|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय ११ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 श्रवुनि राम मुनिवच संकुचती । भावभक्ति आनंदे तृप्ती ॥ दो० :- राम करुनि विश्राम निशिं स्नान उदयिं तीर्थांत ॥ मुनीचे वचन (स्तुती) ऐकून राम संकोचित झाले (पण) मुनीच्या भावभक्तीने व आनंदाने ते तृप्त झाले ॥ १ ॥ मग रघुवीराने मुनीचे सुंदर सुयश नाना प्रकारे सर्वांस निवेदन केले ॥ २ ॥ मुनीश तुम्ही ज्याला आदर देता तो मोठा (ठरतो) व तो सर्व गुणसमूहांचे घर बनतो ॥ ३ ॥ मुनी व रघुवीर एकमेकांना नमत (नमस्कार करत) आहेत व वाणीला अगोचर असणार्या सुखाचा अनुभव घेत आहेत ॥ ४ ॥ (भरद्वाजाश्रमात) दशरथनंदन रामलक्ष्मण आले आहेत हा समाचार कळताच प्रयागात राहणारे ब्रम्हचारी तपस्वी मुनी सिद्ध आणि संन्यासी ॥ ५ ॥ हे सगळे दशरथांच्या सुंदर पुत्रास पाहण्यासाठी भरद्वाजाश्रमात आले ॥ ६ ॥ रामचंद्रांनी सर्वांना नमस्कार केला त्या सर्वांना नेत्राचा लाभ मिळाला व आनंद झाला ॥ ७ ॥ त्यांना परम सुख मिळाले व त्यानी आशीर्वाद दिले व ते सुंदरतेची प्रशंसा करीत परत गेले ॥ ८ ॥ रामचंद्रांनी रात्री विश्रांती घेतली व उजाडल्यावर प्रयाग – तीर्थात स्नान इ. केले व भरद्वाज मुनींस आनंदाने नमन करुन सीता, लक्ष्मण व सेवक गुह यांच्यासह आनंदाने जाण्यास तयार झाले (निघाले) ॥ दो० १०८ ॥ राम मुनिस वदले प्रेमानें । जावें नाथ ! कवण मार्गानें ॥ दो० :- विनवुनि बटुनां फिरविले जाति पूर्ण-मनकाम ॥ भरद्वाज मुनीना राम प्रेमाने म्हणाले की नाथ ! आम्ही कोणत्या मार्गाने जावे ॥ १ ॥ (तेव्हा) मुनी मनात मोठ्याने हसून रामचंद्रांस म्हणाले की तुम्हांला सगळे मार्ग सुगम (सोपे) आहेत ॥ २ ॥ रामचंद्रांबरोबर देण्यासाठी भरद्वाजांनी शिष्यांस बोलावले (आज्ञा) ऐकून (सुमारे) पन्नास शिष्य आनंदाने आले ॥ ३ ॥ सर्वांचे रामावर अपार प्रेम आहे व ते सर्व म्हणाले की रस्ता आम्हांला माहीती आहे ॥४ ॥ ज्यांनी पुष्कळ जन्मात सर्व (प्रकारचे) सुकृत केले होते अशा चार बटूंना मुनीने बरोबर दिले ॥ ५ ॥ भरद्वाज मुनींना प्रणाम करून व त्यांची आज्ञा घेऊन रघुराज प्रमुदित मनाने चालू लागले ॥ ६ ॥ तीरवासि नरनारी ऐकत । निज निज काजां विसरुनि धावत ॥ दो० :- सजल नयन, तनुं पुलक, निज इष्ट देव जाणून ॥ (दोन परम सुंदर कुमार व एक परम सुंदर सुकुमारी येत आहेत ही बातमी) यमुनेच्या तीरावरील गांवच्या लोकांस कळतांच, कानी पडताच, सर्व स्त्रीपुरुष आपाअपले कामकाज विसरुन धावत येऊ लागले ॥ १ ॥ लक्ष्मण राम व सीता यांचे सौदर्य पाहून सर्व आपल्या भाग्याची महती गाऊं लागले ॥ २ ॥ नांव, गांव वगैरे विचारण्याची अति प्रबल इच्छा मनात उत्पन्न झाली, पण विचारण्यास संकोच वाटू लागला ॥ ३ ॥ त्या लोकांत जे वयोवृद्ध व शहाणे (सुज्ञ चतुर) होते त्यांनी युक्ती प्रयुक्ती करुन रामचंद्रांस जाणले (ओळखले) ॥ ४ ॥ मग त्यांनी सर्व कथा बाकीच्या सर्वांना सांगीतली (व म्हणाले की) पित्याच्या आज्ञेने (राम) वनात जात आहेत ॥ ५ ॥ हे ऐकून सर्व दु:खी होऊन पश्चाताप करुं लागतात व म्हणतात की राणी व राजा यांनी हे चांगले नाही केले ॥ ६ ॥ तुलसीदासांचा स्वानुभव सगुण साक्षात्काराचा तापस – प्रकरण – त्याच वेळी एक तपस्वी आला होता ॥ ७ ॥ त्याची गती कवीला सुद्धा अलक्ष्य होती (तो कोण हे कवीलाही कळले नाही) वैराग्याचा वेष असून, मनाने – कर्माने व वाणीने तो रामप्रेमी होता ॥ ८ ॥ (राम) आपले इष्टदेव आहेत हे जाणून (ओळखून) त्याचे नेत्र अश्रूंनी डबडबले, अंगावर रोमांच उभे राहीले व तो एखाद्या दंडासारखा धरणीतळावर पडला त्यावेळची त्याची दशा वर्णन करणे शक्य नाही॥ दो० ११० ॥ प्रेमें राम धरिति उरिं पुलकत । परम रंक जणुं परीस पावत ॥ दो० :- मग रघुवीर अनेक-विध शिकवण देति सख्यास ॥ परम रंकाला परिसाचा लाभ व्हावा त्याप्रमाणेच जणू रामप्रेमाने पुलकित होऊन त्यानी त्यास हृदयाशी धरला ॥ १ ॥ सर्व म्हणतील – म्हणाले – की जणूं प्रेम आणि परमार्थ शरीरधारी होऊन एकमेकांस भेटले ॥ २ ॥ नंतर तो लक्ष्मणाच्या पाया पडला (तेव्हा) लक्ष्मणाला प्रेमाचे भरते आले व त्याला उठविला ॥ ३ ॥ मग त्याने जननी समजून सीतेच्या पायांची धूळ मस्तकावर धारण केली व सीतेने त्यास शिशु समजून आशीर्वाद दिला ॥ ४ ॥ (मग) निषादराजाने त्याला दंडवत केला तेव्हा रामस्नेही जाणून त्यास भेटत असता तापसाला आनंद झाला ॥ ५ ॥ तो तपस्वी नेत्ररुपी ओष्ठ – पुटांनी राम – रुपामृताचे पान करीत असा आनंदित झाला की भूक लागलेला मनुष्य मिष्टान्न मिळाल्याने आनंदित होतो ॥ ६ ॥ (स्त्रिया म्हणतात) सखी ! ज्यांनी अशा बालकांस वनांत धाडले ते आईबाप आहेत तरी कसे ? ॥ ७ ॥ रामलक्ष्मण व सीता यांचे रुप पाहून पुरुष व स्त्रिया स्नेहाने व्याकुळ होऊ लागतात ॥ ८ ॥ मग रघुवीराने आपला सखा निषादराज गुह याला नाना प्रकारे शिकवण दिली (समजूत घातली व उपदेश केला) तेव्हा त्याने रामाज्ञा शिरसामान्य करून घरी जाण्य़ासाठी गमन केले ॥ दो० १११ ॥ सिता राम लक्ष्मण कर जुळती । पुन्हां नमन यमुनेला करती ॥ दो० :- प्रेमें विनवित असें, जल नेत्रिं, गात्र पुलकीत ॥ गुह परत गेल्यावर सीताराम व लक्ष्मण यांनी पुन्हा यमुनेला प्रणाम केला ॥ १ ॥ व सीतेसह दोघे बंधू आनंदाने पुढे चालू लागले जाताना रविकन्या यमुनेचे माहात्म्य वर्णन करीत चालले ॥ २ ॥ रस्त्याने जात असता त्यांना अनेक वाटसरू भेटले व ते या दोन भावांना पाहून प्रेमाने म्हणाले की -॥ ३ ॥ तुमच्या शरीरावर सर्व राजचिन्हे आहेत, ती पाहून आमच्या हृदयास फारच दु:ख होत आहे (सर्व सामुद्रिक राजचिन्हे तुमच्या अंगावर असून) तुम्ही अनवाणी पायी चालत वाटेने जात आहांत (हे पाहून) आंम्हास वाटते की सामुद्रिक ज्योतिष खोटे असले पाहीजे ॥ ५ ॥ मार्ग फारच दुर्गम, डोंगर (मोठाले) व अरण्य घनदाट, आणि त्यांतही तुमच्याबरोबर अति सुकुमार स्त्री आहे ॥ ६ ॥ हत्ती, सिंह, लांडगे, असल्याने वनाकडे बघवत सुद्धा नाही (म्हणून) जर आपण अनुज्ञा दिलीत तर आम्ही आपल्याबरोबर (वाटाडे, सोबत व संरक्षक म्हणून) येतो. ॥ ७ ॥ तुम्हांला जिथे जाणे असेल तिथे (कुशल) पोचवून व तुम्हाला (सेवकांप्रमाणे) नमन करुन आम्ही परत येऊं ॥ ८ ॥ (हे वाटसरु ज्योतिषी) याप्रमाणे विनवीत असता त्यांच्या नेत्रांतून अश्रू गळूं लागले व देह रोमांचित झाले. कृपासिंधु रामचंद्रांनी मृदु व अति नम्र वचने बोलून त्यांस परत पाठवले ॥ दो० ११२ ॥ जे पुर गांव पथीं त्या असती । त्या अहि-सुर-पुर सेर्षा स्तवती ॥ दो० :- छाय करिति घन विबुध सुम वर्षोनी स्तवितात ॥ जी खेडी व गांवे (रामचंद्रांच्या) वाटेत आहेत त्यांची नाग व देव नगरे ईर्षापूर्वक स्तुती करु लागले की ॥ १ ॥ कोणत्या पुण्य पुरुषाने व कोणत्या पावन मुहूर्तावर बसविली असतील बरें ! ही सर्व धन्य आहेत, पुण्यमय आहेत व फार शोभत आहेत ॥ २ ॥ राम जिथे पायी चालत जात आहेत त्या स्थानांसारखी अमरावती (इंद्रपुरी) सुद्धा नाही ॥ ३ ॥ रामचंद्राच्या मार्गाच्या जवळ राहणारे लोक पुण्यराशी आहेत (अशी) त्याची प्रशंसा सुरपुरीत राहणारे लोक सुद्धा करतात (कारण की) हे लोक सीता व लक्ष्मण यांच्यासह घनश्याम रामास डोळे भरुन पाहतात. ॥ ५ ॥ ज्या तलावात किंवा नद्यांत रामचंद्रांनी स्नान केले किंवा त्यात प्रवेश केला त्यांची देवांचे तलाव व देवसरिता प्रशंसा करु लागतात ॥ ६ ॥ प्रभु ज्या ज्या झाडांखाली बसतात त्यांना कल्पतरु (आपल्यापेक्षा) मोठे श्रेष्ठ म्हणू लागले ॥ ७ ॥ रामचरण कमलांच्या परागांचा (धुळीचा) स्पर्श झाल्याने (ती ती) भूमी आपले भाग्य अत्यंत थोर आहे असे मानू लागली. ॥ ८ ॥ मेघ छाया करु लागले विबुध (देव) पुष्पवृष्टी करुन प्रभुची स्तुती करु लागले (पण तिकडे लक्ष न देता) राम पर्वत, पक्षी, पशू वगैरेंचे निरिक्षण करीत मार्गाने जात आहेत ॥ दो० ११३ ॥ लक्ष्मण सीते सहित रघुपती । जैं जैं गांवा वरुनी जाती ॥ दो० :- एक बघुनि वट छाय भलि मृदु तृण पल्लव घालि ॥ सीता व लक्ष्मण यासह रघुपती ज्या ज्यावेळी एखाद्या गावाजवळून निघतात ॥ १ ॥ त्या त्यावेळी ते कळताच बालकांपासून वृद्धापर्यत स्त्रिया व पुरुष आपापले घर व घरकाम विसरुन (रामादि तिघांना पाहण्यासाठी) त्वरेने निघतात ॥ २ ॥ राम – लक्ष्मण व सीता यांचे रुप निरखून पाहतात, त्यांना नेत्रफळ मिळते व ते सुखी होतात ॥ ३ ॥ नेत्र अश्रुंनी भरतात, अंगावर रोमांच उभे राहतात व सर्व या दोन वीरांना बघत प्रेममग्न होतात (असे गावोगावी चालते) ॥ ४ ॥ त्यांची प्रेमदशा वर्णन करून सांगणे शक्य नाही, पण जणूं काय रंकांना सुरमणींची (चिंतामणींची) रास सापडावी तसे त्यांस झाले ॥ ५ ॥ कोणी कोणाला बोलावून उपदेश करतात की जा, या क्षणी जा, व नयनलाभ लुटा ॥ ६ ॥ कोणी रामाला पाहून त्यांच्याकडे निरखून बघत बघत त्यांच्या मागो माग जाऊं लागतात ॥ ७ ॥ कोणी नयन मार्गाने रामचंद्रांना हृदयात आणून शरीराने – मनाने व श्रेष्ठ वाणीने शिथिल होतात (शरीर – मन व चारी वाणी यांची कार्ये बंद पडतात) ॥ ८ ॥ कोणी वडाची सुंदर दाट छाया पाहून कोमल तृण पल्लव तिथे पसरुन विनविले की घटकाभर विश्रांती घ्यावी, मग वाटल्यास आज जावे नाहीतर सकाळी जाल ॥ दो० ११४ ॥ एक कलशभर पाणि आणती । भरणें चूळ नाथ ! मृदु म्हणती ॥ दो० :- जटा-मुकुट मस्तकिं सुभग उर-भुज-नयन विशाल ॥ कोणी कळशीभर पाणी आणून विनवितात, की नाथ जरा चूळ भरा ‘ हात ’पाय धुवून पाणी प्यावे ॥ १ ॥ त्यांची ती अति प्रीती पाहून व प्रेमळ वाणी ऐकून अति कृपाळू व अतिशय सुशील ॥ २ ॥ रामचंद्रांनी मनात आणले की सीतेला श्रम ही झालेले आहेत व ते त्या वडाच्या छायेला घटकाभर थांबले – बसले ॥ ३ ॥ स्त्रिया व पुरुष आनंदित होऊन शोभा पाहू लागले व त्या अनुपम रुपावर त्यांचे नेत्र व मन लुब्ध झाले ॥ ४ ॥ ते सर्व लोक प्रभुच्या चारीही बाजूंनी टक लावून बघत असलेले शोभत आहेत रामचंद्रांचे मुख चंद्र आहे व ते बघणारे (सर्व) चकोर आहेत ! ॥ ५ ॥ तरुण तमाल वृक्षाप्रमाणे शाम शरीर शोभायमान दिसत असून त्यास पाहून कोटी – अनंत मदनांचे मन मोहित होते ॥ ६ ॥ वीजेच्या वर्णासारखे लक्ष्मण अति सुंदर व तेजस्वी असून नखशिखांत (सर्वंत्र) मनोहर असल्याने मनाला आवडतात ॥ ७ ॥ दोघांनी मुनीवस्त्रे परिधान केली असून कमरेला तूणीर = भाते कसलेले आहेत व हातात सुंदर धनुष्य – बाण घेतले आहेत ॥ ८ ॥ दोघांच्याही मस्तकावर सुंदर जटामुकुट असून छाती बाहू व नेत्र विशाल व सुंदर आहेत शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्रासारखे (प्रत्येकाचे) मुख सुंदर असून त्यावर घामाच्या बिंदूचे जाळे शोभून दिसत आहे ॥ दो० ११५ ॥ ना वर्णवे मनोहर जोडी । शोभा बहुत बुद्धि मम थोडी ॥ दो० :- श्यामल गौर किशोर वर सुंदर सुषमा-क्षेत्र ॥ या राम – लक्ष्मण मनोहर जोडीचे वर्णन करवत नाही कारण ती शोभा अपार असून माझी बुद्धी अल्प आहे. ॥ १ ॥ ते राम – लक्ष्मण – सीता यांचे सौंदर्य चित्त – मन – बुद्धी लावून पहात आहेत ॥ २ ॥ प्रेमाची तहान लागलेली ही सर्व स्त्री – पुरुष मंडळी (रुप पाहता पाहता) अशी तटस्थ – थक्क झाली आहेत की जणू मोठा दिवा पाहून मृगी आणि मृगच ! ॥ ३ ॥ खेडेगांवातील स्त्रिया सीतेच्या जवळ अत्यंत स्नेहाने जातात पण अत्यंत स्नेहामुळे विचारण्यास संकोच वाटतो. ॥ ४ ॥ तेव्हा त्या सगळ्या वारंवार सीतेच्या पायांना वंदन करुन सरळ व मृदु शब्दांनी म्हणतात ॥ ५ ॥ राजकुमारी ! आम्ही काही विनंती करणार आहोत. पण स्त्री – स्वभाव असल्याने विचारण्यास भीती वाटते ॥ ६ ॥ तरी हे स्वामिनी ! आमच्या उद्धटपणा क्षमा करावा व आम्ही गावंढळ आहोत हे जाणून मनांत रोष धरु नये ॥ ७ ॥ दोघे राजकुमार सहज सुंदर असून यांच्या कांतीनेच मरकत व सोने यांची कांती आहे. (यांच्या पासूनच मरकत व सोने यांनी आपली कांती घेतली आहे) ॥ ८ ॥ सावळे व गोरे, उत्तम किशोर वयाचे, सुंदर व परम शोभेचे निवासस्थान, शरद ऋतूतील पौर्णीमेच्या चंद्रासारखे मुख, व शरदांतील कमलांसारखे डोळे असणारे व कोटी मनोजांना (मदनांना) लाजविणारे हे दोघे तुमचे कोण आहेत, हे सर्व हे सुमुखि ! आपण आम्हाला सारे सांगा हं ! ॥ दो० ११६ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |