सीतावधं श्रुत्वा शोकेन श्रीरामस्य मूर्छा तमाश्वासयतो लक्ष्मणस्य पौरुषार्थमुद्यमश्च -
|
सीता मारली गेल्याची ऐकून श्रीरामांचे शोकाने मूर्छित होणे आणि लक्ष्मणांचे त्यांना समजावित पुरूषार्थासाठी उद्यत होणे -
|
राघवश्चापि विपुलं तं राक्षसवनौकसाम् । श्रुत्वा सङ्ग्रामनिर्घोषं जाम्बवन्तमुवाच ह ॥ १ ॥
|
राघवांनीही राक्षस आणि वानरांचा तो महान् युद्धघोष ऐकून जांबवानास म्हटले - ॥१॥
|
सौम्य नूनं हनुमता क्रियते कर्म दुष्करम् । श्रूयते हि यथा भीमः सुमहानायुधस्वनः ॥ २ ॥
|
सौम्य ! निश्चितच हनुमानांनी अत्यंत दुष्कर कर्म आरंभले आहे, कारण की त्यांच्या आयुधांचा हा महाभयंकर शब्द स्पष्ट ऐकू येत आहे. ॥२॥
|
तद्गच्छ कुरु साहाय्यं स्वबलेनाभिसंवृतः । क्षिप्रमृक्षपते तस्य कपिश्रेष्ठस्य युध्यतः ॥ ३ ॥
|
म्हणून ऋक्षराज ! तुम्ही आपल्या सेनेसह शीघ्र जा आणि झुंजत असणार्या कपिश्रेष्ठ हनुमानाची सहायता करा. ॥३॥
|
ऋक्षाराजस्तथेक्तस्तु स्वेनानीकेन संवृतः । आगच्छत् पश्चिमं द्वारं हनुमान् यत्र वानरः ॥ ४ ॥
|
तेव्हां ’फार चांगले’ असे म्हणून आपल्या सेनेने घेरलेले ऋक्षराज जांबवान् लंकेच्या पश्चिम द्वारावर जेथे वानरवीर हनुमान विराजमान होते तेथे आले. ॥४॥
|
अथायान्तं हनूमन्तं ददर्शर्क्षपतिस्तदा । वानरैः कृतसङ्ग्रामैः श्वसद्भिमरभिसंवृतम् ॥ ५ ॥
|
तेथे ऋक्षराजाने युद्धापासून परत येणार्या आणि दीर्घश्वास घेणार्या वानरांसह हनुमानास येतांना पाहिले. ॥५॥
|
दृष्ट्वा पथि हनूमांश्च तदृक्षबलमुद्यतम् । नीलमेघनिभं भीमं सन्निवार्य न्यवर्तत ॥ ६ ॥
|
हनुमानांनीही मार्गात नील मेघासमान भयंकर ऋक्षसेनेला युद्धासाठी उद्यत पाहून तिला रोखून धरले आणि ते सर्वांसह परत आले. ॥६॥
|
स तेन सह सैन्येन सन्निकर्षं महायशाः । शीघ्रमागम्य रामाय दुःखितो वाक्यमब्रवीत् ॥ ७ ॥
|
महायशस्वी हनुमान त्या सेनेसह शीघ्र भगवान् श्रीरामांच्या निकट आले आणि दुःखी होऊन बोलले - ॥७॥
|
समरे युद्ध्यमानानां अस्माकं प्रेक्षतां पुरः । जघान रुदतीं सीतां इन्द्रिजिद् रावणात्मजः ॥ ८ ॥
|
प्रभो ! आम्ही लोक युद्ध करण्यात गुंतलो होतो त्याच वेळी समरभूमी मध्ये रावणपुत्र इंद्रजिताने आमच्या डोळ्यादेखत रडत असणार्या सीतेला मारून टाकले आहे. ॥८॥
|
उद्भ्रान्तचित्तस्तां दृष्ट्वा विषण्णोऽहमरिन्दम । तदहं भवतो वृत्तं विज्ञापयितुमागतः ॥ ९ ॥
|
शत्रुदमन ! त्यांना त्या अवस्थेत पाहून माझे चित्त उद्भ्रांत झाले आहे. मी विषादात बुडून गेलो आहे म्हणून मी आपल्याला हा समाचार सांगण्यासाठी आलो आहे. ॥९॥
|
तस्य तद् वचनं श्रुत्वा राघवः शोकमूर्च्छितः । निपपात तदा भूमौ छिन्नमूल इव द्रुमः ॥ १० ॥
|
हनुमानाचे ते वचन ऐकून त्यासमयी राघव शोकाने मूर्च्छित होऊन मूळापासून तोडून टाकलेल्या वृक्षाप्रमाणे तात्काळ पृथ्वीवर कोसळून पडले. ॥१०॥
|
तं भूमौ देवसङ्काशं पतितं दृश्य राघवम् । अभिपेतुः समुत्पत्य सर्वतः कपिसत्तमाः ॥ ११ ॥
|
देवतुल्य तेजस्वी राघव भूमीवर पडलेले पाहून समस्त श्रेष्ठ वानर सर्व बाजुनी उड्या मारून तेथे येऊन पोहोचले. ॥११॥
|
असिञ्चन् सलिलैश्चैनं पद्मोत्पलसुगन्धिभिः । प्रदहन्तमसंहार्थं सहसाऽग्निमिवोत्थितम् ॥ १२ ॥
|
ते कमले आणि उत्पले यांच्या सुगंधाने युक्त जल आणून त्यांच्यावर शिंपडू लागले. त्यासमयी एकाएकी प्रज्वलित होऊन दहनकर्म करणार्या आणि विझवता येणे शक्य नसलेल्या अग्निसमान दिसून येत होते. ॥१२॥
|
तं लक्ष्मणोऽथ बाहुभ्यां परिष्वज्य सुदुःखितः । उवाच राममस्वस्थं वाक्यं हेत्वर्थसंयुतम् ॥ १३ ॥
|
भावाची ही अवस्था पाहून लक्ष्मणास अत्यंत दुःख झाले. त्यांनी त्यांना आपल्या दोन्ही भुजांमध्ये घेतले आणि बसले आणि अस्वस्थ झालेल्या श्रीरामांना याप्रमाणे युक्तियुक्त आणि प्रयोजनपूर्ण वाक्ये बोलू लागले - ॥१३॥
|
शुभे वर्त्मनि तिष्ठन्तं त्वामार्य विजितेन्द्रियम् । अनर्थेभ्यो न शक्नोति त्रातुं धर्मो निरर्थकः ॥ १४ ॥
|
आर्य ! आपण सदा शुभ मार्गावर स्थिर राहाणारे आणि जितेन्द्रिय आहात, तथापि धर्म आपल्याला अनर्थापासून वाचवू शकत नाही आहे म्हणून तो निरर्थक आहे असेच वाटते आहे. ॥१४॥
|
भूतानां स्थावराणां च जङ्गमानां च दर्शनम् । यथाऽस्ति न तथा धर्मः तेन नास्तीति मे मतिः ॥ १५ ॥
|
स्थावर तसेच पशु आदि जंगम प्राण्यांनाही सुखाचा प्रत्यक्ष अनुभव येतो, परंतु त्यांच्या सुखामध्ये धर्म कारण (कारण त्यांच्यात धर्माचरणाची शक्ति ही नाही आणि त्यांना धर्मामध्ये काही अधिकारही नाही) म्हणून धर्म सुखाचे साधन नाही असा माझा विचार आहे. ॥१५॥
|
यथैव स्थावरं व्यक्तं जङ्गमं च तथाविधम् । नायमर्थस्तथा युक्तः त्वद्विधो न विपद्यते ॥ १६ ॥
|
जसे स्थावर भूत धर्माधिकारी नसूनही सुखी दिसून येतात, त्याच प्रकारे जङ्गम प्राणी (पशु आदि) ही सुखी आहेत, ही गोष्ट स्पष्टच समजून येत आहे. जर असे म्हटले की जेथे धर्म आहे तेथेच सुख अवश्य आहे तर असेही म्हणता येत नाही, कारण की अशा स्थितीत आपल्या सारख्या धर्मात्मा पुरूष विपत्तित पडता कामा नये. ॥१६॥
|
यदि अधर्मो भवेद्भूंतो रावणो नरकं व्रजेत् । भवांश्च धर्मसंयुक्तो नैवं व्यसनमाप्नुयात् ॥ १७ ॥
|
जर अधर्माची ही सत्ता असती अर्थात अधर्म अवश्यच दुःखाचे साधन असता तर मग रावण तर नरकातच पडून राहिला पाहिजे होता आणि आपल्या सारख्या धर्मात्मा पुरूषावर संकट यावयास नको होते. ॥१७॥
|
तस्य च व्यसनाभावाद् व्यसनं चागते त्वयि । धर्मो भवत्यधर्मश्च परस्परविरोधिनौ ॥ १८ ॥
|
रावणावर तर काही संकट नाही आणि आपण संकटात पडला आहात, म्हणून धर्म आणि अधर्म दोन्ही परस्पर विरोधी झाले आहेत - धर्मात्म्याला दुःख आणि पापात्म्याला सुख मिळू लागले आहे. ॥१८॥
|
धर्मेणोपलभेद् धर्मं अधर्मं चाप्यधर्मतः । यदि अधर्मेण युज्येयुः येषु अधर्मः प्रतिष्ठितः ॥ १९ ॥
न धर्मेण वियुज्येरन् नाध्र्मो रुचयो जनाः । धर्मेणाचरतां चैषां तथा धर्मफलं भवेत् ॥ २० ॥
|
जर धर्माने धर्माचे फळ (सुख) आणि अधर्माने अधर्माचे फळ मिळण्याचा नियम असता तर ज्या रावणादि मध्ये अधर्मच प्रतिष्ठित आहे, ते अधर्माच्या फलभूत दुःखानी युक्त झाले असते आणि जे अधर्मात रूचि ठेवत नाहीत, ते धर्मापासून- धर्माच्या फलभूत सुखापासून कधी वंचित झाले नसते. धर्ममार्गाने चालणार्या या धर्मात्मा पुरूषांना केवळ धर्माचे फल-सुखच प्राप्त झाले असते. ॥१९-२०॥
|
यस्मादर्था विवर्धन्ते येष्वधर्मः प्रतिष्ठितः । क्लिश्यन्ते धर्मशीलाश्च तस्मादेतौ निरर्थकौ ॥ २१ ॥
|
परंतु ज्यांच्या ठिकाणी अधर्म प्रतिष्ठित आहे, त्यांचे तर धन वाढत आहे आणि जो स्वभावतःच धर्माचरण करणारे आहेत, ते क्लेशात पडलेले आहेत, म्हणून हे धर्म आणि अधर्म - दोन्ही निरर्थक आहेत. ॥२१॥
|
वध्यन्ते पापकर्माणो यद्यधर्मेण राघव । वधकर्म हतोऽधर्मः स हतः कं वधिष्यति ॥ २२ ॥
|
राघवा ! जर पापाचारी पुरूष धर्म अथवा अधर्माने मारले जात आहेत तर धर्म अथवा अधर्म क्रियारूप असल्यामुळे (आदि, मध्य आणि अंती) तीनच क्षणांपर्यंत राहू शकतो. चौथ्या क्षणी तर तो स्वतःच नष्ट होऊन जाईल, मग नष्ट झालेला तो धर्म अथवा अधर्म कुणाचा वध करेल ? ॥२२॥
|
अथवा विहितेनायं हन्यते हन्ति चापरम् । विधिः स लिप्यते तेन न स पापेन कर्मणा ॥ २३ ॥
|
किंवा हा जीव जर विधिपूर्वक केल्या गेलेल्या कर्मविशेषांद्वारे मारला जातो किंवा स्वतः तसं कर्म करून दुसर्याला मारतो, तर विधीलाच हत्येसाठी दोषी ठरविले पाहिजे. कर्माचं अनुष्ठान करणार्या पुरुषाचा त्या पपकर्माशी संबंध असता कामा नये. ॥ २३ ॥
|
अदृष्टप्रतिकारेण अव्यक्तेनासता सता । कथं शक्यं परं प्राप्तुं धर्मेणारिविकर्षण ॥ २४ ॥
|
शत्रुदमन ! जो चेतन नसल्यमुळे प्रतीकार ज्ञानशून्य आहे, अव्यक्त आहे, असत् समान विद्यमान आहे त्या धर्माच्या द्वारा दुसर्याला (पापात्म्याला) वध्यरूपाने प्राप्त करणे कसे संभव आहे ? ॥२४॥
|
यदि सत् स्यात् सतां मुख्य नासत् स्यात् तव किञ्चन । त्वया यदीदृशं प्राप्तं तस्मात् तन्नोपपद्यते ॥ २५ ॥
|
सत्पुरूषांमध्ये श्रेष्ठ रघुवीरा ! जर सत्कर्मजनित अदृष्ट सत् अथवा शुभच असते तर आपल्याला काहीही अशुभ अथवा सुःख प्राप्त झाले नसते. जर आपल्याला असे दुःख प्राप्त झाले आहे तर सत्कर्मजनित अदृष्ट सत्च आहे, या कथनाची संगति नीट लागत नाही. ॥२५॥
|
अथवा दुर्बलः क्लीबो बलं धर्मोऽनुवर्तते । दुर्बलो हृतमर्यादो न सेव्य इति मे मतिः ॥ २६ ॥
|
जर दुर्बळ आणि कातर (स्वतः कार्य साधण्यास असमर्थ) असल्याने धर्म पुरूषार्थाचे अनुसरण करतो, तेव्हा तर दुर्बळ आणि फलदानाच्या मर्यादारहित धर्माचे सेवनच करता कामा नये - हेच माझे स्पष्ट मत आहे. ॥२६॥
|
बलस्य यदि चेद् धर्मो गुणभूतः पराक्रमे । धर्ममुत्सृज्य वर्तस्व यथा धर्मे तथा बले ॥ २७ ॥
|
जर धर्म बळ अथवा पुरूषार्थाचे अंग अथवा उपकरण मात्र असेल तर धर्म सोडून पराक्रमपूर्ण वर्तन करावे ज्याप्रमाणे आपण धर्माला मुख्य मानून धर्मात लागून राहिला आहात त्याप्रकारे बलाला प्रधान मानून बल अथवा पुरूषार्थामध्येच प्रवृत्त व्हावे. ॥२७॥
|
अथ चेत् सत्यवचनं धर्मः किल परन्तप । अनृतं त्वय्यकरणे किं न बद्धस्त्वया विना ॥ २८ ॥
|
शत्रूंना संताप देणार्या रघुनंदना ! जर आपण सत्यभाषणरूप धर्माचे पालन करत आहात अर्थात पित्याच्या आज्ञेचा स्वीकार करून त्यांच्या सत्याचे रक्षणरूप धर्माचे अनुष्ठान करत आहात तर आपल्याला ज्येष्ठ पुत्राच्या प्रति युवराज पदावर अभिषिक्त करण्याची जी गोष्ट पित्याने सांगितली होती, त्या सत्याचे पालन न केल्याने पित्याला जो असत्यरूप अधर्म प्राप्त झाला, त्यामुळेच आपल्यापासून वियुक्त होऊन मरून गेले. अशा स्थितिमध्ये काय आपण राजांनी प्रथम सांगितलेल्या अभिषेकसंबंधी सत्य वचनाने बद्ध नव्हतात (जर आपण पित्याने प्रथम सांगितलेल्या वचनाचेच पालन करून युवराज पदावर आपला अभिषेक करवून घेतला असता तर पित्याचा मृत्युही झाला नसता आणि सीताहरणादि अनर्थ ही संघटित झाले नसते.) ॥२८॥
|
यदि धर्मो भवेद् भूत अधर्मो वा परन्तप । न स्म हत्वा मुनिं वज्री कुर्यादिज्यां शतक्रतुः ॥ २९ ॥
|
शत्रुदमन महाराज ! जर केवळ धर्म अथवा अधर्मच प्रधानरूपाने अनुष्ठान योग्य असता तर वज्रधारी इंद्रानी पौरूषद्वारा विश्वरूप मुनीची हत्या (अधर्म) करून नंतर यज्ञाचे (धर्माचे) अनुष्ठान केले नसते. ॥२९॥
|
अधर्मसंश्रितो धर्मो विनाशयति राघव । सर्वमेतद् यथाकामं काकुत्स्थ कुरुते नरः ॥ ३० ॥
|
राघवा ! धर्मापासून भिन्न जो पुरूषार्थ आहे त्याच्याशी संलग्न असलेला धर्मच शत्रूंचा नाश करतो. म्हणून काकुत्स्थ ! प्रत्येक मनुष्य आवश्यकता तसेच रूचिस अनुसरून या सर्वांचे (धर्म तसेच पुरूषार्थाचे) अनुष्ठान करत असतो. ॥३०॥
|
मम चेदं मतं तात धर्मोऽयमिति राघव । धर्ममूलं त्वया छिन्नं राज्यमुत्सृजता तदा ॥ ३१ ॥
|
तात राघव ! याप्रकारे समयानुसार धर्म तसेच पुरूषार्थ यांतून कुणा एकाचा आश्रय घेणे धर्मच आहे असे माझे मत आहे. आपण त्या दिवशी राज्याचा त्याग करून धर्माच्या मूलभूत अर्थाचा उच्छेद केला आहे. ॥३१॥
|
अर्थेभ्यो हि विवृद्धेभ्यः संवृत्तेभ्यस्ततस्ततः । क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः ॥ ३२ ॥
|
जसे पर्वतांतून नद्या निघतात, त्याच तर्हेने जिथून तिथून संग्रह करून आणलेल्या आणि वाढलेल्या अर्थाने सर्व क्रिया ( त्या योग प्रधान असोत अथवा भोगप्रधान) संपन्न होत असतात. (निष्कामभाव असेल तर सर्व क्रिया योगप्रधान होऊन जातात आणि सकाम भाव असेल तर भोगप्रधान होतात.) ॥३२॥
|
अर्थेन हि विमुक्तस्य पुरुषस्याल्पतेजसः । व्युच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितो यथा ॥ ३३ ॥
|
ग्रीष्म ऋतूत लहान लहान नद्या सुकून जातात त्याप्रमाणे जो मानव मंदबुद्धि असल्याने अर्थापासून वंचित असतो त्याच्या सार्या क्रिया छिन्नभिन्न होऊन जातात. ॥३३॥
|
सोऽयमर्थं परित्यज्य सुखकामः सुखैधितः । पापमारभते कर्तुं ततो दोषः प्रवर्तते ॥ ३४ ॥
|
जो पुरूष सुखात वाढलेला असतो तो जर प्राप्त झालेल्या अर्थाचा त्याग करून सुखाची इच्छा करील तर तो त्या अभीष्ट सुखासाठी अन्यायपूर्वक अर्थोपार्जन करण्यास प्रवृत्त होतो म्हणून त्याला ताडन, बंधन आदि दोष प्राप्त होतात. ॥३४॥
|
यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तस्य बान्धवाः । यस्यार्थाः स पुमान् लोके यस्यार्थाः स च पण्डितः ॥ ३५ ॥
|
ज्याच्यापाशी धन आहे त्याचे अधिक मित्र असतात. ज्याच्यापाशी धनाचा संग्रह आहे त्याचे सर्व लोक बंधु-बांधव बनतात. ज्याच्या जवळ पर्याप्त धन आहे तोच संसारात श्रेष्ठ पुरूष म्हटला जातो आणि ज्याच्याजवळ धन आहे तोच विद्वान समजला जातो. ॥३५॥
|
यस्यार्थाः स च विक्रान्तो यस्यार्थाः स च बुद्धिमान् । यस्यार्थाः स महाभागो यस्यार्थाः स गुणाधिकः ॥ ३६ ॥
|
ज्याच्या जवळ धनराशी एकत्र आहे तो पराक्रमी समजला जातो. ज्याच्या जवळ धनाची अधिकता आहे तो बुद्धिमान् मानला जातो, ज्याच्या घरी अर्थसंग्रह आहे तो महान् भाग्यशाली म्हटला जातो तसेच ज्याच्या येथे धनसंपत्ति आहे तो गुणांमध्ये ही वरचढ समजला जातो. ॥३६॥
|
अर्थस्यैते परित्यागे दोषाः प्रव्याहृता मया । राज्यमुत्सृजता धीर येन बुद्धिस्त्वया कृता ॥ ३७ ॥
|
अर्थाचा त्याग करण्याने जे मित्रांचा अभाव आदि दोष प्राप्त होतात त्यांचे मी स्पष्टरूपाने वर्णन केले आहे. आपण राज्य सोडते समयी कुठल्या लाभाचा विचार करून आपल्या बुद्धिमध्ये अर्थत्यागाचा भावनेला स्थान दिलेत हे मी जाणत नाही. ॥३७॥
|
यस्यार्था धर्मकामार्थाः तस्य सर्वं प्रदक्षिणम् । अधनेनार्थकामेन नार्थः शक्यो विचिन्वता ॥ ३८ ॥
|
ज्याच्या जवळ धन आहे त्याची धर्म आणि कामरूप सारी प्रयोजने सिद्ध होतात. त्याच्यासाठी सर्व काही अनुकूल बनून जाते. जो निर्धन आहे तो अर्थाची इच्छा ठेवून त्याचे अनुसंधान केल्यावरही पुरूषार्थाशिवाय त्यास प्राप्त करू शकत नाही. ॥३८॥
|
हर्षः कामश्च दर्पश्च धर्मः क्रोधः शमो दमः । अर्थादेतानि सर्वाणि प्रवर्तन्ते नराधिप ॥ ३९ ॥
|
नरेश्वर ! हर्ष, काम, क्रोध, शम आणि दम हे सर्व धन असेल तरच सफल होतात. ॥३९॥
|
येषां नश्यत्ययं लोकश्चरतां धर्मचारिणाम् । तेऽर्थास्त्वयि न दृश्यन्ते दुर्दिनेषु यथा ग्रहाः ॥ ४० ॥
|
जे धर्माचे आचरण करणारे आणि तपस्येत लागलेले आहेत, त्या पुरूषांचा हा लोक (ऐहिक पुरूषार्थ) अर्थाभावामुळेच नष्ट होऊन जातो, हे स्पष्ट दिसून येते. तोच अर्थ या दुर्दिनात आपल्याजवळ जसे आकाशात ढग जमल्यावर ग्रहांचे दर्शन होत नाही त्याप्रमाणे दिसून येत नाही. ॥४०॥
|
त्वयि प्रव्रजिते वीर गुरोश्च वचने स्थिते । रक्षसापहृता भार्या प्राणैः प्रियतरा तव ॥ ४१ ॥
|
वीरा ! आपण पूज्य पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी राज्य सोडून वनात निघून आलात आणि सत्याच्या पालनावरच ठाम राहिलात, परंतु राक्षसाने आपल्या पत्नीला, जी आपल्याला प्राणांहूनही प्रिय होती, हरून नेले. ॥४१॥
|
तदद्य विपुलं वीर दुःखमिन्द्रजिता कृतम् । कर्मणा व्यपनेष्यामि तस्मादुत्तिष्ठ राघव ॥ ४२ ॥
|
वीर राघवा ! आज इंद्रजिताने आम्हा लोकांना जे महान् दुःख दिले आहे, त्याला मी आपल्या पराक्रमाने दूर करीन म्हणून चिंता सोडून आपण उठावे. ॥४२॥
|
उत्तिष्ठ नरशार्दूल दीर्घबाहो धृतव्रत । किमात्मानं महात्मानं आत्मानं नावबुध्यसे ॥ ४३ ॥
|
नरश्रेष्ठा ! उत्तम व्रताचे पालन करणार्या महाबाहो ! (उठावे !) आपण परम बुद्धिमान् आणि परमात्मा आहात, या रूपात आपण आपल्याला का समजून घेत नाही ? ॥४३॥
|
अयमनघ तवोदितः प्रियार्थं जनकसुतानिधनं निरीक्ष्य रुष्टः । सहयगजरथां सराक्षसेन्द्रां भृशमिषुभिर्विनिपातयामि लङ्काम् ॥ ४४ ॥
|
निष्पाप रघुवीरा ! हे मी आपल्याला जे काही सांगितले आहे ते सर्व आपले प्रिय करण्यासाठी - आपले ध्यान शोकापासून हटवून पुरूषार्थाकडे आकृष्ट करण्यासाठी सांगितले आहे. आता जनकसुतेच्या मृत्युचा समाचार जाणून माझा रोष वाढलेला आहे म्हणून आज आपल्या बाणांच्या द्वारा हत्ती, घोडे, रथ आणि राक्षसांसहित सारी लंका मी धुळीत मिळवून टाकीन. ॥४४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्र्यशीतितमः सर्गः ॥ ८३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा त्र्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८३॥
|