॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ सुंदरकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय २ रा



Download mp3


लंका निशिचर-निकर-निवासहि । येथें कुठला सज्जन-वासहि ॥
चित्तीं तर्क करूं कपि लागे । त्या समयींच बिभीषण जागे ॥
राम राम तो स्मरूं लागला । हृदिं कपि हर्षित सज्जन कळला ॥
करुं मुद्दाम परिचया यासी । साधु न हानि करिति कार्यासी ॥
ऐकवि वचना विप्र बनोनी । श्रवत बिभीषण येति उठोनी ॥
कुशला पुसलें प्रणाम करुनी । विप्र वदा निज कथा वर्णुनी ॥
कीं तुम्हिं कोणी हरिदासांत । गमे प्रीति अति मम हृदयांत ॥
कीं तुम्हिं राम दीन-अनुरागी । आलां करण्या मज बहु भागी ॥

दो :- मग हनुमान् सब सांगती रामकथा निजनाम ॥
श्रवत पुलक तनु युगलिं मन स्मरुनि मग्न गुणग्राम ॥ ६ ॥

लंका तर निशाचर समूहांचेच स्थान ! येथे साधू-सज्जनांचा निवास कोठून असणार ॥ १ ॥ याप्रमाणे कपि तर्क करू लागला, आणि त्याचवेळी बिभीषण जागा झाला. ॥ २ ॥ त्याने ’राम राम’ उच्चारण्यास प्रारंभ केला (ते ऐकून) कपिच्या हृदयात हर्ष झाला व तो सज्जन आहे हे कपीने ओळखले. ॥ ३ ॥ साधू कधीही कार्यहानी करीत नाहीत. म्हणून याच्याशी मुद्दाम परिचय करूं (असे हनुमान मनात म्हणाला). ॥ ४ ॥ विप्ररूप घेऊन राम राम म्हणत (त्यांच्या दरवज्यात) गेले. हे ऐकताच बिभीषण उठून आले ॥ ५ ॥ प्रणाम करून त्यांनी कुशल विचारले (व म्हणाले), हे विप्र आपला परिचय द्यावा. ॥ ६ ॥ आपण कोणी हरिभक्त आहांत काय ? कारण माझ्या हृदयात तुमच्याविषयी अतिशय प्रेम वाटत आहे. ॥७ ॥ की दीनांवर अनुराग करणारे तुम्ही श्रीरामच आहांत काय ? आणि मला महाभाग्यवान बनविण्यासाठी आपण आला आहांत काय ? ॥ ८ ॥
हनुमान बिभीषण संवाद -
मग हनुमंताने सर्व रामकथा सांगून मग आपले नांव सांगितले अन् हे सांगत असताना व ऐकतानाही दोघांच्याही देहावर रोमांच उठले व दोघांची मने रामगुण स्मरणात अति प्रेमाने मग्न झाली. ॥ दो. ६ ॥

पहा पवनसुत अमचि राहणी । जेवीं जीभ बिचारी दशनीं ॥
तात ! अनाथ गणुनि कधिं मजवरि । कृपा भानुकुलनाथ करिति तरि ॥
तामस तनु अणु साधन नाहीं । प्रीति न पदसरसिज मनिं काहीं ॥
अतां भरंवसा मज हनुमंता । विण हरिकृपें भेट नहिं संता ॥
कृत रघुवीरें कृपावलोकन । दिलें स्वयें तैं तुम्हिं मज दर्शन ॥
ऐका बिभीषणा प्रभु-रीती । सदा सेवकीं करिती प्रीती ॥
वदा कवण मी परम कुलीन हि । कपि चंचल सब रीती हीन हि ॥
नाम आमचें घेति सकाळीं । त्यां त्यादिनिं न अहार कपाळीं ॥

दो :- असा अधम मी श्रुणु सखे ! मजवर ही रघुवीर ॥
करिति कृपा; स्मरतां गुण, भरे विलोचनिं नीर ॥ ७ ॥

हे पवनसुत ! जशी बिचारी जीभ ३२ दातांच्या पहार्‍यात राहते तशी आमची राहणी आहे. ॥ १ ॥ तात ! मला अनाथ समजून भानुकुलनाथ माझ्यावर कधी कृपा करतील का ? ॥ २ ॥ तामसी देह असल्याने अणुमात्र साधन घडत नाही, राम चरणकमलांच्या ठायी काहीच प्रीति नाही, व त्यांचे ते पदसरोज ना मनांत ना हृदयात ! ॥ ३ ॥ हनुमंता ! आता मला भरंवसा वाटतो की राम मला सनाथ करतील, कारण हरि कृपेवाचून संतभेट होतच नाही. ॥ ४ ॥ हनुमान म्हणाला - बिभीषणा ऐका ! प्रभूची अशी रीत आहे की ते सदा सेवकांवर प्रीती करतात. मी अशा कोणत्या परम कुलीन कुळातला आहे. मी तर केवळ कपी, स्वभावतःच चंचल आणि सर्व प्रकारे इतका हीन की, ॥ ७ ॥ प्रातःकाळी जे कोणी आमचे नाव घेतील, त्यांच्यावर त्या दिवशी उपाशीच राहायचे पाळी यायची ! (तुम्ही तर परमश्रेष्ठ पुलस्त्य कुळातले आहात !) ॥ ८ ॥ मित्रा ऐक ! मी असा अधम असूनही माझ्यावर रघुवीरांनी कृपा केली. याप्रमाणे रघुनाथ-गुण स्मरण करतांच नेत्र अश्रूंनी भरले. ॥ दो. ७ ॥

असे स्वामि समजुनिहि विसरती । फिरति कां न ते दुःखी बनती ॥
असे रामगुण-गणांस सांगत । अनिर्वाच्य विश्रामा पावत ॥
कथा बिभीषण मग वदतसे । तेथें जनकसुता जशि वसे ॥
ऐक म्हणाला हनुमान् भ्राता ! । पाहुं इच्छितो जानकि माता ॥
युक्ति बिभीषण सगळी सांगे । निघे पवनसुत निरोप मागे ॥
धरि तें रूप जाइ मग तेथें । सिता राहि वनिं अशोक जेथें ॥
बघुनि मनांत चि करी प्रणाम । बसल्या निघुनि जाति निशि याम ॥
एक जटा वेणी शिरिं, कृश तन । जपते हृदयीं रघुपति गुण-गण ॥

दो :- निजपदिं नयनां लाउनी राम चरणिं मन लीन ॥
परम दुःखि तैं पवनसुत दिसे जानकी दीन ॥ ८ ॥

स्वामी असे आहेत हे समजून (जाणून) सुद्धां जे त्यांना विसरतात, विषयातच रमून फिरतात, ते दुःखी का नाही होणार ? ॥ १ ॥ याप्रमाणे रामगुणवर्णन करीत असतां उभयतांना अनिर्वाच्य विश्राम प्राप्त झाला. ॥ २ ॥ तेथे जनकसुता कशी कोठे आहे ती सर्व कथा बिभीषणाने सांगितली. ॥ ३ ॥ तेव्हा हनुमान म्हणाला, हे बंधो ! मी जानकी मातेला पाहू इच्छ्तो. ॥ ४ ॥ तेव्हा बिभीषणाने सगळी युक्ती (कोठून केव्हा कसे जाणे इ.) सांगितली व पवनसुत निरोप घेऊन निघाला. ॥ ५ ॥ मग त्या लघुरूपाने हनुमान अशोक वनात जेथे सीता होती तेथे गेला. ॥ ६ ॥ सीतेला पाहून मनातच त्याने प्रणाम केला, सीता बसलेली आहे व रात्रीचा प्रहर पुढे सरकत आहे. ॥ ७ ॥ डोक्यावर केसांची एक जटारूप वेणी आहे, देह कृश आहे, व हृदयात रघुपतीच्या गुणगणांचा अखंड जप व चिंतन चालू आहे. ॥ ८ ॥ नेत्र (नजर) स्वतःच्या पायांकडे लावलेले आहेत, (पण) मन रामचरणांत लीन आहे, अशी जानकी दीन दशेत पाहिली तेव्हा पवनसुताला परम (अपार) दुःख झाले. ॥ दो ८ ॥

तरु पल्लविं बसलेला लपुनी । करि विचार ’करुं काय तरि’ मनीं ॥
त्या अवसरिं ये तेथें रावण । सवें विभूषित बहु ललनागण ॥
बहुपरिं खल सीते समजावी । साम-दाम-भय-भेदां दावी ॥
रावण म्हणे सुमुखि सुज्ञे ! श्रुणु । मंदोदरी आदि राणी-गणुः ॥
तव अनुचरी करिन मम हा पण । एक वार मजकडे पहा पण ॥
तृण धरि आड वदे वैदेही । स्मरुनि अवधपति परमस्नेही ॥
श्रुणु दशमुख खद्योत उजेडें । कधी तरी नलिनी कीं उघडे ॥
मनिं असं समज म्हणे जानकी । खल न शुद्धि रघुवीर बाण कीं ॥
शठ शून्यीं मज हरुनि आणली । अधम निलज्ज लाज तुज नुरली ॥

दो :- खद्योता सम आपणां राम भानु ऐकून ॥
श्रवुनि परुषवच काढि असि वदला अति कोपून ॥ ९ ॥

कसा धीर दिधला सीतेला -
तरु पल्लवांत बसलेला हनुमान मनात विचार करीत आहे की आता करूं तरी काय ? ॥ १ ॥ त्यावेळी नटून सजून आलेल्या स्त्री समुदायासह रावण तेथे आला. ॥ २ ॥ दुष्टाने नाना प्रकाराने सीतेला समजावण्याचा प्रयत्‍न केला. अगदी साम, दाम, दंड, भेद या चारी उपायांनी, ॥ ३ ॥ रावण म्हणाला, हे सुमुखी, सूज्ञे ऐक, मंदोदरी आदि करून राण्यांच्या सर्व समूहाला मी तुझ्या दासी करीन, ही माझी प्रतिज्ञा आहे, पण तूं एकदा माझ्याकडे पहा तरी ! ॥ ४-५ ॥ गवताची काडी रावणाच्या आड धरून, परमस्नेही अयोध्यापतीचे स्मरण करून वैदेही म्हणाली - ॥ ६ ॥ ऐक रे दशमुख खद्योता ! काजव्याच्या उजेडाने कधी नलिनी (कमळ) फुलते काय ? ॥ ७ ॥ जानकी म्हणाली - मनापासून समज - जाण की रे दुष्टा, तुला रघुवीर बाणाची शुद्ध आहे की नाही ? ॥ ८ ॥ अरे शठा, घरात मी एकटी असताना मला चोरून आणलीस ! अधमा, निर्लज्जा, अजूनही तुला लाज वाटत नाही ? ॥ ९ ॥ आपण काजवा व राम सूर्य (भानू) हे ऐकून व कठोर वचन ऐकून रावणाने तलवार उपसली आणि क्रोधाने म्हणाला - ॥ दो. ९ ॥

सीते त्वां कृत मम अपमाना । कापिन तव शिर कठिण कृपाणां ॥
ना तर सपदि मान मम वाणी । सुमुखि ! न तर बघ जीवन-हानी ॥
श्याम सरोजदाम-सम सुंदर । प्रभु-भुज करिकर सम दशकंधर ॥
तो भुज कंठिं किं तव असि घोरा । श्रुणु हा प्रमाण पण शठ ! चोरा ॥
चंद्रहास हर मम परितापं । रघुपति विरह अनल संजातं ॥
शीतल निशित वहसि वर धारा । म्हणे सिता हर मम दुखभारा ॥
मारुं धावला बोलां ऐकुनि । नय मयसुता वदे समजाउनि ॥
वदे आणवुनि निशिचरि सकला । जा भिववा सीतेस बहु छळा ॥
जर वच मासा माजिं मानि न । तर मी काढुन कृपाण मारिन ॥

दो :- गत भवनीं दशकंधर इथें पिशाचिनि-वृंद ॥
सीते भीती दाखविति धरिति रूप बहु मंद ॥ १० ॥

सीते ! तू माझा अपमान केलास म्हणून या कठीण कृपाणाने तुझे शीर कापीन. ॥ १ ॥ नाहीतर माझे म्हणणे (विनंती) ताबडतोब मान्य कर; नाहीतर हे सुमुखी ! जीवननाश होईल बघ ! ॥ २ ॥ दशकंधरा ! कृष्ण (नील) कमलांच्या हारासारखा सुंदर पण हत्तीच्या सोंडेसारखा प्रभूचा बाहू आहे, समजलास. ॥ ३ ॥ शठा ऐक ! तो बाहू या माझ्या गळ्यात पडेल की तुझी घोर तलवार पडेल ? चोरा ! माझी पण ही प्रतिज्ञा आहे. ॥ ४ ॥ (सीता म्हणाली) हे चंद्रहास (तलवारी) ! रघुपती विरहाग्नीने उत्पन्न झालेला माझा सर्व प्रकारचा ताप हरण कर. ॥ ५ ॥ तू शीतल व तीक्ष्ण अशी उत्तम धार वहन करतेस (तरी) माझा सर्व दुःखभार हरण कर. (दुसरा अर्थ - तुझ्या हृदयातील चंद्र किरणांची धार-प्रवाह अगदी शीतल आहे, त्या प्रवाहाने माझा विरहानल विझव व ती धार फार तीक्ष्ण आहे तिला मला दुःखभार देणार्‍याला वाहून न्यावे.) ॥ ६ ॥ सीतेचे बोल ऐकून रावण तिला मारण्यास धावला पण मंदोदरीने नीति सांगून त्याची समजून घातली. ॥ ७ ॥ तेव्हा तो सर्व निशाचरींना जवळ बोलावून म्हणाला - सीतेला भिती घाला व छळ करा. ॥ ८ ॥ जर एक महिन्यात तिने माझे म्हणणे मानले नाही तर मी कृपाण काढून मारीन. ॥ ९ ॥ दशकंठ घरी गेला व इथे पिशाचिणींचे समूह विविध मंद विद्रूपे धारण करून सीतेला भय दाखवूं लागल्या. ॥ दो. १० ॥

त्रिजटा नाम राक्षसी एका । राम-चरण-रत निपुण विवेका ॥
स्वप्न सांगते सकलां घेउनि । स्वहिता साधा सीते सेवुनि ॥
लंका कपिनें स्वप्निं जाळली । यातुधान सेनाहि मारली ॥
खरारुढ नग्न हि दशशीस । मुंडित शिर खंडित भुज वीस ॥
ऐसा दक्षिण दिशिं गत रावण । जणुं लंका लाभला बिभीषण ॥
पुरिं फिरली रघुवीर-द्वाही । प्रभु-बोलाविति सीतेला ही ॥
वदतें मी हें स्वप्न बजाउन । सत्य ठरेल किं जात चार दिन ॥
परिसुनि वचना त्या सब भिती । जनकसुतेचे पदिं वंदिती ॥

दो:- जिथें तिथें त्या गत, तदा चिंता सिता-मनास ॥
मारिल निशिचर नीच मज एक लोटतां मास ॥ ११ ॥

त्रिजटा नावाची एक राक्षसी रामचरण रत असून ज्ञानी होती. ॥ १ ॥ तिने त्या सर्व राक्षसींना (स्वतःला उत्तररात्री पडलेले) स्वप्न सांगितले व म्हणाली की, तुम्ही आपल्या भावी राणीची सीतेची सेवा करून स्वतःचे हित साधा कसे ! ॥ २ ॥ स्वप्नात एका वानराने लंका जाळली व राक्षसांचे सैन्य ठार केले. ॥ ३ ॥ दशानन नग्न होऊन गाढवावर बसून दहाही शिरे मुंडन केलेली व वीस बाहू तोडलेले असा दक्षिण दिशेला गेलेला स्वप्नात दिसला, व जणूं लंकेचे राज्य बिभीषणास मिळाले आहे असेही दिसले. ॥ ५ ॥ लंकेत रघुवीराची द्वाही फिरली व मग प्रभूंनी सीतेला बोलावून घेतली सुद्धां ॥ ६ ॥ मी तुम्हाला बजावून सांगते की हे स्वप्न दोन-चार दिवसातच खरे ठरणार. ॥ ७ ॥ हे वचन ऐकून त्या सर्व पिशाचिनी घाबरल्या व सीतेच्या पाया पडल्या. ॥ ८ ॥ त्यानंतर त्या इकडे तिकडे (दूर) निघून गेल्या तेव्हा सीतेच्या मनीं चिंता दाटली की एक महिना निघून जाताच ह्या निशाचराच्या हातून मी मरणार ॥ दो. ११ ॥

वदली त्रिजटे जुळुनि करांतें । मला विपत्संगिणि तूं माते ॥
त्यजितें तनु कर यत्‍न शीघ्रतां । दुःसह विरह न सह्य मज अतां ॥
काष्ठ आण रच चिता सजवुनी । माते मग ते अनल लावुनी ॥
प्रीति सत्य मम कर किं सुजाण । कोण शूल वच करि कीं श्रवण ॥
परिसत वचन चरण धरि सांतवि । प्रभू-प्रताप सुयशबल ऐकवि ॥
सुकुमारी निशिं मिळे अनल ना । असें वदुनि ती गत निज भवना ॥
सीता वदे विधी प्रतिकूल हि । अग्नि मिळेल न मिटेल शूलहि ॥
दिसती प्रगट गगनिं अंगारे । अवनिं येति कुणि एक न तारे ॥
स्रवत न पावकमय शशि आगी । जणुं जाणुनि मजला हतभागी ॥
ऐक विनति मम विटप अशोका । सत्य नाम कर हर मम शोका ॥
नूतन किसलय अनल समान हि । दे अग्नी कर तनू-निदान हि ।
बघुनि परम विरहाकुल सीते । तो क्षण गत कल्पसा कपीतें ॥

सो :- कपि मनिं करुनि विचार टाकुनि दे मुद्रिका तंव ॥
जणुं अशोक अंगार दे, हर्षिंत घे उठुनि करिं ॥ १२ ॥

सीता हात जोडून त्रिजटेला म्हणाली की माते ! तूं मला संकटात साह्य करणार्‍या मैत्रीणीसारखी आहेस. ॥ १ ॥ आता हा विरह मला सहन होत नाही. तरी ह्या देहाचा त्याग करण्यासाठी मला तू शीघ्रतेने प्रयत्‍न करून साह्य कर. ॥ २ ॥ काष्ठे आण आणि सौभाग्य श्रृंगारानी सजवून चिता रच व मग माते त्या चितेस अग्नि लावून दे. ॥ ३ ॥ तू सुजाण आहेस, तेव्हा माझे रामप्रेम सत्य कर. कारण (रावण्यासारख्या दुष्टाचे) शूलासारखे शब्द कोण सहन करील ? (ते पुन्हा ऐकणे नकोच) ॥ ४ ॥ सीतेचे हे बोल ऐकताचे त्रिजटेने तिचे पाय धरले व सांत्वन केले. प्रभूचा प्रताप, सुयश व बल तिच्या कानांवर घातले. ॥ ५ ॥ (व म्हणाली) सुकुमारी ! रात्री अग्नि मिळणे शक्य नाही. असे म्हणून ती आपल्या घरी गेली. ॥ ६ ॥ (विपत्तीत साह्य करणारी एकमेव त्रिजटा होती तीही गेली, त्यामुळे व्याकुळ होऊन) सीता म्हणाली, की दैवच माझ्यावर उलटलेले दिसते. (म्हणजे) अग्नि मिळणार नाही व माझा शूल नष्ट होणार नाही. ॥ ७ ॥ आकाशात कितीतरी निखारे अगदी प्रकट दिसत आहेत, पण त्यातील एकही तारा अवनीवर येत नाही. ॥ ८ ॥ हा चंद्र पावकाचाच (अग्नीचा) बनलेला दिसतो पण मी हतभागी आहे हे जाणूनच जणूं आग ओकीत नाही (मजकडे अग्नि पाठवित नाही). ॥ ९ ॥ हे अशोक वृक्षा, माझी विनंती ऐक. तू आपले नांब सत्य कर आणि माझा शोक नाहीसा कर. ॥ १० ॥ तुझी नवी नवी पालवी अग्नीसारखी आहे. मला अग्नि दे आणि माझ्या तनूचा अंत कर. ११ ॥ सीतेला परम विरहाकुल पाहून तो क्षण कपीला कल्पासारखा गेला. ॥ १२ ॥ हनुमंताने विचार करून (सीतेने अशोकाकडे अग्नि मागताच) राम-मुद्रीका खाली टकली (तेव्हा अशोकाने निखाराच खाली टाकला आहे असे समजून) सीतेने उठून हर्षाने ती हातात घेतली. ॥ १२ ॥

तंव दिसली मुद्रिका मनोहर । रामनाम-अंकित अति सुंदर ॥
निरखि मुद्रिके जाणुनि चकिता । हर्ष विषादें व्याकुळ चित्ता ॥
जिंकिल कोण अजय रघुपतिसी । माया बनवुं शके ना ऐसी ॥
सीता मनिं करि विचार नाना । हनुमान् मधुर बोलला वचना ।
रामचंद्र-गुण वर्णूं लागे । अथ पासुनी कथा सब सांगे ॥
श्रुति मन लावुनि ऐकूं लागे । अथ पासुनी कथा सब सांगे ॥
श्रवणामृत कुणि कथा सुशोभन । वर्णी तरि कां होई प्रगट न ॥
तैं हनुमंत निकट गत चालत । वळुनि बसे मन झालें विस्मित ॥
रामदूत मी जननि जानकी । सत्य शपथ करुणा निधान कीं ॥
ही मुद्रा ही आइ ! आणिली । रामें ओळख तुम्हां धाडिली ॥
वद नर-वानर-संगति कैसी । कथित कथा मग घडली जैसी ॥

दो :- प्रेमळ् कपिवच परिसुनी उपजे मनिं विश्वास ॥
जाणे मन-तन-वचनिं हा कृपासिंधुचा दास ॥ १३ ॥

हातात घेऊन पाहिली तो (निखारा नसून) मनोहर अशी ती मुद्रिका आहे ! तिच्यावर ’राम’नाम कोरलेले असून ती अति सुंदर आहे. ॥ १ ॥ मुद्रिकेकडे तिने निरखून पाहताच तिने ती ओळखली व ती आश्चर्यचकित झाली आणि हर्षाने व विषादाने मनातून व्याकूळ झाली. ॥ २ ॥ रघुपति अजिंक्य असल्याने त्यांना कोण बरे जिंकू शकेल ? (अर्थात् कोणीही नाही) बरे मायावी म्हणावे तर माया ’अशी’ अंगठी बनवूच शकणार नाही. ॥ ३ ॥ सीता अनेक प्रकारांनी विचारग्रस्त झाली आहे हे जाणून हनुमान ’राम राम’ असे मधुर वाणीने म्हणाला. ॥ ४ ॥ आणि मग रामचंद्रांचे गुण वर्णन करू लागला. ते एकताच सीतेचे दुःख नष्ट झाले. ॥५ ॥ आणि सीता आपले पंचप्राण कानांत साठवून मन लाऊन ऐकू लागली तेव्हा हनुमंताने प्रारंभापासून सर्व रामकथा (रामविरहकथा) सीतेस वर्णन करून सांगितली. ॥ ६ ॥ ते ऐकून सीता म्हणाली, जो कोणी कानांना अमृतासारखी व सुंदर कथा वर्णन करीत आहे तो प्रगट का नाही होत ? ॥ ७ ॥ तेव्हा हनुमान आपल्या मूळ रुपाने चालत चालत जवळ गेला. (त्याला पाहून) सीता पाठ फिरवून बसली व तिचे मन भय, विषाद, आश्चर्य असे संमिश्र भावनांनी युक्त झाले. ॥ ८ ॥ तेव्हा हनुमान म्हणाला की जननी ! जानकी ! मी रामदूत आहे. मी करुणानिधानाची शपथ घेऊन सांगतो की आई ! ही मुद्रिका मी आणली ती रामचंद्रांनी तुम्हाला ओळख म्हणून दिली आहे. ॥ ९-१० ॥ नर-वानर यांची संगती कशी झाली ते सांग (असे जानकीने विचारताच ती संगती, सुग्रीव-राम सख्य इ. कसे घडले ते सर्व सांगितले. ॥ ११ ॥ कपीचे प्रेमयुक्त (प्रेमरसार्द्र) भाषण ऐकून सीतेच्या मनात विश्वास उत्पन्न झाला की हा कपी रामदूतच आहे. आणि तिने त्याच्या चर्ये व वाणीवरून जाणले की हा शरीर मन वाणीने कृपासिंधुचा दास आहे. ॥ दो. १३ ॥

प्रीति-वाढ अति, जाणुनि हरिजन । वपु पुलकांकित सजल विलोचन ॥
बुडत विरवारिधिं हनुमान ! । मज झालास तात ! जलयान ॥
पिडा टळो ! वद कुशला आतां । सानुज सुख निधि खरारिं, ताता ! ॥
कोमल चित्त कृपाळू रघुवर । कवण हेतु कपि ! बनले निष्ठुर ॥
ब्रीद सहज, सेवक-सुखदायक । स्मरण करिति कधिंतरि रघुनायक ? ॥
तात ! नयन मम कधिं तरि शीतल । होति बघुनि मृदु गात्रां श्यामल ॥
वचन न येइ नयनिं ये वारी । अहह नाथ ! मी विस्मृत भारी ॥
बघुनि परम विरहाकुल सीता । वदला कपि मृदुवचा विनीता ॥
आई ! प्रभू कुशल सानुज, बरं । तव दुःखें दुःखी सुकृपागर ॥
मनिं माते माना ना ऊणें । रामप्रेम तुम्हांवर दूणें ॥

दो :- रघुपति संदेशा अतां आई ! ऐक सधीर ॥
वदतां कपि गद्‌गद बने भरे विलोचनिं नीर ॥ १४ ॥

हनुमान हरिभक्त हरिदास आहे हे जाणल्याने प्रीति अतिशय वाढली, अंगावर रोमांच उभे राहिले व डोळे पाण्याने डबडबले. ॥ १ ॥ आणि सीता म्हणाली बाळा हनुमंता ! मी विरह सागरात बुडत असता तू माझ्यासाठी नौका बनून आलास. ॥ २ ॥ सर्व इडा पिडा टळो ! बाळ ! धाकट्या भावासह सुखनिधी खरारींचे कुशल आता सांग पाहू. ॥ ३ ॥ रघुराज कोमल मनाचे व कृपाळू स्वभावाचे असून हे कपी ! ते निष्ठूर बनले याला कारण तरी काय ? ॥ ४ ॥ सेवक सुखदायक हे त्यांचे सहज ब्रीद असून त्यांनी मला दुःखात कां बरे ठेवली आहे ? रघुनायक माझी कधी तरी आठवण काढतात कां ? ॥ ५ ॥ सीता विरहाने परम व्याकुळ झाली आहे असे पाहून कपी विनयाने व मृदु वाणीने म्हणाला, ॥ ८ ॥ आई प्रभू बंधुंसह कुशल आहेत बरं ! पण कृपासागर राम मात्र तुमच्या दुःखाने दुःखी आहेत. ॥ ३ ॥ माते ! तुम्ही मनांत काही बाही आणूं नका. रामांचे तर तुमच्यावर दुप्पट प्रेम आहे. ॥ १० ॥ आई ! आता धीर धरून रघुपतीचा संदेश ऐक असे म्हणतां म्हणतां कपीच सद्‍गदित झाला व त्याचे नेत्र अश्रूंनी भरले. ॥ दो. १४ ॥

कथिति राम, ’सीते तव विरहें । वळले मज विपरीत सकल हे ! ॥
नव तरु किसलय जणूं कृशानू । काळ निशेसम निशि, शशि भानू ॥
कुवलय-विपिन कुंतवन होती । जलद तप्त तेला जणुं ओती ॥
हित होते ते करिती पीडन । अहिश्वाससा त्रिविध समीरण ॥
दुःख सांगता कांहि आटतें । कुणां सांगुं हे कोण जाणते ॥
तुझें नि माझें प्रेम-तत्त्व तें । प्रिये मना एका मम कळते ॥
तें मन राहि सदा तुजपासीं । यांत समज तूं प्रीतिरसासी’ ॥
प्रभु-निरोप परिसत वैदेही । प्रेममग्न, तनुभान नुरेही ॥
हृदिं धर धीर म्हणे कपि माते ! । स्मर किं राम सेवक-सुखदाते ॥
आण मनीं प्रभुता रघुपतिची । त्यज मम वचनिं भीरुता मनिंची ॥

दो :- निशिचर निकर पतंग सम रघुपति-बाण कृशान ॥
जननी ! हृदयीं धीर धर दग्ध निशाचर जाण ॥ १५ ॥

रामांचा संदेश / निरोप : -
राम म्हणाले की हे सीते ! तुझ्या विरहाने सर्वच माझ्यावर उलटले आहेत. ॥ १ ॥ वृक्षांची नवीन पालवी मला आग झाली आहे, तर रात्र काळरात्रीसारखी भयानक व चंद्र सूर्यासारखा तापदायक झाला आहे. ॥ २ ॥ चंद्र विकासी कमलांची वने भात्यांच्या वनासारखी (सतत भाल्यांच्या टोकासारखी टोचत आहेत) तर मेघ जणूं उकळते तेलच ओतीत असतात. ॥ ३ ॥ (तू जवळ असताना जे जे) हितकारक होते ते ते सर्व पीडादायक बनले आहे. त्रिविध (शीतल-मंद-सुगंधी) वारा सापांच्या फूत्कारांप्रमाणे वाटतो आहे. ॥ ४ ॥ दुःख दुसर्‍यांना सांगितले की थोडेसे कमी होते हे खरे आहे पण सांगू कुणाला ? ते जाणणारे कोण आहेत (कोणी कोणीही नाही). ॥ ५ ॥ प्रिये ! तुझ्या नी माझ्या प्रेमाचे तत्त्व केवळ एका माझ्या मनालाच काय ते माहीत ! ॥ ६ ॥ आणि ते माझे मन तर सदा तुझ्याजवळ असते, यातच काय तो प्रीतीरस (गूढ प्रेमाचे रहस्य) आहे ते समज ! ॥ ७ ॥ प्रभूचा निरोप ऐकताच वैदेही प्रेममग्न झाली आणि देहभान उरले नाही. ॥ ८ ॥ तेव्हा कपी म्हणाला की, माते ! धीर धर व सेवकास सुखदायक अशा रामाचे स्मरण कर. ॥ ९ ॥ रघुपतीची प्रभुता मनात आण आणि माझ्या वचनाने मनातील भीरूतेचा त्याग कर. ॥ १० ॥ निशाचरांचे समूह पतंगांसारखे आहेत आणि रघुपतीचे बाण अग्नी आहेत. माते हृदयात धीर धर, सगळे निशाचर जळून गेले असे समज. ॥ दो. १५ ॥

जर किं शोध रघुवीर पावते । रघुराजा ना वेळ लावते ॥
राम-बाण-रवि-उदयिं जानकी । कुठें तमघटा यातुधान कीं ॥
अतां आइ ! मी घेउन जातों ।रामशपथ, ना प्रभु-आज्ञा तों ॥
काहिं दिवस जननी ! धर धीरा । घडे सकपि येणें रघुवीरा ॥
निशाचरां मारुनि तुज नेतिल । त्रिजगिं नारदादिक यश गातिल ॥
असती सुत तुज सम सब मर्कट ! । अति बलवंत किं यातुधान भट ॥
माझे हृदयिं परम संदेह । श्रवुनी प्रगटी कपि निज देह ॥
कनक-भूधराकार शरीर । समर-भयंकर अति बल वीर ॥
सीते मनीं भरंवसा आला । मग लघुरूप पवनसुत झाला ॥

दो :- श्रुणु माते ! शाखा मृगा नहि बलबुद्धि विशाल ॥
प्रभू प्रतापें खगपतिसि खाइल सुलघू व्याल ॥ १६ ॥

जर तुझा शोध रघुवीरास लागला असता तर रघुराजांनी मुळीच वेळ लावला नसता. ॥ १ ॥ जानकी ! रामबाणरूपी रविचा उदय झाल्यावर राक्षसरूपी तमाचे समूह कोठे राहतील ? ॥ २ ॥ आई ! मी तुला आत्ताच घेऊन गेलो असतो, पण रामाची शपथ सांगतो, प्रभूंची तशी आज्ञा नाही. ॥ ३ ॥ म्हणून जननी ! काही दिवस धीर धर. कपींच्या सहीत रघुवीराचे येणे होईल. ॥ ४ ॥ निशाचरांना मारून प्रभू तुला घेऊन जातील, आणि नारदादी मुनि प्रभूंचे यश त्रैलोक्यात गातील. ॥ ५ ॥ हे पुत्रा ! सगळे मर्कट तुझ्याच साररखे आहेत काय ? राक्षस योद्धे तर अती बलवान आहेत. ॥ ६ ॥ म्हणून माझ्या हृदयात परम संदेह वाटत आहे. हे ऐकून कपीने आपला देह प्रगट केला. ॥ ७ ॥ सुवर्णाच्या पर्वतासारखे (सुमेरूप्रमाणे) शरीर ! आणि रणांगणार भय उत्पन्न करणारा अति बलवंत वीर सीतेला दिसला. ॥ ८ ॥ तेव्हा सीतेच्या मनीं भरंवसा उत्पन्न झाला, तेव्हा मग पवनसुताने पुन्हा लघुरूप धारण केले ॥ ९ ॥ (व म्हणाला की) माते ! ऐक, शाखामृगांना विशाल बल व विशाल बुद्धी नाही पण प्रभूच्या प्रतापाने अति लहान साप गरुडाला सुद्धा खाऊन टाकेल. ॥ दो. १६ ॥

मनिं सुतोष परिसुनि कपि-भाषित । भक्ति तेज-बल-प्रताप-मिश्रित ॥
रामप्रिय जाणुनि आशिस दे । हो ताता ! बल-शील-निधि वदे ॥
अजर अमर गुणनिधि सुत होशिल । बहुत कृपा रघुनायक करतिल ॥
करिति कृपाप्रभु, परिसति कान, । प्रेमीं गाढ मग्न हनुमान ॥
वारंवार नमुनि शिर चरणां । वदे कीश कर जोडुनि वचना ॥
मी माते ! आतां कृतकृत्यहि । आशिष तव अमोघ विख्यातहि ॥
श्रुणु मात मज भारी भूक- । लागे बघुनि रुचिर-फल-रूख ॥
श्रुणु सुत कानन-रक्षण-कारी । परम-सुभट-रजनीचर भारी ॥
त्यांचें भय माते मज नाहीं । जर सुख वाटे तुझ्या मना ही ॥

दो :- बघुनि बुद्धि बल-निपुण कपि म्हणे जानकी जाइ ॥
रघुपति-पद हृदयीं धरुनि तात ! मधुर फळ खाइ ॥ १७ ॥

शक्ति, तेज, बल व प्रताप यांनी युक्त असे कपीचे भाषण ऐकून सीतेला फारच संतोष वाटला. ॥ १ ॥ हा रामाला प्रिय व याला राम प्रिय आहेत हे जाणून आशीर्वाद दिला व म्हणाली बाळा ! तू बलनिधी व शीलनिधी हो. ॥ २ ॥ हे सुता ! तू अजर, अमर आणि गुणनिधी होशील व रघुनायक तुझ्यावर पुष्कळ कृपा करतील ॥ ३ ॥ प्रभू कृपा करतील हे शब्द कानी पडले मात्र हनुमान गाढ प्रेमात मग्न झाले. ॥ ४ ॥ वारंवार पायावर मस्तक नमवून कपी हात जोडून म्हणाला की माते ! मी आता कृतकृत्यच झाले, कारण तुझे आशीर्वाद अमोघ असतात हे अगदी विख्यात आहे. ॥ ५-६ ॥
वन भंगुनि रावणा प्रबोधी -
आई ग ! माझं ऐकतेस का ? ही सुंदर फळांनी लगडलेली झाडे पाहून मला फार फार भूक लागली आहे गं ! ॥ ७ ॥ (सीता म्हणाली) बाळा या वनाचे रक्षण करणारे महा सुभट मोठमोठे राक्षस आहेत. ॥ ८ ॥ (हनुमान म्हणाला असेनात का) त्यांचे मला मुळीच भय वाटत नाही, मात्र तुझ्या मनाला सुख वाटत असेल तरच हो ! ॥ ९ ॥ कपी बुद्धी-बल निपुण आहे हे पाहून जानकी म्हणाली की जा बरं, मात्र बाळा ! रघुपतींच्या पायांचे ध्यान करीत मधुर फळे खा हं ! ॥ दो. १७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP