श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। एकत्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामादिभिः सह विश्वामित्रस्य मिथिलां प्रति प्रस्थानं मार्गे सायंकाले शोणभद्रतटे विश्रामश्च - राम-लक्ष्मणांसह विश्वामित्रांचे मिथिलेस प्रस्थान, मार्गात संध्याकाळ झाल्यावर शोणभद्रतटी विश्राम -
अथ तां रजनीं तत्र कृतार्थौ रामलक्ष्मणौ ।
ऊषतुर्मुदितौ वीरौ प्रहृष्टेनान्तरात्मना ॥ १ ॥
त्यानंतर विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करून कृतकृत्य झालेल्या श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्या यज्ञशाळेतच ती रात्र काढली. त्या समयी ते दोन्ही वीर फार प्रसन्न होते. त्यांचे हृदय हर्षोल्हासाने परिपूर्ण होते. ॥ १ ॥
प्रभातायां तु शर्वर्यां कृतपौर्वाह्णिकक्रियौ ।
विश्वामित्रमृषींश्चान्यान् सहितावभिजग्मतुः ॥ २ ॥
रात्र संपल्यावर जेव्हां प्रातःकाल झाला तेव्हां ते दोन्ही बंधु पूर्वाह्नकालाच्या नित्य नियमांतून निवृत्त होऊन ते दोघेही विश्वामित्र मुनि व इतर ऋषि यांच्याजवळ बरोबरच आले. ॥ २ ॥
अभिवाद्य मुनिश्रेष्ठं ज्वलन्तमिव पावकम् ।
ऊचतुः परमोदारं वाक्यं मधुरभाषिणौ ॥ ३ ॥
तेथे जाऊन त्यांनी प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्वी मुनिश्रेष्ठ विश्वामित्र यांना प्रणाम केला आणि मधुर वाणीने परम उदार वचन बोलले - ॥ ३ ॥
इमौ स्म मुनिशार्दूल किङ्‍करौ समुपगतौ ।
आज्ञापय मुनिश्रेष्ठ शासनं करवाव किम् ॥ ४ ॥
'मुनिवर ! आम्ही दोघे आपले किंकर आपल्या सेवेत उपस्थित झालो आहोत. मुनिश्रेष्ठ ! आम्ही आपली काय सेवा करावी याविषयी आज्ञा करावी.' ॥ ४ ॥
एवमुक्ते तथोर्वाक्ये सर्व एव महर्षयः ।
विश्वामित्रं पुरस्कृत्य रामं वचनमब्रुवन् ॥ ५ ॥
त्या दोघांनी असे म्हटल्यावर ते सर्व महर्षि विश्वामित्रांना पुढे करून श्रीरामचंद्रास म्हणाले - ॥ ५ ॥
मैथिलस्य नरश्रेष्ठ जनकस्य भविष्यति ।
यज्ञः परमधर्मिष्ठस्तत्र यास्यामहे वयम् ॥ ६ ॥
'नरश्रेष्ठ ! मिथिलेचा राजा जनक यांचा परम धर्ममय यज्ञास आरंभ होणार आहोत. ॥ ६ ॥
त्वं चैव नरशार्दूल सहास्माभिर्गमिष्यसि ।
अद्‍भुतं च धनूरत्‍नं तत्र त्वं द्रष्टुमर्हसि ॥ ७ ॥
'पुरुषसिंह ! तुम्हालाही आमच्या बरोबर तेथे यावयाचे आहे. तेथे एक मोठेच अद्‌भुत धनुष्यरत्‍न आहे. तुम्ही ते पाहिले पाहिजे. ॥ ७ ॥
तद्धि पूर्वं नरश्रेष्ठ दत्तं सदसि दैवतैः ।
अप्रमेयबलं घोरं मखे परमभास्वरम् ॥ ८ ॥
'पुरुषप्रवर ! पूर्वी कधी यज्ञात आलेल्या देवतांनी जनकाच्या कुण्या पूर्वपुरुषाला हे धनुष्य दिले होते. ते किती प्रबल आणि भारी आहे याचे मोजमाप नाही. ते फारच प्रकाशमान आणि भयंकर आहे. ॥ ८ ॥
नास्य देवा न गन्धर्वा नासुरा न च राक्षसाः ।
कर्तुमारोपणं शक्ता न कथञ्चन मानुषाः ॥ ९ ॥
'देवता, असुर, गंधर्व तसेच राक्षसही कुठल्याही प्रकारे त्या धनुष्याची प्रत्यञ्चा चढवू शकत नाहीत, मग मनुष्याचे बोलायलाच नको. ॥ ९ ॥
धनुषस्तस्य वीर्यं तु जिज्ञासन्तो महीक्षितः ।
न शेकुरारोपयितुं राजपुत्रा महाबलाः ॥ १० ॥
'त्या धनुष्याची शक्ति अजमाविण्यासाठी कित्येक महाबलाढ्य राजे आणि राजकुमार आले, पण कुणीही ते धनुष्य वाकवून त्यावर प्रत्यञ्चा लावू शकले नाहीत. ॥ १० ॥
तद्धनुर्नरशार्दूल मैथिलस्य महात्मनः ।
तत्र द्रक्ष्यसि काकुत्स्थ यज्ञं च परमाद्‍भुतम् ॥ ११ ॥
'काकुत्स्थकुलनंदन पुरुषसिंह राम ! तेथे आल्याने तू महामना मिथिला नरेशाचे ते धनुष्य तसेच त्याचा परम अद्‌भूत यज्ञही पाहू शकशील. ॥ ११ ॥
तद्धि यज्ञफलं तेन मैथिलेनोत्तमं धनुः ।
याचितं नरशार्दूल सुनाभं सर्वदैवतैः ॥ १२ ॥
'नरश्रेष्ठ ! मिथिलानरेशाने आपल्या यज्ञाच्या फलस्वरूप हे धनुष्य मागितले होते. म्हणून सर्व देवता आणि भगवान् शंकरांनी त्यांना हे धनुष्य प्रदान केले होते. त्या धनुष्याचा मध्यभाग जो मुठीत पकडला जातो, तो फारच सुंदर आहे. ॥ १२ ॥
आयागभूतं नृपतेस्तस्य वेश्मनि राघव ।
अर्चितं विविधैर्गन्धैर्धूपैश्चागरुगन्धिभिः ॥ १३ ॥
'रघुनंदन ! राजा जनकाच्या महालात हे धनुष्य पूजनीय देवतेप्रमाणे प्रतिष्ठीत आहे, आणि नाना प्रकारचे गंध, धूप तथा अगुरू आदि सुगंधित पदार्थांनी त्याची पूजा होत असते. ॥ १३ ॥
एवमुक्त्वा मुनिवरः प्रस्थानमकरोत् तदा ।
सर्षिसङ्‍घः सकाकुत्स्थ आमन्त्र्य वनदेवताः ॥ १४ ॥
असे म्हणून मुनिवर विश्वामित्रांनी वनदेवतांची आज्ञा घेतली आणि ऋषिमण्डळी आणि रामलक्ष्मणांसह तेथून प्रस्थान केले. ॥ १४ ॥
स्वस्ति वोऽस्तु गमिष्यामि सिद्धः सिद्धाश्रमादहम् ।
उत्तरे जाह्नवीतीरे हिमवन्तं शिलोच्चयम् ॥ १५ ॥
मार्गी लागल्यावर ते वनदेवतांना म्हणाले - "मी आपला यज्ञकर्म सिद्ध करून या सिद्धाश्रमांतून आता जात आहे. गंगेच्या उत्तर तटावरून पुढे मी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जाईन. आपले कल्याण असो.' ॥ १५ ॥
इत्युक्त्वा मुनिशार्दुलः कौशिकः स तपोधनः ।
उत्तरां दिशमुद्दिश्य प्रस्थातुमुपचक्रमे ॥ १६ ॥
असे म्हणून तपोधन मुनिश्रेष्ठ कौशिकांनी उत्तर दिशेकडे प्रस्थान करण्यास आरंभ केला. ॥ १६ ॥
तं व्रजन्तं मुनिवरमन्वगादनुसारिणाम् ।
शकटीशतमात्रं च प्रायेण ब्रह्मवादिनाम् ॥ १७ ॥
त्या समयी यात्रा करणार्‍या विश्वामित्रांच्या मागे त्यांच्याबरोबर जाणार्‍या ब्रह्मवादी मुनींच्या शंभर गाड्या चालल्या होत्या. ॥ १७ ॥
मृगपक्षिगणाश्चैव सिद्धाश्रमनिवासिनः ।
अनुजग्मुर्महात्मानं विश्वामित्रं तपोधनम् ॥ १८ ॥
सिद्धाश्रमात निवास करणारे मृग आणि पक्षीही तपोधन विश्वामित्रांच्या मागोमाग जाऊ लागले. ॥ १८ ॥
निवर्तयामास ततः सर्षिसङ्‌घः स पक्षिणः ।
ते गत्वा दूरमध्वानं लम्बमाने दिवाकरे ॥ १९ ॥

वासं चक्रुर्मुनिगणाः शोणाकूले समाहिताः ।
तेऽस्तं गते दिनकरे स्नात्वा हुतहुताशनाः ॥ २० ॥
काही अंतर चालून गेल्यावर ऋषिमण्डळीसह विश्वामित्रांनी त्या सर्व पशु पक्षांना परत पाठवले. नंतर बर्‍याच अंतरावरील मार्ग चालून गेल्यावर ज्यावेळी सूर्य अस्ताचलास जाऊ लागला तेव्हां त्या ऋषिंनी पूर्ण सावधान राहून शोणभद्राच्या तटावर मुक्काम ठोकला. जेव्हां सूर्याचा अस्त झाला तेव्हा स्नान करून सर्वांनी अग्निहोत्राचे कार्य पूर्ण केले ॥ १९-२० ॥
विश्वामित्रं पुरस्कृत्य निषेदुरमितौजसः ।
रामोऽपि सहसौमित्रिर्मुनींस्तानभिपूज्य च ॥ २१ ॥

अग्रतो निषसादाथ विश्वामित्रस्य धीमतः ।
त्यानंतर सर्व अमिततेजस्वी ऋषि मुनिवर विश्वामित्रांना पुढे करून बसले. नंतर लक्ष्मणासहित श्रीरामही त्या ऋषिंचा आदर करीत बुद्धिमान् विश्वामित्रांच्या समोर बसले. ॥ २१ १/२ ॥
अथ रामो महातेजा विश्वामित्रं तपोधनम् ॥ २२ ॥

पप्रच्छ मिनुशार्दूलं कौतूहलसमन्वितम् ।
तत्पश्चात् महातेजस्वी श्रीरामांनी तपोधन मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना कुतुहलाने विचारले - ॥ २२ १/२ ॥
भगवन् को न्वयं देशः समृद्धवनशोभितः ॥ २३ ॥

श्रोतुमिच्छामि भद्रं ते वक्तुमर्हसि तत्त्वतः ।
भगवन् ! हा हिरवागार समृद्धिशाली वनाने सुशोभित देश कुठला आहे ? मी याचा परिचय ऐकू इच्छितो. आपले कल्याण असो ! आपण मला ठीक ठीक याचे रहस्य सांगावे. ॥ २३ १/२ ॥
नोदितो रामवाक्येन कथयामास सुव्रतः ।
तस्य देशस्य निखिलमृषिमध्ये महातपाः ॥ २४ ॥
श्रीरामचंद्रांच्या या प्रश्नाने प्रेरित होऊन उत्तम व्रताचे पालन करणारे महातपस्वी विश्वामित्र ऋषिमण्डळीच्या मध्ये त्या देशाचा पूर्णरूपाने परिचय करून देण्यासाठी म्हणाले - ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकत्रिंशः सर्गः ॥ ३१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकतिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३१ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP