॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय १३ वा



Download mp3

दो० :- मेरुशिखरिं वटछाये मुनि लोमश आसीन ॥
बघुनि चरणिं शिर नमविलें वदलो वचन सुदीन ॥ ११०म ॥
श्रवुनि वचन मम नम्र मृदु मुनि कृपालु खगराय ॥
मज सादर पुसलें द्विज ! हेतु आगमनिं काय ? ॥ ११०चं ॥
तैं मी वदलो कृपानिधि ! तुम्हिं सर्वज्ञ सुजाण ॥
ब्रह्म सगुण आराधना सांगा मज भगवान ॥ ११०द्र ॥

मेरु पर्वताच्या शिखरावर वटवृक्षाच्या सावलीत लोमश मुनी बसले होते. त्यांना पाहून मी त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि अति दीन वाणीने काही बोललो. ॥ दो० ११० म ॥ माझे नम्र व मृदु भाषण ऐकून अहो पक्षीराज ! त्या कृपाळू मुनींनी मला विचारले हे द्विज ! तुम्ही कोणत्या कारणास्तव आलांत ? ॥ दो०११० चं ॥ तेव्हा मी म्हणालो की अहो कृपानिधी ! आपण सर्वज्ञ व सुजाण आहांत. भगवान ! सगुण ब्रह्माची आराधना कशी करावी ते मला आपण सांगावे ॥ दो० ११० द्र ॥

तैं मुनीश रघुपतिगुणगाथा । सादर कांहि कथिति खगनाथा ! ॥
ब्रह्मबोधरत विज्ञानी मुनि । मला परम अधिकारी जाणुनि ॥
करुं लागले ब्रह्म‍उपदेश । अज अद्वैत अगुण हृदयेश ॥
अकल अनीह अनाम अरूप । अनुभवगम्य अखंड अनूप ॥
मनगोतीत अमल अविनाशी । निर्विकार निरवधि सुखराशी ॥
तें तूं, त्यांत तुझ्यांत भेद नहि । वारिवीचि इव गाती वेदहिं ॥
शिकविति मुनि मज विविधपरीं जरि । निर्गुण मत उतरे न गळीं तरि ॥
मग मी विनवि नमुनि पदिं शीस । सगुण उपासन वदा मुनीश ! ॥
रामभक्तिजलिं मम मन मीन । होइ अलग कसं मुने प्रवीण ? ॥
सदय करा उपदेश असा या । निज नयनीं निरखिन रघुराया ॥
नेत्र भरुनि कोसलेश पाहिन । मग निर्गुणबोधा आकर्णिन ॥
मुनि अनुपम हरिकथा निवेदुनि । अगुण निरूपिति सगुणा खंडुनि ॥
मी निर्गुण मत निरसुनि दूरीं । सगुण निरूपित हट्टे भूरी ॥
प्रत्युत्तर उत्तर मी केले । क्रोधचिन्ह मुनि देहिं उदेलें ॥
बहुत अवज्ञा प्रभू जैं घडें । ज्ञान्यांचें मन रोषा चढे ॥
करतां कोणी अति संघर्षण । करी प्रकट अनलास हि चंदन ॥

दो० :- वारंवार सकोप मुनि ज्ञानचि निरूपितात ॥
तैं बसल्या मम मानसीं विविध तर्क उठतात ॥ १११रा ॥
द्वैतबुद्धिविण कोप कीं द्वैत विना अज्ञान ॥
मायावश परिछिन्न जड जीव किं ईश समान ॥ १११म ॥

तेव्हा हे पक्षीराज ! मुनीश्वरांनी रघुपतीच्या काही गुणकथा आदराने सांगीतल्या ॥ १ ॥ मग ते ब्रह्मज्ञान परायण विज्ञानी मुनी मला परम अधिकारी जाणून ब्रह्माचा उपदेश करु लागले जे जन्मरहित, अद्वैत, निर्गुण, आणि हृदयेश्वर आहे. ॥ २-३ ॥ जे पूर्ण, इच्छारहित, नाम-रुपरहित, स्वानुभवानेच जाणता येण्यासारखे अखंड आणि उपमारहित आहे ॥ ४ ॥ जे मनाच्या व इंद्रियांच्या अतीत मायारुपी मलरहित, अविनाशी, विकारहित व सुखाची राशी आहे ॥ ५ ॥ वेद वर्णन करतात की तेच तू आहेस जल व तरंग याप्रमाणे त्यांच्यात व तुझ्यात भेद नाही ॥ ६ ॥ मुनी जरी मला नानापरींनी शिकवीत होते तरी निर्गुण मत माझ्या गळीं उतरेना ॥ ७ ॥ मग मी पायावर डोके ठेऊन विनविले की, अहो ! मुनीश्वर ! मला सगुणाची उपासना सांगावी ॥ ८ ॥ रामभक्ती जलांत माझे मन मासा झालेले आहे, ते अहो प्रवीण मुनीश्वर ! वेगळे कसे करता येईल ? ॥ ९ ॥ म्हणून आपण दयेने या ब्राह्मणाला असा उपदेश करा की मी आपल्या डोळ्यांनी रघुराज रामचंद्रास निरखून पाहू शकेन ॥ १० ॥ मी एकदा डोळे भरुन अयोध्यापती रामचंद्रास पाहीन आणि मग निर्गुण उपदेश श्रवण करीन ॥ ११ ॥ मुनींनी पुन्हा अनुपम हरिकथा सांगून, सगुणाचे खंडन करुन निर्गुणाचे निरुपणच सुरु केले ॥ १२ ॥ तेव्हा मी पण निर्गुण मताचे खंडन करुन फार हट्टाने सगुणाचेच निरुपण केले ॥ १३ ॥ जेव्हा मी उत्तरास प्रत्युत्तर देऊ लागलो तेव्हा मुनींच्या देहावर क्रोधाची चिन्हे प्रगट दिसूं लागली ॥ १४ ॥ प्रभू ! फार अपमान केला गेल्यावर ज्ञानी जनांसही क्रोध येतो. ॥ १५ ॥ कोणी अतिशय संघर्षण केले तर चंदनातूनही अग्नी प्रगट होतो. ॥ १६ ॥ मुनी वारंवार क्रोधाने ज्ञानाचेच निरुपण करु लागले. तेव्हा मी बसल्या बसल्या तर्क करुं लागलो की ॥ दो० १११ रा ॥ द्वैत बुद्धी शिवाय क्रोध कसा येईल ? अज्ञानाशिवाय द्वैत असू शकेल कां ? मायेला वश होणारा परिछिन्न जड जीव ईश्वरसारखा होईल कां ? (शक्यच नाही) ॥ दो०१११ म ॥

त्यां किं दुःख कधिं, इच्छि सकलहित । तो किं दरिद्रि परीस करीं स्थित ॥
परद्रोहि कीं निर्भय वसती । कामी कधिं अकलंकित असती ॥
वंश किं उरे द्विजाहित करतां । कर्म होति कीं स्वरुप जाणतां ॥
खल संगें कधिं उपजे सुमति किं । परदारग कधिं पावे सुगति किं ॥
भविं किं पडति परमात्माविंदक । सुखी होति कीं कधिं हरिनिंदक ॥
राज्य किं राही, नीति न जाणुनि । अघ किं राहि जरि चरित्र वर्णुनि ॥
पुण्याविण किं मिळे यश पावन । अपयश लाभ किं जेथें पाप न ॥
लाभ किं जगिं हरिभक्ति समान । जी गाती श्रुति संत पुराण ॥
यासम हानि असे कीं जगतीं । नरतनु मिळुनिहि राम न भजती ॥
पाप पिशुनते सम कीं आन । धर्म किं दया सदृश हरियान ॥
असे तर्क मनिं करुं भाराभर । मुनि उपदेश न ऐकूं सादर ॥
सगुणपक्ष घडि घडि मी स्थापित । तैं मुनिवर वदले क्रोधान्वित ॥
मूढ सुबोधा करुं न मानसी । उत्तर प्रत्युत्तर बहु करसी ॥
सत्यवचनिं विश्वास न धरसी । वायस इव सर्वां घाबरसी ॥
शठ तव हृदीं स्वपक्ष विशाल । हो सपदीं पक्षी चांडाल ॥
मी मस्तकिं धृत मुनि शापाला । भय न दीनता जरा मनाला ॥

दो० :- तत्क्षणिं झालो काक मी मुनिपदिं शिर नमवून ॥
स्मरुनि राम रघुवंशमणि उडत निघें हर्षून ॥ ११२रा ॥
रामचरणिं रत जे उमे ! गत मद काम क्रोध ॥
निज प्रभुमय जग पाहति करिती कुणाशिं विरोध ॥ ११२म ॥

जो सर्वांचे हित इच्छितो त्याला कधी दु:ख होते काय ? ज्याच्या हातात परीस आहे तो कधी दरिद्री असूं शकेल काय ? ॥ १ ॥ परद्रोही कधी निर्भय राहू शकतात काय ? कामी कधी अकलंकित राहू शकतात काय ? ॥ २ ॥ ब्राह्मणाचे अहित केल्याने कधी वंश शिल्लक राहतो कां ? आत्मज्ञान झाल्यावर कर्मे होतात काय ? ॥ ३ ॥ खलांच्या संगतीने कधी कोणास सुबुधदी उत्पन्न झाली आहे काय ? परस्त्रीगामी कधी उत्तम – सदगती पावतो काय ? ॥ ४ ॥ ब्रह्म जाणणारे कधी जन्ममरण चक्रात पडतात काय ? हरीची निंदा करणारे कधी सुखी होतात काय ? ॥ ५ ॥ नीती न जाणतां कधी राज्य टिकते आहे काय ? हरि चरित्र वर्णन केल्या नंतर कधी पाप शिल्लक राहते काय ? ॥ ६ ॥ पुण्यावाचून कधी पवित्र यश मिळते काय ? आणि पापाशिवाय कधी अपयश प्राप्त होते काय ? ॥ ७ ॥ जिला श्रुती संत पुराणादि वाखाणतात त्या हरिभक्तीसारखा दुसरा लाभ जगात आहे काय ? ॥ ८ ॥ मनुष्य देह मिळून सुद्धा श्रीरामाचे भजन न करणे यासारखी दुसरी हानी ती कोणती ? ॥ ९ ॥ चहाडखोरपणासारखे दुसरे पाप नाही हे हरिवाहना ! दयेसारखा दुसरा धर्म आहे कां ? ॥ १० ॥ असे भाराभर तर्क मी करीत बसलो आणि मुनींचा उपदेश आदराने श्रवण केला नाही ॥ ११ ॥ मी घडोघडी सगुणाचा पक्षच सिद्ध करीत राहीलो, तेव्हा मुनीश्रेष्ठ क्रुद्ध होऊन म्हणाले की ॥ १२ ॥ मूढा ! मी तुला उत्तम प्रकारचा उपदेश करीत असता तूं मानत नाहीस ? आणि उत्तर प्रत्युत्तर करतोस ? ॥ १३ ॥ सत्य वचनावर विश्वास न ठेवता, कावळ्यासारखा सर्वांनाच घाबरतोस ! ॥ १४ ॥ अरे शठा ! तुझ्या हृदयात स्वत:चाच पक्ष फार विशाल आहे, म्हणून तूं आत्ताच्या आत्ता चांडाल पक्षी कावळा हो ! ॥ १५ ॥ मी मुनींचा शाप शिरोधार्य मानला त्याचे मला जरासुद्धा भय वाटले नाही की दैन्य वाटले नाही. ॥ १६ ॥ त्याचक्षणीं मी कावळा झालो आणि मुनीचरणीं मस्तक नमवून, रघुवंश शिरोमणी श्रीरामाचे स्मरण करीत हर्षित होऊन उडत निघालो ॥ दो० ११२ रा ॥ उमे ! श्रीरामचरणीं रत असून जे अभिमान, काम, क्रोध इत्यादि रहित असतात, ते सर्व जग आपले प्रभुमय भरलेले असेच पाहतात मग ते विरोध कोणाशी करणार ? ॥ दो० ११२ म ॥

श्रुणु खगेश कांहिं न ऋषि दूषण । प्रेरक हृदिं रघुवंश विभूषण ॥
कृपासिंधु मुनिमतिस भुलविती । माझी प्रेमपरिक्षा घेती ॥
मन वच कृतिं मज निज जन जाणति । मग भगवान् फिरवति मुनिची मति ॥
ऋषि मम महच्छीलता पाहति । रामचरणिं विश्वास तसा अति ॥
अति विषण्ण घडि घडि पस्तावति । सादर मुनि मजला बोलावति ॥
मम परितोष परोपरिं करुनी । राममंत्र मज दिला हर्षुनी ॥
बालरूप रामाचें ध्यान । शिकविति मज मुनि कृपानिधान ॥
सुंदर सुखद मला अति रुचले । तें मी पूर्विंच तुम्हांस कथिले ॥
काहिं काल मुनि मजसी राखति । रामचरित मानस तैं भाषति ॥
सादर मज ही कथा ऐकवुनि । मग वदले सुंदर वचना मुनि ॥
रामचरितसर गुप्त मनोहर । मज लाभलें प्रसादें शंकर ॥
तूं निज रामभक्त हें जाणुनि । मी ही कथित सर्व वाखाणुनि ॥
रामभक्ति ज्यांचें हृदिं नाहीं । त्यांस न वदणें तात । कदा ही ॥
समजाविति मुनि विविधा मजला । मी प्रेमें नमिलें पदकमलां ॥
करकमला ठेउनि मम शीर्षा । देति मुनीश मुदित आशीषा ॥
रामभक्ति अविरल हृदयीं तव । नित्य वसेल मदीय कृपेस्तव ॥

दो० :- व्हा रामप्रिय सदा तुम्हिं शुभगुणभवन अमान ॥
कामरूप इच्छा मरणि ज्ञानविरागनिधान ॥ ११३रा ॥
तुम्हिं वसाल ज्या आश्रमीं स्मरतां श्री भगवंत ॥
व्यापि तिथें न अविद्या चार कोस पर्यंत ॥ ११३म ॥

हे खगेश ! ऐक त्यात ऋषींचा काहीसुद्धा दोष नाही. रघुवंश विभूषण श्रीराम सर्वांच्या हृदयात प्रेरक आहेत ॥ १ ॥ त्या कृपासागराने मुनींच्या बुद्धीला भूल पाडून माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली ॥ २ ॥ मी मनाने, वाणीने व कृतीने निजदास आहे असे जाणले आणि भगवंतांनी पुन्हा मुनीची बुद्धी फिरवली ॥ ३ ॥ ऋषींनी माझे महापुरुषासारखे शील पाहीले आणि रामचरणी अत्यंत विश्वास पाहीला ॥ ४ ॥ तेव्हा ते अति खिन्न होऊन पुन:पुन्हा पश्चाताप करुं लागले; नंतर मुनींनी मला आदराने जवळ बोलाविले ॥ ५ ॥ त्यांनी परोपरींनी मला संतुष्ट केले आणि आनंदाने मला ‘ राममंत्र ’ दिला ॥ ६ ॥ कृपानिधान मुनींनी मला बालरुप रामचंद्रांचे ध्यान (व ते कसे करावे हे) शिकवले ॥ ७ ॥ सुंदर आणि सुखदायक असे हे ध्यान मला फार फार आवडले ते मी तुम्हाला पूर्वीच वर्णन करुन सांगीतले आहे. (१/१९९/१ते१२) ॥ ८ ॥ मुनींनी मला काही काळ आपल्याजवळ ठेऊन घेतले व त्या काळात मला रामचरित मानस सांगीतले ॥ ९ ॥ ही कथा मला आदराने सांगून मग मुनी सुंदर वचन बोलले ॥ १० ॥ हे गुप्त आणि मनोहर रामचरितमानस मला शंकरांच्या कृपाप्रसादाने मिळाले ॥ ११ ॥ तू रामचंद्रांचा निजभक्त आहेस हे जाणून मी ही सगळी कथा तुला सविस्तर सांगीतली ॥ १२ ॥ हे तात ! ज्यांच्या हृदयात रामभक्ती नाही, त्यांना ही कथा केव्हाही सांगू नये ॥ १३ ॥ मुनींनी मला अनेक प्रकारे उपदेश केला, तेव्हा मी प्रेमाने मुनीच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले ॥ १४ ॥ आपले हस्त कमल माझ्या डोक्यावर ठेऊन मुनिश्वरांनी आनंदाने मला आशीर्वाद दिला की ॥ १५ ॥ माझ्या कृपेने रामचंद्रांची प्रगाढ भक्ती नित्य तुमच्या हृदयात राहील ॥ १६ ॥ तुम्ही सदा श्रीरामास प्रिय व्हाल; शुभ गुणांचे माहेरघर, अमान, इच्छेप्रमाने रुप धारण करणारे, ज्ञान वैराग्यनिधान आणि इच्छामरणी व्हाल ॥ ११३ रा ॥ श्रीभगवंताचे स्मरण करीत तुम्ही ज्या आश्रमात रहाल तिथे चार कोस पर्यंत अविद्या व्यापणार नाही ॥ दो० ११३ म ॥

काल कर्म गुण दोष स्वभावहि । जनित दुःख कधिं काहिं तुम्हां नहि ॥
रामरहस्य ललित विध नाना । प्रगट गुप्त इतिहासपुराणां ॥
कळे श्रमांविण सर्व तुम्हां हो । स्नेह रामपदिं नित्य नवा हो ॥
जी इच्छा मनिं कराल कांहीं । हरिप्रसादें दुर्लभ नाहीं ॥
ऐकुनि मुनि आशीस् मति धीरा । ब्रह्मगिरा नभिं होइं गभिरा ॥
तव वच तथास्तु हे ! ज्ञानी मुनि ! । हा मम भक्त कर्म मन भाषणि ॥
श्रवुनि नभागिरा प्रहर्ष मजला । प्रेममग्न संशय सब सरला ॥
विनति करुनि मुनि आज्ञा घेउनि । पद पंकजिं घडि घडिशिर ठेवुनि ॥
या आश्रमिं आलो मी हर्षुनि । प्रभूकृपें दुर्लभ वर पावुनि ॥
येथें वसतां श्रुणु पक्षीश । गेले कल्प सात नी वीस ॥
करी सदा सादर गुणगान । सादर ऐकति विहग सुजाण ॥
अयोध्येंत जैं जैं रघुवीर । धरिति भक्तहित मनुज शरीर ॥
तदा रामपुरिं जाउनि वसतो । शिशुलीला पाहुनि सुख लुटतो ॥
मग हृदिं धरुनि रामशिशुरूपा । निजाश्रमीं येतो खगभूपा ॥
कथा सकल मी कथित तुम्हांला । काक काय मज कसा मिळाला ॥
कथित तात सब तव प्रश्नांसिहि । रामभक्तिमहिमा अति भारि हि ॥

दो० :- प्रिय ही तनु मज, कीं मिळे रामपदीं सुस्नेह ॥
निज प्रभुदर्शन पावलो विगत सकल संदेह ॥ ११४रा ॥

काल, कर्म, त्रिगुण, दोष आणि स्वभाव यांच्यापासून उत्पन्न होणारे दु:ख तुम्हाला कधीही होणार नाही. ॥ १ ॥ अनेक प्रकारचे सुंदर रामरहस्य, जे इतिहास-पुराणा दिकांत प्रगट वा गुप्त आहे ते सर्व काहीही श्रम न करता तुम्हाला कळेल. श्रीरामचरणीं तुमच्या नित्य नवा स्नेह वाढो ! ॥ २-३ ॥ फार काय तुम्ही मनात जी काही इच्छा करान ती हरिकृपेने तुम्हाला दुर्लभ नाही. ॥ ४ ॥ अहो ! धीरमती पक्षीराज ! मुनींचा आशीर्वाद ऐकून आकाशात गंभीर ब्रह्मवाणी झाली की ॥ ५ ॥ हे ज्ञानी मुनी ! तुम्ही जे म्हणालात ते तसे होवो हा कर्माने मनाने वाणीने माझाच भक्त आहे ॥ ६ ॥ ती आकाशात झालेली भगवंताची वाणी ऐकून मला फार हर्ष झाला. मी प्रेममग्न झालो. माझे सर्व संशय लयास गेले ॥ ७ ॥ मग मुनींची प्रार्थना करुन त्यांच्या चरणकमलांवर वारंवार मस्तक ठेऊन ॥ ८ ॥ हर्षित होऊन या आश्रमात आलो. प्रभुच्या कृपेने मला दुर्लभ वर मिळाले ॥ ९ ॥ अहो पक्षीराज ! मी येथे राहू लागल्यापासून २७ कल्प निघून गेले ॥ १० ॥ येथे मी नित्य नियमाने रघुपतीचे गुणगान आदराने करीत असतो, व शहाणे पक्षी आदराने श्रवण करतात ॥ ११ ॥ जेव्हा जेव्हा श्री रघुवीर भक्तांच्यासाठी अयोध्येत मनुज शरीर धारण करतात तेव्हा तेव्हा मी जाऊन शमपुरीत राहतो आणि शिशुलीला पाहून सुख लुटतो ॥ १२-१३ ॥ मग रामचंद्रांचे बालरुप हृदयात धारण करुन मी आपल्या या आश्रमात आलो ॥ १४ ॥ काकदेह मला कसा मिळाला याविषयीची सर्व कथा मी तुम्हाला सांगीतली ॥ १५ ॥ हे तात ! तुमच्या इतर सर्व प्रश्नांविषयीही सांगीतले आणि रामभक्तीचा महिमा अति भारी आहे हे ही सांगीतले ॥ १६ ॥ ही काकतनु मला प्रिय वाटण्याचे कारण हेच की यातच मला रामारणीं शुद्धस्नेह (निर्मल भक्ती) प्राप्त झाला, माझ्या प्रभुचे दर्शन ही याच तनूत झाले व सर्व संशय नष्ट झाले ॥ दो० ११४ रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP