[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ सप्ततितमः सर्गः
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मिथो विचार्य श्रीरामलक्ष्मणाभ्यां कबन्धभुजयोश्छेदनं कबन्धेन तयोः सत्कारश्च -
श्रीराम आणि लक्ष्मणांचे परस्परात विचार करून कबंधाच्या दोन्ही भुजा कापून टाकणे तसेच कबंध द्वारा त्यांचे स्वागत -
तौ तु तत्र स्थितौ दृष्ट्‍वा भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
बाहुपाशपरिक्षिप्तौ कबन्धो वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
आपल्या बाहुपाशात घेरले जाऊन तेथे उभ्या असलेल्या त्या दोन्ही भावांना श्रीराम आणि लक्ष्मणास पाहून कबंध म्हणाला- ॥१॥
तिष्ठतः किन्नु मां दृष्ट्‍वा क्षुधार्तं क्षत्रियर्षभौ ।
आहारार्थं तु सन्दिष्टौ दैवेन हतचेतनौ ॥ २ ॥
क्षत्रिय श्रेष्ठ राजकुमारांनो ! मी भुकेने पीडित आहे हे पाहूनही तुम्ही उभे काय राहिला आहात ? (माझ्या मुखात प्रवेश करा.) कारण की दैवाने माझ्या भोजना साठीच तुम्हाला येथे धाडले आहे, म्हणून तुमची दोघांची बुद्धि मारली गेली आहे. ॥२॥
तच्छ्रुत्वा लक्ष्मणो वाक्यं प्राप्तकालं हितं तदा ।
उवाचार्ति समापन्नो विक्रमे कृतनिश्चयः ॥ ३ ॥
हे एकून पीडित झालेल्या लक्ष्मणाने त्या समयी पराक्रमाचा निश्चय करून असे समयोचित आणि हितकर भाषण केले- ॥३॥
त्वां च मां च पुरा तूर्णमादत्ते राक्षसाधमः ।
तस्मादसिभ्यामस्याशु बाहू छिन्दावहै गुरू ॥ ४ ॥
बंधु ! हा नीच राक्षस मला आणि आपल्याला ताबडतोब तोंडात घालील, या पूर्वीच आपण आपल्या तलवारीनी याच्या मोठमोठ्‍या भुजा ताबडतोब कापून टाकू.॥४॥
भीषणोऽयं महाकायो राक्षसो भुजविक्रमः ।
लोकं ह्यतिजितं कृत्वा ह्यावां हन्तुमिहेच्छति ॥ ५ ॥
हा महाकाय राक्षस फार भीषण आहे. याच्या भुजांमध्येच याचे सारे बळ आणि पराक्रम विहित आहे. हा समस्त संसारात सर्वथा पराजित करीत असल्यासारखा आता आपल्यालाही येथे ठार मारू इच्छित आहे. ॥५॥
निश्चेष्टानां वधो राजन् कुत्सितो जगतीपतेः ।
क्रतुमध्योपनीतानां पशूनामिव राघव ॥ ६ ॥
राजन्‌ ! राघव ! यज्ञात आणल्या गेलेल्या पशुंप्रमाणेच निश्चेष्ट प्राण्यांचा वध राजासाठी निंद्य सांगितला गेला आहे. (म्हणून आपण याचे प्राण घेता कामा नयेत, केवळ भुजांचाच उच्छेद केला पाहिजे.) ॥६॥
एतत् संजल्पितं श्रुत्वा तयोः क्रुद्धस्तु राक्षसः ।
विदार्यास्यं ततो रौद्रं तौ भक्षयितुमारभत् ॥ ७ ॥
त्या दोघांचे हे बोलणे ऐकून त्या राक्षसाला फार क्रोध आला आणि तो आपले भयंकर मुख पसरून त्यांना खाऊन टाकण्यास उद्यत झाला. ॥७॥
ततस्तौ देशकालज्ञौ खड्गाभ्यामेव राघवौ ।
अच्छिन्दतां सुसंहृष्टौ बाहू तस्यांसदेशतः ॥ ८ ॥
इतक्यात देशकाल (अवसर) याचे ज्ञान असणार्‍या त्या दोन्ही रघुवंशी राजकुमारांनी अत्यंत वेगाने तलवारीनीच त्याच्या दोन्ही भुजा खांद्यापासून कापून टाकल्या. ॥८॥
दक्षिणो दक्षिणं बाहुमसक्तमसिना ततः ।
चिच्छेद रामो वेगेन सव्यं वीरस्तु लक्ष्मणः ॥ ९ ॥
भगवान्‌ श्रीराम त्याच्या उजव्या बाजूला उभे होते. त्यांनी आपल्या तलवारीने त्याची उजवी भुजा (हात) कोणत्याही अडथळ्याशिवाय वेगपूर्वक कापून टाकली तसेच डाव्या बाजूस उभ्या असलेल्या वीर लक्ष्मणांनी त्याची डावी भुजा तलवारीने उडवून दिली. ॥९॥
स पपात महाबाहुश्छिन्नबाहुर्महास्वनः ।
खं च गां च दिशश्चैव नादयञ्जलदो यथा ॥ १० ॥
भुजा कापल्या गेल्यावर तो महाबाहु राक्षस मेघाप्रमाणे गंभीर गर्जना करून पृथ्वी, आकाश तसेच दिशांना दणाणून टाकीत पृथ्वीवर कोसळून पडला. ॥१०॥
स निकृत्तौ भूजौ दृष्ट्‍वा शोणितौघपरिप्लुतः ।
दीनः पप्रच्छ तौ वीरौ कौ युवामिति दानवः ॥ ११ ॥
आपल्या भुजा कापल्या गेलेल्या पाहून तो रक्तात न्हाऊन निघालेला दानव दीन वाणीने विचारू लागला- वीरांनो ! तुम्ही दोघे कोण आहात ? ॥११॥
इति तस्य ब्रुवाणस्य लक्ष्मणः शुभलक्षणः ।
शशंस तस्य काकुत्स्थं कबन्धस्य महाबलः ॥ १२ ॥
कबंधानी याप्रकारे विचारल्यावर शुभ लक्षण संपन्न महाबली लक्ष्मणांनी त्यास काकुत्स्थ श्रीरामांचा परिचय करून देण्यास आरंभ केला- ॥१२॥
अयमिक्ष्वाकुदायादो रामो नाम जनैः श्रुतः ।
अस्यैवावरजं विद्धि भ्रातरं मां च लक्ष्मणम् ॥ १३ ॥
हे इक्ष्वाकुवंशी महाराज दशरथांचे पुत्र आहेत आणि लोकात राम नामाने विख्यात आहेत. मला त्यांचा धाकटा भाऊ समजा. माझे नाव लक्ष्मण आहे. ॥१३॥
मात्रा प्रतिहते राज्ये रामः प्रव्राजितो वनम् ।
मया सह चरत्येष भार्यया च महद् वनम् ॥ १४ ॥

अस्य देवप्रभावस्य वसतो विजने वने ।
रक्षसाऽपहृता भार्या यामिच्छन्ताविहागतौ ॥ १५ ॥
माता कैकेयीच्या द्वारा ज्यावेळी त्यांचा राज्याभिषेक थांबवला गेला तेव्हा हे पित्याच्या आज्ञेने वनात निघून आले आणि माझ्या तसेच आपल्या पत्‍नीच्या सह या विशाल वनात विचरण करू लागले. या निर्जन वनात राहात असतां या देवतुल्य प्रभावशाली श्रीरघुनाथांच्या पत्‍नीला कुणी राक्षसाने हरून नेले आहे. तिचाच शोध घेण्याच्या इच्छेने आम्ही येथे आलो आहोत. ॥१४-१५॥
त्वं तु को वा किमर्थं वा कबन्धसदृशो वने ।
आस्येनोरसि दीप्तेन भग्नजङ्‌घो विचेष्टसे ॥ १६ ॥
तू कोण आहेस ? आणि कबंधासमान रूप धारण करून या वनात का पडला आहेस ? छातीच्या खाली चमकणारे मुख आणि तुटलेल्या जंघा घेऊन तू काय कारणाने इकडे तिकडे लंगडत फिरत आहेस ? ॥१६॥
एवमुक्तः कबन्धस्तु लक्ष्मणेनोत्तरं वचः ।
उवाच वचनं परमप्रीतस्तदिन्द्रवचनं स्मरन् ॥ १७ ॥
लक्ष्मणाने असे म्हटल्यावर कबंधाला इंद्रांनी सांगितलेल्या गोष्टीचे स्मरण झाले. म्हणून त्याने अत्यंत प्रसन्नतेने लक्ष्मणास त्याच्या प्रश्नांचे उत्तर दिले- ॥१७॥
स्वागतं वां नरव्याघ्रौ दिष्ट्या पश्यामि वामहम् ।
दिष्ट्या चेमौ निकृत्तौ मे युवाभ्यां बाहुबन्धनौ ॥ १८ ॥
पुरुषसिंह वीरांनो ! आपले दोघांचे स्वागत आहे. मोठ्‍या भाग्याने मला आपले दर्शन झाले आहे. या माझ्या दोन्ही भुजा माझ्यासाठी फार मोठे बंधन होते. आपण त्यांना कापून टाकले ही मोठ्‍या भाग्याची गोष्ट आहे. ॥१८॥
विरूपं यच्च मे रूपं प्राप्तं ह्यविनयाद् यथा ।
तन्मे शृणु नरव्याघ्र तत्त्वतः शंसतस्तव ॥ १९ ॥
नरश्रेष्ठ श्रीरामा ! मला जे असे कुरूप प्राप्त झाले आहे ते माझ्याच उद्दण्डतेचे फळ आहे. हे सर्व कसे काय झाले, तो प्रसंग मी आपल्याला ठीक-ठीक सांगत आहे. आपण माझ्या कडून ऐकावा. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे सप्ततितमः सर्गः ॥ ७० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा सत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP