणो हर्षान् महानम्बुधरो यथा ॥ ४७ ॥
वरुणाच्या पुत्रांना दुःखी आणि व्याकुळ पाहून महाबली रावण महान्‌ मेघाप्रमाणे अत्यंत हर्षाने गर्जना करू लागला. ॥४७॥
ततो रक्षो महानादान् मुक्त्वा हन्ति स्म वारुणान् ।
नानाप्रहरणोपेतैः धारापातैरिवाम्बुदः ॥ ४८ ॥
जोरजोराने सिंहनाद करून तो निशाचर पुन्हा नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांच्या द्वारा वरुण पुत्रांना मारू लागला, जणु ढगच आपल्या धारावाहिक वृष्टिने वृक्षांना पीडित करत असावा. ॥४८॥
ततस्ते विमुखाः सर्वे पतिता धरणीतले ।
रणात् स्वपुरुषैः शीघ्रं गृहाण्येव प्रवेशिताः ॥ ४९ ॥
नंतर ते सर्व वरुण पुत्र युद्धापासून विमुख होऊन पृथ्वीवर कोसळले. त्यानंतर त्यांच्या सेवकांनी त्यांना रणभूमिमधून बाजूस नेऊन शीघ्रच आपल्या स्थानी पोहोचते केले. ॥४९॥
तानब्रवीत्ततो रक्षो वरुणाय निवेद्यताम् ।
रावणं त्वब्रवीन्मन्त्री प्रहासो नाम वारुणः ॥ ५० ॥
त्यानंतर त्या राक्षसाने वरुणाच्या सेवकांना म्हटले - आता वरुणाला जाऊन सांगा की त्यांनी स्वतः युद्धासाठी यावे. तेव्हा वरुणाचा मंत्री प्रभास याने रावणाला म्हटले - ॥५०॥
गतः खलु महाराजो ब्रह्मलोकं जलेश्वरः ।
गान्धर्वं वरुणः श्रोतुं यं त्वमाह्वयसे युधि ॥ ५१ ॥
राक्षसराज ! ज्यांना तुम्ही युद्धासाठी बोलावीत आहात ते जलाचे स्वामी महाराज वरुण संगीत ऐकण्यासाठी ब्रह्मलोकात गेलेले आहेत. ॥५१॥
तत् किं तव यथा वीर परिश्रम्य गते नृपे ।
ये तु संनिहिता वीराः कुमारास्ते पराजिताः ॥ ५२ ॥
वीरा ! राजा वरुण निघून गेल्यावर येथे युद्धासाठी व्यर्थ परिश्रम करण्याने तुला काय लाभ होणार आहे ? त्यांचे जे वीर पुत्र येथे उपस्थित होते, ते तर तुमच्याकडून परास्त झालेच आहेत. ॥५२॥
राक्षसेन्द्रस्तु तर् श्रुत्वा नाम विश्राव्य चात्मनः ।
हर्षान्नादं विमुञ्चन् वै निष्क्रान्तो वरुणालयात् ॥ ५३ ॥
मंत्र्याचे हे बोलणे ऐकून राक्षसराज रावण तेथे आपल्या नावाची घोषणा करून मोठ्‍या हर्षाने सिंहनाद करीत वरुणालयांतून बाहेर पडला. ॥५३॥
आगतस्तु पथा येन तेनैव विनिवृत्य सः ।
लङ्‌कामभिमुखो रक्षो नभस्तलगतो ययौ ॥ ५४ ॥
तो ज्या मार्गाने आला होता. त्याच मार्गाने परत येऊन आकाशमार्गाने लंकेकडे निघून गेला. ॥५४॥
(- कांही प्रतिंच्या मध्ये तेविसाव्या सर्गानंतर पाच प्रक्षिप्त सर्ग उपलब्ध होत आहेत, ज्यात रावणाच्या दिग्विजय यात्रेचे विस्तारपूर्वक वर्णन आहे. अनावश्यक विस्ताराच्या भयाने येथे त्यांचा समावेश केला गेला नाही.)
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रयोविंशः सर्गः ॥ २३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा तेविसावा सर्ग पूरा झाला. ॥२३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP