[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ सप्तदश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
भीषणराक्षसीभिर्वृतायाः सीताया दर्शनेन हनुमतो हर्षः -
भयंकर राक्षसींनी घेरलेल्या सीतेच्या दर्शनाने हनुमानाचे प्रसन्न होणे -
ततः कुमुदखण्डाभो निर्मलं निर्मलोदयः ।
प्रजगाम नभश्चन्द्रो हंसो नीलमिवोदकम् ॥ १ ॥
त्यानन्तर तो दिवस गेल्यानन्तर कुमुद समूहाप्रमाणे वर्णाचा आणि निर्मळरूपाने उदित झालेला चन्द्र स्वच्छ आकाशात क्षितिजावर चढून आला तेव्हा नीळ जळराशीमध्ये जणुं एखादा हंस पोहत असावा, असा भासू लागला. ॥१॥
साचिव्यमिव कुर्वन् स प्रभया निर्मलप्रभः ।
चन्द्रमा रश्मिभिः शीतैः सिषेवे पवनात्मजम् ॥ २ ॥
निर्मळ कान्तीच्या चन्द्राने आपल्या प्रभेने सीतेचे दर्शन आदि होण्यास पवनकुमार हनुमानास सहाय्य करीत आपल्या शीतल किरणांच्या द्वारे त्यांची सेवा शुरू केली. ॥२॥
स ददर्श ततः सीतां पूर्णचन्द्रनिभाननाम् ।
शोकभारैरिव न्यस्तां भारैर्नावमिवाम्भसि ॥ ३ ॥
त्यावेळी हनुमन्तानी पूर्णचन्द्रासारखे मनोहर मुख असणार्‍या सीतेला पाहिले. अधिक भारामुळे पाण्यात दबल्या गेलेल्या नौकेप्रमाणे शोकाच्या अत्याधिक भारामुळे ती जणु काय वाकली होती. ॥३॥
दिदृक्षमाणो वैदेहीं हनुमान् मारुतात्मजः ।
स ददर्शाविदूरस्था राक्षसीर्घोरदर्शनाः ॥ ४ ॥
वायुपुत्र हनुमानानी जेव्हा विदेहकुमारी सीतेस पहाण्यासाठी आपली दृष्टी तिच्याकडे वळवली तेव्हा त्यांना तिच्या जवळच बसलेल्या भयानक दृष्टी असलेल्या अनेक राक्षसी दिसल्या. ॥४॥
एकाक्षीमेककर्णां च कर्णप्रावरणां तथा ।
अकर्णां शङ्‌कुकर्णां च मस्तकोच्छ्‍व‍ासनासिकाम् ॥ ५ ॥
त्यान्तील कुणा एखादीला एकच डोळा होता तर दुसरीला एकच कान होता. कुणाकुणाचे कान इतके मोठे होते की त्यांनी वस्त्राप्रमाणे चादरीप्रमाणे अंगाभोवती गुंडाळून घेतले होते. काही जणींना कानच नव्हते पण काहींचे कान जणुं खुंट मारल्याप्रमाणे गाडलेले होते. कुणाकुणाचे श्वास घेण्याचे नाक त्यांच्या मस्तकावर होते. ॥५॥
अतिकायोत्तमाङ्‌गीं च तनुदीर्घशिरोधराम् ।
ध्वस्तकेशीं तथाकेशीं केशकम्बलधारिणीम् ॥ ६ ॥
कुणाचे शरीर अत्यन्त मोठे होते तर कुणाचे अतिउत्तम होते. कुणाची मान बारीक आणि लांब होती. कुणाचे केस गेले होते तर काहींच्या डोक्यावर केसच उगवलेले नव्हते. काही काही राक्षसींचे केस असे होते की त्यांनी त्यांच्या केसांची घोंगडी (कांबळ) शरीरावर पांघरली होती. ॥६॥
लम्बकर्णललाटां च लम्बोदरपयोधराम् ।
लम्बोष्ठीं चुबुकोष्ठीं च लम्बास्यां लम्बजानुकाम् ॥ ७ ॥
काहींचे कान आणि कपाळ मोठ मोठे होते तर कुणाचे पोट आणि स्तन लांबच लांब होते. कुणाचे ओठ मोठे असल्याने लोंबत होते तर कुणाचे ओठ हनुवटीत जणु शिरले होते. कुणाचे तोंड मोठे होते तर कुणाचे गुडघे मोठे होते. ॥७॥
ह्रस्वां दीर्घां तथा कुब्जां विकटां वामनां तथा ।
करालां भुग्नवक्त्रां च पिङ्‌गाक्षीं विकृताननाम् ॥ ८ ॥
कुणी ठेंगणी, तर कुणी लांब, कुणी कुबडी तर कुणी वाकडी-तिकडी, कुणी वामनासारखी ठेंगणी, तर कुणी विकराळ, कुणी वाकड्या तोंडाची तर कुणी पिंगट डोळ्यांची, तर कुणी विकृत मुख असलेली होती. ॥८॥
विकृताः पिङ्‌गलाः कालीः क्रोधनाः कलहप्रियाः ।
कालायसमहाशूलकूटमुद्गरधारिणीः ॥ ९ ॥
कित्येक राक्षसी बेडौल शरीराच्या, कुणी काळ्या, कुणी पिवळ्या वर्णाच्या, कुणी अत्यन्त क्रोधी, तर कुणी भांडखोर होत्या. त्या सर्वांनी काळ्या लोखंडाचे बनविलेले मोठ मोठे शूळ, कूट, मुद्‍गर आदि हातात धारण केलेले होते. ॥९॥
वराहमृगशार्दूलमहिषाजशिवामुखाः ।
गजोष्ट्रहयपादाश्च निखातशिरसोऽपराः ॥ १० ॥
कित्येक राक्षसीणींची मुखे डुकरासारखी, मृगासारखी, सिंहासारखी, म्हशीसारखी, किंवा बकरी अथवा कोल्ह्यासारखी होती. काहींचे पाय हत्तीसारखे, काहींचे उंटासारखे तर काहींचे घोड्यासारखे होते. कुणाकुणाचे डोके कबन्धाप्रमाणे छातीत घुसलेले होते, म्हणून खड्ड्या प्रमाणे दिसत होते. (अथवा कुणाकुणाच्या मस्तकात खड्डे होते) ॥१०॥
एकहस्तैकपादाश्च खरकर्ण्यश्वकर्णिकाः ।
गोकर्णीर्हस्तिकर्णीश्च हरिकर्णीस्तथापराः ॥ ११ ॥
कुणाला एकच हात होता तर कुणाला एकच पाय होता. कुणाचे कान गाढवासारखे होते तर कुणाचे घोड्यासारखे होते. कुणाकुणांचे कान गायी सारखे, हत्तींसारखे किंवा सिंहासारखे असल्याचे दिसून येत होते. ॥११॥
अतिनासाश्च काश्चिच्च तिर्यङ्‌नासा अनासिकाः ।
गजसन्निभनासाश्च ललाटोच्छ्‍वासनासिकाः ॥ १२ ॥
कुणाची नासिका अत्यन्त मोठी होती तर काहींची तिरकी होती. काही जणींना नाकच नव्हते. काही काहींचे नाक हत्तीच्या सोंडे प्रमाणे होते तर कुणाकुणाची नाके त्यांच्या कपाळात होती आणि त्यांनीच त्या श्वास घेत होत्या. ॥१२॥
हस्तिपादा महापादा गोपादाः पादचूलिकाः ।
अतिमात्रशिरोग्रीवा अतिमात्रकुचोदरीः ॥ १३ ॥
कित्येकींचे पाय हत्तीसारखे होते आणि कित्येकींचे गायीच्या सारखे होते. कुणाकुणाचे पाय फारच मोठे होते तर काही जणींच्या पायावर वेणी घालावी असे लांबलांब केस उगवलेले होते, खूप राक्षसीणी बेहद्द लांब डोके आणि मान असणार्‍या होत्या तर काहींचे पोट आणि स्तन फारच मोठे होते. ॥१३॥
अतिमात्रास्यनेत्राश्च दीर्घजिह्वाननास्तथा ।
अजामुखीर्हस्तिमुखीर्गोमुखीः सूकरीमुखीः ॥ १४ ॥

हयोष्ट्रखरवक्त्राश्च राक्षसीर्घोरदर्शनाः ।
काहींची तोंडे आणि डोळे अमर्याद मोठे होते तर काहींच्या मुखात मोठ मोठ्या जिभा होत्या आणि कित्येक राक्षसीणी अशा होत्या कि त्यांची तोंडे बकरी, हत्ती, गाय, डुक्कर, घोडे, ऊंट आणि गाढवाच्या तोंडासारखी होती. त्यामुळे त्या फारच भयानक दिसत होत्या. ॥१४ १/२॥
शूलमुद्गरहस्ताश्च क्रोधनाः कलहप्रियाः ॥ १५ ॥

कराला धूम्रकेशीन्यो राक्षसीर्विकृताननाः ।
पिबन्ति सततं पानं सुरामांससदाप्रियाः ॥ १६ ॥
कित्येकींनी हातात शूळ घेतले होते तर काहीनी मुद्‍गर घेतले होते. काही रागीट स्वभावाच्या होत्या तर काही भांडखोर होत्या. धुरासारखे केस आणि विकृत मुख असणार्‍या कित्येक विकराळ राक्षसीणी सदा मद्यपान करीत होत्या. त्यांना मदिरा आणि मांस सदाच प्रिय होते. ॥१५-१६॥
मांसशोणितदिग्धाङ्‌गीर्मांसशोणितभोजनाः ।
ता ददर्श कपिश्रेष्ठो रोमहर्षणदर्शनाः ॥ १७ ॥
कित्येक जणींनी आपल्या अंगाला रक्त आणि मांस चोपडले होते. रक्त आणि मांस हेच त्यांचे भोजन होते. त्यांना नुसते पाहिले तरी अंगावर शहारे येत होते. कपिश्रेष्ठ हनुमन्तानी त्या सर्वांना पाहिले. ॥१७॥
स्कन्धवन्तमुपासीनाः परिवार्य वनस्पतिम् ।
तस्याधस्ताच्च तां देवीं राजपुत्रीमनिन्दिताम् ॥ १८ ॥

लक्षयामास लक्ष्मीवान् हनुमाञ्जनकात्मजाम् ।
निष्प्रभां शोकसन्तप्तां मलसङ्‌कुलमूर्धजाम् ॥ १९ ॥
त्या सर्वजणी उत्तम शाखा असलेल्या त्या अशोक वृक्षास चारी बाजूनी घेरून थोड्या दूर अन्तरावर बसलेल्या होत्या आणि सती साध्वी राजकुमारी सीतादेवी त्या वृक्षाच्या खाली त्याच्या बुन्ध्याला टेकून बसलेली होती. त्यावेळी शोभाशाली हनुमन्तानी जनककिशोरी जानकीकडे विशेष लक्ष्य देऊन पाहिले. तिची कान्ती निस्तेज झाली होती, ती शोकाने सन्तप्त होती आणि तिच्या केसान्त मळ जमा झाला होता. ॥१८-१९॥
क्षीणपुण्यां च्युतां भूमौ तारां निपतितामिव ।
चारित्रव्यपदेशाढ्यां भर्तृदर्शनदुर्गताम् ॥ २० ॥
ज्याप्रमाणे पुण्य क्षीण झाल्यावर एखादी तारका स्वर्गातून तुटून पृथ्वीवर पडते त्याप्रमाणे ती कान्तिहीन दिसत होती. ती आदर्श चरित्राने पतिव्रता संपन्न आणि त्यामुळेच विख्यात होती. पण ती पतिदर्शनापासून वंचित झाली होती. ॥२०॥
भूषणैरुत्तमैर्हीनां भर्तृवात्सल्यभूषणाम् ।
राक्षसाधिपसंरुद्धां बन्धुभिश्च विनाकृताम् ॥ २१ ॥
ती उत्तम भूषणरहित असूनही पतिच्या वात्सल्याने विभूषित होती. (येथे वात्सल्य शब्द स्नेह अर्थाने योजिला आहे. पतीचा स्नेह हेच तिचे भूषण होते. राक्षसराज रावणाने तिला बन्दी बनविले होते) ती स्वजनापासून दुरावली होती. ॥२१॥
वियूथां सिंहसंरुद्धां बद्धां गजवधूमिव ।
चन्द्ररेखां पयोदान्ते शारदाभ्रैरिवावृताम् ॥ २२ ॥
ज्याप्रमाणे एखादी हत्तीण आपल्या कळपापासून वेगळी पडावी, यूथपतिच्या स्नेहाने बद्ध असावी आणि तिला एखाद्या सिंहाने रोखून धरावे, त्या प्रमाणे रावणाच्या कैदेत पडलेल्या सीतेची दशा झाली होती. ती वर्षाऋतू संपल्यावर शरद-ऋतूतील पांढर्‍या ढगांनी वेढल्या गेलेल्या चन्द्रकोरीप्रमाणे भासत होती. ॥२२॥
क्लिष्टरूपामसंस्पर्शादयुक्तामिव वल्लकीम् ।
स तां भर्तृहिते युक्तामयुक्तां रक्षसां वशे ॥ २३ ॥

अशोकवनिकामध्ये शोकसागरमाप्लुताम् ।
ताभिः परिवृतां तत्र सग्रहामिव रोहिणीम् ॥ २४ ॥
जशी वीणा आपल्या स्वामीच्या अंगुलीस्पर्शापासून वंचित होऊन वादन आदि क्रियारहित, अयोग्य अवस्थेत मूक पडून राहते तशीच सीता पतिच्या संपर्कापासून दूर झाल्याने महान क्लेशात पडून अशा अवस्थेमध्ये पडली होती, जी तिच्या सारखीला योग्य नव्हते. पति हितात तत्पर असणारी सीता, राक्षसांच्या आधीन राहण्यास योग्य नाही आणि तरीही तशा स्थितित पडली आहे. अशोक वाटिकेमध्ये राहून ही शोकसागरात बुडाली आहे. क्रूर ग्रहांकडून आक्रान्त झालेल्या रोहिणी प्रमाणे ती तेथे या राक्षसीणींकडून वेढली गेली आहे असे हनुमन्तानी तिला पाहिले. ती पुष्पहीन लतेप्रमाणे श्रीहीन झाली होती. ॥२३-२४॥
ददर्श हनुमांस्तत्र लतामकुसुमामिव ।
सा मलेन च दिग्धाङ्‌गी वपुषा चाप्यलङ्‌कृता ।
मृणाली पङ्‌कदिग्धेव विभाति च न भाति च ॥ २५ ॥
तिच्या सर्वांगावर मळ जमा झाला होता. केवळ शरीरसौन्दर्य हाच तिचा अंलकार होता. ती चिखलाने माखलेल्या कमळनालाप्रमाणे शोभा आणि अशोभा दोन्हीने युक्त होती. ॥२५॥
मलिनेन तु वस्त्रेण परिक्लिष्टेन भामिनीम् ।
संवृतां मृगशावाक्षीं ददर्श हनुमान् कपिः ॥ २६ ॥
मलीन आणि जुन्या वस्त्रान्त मृगशावकनयनी भामिनी सीतेला कपिवर हनुमन्तानी या अवस्थेत पाहिले. ॥२६॥
तां देवीं दीनवदनामदीनां भर्तृतेजसा ।
रक्षितां स्वेन शीलेन सीतामसितलोचनाम् ॥ २७ ॥
जरी सीतेच्या मुखावर दीनता पसरली होती तरीही आपल्या पतीच्या तेजाचे स्मरण होताच तिच्या हृदयातील ते दैन्य दूर होत असे. काळेभोर डोळे असलेली सीता आपल्या शीलामुळेच सुरक्षित होती. ॥२७॥
तां दृष्ट्‍वा हनुमान् सीतां मृगशावनिभेक्षणाम् ।
मृगकन्यामिव त्रस्तां वीक्षमाणां समन्ततः ॥ २८ ॥

दहन्तीमिव निःश्वासैर्वृक्षान् पल्लवधारिणः ।
संघातमिव शोकानां दुःखस्योर्मिमिवोत्थिताम् ॥ २९ ॥

तां क्षमां सुविभक्ताङ्‌गीं विनाभरणशोभिनीम् ।
प्रहर्षमतुलं लेभे मारुतिः प्रेक्ष्य मैथिलीम् ॥ ३० ॥
अशा त्या हरिणाच्या पाडसाप्रमाणे नेत्र असलेल्या सीतेस हनुमन्तानी पाहिले, ती घाबरलेल्या मृगकन्येप्रमाणे बावरून साशंक दृष्टीने सर्वत्र पाहात होती. आपल्या उच्छ्वासांनी ती पल्लवधारी वृक्षांना जणु दग्ध करून टाकीत आहे की काय असे भासत होते. शोकाची ती मूर्तीमन्त प्रतिमाच भासत होती; आणि दु:खाच्या मूर्तीमन्त ऊर्मीप्रमाणे, लाटेप्रमाणे प्रतीत होत होती. ती सर्वांग सुन्दर आणि क्षमाशील होती आणि जरी विरह-शोकाने दुर्बल झालेली होती तरीही आभूषणाशिवायही ती शोभत होती. या अवस्थेत मिथिलेशकुमारी सीतेला पाहून पवनपुत्र हनुमन्तांना तिचा शोध लागला म्हणून अनुपम हर्ष झाला. ॥२८-३०॥
हर्षजानि च सोऽश्रूणि तां दृष्ट्‍वा मदिरेक्षणाम् ।
मुमुचे हनुमांस्तत्र नमश्चक्रे च राघवम् ॥ ३१ ॥
मनोहर नेत्र असणार्‍या सीतेला पाहून हनुमन्तांच्या डोळ्यातून आनन्दाश्रू वाहू लागले. त्यांनी मनान्तल्या मनान्त राघवाला नमस्कार केला. (यात भावना अशी की त्यांच्या कृपेने सीतेचा शोध लागला आहे) ॥३१॥
नमस्कृत्वाथ रामाय लक्ष्मणाय च वीर्यवान् ।
सीतादर्शनसंहृष्टो हनुमान् संवृतोऽभवत् ॥ ३२ ॥
सीतेच्या दर्शनाने उत्साहित होऊन श्रीराम आणि लक्ष्मण यांना नमस्कार करून पराक्रमी हनुमान तेथेच लपून राहिले. ॥३२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुन्दरकाण्डे सप्तदशः सर्गः ।
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सतरावा सर्ग पूरा झाला. ॥१७॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP