॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय ९ वा



Download mp3

पुन्हां भुशुंडी वदला सादर । प्रीति न थोडी खगनाथावर ॥
नाथ ! तुम्हीं मज पूज्य सर्वपरिं । श्रीरघुनायक कृपापात्र वरि ॥
तुम्हां न संशय माया मोह न । दया मजवरी केली आपण ॥
मोह मिषें प्रभु तुजला धाडति । मजला महती देती रघुपति ॥
तुम्हिं निज मोहा वदलां खगपति । कांहिं नसे आश्चर्य यांत अति ॥
नारद भव विरंचि सनकादिक । आत्मवादि जे ही मुनिनायक ॥
मोहें अंध न कृत कोणाला । कोण, न नाचवि काम जयाला ॥
तृष्णा वेड न लावि कुणाला । क्रोध न दाहि कुणा हृदयाला ॥

दो० :- ज्ञानी तापस शूर कवि कोविद गुण आगार ॥
लोभ कुणाचें विटंबन न करी जगिं या फार ॥ ७०रा ॥
श्रीमद वक्र न कुणा करि प्रभुताबधिर न कोण ॥
कोण असा किं मृगाक्षिचे विद्ध न शर लागोन ॥ ७०म ॥

पक्षीराजावर थोडे थोडके नाही, पुष्कळ प्रेम असल्यामुळे काकभुशुंडी आदराने पुन्हा म्हणाला की, ॥ १ ॥ नाथ ! तुम्ही सर्व प्रकारे मला पूज्य आहांत व त्यातही तुम्ही श्रीरघुनाथाचे कृपापात्र आहांत ॥ २ ॥ तुम्हांला संशय, माया, मोह इ. काहीच नव्हते तुम्ही खरोखर माझ्यावर दया केलीत ॥ ३ ॥ मोहाच्या निमित्ताने रघुपतींनी तुम्हाला माझ्याकडे पाठवले आणि मला मोठेपणा दिला. ॥ ४ ॥ पक्षीराज ! तुम्ही आपला मोह सांगीतलात पण यांत काही मोठे आश्वर्य नाही. ॥ ५ ॥ नारद, शंकर, ब्रह्मदेव व सन्कादिकांसारखे जे आत्मवादी मुनिनायक इ. कोणाला नाही मोहाने आंधळे केले ? कामाने नाचविला नाही असा कोण आहे ? ॥ ६-७ ॥ तृष्णेने कोणाला नाही वेडा केला ? क्रोधाने ज्याची छाती जळली नाही असा कोण आहे ? ॥ ८ ॥ ज्ञानी, तपस्वी, शूर, कवी, पंडित, गुणधाम (इत्यादित सुद्धा) असा कोण आहे की लोभाने त्याची फार विटंबना केली नाही ? ॥ दो० ७० रा ॥ लक्ष्मीचा मद कोणाला वक्र बनवीत नाही ? सत्तेने बधिर न केलेला असा कोण आहे ? आणि असा कोण आहे की जो हरिणाक्षीच्या बाणाने घायळ झाला नाही ? ॥ दो० ७० म.॥

कुणा न गुण सन्निपात झाला । कोण न मानपदें जो पिडला ॥
कोणा ज्वर यौवन ना भ्रमवी । ममता यश न कुणाचें बुडवी ॥
मत्सर कुणा कलंक न लावी । शोक समीर न कुणा हालवी ॥
चिंता सापिण कुणा न खाते । जगिं माया व्यापि न कोणातें ॥
कीट मनोरथ दारु शरीर । लागे घुण न कोण तो धीर ॥
पुत्र लोक धन तीन एषणा । करिति मलिन ना मतीस कवणा ॥
हा माया परिवारचि सगळा । प्रबल, मिति न कुणि वर्णूं शकला ॥
शिव चतुरानन डरती जीतें । काय इतर जीवां गणती ते ? ॥

दो० :- विश्वा राही व्यापुनी माया कटक प्रचंड ॥
सेनापति कामादि, भट दंभ कपट पाखंड ॥ ७१रा ॥
रघुवीराची दासि ती जरि मिथ्या ज्ञानास ॥
रामकृपेविण ना सुटे प्रभु ! वदुं करुनि पणास ॥ ७१म ॥

त्रिगुणानी उत्पन्न केलेला सन्निपात रोग कोणाला नाही झाला ? असा कोण आहे की जो मानाने व मदाने पीडला नाही ? ॥ १ ॥ यौवन तारुण्यरुपी ज्वर कोणाला नाही भ्रमिष्ट करीत ? ममतेने कोणाचे यश नाही बुडविले ? ॥ २ ॥ मत्सराने कोणाला कलंक नाही लावला ? शोकरुपी जोराच्या वार्‍याने हालवून खिळखिळा केला नाही तो कोणाला ? ॥ ३ ॥ चिंतारुपी सापीण कोणाला खात नाही ? आणि जगात असा कोण आहे की ज्याला माया वश करीत नाही ? ॥ ४ ॥ मनोरथ म्हणजे वाळवीचे कीडे असून शरीर हे काष्ट आहे, असा धीर पुरुष कोण आहे की ज्याला या किड्यांनी खाल्ला नाही ? ॥ ५ ॥पुत्रेषणा, लोकोषणा व वित्तेषणा या तीन एषणांनी कोणाची बुद्धी मलीन केली नाही ? ॥ ६ ॥ हा सगळा मायेचा परिवार आहे. हा फार प्रबल असून अपार आहे याचे वर्णन कोणीही करु शकला नाही ॥ ७ ॥ शिव आणि चतुर्मुख ब्रह्मदेव (सुद्धा) जिला भितात तिच्या पुढे इतर जीवांची गणती ती काय ? ॥ ८ ॥ मायेचे प्रचंड सैन्य विश्वाला व्यापून राहीले आहे. काम, क्रोध, लोभ हे सेनपती आहेत आणि दंभ, कपट, पाखंड वगैरे सर्व योद्धे आहेत. ॥ दो० ७१ रा ॥ ती माया ज्ञान झाल्यावर जरी मिथ्या आहे तरी रघुवीराची दासी आहे, म्हणून हे प्रभु ! मी प्रतिज्ञेवर सांगतो की श्री रघुवीर रामचंद्रांच्या कृपेशिवाय ती सुटणे शक्य नाही ॥ दो० ७१ म ॥

जी माया नाचवि जगतालां । जिचें चरित्र न कळे कुणाला ॥
प्रभु भुवईनें ती खगराजा । नटिसम नाचे सहित समाजा ॥
तो सच्चिदानंदघन रामहि । अज विज्ञानरूप बल धाम हि ॥
व्यापी व्याप्य अखंड अनंत हि । अखिल अमोघ शक्ति भगवंत हि ॥
अगुण अदभ्र गिरा गोतीत हि । सर्वदर्शि अनवद्य अजीत हि ॥
निर्मम निराकार निर्मोह । नित्य निरंजन सुख संदोह ॥
प्रभू प्रकृतिपर सब उरवासी । ब्रह्म निरीह विरज अविनाशी ॥
येथें मोहा कारण नाहीं । रवि सम्मुख तम जाइ कदा ही ॥

दो० :- भक्तांस्तव भगवान् प्रभु रामें धृत तनु भूप ॥
पावन परम चरित्र कृत प्राकृत नरानुरूप ॥ ७२रा ॥
धरुनि विविध वेषां जसा नट कोणी करि नाच ॥
त्या त्या भावा दाखवी होइ तसा ना साच ॥ ७२म ॥

जी माया सर्व जगाला नाचविते व जिचे चरित्र कोणाच्याही लक्षात येत नाही ॥ १ ॥ तीच हे खगराजा प्रभुच्या भुवयांच्या हालचालीवर आपल्या परिवारासह नटीसारखी नाचते ॥ २ ॥ असा जो सच्चिदानंदघन प्रभु तोच राम होय. तो अजन्मा केवळ ज्ञप्तिमात्र (विज्ञानरुप) व बळांचे माहेरघर आहे. ॥ ३ ॥ व्यापक व व्याप्त (असे विश्व) तोच आहे तो अखंड, अनंत आणि परिपूर्ण, अमोघ शक्ती व षड्गुणैश्वर्य संपन्न भगवान आहे.॥ ४ ॥ तो अगुण मोठ्याहून मोठा (अदभ्र) वाणी व इतर इंद्रिये यांच्या पलिकडे असणारा, सर्वदर्शी, निर्दोष, व कधी कोणी न जिंकलेला असा आहे ॥ ५ ॥ तो ममता रहित, निराकार, मोहातीत, नित्यमायादि विकाररहित, व सुखराशी आहे. ॥ ६ ॥ प्रकृतीच्या (मूळमायेच्या) पलीकडे, प्रभु सर्वांच्या हृदयात वास करणारे, इच्छारहित, विकाररहित, अविनाशी ब्रह्म रामचंद्र आहेत. ॥ ७ ॥ येथे (रघुवीरांचे ठिकाणी) मोहाचे कारण असणेच शक्य नाही. सूर्याच्या समोर अंधार कधी गेला आहे काय ? ॥ ८ ॥ भगवान प्रभु रामचंद्रांनी भक्तांच्या कल्याणासाठी भूपदेह धारण केला आणि प्राकृत मनुष्याप्रमाणे वागून परम पावन चरित्र केले ॥ दो० ७२ रा ॥ जसा कोणी नट अनेक रुपे घेऊन नाचतो (अभिनय करतो) व त्या त्या रुपाला व वेषाला योग्य असे भाव दाखवतो पण तो खरोखर तसा होत नाही (तसेच हे प्रभुचे नर चरित्र आहे.) ॥ दो० ७२ म ॥

अशि रघुपति लीला उरगारी ! । दनुज विमोहक जन सुखकारी ॥
जे मति मलिन विषयवश कामी । प्रभुवर लादिति मोहा स्वामी ! ॥
नयनदोष जैं ज्याला होतो । पीतवर्ण शशि तोच किं म्हणतो ॥
ज्या जैं दिग्भ्रम होई खगेश्वर । म्हणे पश्चिमे उदित दिनेश्वर ॥
नौकारूढ पळत जग पाहे । मोहें मानि अचल मी आहे ॥
भ्रमति बाल ना भ्रमति गृहादी । वदति परस्पर मिथ्या वादी ॥
असा मोह हरिविषयिं विहंग ! । अज्ञाना स्वप्निं ना प्रसंग ॥
मायावश मतिमंद अभागे । हृदयिं जवनिका बघुविध लागे ॥
ते शठ हठवश संशय धरती । रामीं निज अज्ञान लादती ॥

दो० :- काम कोप मद लोभ रत गृहासक्त दुखरूप ॥
ते कीं जाणति रघुपतिस मूढ पतित तम कूप ॥ ७३रा ॥
निर्गुण रूप सुलभ अति सगुण न जाणे कोणि ॥
सुगम अगम चरितां श्रवुनि जाती मुनिहि भुलोनि ॥ ७३म ॥

हे उरगारी ! अशी रघुपतीची लीला आहे. ती राक्षसांना विमोहित करणारी पण भक्तांना सुखकारक आहे. ॥ १ ॥ अहो स्वामी ! जे मलिन बुद्धी विषयवश व कामी असतात तेच प्रभुवर मोहाचा आरोप करतात. ॥ २ ॥ ज्याला जेव्हा नेत्रदोष (काविळीने) होतो तोच म्हणतो की चंद्र पिवळा आहे ॥ ३ ॥ हे खगेश्वरा ! ज्याला दिशाभ्रम होतो तोच म्हणतो की सूर्य पश्चिमेस उगवला आहे. ॥ ४ ॥ नौकेत बसून जाणारा जग पळत असलेले पाहतो व तो मोहाने मानतो की मी स्थिर आहे ॥ ५ ॥ मुले स्वत: गरगर फिरत असतात, घर वगैरे काही फिरत नसते पण ही असत्यवादी मुले एकमेकांस सांगतात की घर वगैरे सर्व फिरत आहे. ॥ ६ ॥ हे विहंगा ! हरि विषयीच्या मोहाची अशीच कथा आहे तेथे स्वप्नांत सुद्धा अज्ञानाचा प्रसंग नसतो. ॥ ७ ॥ मायेला वश झालेले मंदबुद्धी आणि अभागी लोक, ज्यांच्या हृदयावर नाना प्रकारची पुटे चढली आहेत ॥ ८ ॥ ते शठ (पढतमूर्ख) हट्टाला बळी पडून (प्रभुविषयी) संशय धरतात आणि आपले स्वत:चे अज्ञान रामावर लादतात. काम, क्रोध, लोभ मदादिकांत रत असलेले व दु:खरुप गृहादिकांवर जे आसक्त झालेले असतात ते रघुपतीला कसे जाणू शकतील ? ते मूढ तर अंधकार रुपी कूपात पडलेले असतात. ॥ दो० ७३ रा ॥ निर्गुण रुप अति सुलभ आहे, पण सगुण कोणीच जाणू शकत नाही (त्यामुळे) सुगम व अगम लीलांचे श्रवण करुन मुनीसुद्धा भुलतात. ॥ दो० ७३ म ॥

श्रुणु खगेश ! रघुपतिची प्रभुता । कथा यथामति रुचिर वदुं अतां ॥
झाला मोह कसा प्रभु मजला । कथा सकल ती वदतो तुजला ॥
रामकृपाभाजन तुम्हिं ताता ! । प्रीति हरिगुणीं मज सुखदाता ॥
म्हणुनि तुम्हांसि न काहिं लपवतो । परम रहस्य मनोहर वदतो ॥
पहा स्वभाव सहज रामाचा । नुरविति कधि अभिमान जनाचा ॥
नाना शूलद संसृति मूलहि । सकल शोकदायक अभिमान हि ॥
यास्तव करिति कृपानिधि दूरी । दासांवर ममता अति भूरी ॥
स्वामी ! शिशु देहीं व्रण होतां । कापवि कठिण बनूनी माता ॥

दो० :- प्रथम दुःख जरि पावतें बालक रडे अधीर ॥
रोग विनाशा दुःख तें न गणी जननी धीर ॥ ७४रा ॥
रघुपति निज सेवक हिता तसा हरिति अभिमान ॥
भ्रमा त्यजुनि तुलसी अशा प्रभुला भजसी कां न ? ॥ ७४म ॥

ती हरिभक्ती काक कशी पावे ? – हे खगेश ! आता रघुपतीचा महिमा ऐका. ती सुंदर कथा आता मी यथामति सांगतो ॥ १ ॥ प्रभो ! मला मोह कसा झाला ती सगळी कथा मी तुला सांगतो ॥ २ ॥ हे तात ! तुम्ही रामकृपेचे पात्र आहांत आणि हरिगुणकथा श्रवणात तुमची प्रीती आहे व त्यामुळे तुम्ही मला सुख देणारे झालांत. ॥ ३ ॥ म्हणून मी तुमच्यापासून काहीही लपवून ठेवीत नाही, परम मनोहर रहस्य वर्णन करुन सांगतो ॥ ४ ॥ श्रीराम रघुपतीचा स्वभाव कसा आहे पहा ते आपल्या भक्तांचा अभिमान कधीही शिल्लक राहू देत नाहीत ॥ ५ ॥ कारण नाना प्रकारचे क्लेश देणारा संसाराचे मूळ आणि सर्व शोकदायक आहे अभिमान ॥ ६ ॥ म्हणून सेवकावर फार प्रेम करणारे रघुपती – कृपानिधी त्या अभिमानाला दूर करतात ॥ ७ ॥ स्वामी ! बालकाच्या अंगावर गळू झाल्यावर माता कठोर बनून तो कापविते ॥ ८ ॥ तेव्हा प्रथम जरि बालकास दु:ख होते व ते अधीर होऊन रडते तरी त्याची धीराची आई रोग विनाशासाठी त्याच्या दु:खाकडे लक्ष देत नाही ॥ दो० ७४ रा ॥ तसेच रघुपती आपल्या सेवकाच्या हितासाठी त्याचा अभिमान हरण करतात तुलसीदास म्हणतात की भ्रमाचा त्याग करुन अशा प्रभुला का भजत नाहीत ? ॥ दो० ७४ म ॥

रामकृपा वर्णूं निज जडता । ऐका खगेश लावुनि चित्ता ॥
जैं जैं राम मनुज तनु धरती । भक्तांस्तव बहु लीला करती ॥
अयोध्येंत मी तैं तैं जातो । बाल चरित्रा बघुनि हर्षतो ॥
जन्म महोत्सव जाउनि बघतो । वर्षे पांच लुब्ध मी वसतो ॥
इष्टदेव मम बालक राम । वपु शोभा कोटी शत काम ॥
बघ बघुनी निज प्रभूचें आनन । करुं उरगारी सुफल विलोचन ॥
लघु वायस वपुधर, हरि संगीं । बघतो बालचरित बहुरंगी ॥

दो० :- बालपणीं जेथें फिरति तेथें सवें उडून ॥
अंगणिं उष्टें जें पडे तें खातों उचलून ॥ ७५रा ॥
एकवार अतिशय सब चरिंत करिति रघुवीर ॥
ती प्रभुलीला स्मरतही पुलके काक शरीर ॥ ७५म ॥

खगेश ! आता मी रामकृपा व माझा मूर्खपणा वर्णन करुन सांगतो तो तुम्ही लक्ष देऊन ऐका ॥ १ ॥ ज्या ज्या वेळी राम भक्तांसाठी मनुष्य देह धारण करतात तेव्हा भक्तांसाठी पुष्कळ लीला करतात. ॥ २ ॥ म्हणून त्या त्या वेळी मी अयोध्येत जातो व बालचरित्र अवलोकन करुन हर्षित होतो ॥ ३ ॥ तेथे जाऊन मी राम जन्मोत्सव पाहतो व पाच वर्षे तेथेच लुब्ध होऊन राहतो. ॥ ४ ॥ माझे इष्ट देव बालक राम असून त्याच्या तनूची शोभा कोटी काम देवांसारखी आहे ॥ ५ ॥ माझ्या प्रभुचे मुख वारंवार पाहून हे उरगारी ! मी आपले नेत्र सुफल करतो ॥ ६ ॥ कावळ्याच्या पिलाचे रुप घेऊन मी श्रीहरीबरोबर फिरत विविध प्रकारचे बालचरित्र पाहतो. ॥ ७ ॥ बालपणी श्रीराम जिथे जिथे फिरतात, तिथे तिथे त्यांच्याबरोबर उडत जातो व अंगणात जे उष्टे पडेल ते टिपून खातो. ॥ दो० ७५ रा ॥ एकदा रघुवीराने फारच सुंदर लीला केली प्रभुच्या त्या लीलेचे स्मरण होताच काकभुशुंडीचे शरीर पुलकित झाले. (पंख फुलले) ॥ दो० ७५ म ॥

म्हणे काक ऐका खगनायक । रामचरित सेवक सुखदायक ॥
नृप मंदिर सुंदर सब रीतीं । खचित कनकमणि नाना जाती ॥
वर्णवे न तें सुंदर आंगण । खेळति नित्य जिथें चौघेजण ॥
बाल विनोद करत रघुनायक । विचरति अजिरिं जननि सुखदायक ॥
मृदुल कलेवर मरकत शाम । अंगीं अंगीं छवि बहु काम ॥
नव राजीव अरुण मृदुचरण हि । पदज रुचिर, नरव शशिभा हरणहि ॥
ललित अंक कुलिशादिक चारी । नूपुर चारु मधुर रवकारी ॥
चारु कनक मणि विरचित सुंदर । कटिं किंकिणि कल, मुखर मनोहर ॥

दो० :- रेखा त्रय सुंदर उदरिं नाभि रुचिर गंभीर ॥
आयत उर राजति विविध बाल विभूषण चीर ॥ ७६ ॥

काकभुशुंडी म्हणाला हे खगनायका ! सेवकांस सुख देणारे रामचरित्र ऐका. ॥ १ ॥ दशरथ राजांचा महाल सर्व प्रकारे सुंदर आहे तो सोन्याचा असून त्यास अनेक प्रकारची रत्ने जडविलेली आहेत. ॥ २ ॥ जिथे चारी बालके नेहमी खेळतात ते सुंदर अंगण तर वर्णन करण्य़ापलिकडचे आहे. ॥ ३ ॥ मातांना सुख देणारे रघुनायक बालविनोद करीत अंगणात खेळत असतात. ॥ ४ ॥ बालरामरुप वर्णन – मरकत (पाचू) मण्यासारखे श्यामल व कोमल शरीर आहे; प्रत्येक अवयवाची शोभा अनेक कामदेवांसाखी आहे ॥ १ ॥ नवीन लाल कमला प्रमाणे पायांचे तळवे लाल व कोमल आहेत पायांची बोटे सुंदर असून नखे चंद्राच्या कान्तीला लाजविणारी आहेत. ॥ ६ ॥ (तळपायावर) वज्र, अंकुश, ध्वज व ऊर्ध्वरेखा ही चार सुंदर (शुभ) चिन्हे आहेत आणि नुपूरे (वाळे) सुंदर असून मधुर ध्वनि (नाद) करणारी आहेत ॥ ७ ॥ रत्नजडित सुवर्णाचे कटिसूत्र असून त्यास सुंदर व मधुर (छोट्या) घागर्‍या आहेत. ॥ ८ ॥ उदरावर सुंदर तीन रेखा असून नाभी फार खोल व सुरेख आहे. छाती विशाल असून त्यावर अनेक प्रकारची बाललेणी व वस्त्र विराजत आहे. ॥ दो० ७६ ॥

अरुण पाणि, नख, करज, मनोहर । बाहु विशाल विभूषण सुंदर ॥
स्कंध बालहरि, कंबूग्रीवा । चारु चिबुक आनन छविसीवा ॥
बोल बोबडे अरुण वराधर । बारिक युग युग दशन विशद वर ॥
ललित गाल नासिका मनोहर । हास्य सकल सौख्यद सम शशिकर ॥
नीलकंज लोचन भव मोचन । भ्राजत भालिं तिलक गोरोचन ॥
भृकुटि विकट, सम सुंदर कान हि । कुंचित कच मेचक छवि छान हि ॥
अंगिं तलम रुचि पिवळें झबलें । दृष्टि, खिदळणें प्रिय मज गमले ॥
रुपराशि विहरती नृपांगणिं । नाचति निज पडछाये पाहुनि ॥
करिति विविध विध मजसी क्रीडा । वर्णित मज अति वाटे व्रीडा ॥
खिदळत जैं मज धरण्या धावति । मी पळतां मज अपूप दावति ॥

दो० :- प्रभु हसती येतां निकट जात उडुन रडतात ॥
पद् धरुं जातां निकट मी वळुनि बघत पळतात ॥ ७७रा ॥
प्राकृत शिशु इव लीला बघुनि होइ मज मोह ॥
कवण चरित करिती प्रभु चिदानंद संदोह ॥ ७७म ॥

लाल तळहात, हाताची बोटे व नखे मनोहारी असून, विशाल बाहूंवर सुंदर आभूषणे आहेत ॥ १ ॥ बाल सिंहासारखे खांदे असून शंखासारखा गळा आहे, हनुवटी सुंदर असून मुखशोभा तर सौंदर्याची सीमाच आहे. ॥ २ ॥ बोबडे बोल, लालचुटुक ओठ, बारिक (नुकतेच आलेले) पांढरे शुभ्र दोन दात – सारेच सुंदर आहे ! ॥ ३ ॥ गाल व नाकही मनोहर असून हास्य तर चंद्रकिरणांसारखे सर्वांस सुखद असे आहे ॥ ४ ॥ नील कमलाप्रमाणे डोळे भवापासून सोडवणारे आहेत तर कपाळावरील गोरोचन – तिलक सुंदर विराजत आहे. ॥ ५ ॥ भुवया बाकदार असून कान सम व सुंदर आहेत, तर केस काळे कुरळे (भुरुभुरु उडताना) सुंदर शोभत आहेत. ॥ ६ ॥ अंगात तलम (झिरझिरित) पिवळे सुंदर झबले आहे, प्रभूची द्रुष्टी आणि खिदळणे मला फारच प्रिय वाटते ॥ ७ ॥ दशरथ राजाच्या अंगणात सौंदर्यराशी रामचंद्र विहार करुं लागले व स्वत:च्या पडछायेकडे पाहून नाचू लागले ॥ ८ ॥ मग माझ्याशी नाना प्रकारच्या क्रीडा करु लागले की त्याचे वर्णन करताना मला फार लाज वाटते. ॥ ९ ॥ जेव्हा खिदळत खिदळत मला धरण्यासाठी धावत आले तेव्हा मी पळालो. ते मला अनरसा दाखवूं लागे ॥ १० ॥ माझ्याजवळ येत तेव्हा प्रभु हसत व मी उडून जाताच रडू लागत आणि (त्यांनी रडू नये म्हणून) त्यांच्या पाया पडण्यासाठी मी जवळ जाऊ लागलो तेव्हा (भ्यायल्या सारखे) पळत पुन्हा मागे वळून पाहून पळू लागले ॥ ७७ रा ॥ प्राकृत बालकासारखी ती लीला पाहून मला मोह उत्पन्न झाला की प्रभु सच्चिदानंद घन असून हे कसले चरित्र करीत आहेत. ! ॥ दो० ७७ म ॥

इतकें मनिं आणत खगराया । प्रेरित रघुपति लागे माया ॥
ती माया न दुखद मज कांहीं । आन जीव इव संसृति नाहीं ॥
नाथ ! इथें कारण तें भिन्न । ऐका सावधान हरियान ॥
ज्ञान अखंड एक सीतावर । मायाविवश जीव सचराचर ॥
ज्ञान एकरस सर्वांचे जर । ईश्वर जीवां भेद कुठें तर ॥
मायविवश जीव अभिमानी । ईशविवश माया गुणखाणी ॥
भगवान् स्ववश, जीव परवश ते । श्रीपति एकचि जीव अमित ते ॥
मुधा भेद यद्यपि कृत माया । विण हरि जाइ न कोटि उपायां ॥

दो० :- रामचंद्र भजनाविण इच्छी पद निर्वाण ॥
ज्ञानवंत अपि तो नर पशु विण पुच्छ विषाण ॥ ७८रा ॥
उगवति सोळा पूर्ण शशि तारागण समुदाय ॥
सकल गिरिंस दव लाविला रविविण रात्र न जाय ॥ ७८म ॥

हे खगराया गरुडा ! मी इतके मनात आणताच रघुपती प्रेरित माया मला लागली ॥ १ ॥ परंतु ती माया मला जरा सुद्धा दु:खद नव्हती, कारण अन्य जीवांप्रमाणे तिच्यामुळे मला संसृतीत पडावे लागले नाही ॥ २ ॥ नाथ ! असे होण्याचे कारण निराळे आहे ते हे हरीवाहना ! सावध राहून ऐका ॥ ३ ॥ एकटे सीतापतीच अखंड ज्ञानस्वरुप आहेत सर्व जंगम व स्थावर जीव मायेला वश झालेले असतात. ॥ ४ ॥ सर्वांचेच ज्ञान सदा अखंड एकरस राहीले तर मग ईश्वर आणि जीव यांच्यात भेद कुठे राहील ? ॥ ५ ॥ जीव अभिमानी असल्याने मायेला वश होतात पण तीच माया गुणांची खाण ईश्वराला वश असते. ॥ ६ ॥ भगवान स्वतंत्र स्ववश आहेत जीव परवश आहेत श्रीपती भगवान एकच आहेत पण जीव अगणित आहेत. ॥ ७ ॥ मायेने केलेला भेद जरी मिथ्या असला तरी हरीवाचून तो कोटी उपायांनीही जात नाही ॥ ८ ॥ रामचंद्रांच्या भक्तीशिवाय मोक्ष मिळवण्याची जो इच्छा करील तो नर जरी ज्ञानवंत असला तरी शिंगे, शेपूट नसलेला पशूच होय. ॥ दो० ७८ रा ॥ सोळा कलांनी पूर्ण चंद्र व सर्व नक्षत्र गणांचे समूह उगवले आणि सर्व पर्वतांना वणवा लागला तरी सूर्याशिवाय रात्र जात नाही. ॥ दो० ७८ म.॥

हरिभजनाविण तसा खगेशा । नाश नव्हें जीवांचे क्लेशां ॥
व्यापि न हरिसेवका अविद्या । व्यापी प्रभुनीं प्रेरित्त विद्या ॥
म्हणुनि न होतो दास् नाश तर । भेदभक्ति वाढे विहंगवर ॥
राम मला भ्रमचकित पाहता । विहसति त्या श्रुणु विशेष चरिता ॥
त्या लीलेचे मर्म न कोणी । जाणति अनुज न पिता न जननी ॥
मज धरण्या प्रभु रांगत धावति । श्यामल गात्र अरुण कर पद अति ॥
तंव मी पळत निघे उरगारी । धरण्या प्रभु पसरति भुज भारी ॥
मी जसजसा उडें आकाशी । दिसति तिथें भुज हरि मजपाशीं ॥

दो० :- गेलो विधिलोकावधि उडत वळुनि बघुं तात ।
तों दो अंगुल अंतर भुजामधें माझ्यात ॥ ७९रा ॥
सप्तावरणा भेदुनी जोंवरि गति मजलाहि ॥
जाइं तिथें प्रभु भुज बघुनि व्याकुळता चित्ताहि ॥ ७९म ॥

तसाच हे खगेशा ! रघुपती भक्तीशिवाय जीवांच्या क्लेशांचा नाश होत नाही. ॥ १ ॥ हरी सेवकांना अविद्या व्यापीत नाही, त्यांना प्रभूंनी प्रेरलेली विद्या व्यापते ॥ २ ॥ म्हणून तर दासांचा नाश होत नाही, उलट हे पक्षिश्रेष्ठा, भेदभक्ती वाढते ॥ ३ ॥ मला भ्रमाने चकित झालेला पाहून राम विहसले ते विशेष चरित्र (लीला) सांगतो ते ऐक ॥ ४ ॥ त्या लीलेचे मर्म कोणीच जाणले नाही. अनुजांनी नाही जाणले, पित्याने मातेने कोणीही जाणले नाही ॥ ५ ॥ श्यामल व अति लाल लाल तळहात व तळपाय असलेले प्रभु रांगत रांगत मला धरण्यासाठी धावले ॥ ६ ॥ तेव्हा हे उरगारी ! मी पळत निघालो बाल राम प्रभुंनी मला धरण्यासाठी आपले हात खूप पसरले ॥ ७ ॥ मी जसजसा आकाशात उंच व दूरदूर उडू लागलो तसतसे तिथे भुजरुप हरी माझ्या अगदी जवळ दिसूं लागले ॥ ८ ॥ मी ब्रह्मलोकापर्यंत उडत गेलो व उडताना वारंवार मागे वळून पाहीले तो माझ्यात आणि रामबाहूत फक्त दोन अंगुळांचेच (बोटांचे) अंतर असलेले दिसत होते. ॥ दो० ७९ रा ॥ सात आवरणांचा भेद करुन मी माझी गति जेथवर होती तेथवर गेलो पण जातो तिथे प्रभुचे हात पाहून मी चित्तांत व्याकुळ झालो. ॥ दो० ७९ म ॥

मिटले नयन यदा मी भ्यालों । बघतो तों कोसलपुरिं आलों ॥
हसले राम यदा मी दिसलो । हसतांक्षणिं मीं मुखीं प्रविशलो ॥
उदरंतच बघ अंडजराया । बहु पाहूं ब्रह्मांडनिकायां ॥
तत्र चित्र अति लोकांनेकां । रचना एकाहुनि अति एकां ॥
कोटी चतुरानन गौरीश । अगणित उडुगण रवि रजनीश ॥
अगणित लोकपाल यम काल । अगणित भूधर भूमि विशाल ॥
सागर सरि सर विपिन अपार । नाना विधा सृष्टिविस्तार ॥
सुर मुनि सिद्ध नाग नर किंनर । चार तर्‍हांचे जीव चराचर ॥

दो० :- जें न दृष्ट वा नसे श्रुत जें कधिं ये न मनांत ॥
तें सब अद्‌भुत पाहिलें कसें वर्णिलें जात ॥ ८०रा ॥
एकैका ब्रह्मांडि मी राहिं वर्ष शत एक ॥
फिरलो यापरिं बघत मी अंड-कटाह अनेक ॥ ८०म ॥

मी जेव्हा भ्यालो तेव्हा डोळे मिटले व उघडून पाहतो तो मी कोसलपुरीत आलेला दिसलो ॥ १ ॥ मी द्रुष्टीस पडताच राम हसले आणि हसताक्षणीच बालरामांच्या मुखात मी प्रवेशलो ॥ २ ॥ हे पक्षीराजा ! हे पहा की प्रभूच्या पोटातच मला ब्रह्मांडांचे समूह दिसले ॥ ३ ॥ त्या ब्रहमांडात असलेल्या अति विचित्र भुवनांची रचना एकापेक्षा एक अधिक चांगली होती. ॥ ४ ॥ कोट्यावधी ब्रह्मदेव, अगणित लोकपाल, यम, काळ अगणित विशाल पर्वत व विशाल भूमी मला दिसल्या. ॥ ५-६ ॥ असंख्य सागर, सरिता, तलाव, अरण्ये आणि नाना प्रकारचा इतर सर्व सृष्टी विस्तार मी पाहीला ॥ ७ ॥ देव, मुनी, सिद्ध, नाग, नर, किन्नर इत्यादी चारी खाणींचे स्थावर, जंगम सर्व जीव मला दिसले (याशिवाय) ॥ ८ ॥ जे पूर्वी कधी पाहीले किंवा ऐकले सुद्धा नव्हते व जे कधी कल्पनेने सुद्धा मनात येणे शक्य नव्हते ते सर्व अदभुत मला दिसले पण त्याचे वर्णन कसे करता येणार ? ॥ दो० ८० रा ॥ प्रत्येक ब्रह्मांडात मी शंभर शंभर वर्षे राहीलो व याप्रमाणे अगणित ब्रह्मांडे बघत फिरत राहीलो ॥ दो० ८० म. ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP