[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ सप्तमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतालक्ष्मणसहितस्य श्रीरामस्य सुतीक्ष्णस्याश्रमं गत्वा तेन सह वार्तालापस्तेन च सत्कृतस्य तस्य तत्रैव रात्रौ निवासः -
सीता आणि भ्रात्यासहित श्रीरामांचे सुतीक्ष्णांच्या आश्रमात जाऊन त्यांच्याशी संभाषण करणे तसेच त्यांच्याकडून सत्कृत होऊन रात्री तेथेच थांबणे (मुक्काम करणे) -
रामस्तु सहितो भ्रात्रा सीतया च परंतपः ।
सुतीक्ष्णस्याश्रमपदं जगाम सह तैर्द्विजैः ॥ १ ॥
परंतप श्रीराम, लक्ष्मण, सीता तसेच त्या ब्राह्मणांसह सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमाकडे निघाले. ॥१॥
स गत्वा दूरमध्वानं नदीस्तीर्त्वा बहूदकाः ।
ददर्श विपुलं शैलं महामेघमिवोन्नतम् ॥ २ ॥
त्यांनी बर्‍याच दूर अंतरावरील मार्ग चालून अगाध जलांनी भरलेल्या बर्‍याच नद्यांना पार करून जेव्हा ते पुढे गेले तेव्हा त्यांना महान् मेरुगिरी प्रमाणे एक अत्यंत उंच पर्वत दिसला जो अत्यंत निर्मल होता. ॥२॥
ततस्तदिक्ष्वाकुवरौ सततं विविधैर्द्रुमैः ।
काननं तौ विविशतुः सीतया सह राघवौ ॥ ३ ॥
तेथून पुढे जाऊन ते दोन्ही इक्ष्वाकु कुळांतील श्रेष्ठ रघुवंशी बंधु सीतेसह नाना प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या एका वनात पोहोचले. ॥३॥
प्रविष्टस्तु वनं घोरं बहुपुष्पफलद्रुमम् ।
ददर्शाश्रममेकान्ते चीरमालापरिष्कृतम् ॥ ४ ॥
त्या घोर वनात प्रविष्ट होऊन श्रीरघुनाथांनी एकांत स्थानात एक आश्रम पाहिला, जेथील वृक्ष भरपूर फुलाफळानी लगडलेले होते. इकडे तिकडे टांगलेल्या चीर वस्त्रांचे समुदाय त्या आश्रमाची शोभा वाढवीत होते. ॥४॥
तत्र तापसमासीनं मलपङ्‌कजधारिणम् ।
रामः सुतीक्ष्णं विधिवत् तपोधनमभाषत ॥ ५ ॥
तेथे आंतरिक मलाच्या शुद्धिसाठी पद्मासन घालून सुतीक्ष्ण मुनि ध्यानमग्न होऊन बसलेले होते. श्रीरामांनी त्या तपोधन मुनिंच्या जवळ विधिवत जाऊन त्यांना यप्रकारे म्हटले - ॥५॥
रामोऽहमस्मि भगवन् भवन्तं द्रष्टुमागतः ।
तन्माभिवद धर्मज्ञ महर्षे सत्यविक्रम ॥ ६ ॥
’सत्यपराक्रमी धर्मज्ञ महर्षि ! भगवन् ! मी राम आहे आणि येथे आपले दर्शन करण्यासाठी आलो आहे. म्हणून आपण माझ्याशी संभाषण करावे.’ ॥६॥
स निरीक्ष्य ततो वीरं रामं धर्मभृतां वरम् ।
समाश्लिष्य च बाहुभ्यामिदं वचनमब्रवीत् ॥ ७ ॥
धर्मपालनांत श्रेष्ठ भगवान् श्रीरामांचे प्रत्यक्ष दर्शनाने आमंदीत झालेल्या महर्षि सुतीक्ष्णांनी आपल्या दोन्ही भुजा पसरून त्यांना आलिंगन देत म्हटले - ॥ ७ ॥
स्वागतं ते रघुश्रेष्ठ राम सत्यभृतां वर ।
आश्रमोऽयं त्वयाऽऽक्रान्तः सनाथ इव साम्प्रतम् ॥ ८ ॥
’धर्मात्म्यांच्या मध्ये श्रेष्ठ रघुश्रेष्ठ राम ! आपले स्वागत आहे. या समयी आपल्या पदापर्णाने हा आश्रम सनाथ झाला आहे. ॥८॥
प्रतीक्षमाणस्त्वामेव नारोहेऽहं महायशः ।
देवलोकमितो वीर देहं त्यक्त्वा महीतले ॥ ९ ॥
’महायशस्वी वीर ! मी आपल्या प्रतीक्षेतच होतो. म्हणूनच आजपर्यत या पृथ्वीवर आपल्या शरीराचा त्याग करून येथून देवलोकात (ब्रह्मधामात) मी गेलो नाही. ॥९॥
चित्रकूटमुपादाय राज्यभ्रष्टोऽसि मे श्रुतः ।
इहोपयातः काकुत्स्थ देवराजः शतक्रतुः । १० ॥
’मी ऐकले होते की आपण राज्यभ्रष्ट होऊन चित्रकूट पर्वतावर येऊन राहात आहात. काकुत्स्थ ! येथे शंभर यज्ञांचे अनुष्ठान करणारे देवराज इंद्र आले होते. ॥१०॥
उपागम्य च मे देवो महादेवः सुरेश्वरः ।
सर्वाँल्लोकाञ्जितानाह मम पुण्येन कर्मणा ॥ ११ ॥
’ते महान देवता देवेश्वर इंद्रदेव माझ्या जवळ येऊन म्हणत होते की ’तुम्ही आपल्या पुण्यकर्माच्या द्वारे समस्त शुभ लोकांवर विजय मिळविला आहे. ॥११॥
तेषु देवर्षिजुष्टेषु जितेषु तपसा मया ।
मत्प्रसादात् सभार्यस्त्वं विहरस्व सलक्ष्मणः ॥ १२ ॥
’त्यांच्या कथनानुसार मी तपस्येच्या द्वारे ज्या देवर्षि सेवित लोकांच्यावर अधिकार प्राप्त केला आहे, त्या लोकांमध्ये आपण सीता आणि लक्ष्मणासह विहार करावा. मी अत्यंन्त प्रसन्नतेने हे सर्व लोक आपल्या सेवेत समर्पित करीत आहे.’ ॥१२॥
तमुग्रतपसं दीप्तं महर्षिं सत्यवादिनम् ।
प्रत्युवाचात्मवान् रामो ब्रह्माणमिव वासवः ॥ १३ ॥
ज्याप्रमाणे इंद्र ब्रह्मदेवांशी भाषण करतात त्या प्रकारे मनस्वी श्रीरामांनी त्या उग्र तपस्या करणार्‍या तेजस्वी आणि सत्यवादी महर्षिंना याप्रकारे उत्तर दिले- ॥१३॥
अहमेवाहरिष्यामि स्वयं लोकान् महामुने ।
आवासं त्वहमिच्छामि प्रदिष्टमिह कानने ॥ १४ ॥
’महामुने ! ते लोक तर मी स्वतः आपल्याला मिळवून देईन. या समयी तर माझी ही इच्छा आहे की आपण मला हे सांगावे की मी या वनात स्वतःला राहाण्यासाठी कुठे कुटी बनवावी ? ॥१४॥
भवान् सर्वत्र कुशलः सर्वभूतहिते रतः ।
आख्यातं शरभङ्‌गेन गौतमेन महात्मना ॥ १५ ॥
’आपण सर्व प्राण्यांच्या हितामध्ये तत्पर तसेच इहलोक आणि परलोकातील सर्व गोष्टींच्या ज्ञानात निपुण आहात, ही तर गोष्ट मला गौतमगोत्रीय महात्मा शरभङ्‌गांने सांगितली होती. ॥१५॥
एवमुक्तस्तु रामेण महर्षिर्लोकर्विश्रुतः ।
अब्रवीन्मधुरं वाक्यं हर्षेण महता युतः ॥ १६ ॥
श्रीरामचंद्रांनी असे सांगितल्यावर त्या लोकविख्यात महर्षिंनी अत्यंत हर्षाने मधुर वाणीने म्हटले- ॥१६॥
अयमेवाश्रमो राम गुणवान् रम्यतामिति ।
ऋषिसङ्‌घानुचरितः सदा मूलफलैर्युतः ॥ १७ ॥
’श्रीरामा ! हाच आश्रम सर्व प्रकारे गुणवान (सुविधाजनक) आहे, म्हणून आपण येथेच सुखपूर्वक निवास करावा. येथे ऋषिंचा समुदाय सदा येत-जात असतो. आणि फले-मूले ही सर्वदा सुलभ असतात. ॥१७॥
इममाश्रममागम्य मृगसङ्‌घा महायशः ।
अहत्वा प्रतिगच्छन्ति लोभयित्वाकुतोभयाः ॥ १८ ॥
’या आश्रमात मोठमोठ्या मुनींचे समुदाय येतात आणि आपल्या रूप, कांति आणि गतिने मनाला मोहित करून कुणालाही कष्ट न देताच येथून परत जातात. त्यांना येथे कुणापासूनही कसलेही भय प्राप्त होत नाही. ॥१८॥
नान्यो दोषो भवेदत्र मृगेभ्योऽन्यत्र विद्धि वै ।
तच्छ्रुत्वा वचनं तस्य महर्षेर्लक्ष्मणाग्रजः ॥ १९ ॥

उवाच वचनं धीरो विकृह्य सशरं धनुः ।
’या आश्रमांत मृगांच्या उपद्रवाशिवाय आणखी कुठल्याही दोष नाही. हे आपण निश्चित रूपाने जाणून ध्यावे. महर्षिंचे हे वचन ऐकून लक्ष्मणांचे मोठे भाऊ धीर-वीर भगवान् श्रीरामांनी हातात धनुष्य बाण घेऊन म्हटले - ॥१९ १/२॥
तानहं सुमहाभाग मृगसंघान् समागतान् ॥ २० ॥

हन्यां निशितधारेण शरेणानतपर्वणा ।
भवांस्तत्राभिषज्येत किं स्यात् कृच्छ्रतरं ततः ॥ २१ ॥
’महाभाग ! येथे आलेल्या त्या उपद्रवकारी मृगसमूहांना जर मी झुकलेल्या गांठीचे आणि तीक्ष्ण धार असलेल्या बाणाने ठार मारले तर त्यात आपला अपमान होईल. जर असे झाले तर याहून अधिक कष्टाची गोष्ट माझ्यासाठी कुठली होऊ शकेल ? ॥२०-२१॥
एतस्मिन्नाश्रमे वासं चिरं तु न समर्थये ।
तमेवमुक्त्वोपरमं रामः संन्ध्यामुपागमत् ॥ २२ ॥
’म्हणून मी या आश्रमात अधिक काळ निवास करू इच्छित नाही.’ मुनिंना असे म्हणून मौन होऊन श्रीराम संध्योपासना करण्यासाठी निघून गेले. ॥२२॥
अन्वास्य पश्चिमां सन्ध्यां तत्र वासमकल्पयत् ।
सुतीक्ष्णस्याश्रमे रम्ये सीतया लक्ष्मणेन च ॥ २३ ॥
सायंकाळची संध्योपासना करून श्रीरामांनी सीता आणि लक्ष्मणासह सुतीक्ष्ण मुनींच्या रमणीय आश्रमांत निवास केला. ॥२३॥
ततः शुभं तापसयोग्यमन्नं
स्वयं सुतीक्ष्णः पुरुषर्षभाभ्याम् ।
ताभ्यां सुसत्कृत्य ददौ महात्मा
संध्यानिवृत्तौ रजनीं समीक्ष्य ॥ २४ ॥
संध्येचा समय निघून गेल्यावर रात्र झालेली पाहून महात्मा सुतीक्ष्णांनी स्वतःच तपस्वी जनांनी सेवन करण्यायोग्य शुभ अन्न घेऊन येऊन त्या दोन्ही पुरुष शिरोमणी बंधुंना मोठ्या सत्कारपूर्वक अर्पण केले. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्ष रामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा सातवा सर्ग पूरा झाला. ॥७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP