॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ६ वा



Download mp3

पुढें उभी जोडुनि युग कर ती । प्रभुस निरखितां प्रीतिस भरती ॥
स्तुती करूं तव केविं खरारी । अधम जाति मी जडमति भारी ॥
अधमीं अधम अधम अति नारी । त्यांतहि मी मतिमंद अघारी ! ॥
रघुपति म्हणती भामिनि ! वदतो । एक भक्तिनातें च मानतो ॥
जात पात कुल धर्म महत्ता । धन बल परिजन सुगुण चतुरता ॥
भक्तिहीन नर शोभे कैसा । दिसे वारिविण वारिद जैसा ॥
नवधा भक्ति सांगु तुज शबरी । श्रुणु सावध धर हृदयिं दृढ बरी ॥
प्रथम भक्ति संतांची संगति । दुसरी कथा श्रवणिं मम अति रति ॥

दो० :- गुरु-पद-पंकज सेवा तिसरी भक्ति अमान ॥
चौथि भक्ति मम गुणगण त्यजुनि कपट करि गान ॥ ३५ ॥

ती दोन्ही हात जोडून समोर उभी राहिली व प्रभूला निरखून पाहतां पाहतां प्रीतीला भरती आली. ॥ १ ॥ ती म्हणाली, खरारी ! मी तुमची स्तुति कशी करूं शकणार ! मी अधम जातीची व अति जडबुद्धि आहे, मूढ आहे. । २ ॥ अधमांत अधम असलेल्यांत ज्या नारी अति अधम त्यांच्यांत सुद्धा हे अघनाशना ! मी मंदबुद्धि आहे. ॥ ३ ॥ रघुपति म्हणाले, भामिनी ! मी सांगतो की फक्त भक्तीचे एकच नाते मी मानतो. ॥ ४ ॥ जात पात, कुल धर्म महती, धन , बल, परिवार, सद्‌गुण, शहाणपणा (चतुरता) इत्यादि असून भक्तिहीन असलेला नर कशा शोभतो तर वारि (जल) नसलेला वारिद मेघ दिसतो तसाच. ॥ ५-६ ॥ शबरी ! तुला नवविधा भक्ति सांगतो ती सावधान होऊन ऐक व हृदयांत चांगली दृढ धारण कर. ॥ ७ ॥ संतांची संगती ही पहिली मुख्य भक्ति होय. माझ्या कथा श्रवण करण्यांत अति प्रीति ही दुसरी भक्ति होय. ॥ ८ ॥ अमान वगैरे राहून श्रीगुरुचरणकमलांची प्रेमाने सेवा करणे ही तिसरी भक्ति होय, आणि कपटाअदि सोडून माझ्या गुणसमूहांचे गान करणे ही चौथी भक्ति होय. ॥ दो० ३५ ॥

दृढ विश्वासें मंत्र जाप मम । भजन पांचवें श्रुति-कथितोत्तम ॥
शम-दमशील विरति बहुकर्मी- । षष्ठ, सतत रत सज्जन-धर्मी ॥
सप्तम सम, मम मय जग पाही । मजहुनि अधिक मानि संतांही ॥
अष्टम यथालाभिं संतोषी । स्वप्निं न जाइ दृष्टि परदोषीं ॥
नवम सरल सर्वासीं, छल नहिं । मम चि भरंवसा खेद न हर्षहि ॥
एक ही नवांमधें ज्यांपासीं । कुणिहि नारिनर चर अचरासी ॥
तो प्रिय भामिनि अतिशय मजला । भक्ती दृढ तुजमाजीं सकला ॥
योगि-वृंद-दुर्लभ गति जीहि । झाली सुलभ आज तुज तीहि ॥
मम दर्शन फल अनुपम परम हि । लभे जीव निज सहज स्वरूप हि ॥
जनकसुता-शोधा भामिनी । जाणसि वद करिवरगामिनी ॥
पंपासरिं रघुराज जाल जर । सुग्रिव सख्य घडेल तिथें तर ॥
तो सांगेल देव रघुवीरा । सब, जाणुनि पुसतां मतिधीरा ॥
पुनः पुन्हां प्रभुपदिं शिर ठेउनि । प्रेमें सकल कथेला सांगुनि ॥

छं० :- वदुनी कथा धरि पाद-पंकज हृदयिं, हरिमुख बघत ती ।
त्यजि योग-पावकिं देह, हरि पदिं लीन, जिथुन न परतती ॥
नर ! विविध कर्म अधर्म बहुमत शोकदायी त्याग रे ।
तुलसी सुविश्वासें मनीं धर रामपदिं अनुराग रे ॥ १ ॥
दो० :- जाति हीन अघ जन्म महि कृता मुक्त अशि नारि ॥
विसरुनि ऐशा प्रभुस मन जड ! सुख इच्छिसि भारि ॥ ३६ ॥

दृढ विश्वासाने माझ्या मंत्राचा जप ही श्रुतीनी (वेदांनी) सांगितलेली उत्तम अशी पांचवी भक्ति आहे (भजन - भक्ति) ॥ १ ॥ शमदमशील व बहुतकर्मीं विषयीं वैराग्य आणि सतत सज्जनांच्या धर्मांत अतिशय रममाण होणे ही साहवी भक्ति आहे. ॥ २ ॥ सर्व जगाला समान, मजसम (राममय) पाहणे व संत सद्‌गुरु यांना माझ्यापेक्षां अधिक मान देणे ही सातवी भक्ति. ॥ ३ ॥ जे काही यदृच्छेने सहज प्राप्त होईल त्यांत संतोष मानणे व दुसर्‍यांचे दोष स्वप्नांत सुद्धां न पाहणे ही आठवी भक्ति. ॥ ४ ॥ सर्वांशीच सरळ वगणूक, छल कपट मुळीच नाही, माझाच भरंवसा असणे व हर्ष विषाद नसणे ही नववी भक्ति होय. ॥ ५ ॥ या नऊ भक्तींपैकी एकही ज्यांच्या ठिकाणी असेल तो कोणीही स्त्री पुरुष चर अचर असला, ॥ ६ ॥ तरी भामिनी ! तो मला प्रिय होतो. तुझ्यापाशीं तर सगळ्या भक्ति दृढ आहेत. ॥ ७ ॥ जी गति योगीसमूहांना सुद्धां दुर्लभ आहे, तीच आज तुला सुलभ झाली आहे. ॥ ८ ॥ माझ्या दर्शनाचे परम अनुपम फल हेच की जीव आपले सहज स्वरूप पावतो. ॥ ९ ॥ हे भामिनी ! करिवरगामिनी जनकसुतेचा शोध तू जाणत असलीस तर सांग. ॥ १० ॥ रघुराज ! आपण जर पंपासरोवराला जाल तर तिथे सुग्रीवाशी मैत्री घडेल. ॥ ११ ॥ देव रघुवीरा तो सर्व सांगेल मति धीरा ! तुम्ही सर्व जाणत असून मला विचारतां ! ॥ १२ ॥ प्रभूच्या पायांवर वारंवार प्रेमाने मस्तक ठेऊन व प्रेमाने सकल कथा सांगून; ॥ १३ ॥ सर्व कथा सांगून, तिने हरिपादपंकजे हृदयांत धारण केली व हरिमुखाकडे बघत योगपावकाने देहत्याग केला व जेथून परतत नाहींत अशा हरिपदीं लीन झाली. हे नरा ! नाना प्रकारची कर्मे, अधर्म व अनेक मते शोकदायक आहेत त्यांस सोडून दे व तुलसीदास म्हणतात दृढ विश्वासाने रामचरणी अनुराग मनांत धारण कर. ॥ छं ॥ जातिहीन व पापांची जन्मभूमि अशी स्त्री असून तिला मुक्त केली. बा ! जड मना ! अशा प्रभुला विसरून तूं सुखाची फार इच्छा करतोस ? ॥ दो० ३६ ॥

सोडुनि निघति राम तें विपिन हि । अतुल बली नर केसरि उभय हि ॥
प्रभु विरही इव करिति विषादा । वदत अनेक कथा संवादां ॥
पहा लक्ष्मणा कानन शोभा । दिसत कुणा मनिं न करी क्षोभा ॥
हे खगमृग सह नारीवृंदां । फिरति करित जणुं माझी निंदा ॥
मृग निकाय मज पाहुनि पांगति । भय न तुम्हाला मृगी कि सांगति ॥
लुटा मोद तुम्हिं पावुनि मृगजनि । भ्रमति कनकमृग शोधित हे वनिं ॥
करी करिणिनां संगे घेती । जणुं मजला हा धडाच देती ॥
शास्त्र सुचिंतित पुन्हां पहावें । भूप सुसेवित वश न गणावे ॥
राखा स्त्री हृदयामधिं तरि ही । युवती शास्त्र नृपति वश नाहीं ॥
तात वसंता बघ शोभामय । प्रियाहीन मी मज उपजवि भय ॥

दो० :- विरह विकल बलहीन मज अति एकल जाणून ॥
सहित विपिन मधुकर खग येइ मदन चालून ॥ ३७ रा ॥
बघुनि बंधुसह दूत गत सांगे, ऐकुनि मात ॥
कटका थोपवि देइ तळ कामदेव जणुं तात ! ॥ ३७ म ॥

शबरीच्या आश्रमांतून राम निघाले व ते वन सुद्धां त्या दोघा अतुल बलवान नरसिंहानी ओलांडले. ॥ १ ॥ विरही पुरुषाप्रमाणे प्रभु शोक करीत अनेक कथा व संवाद सांगू लागले. ॥ २ ॥ लक्ष्मणा ! बघ तर खरी या अरण्याची शोभा ! ही दिसतांच कोणाच्य मनांत क्षोभ उत्पन्न होणार नाही ? हे सर्व पशुपक्षी समुदाय आपापल्या स्त्रियांसहित आहेत व जणूं माझी निंदा करीत फिरत आहेत. ॥ ४ ॥ मला पाहून मृगांचे समुदाय पळत आहेत बघ ! आणि त्या पहा हरिणी-मृगी त्यांना सांगत आहेत की तुम्हांला मुळीच भय नाही. ॥ ५ ॥ तुम्हीं मृगयोनींत जन्मलां आहांत तर आतां खूप आनंद लुटा ! हे सुवर्णमृगाला शोधीत अरण्यांत भटकत आहेत. ॥ ६ ॥ हत्ती हत्तिणींना बरोबर घेत अहेत व जणूं मला हा धडाच देत आहेत की, ॥ ७ ॥ शास्त्राचे उत्तम चिंतन-अध्ययन केले असले तरी ते पुनः पुन्हां अवलोक करावे, व भूपतीची उत्तम सेवा केली असली तरी तो वश झाला आहे असे समजूं नये. ॥ ८ ॥ स्त्रीला वाटल्यास हृदयांत ठेवा, तरीपण तिचे रक्षण केले पाहिजे. कारण की युवती शास्त्र व नृपति कोणाला वश होत नाहीत. ॥ ९ ॥ तात ! सुंदर वसंताला पहा तर खरे ! मी प्रियाहीन असल्यामुळे तो मला भय उत्पन्न करीत आहे (भिववीत आहे). ॥ १० ॥ मी विरहाने व्याकुल, बलहीन आणि अति एकटा आहे हे जाणून कानन, भ्रमर व पक्षी यांच्यासह मदन माझ्यावर चाल करून येऊं लागला. ॥ दो ३७रा ॥ पण मी बंधुसह आहे हे पाहून त्याचा दूत गेला व त्यास सांगितले तेव्हां ती महत्त्वाची बातमी ऐकून, सैन्याला थोपवून तात ! कामदेव तळ देऊन बसला आहे. ॥ दो० ३७म ॥

लता पसरल्या विटपिं विशालीं । जणुं वनिं विविधा वितान घाली ॥
ध्वजा पताका कदलि ताल वर । बघुनि न मोहे जो हि धीर नर ॥
विविध जाति फुलले तरु नाना । जणुं बहु शरधर सजुनी बाणा ॥
कुठें कुठें तरु रुचिर विराजति । सुटे सुटे भट जणुं बहु राहति ॥
कोकिल कूजति करी मत्तसे । ढेक महोख उंट खेचर से ॥
मोर चकोर कीर वर वाजी । पारावत मराल सब ताजी ॥
तित्तिर लावक पदचर यूथ । कोण वर्णि किति मदन-वरूथ ॥
रथ गिरि-शिला नगारे निर्झर । चातक भाट गाति गुण सुस्वर ॥
मधुकर मुखर भेरि बहु सणया । त्रिविध वायु ये वकील समया ॥
चतुरंगिणी चमू सह घेतो । देत जनां आव्हान फिरे तो ॥
लक्ष्मण ! काम चमूला बघती । राहति धीर जगीं तन्महती ॥
याचें एक परम बल नारी । तींतुन बचे सुभट तो भारी ॥

दो० :- प्रबल तात अति तीन खल काम क्रोध नि लोभ ॥
मुनि विज्ञानधाम मनिं करिती निमिषें क्षोभ ॥ ३८ रा ॥
लोभा इच्छा दंभ बल कामा केवल नारी ॥
क्रोधा बल परुषाक्षरें मुनिवर वदति विचारि ॥ ३८ म ॥

विशाल वृक्षांवर लता अशा पसरल्या आहेत की जणूं नाना प्रकारचे तंबूच ताणले आहेत. ॥ १ ॥ सुंदर केळी व ताडाची झाडे जणू सुंदर ध्वजा पताका आहेत जे धीर असतील त्यांचेच मन यांना पाहून मोहित होणार नाही. ॥ २ ॥ विविधजातींचे तरू नाना प्रकारे फुलले आहेत. तेच जणूं वीरवेष घालून उभे असलेले तिरंदाज आहेत. ॥ ३ ॥ कुठे कुठे सुंदर तरू असे विराजत आहेत की जणूं महावीर भट सुटे सुटे राहिले आहेत. ॥ ४ ॥ कोकिळा कूजन करीत आहेत ते जणूंमत्त हत्तींचे गर्जन चालू आहे - ढेंक व महोख पक्षी उंट व खेचरे यांच्यासारखे आवाज काढीत आहेत. ॥ ५ ॥ मोर चक्रवाक व पोपट हे जणूं वाजी (घोडे) होत, पारावत (कबुतरे) व हंस हे जणूं ताजी (अरबी घोडे) आहेत. ॥ ६ ॥ तित्तिर व लावा पक्ष्यांचे समुदाय या जणूं पायदळांच्या तुकड्या आहेत; अशा या कामदेवाच्या सैन्याचे कोण किती वर्णन करणार ! ॥ ७ ॥ पर्वतशिला हेच रथ व निर्झर जणूं नगारे आहेत. ॥ ८ ॥ भ्रमरांचा गुंजारव म्हणजेच भेरी व सणया वाजत आहेत आणि त्रिविध वायु हा (योग्य) वेळेवर येणारा वकील आहे. ॥ ९ ॥ चतुरंगिणी सेना बरोबर घेऊन मदन सर्वांना आव्हान देत फिरत आहे. ॥ १० ॥ लक्ष्मणा ! कामाची सेना पाहून ज्यांचे धैर्य टिकेल त्यांची या जगांत खरी महती आहे. ॥ ११ ॥ याचे मुख्य परमबल म्हणजे स्त्री होय. तिच्यांतून बचेल तोच महान योद्धा, महावीर होय. ॥ १२ ॥ तात ! काम, क्रोध आणि लोभ हे तीन अति प्रबळ खळ आहेत. विज्ञानधाम मुनींच्या मनांत सुद्धां हे एका निमिषांत क्षोभ उत्पन्न करतात. ॥ दो० ३८रा ॥ लोभाचे बळ इच्छा व दंभ आहे. कामाचे बळ केवळ नारी आहे व् कठोर भाषण (परुष+अक्षरें) हे क्रोधाचे बळ आहे असे विचारवंत मुनिश्रेष्ठ म्हणतात. ॥ दो० ३८म ॥

गुणातीत चर-अचरा स्वामी । राम उमे ! सर्वांतर्यामी ॥
कामीजन दीनतेसि दाविति । धीरांचे मनिं विरति दृढाविति ॥
क्रोध मनोज लोभ मद माया । सुटति सकल जैं राम करि दया ॥
इंद्रजालिं तो भुलतो ना नर । तो नट असे प्रसन्न जयावर ॥
उमे ! सांगतो तुज अनुभव मम । सत् हरिभजन जगत् स्व्प्नासम ॥
प्रभु मग जाति सरोवर-तीरा । पंपा नाम सुभग गंभीरा ॥
संत हृदय-सम निर्मल वारी । घाट सुबद्ध मनोहर चारी ॥
जिथें तिथें जल पिति किति मृगकुल । जणुं उदारगृह याचक-संकुल ॥

दो० :- कमलिनि सघन आड जल वेगें न कळें मर्म ॥
मायाछन्न न दिसुं शके निर्गुण जेवीं ब्रह्म ॥ ३९ रा ॥
सुखी मीन सब एक रस अती अगाध जलांत ॥
यथा धर्मशीलांचे, दिन सुखयुत जातात ॥ ३९ म ॥

उमे ! राम गुणातीत असून सर्व चराचरांचे स्वामी आहेत व सर्वांच्या हृदयांत राहून सर्व जाणणारे आहेत. ॥ १ ॥ ते कामी लोकांची दीन दशा दाखवीत धीर पुरुषांचे वैराग्य दृढ करीत आहेत. ॥ २ ॥ काम्, क्रोध, लोभ मद आणि माया इ. सर्व विकार राम जेव्हां दया करतात तेव्हां सुटतात. ॥ ३ ॥ ज्याच्यावर तो नट प्रसन्न असतो तो मनुष्य इंद्रजालावर भुलत नाही. ॥ ४ ॥ उमे ! तुला मी स्वतःचा अनुभव सांगतो की हरि भजन सत् (त्रिकालाबाधित सत्य) आहे व सर्व जग स्वप्नाप्रमाणे (मिथ्या) आहे, एक स्वप्नच आहे. ॥ ५ ॥ मग प्रभू सुंदर व गंभीर अशा पंपा सरोवराच्या तीराला गेले ॥ ६ ॥ त्याचे जल संतांच्या हृदयासारखे निर्मल आहे व चांगले बांधलेले चारी घाट मनोहर आहेत. ॥ ७ ॥ जिथे तिथे मृगांचे कितीतरी कळप पाणी पीत आहेत; जणूं काय उदाराच्या घरीं याचकांचीच गर्दी झाली आहे. ॥ ८ ॥ निर्गुणब्रह्म जसे मायेने झांकले गेल्यामुळे दिसूं शकत नाही तसे तलावांतील पाणी घनदाट कमलिनींच्या आड् असल्यामुळे मर्म लवकर कळत नाही. ॥ दो० ३९रा ॥ धर्मशीलांचे दिवस जसे सुखयुक्त जातात तसे सर्व मासे अतिशय अगाध जळांत सदा एकरस सुखी आहेत. ॥ दो० ३९म ॥

विविध वर्ण विकसित सरसिज अति । भृंगवृंद मृदुमंजुल गुंजति ॥
जलकुक्कुट कलहंसहि बोल ति । प्रभुस विलोकुनि जणुं प्रशंसति ॥
चक्रवाक बक खग समुदाया- । बघणें शक्य, न ये वर्णाया ॥
सुंदर-खग-गण-गिरा मनोहर । जात पथिक बोलावत सादर ॥
सर-समीप मुनि-सदनें भ्राजति । चहुं दिशिं कानन-विटप विराजति ॥
चंपक बकुल कदंब तमाल हि । पाटल पनस पलाश रसालहि ॥
नव पल्लव कुसुमित तरु नाना । चंचरीक-मंडल करि गाना ॥
शीतल मंद सुगंधि वात, तो । सहज मनोहर सतत वाहतो ॥
कुहू कुहू ध्वनि कोकिल करती । श्रवुनि सुरस मुनिध्यान विसरती ॥

दो० :- फलभारें तरु लोंबले भूस भेटुं येतात ॥
पर-उपकारी जसे नर विभवलाभिं नमतात ॥ ४० ॥

पंपासरोवरांत नाना रंगाची पुष्कळ कमळे फुललीं आहेत आणि भृंगाचे थवे मृदु व मंजुल गुंजारव करीत आहेत. ॥ १ ॥ पाणकोंबडी आणि कलहंस बोलत आहेत व प्रभूला पाहून जणूं त्यांची स्तुतीच करीत आहेत. ॥ २ ॥ चक्रवाक, बगळे व इतर पक्ष्यांचे समुदाय यांना पाहणेंच शक्य आहे; त्यांचे वर्णन करता येत नाही. ॥ ३ ॥ सुंदर पक्षीसमुदायांची मनोहर वाणी जणूं जाणार्‍या येणार्‍या वाटसरूंना आदराने बोलवीत आहे. ॥ ४ ॥ तलावाच्या जवळच (काठावर) मुनींची सदने शोभत आहेत व सभोंवार चारी दिशांना वनांतील वृक्षच विराजत आहेत. ॥ ५ ॥ चंपक, बकुळ, कदंब, तमाल, पाडळी, फणस, पळस, आम्रवृक्ष इत्यादि नाना तरूंना नवी पालवी आली आहे व अनेक फुलले आहेत व भृंगांच्या पंक्ती गुंजारव करीत आहेत. ॥ ६-७ ॥ शीतल मंद व सुगंधी असा सहज मनोहर वारा सतत वहात आहे. ॥ ८ ॥ कोकिळांचा कुहू कुहू असा रसाळ ध्वनि ऐकून मुनि आपला ध्यान रस विसरत आहेत. ॥ ९ ॥ परोपकारी पुरुष वैभवाचा (संपती वगैरेचा) लाभ झाला म्हणजे जसे नम्र होतात तसे वृक्ष फळांच्या भाराने इतके लवले आहेत की जणूं भूमीला भेटण्यास येत आहेत. ॥ दो० ४० ॥

राम पाहुनि रुचिर सरा अति । करुनी स्नान परम सुख पावति ॥
पाहुनि सुंदर तरुवर-छाया । बसले अनुजा सह रघुराया ॥
पुन्हां तिथें सब सुर मुनि आले । स्तुती करुनि निज धामां गेले ॥
बसले परम प्रसन्न कृपाल । सांगत अनुजा कथा रसाल ॥
विरहवंत भगवंत पाहिले । नारद मन बहु शोकें भरलें ॥
अंगिकारुनी माझा शापा । सोशिति राम भारि बहु तापा ॥
जाउनि ऐशा प्रभुस पहावे । पुन्हां असा अवसर ना फावे ॥
असें म्हणुनि करिं वीणा घेती । प्रभु सुखि बसले, तिकडे निघती ॥
गात रामचरिता मृदु वाणीं । प्रेमें विविध परीं वाखाणी ॥
करत दंडवत घेति उचलुनि । ठेविति वाढवेळ हृदिं धरुनी ॥
स्वागत, पुसुनी समीप बसविति । लक्ष्मण सादर चरणां क्षालिति ॥

दो० :- नानाविध विनती करुनि प्रभू प्रसन्न बघून ॥
नारद वचना बोलले पाणि-सरोज जुळून ॥ ४१ ॥

अति सुंदर तलाव पाहून रामचंद्रानी स्नान केले व त्यांस परम सुख झाले. ॥ १ ॥ तरुश्रेष्ठाची (वडाची) सुंदर छाया पाहून रघुराया लक्ष्मणासह तेथे बसले. ॥ २ ॥ तोंच सर्व देव व मुनि पुन्हां तिथे आले, व ते स्तुती करून आपापल्या धामाला (स्वर्गादि लोकांस) गेले. ॥ ३ ॥ कृपालु परम प्रसन्न होऊन बसले व अनुजाला रसाळ भक्तांच्या व भक्तिविषयक कथा सांगूं लागले. ॥ ४ ॥ भगवंतास विरहवंत पाहिले तेव्हां नारदाचे मन शोकाने फार व्यापले. ॥ ५ ॥ माझ्या शापाचा अंगिकार करून राम पुष्कळ व भारी ताप सोशीत आहेत. ॥ ६ ॥ असा योग पुन्हां जुळून येणार नाही म्हणून एकदां जाऊन अशा प्रभूला पाहू या. ॥ ७ ॥ असे मनांत म्हणून नारदांनी हातांत वीणा घेतली व जिथे प्रभू सुखी होऊन बसले आहेत तिकडे निघाले. ॥ ८ ॥ मृदु मधुर वाणीने रामचरित्र गात गात व प्रेमाने विविध प्रकारे वर्णन करीत आले. ॥ ९ ॥ दंडवत करीत असतांच प्रभूनी नारदांस उचलून घेतले व पुष्कळ वेळ हृदयाशी धरून ठेवले. ॥ १० ॥ नंतर स्वागत करून, कुशल विचारून जवळ बसविले. मग लक्ष्मणाने आदराने नारदांचे पाय धुतले. ॥ ११ ॥ नारदानी नाना प्रकारची प्रार्थना केली व प्रभु प्रसन्न आहेत असे पाहून कमळांसारखे हात जोडून नारद म्हणाले- ॥ दो० ४१ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP