॥ श्रीरामविजय ॥
॥ अध्याय तेविसावा ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दुर्धर अहंकार दशानन ॥ अहंदेहबुद्धि लंका गहन ॥ तेथे वास्तव्य अनुदिन ॥ क्रोध कुंभकर्ण बंधु सखा ॥१॥ अनर्थकारक काम इंद्रजित ॥ मद हा मुख्य प्रधान प्रहस्त ॥ मत्सर दंभ ते निश्चित ॥ देवांतक नरांतक पैं ॥२॥ शोक मोह आणि अनर्थ ॥ भेदवादी असुर बहुत ॥ खळ कुटिल कुतर्क समस्त ॥ देह लंकेत दुमदुमती ॥३॥ यांचे बळे माजोनि रावण ॥ बंदी घातले सुरगण ॥ आदिदैवत अध्यात्म होऊन ॥ देहलंकेत बंदी पडिले ॥४॥ रमेश तो अंतःकरण ॥ रमाबंधु तोचि मन ॥ बुद्धि विरिंची चित्त नारायण ॥ रावणें बंदी घातली ॥५॥ चक्षुंच्या ठायीं सूर्यनारायण ॥ रसना ते रसनायक वरुण ॥ अश्विनौदेव दोघे घ्राण ॥ रावणें बंदी घातले ॥६॥ वाचा केवळ वैश्वानर ॥ पाणी ते जाण पुरंदर ॥ असो देव आकळोनि समग्र ॥ सेवक करूनि रक्षिले ॥७॥ मायामृग छेदावया लागून ॥ निरंजनी प्रवेशे रघुनंदन ॥ कापट्यशब्द उठवून ॥ विवेक लक्ष्मण दवडिला ॥८॥ सद्बुद्धि जानकीचे हरण ॥ अहंकारें केले न लागतां क्षण ॥ अहंदेह लंकेत आणून ॥ दुराचारें कोंडिलें ॥९॥ मग धांविन्नला वैराग्य हनुमंत ॥ तेणें देहलंका जाळूनि समस्त ॥ कामक्रोधादि राक्षसांसहित ॥ अहं लंकानाथ गांजिला ॥१०॥ सद्बुद्धीचे करूनि समाधान ॥ घेऊन आला रघुनंदन ॥ तो केवळ सद्भाव बिभीषण ॥ रावणें त्रासिला सभास्थानी ॥११॥ आत्माराम सद्गुरु पूर्ण ॥ त्यास शरण चालिला बिभीषण ॥ बाविसावे अध्यायीं जाण ॥ हेंचि कथन सांगितलें ॥१२॥ देखोनि वायसांचा मेळ ॥ त्रासोनि निघे मराळ ॥ कीं देखानि दुष्ट निंदक खळ ॥ साधु उठे तेथोनियां ॥१३॥ तैसा प्रधानांसह बिभीषण ॥ ऊर्ध्वपंथे क्रमीत गगन ॥ भवसिंधु उल्लंघोनि चरण ॥ गुणसिंधूचे पाहूं इच्छी ॥१४॥ हिरण्यकशिपें गांजिला प्रल्हाद ॥ तेणें हृदयी धरिला मुकुंद ॥ तैसाचि जानकीहृदयमिलिंद ॥ बिभीषणें जवळी केला पै ॥१५॥ वानर अंतरिक्ष विलोकिती ॥ तों पाचही असुर उतरले क्षितीं ॥ सेनाप्रदेशीं उभे राहती ॥ हस्त जोडूनि तेधवां ॥१६॥ कित्येक धांवले वानरगण ॥ घेऊनियां वृक्षपाषाण ॥ तो बिभीषण म्हणे मी तुम्हांसी शरण ॥ दावा चरण रघुपतीचे ॥१७॥ रावणबंधू मी बिभीषण ॥ तेणें अपमानिले मजलागून ॥ आलो सीतावल्लभासी शरण ॥ त्याचे चरण दावा मज ॥१८॥ जे सेनादिकांची ध्येय मूर्ति ॥ नारदादि गाती ज्याची कीर्ति ॥ तो ब्रह्मानंद अयोध्यापती ॥ त्याचे चरण मज दावा ॥१९॥ जें निगमवल्लीचे पक्व फळ पूर्ण ॥ जो विषकंठमनमांदुसरत्न ॥ जे पद्मोद्भवाचें देवतार्चन ॥ त्याचे चरण दावा मज ॥२०॥ प्रतापमित्र रघुनंदन ॥ जो अरिचक्रवारणपंचानन ॥ जो खरदूषणप्राणहरण ॥ त्याचे चरण दावा मज ॥२१॥ वेदांती म्हणती परब्रह्म ॥ अजअजित पूर्णकाम ॥ तोचि हा दशरथात्मज श्रीराम ॥ त्याचे चरण दावा मज ॥२२॥ व्याकरणकार शब्द साधिती ॥ त्याचे नामाचे अनेकार्थ्ज्ञ करिती ॥ तोचि हा मंगळभगिनीचा पति ॥ त्याचे चरण दावा मज ॥२३॥ पातंजली योग साधून ॥ योग पावती निरंजन ॥ तोचि हा चंडकिरणकुळभूषण ॥ त्याचे चरण दावा मज ॥२४॥ प्रकृति पुरुष सांगत ॥ सांख्यशास्त्र असे गर्जत ॥ तोचि हा जानकीनाथ ॥ त्याचे चरण दावा मज ॥२५॥ नैयायिक म्हणती कर्ता ईश्वर ॥ जीवासी न कळे त्याचा पार ॥ तोचि हा अजराजपुत्रकुमर ॥ त्याचे चरण दावा मज ॥२६॥ मीमांसक स्थापिती कर्म ॥ कर्माचरणें पाविजे परब्रह्म ॥ तो परात्पर विश्रांतिधाम ॥ त्याचे चरण दावा मज ॥२७॥ ऐशीं बिभीषणाचीं शब्दरत्नें ॥ की ती भक्तिनभींचीं उडुगणें ॥ की तीं वैराग्यवल्लीची सुमने ॥ प्रेमसुवासें विकासती ॥२८॥ श्रीरामसुग्रीवांसी जाऊन ॥ कित्येक सांगती वर्तमान ॥ चौघे प्रधानांसह शरण ॥ राक्षस एक आलासे ॥२९॥ आपला ज्येष्ठ बंधु रावण ॥ आपुलें नाम सांगे बिभीषण ॥ ऐसें ऐकतां जानकीजीवन ॥ सुग्रीवाकडे पाहत ॥३०॥ तो अर्कज बोले उत्तर ॥ वरी भाविक दिसतो निशाचर ॥ परी नोळखतां तयाचे अंतर ॥ जवळी सहसा ठेवूं नये ॥३१॥ दिवाभीताची सेवा करून ॥ कागे लाविला जैसा अग्न ॥ तैसा जरी गेला करून ॥ तरी मग काय विचार ॥३२॥ जांबुवंत म्हणे मारूनि वाळी ॥ किष्किंधा तुम्ही सुग्रीवा दिधली ॥ हे कीर्ति ऐकोनि तात्काळीं ॥ शरण आला तुम्हांतें ॥३३॥ मारूनियां रावणा ॥ लंकाराज्य द्यावे आपणा ॥ हेचि मनी धरूनि वासना ॥ शरण आला तुम्हांते ॥३४॥ सुषेण म्हणे समयी कठीण ॥ देखोन साह्य करिती बंधुजन ॥ हा रावणासी सोडून आला शरण ॥ हेंचि नवल वाटतें ॥३५॥ तर्क वितर्क बहु विचार ॥ करिते झाले तेव्हां वानर ॥ मग तो शेवटी रुद्रावतार ॥ निश्चयवचन बोलिला ॥३६॥ लंकेत शोधितां जनककुमारी ॥ मी प्रवेशलों याचे मंदिरीं ॥ महासाधु निष्कपट अंतरीं ॥ तेच समयी ओळखिला ॥३७॥ वरी तुम्हांस दिसतो राक्षस ॥ परी अंतरीं प्रेमळ निर्दोष ॥ कंटकमय दिसतो फणस ॥ परी अंतरीं सुरस जैसा ॥३८॥ शरणागतांसी वज्रपंजर ॥ रामा तुझें ब्रीद साचार ॥ जवळी बोलावून असुर ॥ अभय तयातें देइंजे ॥३९॥ इतर शास्त्रीचें बोल बहुत ॥ एक वचनें दावी वेदांत ॥ तैसें बोलिला हनुमंत ॥ तेंच समस्तां मानलें ॥४०॥ अंगदासी भ्रूसंकेत ॥ दावीत तेव्हां ताराकांत ॥ बिभीषणास आणावया त्वरित ॥ येरू निघाला वायुवेगें ॥४१॥ बिभीषणास म्हणे वाळीपुत्र ॥ उदेला तुझा भाग्यमित्र ॥ तुज पाचारितो स्मरारिमित्र ॥ राजीवनेत्र अजित जो ॥४२॥ बिभीषणाचा धरूनि हस्त ॥ रामाजवळी आला तारासुत ॥ जेंवि साधकासी सद्विवेक दावित ॥ स्वरूपनिर्धार निश्चयें ॥४३॥ असो बिभीषणं पाहिला श्रीराम ॥ जो चरचरफलांकित द्रुम ॥ जयजयकार करून परम लोटांगण घातलें ॥४४॥ दृष्टीं पाहूनि श्रीरामचंद्र ॥ उचंबळे बिभीषणभाव समुद्र ॥ प्रेमाचें भरते अपार ॥ दाटतें झालें तेधवां ॥४५॥ श्रीरामचरणारविंदसुगंध ॥ तेथें बिभीषण जाहला मिलिंद ॥ अष्टभावें होऊन सद्रद ॥ आनंदमय जाहला ॥४६॥ रामचरणीं ठेवितां मस्तक ॥ संतोषोनि ब्रह्मांडनायक ॥ शिरी ठेविला वरद हस्त ॥ अक्षय कल्याणदायक जो ॥४७॥ म्हणे जोंवरी शशी आणि तरणी ॥ जोंवरी रामकथा आणि धरणी ॥ तोंवरी राज्य करी लंकाभुवनीं ॥ बळीध्रुवांसारिखें ॥४८॥ जेंवी चिरंजीव वायुनंदन ॥ त्याचपरी राहें तूं बिभीषण ॥ काळीकाळ तोडरीं बांधोन ॥ लंकेत सुखें नांदे कां ॥४९॥ ऐसा आशीर्वाद देऊन ॥ रामें उठविलां बिभीषण ॥ सप्रेमें दिधलें आलिंगन ॥ वानरगण आनंदले ॥५०॥ मग सौमित्र आणि अष्ट दिक्पती ॥ तेही बिभीषणासी भेटती ॥ पुष्पवर्षाव करिती ॥ वृंदारक तेधवां ॥५१॥ मग बिभीषण जोडूनि कर ॥ उभा राहिला श्रीरामासमोर ॥ म्हणे जयजय राम करुणासमुद्र ॥ जगदोद्धारा दीनबंधो ॥५२॥ जयजय रामकमळपत्राक्षा ॥ हे ताटिकांतका सर्वसाक्षा ॥ मखपाळका निर्विकल्पवृक्षा ॥ कर्माध्यक्षा कर्ममोचका ॥५३॥ जय राम चंडीशकोदंडभंजना ॥ हे राम दशकंठदर्पहरणा ॥ हे राम विषकंठदाहशमना ॥ भक्तरंजना जगवंद्या ॥५४॥ हे राम पद्मजातजनका ॥ हे राम विबुधबंधच्छेदका ॥ हे राम दुष्टअसुरांतका ॥ सहस्रमुखा न वर्णवेचि ॥५५॥ ऐसी बिभीषणें करितां स्तुति ॥ मग तयासी हाती धरूनि सीतापति ॥ आपणजवळी बैसवी प्रीतीं ॥ बहुत मान देऊनियां ॥५६॥ संतोषोनि बोले रघुनंदन ॥ आमचा पांचवा बंधु बिभीषण ॥ वानर म्हणती धन्य धन्य ॥ भाग्यरावणानुजाचें ॥५७॥ मग चतुःसमुद्रींचीं उदकें आणुनी ॥ बिभीषणासी रामें बैसवूनी ॥ लंकापति हा म्हणूनि ॥ अभिषेक केला यथाविधी ॥५८॥ लंकानगरींचा नृप पूर्ण ॥ येथून अक्षयी बिभीषण ॥ यावरी लोकप्राणेशनंदन ॥ काय करिता जाहला ॥५९॥ वाळूची लंका विशाळ केली ॥ कपींचीं किराणें बाहेर पडली ॥ ते बिभीषणाजवळी गहाण ठेविली ॥ राघवेंद्र तेधवां ॥६०॥ माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ॥ ते लंका सांडीन ओंवाळून ॥ परम प्रीतीं सीताजीवन ॥ लंका विलोकी मारुतीची ॥६१॥ असो यावरी बिभिषणाप्रति ॥ विचारीत जनकजापती ॥ म्हणे सागर तरावया निश्चितीं ॥ काय उपाय करावा ॥६२॥ यावरी बोले बिभीषण ॥ सागराची पूजा करून ॥ मागावा मार्ग प्रार्थून ॥ वानरदळ उतरावया ॥६३॥ मग समुद्रतीरीं रघुनंदन ॥ बैसला दर्भासन घालून ॥ पूजा सागरी समर्पून ॥ मित्रकुळभूषण मार्ग मागे ॥६४॥ फळ तोय वर्जून समस्त ॥ निराहार बैसला सीताकांत ॥ हिमाचळीं हिमनगजामात ॥ तप करी जयापरी ॥६५॥ तो तेथे रावणाचा हेर ॥ शार्दूळनामा होता असुर ॥ लंकापतीपुढें जाऊन सत्वर ॥ वार्ता सांगे ते काळीं ॥६६॥ म्हणे कमळिणीप्रियभूषण ॥ अगाध वानरसमुदाय घेऊन ॥ प्रतापसिंधु रघुनंदन ॥ जळसिंधुतीरीं राहिला ॥६७॥ ऐसा समाचार ऐकतां साचार ॥ चिंतेनें व्यापिला दशकंधर ॥ मग शुकनामें असुर ॥ दशकंधर त्यासी सांगे ॥६८॥ तूं आमचा बंधु होसी ॥ जाऊन सांग सुग्रीवासी ॥ तुज काय कारण सीतेसी ॥ परतोन जाईं माघारा ॥६९॥ मग तो शुक रूप जाहला ॥ क्षणें सिंधू उल्लंघूनि आला ॥ अंतरिक्षीं उभा राहिला ॥ बोलों लागला धीटपणें ॥७०॥ म्हणे मज पाठविलें रावणें ॥ वानरेश्वरा तूं एक वचनें ॥ तुवां शीघ्र परतोनी जाणें ॥ मर्कटसेना घेऊनियां ॥७१॥ आम्ही जानकी आणिली हिरून ॥ तरी तुम्हांसी यावया काय कारण ॥ व्यर्थ वेंचू नका प्राण ॥ जावें परतोन किष्किंधे ॥७२॥ जरी तुम्ही न जाल परतोन ॥ तरी मी शुक स्वकरेंकरून ॥ तुमची शिरकमळें छेदून ॥ नेईन आतां लंकेसी ॥७३॥ ऐसें बोलतां शुक निशाचर ॥ परम क्रोधावले वानर ॥ बहुत धांविन्नले वीर ॥ आसडून खालीं पाडिला ॥७४॥ बहुत मिळोनी कुंजर ॥ ताडिती जैसें एक मार्जार ॥ पाणिप्रहारें तैसा असुर ॥ वानरवीरीं ताडिला ॥७५॥ परम कासावीस होऊन म्हणे मज राघवा सोडवीं येथून ॥ कृपासागर रघुनंदन ॥ पाहे विलोकून त्याकडे ॥७६॥ सुमित्रासुत म्हणे सोडा सत्वर ॥ तात्काळ मुक्त करिती वानर ॥ सवेंचि गगनीं उडोनि असुर ॥ मागुतीं बोले निंद्योत्तरें ॥७७॥ म्हणे एथून जाय तूं किष्किंधापति ॥ न धीर रामाची संगती ॥ जैसें देवांचे बुद्धी छळितां उमापती ॥ पुष्पचाप भस्म झाला ॥७८॥ तुम्हांसी मारावया देख ॥ घेऊन आला रघुनायक ॥ तुम्ही वानर शतमूर्ख ॥ नेणा हित आपुलें ॥७९॥ ऋषभ म्हणे रे शुका ॥ दुर्बुद्धि मलिना मशका ॥ जाऊनि सांगे दशमुखा जनकात्मजा सोडी वेगीं ॥८०॥ तूं आमुचा शत्रु साचार ॥ तुज वधावया आला रघुवीर ॥ तुझीं दाही शिरें छेदून सत्वर ॥ बळी देईल दशदिशां ॥८१॥ शुक म्हणे सीता गोरटी ॥ पुन्हां न पडे तुमचे दृष्टीं ॥ मर्कटहो व्यर्थ कष्टी ॥ कासया होतां उगेची ॥८२॥ ऐसें ऐकतां वाळिनंदन ॥ म्हणे धरा धरा मागुतेन ॥ तो तात्काळ वानरीं आसुडोन ॥ केले ताडण ते वेळां ॥८३॥ मग करचरण बांधोन ॥ शुक ठेविला रक्षून ॥ असो इकडे रघुनंदन ॥ समुद्रासी मार्ग मागे ॥८४॥ तीन दिवसपर्यंत ॥ गुणसमुद्र रघुनाथ ॥ समुद्राची वाट पहात ॥ परी तो उन्मत्त सर्वदा ॥८५॥ परम क्षोभला रघुनाथ ॥ म्हणे हा समय नोळखे यथार्थ ॥ यास मी मान दिधला बहुत ॥ सागरनिर्मित म्हणोनिया ॥८६॥ लवणजळविषेंकरून ॥ सर्प हा पसरला लंबायमान ॥ आतां यावरी बाण सुपर्ण ॥ सोडितां भक्षील क्षणार्धे ॥८७॥ माझा बाण वडवानळ ॥ क्षणें शोषील समुद्रजळ ॥ जैसें ज्ञान प्रवेशतां सकळ ॥ अज्ञान जाय निरसोनी ॥८८॥ की माझा बाण कलशोद्भव ॥ क्षणें शोषील जळार्णव ॥ सूर्य उगवतां तम सर्व ॥ जाय जैसें निरसोनी ॥८९॥ मागुती क्षण एक वाट पाहून ॥ उभा ठाकला रघुनंदन ॥ धनुष्यावरी योजिला बाण ॥ अर्ध क्षण न लागतां ॥९०॥ बाणाचे मुखी ब्रह्मास्त्र ॥ स्थापिता जाहला राजीवनेत्र ॥ की क्षोभला प्रळयरुद्र ॥ अक्षय सागर देखतां ॥९१॥ आकर्ण चाप ओढितां प्रचंड ॥ भयें तडाडी विरिंचिअंड ॥ जळचर खेचरें उदंड ॥ मूर्च्छना येऊन पडियेलीं ॥९२॥ निशा संपतां समग्र ॥ उदयाद्रीवरी ये मित्रचक्र ॥ तैसा दिव्यरूप समुद्र ॥ सरितांसहित प्रगटला ॥९३॥ यागीं होतां पूर्णाहुती ॥ तात्काळ प्रगटे आराध्यमूर्ति ॥ तैसा प्रगटला सरितापति ॥ परिवारेंसी तेधवां ॥९४॥ वंदूनियां रघुवीरचरणां ॥ म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ स्मरारिमित्रा आनंदसदना ॥ जानकीजीवना रघुपति ॥९५॥ तूं कृपासमुद्र रघुवीर ॥ कां हे लहरी आली क्रूर ॥ माझा अन्याय नसतां शर ॥ धनुष्यावरी घातला ॥९६॥ माझा स्वभाव रघुनंदना ॥ सर्वदाही करावी गर्जना ॥ तुजसीं गर्व गर्वहरणा ॥ सर्वथाही केला नाही ॥९७॥ मग म्हणे रघुनंदन ॥ म्यां शरासनी योजिला बाण ॥ पुन्हा काढितां नये पूर्ण ॥ यासी कारण सांग कांहीं ॥९८॥ यावरी बोले सरितानाथ ॥ पश्चिमेस असे मरु दैत्य ॥ तो माझी जळचरें भक्षित ॥ सदा पीडितो गोब्राह्मणां ॥९९॥ त्यावरी टाकूनियां बाण ॥ मरूचा तात्काळ घ्यावा जी प्राण ॥ तों शर गेला न लागतां क्षण ॥ कल्पांतचरपळेसारिखा ॥१००॥ जळीं जीव वधितां मरु दैत्य ॥ शिर छेदिलें अकस्मात ॥ जीवन शोषिलें तेथ बहुत ॥ मारवाडदेश वसिन्नला ॥१॥ अद्यापि तिकडे अल्प जळ ॥ परी वृक्षवल्ली सदा सुफळ ॥ असो सागरें तमालनीळ ॥ जामात म्हणोनि पूजिला ॥२॥ मग सर्व पूजा आणून ॥ घनश्यामगात्र रघुनंदन ॥ अपर्णावराचें मनरंजन ॥ हर्षे पूजी श्रीरामचंद्रा ॥३॥ दिव्यालंकार दिव्य वस्त्रें ॥ अमोलिक रत्नें प्रभाकरें ॥ राघवापुढें नदीश्वरें ॥ समर्पिलीं ते काळीं ॥४॥ सागर म्हणे अयोध्यानाथा ॥ वस्त्रे भूषणें लेईं समर्था ॥ नृपास वल्कलें तत्त्वतां ॥ रिपुसन्मुख योग्य नव्हे ॥५॥ अयोध्यानाथा नृपवरा ॥ करूनि यांच्या अंगीकारा ॥ मग समरंगणीं दशकंधरा ॥ खंड विखंड करावें ॥६॥ बैसावया दिव्य रथ ॥ समरीं पाठवील शचीनाथ ॥ वानर सुग्रीवादि समस्त ॥ विनविती तेव्हां रघूत्तमा ॥७॥ स्वामी आम्हां समस्तांचे मनीं ॥ वस्त्रे भूषणें घ्यावीं ये क्षणीं ॥ भक्तवचनें चापपाणी ॥ मानिता झाला ते वेळे ॥८॥ कल्पांतचपळेसमान ॥ राघव नसेला पीतवसन ॥ उत्तरीय प्रावरण दैदीप्यमान ॥ कीं चंडकिरण प्रकाशला ॥९॥ सांवरूनि जटाभार ॥ वरी मुकुट घातला सुंदर ॥ तेज तळपतसे अपार ॥ दिकृचक्रांमाजी न समाये ॥११०॥ प्रळयचपळेचे उमाळे उठती ॥ तेवी दिव्य कुंडलें तळपती ॥ कीं कवि आणि अंगिरापती ॥ कर्णीं शोभती साचार ॥११॥ मुक्ताफळमाळा बहुत ॥ रघुपतीच्या गळां डोलत ॥ कीं मुक्तरूपें समस्त ॥ अनंत ब्रह्मांडें गुंफिलीं ॥१२॥ मुक्ताफळांचे तेज गहन ॥ परी त्यांचा पालटला वर्ण ॥ दिसती इंद्रनीळसमान ॥ श्यामलांगीं रघुपतीच्या ॥१३॥ जेंवि निष्कलंक मृगांक ॥ तेंवि हृदयी झळके पदक ॥ कटीं मेखळेचें तेज अधिक ॥ देखतां अर्क भुले पैं ॥१४॥ वेदांतीच्या श्रुति गहन ॥ अर्थ बोलती जेंवि शोधून ॥ तैशा क्षुद्रघंटा रुणझुण ॥ शब्द करिती रसाळ ॥१५॥ तीक्ष्ण प्रभेची चके्रं तळपती ॥ तैशा मुद्रिका करी झळकती ॥ पदी नेपुरें गर्जती ॥ असुरांवरी प्रतापें ॥१६॥ नीळ गगनावरी सुंदर ॥ मंदाकिनीओघ दिसे शुभ्र ॥ तैसा अम्लान सुमनहार ॥ श्यामलांगीं शोभतसे ॥१७॥ असो दिव्यगंधीं दिव्यसुमनीं ॥ सागरें पूजिला चापपाणी ॥ तैसाचि लक्ष्मण तये क्षणी ॥ वस्त्रालंकार गौरिविला ॥१८॥ देव करिती जयजयकार ॥ वर्षती दिव्यपुष्पसंभार ॥ भुभुःकारें गर्जती वानर ॥ तेणें अंबर कोंदलें ॥१९॥ असो जगदात्मा रघुवीर ॥ जो कां सर्वांनंदमंदिर ॥ सागराप्रति राजीवनेत्र ॥ काय बोलता जाहला ॥१२०॥ म्हणे सुवेळेसी जावया दळभार ॥ उपाय सांगे कांहीं सत्वर ॥ सागर म्हणे नळ वानर ॥ ऋषीचा वर त्यास असे ॥२१॥ नळ कपि बाळपणीं ॥ शाळिग्राम टाकी जळीं नेउनी ॥ मग ऋषि म्हणती जीवनीं ॥ पाषाण तरोत तव हस्तें ॥२२॥ यालागी सुवेळेपर्यंत ॥ नळाचे हस्तें बांधी सेतु ॥ असो आज्ञा मागोनि सरितानाथु ॥ जाहला गुप्त स्वस्थानीं ॥२३॥ याउपरी कौसल्यानंदन ॥ नळ कपि जवळी बोलावून ॥ म्हणे धन्य धन्य वरदान ॥ जळीं पाषाण तारीं आतां ॥२४॥ धन्य धन्य तुझी माउली ॥ तुज ऐसें रत्न प्रसवली ॥ तरी सखया आतां ये काळीं ॥ प्रगट करी सामर्थ्य तुझें ॥२५॥ ऐसें बोलतां रघुवीर ॥ भुभुःकारें गर्जती वानर ॥ पाषाण पर्वत अपार ॥ समुद्रजळी टाकिती ॥२६॥ लागतां नळाचा वरदहस्त ॥ समुद्रीं तरती काष्ठवत ॥ कीं तुंबिनीफळें तरत ॥ पाषाण पोहती त्यापरी ॥२७॥ कीं सद्गुरूचे कृपेंकरूनी ॥ भवजळीं तरती बहुत प्राणी ॥ तैसीच नळाची करणी ॥ पाषाण जळीं तरले हो ॥२८॥ इकडे अठरा पद्में वानर ॥ बहात्तर कोटी रीस वीर ॥ पर्वत तरुवर ॥ संख्यारहित आणिती ॥२९॥ असंभाव्य उचलिती पर्वत ॥ वरी ग्रामतटाकांसहित ॥ ऐशा नगांच्या उतरंडी बहुत ॥ धांवताती घेऊनि ॥१३०॥ भार वानरांचे धांवती ॥ चालतां न दिसे खाली क्षिती ॥ लक्षांचे लक्ष पर्वत टाकिती ॥ नव्हे गणती शेषातें ॥३१॥ त्याहीमाजी हनुमंत ॥ विशाळरूप धरी अद्भुत ॥ कीं मंदराचळचि धांवत ॥ रामकार्याकारणें ॥३२॥ तरी तो महाराज हनुमंत ॥ तेणें किती वाहिले पर्वत ॥ मूळकाव्यामाजी गणित ॥ केले असे ऐका तें ॥३३॥ वेदसंख्यालक्ष पर्वत ॥ पुच्छें वेष्टित आधीं हनुमंत ॥ शास्त्रसंख्यालक्ष शिरीं ठेवित ॥ हातीं घेत लक्षद्वय ॥३४॥ बहुत नगांच्रूा पंक्ति ॥ स्कंधीं बैसवी हो मारुति ॥ मागें सांडोनि समीरगती ॥ आकाशपंथें धांवतसे ॥३५॥ वानर श्रमले असंख्यात ॥ ठायी ठायी पडती निद्रिस्त ॥ परी श्रमरहित हनुमंत ॥ असंख्यात खेपा करी ॥३६॥ आश्चर्य करी अयोध्यापाळ ॥ म्हणे धन्य मारुतीचें बळ ॥ संख्यारहित अचळ ॥ रिचवी नेऊन सागरीं ॥३७॥ प्रथमदिवशीं नळें अद्भुत ॥ चौदा गांवें बांधिला सेत ॥ परी अभिमान धरिला बहुत ॥ माझेनि तरती पाषाण हे ॥३८॥ तंव निमेषामाजी एक मीन आला ॥ तेणें सर्व सेतु गिळिला ॥ सवेंच दिनमणि उगवला ॥ तों सेतु नाही त्या स्थळीं ॥३९॥ सुग्रीवादि वानर तर्क करिती ॥ रावणें नेला सेतू म्हणती ॥ मग रघुपतीस जाणविती ॥ सेतू नाही म्हणूनियां ॥१४०॥ मग श्रीरामें शरभासीं सांगूनी ॥ तिमिंगिल मत्स्य आणविला ते क्षणीं ॥ शरभ म्हणे सेतू शोधूनि ॥ वेगें आणूनि देइंजे ॥४१॥ नाहीं तरी अयोध्यानाथ ॥ तुम्हांस शिक्षा करील बहुत ॥ यावरी तिमिंगिल बोलत ॥ राघवापुढें ते वेळां ॥४२॥ मी दर्शनास येतेवेळे ॥ मागें येत होतीं लघु बाळें ॥ त्यांही गिळिला शीघ्रकाळें ॥ बाळभावेंकरूनियां ॥४३॥ तयां हातें बांधवीन क्षणांत ॥ अथवा स्वपृष्ठीचा करीन सेत ॥ हास्यवदन करी रघुनाथ ॥ म्हणे करणी अद्भुत बाळांची ॥४४॥ गर्वहत नळ होऊन ॥ खालीं पाहे अधोवदन ॥ असो मत्स्यशिशूनें सेतू उगळून ॥ आणून ठेविला पूर्वस्थळीं ॥४५॥ मग त्यापुढें कपी नळ ॥ सेतू बांधिता जाहला विशाळ ॥ परी जळी पडतां ते अचळ ॥ मत्स्य गिळिती सेवेगें ॥४६॥ मत्स्य गिळिती अचळ ॥ उगाचि तटस्थ पाहे नळ ॥ तो मत्स्यरूपी केशव विशाळ ॥ जळचरांप्रति सांगतसे ॥४७॥ म्हणे मी आणि रघुवीर ॥ दोघे एकरूप साचार ॥ सेतुबंधनासी निर्धार ॥ विघ्न कांही न करावें ॥४८॥ नळासी साह्य होऊन ॥ तळीं पृष्ठी द्या अवधे जण ॥ असो पर्वत गिळितां राहिले मीन ॥ नवल जाहलें ते वेळीं ॥४९॥ परी पर्वत शिळा उसळोन ॥ दूर जाती वाहून ॥ नळाची विकळ मति होऊन ॥ तटस्थरूप जाहला ॥१५०॥ मग नळासी म्हणे हनुमंत ॥ सखया गर्व न धरी किंचित ॥ अवघाकर्ता रघुनाथ ॥ अभिमान तेथें कासया ॥५१॥ स्तंभावीण आकाश धरी ॥ उदकावरी तारी धरित्री ॥ मित्र शशी उडुगणें निर्धारीं ॥ वायुचक्री चालवी जो ॥५२॥ अनंत ब्रह्मांड मोडून ॥ सवेंचि निर्मी न लागतां क्षण ॥ त्या रामापुढें अभिमान ॥ कोठें चालेल जीवांचा ॥५३॥ जैसा उगवतां वासरमणी ॥ मृगांकतेज लोपे ते क्षणीं ॥ तेथें खद्योत स्वेतेजेंकरूनी ॥ उजळील काय नभातें ॥५४॥ यालागीं गर्व सांडोनी ॥ सांगतों ते वर्म धरी मनीं ॥ रकारें एक शिला रेखुनी ॥ काना देऊनि करी गुरु ॥५५॥ दुजे शिळेवरी रेखीं मकार ॥ दोहींस करी एकंकार ॥ तूं म्हणसी रामनाम पवित्र ॥ सेतूवरी केवीं लिहूं ॥५६॥ कपी देतील वर चरण ॥ हा संशय धरी तुझंं मन ॥ बरे मुख्य भेदासी कारण ॥ तो अभिमान सोडी कां ॥५७॥ मुख्य रामनाम पाहीं ॥ हृदयीं अभेद रुळे सदाही ॥ मग ते पाषाण सहसाही ॥ भेदभाव न धरिती ॥५८॥ हनुमंतवचन तीक्ष्ण कुठार ॥ समूळ छेदिला अभिमानतरुवर ॥ मग निरभिमानें नळवीर ॥ तैसेंचि करिता जाहला ॥५९॥ करितांच श्रीरामस्मरण ॥ नळ कपी जोडी पाषाण ॥ तो तेथें सम विषम थोर लहान ॥ भेदाभेद न दिसेचि ॥१६०॥ हनुमंत काव्यांतील हृद्गत ॥ चतुरीं जाणिजे हा भावार्थ ॥ सेतुपंथें नाम यथार्थ ॥ नळें नाही रेखिलें तें ॥६१॥ दुजयासी पाषाण जे बुडवित ॥ ते सागरीं तरती तारुवेत ॥ हा नळाचा गुण नव्हे निश्चित ॥ अदभुत महिमा रामाचा ॥६२॥ सेतू बांधावया कारण ॥ नळ रामेंचि केला निर्माण ॥ भक्तवत्सल रघुनंदन ॥ महिमा वाढवी दासांचा ॥६३॥ असो बाणसंख्यादिवसांत ॥ सुवेळेपर्यंत बांधिला सेत ॥ शतयोजनें लांब गणित ॥ दशयोजनें रुंद पैं ॥६४॥ गगनीं पाहती सुरवर ॥ सेतू दिसे जैसा भोगेंद्र ॥ रघुपतीतें सांगती वानर ॥ सेतू संपूर्ण केला नळ ॥६५॥ नळास बोलावून रघुनंदनें ॥ हृदयी धरिला परम प्रीतीनें ॥ म्हणे धन्य धन्य तुझें जिणें ॥ भरिलें त्रिभुवन कीर्तीनें ॥६६॥ सखया त्वां अदभुत कार्य केले ॥ अघटित तेंचि घडविलें ॥ असो रघुवीर म्हणे ते वेळे ॥ चल सुवेळे जाऊं आतां ॥६७॥ कुंचा फिरविला वीरें नळे ॥ तत्काळ उठलीं कपिदळें ॥ भुभुःकारनादें ते वेळे ॥ डळमळिला भूगोळ ॥६८॥ सुमुहूर्त वेळा पाहून ॥ उठोनि चालिले रामलक्ष्मण ॥ दशयोजनें रुंद प्रमाण ॥ सेना दाटली चालता ॥६९॥ कडेचे कोसळती वानर ॥ सवेंच उडी घेती चक्राकार ॥ वरी येऊन सत्वर ॥ सेतुपंथें चालती ॥१७०॥ रघुवीर चरणचालीं जात ॥ धांवती सुग्रीव हनुमंत ॥ म्हणती रघूत्तमा विपरीत ॥ होईल ऐसें वाटतें ॥७१॥ तुमचे पद लागतां ये वेळा ॥ उद्धरतील सेतूच्या शिळा ॥ होतील अहल्येऐशा अबळा ॥ पडतील गळां कपींच्या ॥७२॥ कुटिल भाव सोडून ॥ विनोदें हांसे सूर्यनंदन ॥ मग हनुमंतस्कंधी रघुनंदन ॥ आरूढला ते वेळां ॥७३॥ अंगदाच्या स्कंधावरी ॥ सौमित्र बसे ते अवसरीं ॥ बाळसूर्य उदयाद्रीवरी ॥ त्याचपरी शोभतसे ॥७४॥ न भरतां अर्धप्रहर ॥ सूवेळेसी आला रघुवीर ॥ सेना उतरली अपार ॥ लंकानगर गजबजिलें ॥७५॥ शुकास केले होते बंधन ॥ तो राघवें दिधला सोडून ॥ तेणें रघुपतीचे वंदोनि चरण ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥७६॥ मग रावणापुढें अदभुत ॥ राघवप्रताप शुक सांगत ॥ म्हणे जयासी समुद्र सरितांसहित ॥ मूर्तिमंत भेटला ॥७७॥ धन्य प्रतापी रघुनंदन ॥ जळी तारिलें पाषाण ॥ परमशक्तिवानरगण ॥ कळिकाळासी न गणिती ॥७८॥ तुम्ही निरोप जे सांगितले ॥ तितुके मित्रपुत्रासी कथिले ॥ तंव तिही धांवोनि मजला धरिलें ॥ बांधोनि पाडिलें आजिवरी ॥७९॥ करुणासागर रघुनंदन ॥ तेणें आज दिधलें सोडून ॥ आतां राजा जानकी नेऊन ॥ सत्वर रामासी समर्पावी ॥१८०॥ सखा करितां रघुनंदन ॥ तेणें चंद्रार्कवरी कल्याण ॥ ऐकतां क्षोभला रावण ॥ म्हणे केले ताडण तिहीं तुज ॥८१॥ भय घेतलें मानसीं ॥ म्हणोनि भलते वाचाळसी ॥ शत्रुप्रताप मजपुढें वानिसी ॥ तरी मृत्यु पावसी निर्धारें ॥८२॥ मग शुक आणि सारण ॥ दोघां सांगे दशवदन ॥ म्हणे सुवेळेसी जाऊन ॥ सैन्य गणोनि या वेगीं ॥८३॥ मुख्य मुख्य कोण वानर ॥ कोणासवें किती भार ॥ ऐसें पाहूनि सत्वर ॥ परता रक्षूनि आपणां ॥८४॥ आज्ञा वंदूनि दोघांजणीं ॥ कपिसेनेंत आले ते क्षणी ॥ वानरवेष धरूनि ॥ सैरावैरा हिंडती ॥८५॥ सेना धुंडोनि सकळ ॥ मग जेथें असे अयोध्यापाळ ॥ लक्षीत ते सभामंडळ ॥ उभे दूर राहूनियां ॥८६॥ तो बिभीषणाची दृष्टि ते काळी ॥ अकस्मात दोघांवरी पडली ॥ धांवोनि धरिले ते वेळीं ॥ राघवाजवळी आणिले ॥८७॥ म्हणे हे रावणाचे हेर ॥ इही सेना गणिली समग्र ॥ वेष पालटोनी वानर ॥ होऊन हिंडती स्वईच्छा ॥८८॥ चुना मोखानि वायस ॥ जाहले जैसे राजहंस ॥ कीं धरूनि ब्राह्मणांचा वेष ॥ मैंद जैसे हिंडती ॥८९॥ कीं खोटेंनाटे करून ॥ खर्यांत मेळविती कुजन ॥ मग परीक्षककाढिती निवडोन ॥ दोघेजण तैसे धरिले ॥१९०॥ मग राजाधिराज रघुनंदन ॥ सुहास्यवदन बोले वचन ॥ म्हणे या दोघांस करी धरून ॥ दाखवा सैन्य समस्तही ॥९१॥ सकळ वृत्तांत आणूनि मना ॥ जाऊनि श्रुत करा दशवदना ॥ तंव ते म्हणती रघुनंदना ॥ मखपाळका विश्वेशा ॥९२॥ आम्हीं महिमा एकिली कर्णीं ॥ तो राम आजि देखिला नयनीं ॥ असो श्रीरामाची आज्ञा घेउनी ॥ दोघे परतले लंकेसी ॥९३॥ आले देखोन दोघे हेर ॥ षोडश खणांचे गोपुर ॥ त्यावरी चढला दशकंधर ॥ सेवक अपार भोंवते ॥९४॥ हेरांप्रति पुसे रावण ॥ सांगा येथून कोणाचे कोण ॥ मग ते दाविती दोघेजण ॥ संकेतवर्ण लक्षूनियां ॥९५॥ वानरसेना दशयोजन ॥ सभोंवती उतरली वीस्तीर्ण ॥ एकएक वीर दैदीप्यमान ॥ बळवंत आणि प्रतापी ॥९६॥ वानरसिंधूचें मव्यमंडळ ॥ जुत्पत्ति उभे भोंवते सकळ ॥ त्या मध्यभागीं तमालनीळ ॥ वस्त्राभरणीं मंडित दिसे ॥९७॥ कनकहरिणचर्मी पूर्ण ॥ पहुडलासे रघुनंदन ॥ सुग्रीवाचे मांडीवरी शिर ठेवून ॥ गोष्टी सांगे कौतुकें ॥९८॥ जाळूनि गेला लंकानगर ॥ सवेंच घेऊन आला रघुवीर ॥ तो हनुमंत वायुकुमर ॥ चरण चुरी रामाचे ॥९९॥ तुमचा बंधु बिभीषण ॥ रघुनाथनिकट बैसोन ॥ जे जे झाले वर्तमान ॥ गोष्टी सांगे रामकर्णीं ॥२००॥ दैदीप्यमान दिनकर ॥ तैसा रामाचे पाठीसी सौमित्र ॥ पैल अंगद महावीर ॥ क्रोधे पाहे आम्हांकडे ॥१॥ पैल सुषेण वैद्य महावीर ॥ हा सूर्यसुतासी होय श्वगुर ॥ वीसकोटी वानरभार ॥ त्यासांगातें पुरुषार्थी ॥२॥ पैल जांबुवंत ऋक्षवीर ॥ तयाचा बहात्तरकोटी दळभार ॥ पैल सेनाधिपती नीळ वीर सामर्थ्य अपार पैं त्याचें ॥३॥ जेणें शिळीं बांधिला सागर ॥ नळ नाम बळसमुद्र ॥ शरभ ऋषभ पर्वताकार ॥ युद्धसमय वांछिती ॥४॥ असो आतां वानरगण ॥ त्यांचीं नामें सांगतां पूर्ण ॥ उर्वी न पुरे करितां लेखन ॥ बळार्णव सर्वही ॥५॥ यालागीं दशकंधरा अवधारीं ॥ त्यांसी युद्ध करितां समरीं ॥ काळाचीही न उरे उरी ॥ मग इतर तेथें कायसे ॥६॥ ऐसें बोलतां शुक सारण ॥अत्यंत क्रोधावला रावण ॥ म्हणे तुमचा शिरच्छेद करून ॥ टाकावा ऐसें वाटतसे ॥७॥ येरू म्हणती आम्ही तुमचे हेर ॥ सत्य सांगावा समाचार ॥ असत्य बोलूं तरी साचार ॥ दंड करावा आम्हांतें ॥८॥ असो इकडे बिभीषण ॥ समस्तांसी दावी तर्जनी उचलून ॥ म्हणे पैल पहा रावण ॥ गोपुरावरी चढलासे ॥९॥ दहा शिरांवरी दाहा छत्रें ॥ दाहा विलसती मित्रपत्रें ॥ सेवक करी ढाळिती चामरें ॥ एकीं पिकमात्रें धरियेली ॥२१०॥ जैसा मघे उतरे पर्वतशिखरीं ॥ तैसा रावण भासे गोपुरीं ॥ अलंकारदीप्ति महीवरी ॥ विद्युत्प्राय झळकतसे ॥११॥ ऐसी आपुली संपदा पूर्ण ॥ शत्रूलागीं दाखवी रावण ॥ छत्रछायेखालीं रामसैन्य ॥ झांकून गेले ते समयीं ॥१२॥ जैसें उठतां मेघडंबर ॥ खालीं आच्छादे जग समग्र ॥ सेनेसहित रामचंद्र ॥ छत्रछायेतळीं तैसा ॥१३॥ ऐसा देखानि लंकापती ॥ कपिवीर क्षोभले चित्तीं ॥ सौमित्रें चाप घेतलें हातीं ॥ निमिषार्ध न लागतां ॥१४॥ लाविला अर्धचंद्रबाण ॥ ओढी ओढिली आकर्ण ॥ कल्पांतचपळेसमान ॥ चापापासूनि सूटला ॥१५॥ मुकुट छत्रे ते अवसरीं ॥ तोडून पाडिली धरणीवरी ॥ रावण घाबरला अंतरीं ॥ खालीं झडकरी उतरला ॥१६॥ म्हणे कोण्या वीरांचे संधान ॥ पाडिली दहाही छत्रें खंडून ॥ अन्न पान शयन ॥ गोड न लागे रावणातें ॥१७॥ कपाळशूळें आरंबळे व्याघ्र ॥ कीं वणव्यांत आहाळे अजगर ॥ तैसा दुःखें दशकंधर ॥ चिंताक्रांत सर्वदा ॥१८॥ रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हाचि केवळ क्षीरसागर ॥ साहित्य शेषशयन अरुवार ॥ वरी सर्वेश्वर पहुडला ॥१९॥ तेथें सप्रेम कळा लक्ष्मी ॥ सदा विलसे पादपद्मीं ॥ तरी सद्भाविक श्रोते तुम्ही ॥ पार्षदगण हरीचे ॥२२०॥ सुंदरकांड संपले येथोन ॥ पुढे युद्धकांड सुरस पूर्ण ॥ तें रसभरित भक्तजन ॥ करोत श्रवण सर्वदा ॥२१॥ जो अयोध्यापति रघुनंदन ॥ तेणेंच धनुष्यबाण ॥ दोनी कर जधनीं ठेवून ॥ भीमातटीं उभा असे ॥२२॥ श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पांडुरंगा पुंडलीकवरदा ॥ भक्तहृदयारविंदमिलिंदा ॥ अभंग अभेदा जगद्गुरु ॥२३॥ स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ त्रयोविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२२४॥ सुंदरकाण्ड समाप्त ॥ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |