|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय ५ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 चौथे प्रहरिं रोज नृप जागति । विस्मय वाटे आज अम्हां अति ॥ दो० :- रात्रिं न निद्रा नृपतिला हेतु विदित जगदीश ॥ (लोक म्हणाले) रोज राजे तीन प्रहर रात्र उलटून गेल्यावर (चौथे प्रहरी) उठतात; (तेव्हा) आम्हाला अति आश्चर्य वाटते ॥ १ ॥ जा सुमंत्रा ! जाऊन उठवा (जागे करा) की, (मग) आज्ञा मिळाली म्हणजे त्याप्रमाणे कार्य करु ॥ २ ॥ तेव्हा मग सुमंत्र राजभवनात (अंत:पुरात) शिरले (तोच) ते भयाण दिसू लागले व जाण्य़ास (जाताना) भीती वाटू लागली ॥ ३ ॥ जणू काय धाऊन गिळण्यास (खाण्यास) च येत आहे (असे वाटून) तिकडे बघवेनासे झाले व (वाटले की) जणू विपत्ती व विषाद यांनीच (तेथे) वस्ती केली आहे ॥ ४ ॥ (शयन गृहांत) विचारले पण कोणी काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा ज्या खोलीत (कोपभवनात) भूप व कैकयी आहेत तेथे गेले ॥ ५ ॥ जय जीव म्हणून मस्तक नमविले व सुमंत्र बसला. पण राजाची दुर्दशा दिसताच सुकून गेला ॥ ६ ॥ मुळासकट उपटून टाकलेले कमळ पडलेले असावे तसेच जणू भूपति शोकाने व्याकुळ होऊन निवर्ण झालेले जमिनीवर पडलेले दिसले ॥ ७ ॥ सचिव (इतका) घाबरला (की) काही विचारु शकला नाही, पण शुभहीन व अशुभांचीच बनलेली ती (राणी) म्हणाली. ॥ ८ ॥ राजाला रात्रभर मुळीच झोप आली नाही हेतू काय तो जगदीशाला माहीत मात्र राऽऽम राऽऽम राऽऽम म्हणत उजाडले पण मर्म काय ते महीश काही सांगत नाही ॥ दो० ३८ ॥ रामा सत्वर घेउनि येणें । समाचार मग येउनि पुसणें ॥ दो० :- जातिं बघति रघुवंशमणि अति नृपतिचा कुसाज ॥ (तेव्हा) रामाला अगदी त्वरेने (बोलावून) घेऊन या व (राम) आल्यावर मग समाचार विचारा ॥ १ ॥ राजाचा कल पाहून सचिव (सुमंत्र) निघाले (पण) त्यांनी ओळखले की राणीने काहीतरी कुचाळी केलेली दिसते ॥ २ ॥ (सुमंत्र) चिंतेने व्याकुळ झाले व त्यांचे पाऊल पुढील मार्गावर पडेना (मनात म्हणतात की) रामचंद्राना बोलावून राजे काय सांगणार आहेत कोणास ठाऊक ॥ ३ ॥ कसातरी धीर धरुन सुमंत्र राजद्वाराशी गेले. त्यांचे ते उदास (उतरलेले, चिंतातुर) मुख पाहून सर्व लोकांनी त्यांस (कारण) विचारले ॥ ४ ॥ लोकांचे (कसेतरी) समाधान करुन सुमंत्र रघुकुलतिलक रामचंद्रांच्या भवनास गेले ॥ ५ ॥ रामचंद्रांनी सुमंत्रांना येताना पाहीला व पित्याप्रमाणे मानून त्याचा आदर सत्कार केला ॥ ६ ॥ सचिवाने रामचंद्रांच्या मुखाकडे (एकदा प्रेमाने) न्याहाळून पाहीले व राजाची आज्ञा निवेदन केली आणि रघुकुलदीपाला घेऊन चालले ॥ ७ ॥ राम सचिवाबरोबर कसेसेच जात आहेत ते ज्यांनी ज्यांनी पाहीले ते ते सर्व व्याकुळ झाले ॥ ८ ॥ रघुवंशमणी राम गेले व पाहतात तो नरपति अत्यंत दु:स्थितीत असे पडलेले दिसले की जणू सिहिणीला पाहून भयभीत होऊन गजराजच पडला असावा ॥ दो० ३९ ॥ सुकले अधर जळत सब अंग । जणूं दीन मणिहीन भुजंग ॥ दो० :- सुतस्नेह इथं वचन तिथं संकटिं पतिंत नरेश । ओठ सुकून कोरडे पडले आहेत व सर्व अंग जळत आहे आणि जणू मणिहीन झालेला भुजंगच अति दीन होऊन पडला आहे ॥ १ ॥ रुष्ट झालेली कैकयी जवळच दिसत असून जणू मृत्युची घटका मोजून घेत आहे ॥ २ ॥ राम स्वभावताच करुणामय व कोमल अंत:करणाचे व त्यातही त्यांनी दु:ख म्हणजे काय हे ऐकले सुद्धा नव्हते पण आज प्रथमच दु:ख पहावेच लागले ॥ ३ ॥ (त्यामुळे त्यांस अति दु:ख झाले) पण वेळेचे महत्व जाणून त्यांनी धीर धरला व मधुर वाणीने माता – कैकेयीला म्हणतात ॥ ४ ॥ माते मला वडिलांच्या दु:खाचे कारण सांग; म्हणजे जेणे करुन ते निवारण करता येईल असा उपाय करु ॥ ५ ॥ हे पहा राम ! कारण एकच की तुमच्यावर राजांचा अपार स्नेह आहे ॥ ६ ॥ (त्यांनी) मला दोन वर देण्याचे कबूल केले होते व मला जे आवडले ते मी मागितले ॥ ७ ॥ ते ऐकून भूपांच्या मनाला चिंता लागली; कारण की तुमचा संकोच ते सोडू शकत नाहीत ॥ ८ ॥ इकडे पुत्रस्नेह व तिकडे आपले वचन अशा संकटात नरेश सापडले आहेत तुम्हाला शक्य असेल तर आज्ञा शिरसा मान्य करा. व कठीण क्लेश निवारण करा. ॥ दो० ४० ॥ निधडक बसुनि वचन कटु वदते । श्रवत कठिणता अति विव्हळते ॥ दो० :- मुनिगण मिलन विशेषिं वन मजसि परम हितकारि ॥ नि:शंकपणे (निधडक) बसून इतके कटू भाषण करीत आहे की ते ऐकताना कठिणता सुद्धा अत्यंत विह्वळ होते (होईल) ॥ १ ॥ विविध वचने विविध बाण आहेत जीभ हे धनुष्य आहे आणि महीपति (दशरथ) जणू मृदु (मऊमऊ) लक्ष्यासारखे आहेत ॥ २ ॥ जणू कठोरपणाच वर (श्रेष्ठ) वीरांचे शरीर धारण करुन उत्तम धनुर्विद्याच शिकत आहे ॥ ३ ॥ जणू निष्ठुरता स्वत:च देह धरुन बसून तिने (दोन वरांविषयीची) सर्व हकीकत रघुपतीला सांगितली ॥ ४ ॥ भानुकुलाला प्रकाशित करणारे भानु, सहज, आनंदाचे निधान असलेले राम मनात स्मित करुन (म्हणाले) ॥ ५ ॥ (वाणीच्या) सर्व दुषणांनी रहित असलेले, असे कोमल व सुंदर वचन राम बोलले की जणू वाणीचे विशेष विभूषणच ॥ ६ ॥ हे बघ, आई ! जो पुत्र पिता व माता यांच्या वचनावर प्रेम करतो तो महाभाग्यवान होय. ॥ ७ ॥ पण आई ! आईला व बापालाही तोषविणारा मुलगा संसारात (या जगात) दुर्लभ आहे . ॥ ८ ॥ आई ! मला तर ही गोष्ट परमहितकारी वाटते कारण की एक तर वनात राहण्यास सापडणार तेथे विशेष म्हणजे मुनिगणांच्या भेटीगाठी होणार, वडिलांच्या आज्ञेचे पालन करता येणार आणि त्यातही तुला फार आवडणारी गोष्ट करता येणार ! ॥ दो० ४१ ॥ राज्य मिळे प्राणप्रिय भरता । विधि अनुकूल आज मज पुरता ॥ दो० :- सहज सरल रघुवर वचन कुटिल मानि कुमती हि ॥ (आणि) मला प्राणप्रिय असलेले भरत राज्य पावतील; (म्हणून) आज मला दैव पूर्णपणे (सर्व प्रकारे) अनुकूल झाले आहे. (यात संशय नाही) ॥ १ ॥ अशा ही कार्यासाठी मी जर वनात गेलो नाहीतर माझी गणती मूढ लोकांत पहिला म्हणूनच केली पाहीजे ॥ २ ॥ कल्पतरुचा त्याग करुन जो जेपाळाची (बाभळीची) सेवा करतो व अमृत फेकून विष मागून घेतो ॥ ३ ॥ (असे असतील) ते सुद्धा अशी सुसंधी आली असता हातची दवडणार नाहीत; म्हणून माते तू आपल्या मनात जरा विचार करुन बघ (म्हणजे तुझी खात्री होईल की हा वनात जाणारच) ॥ ४ ॥ माते ! मला एकच विशेष दु:ख वाटते (कारण) नरनायक अति व्याकुळ झालेले मला दिसत आहेत ॥ ५ ॥ अल्पशा कारणास्तव पित्याला इतके दु:ख होईल अशी प्रतीती माझ्या मनाला वाटत नाही ॥ ६ ॥ (कारण की) महाराज धीर असून गुणांचा अगाध सागर आहेत (तेव्हा मला) असे वाटते की माझ्याकडूनच काहीतरी मोठा अपराध घडला असावा ॥ ७ ॥ ज्या अपराधामुळे महाराज माझ्याशी काहीसुद्धा बोलत नाहीत तो कोणता (अपराध) ते खरे खरे सांग तुला माझी शपथ आहे ॥ ८ ॥ रघुवराचे वचन सहज सरळ आहे (पण कैकेयी) कुबुद्धि व कुटिल आहे म्हणून (हि) तिला ते कुटिल वाटते सलिल जरी समान असले तरी जळू, त्या जलात वक्रगतीनेच चालावयाची ॥ दो० ४२ ॥ हर्षे राणि राम-कल पाहुनि । बोले कपटी स्नेहा चावुनि ॥ दो० :- गत मूर्च्छा रामा स्मरत वळले नृपति कुशीस ॥ रामचंद्रांचा कल जाणून राणी हर्षित झाली व कपटी स्नेह दाखवित म्हणाली की - ॥ १ ॥ मी तुमची शपथ आणि भरताची आण घेऊन सांगते की (राजांच्या दु:खाचा) मला आणखी कोणताच हेतू माहीत नाही ॥ २ ॥ तात ! तुम्ही अपराध करण्यास लायक नाही व आई-बाप व भाऊ यांना सुख देणारे आहांत ॥ ३ ॥ राम तुम्ही जे काही सांगता आहांत ते सर्व सत्य आहे कारण तुम्ही माता – पिता – वचनांत रत असतां ॥ ४ ॥ हा देह मी तुमच्यावरुन ओवाळून टाकते (पण) तुम्ही वडिलांची अशी समजूत घालावी की वृद्धपणी अकीर्तीचा लाभ होऊ नये ॥ ५ ॥ ज्या पुण्याईने तुमच्यासारखा पुत्र दिला त्या पुण्याईचा अनादर करणे उचित नाही ॥ ६ ॥ कैकेयीच्या कुमुखात ही वचने कशी दिसतात म्हणाल तर मगध देशात जशी गया वगैरे तिर्थे दिसतील तशी ॥ ७ ॥ जसे गंगेत येऊन पडणारे विविध जलप्रवाह पवित्रच होतात, तशी कैकयीची सर्व वचने रामाला रुचली ॥ ८ ॥ दशरथांची मूर्छा गेली व राम राम उच्चार करीत ते कुशीस वळले तेव्हा सुमंत्राने राम आल्याचे सांगीतले आणि समयानुसार विनंती केली ॥ दो० ४३ ॥ अवनिप परिसुनि राम पदार्पण । धरिति धीर मग उघडिति लोचन ॥ दो० :- प्रेरक तुम्हिं सर्वांतरीं द्या अशि मति रामास ॥ रामचंद्रांनी पदार्पण केले आहे असे अवनी पतिच्या कानी पडताच त्यांनी धीर धरला व मग डोळे उघडले ॥ १ ॥ सचिवाने राजास सांभाळून बसते केले व (राम) पाया पडत असता राजाने रामाकडे निरखून पाहिले ॥ २ ॥ स्नेहाने व्याकुळ होऊन त्यांना असे हृदयाशी धरले की जणू हरवलेला मणि फणीला (नागाला) परत मिळाला ॥ ३ ॥ राजा दशरथ रामाकडे टक लावून बघत राहीले आहेत व नेत्रांतून अश्रूंचे प्रवाह वहात आहेत ॥ ४ ॥ शोकाकुल झाले असल्याने शब्द सुद्धा बोलवत नाही फक्त पुन:पुन्हा हृदयाशी धरून आलिंगन देत आहेत ॥ ५ ॥ दशरथ राजा मनात विधिला विनवितात की जेणे करुन रघुनाथ वनांत जाणार नाहीत ॥ ६ ॥ महेशाचे स्मरण करुन (मनातच) प्रार्थना करतात की हे सदाशिवा ! माझी विनंती ऐकावी ॥ ७ ॥ तुम्ही शीघ्र संतुष्ट होणारे व लहरीत येईल ते देणारे आहात, तेव्हा मी दीन आहे हे जाणून माझ्या विपत्तींचे हरण करा ॥ ८ ॥ तुम्ही सर्वांच्या हृदयात प्रेरक आहांत, तेव्हा रामाला अशी बुद्धी द्या की माझ्या वचनाचा त्याग करुन आणि शीलावर जो स्नेह आहे त्याचा त्याग करुन राम घरी राहील ॥ दो० ४४ ॥ अपयश मिळो, सुयश जगिं जावो । मिळो नर्क वा स्वर्ग न पावो ॥ दो० :- मंगल-समयीं स्नेहवश शोक नसावा तात ॥ जगात माझे अपयश, अकीर्ती होवो की सुयशाचा नाश होवो, नरकप्राप्ती होवो की स्वर्ग न मिळो ॥ १ ॥ (जगात असतील ती) सर्व दु:सह दु:खे (महेशा !) मला द्या पण रामाला माझ्या डोळ्यांआड नेऊ नका ॥ २ ॥ अशा प्रकारचे चिंतन राजा, मनात करीत आहे व काही बोलत नाही; पण त्याचे मन मात्र पिंपळपानासारखे फडफडत (डोलत) आहे ॥ ३ ॥ वडील प्रेमवश झाले आहेत असे जाणून व माता पुन्हा काही बोलेल हे जाणून ॥ ४ ॥ रघुपति देश, काळ, वेळ यांना अनुसरुन विचारपूर्वक व विशेष नम्रतेने म्हणाले की - ॥ ५ ॥ ताता ! मी धीटपणा करून काही बोलतो, पण माझे बालपण लक्षात घेऊन आपण मला क्षमा करावी ॥ ६ ॥ आपण अगदी क्षुद्र कार्यात दु:खी झालात मला आधीच का नाही कळविले ? आपली दशा पाहून मी मातेला विचारले व सर्व हकीकत ऐकून शरीर शीतल झाले ॥ ८ ॥ बाबा ! मंगलकारक प्रसंगी स्नेहाला वश होऊन शोक करु नये मला आनंदाने आज्ञा द्यावी (असे म्हणून) प्रभू रोमांचित झाले ॥ दो० ४५ ॥ धन्य जन्म जगतीतळिं त्याचें । प्रमुदित पिता चरित्रें ज्याचें ॥ दो० :- मुखं सुकतीं स्रवती नयन उर अपुरा शोकास ॥ ज्याच्या चरित्राने (ते श्रवण करुन) पित्याला विशेष आनंद त्याचा (पुत्राचा) जन्म या जगतितळावर धन्य होय ॥ १ ॥ ज्याला पिता व माता प्राण प्रिय वाटतात त्याच्या मुठीत चारी पुरुषार्थ आले असे समजावे ॥ २ ॥ (आपल्या) आज्ञेचे पालन करुन जन्माची सफलता करुन मी लवकर येईन, तरी आज्ञा द्यावी ॥ ३ ॥ मी आईकडे जाऊन निरोप घेऊन येतो व मग आपल्या चरणांना वंदन करुन वनात जाईन ॥ ४ ॥ असे सांगून रामचंद्रांनी गमन केले (पण) शोकाकुल झाल्यामुळे नृपति काही उत्तर देऊ शकले नाहीत ॥ ५ ॥ (रामराज्यरसभंग प्रकरण पूर्ण) विधिनें असुनी मेळ बिघडिला । जिथं तिथं देति शिव्या कैकइैला ॥ दो० :- काय न वन्हिस जाळवे राहि सागरिं न काय ॥ सगळ्या कुटुंबाचा चांगला मेळ (एकी) असता विधीने बिघाड करून टाकला जिथे तिथे (नरनारी) कैकयीला शिव्या देऊं लागले ॥ १ ॥ या पापीणीला काय दुर्बद्धि सुचली की घर आधी शाकारुन मग त्याला आग लावली ! ॥ २ ॥ आपल्या हातांनी आपले डोळे काढून घेऊन ते पाहण्याची इच्छा झाली ! आणि अमृत सुद्धा टाकून देऊन विष चाखू पहात आहे ॥ ३ ॥ अभागिण ! कुटिल कठोर, कुबुद्धि बनली व रघुवंशरुपी वेणूच्या वनात आग बनली ॥ ४ ॥ मोठ्या फांदीवर बसून तिने बुंधाच की हो छाटला ! व सुखात असता शोकाचा सर्व थाट की हो थाटला ! ॥ ५ ॥ राम हिला सदा प्राणांसारखे प्रिय होते; मग काय कारणाने ही कुटिलपणा धरुन बसली ॥ ६ ॥ स्त्री स्वभावाविषयी कवी म्हणतात ते अगदी सत्य आहे त्यांचे नाना प्रकारचे कपट अगाध व अगम्य असते (यात शंकाच नाही) ॥ ७ ॥ स्वत:चे प्रतिबिंबसुद्धा स्वत:च्या हातात घेता येईल पण स्त्रियांची करणी कधीही जाणता येणार नाही ॥ ८ ॥ अग्नि काय जाळूं शकत नाही ? समुद्रात काय राहू शकत नाही ? प्रबल झालेली अबला काय करु शकत नाही ? व काळ कोणाला खात नाही ? ॥ दो० ४७ ॥ विधी ऐकवुनि काय ऐकवी । काय दाखवुनि काय चाखवी ॥ दो० :- स्रवे चंद्र जरि अनलकण विषसम होइ सुधा हि ॥ अयोध्यावासींच्या प्रतिक्रियाविधीने (कालच) कानी घातले काय व (आज) ऐकवीत आहे काय ? (काल) काय दाखविले आणि (आज) काय चाखवीत आहे ? काही लोक म्हणत आहेत की राजाने भले नाही केले, त्या दुर्बुद्धिला वर दिले ते विचार करुन नाही दिले ॥ २ ॥ वर देण्याच्या हट्टाने आज सर्व दु:खांचे (भाजन) पात्र बनले; एका अबलेला वश झाले व जणूं ज्ञान व गुण नष्ट झाले ॥ ३ ॥ धर्मच श्रेष्ठ असे जाणणारे जे सूज्ञ शहाणे आहेत ते राजाला दोष देत नाहीत ॥ ४ ॥ हरिश्चंद्र, शिबी, दधिचि इत्यादिंच्या कथा कोणी कोणास सांगू लागले ॥ ५ ॥ कोणी म्हणाले की (कैकेयीच्या कुटील करणीला) भरताची संमती असलीच पाहीजे, तर कोणी हे ऐकून उदासीनपणाने स्वस्थ राहीले आहेत. ॥ ६ ॥ कोणी कानांवर हात ठेवून जीभ चावून म्हणाले की तुमचे म्हणणे खोटे आहे. ॥ ७ ॥ असे बोलण्याने तुमचे सर्व सुकृत नष्ट होऊन जाईल ! कारण भरताला राम प्राणांहून प्रिय आहेत ॥ ८ ॥ चंद्र जरी अग्निकणांचा वर्षाव करु लागला आणि सुधा ही विषासारखी झाली तरीही भरत कधी स्वप्नांत सुद्धा रामाच्या विरुद्ध काहीही करणार नाहीत ॥ दो० ४८ ॥ एक विधाता देती दूषण । सुधा दाखवुनि दे विष उल्बण ॥ दो० :- सीता सोडि किं पतिपदां त्यजि न कि लक्ष्मण धाम ॥ कोणी ब्रह्मदेवाला दोष देतात की त्याने सुद्धा अमृत दाखवून घोर विष दिले ॥ १ ॥ तेव्हा नगरात सर्वत्र खळबळ उडाली असून सर्वच शोक करीत आहेत. (सर्वांच्या) हृदयात दु:सह दाह होत असून (सर्व) उत्साह पार मावळला आहे ॥ २ ॥ उत्तम कुळातल्या सन्मान्य वृद्ध स्त्रिया व ब्राह्मणांच्या स्त्रिया ज्या ज्या कैकयीला फार प्रिय आहेत ॥ ३ ॥ त्या कैकयीच्या सुस्वभावाची प्रशंसा करुन तिला उपदेश करु लागल्या; पण त्यांची वचने तिला बाणासारखी वाटू लागली ॥ ४ ॥ भरत मला रामाच्या सारखा प्रिय नाही असे तुम्ही नेहमी म्हणत असता, आणि सर्व जगही जाणते ॥ ५ ॥ तुम्ही रामावर सहज स्नेह करीत असून असा काय गुन्हा (त्यांनी केला) की तुम्ही त्यांस वनवास देता ? ॥ ६ ॥ तुम्ही कधीही सवतीमत्सर केला नाहीत व तुमची परस्पर प्रीती व विश्वास सर्व देशाला विदित आहे ॥ ७ ॥ आताच कौसल्येने असा काय बिघाड केला की ज्यामुळे तुम्ही सगळ्या अयोध्येवर वज्रपात केलात ? ॥ ८ ॥ सीता का रामचरणांना सोडून राहील ? लक्ष्मण (ही) घर सोडल्यावाचून राहतील का ? भरत अयोध्येचे राज्य भोगतील कां ? ॥ दो० ४९ ॥ या सुविचारें रोषा त्यजणें । शोक-कलंक-कोठि ना बनणें ॥ छं० :- करुनी उपाय कलंक शोकां नाशि जो कुळ पाळणें । असा सुविचार करुन क्रोध सोडा आणि शोक व कलंक याची कोठी होऊ नका ॥ १ ॥ भरताला युवराज जरुर करा पण रामाला वनात धाडण्याचे काम काय ? ॥ २ ॥ रामचंद्रांना राज्याची भूक - भोगेच्छा मुळीसुद्धा नाही ते धर्म - धुरंधर असून विषयभोगांच्या ठिकाणी अगदी विरक्त - उदासीन - रुक्ष आहेत ॥ ३ ॥ (तेव्हा) दुसरा वर मागून घ्या की रामचंद्रांनी घरी न राहता गुरुगृही रहावे (राज्याचा त्याग करावा) ॥ ४ ॥ आमचे (हे) सांगणे जर तुम्ही मानले नाहीत तर तुमच्या हाती काही सुद्धा लागणार नाही. (हे नक्की समजा) ॥ ५ ॥ जर ही काही थट्टाच केली असेल तर तसे स्पष्टपणे उघड करुन सांगा ॥ ६ ॥ रामासारखा पुत्र काय वनवासात पाठवण्यास योग्य आहे ? हे ऐकून लोक तुम्हांला काय म्हणतील ? ॥ ७ ॥ उठा सत्वर व घाईघाईने असा उपाय करा की जो शोक व कलंक पुसून टाळण्यास समर्थ होईल ॥ ८ ॥ जो कलंकाचा व शोकाचा नाश करील असा उपाय करुन कुळाचे रक्षण करा, राम वनात जात असता त्यांना हट्टाने परत वळवा; दुसरे काही बोलूच नका भानूशिवाय जसा दिवस, प्राणाशिवाय जशी तनु, व चंद्राशिवाय जशी रात्र, तशीच हे भामिनी! तुलसीदासांच्या प्रभूशिवाय ही अयोध्या दीन होईल हे लक्षात ठेवा ॥ छंद ॥ (या प्रमाणे) सखींनी उपदेश केला तो ऐकण्यास मधुर व परिणामीं हित करणारा आहे (तरीसुद्धा) तिने जरासुद्धा कानांवर घेतला नाही; कारण कुटिल कुबडीने तिला पढवलेली आहे ॥ दो० ५० ॥ न वदे, भारि दिसे रुसलेली । बघे मृगिंस वाघीण भुकेली ॥ दो० :- नव गजेंद्र रघुवीर मन राज्य अलान-समान ॥ ती कुमती काहीच बोलली नाही, पण फार रुष्ट झालेली दिसली व जणूं अत्यंत भूक लागलेली वाघीण हरीणीकडे पहावे (तशी) पाहू लागली ॥ १ ॥ व्याधी असाध्य आहे असे समजून त्यांनी तिचा त्याग केला आणि मंदबुद्धी अभागीण आहे असे म्हणत परतल्या ॥ २ ॥ ही चांगले राज्य करीत असता दैवाने हिला बुडविली हिने जसे केले तसे कोणीसुद्धा करणार नाही ॥ ३ ॥ याप्रमाणे नगरातील पुरुष व स्त्रिया विलाप करीत आहेत, व या कुचाळकी करणारीला खूप शिव्या देत आहेत ॥ ४ ॥ विषमज्वराने दाह होत आहे व सर्व दीर्घ उसासे घेत आहेत (व म्हणतात की) रामाशिवाय जीवनाची आशा तरी (कुठली) ? ॥ ५ ॥ अत्यंत वियोगाने प्रजा अशी विह्वळत (तळमळत) आहे की जणू पाणी आटले असता जलचरांचे समूहच ! ॥ ६ ॥ सर्व पुरुष व स्त्रिया विषादाला वश आहेत (जेव्हा) स्वामी राम मातेकडे गेले ॥ ७ ॥ तेव्हा त्यांचे मुख प्रसन्न असून चित्तात अत्यंत उत्साह आहे; (कारण) राजा (घरी) ठेवीत तर नाही ना ? ही चिंता दूर झाली ॥ ८ ॥ रघुवीराचे मन नवीन गजेंद्र असून राज्य आलाना (बंधन स्तंभा) सारखे आहे . वनात गमन करायचे हे जाणून (म्हणजे) ते बंधन सुटले असे जाणून, हृदयात महान आनंद झाला आहे . ॥ दो० ५१ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |