॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ सुंदरकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ४ था



Download mp3

जात महाध्वनि गर्जे भारी । स्रवति गर्भ तैं निशिचर नारी ॥
आला पारहि सिंधु लंघुनी । शब्द किल किला वानर-कानीं ॥
हर्षति सर्व बघुनि हनुमाना । कपि नव जन्म म्हणति झाला ना ॥
मुख प्रसन्न तनु तेजें भ्राजे । साधि रामचंद्राचीं काजे ॥
भेटुनि होति सुखी सब भारी । मरत मीन मिळतां जसं वारी ॥
निघती हर्षित रघुपति पाशीं । पुसत वदत नव इतिहासासी ॥
सकलहि ते मग मधुवनिं जाती । अंगद संमत मधु फल खाती ॥
जेव्हां रक्षक वर्जुं लागले । मुष्टिमार मिळतां सब पळले ॥

दो :- जाउनि वर्दी देति सब वन उजाडि युवराज ॥
हर्ष सुकंठा, येति कपि कीं करुनी प्रभुकाज ॥ २८ ॥

जाताना महाध्वनीने भारी गर्जना केली तेव्हा (तो ध्वनी ऐकताच) निशाचर स्त्रियांचे गर्भ गळून पडले. ॥ १ ॥ सागर ओलांडून पार आला तेव्हा किलकिला शब्द कपींच्या कानी आला. ॥ २ ॥ हनुमंताला येताना पाहून सर्वांना हर्ष झाला व ते कपी आपसात म्हणतात की आज आपला नवा जन्म झाला, नाही का ? ॥ ३ ॥ (दुरून पाहिला तो मुख प्रसन्न दिसले, शरीर तेजाने प्रकाशत असलेले दिसले (त्यावरून सर्वांनी ओळखले की) हा रामकार्य पूर्ण करून आला आहे. ॥ ४ ॥ (इतक्यात हनुमान भूमीवर उतरला सुद्धा) तेव्हा सर्वजण त्यला मिठ्या मारून भेटले, व मरत असलेल्या माश्याला पाणी मिळल्यावर तो सुखी व्हावा तसे सारे सुखी झाले. ॥ ५ ॥ रघुपतीपाशी सकल कपी आले - नंतर सगळे मोठ्या हर्षाने रघुपतीकडे जाण्यास निघाले. जाता जाता नवा इतिहास वानर विचारू लागले व हनुमंत सांगत गेला. ॥ ६ ॥ मग ते सगळे (सुग्रीवाच्या खास) मधुवनांत गेले व अंगदाच्या संमतीने मध व फळे खाऊं लागले. ॥ ७ ॥ रक्षक हरकत घेऊ लागताच त्यांना मुष्टीमार मिळाला व त्या सर्व रक्षकांनी पळ काढला व सुग्रीवास अंगदाची कागाळी सांगण्यास गेले. ॥ ८ ॥ त्या (दधिमुखादि) सर्वांनी जाऊन वर्दी दिली की युवराजाने मधुवन उजाड करून टाकले आहेत. ॥ दो. २८ ॥

सीता शोध जर न पावते । मधुवन-फळें किं खाऊं शकते ।
मनिं यापरिं करि विचार राजा । तों आले कपि सहित समाजा ॥
येति सकल शिर नमविति पायां । भेटे प्रेमें अति कपिराया ॥
पुसलें कुशल कुशल बघुं पायां । रामकृपें कृत विशेष कार्यां ॥
नाथ ! करी कार्या हनुमानहि । रक्षित सकल कपींचे प्राणहि ॥
भेटे पुन्हां सुकंठ तयाला । कपिसह रघुपतिकडे निघाला ॥
रामें कपिनां येत विलोकित । कृतकार्यहि मनिं विशेष हर्षित ॥
स्फटिक शिळे दो बंधू बसले । कपि सब जाउनि पाया पडले ॥

दो :- भेटति सकलां प्रेमें रघुपति करुणापुंज ॥
पुसति कुशल नाथा अतां कुशल बघुनि पदकंज ॥ २९ ॥

सीतेचा शोध जर लागला नसता तर (वानरदूत) मधुवनातील फळे कधीतरी खाऊ शकते काय ? (कधीच नाही, अगदी अशक्य) ॥ १ ॥ याप्रमाणे राजा मनात विचार करीत आहे तोच युवराजादि कपि सर्व कपिसमाजासहित येऊन पोचले सुद्धा. ॥ २ ॥ येऊन सगळे मस्तक नमवून पायांना नमस्कार करू लागले व कपिराजा सगळ्यांना (जे जसे आले त्यांना) अति प्रेमाने गळ्यात गळा घालून भेटला. ॥ ३ ॥ सुग्रीवाने कुशल विचारले (तेव्हा कपी म्हणाले की) आपले पाय दिसले म्हणूनच कुशल आहे. रामकृपेने विशेष कार्य केले गेले. ॥ ४ ॥ नाथ ! सर्व कार्य हनुमंतानेच केले व त्यानेच सर्व कपींचे प्राण वाचविले. ॥ ५ ॥ (तेव्हा ते ऐकून) सुग्रीव त्याला पुन्हा भेटला व कपीसहित रघुपतीकडे निघाला. ॥ ६ ॥ रामचंद्रांनी जेव्हा कपींना कृतकार्य होऊन विशेष हर्षित (होऊन) येत असलेले पाहिले तेव्हाच त्यांना मनात विशेष हर्ष झाला. ॥ ७ ॥ दोघे भाऊ स्फटिक शिळेवर बसले. सर्व कपी जाऊन पाया पडले. ॥ ८ ॥ करुणासागर रघुपति सगळ्यांना प्रेमाने भेटले व कुशल विचारले. (सर्व म्हणाले की) नाथा ! आपले चरणकमल दिसले, आता कुशल आहे. ॥ दो. २९ ॥

म्हणे जांबवान् श्रुणु रघुराया । ज्यावर करतां नाथ तुम्हिं दया ॥
त्यास सदा शुभ कुशल निरंतर । सुर नर मुनी प्रसन्न तयावर ॥
तो विजयी विनयी गुण सागर । त्रिभुवनिं सुयश तयाचें भास्वर ॥
प्रभूकृपें झाले सब काज । जन्म आमचे सुफलहि आज ॥
नाथ पवनसुत-कृत-जी करणी । ती न वर्णवे सहस्रवदनीं ॥
पवनतनयकृत सुंदर चरितें । जांबवंत सांगति रघुपतितें ॥
श्रवत कृपानिधि मनिं अति रुचले । मग हर्षें हनुमान् हृदिं धरले ॥
वदा तात कशि तरी जानकी । राहे रक्षी निज प्राण कीं ॥

दो :- नाम पाहरा रात दिन तुमचें ध्यान कपाट ॥
लोचन निजपदिं यंत्रिलें जाण्या प्राण किं वाट ? ॥ ३० ॥

वैदेही कुशलाला वदले -
जांबवान म्हणाला की रघुनाथा ऐका. नाथ ! तुम्ही ज्याच्यावर दया करतां, त्याचे सदा कल्याण व निरंतर कुशलच असते व सुरनरमुनी निरंतर त्यावर प्रसन्न असतात. ॥ १-२ ॥ तोच विजयी, विनयी व गुणसागर होतो आणि त्याचे सुयश त्रिभुवनी प्रकाशते. ॥ ३ ॥ प्रभो ! आपल्या कृपेनेच सर्व कार्य झाले पण आज आमचे जन्म सुफल झाले. ॥ ४ ॥ नाथ ! पवनसुताने जी करणी केली ती हजारो मुखांनीही वर्णन करता येणार नाही. ॥ ५ ॥ नंतर जांबवनाने पवनतनयाचे सुंदर चरित्र रघुपतीस सांगितले. ॥ ६ ॥ ऐकत असताच ते चरित्र व हनुमान कृपानिधीच्या मनास फार आवडले व (चरित्र ऐकून झाल्यावर) मग हनुमंतास हर्षाने हृदयाशी धरले. ॥ ७ ॥ तात ! सांग पाहू की जानकी राहते तरी कशी व आपल्या प्राणांचे रक्षण करते तरी कशी ? ॥ ८ ॥ हनुमान सांगतात - आपले नाम रात्रंदिवस पहार्‍यावर आहे, तुमचे ध्यानरूपी कपाट सदा लागलेले आहे, नेत्र स्वतःच्या पायावर खिळले आहेत; तेव्हा प्राण जाण्यास वाट आहेच कोठे ? ॥ दो. ३० ॥

निघतां चूडामणि मज दिधला । घेउनि रघुपतिनीं हृदिं धरला ।
नाथ ! युगल लोचनिं भरि वारी । वदली कांहीं जनक कुमारी ॥
अनुजासह धरुनी प्रभुचरणां । दीनबंधु प्रणतार्ती-हरणा ॥
मन-तन-वचनें पदिं अनुरक्ता । नाथ ! कवण अपराधे त्यक्ता ॥
अवगुण एकच मान्य मम मना । प्राण न करिति वियोगें गमना ॥
गुन्हा नाथ ! नेत्रांचा सगळा । प्राणां जातां करिति अडथळा ॥
विरहवन्हि, तनु तूल, समीर- । श्वासहि, जळतें क्षणें शरीर ॥
वर्षति नेत्र जला स्वहिताला । तनु न जाळवे विरहदवाला ॥
सीता-विपदा अती विशाला । बरें न वदणें, दीनदयाला ॥

दो :- निमिष निमिष करुणानिधे प्रभो कल्पसें गाळि ॥
स्वभुजबळें खळ-दळ वधुनि चला आणुं तात्काळिं ॥ ३१ ॥

हनुमान म्हणाले - निघताना मजजवळ चूडामणी दिला. तेव्हा रघुपतींनी तो घेऊन हृदयाशी धरला. ॥ १ ॥ नाथ ! जनककुमारीने दोन्ही डोळ्यात पाणी आणून सांगितले; ॥ २ ॥ अनुजासह प्रभूचे पाय (अशा रीतीने) धरून सांग की हे दीनबंधू ! हे प्रणतांची दुःखे हरण करणार्‍या प्रभो - ॥ ३ ॥ मनाने, शरीराने व वाणीने आपल्या चरणी अनुरक्त असून माझा त्याग केला आहे तो कोणत्या अपराधामुळे ? ॥ ४ ॥ माझ्या मनाला तर माझा एकच अवगुण मान्य आहे, तो हा की, वियोग होताच प्राण गेले नाहीत. ॥ ५ ॥ (पण) नाथ ! सगळा या माझ्या डोळ्यांचा अपराध आहे. कारण प्राण जात असताना ते अडथळा करतात (जाऊ देत नाहीत). ॥ ६ ॥ विरहाग्नी भडकला आहे, देह कापूस झाला आहे, श्वास हा जोराचा वारा वाहतो आहे, तेव्हा एका क्षणात शरीर जळून गेले असते. ॥ ७ ॥ पण करणार काय, हे स्वार्थी डोळे स्वतःच्या हितासाठी पाण्याची वृष्टी करीत आहेत त्यामुळे विरहरूपी वणवा तनूला जाळू शकत नाही. ॥ ८ ॥ (हनुमान म्हणाले) सीतेची विपत्ती अति विशाल आहे. दीनदयाळा - तिचे आणखी वर्णन न करणेच बरे (मला करवत नाही). ॥ ९ ॥ (थोडक्यांत सांगायचे म्हणजे) हे करुणसागरा ! ती एकेक निमिष कल्पा कल्पा सारखे काढीत आहे. तरी रावण व निशाचरांना ठार करून तत्काळ तिला आणावे (आणूं या). ॥ दो. ३१ ॥

श्रवुनि सिता दुःखां सुख-अयना । जल भरलें प्रभु-राजिव-नयना ॥
मम गति तनुमनवचनें ज्यासी । शिवे स्वप्निं कधिं विपत्ति त्यासी ॥
म्हणे हनू प्रभू ! तीच विपत्ती । स्मरण भजन तव यदा न घडती ॥
प्रभो ! निशाचर कथा काय ती । रिपु जिंकुनि जानकी आणती ॥
ऐक कपे ! तुज सम उपकारी । नहि कुणि सुर-नर-मुनि-तनुधारी ॥
करुं तव केवी प्रत्युपकारा । मम मन कुंठित करित विचारा ॥
श्रुणु सुत ! अनृण तुझा मी नाहीं । करुनि विचारा बघत मनां ही ॥
पुनः पुन्हां सुरपाल विलोकति- । कपिस, नेत्रिं जल तनु पुलकित अति ॥

दो :- प्रभु-वच परिसुनि बघे मुख तनु हर्षित हनुमंत ॥
प्रेमाकुल पायां पडे त्राहि ! त्राहि ! भगवंत ॥ ३२ ॥

सीतेचे दुःख श्रवण करून सुखधाम प्रभूच्या राजीव नेत्रांत जल भरले. ॥ १ ॥ आणि प्रभू म्हणाले की, शरीराने, मनाने व वाणीने ज्याला माझ्याशिवाय अन्य गति नाही. त्याला विपत्ती कधी स्वप्नात तरी शिवेल काय ? ॥ २ ॥ हनुमान म्हणाले की प्रभू ! जेव्हा तुमचे स्मरण भजनादि घडत नाही तेच संकट, तीच विपत्ती. ॥ ३ ॥ प्रभो ! त्या निशाचरांची कथा ती काय ? आपण शत्रूला जिंकून, चला जानकीला सत्वर आणूं. ॥ ४ ॥ कपि ऐक ! तुझ्यासारखा माझ्यावर उपकार करणारा सुर-नर-मुनी इत्यादि देहधारकांत सुद्धा कोणी नाही. ॥ ५ ॥ तुझ्या उपकारांची फेड मी कशी करू ? कारण की काय केले असता प्रति उपकार करता येईल याचा विचार करू लागलो म्हणजे माझ्या मनाची गति कुंठीत होते (उपाय, मार्ग सुचत नाही.) ॥ ६ ॥ हे सुता ! ऐक, मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, असे मनात विचार करत उठले. ॥ ७ ॥ सुररक्षक असूनसुद्धा राम वारंवार हनुमंताच्या तोंडाकडे पाहू लागले व त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि देह अति पुलकित झाला. ॥ ८ ॥ प्रभूचे भाषण ऐकून हनुमंताने भगवंताच्या मुखाकडे व शरीराकडे पाहिले व त्याच्या देहावर रोमांच उभे राहिले व प्रेमाकुल होऊन "भगवंता रक्ष ! रक्ष !’ असे म्हणून पायावर लोळण घेतली. ॥ दो. ३२ ॥

पुनः पुन्हां प्रभु उठवूं पाहत । प्रेम मग्न उठुं नये चि वाटत ॥
प्रभु-कर-पंकज कपिचे शीर्षां । स्मरत दशा उन्मनि गौरीशा ॥
सावधान मन करुनी शंकर । लागति सांगुं कथा अति सुंदर ॥
प्रभु उठवुनि कपिला हृदिं धरिती । परम निकट कर धरुनि बसविती ॥
वद कपि रावण-पालित लंका । दुर्ग जाळिती कशि अति बंका ॥
प्रभू प्रसन्न बघुनि हनुमान । वदला वचन विगत-अभिमान ॥
मोठा शाखामृग पुरुषार्थ हि । शाखे शाखे उडती व्यर्थ हि ॥
लंघुनि सिंधु कनकपूर होळी । निशिचर-गण-वध वन खांडोळी ॥
तो प्रताप रघुपति तव अवघा । प्रभुता नाथ ! न अल्प मम बघा ॥

दो :- प्रभु त्या दुर्गम कांहि ना ज्याला तुम्हिं अनुकूल ॥
प्रभावें हि तव जाळिल वडवाग्निस खलु तूल ॥ ३३ ॥

प्रभू वारंवार हनुमंतास उठवूं पहात आहेत पण प्रेममग्न झाल्याने उठू नये असे त्यास वाटत आहे. ॥ १ ॥ प्रभूंनी आपले करकमल त्याच्या मस्तकावर ठेवले. त्या दशेचे स्मरण होताच गौरी शंकरांना उन्मनी दशा प्राप्त झाली. ॥ २ ॥ मग मन सावध करून शंकर अति सुंदर कथा सांगू लागले. ॥ ३ ॥ प्रभूंनी कपीला उठवून हृदयाशी धरला व नंतर हाताला धरून आपल्या अत्यंत जवळ बसविला. ॥ ४ ॥ (व विचारले की) हे कपि ! अति दुर्गम व अति बिकट अशी रावण पालित लंका तूं जाळलीस तरी कशी ? ॥ ५ ॥ प्रभू प्रसन्न आहेत असे पाहून हनुमान अभिमानरहित होऊन बोलला; ॥ ६ ॥ शाखामृगांचा हा मोठाच पुरुषार्थ की झाडाच्या एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर अशा व्यर्थ उड्या मारतात. ॥ ७ ॥ सागर लंघून सोन्याच्या नगरीची होळी झाली, निशाचर समूहांचा वध केला गेला व वनाचा विध्वंस केला गेला. ॥ ८ ॥ रघुपती ! तो सगळा तुमचाच प्रताप होय. नाथ त्यात माझी प्रभुता, पुरुषार्थ अल्पही नाही. ॥ ९ ॥ प्रभू ! तुम्ही ज्याच्यावर कृपा करता त्याला या जगात दुर्गम, दुष्प्राप्य असे काहीच नाही. तुमच्या प्रभावानेच खरोखर कापूससुद्धा वडवाग्नीस जाळूं शकेल. ॥ दो. ३३ ॥

नाथ भक्ति अति सुखदायिनी । करुनि कृपा द्या अनपायिनी ॥
परिसुनि परम सरल कपि-वाणी । प्रभु वदले किं तथास्तु भवानी ! ॥
कळला राम स्वभावही ज्या । उमे भजनविण नान्य रुचे त्या ॥
हा संवाद हृदयिं ज्या वसला । तो रघुपति पद भक्ति पावला ॥
प्रभुवच कानिं, वदति कपि वृंद । जय जय जय कृपालु सुखकंद ॥
मग रघुपति बोलावुनि कपिपति । ’करा प्रयाण-तयारी’ सांगति ॥
अतां उशीर कशास करावा । शीघ्र हुकूम कपींनां द्यावा ॥
कौतुक बघुन सुमन बहु वर्षुन । नभिं सुर भवना निघती हर्षुन ॥

दो :- कपि पति वेगें बोलवी आले यूथप-यूथ ॥
नाना वर्ण अतुल बल वानर भल्ल वरूथ ॥ ३४ ॥

नाथ ! अति सुख देणारी व कधी नाश न पावणारी (अनपायिनी) अशी आपली भक्ती माझ्यावर कृपा करून मला द्या. ! १ ॥ कपीची परम सरल वाणी ऐकून भवानी ! प्रभू तथास्तु म्हणाले. ॥ २ ॥ हे उमे ! ज्याला रामस्वभाव कळला त्याला भक्तीशिवाय दुसरे काही रुचत नाही. ॥ ३ ॥ हा संवाद ज्याच्या हृदयात वस्तीस आला तो रघुपती पदभक्ती पावलाच. ॥ ४ ॥ प्रभूचे वचन कानी पडताच सर्व कपि समुदाय ’जयजय कृपालु सुखकंद’ असे म्हणू लागले. ॥ ५ ॥ कटकासहित यथा रघुवीरा घडे आगमन जलनिधी तीर - मग रघुपतींनी कपिपतीला बोलावून सांगितले की आता प्रयाणाची तयारी करा. ॥ ६ ॥ आता उगीच विलंब कशासाठी करायचा, सर्व कपींना लवकर हुकूम द्यावा. ॥ ७ ॥ हे कौतुक पाहून देव पुष्कळ पुष्पवृष्टी करून, हर्षित होऊन आकाशातून आपल्या भवनास चालले. ॥ ८ ॥ कपिपतीने त्वरेने बोलावले तेव्हा वानर सेनापतींचे समुदाय आले. ते वानर व ऋक्ष यांचे समुदाय नाना वर्णाचे व अतुल बलवान होते. ॥ दो. ३४ ॥

प्रभुपद-पंकजिं नमिति शीर्ष । गर्जति भल्ल महाबल कीश ॥
निरखुनि राम सकल कपि सेने । बघती राजीवाक्ष कृपेनें ॥
रामकृपें बळ मिळत कपींद्र । होती पक्षयुत जणूं गिरींद्र ॥
करिति राम हर्षुनी प्रयाणा । होति शकुन सुंदर शुभ नाना ।
सव मंगलमय ज्याची कीर्ती । तया प्रयाणिं शकुन ही नीती ॥
वैदेही प्रभु-प्रयाण जाणत । वामांगे स्फुरुनी जणुं सांगत ॥
शकुन जानकिस जो जो झाला । तो तो अशकुन दशाननाला ॥
निघे कटक कुणि वर्णुं किं शकती । अगणित वानर रीस गर्जति ॥
नख आयुध गिरि पादप धारी । जाति गगनमहिं इच्छा चारी ॥
केसरिनाद ऋक्ष कपि करती । डगमगती दिग्गज चीत्कारती ॥

छं :- चीत्करति दिग्गज कंप भू, गिरिलोल, सागर खळबळे ॥
मनिं हर्षयुत गंधर्व सुर मुनि नाग किंनर दुख टळे ॥
कट्कटति मर्कट विकट भट बहु कोटि कोटी धावती ॥
जयराम प्रबल प्रताप कोसलनाथ गुणगण वानती ॥ १ ॥
सहुं शकत भार न फार अहिपति वार फारहि मोहतो ॥
धरि दशनिं कितिदां कमठ-पृष्ठ कठोर केवीं शोभतो ॥
रघुवीर रुचिर प्रयाण प्रस्थिति जाणुनी अति शोभना ॥
जणुं कमठ-खर्परिं सर्पराज किं लिहित अविचल पावना ॥ २ ॥
दो :- असे कृपानिधि उतरले जाउन सागर-तीरिं ॥
जिथें तिथें फळं भक्षिलीं भला विपुल कपि वीरिं ॥ ३५ ॥

प्रभूच्या चरणकमलांना मस्तक नमवून ते महाबलवान ऋक्ष व वानर गर्जना करू लागले. ॥ १ ॥ रामचंद्रांनी सकल कपिसेनेचे निरीक्षण केले व नंतर राजीव नेत्रांनी एकदा सर्वांकडे कृपेने पाहिले. ॥ २ ॥ रामकृपेचे बळ मिळताच सर्व कपींद्र झाले व जणूं पंख असलेल्या पर्वत राजाप्रमाणे बनले. ॥ ३ ॥ रामचंद्रांनी हर्षाने प्रयाण केले तेव्हा नाना प्रकारचे सुंदर शुभशकुन झाले. ॥ ४ ॥ ज्याची कीर्ति सकल मंगलमय आहे त्याला प्रयाण समयी शुभ शकुन होणारी ही नीति आहे. ॥ ५ ॥ वैदेहीने प्रभूंचे प्रयाण जाणले. वामांगे स्फुरण पावून तीच जणूं सांगत आहेत (असे वाटले). ॥ ६ ॥ जानकीला जो जो शुभ शकुन झाला तो तो अपशकुन दशाननाला झाला. ॥ ७ ॥ सैन्य निघाले - चालू लागले, त्याचे वर्णन कोण करू शकेल, कारण ते अशक्य आहे. अगणित वानर व रीस गर्जना करू लागले. ॥ ८ ॥ नखे हीच त्यांची आयुधे आहेत व त्यांनी वृक्ष व पर्वत हातात घेतले आहेत. ते इच्छेनुसार गमन करणारे, कधी आकाशातून तर कधी कोणी जमिनीवरून चालले आहेत. ॥ ९ ॥ ऋक्ष व वानर सिंहनाद करू लागले व त्यामुळे दिग्गज डळमळू लागून चीत्कार करू लागले. ॥ १० ॥ दिग्गज चीत्कार करू लागले. धरणी कंपायमान झाली, पर्वत डोलू लागले, सागर खवळले, गंधर्व, देव, मुनी, नाग, किन्नर यांना मनात हर्ष झाला; कारण त्यांचे दुःख टळले (असे त्यांस वाटले) विक्राळ मर्कट योद्धे कट्कटा आवाज करीत अनेक कोटी कोटी संख्येने धावू लागले व जयराम प्रबल प्रताप ! जय कोसलनाथ ! अशा गर्जना करून कोसलनाथांचे गुणगान वर्णू लागले. ॥ छं. १ ॥ तो उदार अहि-पती शेष भार सोसू शकेना व पुष्कळ वेळा मोह होऊ लागला तेव्हा तो आपल्या दातांनी कूर्माच्या पाठीला वारंवार धरू लागला. तेव्हा तो कसा शोभू लागला म्हणाल तर रघुपतीच्या सुंदर प्रयाणाची वेळ अति शोभत आहे हे जाणून जणूं शेष ती अविचल पवित्र रीतीने कमठाच्या पाठीवर लिहून ठेवीत आहे असे वाटले ॥ छ. २ ॥ याप्रमाणे जाऊन कृपासागर सागर तीरावर उतरले आणि विपुल भल्ल व कपी वीरांनी जिकडे तिकडे फळे खाण्यास सुरुवात केली. ॥ दो. ३५ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP