[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । एकोनचत्वारिंशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञो दशरथस्य विलापस्तदाज्ञया सुमन्त्रेण श्रीरामस्य कृते रथस्यानयनं कोषाध्यक्षेण सीतायै बहुमूल्यवस्त्राभूषणानां समर्पणं कौसल्यायाः सीतां प्रति पतिसेवाया उपदेशः, सीतया तस्याङ्‌गीकरणं श्रीरामस्य मातरं प्रति राज्ञि दोषदृष्टिं परित्यक्तुमनुरोधोऽन्या मातॄश्च सम्बोध्य वनं गन्तुमनुज्ञाप्रार्थनं च - राजा दशरथांचा विलाप, त्यांच्या आज्ञेने सुमंत्रांनी रामासाठी रथ जोडून आणणे, कोषाध्यक्षांनी सीतेला बहुमूल्य वस्त्रे आणि आभूषणे देणे, कौसल्येचा सीतेला पतिसेवाचा उपदेश, सीतेच्या द्वारा त्याची स्वीकृती, तथा श्रीरामांनी आपल्या मातेला पित्याप्रति दोषदृष्टि न ठेवण्याचा अनुरोध करून अन्य मातांचा निरोप मागणे -
रामस्य तु वचः श्रुत्वा मुनिवेषधरं च तम् ।
समीक्ष्य सह भार्याभी राजा विगतचेतनः ॥ १ ॥
श्रीरामांचे ते वचन ऐकून आणि त्यांनी मुनिवेष धारण केलेला पाहून स्त्रियांसहित राजा दशरथ शोकाने अचेत (निश्चेष्ट) झाले. ॥१॥
नैनं दुःखेन सन्तप्तः प्रत्यवैक्षत राघवम् ।
न चैनमभिसम्प्रेक्ष्य प्रत्यभाषत दुर्मनाः ॥ २ ॥
दुःखाने संतप्त झाल्याने ते राघवाकडे डोळे भरून पाहूही शकले नाही, आणि पहिल्यावरही मनांतील दुःखामुळे त्यांना काही उत्तरही देऊ शकले नाहीत. ॥२॥
स मुहूर्तमिवासंज्ञो दुःखितश्च महीपतिः ।
विललाप महाबाहू राममेवानुचिन्तयन् ॥ ३ ॥
एक मुहूर्तपर्यंत (दोन घटकापर्यंत) अचेत राहिल्यानंतर जेव्हा ते परत सावध झाले तेव्हा ते महाबाहु नरेश रामांचेच चिंतन करीत दुःखी होऊन विलाप करू लागले- ॥३॥
मन्ये खलु मया पूर्वं विवत्सा बहवः कृताः ।
प्राणिनो हिंसिता वापि तन्मामिदमुपस्थितम् ॥ ४ ॥
'असे कळून येत आहे की मी पूर्वजन्मी अवश्यच बर्‍याच गाईंची त्यांच्या वासरांपासून ताटातूट केली असावी अथवा अनेक प्राण्यांची हिंसा केली असावी की ज्यायोगे आज माझ्यावर हे महान संकट कोसळले आहे. ॥४॥
न त्वेवानागते काले देहाच्च्यवति जीवितम् ।
कैकेय्या क्लिश्यमानस्य मृत्युर्मम न विद्यते ॥ ५ ॥
'समय पूर्ण भरल्याशिवाय कुणाच्याही शरीरांतून प्राण निघून जात नाही, म्हणून तर कैकेयीच्या द्वारा इतके क्लेश होऊनही मला मृत्यु येत नाही आहे. ॥५॥
योऽहं पावकसङ्‌काशं पश्यामि पुरतः स्थितम् ।
विहाय वसने सूक्ष्मे तापसाच्छादमात्मजम् ॥ ६ ॥
'ओह ! आपल्या अग्निसमान तेजस्वी पुत्राला बहुमूल्य वस्त्रे उतरवून तपस्व्यांप्रमाणे वल्कल वस्त्रे धारण केलेला मी प्रत्यक्ष पहात असूनही माझे प्राण अजून निघून जात नाहीत. ॥६॥
एकस्याः खलु कैकेय्याः कृतेऽयं खिद्यते जनः ।
स्वार्थे प्रयतमानायाः संश्रित्य निकृतिं त्विमाम् ॥ ७ ॥
'या वरदानरूपी शठतेचा आश्रय घेऊन आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्‍नास लागलेल्या या एकमात्र कैकेयीमुळे हे सर्व लोक महान कष्टात पडलेले आहेत.' ॥७॥
एवमुक्त्वा तु वचनं बाष्पेण विहतेन्द्रियः ।
रामेति सकृदेवोक्त्वा व्याहर्तुं न शशाक ह ॥ ८ ॥
अशा गोष्टी बोलता बोलता राजांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्यांची इंद्रिये शिथील झाली आणि एक वेळच 'हे राम !' असे म्हणून ते मूर्च्छित झाले. त्यापुढे ते काही बोलू शकले नाहीत. ॥८॥
सञ्ज्ञां तु प्रतिलभ्यैव मुहूर्तात् स महीपतिः ।
नेत्राभ्यामश्रुपूर्णाभ्यां सुमन्त्रमिदमब्रवीत् ॥ ९ ॥
एक मुहूर्तानंतर शुद्धिवर येताच महाराज डोळ्यात अश्रू भरलेले असता सुमंत्राकडे पाहून या प्रमाणे बोलले- ॥९॥
औपवाह्यं रथं युक्त्वा त्वमायाहि हयोत्तमैः ।
प्रापयैनं महाभागमितो जनपदात् परम् ॥ १० ॥
'तुम्ही स्वारीसाठी योग्य अशा एका रथास उत्तम घोडे जुंपून येथे घेऊन या आणि या महाभाग श्रीरामास त्यावर बसवून या जनपदाच्या बाहेर पर्यंत पोहोंचवून या. ॥१०॥
एवं मन्ये गुणवतां गुणानां फलमुच्यते ।
पित्रा मात्रा च यत्साधुर्वीरो निर्वास्यते वनम् ॥ ११ ॥
'आपल्या श्रेष्ठ वीर पुत्रांस स्वयं माता- पिताच जेव्हा घराबाहेर काढून वनात धाडत आहेत तेव्हा असे कळून येते की शास्त्रात गुणवान पुरूषांच्या गुणांचे हेच फळ सांगितले गेले आहे. ॥११॥
राज्ञो वचनमाज्ञाय सुमन्त्रः शीघ्रविक्रमः ।
योजयित्वा ययौ तत्र रथमश्वैरलङ्‌कृतम् ॥ १२ ॥
राजांची आज्ञा शिरोधार्य करून शीघ्रगामी सुमंत्र गेले आणि उत्तम घोड्यांनी सुशोभित रथ जोडून घेऊन आले. ॥१२॥
तं रथं राजपुत्राय सूतः कनकभूषितम् ।
आचचक्षेऽञ्जलिं कृत्वा युक्तं परमवाजिभिः ॥ १३ ॥
नंतर सूत सुमंत्रांनी हात जोडून म्हटले- 'महाराज ! राजकुमार रामांसाठी उत्तम घोडे जुंपलेला सुवर्ण-भूषित रथ तयार आहे.' ॥१३॥
राजा सत्वरमाहूय व्यापृतं वित्तसञ्चये ।
उवाच देशकालज्ञो निश्चितं सर्वतः शुचि ॥ १४ ॥
तेव्हा देश आणि काल जाणणार्‍या, सर्व बाजूनी शुद्ध ( इहलोक आणि परलोकापासून उऋण) राजा दशरथांनी तात्काळच धन-संग्रहाच्या व्यापारात नियुक्त कोषाध्यक्षांना बोलावून ही निश्चित गोष्ट सांगितली - ॥१४॥
वासांसि च वरार्हाणि भूषणानि महान्ति च ।
वर्षाण्येतानि सङ्‌ख्याय वैदेह्याः क्षिप्रमानय ॥ १५ ॥
'तुम्ही वैदेही सीतेने धारण करण्यास योग्य बहुमूल्य वस्त्रे आणि महान आभूषणे, जी चौदा वर्षेपर्यंत पर्याप्त होतील अशी, निवडून शीघ्र घेऊन या.' ॥१५॥
नरेंद्रेणैवमुक्तस्तु गत्वा कोशगृहं ततः ।
प्रायच्छत् सर्वमाहृत्य सीतायै क्षिप्रमेव तत् ॥ १६ ॥
महाराजांनी असे सांगितल्यावर कोषाध्यक्षांनी खजिन्यात जाऊन तेथून सर्व वस्तू आणून शीघ्रच सीतेला समर्पित केल्या. ॥१६॥
सा सुजाता सुजातानि वैदेही प्रस्थिता वनम् ।
भूषयामास गात्राणि तैर्विचित्रैर्विभूषणैः ॥ १७ ॥
उत्तम कुळात उत्पन्न, अथवा अयोनिजा आणि वनवासासाठी प्रस्थित वैदेही सीतेने सुंदर लक्षणांनी युक्त आपल्या सर्व अंगांना त्या विचित्र आभूषणांनी विभूषित केले. ॥१७॥
व्यराजयत वैदेही वेश्म तत् सुविभूषिता ।
उद्यतोंऽशुमतः काले खं प्रभेव विवस्वतः ॥ १८ ॥
त्या आभूषणांनी विभूषित झालेली वैदेही, प्रातःकाली उदय पावलेल्या अंशुमाळी सूर्याची प्रभा आकाशाला जशी प्रकाशित करते त्याप्रमाणे त्या घराला सुशोभित करू लागली. ॥१८॥
तां भुजाभ्यां परिष्वज्य श्वश्रूर्वचनमब्रवीत् ।
अनाचरन्तीं कृपणं मूर्ध्न्युपाघ्राय मैथिलीम् ॥ १९ ॥
त्या समयी कधींही दुःखद वर्तन न करणार्‍या मैथिलीला सासु कौसल्येने आपल्या दोन्ही भुजांनी आवळून घट्ट हृदयाशी धरले आणि तिचे मस्तक अवघ्राण करून म्हटले - ॥१९॥
असत्यः सर्वलोकेऽस्मिन् सततं सत्कृताः प्रियैः ।
भर्तारं नानुमन्यन्ते विनिपातगतं स्त्रियः ॥ २० ॥
'मुली ! ज्या स्त्रिया आपल्या प्रियतम पतिद्वारा सदा सन्मानित होऊनही संकटात सापडल्यावर त्याचा आदर करीत नाहीत त्या या संपूर्ण जगतात 'असती' ( दुष्टा) या नामाने संबोधल्या जातात. ॥२०॥
एष स्वभावो नारीणामनुभूय पुरा सुखम् ।
अल्पामप्यापदं प्राप्य दुष्यन्ति प्रजहत्यपि ॥ २१ ॥
'दुष्ट स्त्रियांचा हा स्वभावच असतो की प्रथम तर त्या पतिच्या द्वारा यथेष्ट सुख भोगतात परंतु जेव्हा तो थोड्याशाही विपत्तित पडतो तेव्हा त्याच्यावर दोषारोपण करतात आणि त्याची साथ देणे सोडून देतात. ॥२१॥
असत्यशीला विकृता दुर्गा अहृदयाः सदा ।
असत्यः पापसङ्‌कल्पाः क्षणमात्रविरागिणः ॥ २२ ॥
ज्या खोटे बोलणार्‍या, विकृत चेष्टा करणार्‍या, दुष्ट पुरूषांशी संसर्ग राखणार्‍या पतिच्या प्रति सदा ह्रदयहीनतेचा परिचय देणार्‍या, कुलटा पापांचेच मनसूबे बांधणार्‍या लहान सहान गोष्टीसाठीही पतिपासून विरक्त होणार्‍या स्त्रिया आहेत त्या सर्वच्या सर्व असती अथवा दुष्ट म्हटल्या गेल्या आहेत. ॥२२॥
न कुलं न कृतं विद्यां न दत्तं नापि सङ्‌ग्रहः ।
स्त्रीणां गृह्णाति हृदयमनित्यहृदया हि ताः ॥ २३ ॥
'उत्तम कुल, केला गेलेला उपकार, विद्या, भूषण आदिचे दान आणि संग्रह ( पतीच्या द्वारे स्नेहपूर्वक आपलेसे केले जाणे) हे सर्व काही दुष्टा ( असती) स्त्रियांच्या हृदयाला वश करू शकत नाही कारण की त्यांचे चित्त अव्यवस्थित असते. ॥२३॥
साध्वीनां तु स्थितानां तु शीले सत्ये श्रुते स्थिते ।
स्त्रीणां पवित्रं परमं पतिरेको विशिष्यते ॥ २४ ॥
'याच्या उलट ज्या सत्य, सदाचार, शास्त्रांची आज्ञा आणि कुलोचित मर्यादांमध्ये स्थित राहातात त्या साध्वी स्त्रियांसाठी एकमात्र पतिच परम पवित्र एवं सर्वश्रेष्ठ दैवत आहे. ॥२४॥
स त्वया नावमन्तव्यः पुत्रः प्रव्राजितो वनम् ।
तव देवसमस्त्वेष निर्धनः सधनोऽपि वा ॥ २५ ॥
'म्हणून तू माझा पुत्र श्रीराम, ज्याला वनवासाची आज्ञा मिळालेली आहे, कधी अनादर करू नको. हा निर्धन असो वा धनी, तुझ्यासाठी तो देवतातुल्यच आहे.' ॥२५॥
विज्ञाय वचनं सीता तस्या धर्मार्थसंहितम् ।
कृत्वाञ्जलिमुवाचेदं श्वश्रूमभिमुखे स्थिताम् ॥ २६ ॥
सासुच्या धर्म आणि अर्थयुक्त वचनांचे तात्पर्य उत्तम प्रकारे जाणून त्यांच्या समोर उभी राहून हात जोडून सीतेने त्यांना याप्रकारे म्हटले- ॥२६॥
करिष्ये सर्वमेवाहमार्या यदनुशास्ति माम् ।
अभिज्ञास्मि यथा भर्तुर्वर्तितव्यं श्रुतं च मे ॥ २७ ॥
'आर्ये ! आपण माझ्यासाठी जो काही उपदेश देत आहात त्याचे मी पूर्णरूपाने पालन करीन. स्वामींशी कशा प्रकारे वर्तन केले पाहिजे हे मला उत्तमप्रकारे विदित आहे कारण की या विषयी मी पूर्वीही बरेच काही ऐकलेले आहे.' ॥२७॥
न मामसज्जनेनार्या समानयितुमर्हति ।
धर्माद् विचलितुं नाहमलं चंद्रादिव प्रभा ॥ २८ ॥
'पूजनीय मातोश्री ! आपण मला असती स्त्रियांप्रमाणे मानता कामा नये. कारण की ज्या प्रमाणे प्रभा चंद्रमा पासून दूर जाऊ शकत नाही त्याप्रमाणेच मी पतिव्रता धर्मापासून विचलित होऊच शकत नाही. ॥२८॥
नातन्त्री वाद्यते वीणा नाचक्रो वुद्यते रथः ।
नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा ॥ २९ ॥
'ज्याप्रमाणे तार असल्याखेरिज वीणा वाजू शकत नाही अथवा चाकाशिवाय रथ चालू शकत नाही त्याप्रमाणे शंभर पुत्रांची माता जरी झाली तरी स्त्री पतिच्या शिवाय सुखी होऊ शकत नाही. ॥२९॥
मितं ददाति हि पिता मितं माता मितं सुतः ।
अमितस्य हि दातारं भर्तारं का न पूजयेत् ॥ ३० ॥
'पिता, भ्राता आणि पुत्र - हे परिमित सुख प्रदान करतात, परंतु पति अपरिमित सुखाचा दाता असतो. त्याच्या सेवेने इहलोक आणि परलोक दोन्हीमध्ये कल्याण होत असते. म्हणून अशी कोण स्त्री की जी आपल्या पतिचा सत्कार करणार नाही ?' ॥३०॥
साहमेवंगता श्रेष्ठा श्रुतधर्मपरावरा ।
आर्ये किमवमन्येयं स्त्रीया भर्त्ता हि दैवतम् ॥ ३१ ॥
'आर्ये ! मी श्रेष्ठ स्त्रियांच्या- माता आदिंच्या मुखाने नारीच्या सामान्य आणि विशेष धर्मांचे प्रवचन ऐकलेले आहे. या प्रकारे पतिव्रत्याचे महत्व जाणूनही मी पतिचा अपमान का बरे करीन ? मी जाणते की पति हेच स्त्रीचे दैवत आहे.' ॥३१॥
सीताया वचनं श्रुत्वा कौसल्या हृदयङ्‌गमम् ।
शुद्धसत्त्वा मुमोचाश्रु सहसा दुःखहर्षजम् ॥ ३२ ॥
सीतेचे हे मनोहर वचन ऐकून शुद्ध अंतःकरणाच्या देवी कौसल्येच्या नेत्रातून एकाएकी दुःख आणि हर्षाने अश्रु वाहू लागले. ॥३२॥
तां प्राञ्जलिरभिप्रेक्ष्य मातृमध्येऽतिसत्कृताम् ।
रामः परमधर्मात्मा मातरं वाक्यमब्रवीत् ॥ ३३ ॥
तेव्हां परम धर्मात्मा रामांनी मातांच्या मध्ये अत्यंत सन्मानित होऊन उभी असलेल्या माता कौसल्येकडे पाहून हात जोडून म्हटले- ॥३३॥
अम्ब मा दुःखिता भूत्वा पश्येस्त्वं पितरं मम ।
क्षयोऽपि वनवासस्य क्षिप्रमेव भविष्यति ॥ ३४ ॥
'माते ! यांच्यामुळे माझ्या पुत्राला वनवास प्राप्त झाला आहे असे समजून तू माझ्या पित्याकडे दुःखित होऊन पाहू नको. वनवासाचा अवधिही शीघ्र च समाप्त होऊन जाईल. ॥३४॥
सुप्तायास्ते गमिष्यन्ति नव वर्षाणि पञ्च च ।
समग्रमिह सम्प्राप्तं मां द्रक्ष्यसि सुहृद्‌वृतम् ॥ ३५ ॥
ही चौदा वर्षे तर तुमची झोपल्या झोपल्या निघून जातील. नंतर एक दिवस तू पहाशील की मी आपल्या सुहृदांनी घेरलेला सीता आणि लक्ष्मणासहित संपूर्ण रूपाने येथे येऊन पोहोंचलो आहे. ' ॥३५॥
एतावदभिनीतार्थमुक्त्वा स जननीं वचः ।
त्रयः शतशतार्धा ददर्शावेक्ष्य मातरः ॥ ३६ ॥

ताश्चापि स तथैवार्ता मातॄर्दशरथात्मजः ।
धर्मयुक्तमिदं वाक्यं निजगाद कृताञ्जलिः ॥ ३७ ॥
मातेला या प्रकारे आपला निश्चित अभिप्राय सांगून दशरथनंदन श्रीरामांनी आपल्या अन्य साडे तीनशें मातांकडे पाहिले. तेव्हा त्यांनी हात जोडून त्या सर्वांनाही धर्मयुक्त गोष्ट सांगितली - ॥३६-३७॥
संवासात् परुषं किञ्चिदज्ञानादपि यत् कृतम् ।
तन्मे समनुजानीत सर्वाश्चामन्त्रयामि वः ॥ ३८ ॥
'मातांनो ! सदा एकत्र रहात असल्या कारणाने मी जर काही कठोर वचन बोललो असेन अथवा नकळत जर माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर त्यासाठी आपण मला क्षमा करावी. मी आपणा सर्व मातांचा आता निरोप मागत आहे.' ॥३८॥
वचनं राघवस्यैतद् धर्मयुक्तं समाहितम् ।
शुश्रुवुस्ताः स्त्रियः सर्वाः शोकोपहतचेतसः ॥ ३९ ॥
राजा दशरथांच्या त्या सर्व स्त्रियांनी राघवांचे हे समाधानकारक धर्मयुक्त वचन ऐकले. ते ऐकताच त्या सर्वांचे चित्त शोकाने अत्यंत व्याकुळ होऊन गेले. ॥३९॥
जज्ञेऽथ तासां सन्नादः क्रौञ्चीनामिव निःस्वनः ।
मानवेन्द्रस्य भार्याणां एवं वदति राघवे ॥ ४० ॥
राघवांनी असे म्हटले तेव्हा त्या समयी महाराज दशरथांच्या राण्या क्रौञ्ची प्रमाणे ( टिटवी प्रमाणे) विलाप करू लागल्या. त्यांचा हा आर्तनाद त्या राजभवनात सर्वत्र निनादत राहिला. ॥४०॥
मुरजपणवमेघघोषवद्
     दशरथवेश्म बभूव यत् पुरा ।
विलपितपरिदेवनाकुलं
     व्यसनगतं तदभूत् सुदुःखितम् ॥ ४१ ॥
राजा दशरथांचे जे भवन प्रथम मुरज, पणव आणि मेघ आदि वाद्यांच्या गंभीर घोषांनी गुंजत रहात असे, तेच विलाप आदि रोदनाने व्याप्त होऊन संकटात पडून अत्यंत दुःखमय प्रतीत होऊ लागले. ॥४१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकोनचत्वारिंशः सर्गः ॥ ३९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकोणचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥३९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP