श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। त्रयोदशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरद्वाजेन सह मिलित्वा भरतस्यायोध्यां प्रति निवर्तनम् -
भरतांचे भरद्वाजांना भेटून अयोध्येस परत येणे -
ततः शिरसि कृत्वा तु पादुके भरतस्तदा ।
आरुरोह रथं हृष्टः शत्रुघ्नसहितस्तदा ॥ १ ॥
त्यानंतर श्रीरामचंद्रांच्या दोन्ही चरणपादुकांना आपल्या मस्तकावर धरून भरत शत्रुघ्नासह प्रसन्नतापूर्वक रथात बसले. ॥ १ ॥
वसिष्ठो वामदेवश्च जाबालिश्च दृढव्रतः ।
अग्रतः प्रययुः सर्वे मन्त्रिणो मन्त्रपूजिताः ॥ २ ॥
वसिष्ठ, वामदेव तसेच दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणारे जाबालि आदि सर्व मंत्री, जे उत्तम मंत्रणा देण्यामुळे सन्मानित होते, ते पुढेपुढे चालू लागले. ॥ २ ॥
मन्दाकिनीं नदीं रम्यां प्राङ्‌मुखास्ते ययुस्तदा ।
प्रदक्षिणं च कुर्वाणाः चित्रकूटं महागिरिम् ॥ ३ ॥
ते सर्व लोक चित्रकूट नामक महान् पर्वताची परिक्रमा करून परम रमणीय मंदाकिनी नदीला पार करून पूर्व दिशेकडे प्रस्थित झाले. ॥ ३ ॥
पश्यन् धातुसहस्राणि रम्याणि विविधानि च ।
प्रययौ तस्य पार्श्वेन ससैन्यो भरतस्तदा ॥ ४ ॥
त्या समयी भरत आपल्या सेनेसह हजारो प्रकारच्या रमणीय धातूंना पाहात चित्रकूटाच्या किनार्‍यावरून पुढे निघाले. ॥ ४ ॥
अदूराच्चित्रकूटस्य ददर्श भरतस्तदा ।
आश्रमं यत्र स मुनिर्भरद्वाजः कृतालयः ॥ ५ ॥
चित्रकूटपासून थोड्याच अंतरावर गेल्यावर भरताने जेथे मुनिवर भरद्वाज निवास करीत होते तो आश्रम** पाहिला. ॥ ५ ॥
[** हा आश्रम यमुनेच्या दक्षिण दिशेस चित्रकूटाच्या थोडा जवळ होता. गंगा आणि यमुनेच्या मधील प्रयाग येथील आश्रम जेथे वनांत येतेवेळी श्रीरामचंद्र आणि भरत आदिंनी निवास केला होता, त्याहून हा आश्रम भिन्न असावा असे वाटते. म्हणूनच या आश्रमावर भरद्वाजांना भेटल्यानंतर भरत आदिंनी यमुना पार केल्याचा उल्लेख दिसतो आहे. ’ततस्ते यमुनां दिव्या नदीं तीर्तोस्मि मालिनीम् । ’ या द्वितीय आश्रमांतून श्रीराम आणि भरत यांच्या समागमाचा समाचार शीघ्र प्राप्त होऊ शकत होता. म्हणून भरद्वाज भरत येईपर्यंत तेथेच उपस्थित होते.]
स तमाश्रममागम्य भरद्वाजस्य वीर्यवान् ।
अवतीर्य रथात् पादौ ववन्दे कुलनन्दनः ॥ ६ ॥
आपल्या कुलाला आनंदित करणारे पराक्रमी भरत महर्षि भरद्वाजांच्या त्या आश्रमावर पोहोचून रथातुन खाली उतरले आणि त्यांनी मुनिंच्या चरणी प्रणाम केला. ॥ ६ ॥
ततो हृष्टो भरद्वाजो भरतं वाक्यमब्रवीत् ।
अपि कृत्यं कृतं तात रामेण च समागतम् ॥ ७ ॥
त्यांच्या येण्यामुळे महर्षि भरद्वाज फार प्रसन्न झाले आणि त्यांनी भरतास विचारले’- "तात ! काय तुमचे कार्य संपन्न झाले का ? काय श्रीरामांची भेट झाली का ?"॥ ७ ॥
एवमुक्तः स तु ततो भरद्वाजेन धीमता ।
प्रत्युवाच भरद्वाजं भरतो धर्मवत्सलः ॥ ८ ॥
बुद्धिमान भरद्वाजांनी याप्रकारे विचारल्यावर धर्मवत्सल भरतांनी त्यांना सांगितले - ॥ ८ ॥
स याच्यमानो गुरुणा मया च दृढविक्रमः ।
राघवः परमप्रीतो वसिष्ठं वाक्यमब्रवीत् ॥ ९ ॥
’मुने ! भगवान श्रीराम आपल्या पराक्रमावर दृढ राहाणारे आहेत. मी त्यांची खूप प्रार्थना केली. गुरूंनीही अनुरोध केला. तेव्हां त्यांनी अत्यंत प्रसन्न होऊन गुरुदेव वसिष्ठांना याप्रकारे सांगितले - ॥ ९ ॥
पितुः प्रतिज्ञां तामेव पालयिष्यामि तत्त्वतः ।
चतुर्दश हि वर्षाणि या प्रतिज्ञा पितुर्मम ॥ १० ॥
’मी चौदा वर्षे वनांत राहावे यासाठी माझ्या पित्याने जी प्रतिज्ञा केली होती, त्यांच्या त्या प्रतिज्ञेचेच मी यथार्थरूपाने पालन करीन. ॥ १० ॥
एवमुक्तो महाप्राज्ञो वसिष्ठः प्रत्युवाच ह ।
वाक्यज्ञो वाक्यकुशलं राघवं वचनं महत् ॥ ११ ॥
’त्यांनी असे म्हटल्यावर वचनांतील मर्म जाणणारे महाज्ञानी वसिष्ठ वाक्यकुशल राघवांना (रामांना) याप्रकारे महत्त्वपूर्ण वचन सांगते झाले. ॥ ११ ॥
एते प्रयच्छ संहृष्टः पादुके हेमभूषिते ।
अयोध्यायां महाप्राज्ञ योगक्षेमकरो भव ॥ १२ ॥
’महाप्राज्ञा ! तुम्ही प्रसन्नतापूर्वक या स्वर्णभूषित पादुका आपल्या प्रतिनिधीच्या रूपात भरतांना द्या आणि त्यांच्या द्वारे अयोध्येच्या योगक्षेमाचा निर्वाह करा.’ ॥ १२ ॥
एवमुक्तो वसिष्ठेन राघवः प्राङ्‌मुखः स्थितः ।
पादुके हेमविकृते मम राज्याय ते ददौ ॥ १३ ॥
गुरु वसिष्ठांनी असे सांगितल्यावर पूर्वाभिमुख उभे असलेल्या राघवांनी अयोध्येच्या राज्याचे संचालन करण्यासाठी या दोन्ही स्वर्णभूषित पादुका मला दिल्या आहेत. ॥ १३ ॥
निवृत्तोऽहमनुज्ञातो रामेण सुमहात्मना ।
अयोध्यामेव गच्छामि गृहीत्वा पादुके शुभे ॥ १४ ॥
त्यानंतर मी महात्मा श्रीरामांची आज्ञा मिळतांच परत आलो आहे आणि त्यांच्या या मंगलमयी चरणपादुकांना घेऊन अयोध्येस जात आहे. ॥ १४ ॥
एतच्छ्रुत्वा शुभं वाक्यं भरतस्य महात्मनः ।
भरद्वाजः शुभतरं मुनिर्वाक्यमुदाहरत् ॥ १५ ॥
महात्मा भरतांचे हे शुभ वचन ऐकून भरद्वाज मुनींनीही परम मंगलमय गोष्ट सांगितली - ॥ १५ ॥
नैतच्चित्रं नरव्याघ्रे शीलवृत्तविदां वरे ।
यदार्यं त्वयि तिष्ठेत्तु निम्नोत्सृष्टमिवोदकम् ॥ १६ ॥
भरत तुम्ही मनुष्यांमध्ये सिंहासमान वीर तसेच शील आणि सदाचाराच्या ज्ञात्यांमध्ये श्रेष्ठ आहात. ज्याप्रमाणे जल सखल भूमि असलेल्या जलाशयाकडे सर्व बाजूनी वाहात जाते त्या प्रकारे तुमच्यात सारे श्रेष्ठ गुण स्थित व्हावे ही काही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नव्हे. ॥ १६ ॥
अनृणः स महाबाहुः पिता दशरथस्तव ।
यस्य त्वमीदृशः पुत्रो धर्मात्मा धर्मवत्सलः ॥ १७ ॥
ज्यांचा तुमच्यासारखा धर्मप्रेमी आणि धर्मात्मा पुत्र आहे, असे तुमचे पिता महाबाहु राजा दशरथ आता सर्व प्रकारांनी उऋण झाले आहेत. ॥ १७ ॥
तमृषिं तु महाप्राज्ञमुक्तवाक्यं कृताञ्जलिः ।
आमन्त्रयितुमारेभे चरणावुपगृह्य च ॥ १८ ॥
त्या महाज्ञानी महर्षिंनी असे सांगितल्यावर भरतांनी हात जोडून त्यांच्या चरणांना स्पर्श केला, आणि नंतर ते त्यांच्याकडून तेथून जाण्याची आज्ञा घेण्यास उद्यत झाले. ॥ १८ ॥
ततः प्रदक्षिणं कृत्वा भरद्वाजं पुनः पुनः ।
भरतस्तु ययौ श्रीमानयोध्यां सह मन्त्रिभिः ॥ १९ ॥
त्यानंतर श्रीमान् भरतांनी वारंवार मुनिंची परिक्रमा केली आणि ते मंत्र्यांसहित अयोध्येकडे निघाले. ॥ १९ ॥
यानैश्च शकटैश्चैव हयैर्नागैश्च सा चमूः ।
पुनर्निवृत्ता विस्तीर्णा भरतस्यानुयायिनी ॥ २० ॥
नंतर ती विस्तृत सेना रथ छकडे, घोडे आणि हत्ती यांच्यासह भरतांचे अनुगमन करीत अयोध्येस परत निघाली. ॥ २० ॥
ततस्ते यमुनां दिव्यां नदीं तीर्त्वोर्मिमालिनीम् ।
ददृशुस्तां पुनः सर्वे गङ्गां शिवजलां नदीम् ॥ २१ ॥
त्यानंतर पुढे जाऊन त्या सर्वांनी तरंगमालांनी सुशोभित दिव्य नदी यमुनेला पार करून पुनः शुभसलिला गंगेचे दर्शन केले. ॥ २१ ॥
तां रम्यजलसम्पूर्णां संतीर्य सहबान्धवः ।
शृङ्गवेरपुरं रम्यं प्रविवेश ससैनिकः ॥ २२ ॥
नंतर बंधु-बांधव आणि सैनिकांसह मनोरम जलाने भरलेली गंगाही पार करून ते परम रमणीय श्रृंगवेरपुरास जाऊन पोहोंचले. ॥ २२ ॥
शृङ्गवेरपुराद् भूय अयोध्यां संददर्श ह ।
अयोध्यां तु तदा दृष्ट्वा पित्रा भ्रात्रा विवर्जिताम् ॥ २३ ॥

भरतो दुःखसंतप्तः सारथिं चेदमब्रवीत् ।
श्रृंगवेरपुराहून प्रस्थान केल्यावर त्यांना पुन्हा अयोध्यापुरीचे दर्शन झाले, जी त्या समयी पिता आणि भाऊ यांच्या विरहित होती. तिला पाहून भरतांनी दुःखाने संतप्त होऊन सारथ्यास याप्रकारे म्हटले - ॥ २३ १/२ ॥
सारथे पश्य विध्वस्ता अयोध्या न प्रकाशते ॥ २४ ॥

निराकारा निरानन्दा दीना प्रतिहतस्वना ॥ २५ ॥
सारथि सुमंत्र ! पहा अयोध्येची सारी शोभा नष्ट होऊन गेली आहे. म्हणून ती आता पूर्वीप्रमाणे प्रकाशित होत नाही आहे. तिचे ते सुंदर रूप, तो आनंद निघून गेला आहे. यावेळी ती अत्यंत दीन व नीरव भासत आहे. ॥ २४-२५ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रयोदशाधिकशततमः सर्गः ॥ ११३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे तेरावा सर्ग पूरा झाला ॥ ११३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP