लक्ष्मणेन्द्रजितो रुषा संवादो मिथो युद्धं च -
|
लक्ष्मण आणि इन्द्रजित यांचे परस्परांतील रोषपूर्ण संभाषण आणि घोर युद्ध -
|
विभीषणवचः श्रुत्वा रावणिः क्रोधमूर्च्छितः । अब्रवीत् परुषं वाक्यं क्रोधेनाभ्युत्पपात ह ॥ १ ॥
|
विभीषणाचे हे वचन ऐकून रावणकुमार इन्द्रजित क्रोधाने जणुं मूर्च्छित झाल्यासारखा झाला. तो रोषाने कठोर भाषण करू लागला आणि उसळून समोर आला. ॥१॥
|
उद्यतायुधनिस्त्रिंशो रथे सुसमलङ्कृते । कालाश्वयुक्ते महति स्थितः कालान्तकोपमः ॥ २ ॥
|
त्याने खड्ग आणि दुसरी आयुधेही उचलून घेतली होती. काळ्या घोड्यांनी युक्त सजविलेल्या विशाल रथात बसलेला इन्द्रजित विनाशकारी काळासमान भासत होता. ॥२॥
|
महाप्रमाणमुद्यम्य विपुलं वेगवद् दृढम् । धनुर्भीमबलो भीमं शरांश्चामित्रनाशनान् ॥ ३ ॥
|
तो भयंकर बलशाली निशाचर फार मोठ्या आकाराचे, लांब, मजबूत, वेगवान् आणि भयानक धनुष्य आणि शत्रूंचा नाश करण्यास समर्थ बाणांना घेऊन युद्धासाठी उद्यत झाला होता. ॥३॥
|
तं ददर्श महेष्वासो रथस्थः समलङ्कृतः । अलङ्कृतममित्रघ्नो राघवस्यात्मजो बली ॥ ४ ॥
हनुमत्पृष्ठमारूढं उदयस्थरविप्रभम् ।
|
वस्त्राभूषणांनी अलंकृत होऊन रथात बसलेल्या त्या महाधनुर्धर शत्रुनाशक बलवान् रावणकुमाराने पाहिले, लक्ष्मण आपल्या तेजानेच विभूषित होऊन हनुमानाच्या पाठीवर आरूढ होऊन उदयाचलावर विराजमान सूर्यदेवाप्रमाणे प्रकाशित होत आहेत. ॥४ १/२॥
|
उवाचैनं सुसंरब्धः सौमित्रिं सविभीषणम् ॥ ५ ॥
तांश्च वानरशार्दूलान् पश्यध्वं मे पराक्रमम् । अद्य मत्कार्मुकोत्सृष्टं शरवर्षं दुरासदम् ॥ ६ ॥
मुक्त वर्षमिवाकाशे वारयिष्यथ संयुगे ।
|
पहातांच तो अत्यंत रोषाने भरून गेला आणि विभीषणासहित सौमित्र तसेच अन्य वानरसिंहांना म्हणला - ’शत्रूंनो ! आज माझा पराक्रम पहा. तुम्ही सर्व लोक युद्धस्थळी माझ्या धनुष्यांतून सुटलेल्या बाणांची दु:सह वृष्टि आपल्या अंगावर, आकाशांतून होणारी उन्मुक्तवृष्टि भूतलावरील प्राणी जशी आपल्या शरीरावर धारण करतात त्याप्रमाने धारण कराल. ॥५-६ १/२॥
|
अद्य वो मामका बाणा महाकार्मुकनिःसृताः । विधमिष्यन्ति गात्राणि तूलराशिमिवानलः ॥ ७ ॥
|
जसे आग कापसाच्या ढीगाला जाळून टाकते, त्याप्रकारे या विशाल धनुष्यातून सुटलेले माझे बाण आज तुमच्या शरीराच्या ठिकर्या ठिकर्या उडवतील. ॥७॥
|
तीक्ष्णसायकनिर्भिन्नान् शूलशक्त्यृष्टितोमरैः । अद्य वो गमयिष्यामि सर्वानेव यमक्षयम् ॥ ८ ॥
|
आज आपल्या शूल, शक्ति, ऋष्टि आणि तोमरांच्या द्वारे तसेच तीक्ष्ण सायकांनी छिन्न-भिन्न करून मी तुम्हां लोकांना यमलोकी पोहोचवून देईन. ॥८॥
|
सृजतः शरवर्षाणि क्षिप्रहस्तस्य संयुगे । जीमूतस्येव नदतः कः स्थास्यति ममाग्रतः ॥ ९ ॥
|
युद्धस्थळी हत्तींना फार वेगाने चालवून जेव्हा मी मेघासमान गर्जना करीत बाणांची वृष्टि करण्यास आरंभ करीन त्यासमयी कोण माझ्या समोर टिकू शकेल ? ॥९॥
|
रात्रियुद्धे मया पूर्वं वज्राशनिसमैः शरैः । शायितौ स्थो मया भूमौ विसंज्ञौ सपुरःसरौ ॥ १० ॥
स्मृतिर्न तेऽस्ति वा मन्ये व्यक्तं वा यमसादनम् । आशीविषसमं क्रुद्धं यन्मां योद्धुं उपस्थितः ॥ ११ ॥
|
लक्ष्मणा ! त्या दिवशी रात्रीच्या युद्धात मी वज्र आणि अशनि समान तेजस्वी बाणांच्या द्वारे जे प्रथम तुम्हा दोघा भावांना रणभूमीमध्ये झोपवले होते आणि तुम्ही लोक अग्रगामी सैनिकांसहित मूर्च्छित होऊन पडला होतात, मी समजतो की त्याचे यासमयी तुम्हांला स्मरण राहिलेले नाही. विषधर सर्पासमान रोषाने भरलेल्या माझ्याबरोबर - इन्द्रजिता बरोबर ज्या अर्थी तुम्ही युद्ध करण्यसाठी उपस्थित झाला आहात, त्यावरून हे स्पष्ट कळून येत आहे की तुम्ही यमलोकात जाण्यासाठी उद्यत आहात. ॥१०-११॥
|
तच्छुत्वा राक्षसेन्द्रस्य गर्जितं राघवस्तदा । अभीतवदनः क्रुद्धो रावणिं वाक्यमब्रवीत् ॥ १२ ॥
|
राक्षसराजाच्या मुलाची ती गर्जना ऎकून राघव - लक्ष्मण त्यावेळी कुपित झाले. त्यांच्या मुखावर भयाचे कोठलेही चिन्ह नव्हते. ते त्या रावणकुमारास म्हणाले - ॥१२॥
|
उक्तश्च दुर्गमः पारः कार्याणां राक्षस त्वया । कार्याणां कर्मणा पारं यो गच्छति स बुद्धिमान् ॥ १३ ॥
|
निशाचरा ! तू केवळ वाणीद्वारा आपल्या शत्रुवध आदि कार्यांच्या पूर्तीची घोषणा केली आहेस, परंतु त्या कार्यांना पूर्ण करणे तुझ्यासाठी फारच कठीण आहे. जो क्रियाद्वारा कर्तव्यकर्मांच्या पार पोहोचतो अर्थात जो बोलत नाही, काम पूरे करून दाखवतो, तोच पुरूष बुद्धिमान् आहे. ॥१३॥
|
स त्वमर्थस्य हीनार्थो दुरवापस्य केनचित् । वचो व्याहृत्य जानीषे कृतार्थोऽस्मीति दुर्मते ॥ १४ ॥
|
दुर्मते ! तू आपल्या अभीष्ट कार्याची सिद्धि करण्यास असमर्थ आहेस. जे कार्य कोणाच्याही द्वारा सिद्धिस जाणे कठीण आहे ते केवळ वाणीच्या द्वारा बोलून तू आपल्याला कृतार्थ मानत आहेस ? ॥१४॥
|
अन्तर्धानगतेनाजौ यत्त्वया चरितस्तदा । तस्कराचरितो मार्गो नैष वीरनिषेवितः ॥ १५ ॥
|
त्या दिवशी संग्रामात स्वत:ला लपवून ठेवून तू ज्याचा आश्रय केला होतास तो चोरांचा मार्ग आहे. वीर पुरूष त्याचे सेवन करीत नाहीत. ॥१५॥
|
यथा बाणपथं प्राप्य स्थितोऽस्मि तव राक्षस । दर्शयस्वाद्य तत्तेजो वाचा त्वं किं विकत्थसे ॥ १६ ॥
|
राक्षसा ! या समयी मी तुझ्या बाणांच्या मार्गात येऊन उभा आहे. आज तुझे आपले ते तेज दाखव, केवळ तोंडाने बडबड करून वल्गना का करीत आहेस ? ॥१६॥
|
एवमुक्तो धनुर्भीमं परामृश्य महाबलः । ससर्ज निशितान् बाणान् इन्द्रजित् समितिञ्जयः ॥ १७ ॥
|
लक्ष्मणांनी असे म्हटल्यावर संग्रामविजयी महाबली इन्द्रजिताने आपले भयंकर धनुष्य दृढतापूर्वक पकडून तीक्ष्ण बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥१७॥
|
तेन सृष्टा महावेगाः शराः सर्पविषोपमाः । सम्प्राप्य लक्ष्मणं पेतुः श्वसन्त इव पन्नगाः ॥ १८ ॥
|
त्याने सोडलेले महान् वेगशाली बाण सापाच्या विषाप्रमाणे विषारी होते. ते फुसकारत येणार्या सर्पासमान लक्ष्मणांच्या शरीरावर पडू लागले. ॥१८॥
|
शरैरतिमहावेगैः वेगवान् रावणात्मजः । सौमित्रिमिन्द्रजिद् युद्धे विव्याध शुभलक्षणम् ॥ १९ ॥
|
वेगवान् रावणकुमार इन्द्रजिताने त्या अत्यंत वेगवान् बाणांच्या द्वारा युद्धात शुभलक्षणी लक्ष्मणास घायाळ करून टाकले. ॥१९॥
|
स शरैरतिविद्धाङ्गो रुधिरेण समुक्षितः । शुशुभे लक्ष्मणः श्रीमान् विधूम इव पावकः ॥ २० ॥
|
बाणांनी त्यांचे शरीर अत्यंत क्षत-विक्षत झाले. ते रक्ताने न्हाऊन गेले. त्या अवस्थेत श्रीमान् लक्ष्मण धूमरहित प्रज्वलित अग्निसमान शोभून दिसत होते. ॥२०॥
|
इन्द्रजित् त्वात्मनः कर्म प्रसमीक्ष्याभिगम्य च । विनद्य सुमहानादं इदं वचनमब्रवीत् ॥ २१ ॥
|
इन्द्रजित आपला हा पराक्रम पाहून लक्ष्मणांच्या जवळ जाऊन मोठ्या जोराने गर्जना करत असे म्हणाला - ॥२१॥
|
पत्रिणः शितधारास्ते शरा मत्कार्मुकच्युताः । आदास्यन्तेऽद्य सौमित्रे जिवितं जिवितान्तकाः ॥ २२ ॥
|
सौमित्र ! माझ्या धनुष्यातून सुटणारे तीक्ष्ण धार असलेले पंखधारी बाण शत्रूच्या जीवनाचा अंत करून टाकणारे आहेत. हे आज तुमचा प्राण घेऊनच राहातील. ॥२२॥
|
अद्य गोमायुसङ्घाश्च श्येनसङ्घाश्च लक्ष्मण । गृध्राश्च निपतन्तु त्वां गतासुं निहतं मया ॥ २३ ॥
|
लक्ष्मणा ! आज माझ्या द्वारे मारले गेल्यावर ज्यावेळी तुमचे प्राण निघून जातील, तेव्हा तुमच्या प्रेतावर झुंडीच्या झुंडी कोल्हे, ससाणे आणि गिधाडे तुटून पडतील. ॥२३॥
|
क्षत्रबन्धुं सदानार्यं रामः परमादुर्मतिः । भक्तं भ्रातरमद्यैव त्वां द्रक्ष्यति हतं मया ॥ २४ ॥
|
परम दुर्बुद्धि राम तुझ्यासारख्या अनार्य, क्षत्रियाधम, तसेच आपल्या भक्त भावाला आजच माझ्या द्वारे मारला गेलेला पहातील. ॥२४॥
|
विस्त्रस्तकवचं भूमौ व्यपविद्धशरासनम् । हृतोत्तमाङ्गं सौमित्रे त्वामद्य निहतं मया ॥ २५ ॥
|
सौमित्र ! तुमचे कवच सुटून पृथ्वीवर पडून जाईल, धनुष्यही दूर जाऊन पडेल आणि तुमचे मस्तकही धडापासून अलग केले जाईल. या अवस्थेत राम आज माझ्या हाताने मारल्या गेलेल्या तुला पहातील. ॥२५॥
|
इति ब्रुवाणं संक्रुद्धः परुषं रावणात्मजम् । हेतुमद् वाक्यमर्थज्ञो लक्ष्मणः प्रत्युवाच ह ॥ २६ ॥
|
याप्रकारे कठोर वचने बोलणार्या इन्द्रजिताला आपले प्रयोजन जाणणारे लक्ष्मणांनी कुपित होऊन असे युक्तियुक्त उत्तर दिले - ॥२६॥
|
वाग्बलं त्यज दुर्बुद्धे क्रूरकर्मन् हि राक्षस । अथ कस्माद् वदस्येतत् सम्पादय सुकर्मणा ॥ २७ ॥
|
क्रूरकर्म करणार्या दुर्बुद्धि राक्षसा ! वाग्वल सोडून दे. तू ह्या सर्व गोष्टी कशासाठी सांगत आहेस ? करून दाखव. ॥२७॥
|
अकृत्वा कत्थसे कर्म किमर्थमिह राक्षस । कुरु तत्कर्म येनाहं श्रद्दध्यां तव कत्थनम् ॥ २८ ॥
|
निशाचरा ! जे काम अजून केलेले नाही, त्यासाठी येथे व्यर्थ बढाया का मारीत आहेस ? तू जे काही सांगत आहेस ते कार्य पूरे कर की ज्यायोगे माझा तू फुलवून सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसेल. ॥२८॥
|
अनुक्त्वा परुषं वाक्यं किञ्चिदप्यनवक्षिपन् । अविकत्थन् वधिष्यामि त्वां पश्य पुरुषादन ॥ २९ ॥
|
नरभक्षी राक्षसा ! तू पाहून घे मी काही कठोर वचन न बोलतां तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप न करता, आत्मप्रशंसा न करताच तुझा वध करीन. ॥२९॥
|
इत्युक्त्वा पञ्च नाराचान् आकर्णापूरितान् शितान् । निजघान महावेगान् लक्ष्मणो राक्षसोरसि ॥ ३० ॥
|
असे म्हणून लक्ष्मणांनी त्या राक्षसाच्या छातीमध्ये अत्यंत वेगाने पाच नाराच मारले, जे धनुष्य (आकर्ण) कानापर्यंत खेचून सोडले गेले होते. ॥३०॥
|
सुपत्रवाजिता बाणा ज्वलिता इव पन्नगाः । नैर्ऋतोरस्यभासन्त सवितू रश्मयो यथा ॥ ३१ ॥
|
सुंदर पंखांमुळे अत्यंत वेगाने जाणारे आणि प्रज्वलित सर्पासमान दिसून येणारे ते बाण त्या राक्षसाच्या छातीवर सूर्यकिरणांसमान प्रकाशित होत होते. ॥३१॥
|
स शरैराहतस्तेन सरोषो रावणात्मजः । सुप्रयुक्तैस्त्रिभिर्बाणैः प्रतिविव्याध लक्ष्मणम् ॥ ३२ ॥
|
लक्ष्मणांच्या बाणांनी आहत होऊन रावणकुमार रोषाने संतप्त झाला. त्याने उत्तम प्रकारे सोडालेल्या तीन बाणांनी लक्ष्मणालाही घायाळ करून बदला घेतला. ॥३२॥
|
स बभूव तदा भीमो नरराक्षससिंहयोः । विमर्दस्तुमुलो युद्धे परस्परजयैषिणोः ॥ ३३ ॥
|
एका बाजूस पुरुषसिंह लक्ष्मण होते तर दुसर्या बाजूस राक्षससिंह इन्द्रजित ! दोघेही युद्धस्थळी एक दुसर्यावर विजय मिळवू इच्छित होते. त्या दोघांचे ते तुमुल युद्ध महाभयंकर होते. ॥३३॥
|
विक्रान्तौ बलसम्पन्नौ उभौ विक्रमशालिनौ । उभौ परमदुर्जेयौ अतुल्यबलतेजसौ ॥ ३४ ॥
|
ते दोन्ही वीर पराक्रमी, बलसम्पन्न, विक्रमशाली, परम दुर्जय तसेच अनुपम बल आणि तेजांनी युक्त असल्याने अत्यंत दुर्जय होते. ॥३४॥
|
युयुधाते तदा वीरौ ग्रहाविव नभोगतौ । बलवृत्राविव हि तौ युधि वै दुष्प्रधर्षणौ ॥ ३५ ॥
|
जशी आकाशात दोन ग्रहांची टक्कर व्हावी त्याचप्रमाणे ते दोन्ही वीर परस्परांशी झुंजत होते. त्या युद्धस्थळी ते इन्द्र आणि वृत्रासुराप्रमाणे दुर्धर्ष भासत होते. ॥३५॥
|
युयुधाते महात्मानौ तदा केसरिणाविव । बहूनवसृजन्तौ हि मार्गणौघानवस्थितौ । नरराक्षसमुख्यौ तौ प्रहृष्टावभ्ययुध्यताम् ॥ ३६ ॥
|
ते महामनस्वी नरश्रेष्ठ तसेच राक्षसप्रवर वीर ज्याप्रमाणे दोन सिंह आपसात लढत असावेत त्याप्रमाणे युद्ध करत होते आणि बर्याचशा बाणांची वृष्टि करीत युद्धभूमीत पाय रोवून उभे होते. दोघे अत्यंत हर्षाने आणि उत्साहाने एक दुसर्याचा सामना करीत होते. ॥३६॥
|
ततः शरान् दाशरथिः सन्धायामित्रकर्षणः । ससर्ज राक्षसेन्द्राय क्रुद्धः सर्प इव श्वसन् ॥ ३७ ॥
|
त्यानंतर दशरथनन्दन शत्रुसूदन लक्ष्मणांनी कुपित होऊन सर्पाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊन आपल्या धनुष्यावर अनेक बाण ठेवले आणि त्या सर्वांना राक्षसराज इन्द्रजितावर सोडले. ॥३७॥
|
तस्य ज्यातलनिर्घोषं स श्रुत्वा राक्षसाधिपः । विवर्णवदनो भूत्वा लक्ष्मणं समुदैक्षत ॥ ३८ ॥
|
त्यांच्या धनुष्याच्या दोरीपासून प्रकट होणार्या टणत्काराला ऐकून राक्षसराज इन्द्रजिताचे मुख उदास झाले आणि तो गुपचुप लक्ष्मणांकडे पाहू लागला. ॥३८॥
|
विवर्णवदनंमुखं दृष्ट्वा राक्षसं रावणात्मजम् । सौमित्रिं युद्धसंयुक्तं प्रत्युवाच विभीषणः ॥ ३९ ॥
|
रावणकुमार इन्द्रजिताचे उदास मुख पाहून विभीषणाने युद्धात गुंतलेल्या सौमित्राला म्हटले - ॥३९॥
|
निमित्तान्युप पश्यामि यान्यस्मिन् रावणात्मजे । त्वर तेन महाबोहो भग्न एष न संशयः ॥ ४० ॥
|
महाबाहो ! या समयी रावणपुत्र इन्द्रजिताच्या ठिकाणी मला जी लक्षणे दिसून येत आहेत, त्यावरून कळून येत आहे की नि:संदेह त्याचा उत्साह भंग पावला आहे म्हणून आपण त्याच्या वधासाठी शीघ्रता करावी. ॥४०॥
|
ततः सन्धाय सौमित्रिः शरानाशीविषोपमान् । मुमोच विशिखांस्तस्मिन् सर्पानिव विषोल्बणान् ॥ ४१ ॥
|
तेव्हा सौमित्राने विषधर सर्पांसमान भयंकर बाण धनुष्यावर चढविले, आणि त्यांना इन्द्रजितास लक्ष्य करून सोडले. ते बाण कुठले, महाविषारी सर्पच होते. ॥४१॥
|
शक्राशनिसमस्पर्शैः लक्ष्मणेनाहतः शरैः । मुहूर्तमभवन्मूढः सर्वसङ्क्षुभितेन्द्रियः ॥ ४२ ॥
|
त्या बाणांचा स्पर्श इन्द्राच्या वज्राप्रमाणे दु:सह होता. लक्ष्मणांनी सोडलेल्या त्या बाणांचा आघात होताच इन्द्रजित एक मुहूर्तपर्यंत मूर्च्छित झाला. त्याची सारी इन्द्रिये विक्षुब्ध झाली. ॥४२॥
|
उपलभ्य मुहूर्तेन संज्ञां प्रत्यागतेन्द्रियः । ददर्शावस्थितं वीरं वीरो दशरथात्मजम् । सोऽभिचक्राम सौमित्रिं रोषात् संरक्तलोचनः ॥ ४३ ॥
|
थोड्या वेळाने जेव्हा तो भानावर आला आणि इन्द्रिये सुस्थिर झाली तेव्हा त्याने रणभूमीमध्ये दशरथकुमार वीर लक्ष्मणास उभा असलेला पाहिले. पहाताच त्याचे नेत्र रोषाने लाल झाले आणि तो सौमित्राच्या समोर गेला. ॥४३॥
|
अब्रवीच्चैनमासाद्य पुनः स परुषं वचः । किं न स्मरसि तद् युद्धे प्रथमे मत्पराक्रमम् । निबद्धस्त्वं सह भ्रात्रा यदा भुवि विचेष्टसे ॥ ४४ ॥
|
तेथे पोहोचून तो त्यांना कठोरवाणीने म्हणाला - ’सौमित्रा ! प्रथम मी युद्धात जो पराक्रम दाखविला होता काय तुम्ही तो विसरून गेलात ? त्या दिवशी तुम्हांला आणि तुमच्या भावालाही मी बांधून ठेवले होते. त्या समयी तुम्ही युद्धभूमीमध्ये पडल्या पडल्या तडफडत होता. ॥४४॥
|
युवां खलु महायुद्धे शक्राशनिसमैः शरैः । शायितौ प्रथमं भूमौ विसंज्ञौ सपुरःसरौ ॥ ४५ ॥
|
त्या महायुद्धात वज्र आणि अशनिसमान तेजस्वी बाणांच्या द्वारे मी तुम्हा दोघा भावांना प्रथम जमिनीवर झोपविले होते. तुम्ही दोघेही आपल्या अग्रगामी सैनिकांसह मूर्च्छित होऊन पडला होतात. ॥४५॥
|
स्मृतिर्वा नास्ति ते मन्ये व्यक्तं वा यमसादनम् । गन्तुमिच्छसि यन्मां त्वमाधर्षयितुमिच्छसि ॥ ४६ ॥
|
अथवा असे कळून येत आहे की तुम्हांला त्या सर्व गोष्टींची आठवण नाही आहे. हे स्पष्ट कळून येत आहे की तुम्ही यमलोकात जाऊ इच्छित आहा. म्हणून तुम्ही मला पराजित करण्याची इच्छा बाळगत आहां. ॥४६॥
|
यदि ते प्रथमे युद्धे न दृष्टो मत्पराक्रमः । अद्य त्वां दर्शयिष्यामि तिष्ठेदानीं व्यवस्थितः ॥ ४७ ॥
|
जर तुम्ही पहिल्या युद्धात माझा पराक्रम पाहिला नसेल तर आज तुम्हांला दाखवून देईन. यासमयी सुस्थिर भावाने उभे राहा. ॥४७॥
|
इत्युक्त्वा सप्तभिबाणैः अभिविव्याध लक्ष्मणम् । दशभिस्तु हनूमन्तं तीक्ष्णधारैः शरोत्तमैः ॥ ४८ ॥
|
असे म्हणून तीक्ष्ण धार असणार्या सात बाणांनी त्याने लक्ष्मणांना घायाळ केले आणी दहा उत्तम सायकांच्या द्वारा हनुमानांवर प्रहार केला. ॥४८॥
|
ततः शरशतेनैव सुप्रयुक्तेन वीर्यवान् । क्रोधाद् द्विगुणसंरब्धो निर्बिभेद विभीषणम् ॥ ४९ ॥
|
त्यानंतर दुप्पट रागाने भडकून त्या पराक्रमी निशाचराने उत्तम प्रकारे सोडलेल्या शंभर बाणांनी विभीषणास क्षत-विक्षत करून टाकले. ॥४९॥
|
तद् दृष्ट्वेन्द्रजिता कर्म कृतं रामानुजस्तदा । अचिन्तयित्वा प्रहसन् एतत् किञ्चिदिति ब्रुवन् ॥ ५० ॥
|
इन्द्रजित द्वारा केला गेलेला हा पराक्रम पाहून रामानुज लक्ष्मणांनी त्याची काही पर्वा केली नाही आणि हसत हसत म्हटले - हे तर काहीच नाही. ॥५०॥
|
मुमोच स शरान् घोरान् सङ्गृह्य नरपुङ्गवः । अभीतवदनः क्रुद्धो रावणिं लक्ष्मणो युधि ॥ ५१ ॥
|
त्याच बरोबर त्या नरश्रेष्ठ लक्ष्मणांनी मुखावर भयाची छायासुद्धा पडू दिली नाही. त्यांनी युद्धस्थळी कुपित होऊन भयंकर बाण हातात घेतले आणि त्यांना रावणकुमारास लक्ष्य करून सोडून दिले. ॥५१॥
|
नैवं रणगताः शूराः प्रहरन्ते निशाचर । लघवश्चाल्पवीर्याश्च सुखा हीमे सुखास्तव ॥ ५१ ॥
|
नंतर ते म्हणाले - ’निशाचरा ! रणभूमीवर आलेले शूरवीर याप्रकारे प्रहार करत नाहीत. तुझे हे बाण फारच हलके आणि कमजोर आहेत. यांच्यापासून कष्ट होत नाहीत - सुखच मिळत आहे. ॥५२॥
|
नैवं शूरास्तु युध्यन्ते समरे युद्धकाङ्क्षिणः । इत्येवं तं ब्रुवन् धन्वी शरैरभिववर्ष ह ॥ ५३ ॥
|
युद्धाची इच्छा ठेवणारे शूरवीर समरांगणात याप्रकारे युद्ध करत नाहीत. असे म्हणून धनुर्धर वीर लक्ष्मणांनी त्या राक्षसावर बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥५३॥
|
तस्य बाणैः सुविध्वस्तं कवचं काञ्चनं महत् । व्यशीर्यत रथोपस्थे ताराजालमिवाम्बरात् ॥ ५४ ॥
|
लक्ष्मणांच्या बाणांनी इन्द्रजिताचे महान् कवच, जे सोन्याचे बनविलेले होते, तुटून रथाच्या बैठकीवर विखरून गेले. जणु आकाशांतून तार्यांचा समूहच तुटून खाली पडला असावा. ॥५४॥
|
विधूतवर्मा नाराचैः बभूव स कृतव्रणः । इन्द्रजित् समरे वीरः प्रत्यूषे भानुमानिव ॥ ५५ ॥
|
कवच तुटल्याने नाराच्यांच्या प्रहारांनी वीर इन्द्रजिताच्या सार्या शरीरात जखमा झाल्या. तो समरांगणात रक्ताने रंगून जाऊन प्रात:कालच्या सूर्याप्रमाणे दिसू लागला. ॥५५॥
|
ततः शरसहस्रेण सङ्क्रुद्धो रावणात्मजः । बिभेद समरे वीरं लक्ष्मणं भीमविक्रमः ॥ ५६ ॥
|
तेव्हा भयानक पराक्रमी वीर रावणकुमाराने अत्यंत कुपित होऊन समरभूमीमध्ये लक्ष्मणांना हजारो बाणांनी घायाळ करून टाकले. ॥५६॥
|
व्यशीर्यत महद्दिव्यं कवचं लक्ष्मणस्य च । कृतप्रतिकृतान्योन्यं बभूवतुररिदमौ ॥ ५७ ॥
|
यामुळे लक्ष्मणांचेही दिव्य आणि विशाल कवच छिन्न-भिन्न झाले. ते दोघेही शत्रुदमन वीर एक दुसर्याच्या प्रहाराचे उत्तर देऊ लागले. ॥५७॥
|
अभीक्ष्णं निश्वसन्तौ तौ युद्ध्येतां तुमुलं युधि । शरसङ्कृत्तसर्वाङ्गौ सर्वतो रुधिरोक्षितौ ॥ ५८ ॥
|
ते वारंवार धापा टाकत भयानक युद्ध करू लागले. युद्धस्थळात बाणांच्या आघाताने दोघांचे सारे अंग क्षत-विक्षत झाले होते. म्हणून ते दोघे सर्व बाजूनी रक्तबंबाळ झाले. ॥५८॥
|
सुदीर्घकालं तौ वीरौ अन्योन्यं निशितैः शरैः । ततक्षतुर्महात्मानौ रणकर्मविशारदौ । बभूवतुश्चात्मजये यत्तौ भीमपराक्रमौ ॥ ५९ ॥
|
दोन्ही वीर दीर्घकाळपर्यत एक दुसर्यावर तीक्ष्ण बाणांचा प्रहार करीत राहिले. दोघेही महामनस्वी तसेच युद्धाच्या कलेत निपुण होते. दोघे भयंकर पराक्रम प्रकट करत होते आणि आपापल्या विजयासाठी प्रयत्नशील होते. ॥५९॥
|
तौ शरौघैस्तथाकीर्णौ निकृत्तकवचध्वजौ । स्रवन्तौ रुधिरं चोष्णं जलं प्रस्रवणाविव ॥ ६० ॥
|
दोघांची शरीरे बाण-समूहांनी व्याप्त झाली होती. दोघांची कवचे आणि ध्वजा तुटून गेलेली होती. जसे दोन निर्झर जल वहावत असावे त्याप्रमाणे दोघेही आपल्या शरीरांतून गरम रक्त प्रवाहित करत होते. ॥६०॥
|
शरवर्षं ततो घोरं मुञ्चतोर्भीमनिःस्वनम् । सासारयोरिवाकाशे नीलयोः कालमेघयोः ॥ ६१ ॥
|
दोघेही भयंकर गर्जनेसहित बाणांची घोर वृष्टि करत राहिले होते, जणु प्रलयकालातील दोन नील मेघ आकाशात जलधारांची वृष्टि करत असावेत. ॥६१॥
|
तयोरथ महान् कालो व्यतीयाद् युध्यमानयोः । न च तौ युद्धवैमुख्यं क्लमं वाप्युपजग्मतुः ॥ ६२ ॥
|
तेथे झुंजत असतांना त्या दोन्ही वीरांचा बराच अधिक काळ व्यतीत झाला. परंतु ते दोघे युद्धापासून विमुखही झाले नाहीत आणि त्यांना थकवाही आला नाही. ॥६२॥
|
अस्त्राण्यस्त्रविदां श्रेष्ठौ दर्शयन्तौ पुनः पुनः । शरानुच्चावचाकारान् अन्तरिक्षे बबन्धतुः ॥ ६३ ॥
|
दोघेही अस्त्रवेत्यांमध्ये श्रेष्ठ होते आणि वारंवार आपल्या अस्त्रांचे प्रदर्शन करीत होते. त्यांनी आकाशांत लहान-मोठ्या बाणांचे जणु जाळेच बांधले. ॥६३॥
|
व्यपेतदोषमस्यन्तौ लघु चित्रं च सुष्ठु च । उभौ तौ तुमुलं घोरं चक्रतुर्नरराक्षसौ ॥ ६४ ॥
|
ते मनुष्य आणि राक्षस - दोन्ही वीर अत्यंत उत्साहाने अद्भुत आणि सुंदर रीतीने बाणांचा प्रहार करत होते. त्यांच्या बाण सोडण्याच्या कलेत काही दोष दिसून येत नव्हता. ते दोघे घनघोर युद्ध करत होते. ॥६४॥
|
तयोः पृथक् पृथक् भीमः शुश्रुवे तलनिस्वनः । स कम्पं जनयामास निर्घात इव दारुणः ॥ ६५ ॥
|
बाण सोडतांना त्या दोघांच्या हातांच्या तळव्यांचा आणि प्रत्यञ्चेचा भयंकर आणि तुमुल नाद पृथक-पृथक ऐकू येत होता, जो भयंकर वज्रपाताच्या आवाजाप्रमाणे श्रोत्यांच्या हृदयात कंप उत्पन्न करीत होता. ॥६५॥
|
तयोः स भ्राजते शब्दः तथा समरमत्तयोः । सुघोरयोर्निष्टनतोः गगने मेघयोरिव ॥ ६६ ॥
|
त्या दोन्ही रणोन्मत्त वीरांचा तो शब्द आकाशात परस्परांशी टकरून दोन महाभयंकर मेघांच्या गडगडाटासमान सुशोभित होत होता. ॥६६॥
|
सुवर्णपुङ्खैर्नाराचैः बलवन्तौ कृतव्रणौ । प्रसुस्रुवाते रुधिरं कीर्तिमन्तौ जये धृतौ ॥ ६७ ॥
|
ते दोन्ही बलवान् योद्धे सोन्याचे पंख असलेल्या नाराचांनी घायाळ होऊन शरीरांतून रक्त प्रवाहित करत होते. दोघेही यशस्वी होते आणि आपापल्या विजयासाठी प्रयत्न करत होते. ॥६७॥
|
ते गात्रयोर्निपतिता रुक्मपुङ्खाः शरा युधि । असृग्दिग्धा विनिष्पेतुः विविशुर्धरणीतलम् ॥ ६८ ॥
|
युद्धात त्या दोघांनी सोडलेले सुवर्णमय पंखाचे बाण एक-दुसर्याच्या शरीरावर पडत होते, आणि रक्तांत भिजून बाहेर निघत होते आणि धरणीतलामध्ये समावून जात होते. ॥६८॥
|
अन्ये सुनिशितैः शस्त्रैः आकाशे संजघट्टिरे । बभञ्जुश्चिच्छिदुश्चैव तयोर्बाणाः सहस्रशः ॥ ६९ ॥
|
त्यांचे हजारो बाण आकाशात तीक्ष्ण शस्त्रांना धडकून आणि त्यांना तोडून तुकडे तुकडे करून टाकत होते. ॥६९॥
|
स बभूव रणो घोरः तयोर्बाणमयश्चयः । अग्निभ्यामिव दीप्ताभ्यां सत्रे कुशमयश्च यः ॥ ७० ॥
|
ते फार भयंकर युद्ध चालू होते. त्यात दोघांच्या बाणांचा समूह यज्ञात गार्हपत्य आणि आहवनीय नामक दोन प्रज्वलित अग्निंच्या बरोबर पसरलेल्या कुशांच्या दर्भाच्या ढीगाप्रमाणे भासत होते. ॥७०॥
|
तयोः कृतव्रणौ देहौ शुशुभाते महात्मनोः । सपुष्पाविव निष्पत्रौ वने किंशुकशाल्मली ॥ ७१ ॥
|
त्या दोघा महामनस्वी वीरांची क्षत-विक्षत शरीरे वनात पत्रहीन आणि लाल पुष्पांनी लगडलेल्या पळस आणि शाल्मली वृक्षांप्रमाणे सुशोभित होत होती. ॥७१॥
|
चक्रुतुस्तुमुलं घोरं सन्निपातं मुहुर्मुहुः । इन्द्रजिल्लक्ष्मणश्चैव परस्परजयैषिणौ ॥ ७२ ॥
|
एक दुसर्याला जिंकण्याची इच्छा करणारे इन्द्रजित आणि लक्ष्मण राहून राहून वारंवार भयंकर मारामारी करत होते. ॥७२॥
|
लक्ष्मणो रावणिं युद्धे रावणिश्चापि लक्ष्मणम् । अन्योन्यं तावभिघ्नन्तौ न श्रमं प्रतिपद्यताम् ॥ ७३ ॥
|
लक्ष्मण रणभूमीमध्ये रावणकुमारावर प्रहार करत होते आणि रावणकुमार लक्ष्मणावर. या प्रकारे एक दुसर्यावर प्रहार करतांनाही ते वीर थकत नव्हते. ॥७३॥
|
बाणजालैः शरीरस्थैः अवगाढैस्तरस्विनौ । शुशुभाते महावीर्यो प्ररूढाविव पर्वतौ ॥ ७४ ॥
|
त्या दोन्ही वेगशाली वीरांच्या शरीरात बाणांचे समूह घुसले होते, म्हणून ते दोन्ही महापराक्रमी योद्धे ज्याच्यावर बरेचसे वृक्ष उगवून आले आहेत अशा दोन पर्वतांप्रमाणे शोभत होते. ॥७४॥
|
तयो रुधिरसिक्तानि संवृतानि शरैर्भृशम् । बभ्राजुः सर्वगात्राणि ज्वलन्त इव पावकाः ॥ ७५ ॥
|
बाणांनी झाकलेली आणि रक्तांनी भिजलेली त्या दोघांची सारी अंगे जळत असलेल्या आगीप्रमाणे उद्दीप्त होत होती. ॥७५॥
|
तयोरथ महान् कालो व्यत्ययाद्युध्यमानयोः । न च तौ युद्धवैमुख्यं श्रमं वाप्युपजग्मतुः ॥ ७६ ॥
|
याप्रकारे युद्ध करता करता त्या दोघांचा बराच समय व्यतीत झाला, परंतु ते दोघे युद्धापासून विमुखही झाले नाहीत आणि त्यांना थकवाही आला नाही. ॥७६॥
|
अथ समरपरिश्रमं निहन्तुं समरमुखेष्वजितस्य लक्ष्मणस्य । प्रियहितमुपपादयन् महात्मा समरमुपेत्य विभीषणोऽवतस्थे ॥ ७७ ॥
|
युद्धाच्या तोंडावर पराजित न होणार्या लक्ष्मणांच्या युद्धजनित श्रमाचे निवारण तसेच त्यांचे प्रिय आणि हिताचे सम्पादन करण्यासाठी महात्मा विभीषण युद्धभूमीमध्ये येऊन उभे राहिले. ॥७७॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टाशीतितमः सर्गः ॥ ८८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा अठ्याऎंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८८॥
|