॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ७ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

त्रेतायुग एकवार चाले । शंभु कुंभजापाशीं आले ॥
सवें सती जगजननि भवानी । पूजी ऋषि अखिलेश्वर जाणी ॥
रामकथा मुनिवर वाखाणति । श्रवति महेश परम सुख मानति ॥
ऋषि सुंदर हरिभक्ति विचारी । सांगति शंभु मिळुनि अधिकारी ॥
श्रवत कथित रघुपति-गुण-गाथा । वास कांहिं दिन तिथं गिरिनाथा ॥
मुनि-निरोप घेती त्रिपुरारी । निघति भवनिं सह दक्षकुमारी ॥
भूमि-भार-भंजन ते अवसरिं । रघुवंशी अवतरलेले हरि ॥
त्यक्तराज्य पितृवचें उदासी । दंडक वनिं विचरति अविनाशी ॥

दो० :-हृदयीं चिंतित जाति हर दर्शन कसें घडेल ॥
अवतरले प्रभु गुप्त कीं जातां जनां कळेल ॥ ४८ रा ॥
सो. :- शंकर-हृदिं विक्षोभ कळे सतीला मर्म न ॥
तुलसी! दर्शन-लोभ मनिं भय लालुचि विलोचन ॥ ४८ म ॥

सती मोह प्रकरण – एकदा त्रेतायुग चालू असता कुंभज (अगस्ती) ऋषींकडे शंकर गेले ॥१॥ बरोबर सती –जगज्जननी भवानी होती, त्यांना सर्वांचे ईश्वर जाणून ऋषींनी त्याची पूजा केली ॥२॥ मुनिश्रेष्ठांनी रामकथा विस्तारपूर्वक सांगितली व महेशांनी परम सुख मानून ती श्रवण केली ॥३॥ नंतर ऋषींनी सुंदर हरिभक्ती विचारली व उत्तम अधिकारी मिळाल्याने शंभूनी ती सांगितली.॥४॥ रघुपतीच्या गुणकथा ऐकत व सांगत कैलासनाथ काही काळ तेथे राहीले ॥५॥ मग त्रिपुरारी महेशांनी कुंभज मुनींचा निरोप घेतला व दक्षकुमारीसह घरी जाण्यास निघाले.॥६॥ भूमीभार भंजन करणारे, रघुवंशात अवतरलेले हरी(राम) त्याच समयास-॥७॥ पित्याच्या वचनाने राज्य त्याग केलेले, उदासीन व अविनाशी (राम) दंडकवनात विचरत होते.॥८॥ दो. रामचंद्रांचे दर्शन आपणास कसे होईल याचे चिंतन करीत हर चालले आहेत, प्रभू गुप्त रुपाने अवतरले आहेत, आणि मी (दर्शनास) गेले तर सर्व लोकांना रहस्य कळेल ॥दो. ४८॥ या प्रमाणे शंकरांच्या हृदयात विशेष क्षोभ झाला आहे, (पण) त्यातील मर्म सतीला कळले नाही; तुलसीदास म्हणतात दर्शनाचा लोभ तर आहे, पण मन घाबरत आहे, व डोळ्यांना हाव सुटली आहे.॥दो. ४८ म॥

रावण मरण मनुजकरिं याची । प्रभु करुं इच्छिति विधिवाक्‌साची ॥
जाइन ना तर अनुतापावें । करत विचार, न उपाय फावे ॥
होति शोच-वश असे महेश्वर । त्याच समयिं जाउनि दशकंधर ॥
घेई नीच मारीचा संगतिं । कपटकुरग तो बने शीघ्रगतिं ॥
वैदेहीला मूढ हरि छळें । तसा प्रभूचा प्रभाव न कळे ॥
मृगा वधुनि हरि सबंधु वळले । आश्रम बघुनि नयन डबडबले ॥
विरहविकल नर इव रघुरऊ । धुंडित वनिं फिरती द्वय भाऊ ॥
योग वियोग न कधिंहि जयातें । दिसे प्रगटा शुच विरह तयाते ॥

दो० :- अति विचित्र रघुपतिचरित जाणे परम सुजाण ॥
जे मतिमंद विमोहवश धरिति कांहिं हृदिं आन ॥ ४९ ॥

रावणाने मनुष्याच्या हातून मरण्याची याचना केली आहे व प्रभूराम ब्रह्मदेवाची वाणी सत्य करुं पाहत आहेत. (तथापि)॥१॥ (अशी सुसंधी आली असता) जर जाऊन दर्शन घेतले नाही तर नंतर पश्चाताप करीत बसावे लागेल (असे उलट सुलट) विचार करून सुद्धा काही उपाय सापडेना ॥२॥ याप्रमाणे महेश शोकचिंतावश झाले आहेत, त्याच वेळी नीच दशकंठाने तिकडे जाऊन नीच मारीचाला संगतीत घेतला व तो (मारीच) शीघ्रगतीने कपट-मृग बनला ॥३-४॥त्या मूढाने कपटाने वैदेहीला चोरून नेली (त्याचे कारण) प्रभूचा प्रभाव जसा आहे तसा त्यास कळला नाही ॥५॥ मृगाचा वध करून हरी बंधू लक्ष्मणासह परत आले व आश्रम पाहताच त्यांचे डोळे पाण्याने भरले ॥६॥ विरहाने विव्हळणर्‍या (सामान्य) पुरुषासारखे रघुराज सुद्धा व्याकुळ झाले (व मग) दोघे भाऊ वैदेहीला वनात धुंडित फिरू लागले.॥७॥ ज्यांना योग वियोगादी कधी सुद्धा नाहीत त्यानाच विरहाने शोक झालेला प्रगट दिसला.॥८॥ दो.- रघुपतीचे चरित्र अती विचित्र आहे. ते जो जाणतो जाणेल तोच परत सुजाण होय. जे मतिमंद असतात ते विमोहवश होतात व काही निराळीच भावना आपल्या हृदयात धारण करतात.॥दो. ४९॥

शंभु समयिं त्या रामा पाहति । हर्ष हृदयिं अति विशेष पावति ॥
लोचनभर छवि-सिंधुस निरखुनि । परिचय करिति न कुसमय समजुनि ॥
जय सच्चिदानंद जगपावन । चालति वदुनि मनोजविनाशन ॥
शिव पथिं चालत जाति सह सती । घटि घडि कृपनिकेत पुलकती ॥
बघत सती त्या शंभु-दशेसी । उपजे हृदिं संदेह विशेषीं ॥
शंकर जगद्वंद्य जगदीशा । सकल नमिति मुनि नर सुर शीर्षा ॥
ते करिती नृपसुता प्रणामा । वदुनी सच्चित्सुख परधामा ॥
होति मग्न छवि त्याचे पाहुनि । प्रीति अझुनि हृदिं राहि न रोखुनि ॥

दो० :- ब्रह्म निरीह विरज अज व्यापक अकल अभेद ॥
तें किं धरुनि तनु होइ नर जाणति ना ज्या वेद ॥ ५० ॥

त्याचवेळी शंभूनी रामास पाहीले व त्यांच्या हृदयात विशेष हर्ष झाला.॥१॥ त्याचवेळी लावण्य सिंधुस डोळे भरून निरखून पाहीले, पण कुसमय जाणून परिचय (नमस्कार, जाऊन भेटणे इ.) केला नाही ॥२॥ ’जय सच्चिदानंद-जग पावन’ असे म्हणून मदन-विनाशी शिव चालू लागले.॥३॥ शिव सतीसह रस्त्याने चालत जात आहेत व कृपानिकेत शिव पुन:पुन्हा रोमांचित होत आहेत.॥४॥ सतीने ती शंभूंची दशा पाहीली मात्र आणि तिच्या हृदयात विशेष संदेह उपजला ॥५॥ शंकर जगाचे ईश असून ते जगाला वंद्य आहेत, सुर-नर-मुनी इ. सगळेच त्यांना मस्तक नमवितात ॥६॥ त्यांनी राजाच्या पोराला प्रणाम केला व तो सुद्धा सच्चिदानंद परंधाम असे म्हणून ॥७॥ त्याचे रूपलावण्य पाहून प्रेममग्न झाले व प्रीती हृदयात दाबून ठेवण्याचा प्रयत्‍न करीत आहेत तरी अजून सुद्धा हृदयात मावत नाही ! ॥८॥ दो.-जे ब्रह्म मायादी मलरहीत आहे, ज्याच्या ठिकाणी कोणतीही इच्छा नाही, ज्याला जन्मादी विकार नाहीत, जे सर्वव्यापक आहे, जे अंशकलादी विहीन म्हणजे पूर्ण आहे. ज्याच्या ठिकाणी विविध भेद नाहीत व जे वेदांना सुद्धा जाणता येत नाही, ते का देह धरून मनुष्य बनणार आहे? (छे ! छे ! अगदी अशक्य !) ॥ दो० - ५० ॥

विष्णु सुरहिता नरतनु-धारी । तो सर्वज्ञ जसे त्रिपुरारी ॥
तो किं अज्ञसा शोधिल नारी । ज्ञाननिधी श्रीपति असुरारी ॥
मृषा होइ परि शंभुगिरा ना । शिव सर्वज्ञ विदित सर्वांनां ॥
असें संशयीं अमित भरे मन । तिळहि संचरे हृदीं प्रबोधन ॥
प्रगट वदे ना जरी भवानी । हर हृदयस्थित जाणे ज्ञानी ॥
स्त्रीस्वभाव तव सती, ऐकणें । संशय हृदिं न असा कधिं धरणें ॥
कुंभज ऋषि यत्कथेस गाती । मी कथिली मुनिला यद्‍भक्ती ॥
ते रघुवीरचि इष्टदेव मम । सेवित नित्य धीर मुनि निर्मम ॥

छंद० :- ज्या ध्याति योगी सिद्ध संतत धीर मुनि मन शुचि अती
यत्कीर्ति वेद पुराण आगम नेति नेतिहि वानती ॥
तें ब्रह्मा सर्वग राम भुवन-निकाय-पति मायाधनी
अवतीर्ण भक्तहितार्थ निज निजतंत्र अज रघुकुलमणी ॥ १ ॥
सो० :- शिरे न उरिं उपदेश जरि शिव वदले वार किति ॥
कथिती हसुनि महेश हरिमायाबल विदित हृदिं ॥ ५१ ॥

देवांच्या हितासाठी विष्णू नर शरीरधारी झाला (असे मानले) तरी तो सुद्धा त्रिपुरारिंसारखाच सर्वज्ञ आहे ॥१॥ तो (विष्णू) ज्ञानधाम लक्ष्मीचा पती व असुरांचा शत्रू आहे; तो का अज्ञानी माणसा सारखा बायकोला शोधीत भटकेल? (शक्यच नाही) ॥२॥ परंतु शंभूंची वाणी (ही) कधी खोटी असणार नाही, कारण शिव सर्वज्ञ आहेत हे सर्वांना माहीत आहे.॥३॥ अशा प्रकारे सतीचे मन संशयात शिरले तेव्हा मनाला प्रबोध करण्याचा तिने पुष्कळ प्रयत्‍न केला, पण त्याचा जरा सुद्धा प्रवेश हृदयात होईना ! ॥४॥ भवानीने जरी काही उघड सांगितले नाही तरी हृदयस्थित ज्ञानी हराने सर्व काही जाणले (व हरहृदयस्थित रामांनी सर्व काही जाणले हा गूढार्थ) ॥५॥ तेव्हा ते म्हणाले, हे पहा सती ! तुमचा पडला स्त्री-स्वभाव, तरी ऐका-अशा प्रकारचे संशय कधीही उराशी बाळगूं नका ॥६॥ ज्याची कथा कुंभज ऋषींनी सविस्तर सांगीतली व ज्यांची भक्ती मी कुंभज ऋषींना सांगीतली ॥७॥ तेच रघुवीर माझे इष्टदेव आहेत, व धीर निर्मम मुनी त्यांचीच नित्य सेवा करतात.॥८॥ छंद-मुनी, धीर, योगी व सिद्ध, अती निर्मल मनाने ज्याचे ध्यान सतत करीत असतात; ज्याची कीर्ती वेद पुराण व आगम ’नेति नेति’ म्हणून वर्णन करीत असतात तेच सर्वव्यापक ब्रह्म सर्वब्रह्मांड भुवनांचे स्वामी, मायेचे धनी, आत्मतंत्र व अज असलेले राम, निजभक्तांच्या हितासाठी अवतीर्ण झालेले रघुकुल शिरोमणी होत.॥१॥ सो.- याप्रमाणे शिवाने कितीवेळा उपदेश केला तरी तो सतीच्या हृदयात शिरेना, तेव्हा शिवाच्या हृदयात कळले की हे हरिमायेचे बळ आहे, आणि महेश हसून म्हणाले की - ॥सो.५१॥

अति संदेह मनीं तुमचे जर । जाउन कां न परीक्षा घ्या तर ॥
तोंवर वटतळि मी बसतों या । तुम्ही परत मजपाशीं जों या ॥
मोह महाभ्रम जेणें जावा । यत्‍न विवेक-विचारिं करावा ॥
निघे सती शिव-आज्ञा मिळतां । मनिं चिंती कीं काय करुं अतां ॥
करिति शंभु अनुमान इथं मना । दक्षसुताकल्याण दिसत ना ॥
संशय हटति न मी वदतां ही । विधि विपरीत भलाई नाहीं ॥
तेंच घडें जें रामा वाटे । तर्क करुनि कां फोडू फाटे ॥
असें म्हणुनि हरिनामा जपती । प्रभु सुखधामाकडे गत सती ॥

दो० :- घडि घडि हृदयिं विचारुनी धरुनी सीता रूप ॥
होई पुढें त्या गता पथिं जिथुनि येति नरभूप ॥ ५२ ॥

तुमच्या मनात जर अती संदेह असेल तर जाऊन परीक्षाच कां घेत नाही? ॥१॥ तुम्ही जाऊन परत येई पर्यंत मी या वटवृक्षाच्या छायेत बसूने राहतो.॥२॥ (पण) जेणे करून तुमचा महामोह व महाभ्रम जाईल असा काही तरी उपाय तुम्ही विवेकाने विचारपूर्वक करा हं ! ॥३॥ शिवाची आज्ञा मिळताच सती निघाली व मनात विचार करूं लागली की आता काय करावं बरं ! ॥४॥ इकडे शंभूंनी आपल्या मनाशी अनुमान केले की दक्षकन्येचे कल्याण (होईलसे) दिसत नाही.॥५॥ (कारण) मी सांगून सुद्धा संशय ढळत नाहीत त्या अर्थी विधि विपरीत आहे.-चांगले होईलसे दिसत नाही ॥६॥ श्रीरामाला जे वाटत असेल तेच घडणार, (मग उगाच) तर्क करीत बसून (विचारांना) फाटे फोडीत राहण्यात काय अर्थ आहे.॥७॥ असे म्हणून शंकर हरीच्या नामाचा जप करू लागले (तो तिकडे) सती सुखधाम प्रभूकडे गेली (सुद्धा) ॥८॥ दो.- पुन्हा पुन्हा विचार करून व सीतेचे रूप घेऊन ती पुढे झाली व ज्या मार्गाने नरभूपती रघुनाथ (राम) येत होते त्या मार्गाने चालू लागली ॥दो. ५२॥

लक्ष्मण बघति उमाकृत वेषा । चकित पावले भ्रमा विशेषा ॥
कांहिं न वदवे अति गंभीरा । प्रभूप्रभाव विदित मतिधीरा ॥
जाणति सतिछल देवस्वामी । सर्वदर्शि सर्वांतर्यामी ॥
स्मरण जयाचें हरि अज्ञाना । त्या सर्वज्ञ राम भगवाना ॥
कपटें सतीहि भुलवूं पाहे । स्त्रीस्वभावबल बघ बापा! हें ॥
निज मायाबल हृदीं प्रशांसुनि । राम मृदुलवच वदले विहसुनि ॥
प्रभु जोडुनि कर करी प्रणामा । वदुनि तात-नामा निज नामा ॥
मग पुसलें किं कुठें वृषकेतू । एकट फिरा काय वनिं हेतू ॥

दो० :- श्रवुनि रामवच गूढ मृदु उपजे अति संकोच ॥
सती महेशाप्रति सभय निघे हृदयिं अति शोच ॥ ५३ ॥

(भरद्वाज ऐका-) सतीने केलेला वेष लक्ष्मणांच्या द्दष्टीस पडला (तेव्हा) ते अगदी चकित होऊन त्यास विशेष भ्रम झाला.(की सीतामाई परत कशा आल्या इ.) ॥१॥ परंतु लक्ष्मण जात्याच अती गंभीर असल्याने कांही बोलण्याचे धाडस होईना. कारण धीरमती लक्ष्मणास प्रभूचा प्रभाव (चांगला) माहीत आहे.॥२॥ देवांचे स्वामी रामचंद्र यांनी सतीचे कपट ओळखले, कारण ते सर्व दर्शी व सर्वांतर्यामी आहेत. ॥३॥ ज्यांच्या स्मरणाने अज्ञान नष्ट होते त्या सर्वज्ञ भगवान रामाला - ॥४॥ सती कपटाने भुलवूं पाहते ! हे बाबा ! भरद्वाजा ! स्त्री स्वभावाचे हे सामर्थ्य पहा ! ॥५॥ आपल्या मायेच्या प्रभावाची प्रशंसा आपल्या हृदयात करून राम मोठ्याने हसून मृदु वाणीने म्हणाले- ॥६॥ आपल्या पित्याच्या नावाचा व आपल्या नावाचा उच्चार करुन प्रभूंनी हात जोडून प्रणाम केला ॥७॥ व मग विचारले की वृषकेतू कुठे आहेत, आणि आपण अशा एकट्या वनात का हिंडत आहांत ? ॥८॥ दो. – रामचंद्रांचे मृदु पण गूढ भाषण ऐकून सती अतिशय लाजली. व भयभीत होऊने महेशांकडे परत जायला निघाली तेव्हा तिच्या हृदयात अत्यंत चिंता उत्पन्न झाली. ॥दो. ५३॥

शंकर शब्दां मी न मानले । रामीं निज अज्ञान लादलें ॥
काय देउं मी जाबा जाउन । उपजे हृदयीं दाह सुदारुण ॥
राम सती-दुःखास ओळखिति । प्रगट जरा स्वप्रभाव दाविति ॥
सती बघे कौतुक पथिं जातां । राम समोर सवें श्री भ्राता ॥
फिरुनि बघे मागें प्रभु पाही । रुचिरवेषिं सानुज सीताही ॥
जिथें बघे प्रभु तिथें उपस्थित । सिद्ध-मुनीशीं प्रवीण सेवित ॥
पाही शिव विधि विष्णु अनेकां । महिमामित एकाहुनि एका ॥
नमिति चरणिं करिती प्रभुसेवा । बघे विविध वेषीं सब देवां ॥

दो० :- सती विधात्री इंदिरा अनुपम दिसति अमूप ॥
जे जे वेषिं अजादि सुर त्या त्या तनु-अनुरूप ॥ ५४ ॥

मी शंकरांनी सांगितलेले मानले नाही व स्वत:चे अज्ञान रामावर लादले ॥१॥ आता गेल्यावर मी जाब तरी काय देऊ ? असा सतीच्या हृदयात दारुण दाह उत्पन्न झाला ॥२॥ सतीला झालेले दु:ख रामांनी ओळखले व (तिला सुखविण्यासाठी) आपला प्रभाव थोडासा प्रगट करून दाखवला ॥२॥ सती रस्त्याने जात असता तिला एक कौतुकास्पद दृश्य दिसले, समोर राम असून त्यांच्या बरोबर श्री व लक्ष्मण असून ते मार्गाने चालत आहेत. ॥४॥ मागे वळून पाहीले तो तिला मागेही प्रभू दिसले व ते (ही) बंधू लक्ष्मणासहित व सीतेसहित असून सर्वांचा वेष सुंदर आहे.॥५॥ जिथे सती पाहते तिथे तिथे तिला प्रभू बसलेले दिसले व प्रवीण सिद्ध व मुनीश त्यांस सेवीत आहेत असे दिसले ॥६॥ अनेक शिव, अनेक विधी व अनेक विष्णू सतीच्या दृष्टीस पडले व त्यांचा महिमा (प्रभाव) एकाहून दुसर्‍याचा अधिक अमित आहे असे दिसले. ॥७॥ ते सर्व प्रभूच्या चरणांना वंदन-नमन करीत असून प्रभूची सेवा करीत आहेत, तसेच इतर सर्व देव तसेच करताना तिला दिसले ॥८॥ दो.- अगणित व उपमारहित सती, विधात्री व इंदिरा तिला दिसल्या. जे अजादि (ब्रह्मदेवादि) सुर ज्या वेषात व ज्या रुपात आहेत त्या वेषास व रुपास अनुरुप अशा त्या सर्व देवांच्या शक्ती आहेत असे तिला दिसले. ॥दो. ५४॥

जिथं तिथं दिसले रघुपति जितके । शक्तींसहित सकल सुर तितके ॥
जीव चराचर जे संसारीं । दिसले सगळे किती प्रकारीं ॥
पूजिति प्रभुस वेषिं बहु सुरगण । रामरूप दिसलें न अपर पण ॥
कितितरी रघुपति दृष्टिस आले । सीतेसहित, न वेष निराळे ॥
ते रघुवर ते लक्ष्मण सीता । होई बघुनि अति सती सभीता ॥
हृदयिं कंप तनु-शुद्धि जरा ना । बसली मार्गीं मिटुनि नेत्रांना ॥
नंतर उघडुन नयन पाहिले । दक्षकुमारिस कांहि नाढळे ॥
नमुनि रामपदिं शिर कितिदां तरि । जिथें गिरीश तिथें गमना करि ॥

दो० :- गता समीप महेश तैं हसत पुसति कुशलास ।
कशी परीक्षा घेतली सत्य वदा वृत्तास ॥ ५५ ॥

सतीला जिथे जितके रघुपती दिसले तिथे सर्व देव आपापल्या शक्तीसहित दिसले. ॥१॥ या संसारात असलेले सर्व चराचर जीव सतीला नानाप्रकारचे दिसले ॥२॥ सर्व देवगण विविध वेषानी-रूपानी प्रभूची पूजा करीत असलेले दिसले पण रामरुप मात्र निराळे दिसले नाही. ॥३॥ सीतेसहित कितीतरी रघुपती सतीच्या दृष्टीस पडले. पण त्यांचा वेष (रुपादिक) मुळीच निराळा दिसला नाही. ॥४॥ तेच रघुवर तेच लक्ष्मण व तीच सीता (सर्वत्र) पाहून सती अति भयभीत झाली.॥५॥ तिच्या हृदयात थरकाप सुटला व शरीराची शुद्ध जरा सुद्धा राहीली नाही, तेव्हा ती डोळे मिटून मार्गातच बसली.॥६॥ नंतर डोळे उघडून पाहीले तेव्हा दक्षकुमारीला (त्यातले) काहीच आढळले नाही ॥७॥ तेव्हा वारंवार रामपदी मस्तक नमवून जिथे गिरिश होते तिकडे सती गेली ॥८॥ दो.- सती महेशांजवळ जाऊन पोचली. तेव्हा त्यांनी हसत कुशल विचारले (व म्हणाले की), परीक्षा कशी घेतलीत तो सर्व वृतांत खराखरा सांगा पाहूं ॥दो. ५५॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP