॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १४ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

अमर नाग किन्नर दिक्पाल । चित्रकूटिं आले तत्काल ॥
राम करिति नमना सर्वांना । मुदित देव जैं लाभ लोचनां ॥
सुमनें वर्षुनि देव-समाज । म्हणति नाथ अम्हिं सनाथ आज ॥
विनवुनि दुःसह दुःखें वदले । हर्षित निज निज सदना वळले ॥
चित्रकूटिं वसले रघुनंदन । कळे वृत्त ते येती मुनिगण ॥
येतां बघुनि मुदित मुनिवृंद । करिति दण्डवत रघुकुलचंद ॥
मुनी रघुवरा हृदयीं घेती । सुफल व्हावया आशिस देती ॥
रामसितालक्ष्मण-छवि देखति । साधन सकल सफल निज लेखति ॥

दो० :- योग्य मान देउनी प्रभु बोळविती मुनिवृंद ॥
करिति योग जप याग तप निजाश्रमीं स्वच्छंद ॥ १३४ ॥

अमर, नाग, किंन्नर, दिकपाल हे सर्व तत्काळ चित्रकूटास आले ॥ १ ॥ रामचंद्रांनी त्या सर्वांस नमन केले व नेत्रांच्या लाभाने ते सगळे देव आनंदित झाले ॥ २ ॥ पुष्पवृष्टी करुन ते सर्व देवसमाज म्हणाले की नाथ ! आम्ही आज सनाथ झालो ॥ ३ ॥ विनंती - प्रार्थना करुन देवांनी आपली दु:सह दु:खे निवेदन केली व ते हर्षाने, उत्साहाने आपापल्या स्थानी जाण्यास परत निघाले ॥ ४ ॥ रघुनंदनांनी चित्रकूटावर निवास केला आहे ही बातमी ज्यांना कळली ते ते मुनीवर ( रामांना) पाहण्य़ासाठी येऊं लागले ॥ ५ ॥ मुनीवृंद आनंदित झालेले येताना दिसताच रघुकुलचंद्र रघुनाथांनी दंण्डवत नमस्कार केला ॥ ६ ॥ मुनी रघुवरास हृदयाशी धरतात व आपला आशीर्वाद सुफल व्हावा म्हणून आशीर्वाद देतात ॥ ७ ॥ ते राम - सीता व लक्ष्मण यांचे रुप पाहतात व आपली सर्व साधने सफल झाली असे त्यास वाटते ॥ ८ ॥ प्रभुंनी यथायोग्य मान देऊन मुनीवृंदांना निरोप दिला व ते ( परत जाऊन) आपापल्या आश्रमांत योग - जप - यज्ञयाग तप वगैरे स्वच्छंदपणाने ( निर्भय होऊन - मोकळे पणाने) करु लागले ॥ दो० १३४ ॥

कोळि-किरातां वृत्त मिळालें । हर्षति जणुं नवविधि घरिं आले ॥
भरुनी कंदमूलफल द्रोणें । निघति रंक जणुं लुटण्या सोनें ॥
त्यांत आधिं जिहिं बंधु पाहिले । अपर तया पथिं पुसत चालले ॥
श्रवत कथित रघुवीर-रुचिरता । रघुराजा सब बघति पोचतां ॥
भेट पुढें ठेउनि जोहारति । अति अनुरागें प्रभुला पाहति ॥
जिथें तिथें स्थित चित्रिं कें दिसले । तनु पुलकित लोचनिं जल झरलें ॥
स्नेहमग्न सब, राम ओळखति । प्रिय वचनें सकलां सन्मानति ॥
पुनः पुन्हां प्रभुला जोहारुनि । वचन विनीत वदति कर जोडुनि ॥

दो० :- नाथ सनाथ अतां अम्हीं सब, दिसतां प्रभु-पाय ॥
अमच्या भाग्यें आगमन अपलें कोसलराय ॥ १३५ ॥

कोळी भिल्लांना हा समाचार मिळाला तेव्हा त्यांना असा हर्ष झाला की जणूं नवनिधीच आपल्या घरी आले आहेत असे वाटले ॥ १ ॥ कंदमूळ फळांनी द्रोण भरुन घेऊन ( दर्शनासाठीच) असे चालले की जणूं रंक सोने लुटण्यासाठीच जात आहेत ॥ २ ॥ त्यांत ज्यांनी दोघा बंधूंना आधी पाहीले होते त्यांना वाटेने जाता जाताच इतर विचारुं लागले ॥ ३ ॥ याप्रमाणे रघुवीरांचे सौंदर्य विषयी विचारत व सांगत ते येऊन पोचले व त्यांनी सर्वांनी रघुराजांना पाहीले ॥ ४ ॥ भेट पुढे ठेऊन ते जोहार करु लागले व अति अनुरागाने प्रभूकडे पाहू लागले ॥ ५ ॥ तेव्हा ते जणूं चित्रात जिकडे तिकडे उभे असलेले, अंगावर रोमांच आलेले व डोळ्यांतून पाणी वहात असलेले दिसले ॥ ६ ॥ रामचंद्रांनी ओळखले की हे सर्व स्नेहांत मग्न आहेत व त्यांनी प्रिय वचनांनी सर्वांचा सन्मान केला ॥ ७ ॥ प्रभूला वारंवार जोहार करुन हात जोडून नम्रपणाने ते म्हणतात ॥ ८ ॥ हे नाथ ! हे प्रभु ( स्वामी) ! आपल्या पायांचे दर्शन झाल्याने आम्ही सर्व आता सनाथ झालो कोसलराज ! आमच्या सर्वांच्या भाग्यानेच आपले येथे आगमन झाले आहे ॥ दो० १३५ ॥

धन्य धरणि पथ पर्वत कानन । जेथें कृत तुम्हिं नाथ पदार्पण ॥
धन्य विहग मृग काननचारी । सफल जन्म तव-दर्शनिं सारीं ॥
आम्हिं सपरिजन धन्यचि सगळे । रूप नेत्रभर दिसले अपलें ॥
कृत निवास चिंतुनि शुभ ठावा । सकल ऋतूंत इथें सुख पावां ॥
आम्हीं सेवा करूं सर्वपरिं । ठेउं दूर अहि वाघ सिंह करि ॥
दुर्गम वन गिरि गुहा कंदरा । विदित अम्हां प्रबु कोन कोपरा ॥
ठायिं ठायिं बहु शिकार करवूं । सर निर्झर जलठाय दाखवूं ॥
नाथ ! दास अम्हि सह परिवारा । आज्ञापित संकोचा न धरा ॥

दो० :- वेद-वचन-मुनिगण-अगम ते प्रभु करुणावास ॥
भिल्लवचन परिसति जसे जनक बालवचनास ॥ १३६ ॥

नाथ ! जिथे जिथे आपले पाय लागले ती भूमी, तो मार्ग, ती वने व ते पर्वत हे सर्व धन्य होत. ॥ १ ॥ त्या वनांत विहार करणारे पशुपक्षी सुद्धा धन्य व आपले दर्शन झाल्याने त्या सर्वांचाच नवा जन्म झाला आहे. ॥ २ ॥ आम्ही सगळे सुद्धा आमच्या परिवारासह धन्य झालो आहोत कारण की आपले रुप आम्ही डोळे भरुन पाहीले ॥ ३ ॥ आपण चांगला विचार करुनच या चांगल्या ठिकाणी निवास केलात ( असे वाटते) येथे आपण सर्व ऋतूंत सुख पावाल ॥ ४ ॥ आम्ही सर्प, वाघ, हत्ती, सिंह वगैरेंना दूर ठेऊन आपली सर्व प्रकारे सेवा करुं ॥ ५ ॥ प्रभु ! या भागातील दुर्गम अरण्य, डोंगरातील गुहा, व दर्‍याखोरी यांचा कानाकोपरा आम्हाला माहीती आहे. ( पाहीलेला आहे) ॥ ६ ॥ ठिकठिकाणी आम्ही आपल्याला शिकार मिळवून देऊं व तलाव, झरे, नाले इ. जलाशय दाखवूं ॥ ७ ॥ नाथ ! आम्ही आमच्या सर्व परिवारासह आपले दास आहोत तरी आपण आम्हाला आज्ञा देण्यात संकोच बालगूं नये ॥ ८ ॥ वेदवाणी व मुनींचे मन यांना जे प्रभु अगम्य आहेत ते करुणेचे निवासस्थान, भिल्लांचे भाषण असे प्रेमाने ऐकत आहेत - जसे आपल्या बालकाचे बोल पित्याने ऐकावेत. ॥ दो० १३६ ॥

प्रेम चि केवल रामा प्यारे । जाणणार घ्या जाणुनि सारे ॥
मग रामें वनचर सब तोषित । मृदुवचनीं प्रेमें परितोषित ॥
बोळविले, शिर नमवुनि निघती । श्रवत कथित प्रभुगुण गृहिं येती ॥
असे उभय बंधू सह सीतें । वसति विपिनिं सुर-मुनि-सुखदाते ॥
जैं येउनि राहति रघुनायक । तैं पासुन वन मंगलदायक ॥
नानाविध तरु फुलले फळले । मंजु लता-मंडप वर बनले ॥
सुर विटपां-सम सहज सुशोभन । आलें जणुं सोडून विबुध-वन ॥
गुंजति मधुकर मंजु कदंबक । त्रिविध वायु वाहें सुखदायक ॥

दो० :- नीलकंठ कलकंठ शुक चातक चक्र चकोर ॥
बोलतिं बहुविध विहगबहु श्रवण-सुखद मनचोर ॥ १३७ ॥

जे जाणणारे ( ज्ञानी) असतील त्यांनी सर्वांनी हे जाणून घ्यावे की श्रीरामास फक्त शुद्ध प्रेमच फार प्रिय आहे ॥ १ ॥ मग रामचंद्रांनी त्या सर्व वनचर लोकांस संतुष्ट केले व मृदु वचने बोलून प्रेमाने परिपुष्ट केले ॥ २ ॥ व त्यांना निरोप दिला तेव्हा ते मस्तक नमवून ( जोहार करुन) परत निघाले व प्रभुगुण वर्णन करीत व श्रवण करीत घरी आले ॥ ३ ॥ याप्रमाणे सुरांना व मुनींना सुख देणार दोघे बंधू सीतेसह वनांत राहू लागले ॥ ४ ॥ रघुनायक जेव्हा चित्रकूटला येऊन राहीले तेव्हा पासून ते वन मंगलदायक झाले ॥ ५ ॥ नाना प्रकारचे वृक्ष फुलूं लागले व फळूं लागले व त्यांच्यावर सुंदर लतामंडप तयार झाले ॥ ६ ॥ हे सर्व वृक्ष कल्पवृक्षांसारखे असे सुंदर दिसू लागले आहेत की जणू काय देवांची ( नंदनवनादि) वने सोडूनच येथे आले आहेत ॥ ७ ॥ मधुकरांचे सुंदर समूह ( कदंबक, श्रेणी) मंजुळ गुंजारव करीत आहेत व शितल मंद सुगंधी असा त्रिविध वारा सुखदायक वाहू लागला आहे ॥ ८ ॥ मोर ( नीलकंठ) कोकिळ ( कलकंठ) पोपट, चातक, चक्रवाक, चकोर इ. विविध विहंग नाना प्रकारे बोलून कानांना सुख देत आहेत आणि मन चोरुन घेत आहेत. ॥ दो० १३७ ॥

कपि केसरि करि किरी कुरंगें । विगत वैर विहरति सब संगें ॥
मृगये फिरत राम छवि निरखति । कुरग-कदंब अधिक आनंदति ॥
विबुध विपिन जितकीं जगिं असती । बघुनि रामबन सेर्षा सवती ॥
सुरसुरि सरस्वई रविकन्या । मेकल दुहिता, गोदा, धन्या ॥
सब सर सिंधु नदी नद नाना । मंदाकिनिचे करिती गाना ॥
उदय-अस्त-पर्वत कैलासहि । मंदर मेरु सकल सुर-वसहि ॥
सहिल हिमाचल आदिक जितके । चित्रकूट यश गाती तितके ॥
विंध्य मुदित, मनिं सुख ना मावे । विपुल महत्त्व विनाश्रम पावे ॥

दो० :- चित्रकूटचे विहग मृग वेलि-विटप- तृण-जाति ॥
पुण्यपुंज सब धन्य असं वदति देव दिन राति ॥ १३८ ॥

कपि, सिंह, हत्ती डुकरे ( किरी, कोल) हरिणे इ. पशु आपसांतील वैर विसरुन एकमेकांच्या संगतीत विहार करु लागले ॥ १ ॥ रामचंद्र शिकारीकरता फिरत असता रामरुप निरखून हरणांचे कळप ( कदंब, वृंद) इतरांपेक्षा अधिक आनंदित होऊ लागले ॥ २ ॥ जगातील सर्व देववने, रामवनाला पाहून त्याची ईर्षापूर्वक स्तुती करु लागले ॥ ३ ॥ देवनदी गंगा, सरस्वती, सूर्यकन्या यमुना, मेकत कन्या नर्मदा, व गोदावरी वगैरे धन्य असलेल्या नद्या, सर्व नानाविध सरोवरे, विविध सागर, विविध नद्या व नद मंदाकिनीची प्रशंसा करतात ॥ ४-५ ॥ उदयाचल, अस्ताचल आणि कैलास पर्वत, मंदराचल, मेरुपर्वत इ. सर्व देवांची निवासस्थाने आणि हिमालय वगैरे जितके पर्वत आहेत तितके सर्व चित्रकूट पर्वताचे यश गाऊ लागले ॥ ६-७ ॥ विंध्या पर्वत फार प्रसन्न झाला व सुख मनात मानेनासे झाले ( कारण) काही श्रम न करता ( सहज) पुष्कळ मोठेपणा मिळाला ॥ ८ ॥ चित्रकूटचे पक्षी, पशु, आणि वेली विटप ( वृक्ष) व तृण यांच्या विविध जाती ( प्रकार) इत्यादी सर्व पुण्यराशी असून धन्य आहेत असे देव रात्रंदिवस म्हणू लागले ॥ दो० १३८ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP