श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। सप्तदशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ब्रह्मणः प्रेरणया देवादिभिर्विभिन्नवानरयूथपतीनामुत्पादनम् - ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने देवता आदिंच्या द्वारा विभिन्न वानरयूथपतिंची उत्पत्ति -
पुत्रत्वं तु गते विष्णौ राज्ञस्तस्य महात्मनः ।
उवाच देवताः सर्वाः स्वयंभूर्भगवानिदम् ॥ १ ॥
ज्यावेळी भगवान् विष्णु महामनस्वी राजा दशरथांच्या पुत्रभावास प्राप्त झाले तेव्हां भगवान ब्रह्मदेवांनी सर्व देवतांना या प्रकारे सांगितले - ॥ १ ॥
सत्यसन्धस्य वीरस्य सर्वेषां नो हितैषिणः ।
विष्णोः सहायान् बलिनः सृजध्वं कामरूपिणः ॥ २ ॥

मायाविदश्च शूरांश्च वायुवेगसमान् जवे ।
नयज्ञान् बुद्धिसम्पन्नान् विष्णुतुल्यपराक्रमान् ॥ ३ ॥

असंहार्यानुपायज्ञान् दिव्यसंहननान्वितान् ।
सर्वास्त्रगुणसंपन्नानमृतप्राशनानिव ॥ ४ ॥

"देवगणहो ! भगवान विष्णु सत्यप्रतिज्ञ, वीर आणि आपल्या सर्वांचे हितैषी आहेत. तुम्ही सर्व त्यांच्या सहाय्यकरूपाने अशा पुत्रांची उत्पत्ति करा की जे बलवान् , इच्छेनुसार रूप धारण करण्यास समर्थ, माया जाणणारे, शूर व वीर, वायुसमान वेगवान, नीतिज्ञ, बुद्धिमान, विष्णुतुल्य पराक्रमी, कुणाकडूनही परास्त न होणारे, निरनिराळ्या उपायांचे जाणकार, दिव्य शरीरधारी आणि अमृतभोजी देवतांप्रमाणे सर्व प्रकारच्या अस्त्रविद्येच्या गुणांनी संपन्न असतील. ॥ २-४ ॥
अप्सरस्सु च मुख्यासु गन्धर्वीणां तनूषु च ।
यक्षपन्‍नगकन्यासु ऋक्षविद्याधरीषु च ॥ ५ ॥

किन्‍नरीणां च गात्रेषु वानरीणां तनूषु च ।
सृजध्वं हरिरूपेण पुत्रांस्तुल्यपराक्रमान् ॥ ६ ॥

'प्रधान प्रधान अप्सरा, गंधर्वांच्या स्त्रिया, यक्ष आणि नागांच्या कन्या, अस्वलांच्या स्त्रिया, विद्याधरी, किन्नरी आणि वानरिणी यांच्या गर्भातून वानरूपात आपल्या प्रमाणेच पराक्रमी पुत्र उत्पन्न करा. ॥ ५-६ ॥
पूर्वमेव मया सृष्टो जाम्बवानृक्षपुङ्‍गवः ।
जृम्भमाणस्य सहसा मम वक्त्रादजायत ॥ ७ ॥
'मी आधीच ऋक्षराज जाम्बवनाची सृष्टी केलेली आहे. एकवेळ मी जांभई देत होतो तेव्हां एकाएकी तो माझ्या मुखातून प्रकट झाला." ॥ ७ ॥
ते तथोक्ता भगवता तत् प्रतिश्रुत्य शासनम् ।
जनयामासुरेवं ते पुत्रान् वानररूपिणः ॥ ८ ॥
भगवान ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर त्यांची आज्ञा स्वीकारून देवांनी वानररुपात अनेकानेक पुत्र उत्पन्न केले.
ऋषयश्च महात्मानः सिद्धविद्याधरोरगाः ।
चारणाश्च सुतान् वीरान् ससृजुर्वनचारिणः ॥ ९ ॥
महात्मा, ऋषि, सिद्ध, विद्याधर, नाग आणि चारणांनेही वनांत विचरणार्‍या वानर अस्वलांच्या रूपात वीर पुत्रांना जन्म दिला. ॥ ९ ॥
वानरेन्द्रं महेन्द्राभमिन्द्रो वालिनमात्मजम् ।
सुग्रीवं जनयामास तपनस्तपतां वरः ॥ १० ॥
देवराज इंद्राने वानरराज वालीला पुत्ररूपाने उत्पन्न केले, जो महेंद्र पर्वतासमान विशालकाय आणि बलिष्ठ होता. तपणारात श्रेष्ठ भगवान सूर्याने सुग्रीवास जन्म दिला. ॥ १० ॥
बृहस्पतिस्त्वजनयत् तारं नाम महाकपिम् ।
सर्ववानरमुख्यानां बुद्धिमन्तमनुत्तमम् ॥ ११ ॥
बृहस्पतीने तार नामक महाकाय वानरास उत्पन्न केले, जो समस्त वानर सरदारात परम बुद्धिमान आणि श्रेष्ठ होता. ॥ ११ ॥
धनदस्य सुतः श्रीमान् वानरो गन्धमादनः ।
विश्वकर्मा त्वजनयन्नलं नाम महाकपिम् ॥ १२ ॥
तेजस्वी वानर गंधमादन कुबेराचा पुत्र होता. विश्वकर्म्याने नल नामक महान वानरास जन्म दिला. ॥ १२ ॥
पावकस्य सुतः श्रीमान् नीलोऽग्निसदृशप्रभः ।
तेजसा यशसा वीर्यादत्यरिच्यत वीर्यवान् ॥ १३ ॥
अग्निच्या प्रमाणे तेजस्वी श्रीमान् नील साक्षात अग्निदेवाचाच पुत्र होता. तो पराक्रमी वानर तेज, यश, आणि बल-वीर्यात सर्वांहून श्रेष्ठ होता. ॥ १३ ॥
रूपद्रविणसम्पन्नावश्विनौ रूपसम्मतौ ।
मैन्दं च द्विविदं चैव जनयामासतुः स्वयम् ॥ १४ ॥
रूप वैभवाने संपन्न, सुंदर रूप असणार्‍या दोन्ही अश्विनीकुमारांनी स्वतःच मन्द आणि द्विविद यांना जन्म दिला. ॥ १४ ॥
वरुणो जनयामास सुषेणं नाम वानरम् ।
शरभं जनयामास पर्जन्यस्तु महाबलः ॥ १५ ॥
वरुणाने सुषेण नामक वानरास उत्पन्न केले आणि महाबली पर्जन्याने शरभाला जन्म दिला. ॥ १५ ॥
मारुतस्यौरसः श्रीमान् हनुमान् नाम वानरः ।
वज्रसंहननोपेतो वैनतेयसमो जवे ॥ १६ ॥
हनुमान नावाचा ऐश्वर्यशाली वानर वायुदेवाचा औरस पुत्र होता. त्याचे शरीर वज्रासमान सुदृढ होते. तो जलद चालण्यात गरुडासमान होता. ॥ १६ ॥
सर्ववानरमुख्येषु बुद्धीमान् बलवानपि ।
ते सृष्टा बहुसाहस्रा दशग्रीववधोद्यताः ॥ १७ ॥
श्रेष्ठ वानरात हनुमान सर्वांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि बलवान होता. या प्रकारे कित्येक हजार वानरांची उत्पत्ती झाली. ते सर्व रावणाचा वध करण्यासाठी उद्यत राहात होते. ॥ १७ ॥
अप्रमेयबला वीरा विक्रान्ताः कामरूपिणः ।
ते गजाचलसङ्‍काशा वपुष्मन्तो महाबलाः ॥ १८ ॥
त्यांच्या बळाला काही सीमा नव्हती. ते वीर, पराक्रमी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे होते. गजराज आणि पर्वतासारखे महाकाय आणि महाबली होते. ॥ १८ ॥
ऋक्षवानरगोपुच्छाः क्षिप्रमेवाभिजज्ञिरे ।
यस्य देवस्य यद्‍रूपं वेषो यश्च पराक्रमः ॥ १९ ॥

अजायत समं तेन तस्य तस्य पृथक् पृथक् ।
गोलाङ्‍गूलेषु चोत्पन्‍नाः किंचिदुन्‍नतविक्रमाः ॥ २० ॥
अस्वले, वानर आणि गोलाङ्‍गूल जातीचे वीर शीघ्रच उत्पन्न झाले. ज्या देवतेचे जसे स्वरूप, वेष आणि पराक्रम होता त्यांच्यापासून त्यांच्या सारखेच पृथक् पृथक् पुत्र उत्पन झाले. लंगूरात ज्या देवता उत्पन्न झाल्या त्या देवावस्थेपेक्षा काही अंशी अधिकच पराक्रमी होत्या. ॥ १९-२० ॥
ऋक्षीषु च तथा जाता वानराः किन्नरीषु च ।
देवा महर्षिगन्धर्वास्तार्क्ष्ययक्षा यशस्विनः ॥ २१ ॥

नागाः किंपुरुषाश्चैव सिद्धविद्याधरोरगाः ।
बहवो जनयामासुर्हृष्टास्तत्र सहस्रशः ॥ २२ ॥
काही वानर अस्वल जातिच्या मातांपासून तथा काही किन्नरींपासून उत्पन्न झाले. देवता, महर्षि, गंधर्व, गरूड, यशस्वी यक्ष, नाग, किम्पुरुष, सिद्ध, विद्याधर तथा सर्प जातिच्या बहुसंख्याक व्यक्तिंनी अत्यंत हर्षभरित होऊन हजारो पुत्र उत्पन्न केले. ॥ २१-२२ ॥
चारणाश्च सुतान् वीरान् ससृजुर्वनचारिणः ।
वानरान् सुमहाकायान् सर्वान् वै वनचारिणः ॥ २३ ॥
देवतांचे गुण गाणार्‍या वनवासी चारणांनीही बरेचसे विशालकाय वीर वानरपुत्र उत्पन्न केले. ते सर्व जंगली फळे-मुळे खाणारे होते. ॥ २३ ॥
अप्सरस्सु च मुख्यासु तथा विद्याधरीषु च ।
नागकन्यासु च तदा गन्धर्वीणां तनूषु च ।
कामरूपबलोपेता यथाकामविचारिणः ॥ २४ ॥
मुख्य मुख्य अप्सरा, विद्याधरी, नागकन्या आणि गंधर्व पत्‍नींच्या गर्भापासून इच्छेनुसार रूप धारण करणारे, बलाने युक्त आणि स्वेच्छेनुसार सर्वत्र विचरण्यास समर्थ असणारे वानरपुत्र उत्पन्न केले. ॥ २४ ॥
सिंहशार्दूलसदृशा दर्पेण च बलेन च ।
शिलाप्रहरणाः सर्वे सर्वे पर्वतयोधिनः ॥ २५ ॥
ते दर्प आणि बलात, सिंह आणि व्याघ्र्यांच्या समान होते. दगडाच्या शिलांनी प्रहार करीत असत आणि पर्वत उचलून युद्ध करीत असत. ॥ २५ ॥
नखदंष्ट्रायुधाः सर्वे सर्वे सर्वास्त्रकोविदाः ।
विचालयेयुः शैलेन्द्रान् भेदयेयुः स्थिरान् द्रुमान् ॥ २६ ॥
ते सर्व नखे आणि दातांनी शस्त्राचे काम करीत असत. त्या सर्वांना सर्व प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांचे ज्ञान होते. ते पर्वतांनाही हलवू शकत होते; आणि स्थिर भावाने उभ्या असलेल्या वृक्षांनाही तोडून टाकण्याची शक्ति बाळगून होते. ॥ २६ ॥
क्षोभयेयुश्च वेगेन समुद्रं सरितां पतिम् ।
दारयेयुः क्षितिं पद्‍भ्यामाप्लवेयुर्महार्णवान् ॥ २७ ॥
आपल्या वेगाने ते सरितांचा स्वामी जो समुद्र त्यालाही क्षुब्ध करू शकत होते. आपल्या पायांनी पृथ्वीला विदीर्ण करण्याची शक्ति त्यांच्यापाशी होती. ते महासागरासही ओलांडु शकत होते. ॥ २७ ॥
नभस्तलं विशेयुश्च गृह्णीयुरपि तोयदान् ।
गृह्णीयुरपि मातङ्‍गान् मत्तान् प्रव्रजतो वने ॥ २८ ॥
त्यांना वाटल्यास ते आकाशात घुसून ढगांना हाताने पकडू शकत होते; तथा वनांतून वेगाने चालणार्‍या मदोन्मत्त गजराजांही बंदी बनवू शकत होते. ॥ २८ ॥
नर्दमानांश्च नादेन पातयेयुर्विहङ्‍गमान् ।
ईदृशानां प्रसूतानि हरीणां कामरूपिणाम् ॥ २९ ॥

शतं शतसहस्राणि यूथपानां महात्मनाम् ।
ते प्रधानेषु यूथेषु हरीणां हरियूथपाः ॥ ३० ॥
घोर शब्द करून आकाशात उडणार्‍या पक्ष्यांनाही ते आपल्या सिंहनादाने खाली पाडू शकत होते. असे बलशाली आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे महाकाय वानर यूथपति कोटींच्या संख्येमध्ये उत्पन्न झाले. ते वानरांच्या प्रधान यूथांचे युथपति होते. ॥ २९-३० ॥
बभूवुर्यूथपश्रेष्ठान् वीरांश्चाजनयन् हरीन् ।
अन्ये ऋक्षवतः प्रस्थानुपतस्थुः सहस्रशः ॥ ३१ ॥
त्या यूथपतिंनी अशा वीर वानरांना उत्पन्न केले होते की जे अति श्रेष्ठ होते तसेच इतर प्रकारचेही वनर होते. या प्राकृत वानरांहून ते विलक्षण होते. त्यांच्यापैकी हजारो वानर यूथपति ऋक्षवान् पर्वताच्या शिखरावर निवास करू लागले. ॥ ३१ ॥
अन्ये नानाविधाञ्छैलान् काननानि च भेजिरे ।
सूर्यपुत्रं च सुग्रीवं शक्रपुत्रं च वालिनम् ॥ ३२ ॥

भ्रातरावुपतस्थुस्ते सर्वे च एव हरीयूथपाः ।
नलं नीलं हनूमन्तमन्यांश्च हरियूथपान् ॥ ३३ ॥

ते तार्क्ष्यबलसम्पन्‍नाः सर्वे युद्धविशारदाः ।
विचरन्तोऽर्दयन् सर्वान् सिंहव्याघ्रमहोरगान् ॥ ३४ ॥
दुसर्‍यांनी नाना प्रकारच्या पर्वतांचा आणि जंगलांचा आश्रय घेतला. इंद्रकुमार वालि आणि सूर्यनंदन सुग्रीव हे दोघे भाऊ होते. सर्व वानर यूथपति या दोन्ही भावांच्या सेवेत उपस्थित राहात असत. याच प्रकारे नल, नील, हनुमान तथा अन्य वानर सरदारांचाही ते आश्रय घेऊन होते. ते सर्व गुरुडासमान बलशाली आणि युद्धकलेच्या कलेत निपुण होते. ते वनात विचरत असताना सिंह, व्याघ्र आणि मोठमोठे नाग आदि समस्त वनजंतूंना चिरडून टाकीत होते. ॥ ३२-३४ ॥
महाबलो महाबाहुर्वाली विपुलविक्रमः ।
जुगोप भुजवीर्येण ऋक्षगोपुच्छवानरान् ॥ ३५ ॥
महाबाहु वालि महान बलाने संपन्न आणि विशेष पराक्रमी होते. त्यांनी आपल्या बाहुबलांनी अस्वले, लंगूर आणि तसेच अन्य वानरांचे रक्षण केले होते. ॥ ३५ ॥
तैरियं पृथिवी शूरैः सपर्वतवनार्णवा ।
कीर्णा विविधसंस्थानैर्नानाव्यञ्जनलक्षणैः ॥ ३६ ॥
त्या सर्वांचे शरीर आणि सामर्थ्यसूचक लक्षणे नाना प्रकारची होती. ते शूरवीर वानर पर्वते, वने आणि समुद्रासहित समस्त भूमंडलावर पसरले होते. ॥ ३६ ॥
तैर्मेघवृन्दाचलकूटसंनिभै
     र्महाबलैर्वानरयूथपाधिपैः ।
बभूव भूर्भीमशरीररूपैः
     समावृता रामसहायहेतोः ॥ ३७ ॥
ते वानर यूथपति मेघसमूह तथा पर्वत शिखरासारखे विशालकाय होते. त्यांचे बल महान होते. त्यांचे शरीर आणि रूप भयंकर होते. भगवान श्रीरामास सहायता करण्यासाठी प्रकट झालेल्या त्या वानर वीरांनी ही सारी पृथ्वी भरून गेली होती. ॥ ३७ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे सप्तदशः सर्गः ॥ १७ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सतरावा सर्ग समाप्त झाला. ॥ १७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP