॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सत्तेचाळिसावा ॥
भरत – हनुमान भेट
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
भरताची राममय स्थिती :
हनुमान अत्यंत विश्वासी । अनुसरोनि बाणासीं ।
आला नंदिग्रामासीं । जेथें भरतासीं निवास ॥ १ ॥
भरत श्रीरामाचा निजभक्त । भरतें भक्ति उल्लासित ।
आचार्य भक्तीचा भरत । भरतें निर्मुक्त चराचर ॥ २ ॥
भरते भक्ति विस्तारली । भरतें भक्ति प्रकाशिली ।
भरतें पाल्हाळिली निजभक्ती ॥ ३ ॥
भरत भक्तीचा निजठेवा । भरत भक्तीचा विसावा ।
भरत भक्तीचा ओलावा । भक्तीच्या गांवा रिगम भरता ॥ ४ ॥
भरतें सत्य सद्भावो । भरतें साचार अनुभवो ।
भरतें प्रकट रामरावो । सर्वत्र पहा हो सर्वांसी ॥ ५ ॥
भरतें आपंगिली भक्ती । भरतें वाढविली विरक्ती ।
भरतें पाहिली निजशांती । भूतें भोगती स्वानंद ॥ ६ ॥
मलयाद्रीच्या ठायीं । चंदनाची पैं झाडी पाहीं ।
तेणें डोंगर सर्वही । केला लवलाही चंदन ॥ ७ ॥
नाहीं आपण तेथें गेला । नाहीं उपडोनि आणिला ।
अंगवात वरुनि गेला । तेणें गिरि केला चंदन ॥ ८ ॥
एक वनस्पतीचा बडिवार । चंदन केला डोंगर ।
बहकतसे चौफेर । सुवास थोर आवरेना ॥ ९ ॥
माझ्याचि हृदयीं भगवंत । तो भगवंत मूर्तिमंत ।
तेणे काय नव्हे प्राप्त । सभाग्य संत त्रिजगतीं ॥ १० ॥
चित्ते मुकुंदो वदने मुकुंदो दृष्टौ मुकुंदः श्रवणे मुकुंदः ।
एवं सदा सर्वगतो मुकुंदस्ते मानवाः किं न मुकुंदतुल्याः ॥१॥
दृष्टी विषय समस्त । रामरुपें देखत भरत ।
दृश्य दृष्टा दर्शन तेथ । सहज होत रामरुप ॥ ११ ॥
श्रवणीं शब्द पडतांचि जाण । शब्दार्थ श्रीराम आपण ।
श्राव्य श्रावण श्रवण । स्वयें चिद्धन होवोनि ठाके ॥ १२ ॥
घ्राणें घेतां वास । वासा सबाह्य परेश ।
घ्रेय घ्राता घ्राण समस्त । चिदाकाश होवोनि ठाके ॥ १३ ॥
त्वचा घेवों जाय स्पर्शासी । तंव दोहींतें राम प्रकाशी ।
त्वचा स्पर्श स्पर्शनासी । सहज समरसी श्रीराम ॥ १४ ॥
रसना रातली आवडीं । घेतां रामरसाची गोडी ।
त्रिपुटी झाली देशोधडी । रसना ओसंडी रसातें ॥ १५ ॥
कर्मेंद्रियें याचि रीतीं । सेवितां श्रीराम चिच्छक्ती ।
उडाली कर्माची कर्मगती । स्वच्छा वर्तती निष्काम ॥ १६ ॥
ऐसा भरत रामें कोंदला । तो देशचि राम झाला ।
हनुमान अत्यंत सुखावला । देखों लागला अपूर्व ॥ १७ ॥
नगरा बाह्य आराम । वृक्षध्वनी रामराम ।
रामरुप सक्ळ द्रुम । प्लवंगम विस्मित ॥ १८ ॥
दिशा दुमदुमिती रामें । तृणें कोंदलीं रामनामें ।
वायु गर्जे रामनामें । व्योम रामें कोंदलें ॥ १९ ॥
सत्संगें धरा सधर । भूतें वागविते निरंतर ।
सांडून कठिनत्व प्रकार । मृदु अरुवार स्वयें झाली ॥ २० ॥
सत्संगती ओलावली । अति शांति धरेसीं आली ।
एकात्मता विस्तारली । वर्तो लागली अविरुद्ध ॥ २१ ॥
सत्संगती झाली जीवना । विसरोनि अधोगमना ।
ऐक्यवृत्ति सकळ जनां । अति स्वादन मधुरत्वें ॥ २२ ॥
गाय देखोनि सज्जन । निववी देवोनि जीवन ।
व्याघ्र पापी म्हणोन । उपेक्षण न करीचि ॥ २३ ॥
तेजासी होतां सत्संगती । आकर्षून दाहक शक्ती ।
स्वयें प्रकाश सर्वभूतीं । त्रिजगतीमाजी विचरे ॥ २४ ॥
ज्यानें प्रकाशिलें निजगृहीं । त्यासीं प्रकासा उणें नाहीं ।
पारखा चोरुं आल्या पाहीं । प्रकाश त्यासही तैसाचि ॥ २५ ॥
वायु सत्संगा लाढला । चंचलत्व आपुलें विसरला ।
योगीश्वरा भेटों आला । निश्चळ झाला निजरुपीं ॥ २६ ॥
विचरे तरी सर्व देहीं । परी आसक्त नव्हे कांही ।
सुवास दुर्वास न म्हणे कांही । निःसंग पाहीं विचरत ॥ २७ ॥
सत्संगा लाधलें आकाश । खुपों नेणे पैं कोणास ।
विसरोनियां निरवकाश । विरक्त उदास सर्वत्र वसे ॥ २८ ॥
आपुल्या निजशरीरीं । शित उष्ण पर्जन्यधारीं ।
न लिंपे एकही विकारीं । सत्संगथोरी एवढी ॥ २९ ॥
ऐसें नगर अवघेंचि संत । श्रीरामभजनीं निरत ।
धन्य भक्तिप्रतापें भरत । सौभाग्यवंत नांद्त ॥ ३० ॥
कोणाही नाहीं दुर्दशा । कोणी नव्हती हीनमानसा ।
श्रीरामभजनें उल्लासा । सावकाश नांदती ॥ ३१ ॥
उदीम एकमोहरा करणें । अक्षराचें खरें नाणें ।
जैसें देणें तैसें घेणें । कोणाही उणें असेना ॥ ३२ ॥
एकचि वस्तु देतां घेतां । एका बोलाचीच कथा ।
एकावाचून सर्वाथा । दुजी वार्ता असेना ॥ ३३ ॥
दुजेपणें दे दलाल । ठकूं पाहे तत्काळ ।
सर्वस्वें नेतां न लगे पळ । घेवोनि सबळ जातसे ॥ ३४ ॥
जेथें त्याची उडी पडे । सर्वस्वेंसीं जीवित बुडे ।
कांही उपाय न चले पुढें । पडे रोकडें अनर्थी ॥ ३५ ॥
अंगळुमंगळु नंदभाषा । सवेग निवटूं पाहे घसा ।
प्राणिया न कळे सहसा । दलाल ऐसा द्वैताचा ॥ ३६ ॥
भरतनगरीं लोक चतुर । स्वयें उदिमी एकांगवीर ।
होतां द्वैताचा संचार । वृत्ति सत्वर छेदिती ॥ ३७ ॥
एक एक उदीम ऐसा । आकळी सगळिया आकाशा ।
द्वैताची तेथें कोण दशा । परम परेशा विनटले ॥ ३८ ॥
हाटवटिया चौबारें । कथाकीर्तन चौफेरें ।
गातां रामकीर्ती गजरें । अंबर झरे तुषारीं ॥ ३९ ॥
आनंद भरताच्या मनीं । गेलें शून्यत्व बुडोनी ।
चैतन्यघन होउनी । निर्विकार जनीं सुस्थिर ॥ ४० ॥
गर्जतां रामनामें कल्लोळें । गगन अवघेंचि महुरलें ।
मोक्षफळीं लगडोनि आलें । ऐक्य झालें हरिरंगी ॥ ४१ ॥
सादृश्यामुळे हनुमंताचा भरताला राम समजून कोप :
देखतां नगरवृतांत । कपि स्वानंदें डुल्लत ।
पुढें देखिला भरत । अति विस्मित स्वयें झाला ॥ ४२ ॥
जटाधारी वल्कलांबर । तापसवेषी मनोहर ।
राजीवलाचन श्यामसुंदर । अति मनोहर साजिरा ॥ ४३ ॥
ठाणमाण गुणलावण्य । कळाविन्यास प्रसन्नवदन ।
देखतां कपि उद्विग्न । रघुनंदन येथें कां आला ॥ ४४ ॥
मनोमय करोनी नमन । रणपुरुषार्थें क्षोभोन ।
काय बोलत कपिनंदन । कोण विघ्न तुज आलें ॥ ३५ ॥
म्हणवितोसी आत्माराम । दिससी दुःखाचा आराम ।
रणीं सांडिला युद्धधर्म । परम अधर्म तुवां केला ॥ ४६ ॥
धीर वीर परम उदार । रणप्रवीण महाशूर ।
पुराणें गर्जती अपार । तें समग्र लटिकेंचि ॥ ४७ ॥
लटिकें तुझें कुळ शीळ । लटिकें तुझे व्रत सकळ ।
लटकें तुझें प्रतापबळ । लटिकाच केवळ पुरुषार्थ ॥ ४८ ॥
तुज पुरुषत्वचि नाहीं कांही । स्त्रीत्वही तुजमाजी नाहीं ।
नपुंसकाहूनि पाहीं । वेष तोही लटिकाचि ॥ ४९ ॥
लटिकी तुझी धृती कीर्ती । लटिकी तुझी शौर्यशक्ती ।
लटिकी तुझी स्थिती गती । लटिका निश्चितीं श्रीराम ॥ ५० ॥
वृथाचि वाढविलें नाम । वृथा तुझे नेमधर्म ।
वृथा तुझे धर्माधर्म । रघूत्तम वृथाचि ॥ ५१ ॥
जितुका पुरुषार्थ केला । तितुका वायांचि वाढविला ।
क्षात्रधर्मा बोल लाविला । रणीं सांडिला सौमित्र ॥ ५२ ॥
बिभीषण शरणागत । वानर सांडिले अनाथ ।
सुग्रीव सांडिला येथ । रावणें घात करावया ॥ ५३ ॥
आम्ही एक एक गोळांगूळ । गिळूं शकूं ब्रह्मांडगोळ ।
कायसें रावणाचें बळ । रणीं सकळ जिंकावया ॥ ५४ ॥
घायी तळमळी सौमित्र । रणीं सांडोनि सत्वर ।
पळालासी तूं रघुवीर । बाण समोर धाडिला ॥ ५५ ॥
मुहूर्त एक राहतासि तेथें । क्षणें आणितों ओषधीतें ।
उठवोनियां सौमित्रातें । रावणातें मारितो ॥ ५६ ॥
भरताला आश्चर्य व हनुमंताला वस्तुस्थिती कथन :
श्रीरामा थोर अन्याय केला । विकळ बंधू रणीं सांडिला ।
ऐकतां भरत चकित जाला । पाहूं लागला आकाशीं ॥ ५७ ॥
कपि रुपें पर्वताकार । पुच्छीं बांधोनि डोंगर ।
गगनीं जातसे सत्वर । गर्जत थोर रामनामें ॥ ५८ ॥
दिसे अति बळें बळवंत । कळिकाळा दृष्टी नाणित ।
बाण देखोनि नामांकित । सत्वर येथ पैं आला ॥ ५९ ॥
होय रामदूत साचार । युद्ध मांडलें घोरांदर ।
पर्वत घेवोनि सत्वर । करावया संहार जातसे ॥ ६० ॥
प्रसंगें येथें हा पातला । पुसों वृत्तांत वाहिला ।
चौदा वर्षापाठीं भेटला । रामें धाडिला कृपाळुत्वें ॥ ६१ ॥
श्रीराम दीनदयाळ । राम भावार्थभुकाळ ।
राम सप्रेंअ स्नेहाळ । प्रणतपाळ श्रीराम ॥ ६२ ॥
राम जीवाचें जीवन । राम जीवाचें अंजन ।
जीवीं जीवा समाधान । राम चिद्धन वोळला ॥ ६३ ॥
राम कथेवीण येथ । बहुत दिवस होतों पीडित ।
रामें कृपा करोनि त्वरित । कपिपर्वत पाठविला ॥ ६४ ॥
यासी पुसतां प्रवृत्ति समग्र । रामकथा सविस्तर ।
आम्हां सांगेल वानर । अति चौर दिसताहे ॥ ६५ ॥
ऐसें विचारोनि मनीं । भरत सादर रामश्रवणीं ।
पुसतां झाला तत्क्षणीं । प्रेमेंकरोनि कपीसी ॥ ६६ ॥
कोण कैंचा आलासी कोठोनी । पुच्छीं पर्वत काय म्हणोनी ।
रामभेटी तुज कैसेनी । कोपेंकरोनी बोलासी ॥ ६७ ॥
राम कैंचा कोठील कोण । तुज कोपाया काय कारण ।
कोठें पाहिला लक्ष्मण । वानरगण ते कैंचे ॥ ६८ ॥
कैंचा बिभीषण शरणागत । कोठें रावणेंसीं झुंज होत ।
लक्ष्मण केंवी झाला मुर्च्छित । कोण हेतु युद्धासीं ॥ ६९ ॥
कोण्या अर्था तूं गेलासी । पर्वत कशालागीं नेतोसी ।
वेळोवेळां राम स्मरसी । रामीं तुम्हासीं सख्य कैंचे ॥ ७० ॥
हा समूळ माझा संदेहो । तुवां छेदावा महाबाहो ।
झणें उदास होसी पहा हो । कथान्वयो सांगतां ॥ ७१ ॥
तुझे मुखीं रामस्मरण । म्हणोनि तुज आलों शरण ।
पुढती घालितों लोटांगण । रामकाथन मज सांग ॥ ७२ ॥
भरत प्रेमाचा संपूर्ण । प्रेमें बांधिला कपिनंदन ।
न ओळखोनि भरतचिन्ह । राम म्हणोन उपहासी ॥ ७३ ॥
उपहासमिषें कपिनाथ । श्रीरामातें वर्णित ।
सूक्ष्म सर्वगत अनंत । सदोदित सांगत ॥ ७४ ॥
हनुमंताचा राग कायम :
किती नेणतेपण घेसी । लटिकाचि प्रेमा दाविसी ।
जगासीं जैसा ठकवितोसी । तैसें मजसीं चालेना ॥ ७५ ॥
उघड सर्वत्र अससी । असोनि विश्वा वेड लाविसी ।
जगींच जगा न दिससी । पाहातां लपसी सूक्ष्मत्वें ॥ ७६ ॥
जे जे पहावया निघाले । ते ते उघडे नागवले ।
नागवे हळहळीत केले । हिंडविले दिगंतीं ॥ ७७ ॥
एकीं अन्नचि वर्जिलें । एक पाला खाऊं लागले ।
एकीं तृणरस सेविले । पाहूं लागले तुजलागीं ॥ ७८ ॥
एकां माथां जटाभार । एकीं वळविलें शरीर ।
एक सेविती उदक मात्र । एकीं नीरही सांडिले ॥ ७९ ॥
एक झाले वल्कलांबर । एक चर्माच्छादनपर ।
एकां तृणाचें शेजार । एकां सविस्तर नरकेश ॥ ८० ॥
एक झाले जी बोडके । दंडी मंडी भगवे सुडके ।
एकीं वेढिलें फडकें । एक बोलके अति चतुर ॥ ८१ ॥
ऐसे पाहती तुजलागीं । सर्वाथा न दिससी जगीं ।
असोनि त्यांच्या सर्वांगीं । भ्रमण वेगीं करविसी ॥ ८२ ॥
तें मजसीं न चले मत । मी जाणतसे समस्त ।
लपलासी जेथ तेथ । मी समस्त सांगेन ॥ ८३ ॥
पाहत्याभेणे लपसीं । बापुडीं वेडा लाविसी ।
शेखीं पाहणे होऊन राहसी । हें कोणासीं लक्षेना ॥ ८४ ॥
निर्धार माग काढितां । वेळ न लगे जळीं बुडतां ।
मत्स्याऐसा तळपतां । लाज सर्वथा असेना ॥ ८५ ॥
ओळखोनि धरितां येथ । रुप आणिकचि धरित ।
हात पाय पोटीं घालून तेथ । पाठी करित अति निबर ॥ ८६ ॥
पर्वत पडिल्या पाठीवरी । ओळखी न देसी तरी ।
तेथें धरितां निर्धारीं । रुपांतरीं लपतोसी ॥ ८७ ॥
धावण्या धांवतां मागेंसीं । भेणें भेणें शूकर होसी ।
वेगीं दांतीं भोय धरिसी । करुणा भाकिसी अनिवार ॥ ८८ ॥
तेथें ओळखितां निर्धारीं । जाभाडें पसरोनि भारी ।
गुरगुर करिसी खांबाभीतरीं । नर ना केसरी होऊन ठाकसी ॥ ८९ ॥
नख केश तिखट भारी । हातें धरोनि अंगावरी ।
उदर चिरोनि नखाग्रीं । करिसी बोहरी पाहत्याची ॥ ९० ॥
निर्धारितां निष्टंक । होसी बापुडा भिकारी रंक ।
दीन कुब्ज होवोनि देख । बळीपासीं भीक मागसी ॥ ९१ ॥
बळी राजा चतुर भारी । तेणें ओळखोनि निर्धारीं ।
धरोनि द्वारपाळ करी । अद्यापिवरी तिष्ठत ॥ ९२ ॥
तेथून लपतां लवडसवडें । माग न सांडिती मागाडे ।
मग आपुले मायेचें मडें । निजनिवाडें काढिसी ॥ ९३ ॥
लटकीच मोकलोनि धाये । रडसी ये माये ये माये ।
लोक म्हणती झालें काये । अपूर्व पाहें केवढें ॥ ९४ ॥
आतांचि पाहां पां रोकडें । किती मेळविलीं माकडें ।
सागरीं तारोनियां गुंडे । लंका कैवाडे घेतली ॥ ९५ ॥
करोनियां महारण । मारविला लक्ष्मण ।
शरणागत बिभीषण । तोही सांडून पळालासी ॥ ९६ ॥
तूं राम मी मारुती । लपणी न चले मजप्रती ।
ऊठ चाल शिघ्रगतीं । ऊर्मिलापती उठवावया ॥ ९७ ॥
घेवोनि मोहाची बुंथी । घेवोनियां दीनवृत्ती ।
कोण म्हणोनि मजप्रती । पुसों निश्चितीं आलासी ॥ ९८ ॥
एक उरलासे रावण । त्यासी मारितां न लगे क्षण ।
न येतां पुच्छीं बांधोनि नेईन । सत्य जाण श्रीरामा ॥ ९९ ॥
उठवीन लक्ष्मण । निर्दळीन रावण ।
अभिषेकीन बिभीषण । तरी मी दूत जाण रामाचा ॥ १०० ॥
सोडवीन सीता सुंदरी । सुर सोडवीन निजगजरीं ।
सुरवरांचे जयजयकारीं । अयोध्यानगरीं प्रवेशों ॥ १ ॥
इतुकें केल्यावीण सर्वथा । तुज ढळों नेदीं मी श्रीरघुनाथा ।
वायां चुकवुं नको आतां । ऊठ तत्वतां जाऊं तेथें ॥ २ ॥
धूरलक्षण ऐसें नव्हे । जेणें स्वामित्वास बाधा पावे ।
ऐसे न धरावें राघवें । वेगीं निघावें युद्धासी ॥ ३ ॥
तूं युद्धधर्म सांडिसी । दूषण लागे सूर्यवंशासी ।
आणि सकळांतें मारविसी । हत्या घेसी निजमाथां ॥ ४ ॥
पूर्वी शिष्टाईचे वेळे । जुझों नेदिसी गोळांगुळें ।
एकाचेनि पापबळें । दीनें सकळें केंवी मारुं ॥ ५ ॥
ऐशा कृपाळु रघुनाथा । न विसंबसी निजभक्तां ।
तें सकळ रणीं सांडितां । दयाळुता काय झाली ॥ ६ ॥
स्वर्गीं चिंतिती सुरवर । रावणा मारील् रामचंद्र ।
बंध सोडवील समग्र । निरंतर वाट पाहती ॥ ७ ॥
ऋषि वाल्मीकाचें भाष्य । अनागत अति सुरस ।
राम मारील रावणास । त्या बोलास साच करीं ॥ ८ ॥
प्रतिपाळावें वेदासी । संरक्षावें पुराणासी ।
नुल्लंघावें ऋषिवचनासी । प्रतिज्ञा ऐशी श्रीरामा ॥ ९ ॥
ते प्रतिज्ञा साच करीम् । रावणातें जीवें मारीं ।
शरणागताचा कैवारी । निजभक्तां करीं उल्लास ॥ ११० ॥
अशोक वनिकेमाझारीं । अडकली सीता सुंदरी ।
तिसी सोडवूनि झडकरी । अभिषेक करीं बिभीषणा ॥ ११ ॥
तुझी आण रघुनाथा । पाऊलही न घालवे सर्वाथा ।
तुजवीण आम्ही सकळ वृथा । असारता भूमिभार ॥ १२ ॥
किती पाहसी निर्वाण् । कासयासाठीं धरिसी मौन ।
तुजवीण न करीं गमन । येथेंचि प्राण आतां सांडीन ॥ १३ ॥
नमन तुझिया पायांसी । लोटांगण चरणासी ।
बहुत झालों कासाविसी । रणीं युद्धासी न वचतां ॥ १४ ॥
अश्रु आले दोहीं डोळां । गात्रें कांती चळचळां ।
सर्वागीं स्वेदकल्लोळ चालिला । कपि विकळ जाऊं पाहे ॥ १५ ॥
भरत शोकविव्हल व हनुमंताला सत्यकथन :
देखतां कपीचें चिन्ह । श्रीरामीं प्रेम गहन ।
भरत झाला मूर्च्छापन्न । देहभावासी जाण विसरला ॥ १६ ॥
नाठवे देहगेहवृत्ती । नाठवे वर्णाश्रमजाती ।
नाठवे स्वजनसंतती । जडली वृत्ती श्रीरामीं ॥ १७ ॥
नाठवे क्रियाकर्म । नाठवे धर्माधर्म ।
नाठवे रुपनाम । भरत सप्रेम पडियेला ॥ १८ ॥
येरीकडे कपिनंदन । झाला अति विस्मयापन्न ।
श्रीराम न होवोनियां कोण । मज संपूर्ण लक्षेना ॥ १९ ॥
दिसे श्रीरामसादृश्य देहीं । एक अंश उणा नाहीं ।
रुपलावण्यगुण कांहीं । उणें नाहीं श्रीरामा ॥ २० ॥
ठाणमाण नेटका । मेघश्याम तनु देखा ।
कांसे पीतांबर सुरेखा । स्वरुप देखा साजिरें ॥ २१ ॥
कपि विचारी मनांत । तंव भरत झाला सावचित्त ।
घालोनि लोटांगण त्वरित । कपिनाथ विनविला ॥ २२ ॥
तूं रामाचा निजभक्त । सखा जिवलग हनुमंत ।
रामाज्ञेसीं नित्यांकित । राम सेवित सर्वदा ॥ २३ ॥
मी श्रीरामाचा धाकटा बंधु । भजनहीन महामंदु ।
नायकें श्रीरामकथागंधु । अभाग्यसिंधु मी एक ॥ २४ ॥
नायकें श्रीरामाचें नाम । नाठवें श्रीरामाचें कर्म ।
न देखें श्रीरामाचें प्रेम । भजनाधम मी एक ॥ २५ ॥
तूं सभाग्य कपिनंदना । सबाह्य वेंचिलें श्रीरामभजना ।
रामेंवीण नेणसी आना । प्रेमा गहन श्रीरामीं ॥ २६ ॥
सर्वेंद्रियांच्या ठायीं । राम कोंदला तुझे देहीं ।
रामावांचून नेणसी कांही । म्हणोनि पाहीं विनवीत ॥ २७ ॥
आजी चौदा वर्षांपाठीं । कपि तुझ्या वाक्पुटीं ।
ऐकिली श्रीरामाची गोष्टी । तेणें पोटीं अवस्था ॥ २८ ॥
ऐकावया श्रीरामकथा । अंतरी अनिवार अवस्था ।
भक्तोत्तमा कपिनाथा । उदासता नसावी ॥ २९ ॥
अहर्निशीं हेंचि चिंतित । जो कोणी सांगेल रामचरित ।
आजी तूं भेटलासी येथ । तरी साद्यंत मज सांग ॥ १३० ॥
हनुमंताला चिंता :
उल्लंघोनि जासी येथ । तरी मज होईल प्राणांत ।
तुज कोपेल रघुनाथ । उपेक्षिला भरत काय म्हणोनी ॥ ३१ ॥
तिकडे स्वामी क्षोभेल । इकडे माझा प्राण जाईल ।
समाधान । ऐकोनियां कपिनंदन । लोटांगण घालित ॥ ३३ ॥
मज सांगतां वृत्तांत । विलंब लागों पाहे येथ ।
उदया येतांचि भास्वत । होईल घात सौमित्रा ॥ ३४ ॥
ब्रह्मशक्ति महादारुण । वरी पडतां रविकिरण ।
सौमित्राचा जाईल प्राण । म्हणोनि त्वरेनें जातसें ॥ ३५ ॥
जरी प्रीती सौमित्रासीं । श्रीरामातें पाहूं इच्छिसी ।
तरी गोवूं नको मजसीं । ओषधींसी नेऊं दे ॥ ३६ ॥
तुज माझें लोटांगण । शिघ्र द्यावें आज्ञापन ।
विलंबी होईल महाविघ्न । प्राण लक्ष्मण सोडील ॥ ३७ ॥
भरताचे सूर्योदय थोपविण्याचे हनुमंताला आश्वासन :
ऐकतां कपीची मात । भरत क्रोधें कृतांत ।
उदया येतां भास्वत । करीन घात तयाचा ॥ ३८ ॥
वाहतों श्रीरामाची आण । वृत्तांत न सांगता संपूर्ण ।
तत्काळ माझा जाईल प्राण । अर्ध क्षण न लागतां ॥ ३९ ॥
एकां वांचवूं जातोसी । दुजियातें जीवें मारिसी ।
इतकेनि सुख नव्हे श्रीरामासी । कपि जाणसी तें करीं ॥ १४० ॥
माझा प्राण जाईल येथ । शत्रुघ्न तत्काळ करील घात ।
तिघी माता त्वरित । प्राणघात करतील ॥ ४१ ॥
ऐकोनी युद्धकथा । आकांत होईल गा समस्तां ।
साद्यंत वृत्तांत न सांगता । करिशील घाता सर्वांच्या ॥ ४२ ॥
मग येथील चरित्र । श्रीरामासी सांग सविस्तर ।
मारोनि माता सहोदर । येथें सत्वर मी आलों ॥ ४३ ॥
ऐकोनियां भरतवचन । हनुमान अत्यंत विस्मयापन्न ।
यासी न देतां समाधान । गमन आपण करुं नये ॥ ४४ ॥
उल्लंघितां भरतासी । राम क्षोभेल मानसीं ।
जगीं होईल अपेशी । सज्जनासी उल्लंघितां ॥ ४५ ॥
ओषधी मंदतेज होती । वेगें क्षोभेल रघुपती ।
हे चुकवावी अपकीर्तीं । भरत चित्तीं सुखावूं ॥ ४६ ॥
उदयां येतां गभस्ती । त्यासी मारीन निश्चितीं ।
रवि माझी जाणे शक्ती । बाळपणीं ख्याती केली जे ॥ ४७ ॥
आतां तरी झालो टणक । श्रीरामभजनीं अवंचक ।
रवि बापुडें कोण मशक । उदया देख यावया ॥ ४८ ॥
ऐसें विचारोनि मानसीं । छळणें पुसे भरतासी ।
उदया येतां रवीसी । अनर्थासी कारण ॥ ४९ ॥
ऐकोनि कपीचें उत्तर । पोळलें भरताचें अंतर ।
बोलों आदरिलें खडतर । कपि उत्तर ऐकत ॥ १५० ॥
न साधतां रामकार्यासी । उदया पावतां रवीसी ।
समूळ छेदीन मी त्यासी । बाणाग्रेंसीं क्षणार्धें ॥ ५१ ॥
तुज उशीर होईल जरी । तरी सपर्वत बाणाग्रीं ।
बैसवोनियां रामशरीं । क्षणामाझारीं पाववीन ॥ ५२ ॥
एका जनार्दना शरण । हनुमान देईल समाधान ।
अति गोड निरुपण । सावधान परिसावें ॥ ५३ ॥
चतुर एका जनार्द । करितां निजगुणानुकथन ।
शब्दासी उपरित होऊन । निजरुपीं लीन तो झाला ॥ ५४ ॥
स्वयें निजरुपी लीन झाला । तरी न राहे उगला ।
निजकथा गावया वहिला । राहून ठेला साक्षित्वें ॥ ५५ ॥
कदाचित चुकवूनि जाये । म्हणऊ आड उभा राहे ।
सरासाचि लागला आहे । परता नव्हे अणुमात्र ॥ ५६ ॥
तरी भरंवसा नाहीं पोटीं । म्हणऊन श्रीरामासीं मज गांठी ।
घालोनि ठेला अवचटीं । अति संकटीं सांडीना ॥ ५७ ॥
लागलासे जेथ जेथ । कांहींही न चले मत ।
शोधूनि अहंबुद्धि चित्त । क्षीणवृत्त मज केलें ॥ ५८ ॥
सबाह्य माझा करोनि गोळा । एकाएकीं पालटोनि ठेला ।
उपाय सर्वाथा तुटला । पडल्या पडल्या गाववी ॥ ५९ ॥
झणें मी मौनी राहें । म्हणोनि वाचेंसीं स्वयें होये ।
निजकीर्ती स्वयें गाये । करुं काय मी आतां ॥ १६० ॥
कांही न चले सर्वथा । चौखरिलोंचि तत्वतां ।
शरण आलों साधुसंतां । विचार आतां मज सांगा ॥ ६१ ॥
नेणें प्रेमाचे बोल । प्रमेय उथळ कीं सखोल ।
नेणें पदबंधव्युत्पत्ती । रीघ नाहीं संस्कृतीं ॥ ६२ ॥
लेखणी देवोनी हातीं । राम निजकीर्ती लिहवितो ॥ ६३ ॥
यालागीं जी स्वामिनाथा । मज बोल नाहीं सर्वथा ।
वरद हस्त माझे माथां । ठेवू आतां क्षमा कीजे ॥ ६४ ॥
तंव कृपाळु साधुजन । उभय हस्तें आलिंगून ।
स्वयें बोलते झाले वचन । अमृताहून सुखकारी ॥ ६५ ॥
तूं कां भाकितोसि करुणा । कासयासी होतोसि दीन ।
वक्ता एक जनार्दन । तेथें तूं कोण परिहारा ॥ ६६ ॥
तुझेनि मुखें हे कथा । आवडली श्रीरघुनाथा ।
वाचे वचन आणि वक्ता । स्वयें तत्वतां होवोनि ठेला ॥ ६७ ॥
फुंक भरोनि मसकेसीं । आवडे स्वामीचिया मानसीं ।
ध्वनि वाजवी जैसी तैसी । संबध मसकेसीं असेना ॥ ६८ ॥
ऐसें निजकृपा साधुवचन । निवविला एका जनार्दन ।
उल्लास पावोनि चौगुण । लोटांगणें विनवीत ॥ ६९ ॥
पुढील कथानुसंधान । भरतामकथा श्रवण ।
करोनि कपीचें पूजन । बाणीं बैसवून बोळवील ॥ १७० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे यद्धकांडे एकाकारटीकायां भरतहनूमद्दर्शनं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४७ ॥
ओंव्या ॥ १७० ॥ श्लोक ॥ १ ॥ एवं ॥ १७१ ॥
GO TOP
|