[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ चतु:षष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
दधिमुखतः सुग्रीवसन्देशमाकर्ण्य अंगदहमदादीनां वानराणां किष्किन्धायां गमनं; हनुमता श्रीरामं प्रणम्य सीतादर्शनसमाचारस्य निवेदनं च -
दधिमुखाकडून सुग्रीवाचा सन्देश ऐकून अंगद-हनुमान आदि वानरांचे किष्किन्धेस पोहोंचणे आणि हनुमानाने श्रीरामास प्रणाम करून सीतादेवीच्या दर्शनाचा समाचार सांगणे -
सुग्रीवेणैवमुक्तस्तु हृष्टो दधिमुखः कपिः ।
राघवं लक्ष्मणं चैव सुग्रीवं चाभ्यवादयत् ॥ १ ॥
सुग्रीवाने असे सांगितल्यावर प्रसन्नचित्त वानर दधिमुखाने श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांना प्रणाम केला.॥१॥
स प्रणम्य च सुग्रीवं राघवौ च महाबलौ ।
वानरैः सहितैः शूरैर्दिवमेवोत्पपात ह ॥ २ ॥
सुग्रीव आणि त्या महाबली रघुवंशी बन्धुंना प्रणाम करून तो शूरवीर वानरांसह आकाशमार्गाने उड्डाण करून तेथून निघाला.॥२॥
स यथैवागतः पूर्वं तथैव त्वरितं गतः ।
निपत्य गगनाद्‌ भूमौ तद्वनं प्रविवेश ह ॥ ३ ॥
ज्याप्रमाणे प्रथम आले होते त्याप्रमाणे तितक्याच वेगाने ते मधुवनात जाऊन पोहोचले आणि आकाशातून पृथ्वीवर उतरून त्यानी मधुवनात प्रवेश केला.॥३॥
स प्रविष्टो मधुवनं ददर्श हरियूथपान् ।
विमदानुत्थितान् सर्वान् मेहमानान् मधूदकम् ॥ ४ ॥
मधुवनात प्रवेश करताच त्यानी पाहिले की समस्त वानरयूथपति, जे पहिल्याने उद्दंड झाले होते त्यांची नशा उतरून ते आता मदरहित झाले आहेत आणि ते मधुमिश्रित जळाचे मेहन (मूत्रेन्दिय द्वारा) करीत आहेत.॥४॥
स तानुपागमद् वीरो बद्ध्वा करपुटाञ्जलिम् ।
उवाच वचनं श्लक्ष्णमिदं हृष्टवदङ्‌गदम् ॥ ५ ॥
वीर दधिमुख त्यांच्या जवळ गेला आणि दोन्ही हात जोडून अंगदाला हर्षयुक्त मधुर वाणीने याप्रमाणे म्हणाला—॥५॥
सौम्य रोषो न कर्तव्यो यदेभिः परिवारणम् ।
अज्ञानाद् रक्षिभिः क्रोधाद्‌ भवन्तः प्रतिषेधिताः ॥ ६ ॥
'हे सौम्या ! या रक्षकांनी अज्ञानवश तुम्हाला अडविले होते आणि क्रोधपूर्वक तुम्हा सर्वांना मधु पिण्याला मनाई केली होती. यासाठी आपण आपल्या मनात क्रोध करू नका.॥६॥
श्रान्तो दूरादनुप्राप्तो भक्षयस्व स्वकं मधु ।
युवराजस्त्वमीशश्च वनस्यास्य महाबल ॥ ७ ॥
आपण सर्व दूर अन्तरावरून थकून भागून आला आहात म्हणून आपण फळे खावी आणि मधही प्यावा. ही सर्व आपलीच संपत्ति आहे. महाबली वीरा ! आपण आमचे युवराज आहात आणि या वनाचे स्वामी आहात.॥७॥
मौर्ख्यात् पूर्वं कृतो रोषस्तद् भवान् क्षन्तुमर्हति ।
यथैव हि पिता तेऽभूत् पूर्वं हरिगणेश्वरः ॥ ८ ॥

तथा त्वमपि सुग्रीवो नान्यस्तु हरिसत्तम ।
'कपिश्रेष्ठ ! मी प्रथम मूर्खपणाने जो रोष प्रकट केला होता, त्याबद्दल आपण क्षमा करावी. कारण पूर्वकाली जसे आपले पिता वानरांचे राजे होते त्याचप्रमाणे आपण आणि सुग्रीवही आहात. आपल्या शिवाय दुसरा कोणी आमचा स्वामी नाही आहे.॥८ १/२॥
आख्यातं हि मया गत्वा पितृव्यस्य तवानघ ॥ ९ ॥

इहोपयानं सर्वेषामेतेषां वनचारिणाम् ।
भवदागमनं श्रुत्वा सहैभिर्वनचारिभिः ॥ १० ॥

प्रहृष्टो न तु रुष्टोऽसौ वनं श्रुत्वा प्रधर्षितम् ।
'निष्पाप युवराज ! मी येथून आपले काका (चुलते) सुग्रीव यांच्याजवळ जाऊन या सर्व वानरांच्या येथे येण्यासंबंचीचे वृत्त त्यांना सांगितले. या सर्व वानरांसह आपल्या आगमनाचे वृत्त ऐकून ते अत्यन्त प्रसन्न झाले. या वनाच्या विध्वंसाचा समाचार ऐकूनही त्यांना रोष आला नाही. ॥९-१० १/२॥
प्रहृष्टो मां पितृव्यस्ते सुग्रीवो वानरेश्वरः ॥ ११ ॥

शीघ्रं प्रेषय सर्वांस्तानिति होवाच पार्थिवः ।
'आपले चुलते वानरराज सुग्रीव यांनी अत्यन्त आनन्दाने मला सांगितले की, ''त्या सर्वांना शीघ्र इकडे पाठवून दे.'' ॥११ १/२॥
श्रुत्वा दधिमुखस्येदं वचनं श्लक्ष्णमङ्‌गदः ॥ १२ ॥

अब्रवीत् तान् हरिश्रेष्ठो वाक्यं वाक्यविशारदः ।
दधिमुखाचे हे भाषण ऐकून संभाषण करण्यात कुशल असणार्‍या कपिश्रेष्ठ अंगदाने त्या सर्वांना मधुर वाणीने म्हटले—॥१२ १/२॥
शङ्‌के श्रुतोऽयं वृत्तान्तो रामेण हरियूथपाः ॥ १३ ॥

अयं च हर्षदाख्याति तेन जानामि हेतुना ।
तत् क्षमं नेह नः स्थातुं कृते कार्ये परन्तपाः ॥ १४ ॥
'वानर यूथपतिंनो ! असे वाटते आहे की भगवान श्रीरामांनी आम्हा सर्वांच्या आगमनाचा समाचार ऐकला आहे. कारण ते अत्यंत प्रसन्न होऊन तेथील सर्व गोष्टी ऐकत आहेत. म्हणून मला असे कळत आहे की परंतपांनो ! (शत्रूला संताप देणार्‍या वीरांनो) कार्य पूरे झाले असता आता आम्ही येथे अधिक थांबता कामा नये.॥१३-१४॥
पीत्वा मधु यथाकामं विश्रान्ता वनचारिणः ।
किं शेषं गमनं तत्र सुग्रीवो यत्र वानरः ॥ १५ ॥
'पराक्रमी वानर इच्छानुसार मध पिऊन चुकले आहेत आता येथे कोठले कार्य शेष (शिल्लक) आहे ? म्हणून आता जेथे वानरराज सुग्रीव आहेत तिकडेच गेले पाहिजे.॥१५॥
सर्वे यथा मां वक्ष्यन्ति समेत्य हरियूथपाः ।
तथास्मि कर्ता कर्तव्ये भवद्‌भिः परवानहम् ॥ १६ ॥
'हे वानर पुंगवांनो ! आपण सर्व मिळून मला जसे सांगाल तसेच मी करीन ! कारण कर्तव्याच्या विषयी मी आपणा सर्वांच्या अधीन आहे.॥१६॥
नाज्ञापयितुमीशोऽहं युवराजोऽस्मि यद्यपि ।
अयुक्तं कृतकर्माणो यूयं धर्षयितुं बलात् ॥ १७ ॥
'जरी मी युवराज असलो तरी आपणा सर्वांवर मी हुकमत गाजवू शकत नाही. आपण फार मोठे कार्य पूर्ण करून आला आहात. म्हणून बलपूर्वक तुमच्यावर शासन चालविणे कदापि उचित नाही. ॥१७॥
ब्रुवतश्चाङ्‌गदस्यैवं श्रुत्वा वचनमव्ययम् ।
प्रहृष्टमनसो वाक्यमिदमूचुर्वनौकसः ॥ १८ ॥
त्यावेळी याप्रमाणे बोलणार्‍या अंगदाचे उत्तम वचन ऐकून सर्व वानरांचे चित्त प्रसन्न झाले. आणि ते याप्रकारे बोलले—॥१८॥
एवं वक्ष्यति को राजन् प्रभुः सन् वानरर्षभ ।
ऐश्वर्यमदमत्तो हि सर्वोऽहमिति मन्यते ॥ १९ ॥
'हे राजन ! कपिश्रेष्ठ ! स्वामी असूनही आपल्या आधीन रहाणार्‍या लोकाशी कोण या प्रकारे बोलेल ? प्राय: सर्व लोक ऐश्वर्याच्या मदाने उन्मत्त होऊन अहंकारवश आपल्या स्वत:लाच सर्वोपरि सर्वश्रेष्ठ मानू लागतात.॥१९॥
तव चेदं सुसदृशं वाक्यं नान्यस्य कस्यचित् ।
सन्नतिर्हि तवाख्याति भविष्यच्छुभयोग्यताम् ॥ २० ॥
'आपण जे बोलला ते आपल्यालाच साजेसे आहे. दुसर्‍या कुणाच्या मुखान्तून प्राय: अशी वचने बोलली जात नाहीत. ही नम्रता आपल्या भावी शुभयोग्यतेचा परिचय करून देत आहे.॥२०॥
सर्वे वयमपि प्राप्तास्तत्र गन्तुं कृतक्षणाः ।
स यत्र हरिवीराणां सुग्रीवः पतिरव्ययः ॥ २१ ॥
'आम्ही सर्वजणही वानर वीरांचे अविनाशी पति सुग्रीव जेथे विराजमान आहेत तेथे जाण्यासाठी उत्कण्ठित होऊन येथे आपल्या समीप आलो आहेत.॥२१॥
त्वया ह्यनुक्तैर्हरिभिर्नैव शक्यं पदात् पदम् ।
क्वचिद् गन्तुं हरिश्रेष्ठ ब्रूमः सत्यमिदं तु ते ॥ २२ ॥
'हे वानरश्रेष्ठ ! आपली आज्ञा प्राप्त झाल्याशिवाय आम्ही वानरगण कुठेही एक पाऊल सुद्धा जाऊ शकत नाही. ही आपल्याला अगदी सत्य गोष्ट सांगत आहोत.॥२२॥
एवं तु वदतां तेषां अङ्‌गदः प्रत्यभाषत ।
साधु गच्छाम इत्युक्त्वा खमुत्पेतुर्महाबलाः ॥ २३ ॥
ते वानर ज्या वेळी अशाप्रकारे बोलू लागले तेव्हा अंगद म्हणाला— 'फार चांगले ! आता आपण चलू या. एवढे बोलून ते महाबलाढ्य वानर आकाशातून उड्डाण करीत निघाले.॥२३॥
उत्पतन्तमनूत्पेतुः सर्वे ते हरियूथपाः ।
कृत्वाऽऽकाशं निराकाशं यन्त्रोत्क्षिप्ता इवोपलाः ॥ २४ ॥
सर्वात पुढे अगन्द आणि त्याच्या मागे ते समस्त वानर यूथपति उडू लागले. ते आकाशाला आच्छादित करीत गोफणीतून फेकले गेलेल्या दगडाप्रमाणे अत्यन्त वेगाने जात होते. ॥२४॥
अङ्‌गदं पुरतः कृत्वा हनूमन्तं च वानरम् ।
तेऽम्बरं सहसोत्पत्य वेगवन्तः प्लवङ्‌गमाः ॥ २५ ॥

विनदन्तो महानादं घना वातेरिता यथा ।
अंगद आणि वानर वीर हनुमानास पुढे ठेवून सर्व वेगवान वानर आकाशात उड्डाण करून वार्‍याने उडविलेल्या मेघांप्रमाणे अत्यन्त जोरजोराने गर्जना करीत किष्किन्धेच्या निकट येऊन पोहोंचले.॥२५ १/२॥
अङ्‌गदे समनुप्राप्ते सुग्रीवो वानरेश्वरः ॥ २६ ॥

उवाच शोकोपहतं रामं कमललोचनम् ।
अंगद जवळ येताच वानरराज सुग्रीव शोकसन्तप्त कमलनयन श्रीरामांस म्हणाले—॥२६ १/२॥
समाश्वसिहि भद्र ते दृष्टा देवी न संशयः ॥ २७ ॥

नागन्तुमिह शक्यं तैरतीतसमयैरिह ।
'प्रभो ! धैर्य धारण करावे. आपले कल्याण असो. सीता देवीचा पत्ता लागला आहे यात संशय नाही, कारण कृतकार्य झाल्याशिवाय दिलेल्या समयाचा अवधि टळून गेल्यावर हे वानर कदापि येथे येऊच शकले नसते.॥२७ १/२॥
अङ्‌गदस्य प्रहर्षाच्च जानामि शुभदर्शन ॥ २८ ॥

न मत्सकाशमागच्छेत् कृत्ये हि विनिपातिते ।
युवराजो महाबाहुः प्लवतामङ्‌गदो वरः ॥ २९ ॥
'हे शुभदर्शना रामा ! अंगदाच्या अत्यन्त प्रसन्नतेमुळेही मला या गोष्टीची सूचना मिळत आहे. जर काम बिघडून गेले असते तर वानरांमध्ये श्रेष्ठ युवराज महाबाहु अंगद परतून माझ्याजवळ कदापि आले नसते. ॥२८-२९॥
यद्यप्यकृतकृत्यानामीदृशः स्यादुपक्रमः ।
भवेत् स दीनवदनो भ्रान्तविप्लुतमानसः ॥ ३० ॥
'जरी कार्य सिद्ध न झाल्यावरही याप्रकारे लोक घरी परतल्याचे आढळून आलेले आहे तथापि त्या अवस्थेत अंगदाच्या चेहर्‍यावर उदासीनता पसरलेली दिसली असती आणि त्याच्या चित्तात भीतीमुळे खळबळ माजली असती.॥३०॥
पितृपैतामहं चैतत् पूर्वकैरभिरक्षितम् ।
न मे मधुवनं हन्याददृष्टा जनकात्मजाम् ॥ ३१ ॥
'माझ्या पूर्वजांच्या या वनाचा, ज्याचे पूर्वजांनीही सदा रक्षण केले होते, कोणीही जनककिशोरीचे दर्शन झाल्याखेरीज विध्वंस करण्यास समर्थ झाला नसता.॥३१॥
कौसल्या सुप्रजा राम समाश्वसिहि सुव्रत ।
दृष्टा देवी न सन्देहो न चान्येन हनूमता ॥ ३२ ॥
'उत्तम व्रताचे पालन करणार्‍या श्रीरामा ! आपली प्राप्ती झाल्याने माता कौसल्या उत्तम सन्तानाची जननी झाली आहे. आपण धैर्य धारण करावे. देवी सीतेचे दर्शन झालेले आहे यात जराही सन्देह नाही. दुसर्‍या कुणीही नाही हनुमानानेच दर्शन घेतले आहे.॥३२॥
नह्यन्यः कर्मणो हेतुः साधनेऽस्य हनूमतः ।
हनूमतीह सिद्धिश्च मतिश्च मतिसत्तम ॥ ३३ ॥

व्यवसायश्च वीर्यं च श्रुतं चापि प्रतिष्ठितम् ।
जाम्बवान् यत्र नेता स्यादङ्‌गदश्च हरीश्वरः ॥ ३४ ॥

हनुमांश्चाप्यधिष्ठाता न तस्य गतिरन्यथा ।
'मतिमानान्त श्रेष्ठ रघुनन्दना ! हे कार्य सिद्धिस जाण्यास हनुमन्ताशिवाय अन्य कोणी कारण बनले असेल असा संभव नाही आहे. वानरश्रेष्ठ हनुमानांच्या ठिकाणीच कार्यसिद्धिसाठी लागणारी शक्ति आणि बुद्धि आहे. त्यांच्या ठिकाणी उद्योग, पराक्रम आणि शास्त्रज्ञानही प्रतिष्ठित आहे. ज्या दलाचे नेते जांबवान आणि महाबलाढ्य अंगद आहेत आणि अधिष्ठाता हनुमान आहे, त्या दलाला विपरीत परिणाम, म्हणजे असफलता, मिळेल हे कधी संभवनीय नाही.॥३३-३४ १/२॥
मा भूश्चिन्तासमायुक्तः सम्प्रत्यमितविक्रम ॥ ३५ ॥

यदा हि दर्पितोदग्राः संगताः काननौकसः ।
नैषामकृतकार्याणामीदृशः स्यादुपक्रमः ॥ ३६ ॥

वनभंगेन जानामि मधूनां भक्षणेन च ।
'अमित पराक्रमी श्रीरामा ! आता आपण चिन्ता करू नये. हे वनवासी वानर जे इतके अहंकाराने चढून जाऊन येत आहेत, कार्यसिद्धि झाल्याशिवाय त्यांचे याप्रकारे येणे असंभव आहे. यांचे मधु पिणे आणि वन उजाडणे या वरूनही मला असेच प्रतीत होत आहे.'॥३५-३६ १/२॥
ततः किलकिलाशब्दं शुश्रावासन्नमम्बरे ॥ ३७ ॥

हनुमत्कर्मदृप्तानां नर्दतां काननौकसाम् ।
किष्किन्धामुपयातानां सिद्धिं कथयतामिव ॥ ३८ ॥
सुग्रीव याप्रमाणे सांगत असतांनाच त्यांना आकाशान्तून अगदी जवळून वानरांचा किलकिला शब्द ऐकू आला. हनुमानाच्या पराक्रमासंबधी गर्व करीत किष्किन्धेच्या जवळ येऊन गर्जना करणारे ते वनावासी वानर जणु कार्यसिद्धिची सूचना देत होते.॥३७-३८॥
ततः श्रुत्वा निनादं तं कपीनां कपिसत्तमः ।
आयताञ्चितलाङ्‌गूलः सोऽभवद्धृष्टमानसः ॥ ३९ ॥
त्या वानरांचा हा सिंहनाद ऐकून कपिश्रेष्ठ सुग्रीवाचे हृदय हर्षाने उचंबळून आले. त्याने आपले पुच्छ लांब आणि उंच केले.॥३९॥
आजग्मुस्तेऽपि हरयो रामदर्शनकांक्षिणः ।
अङ्‌गदं पुरतः कृत्वा हनूमन्तं च वानरम् ॥ ४० ॥
इतक्यातच श्रीरामचन्द्रांच्या दर्शनाच्या इच्छेने अंगद आणि वानरवीर हनुमानास पुढे करून ते सर्व वानर तेथे येऊन पोहोंचले. ॥४०॥
तेऽङ्‌गदप्रमुखा वीराः प्रहृष्टाश्च मुदाऽन्विताः ।
निपेतुर्हरिराजस्य समीपे राघवस्य च ॥ ४१ ॥
ते अंगद आदि वीर आनन्द आणि उत्साहयुक्त होऊन वानरराज सुग्रीव आणि राघवाच्या समीप आकाशातून खाली उतरले.॥४१॥
हनुमांश्च महाबाहुः प्रणम्य शिरसा ततः ।
नियतामक्षतां देवीं राघवाय न्यवेदयत् ॥ ४२ ॥
महाबाहु हनुमानाने राघवाच्या चरणांवर मस्तक ठेवून प्रणाम केला आणि त्यांना असे सांगितले की 'देवी सीता पातिव्रत्याच्या कठोर नियमांचे पालन करीत असून शरीराने सकुशल आहे.'॥४२॥
दृष्ट्‍वा देवीति हनुमद्वदनादमृतोपमम् ।
आकर्ण्य वचनं रामो हर्षमाप सलक्ष्मणः ॥ ४३ ॥
'मी देवी सीतेचे दर्शन केले आहे,' हनुमानाच्या मुखातील हे अमृताप्रमाणे मधुर वचन ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामास अत्यन्त प्रसन्नता वाटली.॥४३॥
निश्चितार्थं ततस्तस्मिन् सुग्रीवः पवनात्मजे ।
लक्ष्मणः प्रीतिमान् प्रीतं बहुमानादवैक्षत ॥ ४४ ॥
पवनपुत्र हनुमानाविषयी सुग्रीवाने प्रथमपासूनच निश्चय केलेला होता की त्याच्या द्वारेच कार्य सिद्ध झालेले आहे. म्हणून प्रसन्न झालेल्या लक्ष्मणाने प्रेमाने अत्यन्त आदराने सुग्रीवाकडे पाहिले. ॥४४॥
प्रीत्या च परयोपेतो राघवः परवीरहा ।
बहुमानेन महता हनुमन्तमवैक्षत ॥ ४५ ॥
शत्रूवीरांचा संहार करणार्‍या राघवाने परम प्रीतीने आणि महान सन्मानाने (आदराने) हनुमानाकडे पाहिले.॥४५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे चतुःषष्टितमः सर्गः ॥ ६४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा चौसष्टावा सर्ग पूरा झाला.॥६४॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP