॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३२ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

पूर्ण कनक घट, ताट पराती । ललित भाजनें विविधा जाती ॥
भरुनि सुधेसम सब पक्वान्नें । विविध-विधा वदवति न मुखानें ॥
फळें अमित वर पदार्थ सुंदर । भेट म्हणुन पाठवी भूपवर ॥
भूषण विविध महामणि वसनें । खग मृग हय गज बहुविध यानें ॥
मंगल शकुन सुगंध सुशोभित । महीपाल नानाविध धाडित ॥
दहि पोहे उपहार पार ना । नेति गडी कावडीं न गणना ॥
यदा स्वागती वर्‍हाड बघती । आनंदित मन तनू पुलकती ॥
थाट माटिं जैं स्वागति दिसले । मुदित वर्‍हाडीं डंके पिटले ॥

दो० :- मुदित परस्पर भेटण्या किंचित दौडत जाति ॥
आनंदोदधि सांडुनी सीमा जणुं मिळताती ॥ ३०५ ॥

जनक राजाकडून वर्‍हाडाचे केले जाणारे स्वागत :- पाणी, सरबत इत्यादिंनी भरलेले सोन्याचे कलश, ज्यांचे मुखाने वर्णन करणे शक्य नाही अशा नाना प्रकारच्या अमृतासारख्या पक्वान्नांनी भरलेली सोन्याची विविध प्रकारची पाने ताटे, पराती इत्यादि इत्यादि. ॥ १-२ ॥ तसेच अगणित मधुर फळे, व सुंदर पदार्थ जनकाने भेट म्हणून स्वागतींबरोबर पाठवले ॥ ३ ॥ नाना प्रकारची भूषणे, वस्त्रे, महामणी, पक्षी, मृग हत्ती, घोडे व नानाविध वाहने ॥ ४ ॥ सुंदर मंगल द्रव्ये, सुंदर सुगंधी पदार्थ व विविध शुभ शकुन महिपालाने धाडले ॥ ५ ॥ आणि दही, पोहे इत्यादी उपहार (भेटीचे जिन्नस) अपार आहेत व ते गडी कावडीतून नेत आहेत. ॥ ६ ॥ स्वागतींनी जेव्हा वर्‍हाड पाहीले तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला व देह रोमांचित झाले ॥ ७ ॥ थाटमाट करून येत असलेले स्वागती जेव्हा वर्‍हाड्यांच्या दृष्टीला पडले तेव्हा त्यांना आनंद झाला व मिरवणूकीत डंके आदि वाद्ये वाजविली गेली ॥ ८ ॥ (दोन्हीकडील लोक) एकमेकांस भेटण्यासाठी किंचित दौडत गेले (तेव्हा वाटले की) जणूं दोन आनंदसागर सीमा ओलांडून एकमेकांस मिळण्यास जात आहेत. ॥ दो० ३०५ ॥

गाती सुरसुंदरि सुम वर्षति । देव दुंदुभी मुदित वाजवति ॥
वस्तु सकल ठेवुनियां पुढतीं । प्रेमें स्वागति नृपा विनवती ॥
प्रेमें रामा तया स्वीकरी । दे बक्षीस याचकां वितरी ॥
पूजुनि मान महत्ता देउनि । जानोशाप्रति जाती घेउनि ॥
पायघड्या पट विचित्र पडती । बघुनि धनद धनमदा सांडती ॥
जानोसा अति सुंदर दिधला । सकलां सब सुख सोयीं भरला ॥
ये वर्‍हाड पुरिं सीता जाणुनि । जरा स्वमहिमा दावी प्रगटुनि ॥
स्मरुनि सकल सिद्धिंस बोलावी । नृप-पाहुणचारा करुं लावी ॥

दो० :- सीताज्ञें सिद्धी सकल जाती जानोशास ॥
सहिंत सकल सुख संपदा सुर-पुर-भोग-विलास ॥ ३०६ ॥

अप्सरा पुष्पवृष्टी करीत जाऊ लागल्य़ा. देवांनी आनंदित होऊन दुंदुभी वाजविल्या ॥ १ ॥ स्वागतींनी सर्व वस्तू राजापुढे ठेऊन त्यांना त्या स्वीकारण्य़ाची विनंती प्रार्थना केली ॥ २ ॥ राजाने त्या वस्तूंचा प्रेमाने स्वीकार केला आणि नोकर चाकरांदिकांस बक्षीस देऊन त्या याचकांस वाटल्या ॥ ३ ॥ स्वागतींनी दशरथ राजाचे सीमान्त पूजन करून मान महती दिली व वर्‍हाडासह जानोशाच्या ठिकाणी घेऊन चालले ॥ ४ ॥ जाताना विचित्र (उंची) वस्त्रांच्या पायघड्या घालल्या जाऊ लागल्या; त्या पाहून कुबेराने आपल्या धनाचा मद सोडला. ॥ ५ ॥ सर्वांना सर्व प्रकारच्या सुखसोयीनी भरलेला अति सुंदर जानोसा दिला ॥ ६ ॥ वर्‍हाडी नगरास आले असे सीतेस कळताच तिने आपला कांहीसा प्रभाव प्रगट करुन दाखवला (प्रभूला) ॥ ७ ॥ तिने स्मरण करुन सर्व सिद्धींना बोलावल्या व दशरथ राजाचा वर्‍हाडासह पाहुणचार करण्यास त्यांना पाठविल्या ॥ ८ ॥ सीतेच्या आज्ञेने सर्व सिद्धी सकल सुख सकल संपदा आणि देवलोकातील (अमरावतीतील) सर्व भोगविलासांसहित जानोश्याच्या ठिकाणी गेल्या. ॥ दो०३०६ ॥

निज निज बासिं वर्‍हाडी पाहति । सुरसुख सुलभ सकल विविधा अति ॥
विभव-मर्म कोणा ना कळलें । 'जनकाचें' वाखाणिति सगळे ॥
रघुपति सीता महिमा जाणुनि । हर्षित हृदयिं हेतुला समजुनि ॥
ऐकत तातागमना भ्राते । उर न पुरे अति आनंदातें ॥
संकोचें वदुं शकति गुरुस ना । पितृ-दर्शन-लालसा बहु मना ॥
विश्वामित्र बघति अति विनया । उपजे हृदिं संतोष अति तयां ॥
मुदें बंधु युग हृदयीं धरले । पुलक अंगिं अंबकिं जल भरलें ॥
निघती दशरथ-जानोशासी । जणुं तलाव लक्षुनि तृषितासी ॥

दो० :- भूप विलोकिति जैं मुनि येती सुतां समेत ॥
हर्षिं उठुनि सुखसागरीं शिरति ठावसा घेत ॥ ३०७ ॥

वर्‍हाड्यांनी आपापले उतरण्य़ाचे ठिकाण पाहीले तोच त्यास देवांची सकल सुखे विविध प्रकारे सुलभ झाल्याचे कळले ॥ १ ॥ या वैभवातील मर्म कोणास कळ्ले नाही (म्हणून) हे सर्व वैभव जनकाचेच आहे असे समजून सारे वाखाणू लागले (अर्थात सीतेला हेच अपेक्षित होते.) ॥ २ ॥ रघुपतींनी मात्र सीतेचा हा महिमा (प्रभाव) जाणला व सीतेच्या हृदयस्थ हेतूस जाणून रघुपति - राम हृदयात हर्षित झाले ॥ ३ ॥ आपले वडील आले आहेत हे दोघा भावांच्या कानी येताच त्यांच्या हृदयात आनंद मावेनासा झाला ॥ ४ ॥ वडिलांच्या भेटीची उत्कंठा तर मनात फार आहे पण संकोचामुळे गुरुजींजवळ बोलण्याचे धारिष्ट्य होत नाही ॥ ५ ॥ ही अत्यंत विनम्रता विश्वामित्रांनी पाहीली व त्यांच्या हृदयास अत्यंत संतोष वाटला ॥ ६ ॥ त्यांनी दोघा भावांना आनंदाने हृदयाशी धरले (तेव्हा) त्यांच्या अंगावर रोमांच आले व नेत्रांत पाणी तरळले ॥ ७ ॥ आणि तृषिताला पाहून तलावाने त्याच्याकडे जावे तसेच जणूं (राम लक्ष्मण) दशरथांच्या जानोशाकडे जाण्यास निघाले ॥ ८ ॥ आपल्या दोन्ही पुत्रांना बरोबर घेऊन विश्वामित्र मुनी येत आहेत असे दशरथ राजांनी जेव्हा पाहीले तेव्हा ते हर्षाने उठून ठाव घेत गेल्यासारखे सुखसागरात शिरुं लागले ॥ दो० ३०७ ॥

मुनिस महीश दंडवत करिती । घडिघडि पदरज निज शिरिं धरिती ॥
कौशिक हृदयीं धरिति नृपाला । आशिस देति पुसति कुशलाला ॥
मग बंधुद्वय करिति दण्डवत । बघुनि नृपति-मनिं सुख ना मावत ॥
सुत हृदिं धरत विषम दुख फिटलें । जणुं मृत देहा प्राण भेटले ॥
मग वसिष्ठ पदिं ते शिर नमती । प्रेम-मोदिं मुनिवर हृदिं धरती ॥
विप्रगणां युग बंधु वंदती । मना सारखे आशीस् मिळती ॥
भरत सहानुज चरणीं प्रणमति । उठवुनि राम तयां आलिंगति ॥
हर्षित लक्ष्मण बघुन बंधु, ते । भेटति कायें प्रेमपूरितें ॥

दो० :- पुरजन परिजन जातिजन याचक मित्र सचीव ॥
सकलां प्रभु भेटतिं सविधि विनयें करुणाशीव ॥ ३०८ ॥

दशरथ महीशांनी मुनीशांना दण्डवत नमस्कार केला व वारंवार त्यांची पायधूळ शिरावर धारण केली ॥ १ ॥ कौशिकाने राजास हृदयाशी धरले व आशीर्वाद देऊन कुशल विचारले ॥ २ ॥ रामलक्ष्मण बंधूनी दशरथास दण्डवत नमस्कार केला ते पाहून दशरथ राजाच्या मनात सुख मावेनासे झाले ॥ ३ ॥ जणूं मृत देहाला प्राण भेटावे त्याप्रमाणे दोघा मुलांना दशरथांनी हृदयाशी धरले (कवटाळले) व त्यांचे दु:सह दु:ख दूर झाले ॥ ४ ॥ मग त्यांनी (रामलक्ष्मणांनी) वसिष्ठांच्या पायावर डोके ठेवले तेव्हा मुनीश्रेष्ठांनी त्या दोघांना प्रेमाने व आनंदाने हृदयाशी धरले ॥ ५ ॥ नंतर दोघा भावांनी विप्रसमुदायास नमन केले तेव्हा मनासारखे आशीर्वाद मिळाले ॥ ६ ॥ भरताने अनुजासह पायावर मस्तक ठेऊन प्रणाम केला तेव्हा रामचंद्रांनी त्यांना उठवून घेऊन आलिंगन दिले ॥ ७ ॥ लक्ष्मणही या दोघा भावांना पाहून हर्षित झाले व प्रेमाने परिपूर्ण झालेल्या कायेने त्यास भेटले ॥ ८ ॥ करुणेची सीमा प्रभु विनयाने पुरजन, परिवार, कुटुंबसंबधी, याचक, मित्र, सचीव इत्यादिंना यथायोग्यरित्या विनयाने भेटले. ॥ दो० ३०८ ॥

निवति वर्‍हाडी रामा बघतां । प्रीति रीति ना येई वदतां ॥
नृप समीप शोभति सुत चारी । जणुं धन-धर्मांदिक तनुधारी ॥
सहित सुतां दशरथांस पाहति । पुर-नर नारी प्रमोद पावति ॥
वर्षुंनि सुमसुर पिटिति निशाणां । करिति नाक - नटिनृत्या गाना ॥
शतानंद नी विप्र-सचिव-गण । मागध-सूत-सूरि बंदीजन ॥
भूप वर्‍हाडासह सन्मानति । घेउनि आज्ञा फिरले स्वागति ॥
लग्नापूर्विंच वर्‍हाड आलें । प्रमुदित म्हणुन अधिक पुर झालें ॥
ब्रह्मानंद लोक सब लुटती । 'विधि ! वाढव वासर' पुट्‌पुटती ॥

दो० :- रामसिता शोभा-अवधि सुकृत-अवधि नृप दोनि ॥
जिथं तिथं पुरजन म्हणति असं नर बहु नारि जमोनि ॥ ३०९ ॥

रामलक्ष्मणाचे दर्शन सर्वांस झाल्याने सर्व वर्‍हाडी निवले, प्रीतीच्या रीतीचे वर्णन करता येणे शक्य नाही ॥ १ ॥ दशरथ राजाच्या जवळ हे चारी पुत्र जणूं अर्थ, धर्म काम, मोक्ष मूर्तीमान होऊन शोभत आहेत ॥ २ ॥ चार पुत्रांसह दशरथास पाहून जनक पुरीतील स्त्री पुरुषांना पुष्कळ आनंद झाला ॥ ३ ॥ देवांनी पुष्पवृष्टी करुन डंके वाजवले व अप्सरा नृत्यगायन करुं लागल्या ॥ ४ ॥ शतानंद, विप्रगण, सचिवगण, मागध सूत, भाट व पंडित यांचे समुदाय या सर्वांचा दशरथ राजाने वर्‍हाडासह सन्मान केला व हे सर्व स्वागती आज्ञा घेऊन परत फिरले ॥ ५-६ ॥ लग्नाच्या तिथीच्या पूर्वीच पुष्कळ आधी वर्‍हाड आले म्हणून सगळ्या जनकपुरीला विशेष प्रमोद झाला ॥ ७ ॥ सर्व लोक ब्रह्मानंद लुटूं लागले व विधीला प्रार्थना करु लागले की हे ब्रह्मदेवा ! साठ घटकांचा दिवस आहे तो आणखी वाढव बाबा ! ॥ ८ ॥ राम व सीता शोभेची परमावधि आहेत व सुकृताची परमावधी दोन्ही राजे आहेत असे पुष्कळ पुरुष व पुष्कळ स्त्रिया जिथे तिथे जमून म्हणू लागले ॥ दो० ३०९ ॥

जनक-सुकृत-मूर्तिंच वैदेही । रामचि दशरथ-सुकृत सदेही ॥
यांसम कुणि ना शिव आराधित । कोणि न यांसम फलासि साधित ॥
यांसम कोणि न जगिं झाला ही । कुठें नसे होणारहि नाहीं ॥
आम्हिं सकल सब सुपुण्यरासी । जन्मुनि जगतिं जनक पुरवासी ॥
जिहिं जानकी-राम-छवि दृष्टहि । सुकृति अम्हांसम अधिक कोणि नहि ॥
आणि पाहुं रघुवीर विवाहू । घेउं यथेष्ट किं लोचन-लाहू ॥
वदति परस्पर कोकिलवचना । या विवाहिं बहु लाभ सुनयना ॥
महाभाग्य ! विधि रचि योगातें । होतिल नेत्र अतिथि दो भ्राते ॥

दो० :- स्नेहें सीते वार बहु जनक किं आणवितील ॥
कोटि-काम-छवि बंधुयुग नेण्या तिज येतील ॥ ३१० ॥

जनकाच्या सुकृताची मूर्ती म्हणजेच वैदेही आणि सदेह झालेले दशरथांचे सुकृत म्हणजेच राम ॥ १ ॥ यांच्या सारखी शिवाची आराधना कोणी केली नाही व यांच्यासारखे फळ कोणीही साधले नाही ॥ २ ॥ यांच्या सारखा जगात कोणी (पूर्वी) झाला नाही, हल्ली कोणी नाही व पुढे कोणी होणार नाही ॥ ३ ॥ आम्ही जगांत जन्माला येऊन जनकपुरवासी झालो त्याअर्थी आम्ही सगळे सर्व चांगल्या पुण्याच्या राशी आहोत. ॥ ४ ॥ ज्याना जानकी व राम छ्बी दिसली असे आमच्यासारखे किंवा अधिक सुकृती दुसरे कोणी नाहीत ॥ ५ ॥ त्यातही आपण रघुवीर विवाह पाहू व डोळ्याचा यथेष्ट लाभ घेऊं ॥ ६ ॥ कोकिळ - वचना आपापसात म्हणू लागल्या की सुनयने ! या विवाहाने फार लाभ होणार आहे ॥ ७ ॥ विधिने हा योग जुळवून आणला हे आपले महाभाग्य आहे (कारण आता येथून पुढे) हे दोघे भाऊ (वारंवार) आपल्या डोळ्याचे अतिथी होतील. ॥ ८ ॥ दीतेवरील स्नेहामुळे जनकराजा सीतेला वारंवार आणवितील आणि (मग) कोटी कामदेवांसारखे सुंदर असलेले हे दोघे बंधू तिला नेण्यासाठी वरचेवर येतील ॥ दो० ३१० ॥

पाहुणचरहि होतिल वाड किं । प्रिय न कुणा अशि् सासुरवाड किं ॥
तंव तंव निरखुनि रामलक्ष्मणां । अति सुख होईल सकल पुरजनां ॥
सखी ! रामलक्ष्मण जोडी जशि । नृपासवें सुत-जोडि दुजी तशि ॥
श्याम्-गौर अंगीं शोभा अति । जे पाहुन आले ते सांगति ॥
एक म्हणे मी आज निरखिले । विरंचिनें स्वकरीं जणुं रचिले ॥
भरत किं रामाचे अनुसारीं । सहज न जाणुं शकति नरनारी ॥
लक्ष्मण-रिपुसूदन रूपें सम । नख-शिखांत सर्वांगें अनुपम ॥
मनिं रुचती ये वर्णुं मुखा ना । त्रिभुवनिं कोणी उपमाया ना ॥

छं ० :- उपमे न कुणि जगिं वदति तुलसी, सूरि कवि वदतात किं ॥
बल-विनय-विद्या-शील-शोभा-सिंधु यांसम हेच कीं ॥
पुरनारि पसरुनि पदर विधिला सकल ही विनवीत कीं ॥
हो लग्न चौघा बंधुचें प्रिं गावुं मंगल गीत कीं ॥ १ ॥
सो० :- वदति परस्पर नारि वारि विलोचनिं पुलक तनुं ।
सखि सब करिल पुरारि पुण्य पयोनिधि भूप युग ॥ ३११ ॥

मग पुष्कळ पाहुणचारही होतील अशी सासुरवाडी कोणाला प्रिय होणार नाही बरे ? ॥ १ ॥ त्या त्या वेळी राम-लक्ष्मणांना निरखून सगळ्या पुरजनांना अति सुख होईल ॥ २ ॥ सखी ! राम-लक्ष्मणाची जोडी जशी आहे ना, अगदी तश्शीच पुत्रांची दुसरी जोडी राजाच्या बरोबर आहे, बरं ! ॥ ३ ॥ ते श्यामल गौर वर्णाचे अंगी अत्यंत शोभा आहे असे जे पाहून आले ते सांगतात ॥ ४ ॥ (तेव्हा दुसरी) एकजण म्हणाली की आजच मी आपल्या डोळ्यांनी पाहीले; (आणि मला तर वाटले की) विरंचीनेच आपल्या स्वत:च्या हातानी त्यांना बनविले असले पाहीजेत. ॥ ५ ॥ भरत अगदी हुबेहुब (इतके) रामाच्या सारखे आहेत की पुरुष असोत की स्त्रिया असोत सहजासहजी ओळखता येत नाहीत ॥ ६ ॥ लक्ष्मण व शत्रुघ्न रुपाने अगदी सारखे असून नखशिखांत सर्व अवयव अगदी उपमारहित आहेत ॥ ७ ॥ (भरतास पाहील्यावर) मनाला आवडते - भावते पण मुखाने वर्णन करता येणे शक्य नाही कारण की उपमा देण्य़ास त्रिभुवनात कोणीही नाही ॥ ८ ॥ तुलसीदास सांगतात व पंडित आणि कवी म्हणतात की उपमेला कोणी नाही ! बल नम्रता, विद्या शील व शोभा यांचे सागर यांच्यासारखे हेच. नगरातील स्त्रिया पदर पसरुन ब्रह्मदेवाला विनवितात की या चौघाही बंधुंचे विवाह याच नगरीत होऊ देत, आम्ही मंगल गीते गाऊ. ॥ छंद ॥ स्त्रिया रोमांचित होऊन व डोळ्यात पाणी आणून एकमेकीस म्हणतात की सखी ! शंकर सर्व काही करतील, कारण की दोन्ही राजे पुण्य़ांचे सागरच आहेत ॥ दो० ३११ ॥

यापरिं सकल मनोरथ करती । उरिं आनंद पूर बहु भरती ॥
जे नृप सिता-स्वयंवरिं आगत । बघुनि बंधुना ते सुख पावत ॥
वदत राम यश विशद् विशाल । निज जिन भवनां गत महिपाल ॥
यापरिं काहीं वासर सरले । प्रमुदित पुरजन वर्‍हाड सगळें ॥
आला मंगलमूल लग्न-दिन । हिमऋतु महिना मार्ग सुशोभन ॥
ग्रह तिथि योग वार वर तारा । लग्न शुद्ध, विधि बघुनि विचारां ॥
नारद हाती देती धाडुनि । जनक-गणकिं जो निश्चित शोधुनि ॥
कळे सकल लोकां ही वार्ता । म्हणति 'असे ज्योतिषी विधाता' ॥

दो० :- धेनु-धुलि-वेला विमल सकल-सुमंगल-मूल ।
विप्र विदेहा सांगती बघुन शकुन अनुकूल ॥ ३१२ ॥

या प्रमाणे नगरनिवासी सर्व लोक मनोरथ करुं लागले व आनंदाचे पूर आपल्या हृदयात वारंवार भरू लागले ॥ १ ॥ जे राजे सीता स्वयंवरासाठी आले होते ते चौघा बंधूंना पाहून सुखी झाले ॥ २ ॥ व रामचंद्रांचे उज्वल व विशाल यश वर्णन करीत आपापल्या घरी गेले ॥ ३ ॥ याप्रमाणे काही दिवस निघून गेले व सर्व नगरलोक व सगळे वर्‍हाडी आनंदात आहेत (सर्वत्र आनंदी - आनंद आहे) ॥ ४ ॥ मंगलाचे मूळ असा लग्नाचा दिवस आला, हा हेमंत ऋतूतील मार्गशीर्ष महिना आहे ॥ ५ ॥ ग्रह, तिथी, वार योग व नक्षत्र (तारा), शुद्ध लग्न ही सर्व उत्तम आहेत असा विचार ब्रह्मदेवाने केला. ॥ ६ ॥ व तो मुहुर्त नारदाचे हाती जनकाकडे पाठवून दिला, (अन काय योगायोग पहा) जनकाच्या ज्योतिषांनीही नेमका तोच मुहूर्त ठरविला होता ॥ ७ ॥ ही बातमी सर्व लोकांना कळताच सारे म्हणू लागले की खरोखर राजाचे ज्योतिषी ब्रह्मदेवच आहेत ! ॥ ८ ॥ सकल सुमंगलाचे मूळ अशी विमल धेनुधूलिवेला (गोरजमुहूर्त) पाहून व शकुन अनुकूल आहेत असे पाहून ब्राम्हणांनी (ज्योतिषी प्रमुखांनी) विदेहास सांगितले (की वेळ झाली) ॥ दो० ३१२ ॥

नरपति वदले पुरोहिताही । अतां विलंबा कारण नाहीं ॥
शतानंद सचिवां बोलाविति । मंगल सकल सजुनि ते आणिति ॥
शंख निशाण पणव बहु वाजति । मंगल कलश शकुन शुभ साजति ॥
सुभग सुवासिनि गाती गाणीं । विप्र पूत गाती श्रुतिवाणी ॥
निघती सादर मूळ वराला । गेले दशरथ-जानोशाला ॥
कोसलपतिच्या बघुनि समाजा । अति लघु भासे त्यां सुरराजा ॥
शीघ्र निघावें समय ठाकला । तदा निशाणीं घाव घातला ॥
करुनि गुरुवचें कुलविधि राजा । निघति सहित मुनि-साधु, समाजा ॥

दो० :- अयोध्येश-भाग्य नि विभव देव अजादि बघून ॥
स्तवुं लागति दशशत-मुखा वृथा स्वजन्म गणून ॥ ३१३ ॥

जनकराजा पुरोहितास म्हणाले की आता विलंब करण्याचे काही कारण नाही ॥ १ ॥ तेव्हा शतानंदांनी सचिवास बोलावून सांगितले (की सगळे सामान लवकर आणा, आता उशीर कां ?) मग त्यांनी सर्व मंगल वस्तू सजवून आणल्या ॥ २ ॥ शंख, नगारे, डंके खूप वाजू लागले, मंगल कलश व शुभ शकुन तयार केले गेले ॥ ३ ॥ सुंदर सौभाग्यवती स्त्रिया सुंदर गीते म्हणू लागल्या व पवित्र ब्राम्हण पावन श्रुतिघोष करु लागले ॥ ४ ॥ वराला घेऊन येण्यासाठी निघाले व दशरथाचा जानोसा होता तेथे गेले ॥ ५ ॥ कोसलपती दशरथ राजांचा समाज व वैभव पाहून त्यांच्या पुढे त्यांना सुरराजा इंन्द्र अगदी तुच्छ वाटला ॥ ६ ॥ (दशरथांना विनविले की) आता लवकर निघावे, कारण मुहूर्त अगदी जवळ आला आहे हे ऐकताच (वर्‍हाडातील) डंक्यावर घाव पडला ॥ ७ ॥ वसिष्ठ गुरुंच्या सांगण्याप्रमाणे राजाने कुलविधि केले आणि मुनीसमाज, साधुसमाज व राजसमाज (व इतर आपली वर्‍हाडी मंडळी) घेऊन दशरथ निघाले ॥ ८ ॥ अयोध्यापती दशरथांचे भाग्य व वैभव पाहून ब्रह्मादिक देव आपला जन्म व्यर्थ आहे असे जाणून हजार मुखांच्या शेषाची प्रशंसा करु लागले ॥ दो० ३१३ ॥

देव सुमंगल अवसर जाणति । पिटुनि निशाणां सुमनें वर्षति ॥
शंभु-अजादिक विबुध-कदंबक । बसइ विमानिं विविध निकुरंबक ॥
प्रेम पुलक वपुं हृदिं उत्साहू । निघति बघाया राम-विवाहू ॥
बघत जनकपुर सुर अनुरागति । स्व-स्वलोक सकलां लघु लागति ॥
निरखिति चकित विचित्र विताना । रचना सकल अलौकिक नाना ॥
नगर-नारि-नर रूपनिधानहि । सुकुल सुधर्मि सुशील सुजाणहि ॥
त्यांस बघुनि सब सुर सुरनारी । विधुतेजीं जशिं भगणें सारीं ॥
बघुनि सुविस्मय विधिमनिं घुसला । निज करणीचा ठाव न दिसला ॥

दो० :- विबुध, विस्मयें भुलुं नका शिव शिकविती सुरांस ॥
सीता-रघुविर विवाह किं धरा मनीं धीरास ॥ ३१४ ॥

(दशरथ सर्वांसह निघाल्याचा) तो अत्यंत मंगल समय जाणून देवांनी आपल्या लोकात डंके, भेरी वाजवून (तेथूनच) पुष्पवृष्टी केली ॥ १ ॥ शंभू ब्रह्मदेव, व इंद्रादि देवांचे समुदाय विविध आकाशमानात टोळ्या टोळ्यांनी बसले ॥ २ ॥ प्रेमाने देहावर रोमांच उभे राहीले आहेत व हृदयात उत्साह भरला आहे, असे सारे रामविवाह पाहण्यासाठी निघाले ॥ ३ ॥ जनकपुरी द्दष्टीस पडताच अनुरागवश झाले व त्यांना आपले लोक (विश्व) तुच्छ वाटू लागले ॥ ४ ॥ ते आश्चर्यचकित नेत्रांनी विचित्र मंडप निरखून पाहू लागले व ती सर्व रचना नाना प्रकारे अलौकिक दिसली ॥ ५ ॥ नगरातील सर्व स्त्रिया व पुरुष रुपनिधान आहेत व उत्तम कुळातील चांगले धर्मशील, सुशील व सुजाण आहेत ॥ ६ ॥ त्यांना पाहून सगळे देव व देवांगना पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशातील नक्षत्रासारखी ठरली ॥ ७ ॥ हे सर्व पाहून ब्रह्मदेवाच्या मनात विशेषच आश्चर्य वाटले (कारण) आपल्या करणीचा थांगपत्ताच त्यास कुठे लागेना. ॥ ८ ॥ (हे पाहून) शंकर देवांना शिकवितात की देव हो ! आश्चर्याने भुलून जाऊ नका आणि मनांत धीर धरुन लक्षात घ्या की हा सीता रघुवीर विवाह आहे ! ॥ दो०३१४ ॥

घेतां ज्यांचें नाम हि जगतीं । सकल-अमंगल-मूल भंगती ॥
चारिं पदार्थहि येति सहज करिं । सिताराम ते म्हणति काम-अरि ॥
शिव समजा‌उनि असें सुरांला । पुढें चालविति वृषोत्तमाला ॥
दशरथ जातां देवां दिसले । महामोद मनिं देह पुलकले ॥
साधु समाज महीसुर संगें । जणुं सुख तनुधर सेविति अंगें ॥
सवें सुभग सुत शोभति चारी । जणुं अपवर्ग सकल तनुधारी ॥
मरकत-कनक्-वर्ण वर जोडे । बघुनि सुरांनां प्रेम न थोडें ! ॥
मग रामास बघुनि हृदिं हर्षति । नृपा प्रशंसुनि सुम बहु वर्षति ॥

दो० :- रामरूप नखशिख सुभग निरखत वारंवार ॥
पुररिपु पुलकति उमेसह सजल विलोचन फार ॥ ३१५ ॥

ज्यांचे नुसते नाम घेतल्याने जगातील सकल अमंगल मूळांचा भंग होतो ॥ १ ॥ आणि अर्थ, धर्म, काम व मोक्ष हे चारी पदार्थ (पुरुषार्थ) सहज हातात येतात ते हे सीताराम आहेत (बरे) असे कामदेवाचे शत्रू (शंकर) म्हणाले ॥ २ ॥ याप्रमाणे शिवानी देवांना समजावून सांगितले व आपला श्रेष्ठ वृषभ-नंदी पुढे चालविला ॥ ३ ॥ दशरथ जात असताना देवांना दिसले. तेव्हा त्यांच्या मनात महा आनंद झाला व देहावर रोमांच उभे राहीले ॥ ४ ॥ दशरथाच्या बरोबर साधूंचा व विप्रांचा समुदाय आहे; ती जणू (विविध) सुखेच देहधारी बनून दशरथाची सेवा करीत आहेत. ॥ ५ ॥ (तसेच) त्यांच्या बरोबर त्यांचे चारी सुंदर व ऐश्वर्यसंपन्न पुत्र आहेत, ते जणू सगळे चार मोक्ष (अपवर्ग) च (सालोक्य, सामीप्य, सारुप्य व सायुज्य) देहधारी बनून शोभत आहेत. ॥ ६ ॥ मरकतमणि व सोन्याच्या वर्णाच्या दोन दिव्य जोड्या पाहून देवांना फारच प्रीती उत्पन्न झाली ॥ ७ ॥ मग रामाला पाहून हर्ष झाला व त्यांनी राजाची प्रशंसा करुन पुष्कळ फुलांचा वर्षाव केला ॥ ८ ॥ रामचंद्रांचे नखशिखान्त सुंदर रुप वारंवार निरखून पहात असता उमेसह त्रिपुरारि - शिव पुलकित झाले व त्यांच्या नेत्रात पुष्कळ आनंदाश्रु आले. ॥ दो० ३१५ ॥

केकिकंठ-भा श्यामल अंगीं । तडित्-विनिंदक वसन सुरंगी ॥
विविध विवाह-विभूषणिं भूषित । मंगल सर्व सर्वपरिं शोभित ॥
शरद-विमल-विधु-वदन-सुशोभन । नव राजीव विलाजक लोचन ॥
सकल अलौकिक सुंदरता ते । भरे मनीं परि वदलि न जाते ॥
बंधु मनोहर शोभति संगा । जाति नाचवित चपल तुरंगां ॥
राजकुमर वर वाजि दाखवति । कुल-प्रशंसक बिरुद पुकारति ॥
तुरंगमीं ज्या राम विराजति । अवलोकत गति खगपति लाजति ॥
वदवे ना सर्वांगीं सुंदर । वाजि-वेष जणुं काम धरी वर ॥

छं० :- जणुं काम रामहितार्थ वाजी-वेषधर अति शोभतो ।
आपलें वय-बल-रूप-गुण-गतिं सकल भुवन विमोहतो ॥
झगमगति जीन-जडाव-जोति- सुमोति बहु मणि माणकें ।
किंकिणि ललाम लगाम ललितहि बघुनि सुर नर मुनि ठके ॥ १ ॥
दो० :- जातां प्रभुमनिं लीन मन ये छवि जणुं तुरगास- ॥
भूषित उडुगण तडितवर नाचवि बर्हि घनास ॥ ३१६ ॥

मोराच्या कंठाप्रमाणे श्यामल असलेल्या अंगावर विजेची विशेष निंदा करणारे सुंदर रंगाचे वस्त्र (पीतांबर) ॥ १ ॥ नाना प्रकारच्या विवाह - विभूषणांनी सुशोभित असून ती सर्व विभूषणे मांगलिक व सर्व प्रकारे सुंदर आहेत. ॥ २ ॥ शारदीय पौर्णिमेच्या चंद्राहून निर्मल व अत्यंत सुंदर मुख असून डोळे नवीन फुललेल्या राजीवाला लाजविणारे आहेत. ॥ ३ ॥ सौंदर्य सर्व प्रकारे अलौकिक असून ते मनात भरते पण वर्णन करता येत नाही ॥ ४ ॥ भरतादी मनोहर बंधू बरोबर शोभत आहेत व ते आपल्या चपळ तुरंगाना (थै - थै) नाचवित चालले आहेत ॥ ५ ॥ भरताच्या वयाचे व त्याच्याबरोबर निघालेले राजकुमार आपल्या श्रेष्ठ वाजींची श्रेष्ठता दाखवीत आहेत व रघुकुलाची प्रंशंसा करणार्‍या बिरुदावलिचा घोष करीत आहेत. ॥ ६ ॥ ज्या तुरंगमावर राम विराजमान आहेत त्याची गती पाहून पक्षिराज गरुड सुद्धा लाजले ॥ ७ ॥ हा घोडा इतका सर्वांग - सुंदर आहे की, सांगण्याची सोय नाही. (असे वाटते की) जणूं कामदेवानेच श्रेष्ठ वाजीचा वेष धारण केला आहे ॥ ८ ॥ रामचंद्राच्या प्रेमामुळे व त्यांच्यासाठी जणू कामदेव श्रेष्ठ वाजीचे रुप घेऊन शोभत आहे आपले वय, बल, रुप, व गुण आणि गति यानी तो सर्व भुवनास विशेष मोहित करीत आहे. (त्याच्या पाठीवर घातलेले) जडावाचे जीन त्यातील अमुल्य मोत्ये, मणि व माणकादिकांच्या ज्योतीने झगमगत आहे; उत्तम रम्य किंकिणी व सुंदर लगाम आहे अशा या घोड्याला पाहून सुर, नर व मुनिसुद्धा ठकले (मोहित झाले) ॥ छंद ॥ प्रभूच्या मनात आपले मन लीन करुन हा घोडा जात असता त्याला अशी शोभा आली आहे की जणूं वीज व तारागणांनी विभूषित वररुपी मेघाला मोर चांगला नाचवीत आहे. ॥ दो० ३१६ ॥

स्वार राम ज्या अनुपम वाजीं । त्यास शारदा कशि नांवाजी ॥
शंकर रामरूपिं अनुरागति । प्रिय अति नेत्र पंच दश लागति ॥
प्रेमें हरिस राम जंव पाहति । रमा-समेत रमापति मोहति ॥
बघुनि रामछवि विधि हर्षावे । आठचि नयन ! म्हणुन पस्तावे ॥
सुर सेनप-उरिं बहु उत्साहो । विधिच्या दिडपट लोचन-लाहो ॥
रामा सुरपति सुजाण पाहत । गौतम शाप परमहित वाटत ॥
स्तविति सुरेशा सुर सेर्षा ही । आज पुरंदर सम कुणि नाहीं ॥
मुदित देवगण रामा बघतां । नृपसमाजिं युग हर्षाधिकता ॥

छं० :- अति हर्ष राजसमाजिं युग दिशिं दुंदुभी वाजति घने ।
सुर सुमन वर्षति हर्षिं जयजय वदति जय रघुकुलमणे ॥
या रीतिं येत वरात जाणुनि विविध बाजे वाजती ॥
ओवाळण्या राण्या सुवासिनिं सह सुमंगल साजती ॥ १ ॥
दो० :- सजुनि आरती बहुविधा बहु मंगलसंभारिं ।
जाति मुदित ओवाळण्या गजगामिनि वरनारि ॥ ३१७ ॥

ज्या अनुपम घोड्यावर राम स्वार झाले आहेत त्याला शारदा कशी नावाजू शकेल ॥ १ ॥ शंकर रामरुपावर अनुरक्त झाले व आपले पंधरा नेत्र त्यास अत्यंत प्रिय वाटले ॥ २ ॥ रामचंद्रानी जेव्हा प्रेमाने विष्णूकडे पाहीले तेव्हा रमेसहित रमापती - विष्णू सुद्धा मोहित झाले ॥ ३ ॥ ब्रह्मदेवाने जेव्हा रामाकडे पाहीले तेव्हा त्यास हर्ष झाला, पण आपल्या आठच डोळे ! म्हणून वाईट वाटले ॥ ४ ॥ देवांचा सेनापती कार्तिकेय यास उत्साह वाटला की मला ब्रह्मदेवाच्या दीडपट नेत्रांचा लाभ आहे. ॥ ५ ॥ सुजाण सुरपती - इंद्राने रामास पाहीले त्याबरोबर त्यास गौतम ऋषीचा शाप परम हितकर वाटला (कारण त्या हजार भगांचे हजार डोळे बनले) ॥ ६ ॥ सगळे देव ईर्षेने इन्द्राची प्रशंसा करु लागले की आज इंद्रासारखा भाग्यवान कोणी नाही. ॥ ४ ॥ सर्व देवगणांना रामास पाहून आनंद झाला, पण अयोध्याधीशांचा समाज व मिथिलेशांचा समाज या दोन्ही समाजांना विशेष हर्ष झाला ॥ ८ ॥ दोन्ही राजसमाजास अत्यंत हर्ष झाला आहे व दोन्ही समाजात पुष्कळ नगारे जोराने वाजत आहेत देव फुलांची वृष्टी करुन ' जय रघुकुल शिरोमणे ' असे हर्षाने उच्चारीत आहेत. याप्रमाणे वराची स्वारी येत आहे असे जाणून (वधूमंडपात) विविध वाद्ये वाजू लागली, व राण्यांनी सुवासिनींस जमवून ओवाळण्याची सुमंगल वस्तु सजविण्य़ास सुरुवात केली ॥ छंद ॥ नाना प्रकारे आरती सजवून व बहुत मंगल वस्तूंचा संभार जमवून गजगामिनी सुंदर स्त्रिया वराला ओवाळण्यासाठी आनंदाने निघाल्या. ॥ दो० ३१७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP