॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १९ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

म्हणे तपी नृप ! ऐसें व्हावें । कारण एक कठिण परिसावें ॥
कालहि तवपदिं नमील शीसा । फक्त विप्रकुल-विना महीशा ॥
तपें सदा विप्रां बल भारी । तत्कोपिं न कुणि रक्षणकारी ॥
जर विप्रां वश करिशि नरेश । तर तव वश विधि विष्णु महेश ॥
ब्रह्मकुळीं जबरी चाले ना । सत्य सांगुं उचलुनी भुजांनां ॥
द्विजशापाविण ऐक नृपाळा । तुझा नाश नहिं कोण्या काळा ॥
प्रमुदित नृप परिसुनि तद्‌भाषण । नाथ! अतां मम होणें नाश न ॥
प्रभो! कृपें तव कृपानिधाना । मी पावेन सतत कल्याणा ॥

दो. :- वदुनी तथास्तु मुनि कुटिल कपटी वदे पुन्हां हि ॥
भुलणें वनिं मम भेट जर वदसि बोल मज नाहिं ॥ १६५ ॥

तो ( वंचक ) तपस्वी म्हणाला की राजा ! असेच होवो, पण एक मोठे कठीण कारण आहे ते ऐक ॥ १ ॥ हे महीशा, फक्त विप्रकुल सोडले तर प्रत्यक्ष काळ सुद्धा तुझ्या पायावर मस्तक नमवील. ॥ २ ॥ ( पण ) ब्राह्मणांना तपाचे फार बळ असल्यामुळे त्यांच्या कोपापासून रक्षण करणारा कोणी नाही ॥ ३ ॥ ( म्हणून सांगतो की ) हे नरेशा ! जर तूं सर्व विप्रांना वश केलेस तर ब्रह्मदेव, विष्णू व महेश सुद्धा तुला वश होतील ॥ ४ ॥ ब्राह्मणांच्या कुळाशी मात्र जबरीचा काही उपयोग होत नाही, हे मी तुला दोन्ही बाहू उचलून सत्य सांगतो. ॥ ५ ॥ राजा ! तुझा नाश ब्राह्मण शापाशिवाय ( कशानेही ) कोणत्याही काळी होणार नाही ॥ ६ ॥ त्याचे भाषण ऐकून राजाला विशेष आनंद झाला ( व म्हणाला ) नाथ ! आता माझा नाश होणे शक्य नाही ॥ ७ ॥ प्रभो ! कृपानिधाना तुमच्या कृपेने मला सतत कल्याणाची प्राप्ती होईल ॥ ८ ॥ तथास्तु असे म्हणून तो कपटी कुटील मुनी पुन्हा म्हणाला की वनात ( तुझे ) भुलणे व माझी भेट ( यांविषयी ) कोणा जवळ काही बोलशील तर मात्र दोष माझ्याकडे नाही. ॥ दो०१६५ ॥

राजा! तुज वर्जितसें यास्तव । वदसि करिसि अति अकार्य बा! तव ॥
षट्‌कर्णीं ही पडत कहाणी । तुमचा नाश सत्य मम वाणी ॥
प्रगट होत हें वा द्विजशापां । नाश तुझा श्रुणु रवि-प्रतापा ॥
अन्य उपायिं निधन तव नाहीं । जरि हरिहर चढले कोपा ही ॥
सत्य नाथ! नृप म्हणे पदां धरि । द्विज-गुरु कोपीं रक्षि कोण तरि ॥
रक्षिति गुरु जर रुष्ट विधाता । गुरु विरोधिं जगिं कुणि ना त्राता ॥
पाळिन जर ना प्रभु! आज्ञाही । घडो नाश मज चिंता नाहीं ॥
एकचि मज वाटे भीती पण । प्रभु! भूदेव शाप अति भीषण ॥

दो. :- होति विप्र वश केविं तें कृपा करुनि सांगा हि ॥
दीन-दयाळा तुजविणें हितकर्ता मम नाहिं ॥ १६६ ॥

राजा ! मी तुला मनाई करतो ती एवढ्याचसाठी की ( या दोन गोष्टी ) कोणाजवळ बोलशील तर बाबा ! स्वत:चे अति अकार्य करशील ॥ १ ॥ कारण की ही कहाणी षट्कर्णी होताच तुमचा नाश झालाच म्हणून समजा. ही माझी वाणी सत्य आहे, खोटी होणार नाही ॥ २ ॥ भानुप्रताप ऐक ! हे प्रगट झाले की अथवा द्विज शाप झाला की तुझा नाश झालाच ॥ ३ ॥ जरी हरिहर तुझ्यावर रुष्ट झाले तरी दुसर्‍या कोणत्याही उपायाने तुझा नाश नाही ॥ ४ ॥ राजाने पाय धरले व म्हणाला की नाथ ! आपण म्हणता ते खरे आहे. ब्राह्मण व गुरु यांच्या कोपापासून रक्षण कोण करुं शकणार ? ( कोणीही नाही ) ॥ ५ ॥ ब्रह्मदेव जरी रुष्ट झाले तरी गुरु रक्षण करु शकतात, पण गुरुशी विरोध केला असता जगात कोणीही त्राता नाही. ॥ ६ ॥ प्रभू ! ही आपली आज्ञा मी जर पाळली नाही तर माझा नाश खुशाल होऊ द्या, त्याची मला मुळीच चिंता नाही. ॥ ७ ॥ पण माझ्या मनाला एकच भीती वाटते की ब्राह्मणांचा शाप भीषण असतो. ॥ ८ ॥ ब्राह्मण कोणत्या प्रकारे वश होतील एवढे मला कृपा करुन सांगावे. दीनदयाळा ! आपल्यावाचून माझा कोणी हितकर्ता नाही ॥ दो० १६६ ॥

श्रृणु नृप यत्‍न जगीं नाना ही । कष्टसाध्य तरि फळति किं नाहीं ॥
एक असे अति सोपें साधन । अडचण तेथें एक महा पण ॥
असे युक्ति ती मम आधीना । घडे गमन मम तव नगरीं ना ॥
आजवरीं जोंपासुन झालों । गृहिं कोणाच्या ग्रामिं न गेलों ॥
महा हानि तव, गेलों ना तर । पडले संकट महा पहा बरं ॥
ऐकुनि नृपति वदे मृदु वाणीं । नाथ निगम अशि नीती वानी ॥
स्नेह थोर सानांवर करती । निज शिरिं गिरि संतत तृण धरती ॥
जलधि अगाध फेस शिरिं वाही । सदा शिरीं धरि धूळ धरा ही ॥

दो. :- असें वदुनि नृप धरि पदां स्वामी व्हाल कृपाल ॥
दुःख सहा प्रभु! मम हिता सज्जन दीनदयाल ॥ १६७ ॥

राजा ! ऐक या जगात नाना प्रकारचे उपाय जरी आहेत तरी ते सगळे कष्ट साध्य आहेत व पुन्हा फळतील की नाही ही शंका आहेच. ॥ १ ॥ एक साधन आहे ते मात्र अगदी सोपे आहे, पण त्यात एक मोठी अडचण आहे ॥ २ ॥ ( कारण ) ती युक्ती फक्त माझ्याच स्वाधीन आहे; व तुझ्या नगरात माझे गमन होणे शक्य नाही ॥ ३ ॥ कारण मी उत्पन्न झाल्यापासून आजपर्यंत कोणाच्या घरी किंवा गावी गेलो नाही ॥ ४ ॥ जर गेलो नाही तर तुझी मोठी हानी होणार ! कसे महासंकट उभे राहीले ते पहा खर ॥ ५ ॥ ते भाषण ऐकून राजा कोमलवाणीने म्हणाला की नाथ ! वेद पुराणादि अशी नीती वर्णन करतात की ॥ ६ ॥ जे मोठे असतात ते लहानांवर स्नेह करतात. पर्वत सदा सर्वकाळ आपल्या मस्तकावर गवत धारण करतात ॥ ७ ॥ व अगाध सागर आपल्या डोक्यावर सदा फेस धारण करतात आणि पृथ्वीसुद्धा सर्वदा आपल्या शिरावर धूळ धारण करते ॥ ८ ॥ असे म्हणून राजाने पाय धरले ( व म्हणाला की ) स्वामी माझ्यावर कृपा करावी ! माझ्या हितासाठी आपण इतके दु:ख सोसाच कारण सज्जन दिन – दयाळू असतात.॥ दो० १६७ ॥

भूप आपल्या अधीन जाणुनि । वदला कपटकुशल तापस मुनि ॥
सत्य सांगतो भूपति तुजला । दुर्गम काहिंहि जगीं न मजला ॥
करिन अवश्य तुझ्या मी कार्या । तूं मम भक्त वचन मन काया ॥
योग-युक्ति-तप-मंत्र-शक्ति, ती । फळे तदा जैं गुप्त रक्षिती ॥
यदि नरेश मी शिजविन अन्ना । तुम्हिं वाढा जाणे कुणि मज ना ॥
तर जे जे तें अन्न भक्षिती । ते ते तव आज्ञेस रक्षिती ॥
त्यांचें घरिं मग जेविल जो ही । भूपा तुज वश होईल तोही ॥
जाउनि नृप कर याच उपाया । वत्सरभर कर संकल्पा या ॥

दो. :- नित्य नवे द्विज लक्ष बा! वरणें सह परिवार ॥
मी त्वां संकल्पित दिवस स्वयंपाक करणार ॥ १६८ ॥

राजा आपल्या आधीन आहे असे पाहून कपट करण्यात कुशल असलेला तो तापस मुनी म्हणाला ॥ १ ॥ राजा ! मी तुला सत्य सांगतो की या जगात दुर्गम असे मला काही सुद्धा नाही ॥ २ ॥ म्हणून मी तुझे कार्य जरुर जरुर करीन; कारण तू मनाने वाणीने व देहाने माझा भक्त आहेस. ॥ ३ ॥ योग युक्ती तप व मंत्रादिकांची शक्ती गुप्त ठेवली तरच सुफळ होते. ॥ ४ ॥ नरेशा ! मी जर अन्न शिजविले व तुम्ही जर ते वाढले व मला कोणी ओळखले नाही ॥ ५ ॥ तर जे जे ते अन्न खातील ते ( सर्व ) तुझी आज्ञा पालन करतील ॥ ६ ॥ नंतर त्यांच्या घरी जो कोणी जेवील तो सुद्धा हे भूपा ! तुला वश होईल ॥ ७ ॥ तेव्हा राजा जाऊन हाच उपाय कर की एक वर्षभर हाच संकल्प असेल ॥ ८ ॥ रोज नवे एक लक्ष ब्राह्मण सहपरिवार जेवले पाहीजेत व मी त्या संकल्पानुसार तितके दिवस स्वयंपाक करणार. ॥ दो० १६८ ॥ ( रोज एक लक्ष म्हणजे वर्षात तीन कोटी साठ लक्ष )

अल्प कष्टिं नृप! अशा पद्ध‌तीं । विप्र सर्व ही तव वश बनती ॥
द्विज मख होम करिति पूजा स्तव । त्यानां देव सहज वश त्यास्तव ॥
आणिक सांगुं एक तुज लक्षण । या वेषें मीं येइन ना, पण-- ॥
तुमच्या पुरोहिताला राया । आणिन हरुनि इथें निज मायां ॥
त्या तपबळें रूप मम देइन । आणि वर्षभर येथें ठेविन ॥
त्याचें रूप धरुनि मी राजा । सर्वपरीं तव करीन काजा ॥
रात्र फार गत, निज बरं आतां । तिजे दिनीं भेटूं तुज ताता ॥
तपोबलें तुज तुरग-समेता । सुप्त पोचविन तुझ्या निकेता ॥

दो. :- त्या रूपें येईन मी ऒळख मला तदाच ॥
बोलावुनि एकांतिं जैं सांगूं कथेसि याच ॥ १६९ ॥

राजा अशा पद्धतीने अगदी थोड्या कष्टात सगळे ब्राह्मण तुला वश होतील ॥ १ ॥ ब्राह्मण यज्ञ, याग, पूजा, स्तुती वगैरे करतात त्यामुळे सर्व देव त्यांना सहजच वश असतात ॥ २ ॥ तुला आणखी एक खूण सांगून ठेवतो की मी या वेषाने तुझ्याकडे येणार नाही ॥ ३ ॥ पण राजा ! तुमच्या पुरोहिताला मी आपल्या मायेने इथे पळवून आणीन ॥ ४ ॥ आणि माझ्य़ा तपाच्या बळाने मी आपले रुप त्याला देईन आणि एक वर्षभर येथे ठेवीन ॥ ५ ॥ राजा ! तुझ्या पुरोहिताचे रुप घेऊन मी येईन व सर्व परींनी तुझे काम करीन ॥ ६ ॥ आता रात्र फार झाली तू नीज पाहू बाळा ! मी तुला तिसर्‍या दिवशी भेटेन ॥ ७ ॥ तू झोपलेला असतानाच तुला तुझ्या घरी मी आपल्या तपोबलाने ( रातोरात ) पोचवीन. ॥ ८ ॥ मी त्या ( तुझ्या पुरोहिताच्या ) रुपाने येईन व तुला एकांतात बोलवून याच सगळ्या गोष्टी ( खूण म्हणून ) सांगेन त्या वेळीच मी आलो आहे असे ओळख. ॥ दो० १६९ ॥

आज्ञा मानुनि नरपति निजला । छली ज्ञानि गत आसनिं बसला ॥
श्रान्त भूप अति निद्रा आली । कशि ये त्याला चिंता जाळी ॥
कालकेतु निशिचर तैं आला । किरि-रूपें जो भुलवि नृपाला ॥
तपी नृपाचा परम मित्र तो । कपट विपुल अत्यंत जाणतो ॥
सुत शत, दहा तयाचे भ्राते । खल अति अजय देव-दुखदाते ॥
पूर्विंच नृप रणिं झाला वधता । विप्र संत सुर दुःखी बघतां ॥
तो खल पूर्विल वैरा स्मरुनी । तपी नृपासि मंत्र करि मिळुनी ॥
योजिति रिपुक्षयार्थ उपाया । भावी-वश मुळिं नुमजे राया ॥

दो. :- तेजस्वी अरि एक जरि क्षुद्र न गणणें त्यास ॥
अझुन राहु शिरमात्र जरि छळतो रविचंद्रास ॥ १७० ॥

त्याची आज्ञा मानून राजा झोपला तो कपटी ज्ञानी जाऊन आसनावर बसला. ॥ १ ॥ भूपती दमलेला, थकलेला होता त्यामूळे त्याला अतिशय झोप आली पण ( त्या वंचकाला ) झोप कशी येणार ? ( कारण ) त्याला चिंता जाळीत होती. ॥ २ ॥ तोच वराह रुपाने ज्याने प्रतापभानू - राजाला भुलविले होते तो कालकेतू ( निशाचर ) तेथे आला. ॥ ३ ॥ तपस्वी नृपाचा परम मित्र होता तो, व तो पुष्कळ कपट जाणणारा होता. ॥ ४ ॥ त्याचे अति दुष्ट, अति अजय, व देवांना दु:ख देणारे शंभर मुलगे, आणि दहा भाऊ होते. ॥ ५ ॥ विप्र, संत व देव ( त्यांच्यामुळे ) दु:खी होतात असे पाहून प्रतापभानूने पूर्वीच त्यांना युद्धात मारले होते. ॥ ६ ॥ त्या खलाला पूर्ववैराचे स्मरण झाले व त्याने तपस्वी नृपाला मिळून त्याचेशी सल्लामसलत केली ॥ ७ ॥ त्या दोघांनी मिळून शत्रूचा ( नाश ) क्षय करण्याचा उपाय योजला, पण प्रारब्धवशाने राजाला काही ते ओळखता आले नाही. ॥ ८ ॥ तेजस्वी शत्रू एकटा एकच असला तरी त्याला क्षूद्र समजू नये राहू शिरमात्र राहीला असला तरी अजूनही तो रविचंद्रांना छळतोच आहे ॥ दो० १७० ॥

तापस नृप निज मित्रा पाहे । मुदित उठुनि भेटे सुख लाहे ॥
मित्रा कथा निवेदी सकला । सुखा पावुनि राक्षस वदला ॥
तुम्हिं माझा उपदेश मानिला । नृपति! रिपुस मी अतां मारिला ॥
स्वस्थनिजा सब चिंता त्यागुनि । शमवि कफा विधि सुंठी वाचुनि ॥
कुळासहित नृपमूळ उपटूनी । चौथें दिनिं भेटेन येउनी ॥
तापस नृपा बहुत परितोषी । निघे महाकपटी अति रोषी ॥
रविप्रताप वाजिसमेता । क्षणें पोचवी रजनिकेता ॥
राणी-सन्निध नृपा निजविला । तुरग नीट हयगृहीं खुटविला ॥

दो. :- पुरोहिता मग नृपतिचे तो आणी चोरून ॥
लपवुनि ठेवी गिरि गुहें मायें मति मोहून ॥ १७१ ॥

तपस्वी नृपाने मित्राला पाहीला व आनंदाने उठून त्याला भेटला व सुखी झाला ॥ १ ॥ त्याने सगळी हकीकत त्याला सांगीतली तेव्हा तो राक्षस सुखी होऊन म्हणाला की ॥ २ ॥ तुम्ही माझा उपदेश मानून त्याप्रमाणे केलेत तरी आता हे राजा ! मी शत्रूला मारले ( असे समजा ) ॥ ३ ॥ आता सर्व चिंता सोडून तुम्ही स्वस्थ निजा कारण की दैवानेच सुंठीवाचून खोकला गेला ( असे समजा ) ॥ ४ ॥ राजाचा कुळासह संमूळ उच्छेद करुन चौथ्या दिवशी मी तुम्हाला भेटेन ॥ ५ ॥ ( नंतर ) तपस्वी नृपास बहुत परितुष्ट करुन तो महाकपटी व अति कोपी कालकेतू त्वरेने निघाला ॥ ६ ॥ प्रतापभानूला त्याच्या घोड्यासहित एका क्षणात राजवाड्यात नेऊन पोचविला ॥ ७ ॥ राणीच्या जवळ त्याला निजलेलाच ठेवला व घोड्याला पागेत नेऊन ( त्याच्या जागेवर ) खुंटाशी बांधला ॥ ८ ॥ मग राजाच्या पुरोहिताला चोरुन नेऊन मायेने त्याची बुद्धी मोहित करुन एका डोंगराच्या गुहेत लपवून ठेवला. ॥ दो० १७१ ॥

आपण घेइ पुरोहित रूपा । त्याचे शेजे निजे सुरूपा ॥
भूप पहाटे पूर्विंच जागे । बघुन भवन विस्मय करुं लागे ॥
मग मुनि-महिमा मनिं अनुमानी । गुपचुप उठे किं नुमजे राणी ॥
त्याच वाजिवर जाइ वनासी । न कळे पुरनर नारि कुणासी ॥
प्रहरिं दोन ये नगरिं भूप तो । गृहिं गृहिं उत्सव गजर खूप तों ॥
पडे पुरोहित जैं आलोकीं । स्मरुनि कार्य नृप चकित विलोकी ॥
नृपा तीन दिन युग सम गमती । कपटी-मुनि-पदिं लीन नृप-मती ॥
समजुनि समय पुरोहित आला । सांगे कृत संकल्प नृपाला ॥

दो. :- गुरुस ओळखुनि मुदित नृप भ्रमवश नुरे विचार ॥
नियुत निमंत्रित विप्रवर शीघ्र सहित परिवार ॥ १७२ ॥

नंतर कालकेतूने स्वत: पुरोहिताचे रुप घेतले व त्या पुरोहिताच्या सुंदर शेजेवर जाऊन झोपला. ॥ १ ॥ राजा प्रतापभानू पहाट होण्यापूर्वीच जागा झाला व आपण आपल्या राजवाड्यात आहोत असे दिसताच त्याला फार आश्चर्य वाटले ॥ २ ॥ व हा सर्व मुनीचा महिमा आहे असे अनुमान त्याने केले. नंतर राणीला कळू नये म्हणून गुपचूप उठला. ॥ ३ ॥ आणी त्याच घोड्यावर बसून पुन्हा वनात गेला; पण नगरातील स्त्रिया, पुरुषादी कोणालाही कळले नाही.॥ ४ ॥ दोन प्रहरी राजा नगरात परत आला; तेव्हा घरोघर ( अभिनंदनाचे ) उत्सव व खूप वाद्यगजर सुरू झाला. ॥ ५ ॥ पुरोहित दृष्टीस पडताच ( त्या ) कार्याची आठवण होऊन राजा चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागला ॥ ६ ॥ ते तीन दिवस राजाला युगासारखे गेले व त्याची मती त्या काळात कपटी मुनीच्या चरणी लीन होऊन राहीली होती. ॥ ७ ॥ पूर्वी ठरविल्याप्रमाणे पुरोहित योग्य वेळी राजाकडे आला व ठरविल्याप्रमाणे त्या सर्व गुप्त गोष्टी राजाला सांगितल्या. ॥ ८ ॥ ( त्याबरोबर ) हेच आपले ( नवे ) गुरु आहेत हे ओळखून राजाला आनंद झाला; भ्रमाला बळी पडल्यामुळे विचार राहीला नाही व लगेच एक लक्ष सत्पात्र ब्राह्मणांना परिवारासहित निमंत्रणे पाठविली. ॥ दो० १७२ ॥

पुरोहितें त्या पाक बनविला । षड्रस चारिपरीं श्रुतिं कथिला ॥
तो निर्मी मायामय पाका । अगणित पक्वान्नादिअक् शाका ॥
विविध मृगांचें आमिष रांधी । विप्रमांस खल तयांत सांधी ॥
विप्र सर्व आणवि जेवाया । सादर बसवी क्षालुनि पायां ॥
भूप वाढुं लागे तो जेव्हां । गगन-गिरा अशि झाली तेव्हां ॥
विप्रवृंद उठुनी गृहिं जावें । महा हानि हें अन्न न खावें ॥
असे रांधिले ब्राह्मण मांस । विप्र उठति ठेउनि विश्वास ॥
भूप विकल मति भुले भ्रमानें । भावी-वश वच ये न मुखानें ॥

दो. :- वदले विप्र सकोप तैं केला नाल्प विचार ॥
जा रजनीचर हो नृपा! मूढा सह परिवार ॥ १७३ ॥

त्या पुरोहिताने श्रुतीत वर्णन केल्याप्रमाणे षडरस व चारी प्रकारचे अन्न शिजविले. त्याने नाना प्रकारची अगणित पक्वान्ने, भाज्या, चटण्या वगैरे सर्व पदार्थ निर्माण केले. पण ते सर्व मायामय बनविले ॥ २ ॥ त्याने निरनिराळ्या पशुंचे मास शिजविले पण त्या दुष्टाने त्यात ब्राह्मणांचे मांसही मिसळले ॥ ३ ॥ सर्व विप्रांना बोलावून आदराने त्याचे पाय धुवून त्यांस ( पाटांवर बसविले. ) ॥ ४ ॥ व प्रतापभानू राजा ( स्वत:च ) जेव्हा वाढू लागला तेव्हा आकाशवाणी झाली ॥ ५ ॥ अहो ब्रह्मवृंदहो, तुम्ही भराभर उठून घरी जा, महाहानी होईल. हे अन्न खाऊ नका. ॥ ६ ॥ ( कारण ) ब्राह्मणांचे मांस शिजवले गेले आहे. ( त्या आकाशवाणीवर ) विश्वास ठेऊन ब्राह्मण भराभर ( आसनावरुन ) उठले. ॥ ७ ॥ राजा व्याकूळ झाला व त्याची बुद्धी भ्रमाने भुलली व प्रारब्धवशात त्याच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. ॥ ८ ॥ त्या ब्राह्मणांनी काहीच विचार केला नाही व क्रोधाने म्हणाले की राजा ! मूढा ! तू आपल्या परिवारासह जाऊन निशाचर हो ! ॥ दो० १७३ ॥

क्षत्रबंधु ! तूं विप्र आणले । भ्रष्टविण्यास कुळांसह सगळे ॥
ईश्वर अमचा धर्म राखि रे । परिवारासह लया जा किं रे ॥
नाश तुझा वर्षामधिं होइल । कुलिं जलदाता कोणि न राहिल ॥
श्रवुनि शाप नृप भयें सुविव्हळ । पुन्हा गिरा नभिं झाली निर्मळ ॥
नृप विचारें दिला हि शाप न । केला कांहिं नृपें अपराध न ॥
चकित विप्र परिसुनि नभवाणी । गेला भूपति भाणस-ठाणीं ॥
तिथें अशन ना द्विज बल्लव तो । फिरला नृप शोकें विव्हळतो ॥
विप्र कानिं सब घटना घाली । व्याकुळ पडे अवनिवर खालीं ॥

दो. :- भूपति भावी ना टळे जरि न दोष तव कांहिं ॥
विप्रशाप अति घोर, तो यत्‍नें नव्हें मृषाहि ॥ १७४ ॥

अरे क्षत्रियाधमा ! सगळ्या ब्राह्मणांना कुळासहित भ्रष्ट करण्यासाठी ( बोलावून ) आणलेस ॥ १ ॥ ( पण ) ईश्वराने आमचा धर्म राखला तुझा परिवारासह नाश होवो. ॥ २ ॥ एका वर्षात तुझा नाश होईल व ( सत्यकेतूच्या ) कुळात कोणी जलदाता राहणार नाही. ॥ ३ ॥ शाप ऐकून राजा भयाने अत्यंत विव्हळ झाला, तेव्हा पुन्हा निर्मळ आकाशवाणी झाली की, ॥ ४ ॥ विप्रांनो, तुम्ही शाप दिलात तो अविचाराने, कारण यात राजाचा काही सुद्धा अपराध नाही ॥ ५ ॥ ती आकाशवाणी ऐकून सर्व ब्राह्मण चकित झाले व राजा स्वयंपाकघरात ( भाणस - ठाणीं ) गेला ॥ ६ ॥ तिथे त्यास काहीच अन्न दिसले नाही, की तो स्वयंपाक करणारा स्वयंपाकीही दिसला नाही राजा परत फिरला व शोकाने विव्हळूं लागला ॥ ७ ॥ घडलेली सर्व हकीकत त्याने विप्रांच्या कानी घातली व व्याकूळ होऊन जमिनीवर खाली पडला ॥ ८ ॥ राजा जे होणार ते ( भावी ) कधी टळत नाही. तुझा काही सुद्धा दोष नसला तरी विप्रांचा शाप अति घोर असतो व यत्‍न करुनही तो खोटा होऊ शकत नाही ॥ दो० १७४ ॥

असें वदुनि भूदेव परतले । वृत्त सकल पुरजनां समजलें ॥
दुःखी देति दोष दैवाला । विरचित हंस रची काकाला ॥
भवनिं पोचवी पुरोहिताला । असुर खबर दे तपी नृपाला ॥
दुष्टें सकलां पत्र धाडलें । सैन्य सजुनि सब भूप धावले ॥
डंके पिटुनि नगर वेढलें । नित्य विविध रणकुंड पेटलें ॥
लढति सुभट सब करुनी करणी । सानुज नृप पडला रणिं धरणीं ॥
सत्यकेतु-कुळिं कुणि ना राही । विप्रशाप कधिं ठरे मृषा ही ॥
जितरिपु नृप ते नगरा वसवुनि । निजपुरिं गेले जय यश पावुनि ॥

दो. :- भरद्वाज बघ होइ जैं ज्यास विधाता वाम ॥
रेणु मेरुसम जनक यम तया व्यालसम दाम ॥ १७५ ॥

असे सांगून सर्व ब्राह्मण परत गेले तेव्हा हे वृत्त सर्व पुरजनांना मिळाले ॥ १ ॥ सर्व दु:खी झाले व दैवाला दोष देऊं लागले की तो तयार करीत होता हंस पण त्याने केला कावळा ॥ २ ॥ तिकडे त्या कालकेतू असुराने पुरोहिताला त्याच्या घरी पोचविला व तापसी नृपाला सर्व हकीकत सांगीतली. ॥ ३ ॥ त्या दुष्ट राजाने सगळ्या राजांना पत्रे पाठविली व ते सगळे आपापले सैन्य सुसज्ज करुन त्वरेने आले. ॥ ४ ॥ त्यांनी डंके पिटून प्रतापभानूच्या नगराला वेढा दिला तेव्हा रोजच्या रोज विविध प्रकारांनी तुंबळ लढाया सुरु झाल्या ॥ ५ ॥ पण प्रतापभानूचे सर्व उत्तम वीर योद्धे शौर्य गाजवून धारातीर्थी पडले आणि भावासह प्रतापभानू राजा रणांगणात पडला. ॥ ६ ॥ सत्यकेतूच्या कुळात कोणीही पुरुष वाचला नाही, विप्र शाप कधीतरी खोटा ठरेल काय ? ॥ ७ ॥ त्या सर्व राजांनी शत्रूला जिंकून ते नगर बसविले व जय आणि यश मिळवून ते सर्व ( राजे ) आपापल्या नगरास गेले ॥ ८ ॥ भरद्वाजा, असे पहा की, ज्यावेळी ज्यास दैव प्रतिकूल होते, त्यावेळी त्याला धुळीचा कण मेरु पर्वतासारखा, जनक यमासारखा व पुष्पहार सर्पासारखा होतो. ॥ दो. १७५ ॥

श्रुणु मुनि यथासमय तो राजा । झाला निशिचर सहित समाजा ॥
दश शिर तया वीस भुज दंड हि । रावण नाम वीर बलि-वंद्य-हि ॥
भूपानुज अरिमर्दन नाम । कुंभकर्ण झाला बलधाम ॥
सचिव धर्मरुचि होति जयाला । बंधु विमातृज लघु तो झाला ॥
नाम बिभीषण विदित जनांनां । विष्णुभक्त जो निधि विज्ञाना ॥
जे नृप-सुत-सेवक ते सगळे । घोर निशाचर अगणित बनले ॥
कामरूप नानाविध दुर्जन । कुटिल महा अविवेकी भीषण ॥
कृपारहित हिंसक सब पापी । वदवे ना, विश्वा परितापी ॥

दो. :- जन्मुनि अमल पुलस्त्यकुळिं अनुपम पूत अमूप ॥
विप्रशापवश जाहले ते सगळे अघ रूप ॥ १७६ ॥

रावणावतार व रावण चरित्र - भरद्वाज मुनी ! ऐका, तो प्रतापभानू राजा योग्य वेळी आपल्या सर्व परिवारादी समाजासह निशाचर झाला. ॥ १ ॥ त्याला दहा डोकी व विस भुजदंड होते त्याचे नाव रावण होते व तो बलवंतांना वंद्य असा वीर झाला.॥ २ ॥ राजाचा धाकटा भाऊ जो अरिमर्दन - तो बलधाम कुंभकर्ण झाला. ॥ ३ ॥ ( राजाचा ) धर्मरुची नावाचा जो सचीव होता व ज्याला धर्माची रुची होती तो धाकटा सावत्र भाऊ झाला. ॥ ४ ॥ त्याचे नांव बिभीषण, तो विष्णुभक्त व विज्ञान - निधी होता. हे सर्वांना माहीत आहे. ॥ ५ ॥ ( प्रतापभानू ) राजाचे जे पुत्र, सेवक वगैरे होते ते सगळे अगणित निशाचर झाले ॥ ६ ॥ ते सगळे कामरुप, दुर्जन, कुटील, अती अविवेकी, महाभीषण व नाना प्रकारांचे होते. ॥ ७ ॥ ते सर्व निर्दय, हिंसाप्रिय, पापी व विश्वाला इतका त्रास, संताप देणारे झाले की काही बोलता येत नाही. ॥ ८ ॥ जरी ते अनुपम, निर्मळ, व अतीपवित्र अशा पुलस्त्यकुलांत उत्पन्न झाले तरी विप्रांच्या शाप - सामर्थ्यामुळे अगदी पापरुप बनले. ॥ दो० १७६ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP