॥ श्रीमद्‌ अध्यात्मरामायण ॥


अपौरुषेय मानलेले वेद, त्यांतील कल्पनांचा गूढार्थ प्रकट करणारी ऋषिभाषितें किंवा त्यांतील सिद्धांत सूत्रावर आधारलेली आर्ष महाकाव्ये आणि आख्याने ह्या सर्वांनी भारतीय संस्कृतीला अनेक प्रकारे समृद्ध केले आहे. मानवी जीवन-व्यवहारांत दीपस्तंभाप्रमाणे हे लेखन मार्गदर्शक ठरले आहे. म्हणूनच आपल्या प्राचीन सांस्कृतिक त्रंथांच्या श्रेयनामावलींत श्रुति, स्मृति, पुराणें ह्यांच्याच प्रमाणे रामायण, ही महाकाव्येंही चमकून जातात. सांस्कृतिक दृष्ट्या उच्चतम आविष्कार असला तरी केवळ प्रज्ञावंतांनाच आश्वादक्षम असणारे सिद्धांत ग्रंथ हे आदरणीय ठरतात. पण ज्या सिद्धांत ग्रंथांचाच मूलाधार लाभलेले, आणि सामान्य मानवाला त्याचेंच चिअरित्र-चित्र आदर्शभूत बनून दाखविणारे कथास्वरूप ग्रंथ हे आदरमिश्रित लोकप्रियता मिळवून बसतात. आज जनमानसांत रामायण, महाभारत ह्यांना लाभलेले स्थान हे लोकप्रियतेच्या कक्षेंतले पण आदराचे आहे ते ह्यामुळेंच होय. ह्या ग्रंथांतील व्यक्तिचरित्रे म्हणजे आदर आणि लोकप्रियता लाभलेली महान् आदर्श चरित्रें आहेत.

महर्षि वाल्मीकिंनी आपल्या दिव्य प्रतिभेने ’श्रीरामायणा’च्या रूपाने जे श्रीरामचरित्र शब्दनिविष्ट केले, त्याला यच्चयावत् विद्वानांनी, कविवर्यांनी आणि व्यवहारज्ञांनी सतत उच्च श्रेणी प्रदान केली आहे. ह्या त्याच्या उच्च श्रेणीने जशी त्यासंबंधांत आदराची भावना निर्माण केली आहे. तशीच त्यांतील चरित्रनायकाच्या चित्रणानें, आदर्शभूत व्यक्तिदर्शन घडविल्याने, हे वाल्मीकि रामायण लोकांच्या मनांत स्वतःविषयी अपार प्रीतिभावना निर्माण करून बसले आहे. वाल्मीकींच्या रामकथेची लोकप्रियता आदरयुक्त आहे. म्हणूनच ह्या रामायणाच्या आद्य आविष्कारापासून तो आजमितिपर्यंत सतत श्रीरामकथेचा आश्रय करूनच भारतीयांनी आपल्यावरील संकटांतून मार्ग काढलेला दिसतो. भारतांत ज्या ज्या वेळी भयावह सामाजिक दुरावस्था प्रतीत झाली. त्या प्रत्येक वेळी भारतीयांनी राष्ट्रीय आणि सामाजिक पुनरुत्थानासाठी रामायणाचाच उपयोग करून घेतलेला आढळेल. अगदी प्राचीन काळातली गोष्ट सोडून अलीकडच्या काळांत डोकावले तरे हेंच दिसेल. उत्तर भारतांत जेव्हा अवश्यक्ता वाटली तेव्हा सामाजिक आदर्श म्हणून रामकथाच गोस्वामी तुलसीदासांनी लोकांपुढे ठेवली; महाराष्ट्रांत परकीय सत्तेच्या काळांत घडून येणारे अधःपतन पाहून एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणाचा प्रचंड प्रपंच केला. अलीकडे आदर्श असा समाजव्यवस्थेचे आणि आदर्श लोककल्याणकारी शासनाचे चित्र जनमानसासमोर उभे करताना ’रामराज्य’ हा एकच शब्द पुरेसा ठरतो. ह्या सर्वांचे उत्तर एवढेंच की अखेत माणलासा मानवतेचा म्हणून काही एक आदर्श समोर हवा आहे. तो मानवतेचा महान् आदर्श महर्षि वाल्मीकींच्या ’रामायणा’नें निर्माण केला आहे.

रामकथेच्या माहात्म्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मूळ वाल्मीकींच्या रामायणाचे माहात्म्य मान्य असलेल्या अनेकांनी आपापल्या परीने, आपापल्या भाषेत, ते मूळ रामायण रूपांतरीत स्वरूपांत आणले. कधी संपूर्णाचा संक्षेप करून तर कधी संपूर्णांतील एखादा भागच घेऊन, कोनी त्यंतील एकादें सूत्रच घेऊन, तर कोणी आपल्या मनावर झालेल्या परिणामाचे दिग्दर्शन करून, अशी आपली रूपांतरे सिद्ध केली. मूळ संस्कृत भाषेत असलेल्या वाल्मीकींच्या रामायणावर आधारून वरील दृष्टींनी संस्कृत भाषेतच काही रामायणे लिहिली गेली. त्यापैकीं श्रीमद्‌अध्यात्मरामायण ही मूळ वाल्मीकि रामायणाची अत्यंत सरस अशी संक्षिप्त आवृत्ति म्हणता येईल.

महर्षि वाल्मीकींच्या त्या रमणीय चरित्रकाव्याचा अधिनायक श्रीरामप्रभु म्हणजे परंधाम परमेशाचा अवतार होता. वाल्मीकींनी चैवी आणि मानवी अशा दोन्ही अंगंनी श्रीरामचरित्र सांगितले आहे. त्यामुळे श्रीरामाच्य आदर्श मानवी व्यवहाराने जसे काहींना आकर्षित केले, तसे काहींना त्यांतील दैवी सामर्थ्याचे कौतुक वाटले. ह्या कौतुकापोटी श्रीरामचरित्रकथा त्या अंगाने वाचतांना अशी काही स्थळे जाणवली कीं त्यांचे समर्थन कसे करावे हे समजेना. यांतून असा एक पर्याय पुढे आला की मूळ रामकथेला बाध न आणतां श्रीरामाच्या दैवी, आध्यात्मिक गुणविशेषांवर भर देऊन सर्व कथा नव्याने सांगावी. अर्थात् हे करताना वल्मीकींच्या रामायणाचा विस्तार कायम ठेवणें शक्यच नव्हते. त्यामुळे ह्या नव्या कृतींना संक्षेप आवश्यक ठरला. श्रीअध्यात्मरामायण ही अशीच एक संक्षिप्त, मूळ कथाभागाचा अपलाप न करतां आणि केवळ आध्यात्मिक दृष्टीने श्रीरामचरित्राचे अवलोकन करणारी कृति आहे.

वाल्मीकींच्या रामायणाची सात काण्डे आहेत तशीच श्रीअध्यात्मरामायणांचीही सात काण्डे आहेत. पण मूळ रामायणांतील सात कांडांत आलेल्या ६४७ सर्वांचा आणि सुमारे २४,००० श्लोकांचा संक्षेप करून तो कथाभाग केवळ ६५ सर्गांत सुमारे ४,३०० श्लोकांत निबद्ध केलेला श्रीअध्यात्मरामायणांत आढळतो. परंतु अध्यात्मरामायणाच्या अनाम कर्त्याने वाल्मीकींच्या रामायणाचे अत्यंत संक्षेपाने परिशीलन केल्याचे पुरावे मात्र ठायीं ठायीं दिसून येतात. त्यामुळे मूळ रामायणाला न्याय देते. केवळ फरक निर्देशित करायचाच म्हटला तर अध्यात्मरामायण हे श्रीराम हा श्रीमहाविष्णूचा वा नारायणाचा अवतार आहे ह्या कल्पनेवर विशेष भर देऊन लिहिले आहे असे म्हणता येईल.

श्रीअध्यात्मरामायण हा ग्रंथ ब्रह्माण्ड पुराणांतर्गत असल्याचा निर्देश प्रास्ताविकांतच येऊन जातो. शिवाय ह्या संपूर्ण ग्रंथाची मांडणी ही श्रीशिवपार्वतीच्या संवादांतून झालेली आहे, असेही ग्रंथात म्हटल्याचे आढळते. ग्रंथकर्ता हा श्रीरामप्रभु हे दैवी अंशाचे मानुषीकरण झालेल्या रूपांत वावरत असल्याचे दाखवितो, तरी पण लोकव्यवहार आणि अंतर्यामीची जाणीव ह्यांतला विसंवाद मधून मधून सूचित करण्याचे धोरण मात्र तो कटाक्षाने पाळतो.

’श्रीअध्यात्मनारायण’ ह्या ग्रंथाच्या कर्त्याने श्रीरामप्रभूंच्या आध्यात्मिक श्रेष्ठतेचे सूत्र मान्य केल्यामुळे मूळ कथेंतील जे प्रसंग त्याच्या दृष्टीने श्रीरामप्रभूंच्या श्रेष्ठतेला बाध आणणारे असतील त्यांत कांही बदल करणे अपरिहार्य ठरणारे होते. परंतु ह्या ग्रंथाची आणि ग्रंथकर्त्याची थोरवी हीच की एकाच महत्त्वाच्या बदलाने त्याने आपले सूत्र विनासायास लांबवर नेले आहे. ते मध्येंच कोठे गुंत्यात पडत नाही की तुटत नाही. श्रीरामप्रभु हे व्हगवान् श्रीविष्णूंचा अवतार नामले तर पर्यायाने सीता ही श्रीलक्ष्मीचा अवतार ठरते. मग लंकाधीश राक्षसराज रावण हा सीतेला पळवून नेतो आणि सीतापति राम शोकविव्हल होतात हा भाग कांहीसा मनाला गोंधळांत टाकणारा ठरतो. म्हणून अध्यात्मरामायणकर्त्याने मायासीतेची कल्पना मांडली. सुवर्णमृगाच्या कपटाकारस्थानाची ओळख ठेऊन, स्वतः श्रीरामप्रभूच सीतासतीला अग्नीत प्रवेश करून राहण्याची कल्पना सांगतात आणि त्याचवेळी, पुढील कार्याच्या सिद्धीसाठी, मायासीता निर्माण करून मागे ठेवण्याची सूचनाही करतात. यामुळे एक महत्त्वाचे श्रेय ग्रंथकर्त्याला गवसले आहे ते हे कीं, रावणाने सीताहरण करून नेली एथपासून तो रावणवधानंतर येणार्‍या सीताशुद्धीच्या प्रसंगापर्यंत मूळ सीता विशुद्ध स्वरूपांत अग्नीमध्ये अबाधित राहते आणि लौकिकांत सारा गोंधळ होतो तो मायासीतेच्या निमित्ताने होतो. अर्थात् ही मूळ कथेला दिलेली डूब शोभून दिसावी म्हणून अगदी आरंभापासून अखेरपर्यंत श्रीराम हे अयोध्येचे राजपुत्र, युवराज आणि राजे अशा सर्व अवस्थांत विविध व्यक्तींना जेव्हा भेटतात तेव्हा प्रसंग साधून श्रीराम हे परमात्माच होत हे विविध व्यक्तींकडून वदविण्याची दक्षता ह्या ग्रंथकर्त्याने बाळगली आहे.

श्रीराम हे परंधाम परमेशाचे अवतार असे जे त्यांचे चित्र ह्या अध्यात्मरामायणकाराने प्रस्तुत ग्रंथांत शब्दांकित केले आहे; त्याचाच पर्यवसायी भाग म्हणजे विविध व्यक्तींकडून त्या परमात्मतत्त्वाविषयी व्यक्त झालेले विचार होत. हे विचार स्वाभाविकपणे तात्त्विक स्वरूपाचेच आहेत. वेदान्त-विचाराला जवळचे असे हे विचार प्रसंगोपात पण वारंवार प्रकट होत गेल्यामुळे अध्यात्मरामायणाच्या वाचकाची मनोभूमिका एका विशिष्ट प्रकारे घडविण्याचे कार्य सहजपणें साध्य होते. ह्या मनाच्या भूमिकेचा चतुरपणे उपयोग करून घेण्याचे कौशल्यही ग्रंथकर्त्याने प्रकट केले आहे. उदाहरणार्थ एक प्रसंग उल्लेखिणें सहज शक्य आहे.

मारुति सागरोड्डाण करून जाण्यापूर्वी, सागरतीरांवर वानश्रेष्ठांची आणि संपाति नामक गृध्राची भेट होते, या मूलचाच प्रसंग आहे. ह्यावेळी संपाति आपले पूर्ववृत्तकथ करतो. त्या कथनांत ज्या ऋषींचा उल्लेख आला आहे ते ऋषि संपातीला जो उपदेश करतात, त्या उपदेशांत परमात्मतत्त्वापासून जीवोत्पत्तीच्या अवस्थेपर्यंतचा तात्त्विक भाग कथन करतात. देहधारी जीवाच्या जन्माचे रहस्य येथे कथन केले हाते. त्यामागे जीव-शिव, पिण्ड-ब्रह्माण्ड. परमात्मा-जीवात्मा अशा संबंधांचे तात्त्विक स्वरूप विशद करणे, कर्माधिष्टित जन्माचे रहस्य उलगडून दाखविणे, असा हेतु असल्याचे स्पष्ट जाणवते. हा भाग काही मुळांतला नव्हे. परंतु आध्यात्मिक जाणिवेच्या वाचकाच्या ठायी परिपोष करण्याची संधि म्हणून अध्यार्मरामायणकाराने तो विशिष्ट पद्धतीने या ठिकाणी आणला आहे.

याच प्रकारे विविध ऋषींनी, मुनींनी, भक्तांनी तसेच स्वर्गीय देवतांनी प्रसंगोपात नामावराताचे आध्यात्मिक स्वरूप प्रकट केलेले ह्या ग्रंथात दाखविले आहे. प्रसंगावशात् ज्या ज्या व्यक्ति श्रीरामस्तुति करतात. त्या सर्व व्यक्ति श्रीराम म्हणजे साक्षात् परमात्माच होय असे सांगतात. एवढेंच नव्हे तर राक्षसकुलांतील सर्व प्रमुख राक्षसही रामा हा साक्षात् नारायण आहे आणि सीता ही योगमाया आहे, ही जाणीव प्रकट करूनच रामाला विरोध करतात हे विशेष लक्षणीय आहे. अशा प्रकारे एक विशिष्ट दृष्टि स्वीकारून अध्यात्मरामायणाची रचना झाली आहे. यांतून मग काही नाट्यमय, काव्यमय असे प्रसंगही येऊन जातात. रामायणांतला विशेष महत्त्वाचा प्रसंग म्हणजे सीताहरणाचा प्रसंग होय. मायासीता निर्माण करून सुवर्णमृगाच्या मागे गेलेला राम जेव्हा मृगाचा वध करून परत येणार असतो, त्यावेळी असाच एक नाट्यपूर्ण प्रसंग प्रस्तुत ग्रंथकर्त्याने सांगितला आहे. राम परत येत असतांनाच वाटेत त्याच्या दिशेनेंच यणार्‍या लक्ष्मणाकडे त्याची दृष्टि जात. लक्ष्मण कां येत आहे आणि पुढें काय होणार याची आपल्याला पूर्ण जाणीव असल्याचे राम स्वतःशीच बोलतो. पण असेंही म्हणतो की, लक्षणाला मायासीता किंवा इतर वोष्टींची जाणीव देण्यापेक्षां मी पुढील कार्याच्या सिद्धीसाठी सामान्य मनुष्याप्रमाणे शोक करून दाखविला पाहिजे. ह्या ठिकाणी मूळ कथाभागाचा यत्किंचितही अपलाप न करतां रामाच्या परमात्मस्वरूपाचें भान ठेवण्याची वाचकांना दिलेली ही सुप्त सूचना ग्रंथकर्त्याने नाट्यमय पद्धतीने आविष्कृत केली आहे.

अध्यात्मरामायणाचे हे जे एका विशिष्ठ दृष्टीने लेखन झाले आहे त्याचा अनेकांच्या मनावर चांगला परिणाम आणि संस्कार घडला आहे. आता एक गोष्ट निर्देशित करणे आवश्य आहे ती ही की, भारतीय प्राचीन वाङ्‌मयांत निबद्ध झालेल्या ज्या संस्कृत भाषेंतील श्रीरामकथा आहेत, जसे आनंदरामायण, मंत्ररामायण इ. त्यांमध्ये अध्यात्मरामायण हे मान्यतेच्या दृष्टीने अग्रेसर आहे. संस्कृतोत्तर ज्या अन्य भारतीय भाषा विकसित झाल्या आणि ज्यांत श्रीरामकथा लिहिली गेली, त्या सर्वांनी अध्यात्मरामायणाचे ऋण निःसंकोच मान्य केले आहे. त्यामुळे अध्यात्मरामायणाला एक महत्त्वाचा आणि विश्वसनीय ग्रंथ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.

ज्यांना ग्रांथिक दृष्टिकोण न बाळगतां केवळ श्रीरामाची उपासना करण्याची प्रवृत्ति होईल, त्यांनाही प्रस्तुत अध्यात्मरामायणाने आकर्षित केले आहे. अध्यात्मरामायणाच्या प्रास्ताविकांत ’माहात्म्यकथना’चा भाग येऊन जातो, तसाच ह्या ग्रंथाच्या वाचनाने, पठणाने, लेखनाने सुधां कोणती फलनिष्पत्ति होते त्याचा निर्देशही वाचावयास मिळतो. रामभक्तांना ’रामहृदया’च्या वाचनाने फार मोठा धीर यावा. तसेच भगवद्‌गीतेप्रमाणेंच रामोपासकांमध्ये सर्वमान्य आणि सर्वप्रिय झालेली ’रामगीता’ हीही ह्या ग्रंथाचे एक लक्षणीय अंग मानता येईल. या सर्वांमुळे श्रीमद्‌अध्यात्मरामायण हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरला आहे.

[श्री म. वि. गोखले संपादित ’सार्थ अध्यात्मरामायण’ यांची प्रस्तावना]



GO TOP