॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ सुंदरकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ३ रा



Download mp3

निघे नमुनि शिर शिरला बागे । खाइ फळें तरु तोडूं लागे ॥
तिथें सुरक्षक भट बहु असती । कांहीं हत, गत कांहि कळवती ॥
नाथ एक आला कपि भारी । तो अशोक वाटिके विदारी ॥
फळें भक्षुनी विटप उपटले । रक्षक मर्दुनि महीं टाकले ॥
तैं रावण पाठवि भट नाना । हनुमान् गर्जे बघुनि तयांनां ॥
कपिनें सगळे निशिचर ते हत । जाति अर्धमृत काहिं पुकारत ॥
मग धाडी तो अक्षकुमारा । घेउनि सुभटां निघे अपारां ॥
येत बघे, घे विटपा तर्जे । त्यास निपाति महाध्वनि गर्जे ॥

दो :- हत किति मर्दित किति, करी मिळवुनि धुळीस चूर ॥
गत कांहीं वदले प्रभु मर्कट अतिबल शूर ॥ १८ ॥

सीतेला मस्तक नमवून नमस्कार करून निघाला, नि शिरला फळबागेत. फळे खाऊन वृक्षांची मोडतोड करायला लागला. ॥ १ ॥ तेथे बागेचे उत्तम रक्षण करणारे पुष्कळ (१४ हजार) योद्धे होते, त्यातल्या काहींना याने ठार मारले तर काहींनी पळून जाऊन रावणाला वर्दी दिली. ॥ २ ॥ नाथ् ! एक फार मोठा वानर आला आहे आणि त्याने अशोक वाटिका उध्वस्त करून टाकली. ॥ ३ ॥ फळे भक्षण केली व मोठमोठे वृक्ष उपटून टाकले आणि रक्षकांना चांगला चोप देऊन त्यांना जमिनीवर लोळवले आहे. ॥ ४ ॥ तेव्हा रावणाने आणखी योद्धे पाठवले. त्यांना पाहताच हनुमंताने गर्जना केली. ॥ ५ ॥ ते सगळे राक्षस कपीने मारले, काही अर्धमेले होऊन रावणाकडे ओरडत गेले. ॥ ६ ॥ मग त्याने अक्षयकुमाराला (रावणपुत्र अखया) पाठवले. तो अपार सुभटांना घेऊन निघाला. ॥ ७ ॥ त्याला येताना पाहिला मात्र, आणि एक मोठा वृक्ष हातात घेऊन त्याला दटावला व त्याचा निःपात करून महाध्वनीने गर्जना केली. ॥ ८ ॥ कित्येकांना मारले, कितींचे मर्दन केले, कित्येकांना धुळीस मिळवून त्यांचा चुरा केला. काही गेले (रावणाकडे व घाबर्‍या घाबर्‍या) म्हणाले की, प्रभू ! मर्कट अति बलवान व शूर आहे. ॥ दो. १८ ॥

श्रुत सुतवध लंकेश कोपला । मेघनाद बलवंत धाडला ॥
मारुं नको त्या बांध सुता ! हे ! पाहूं तरि कपि कुठला आहे ॥
निघे इंद्रजित योद्धा अतुलित । क्रुद्ध बंधुनिधना आकर्णित ॥
कपि बघुनी दारुण भट आला । कट्कटुनी गर्जून धावला ॥
उपटि तरुसि अति विशाल एका । विरथ करी लंकेश्वर-लेका ॥
किती महाभट त्या संगा । कपि धर धरुनि मर्दि निज अंगां ॥
त्यांस निपातुनि भिडे तयासी । युग गजपति किं करिति युद्धासी ॥
मुष्टी मारुनि विटपीं चढला । क्षणभर निशिचर मूर्छित पडला ॥
उठुनी तो करि बहुविध माया । जिंकुं न शके प्रभंजन-तनया ॥

सो :- ब्रह्मास्त्रा तो योजी कपि मनिं करी विचार ॥
ब्रह्म शरा जर मानुं ना महिमा-हानि अपार ॥ १९ ॥

पुत्राचा वध झाला हे ऐकताचे लंकेश कोपला व त्याने बलवान मेघनादास पाठवला. ॥ १ ॥ (रावण त्यास म्हणाला) हे पुत्रा, त्याला ठार मारू नकोस, बांधून टाक. पाहू तर खरा, कुठला कपी आहे तो. ॥ २ ॥ अतुलनीय योद्धा इंद्रजित निघाला. भावाचे मरण ऐकताच तो क्रुद्ध झाला. ॥ ३ ॥ कपीने पाहिले की भयंकर योद्धा येत आहे. तेव्हा कटकटा दात खाऊन गर्जना करून कपी त्याच्यावर धावला. ॥ ४ ॥ एक विशाल वृक्ष उपटला व लंकेश्वराच्या पुत्राला रथावरून खाली पाडला. ॥ ५ ॥ त्याच्याबरोबर जे महाभट होते त्यांना धरधरून आपल्या अंगावर चिरडून टाकले. ॥ ६ ॥ त्या महाभटांचा निःपात करून मारुती इंद्रजिताशी भिडला. ॥ ॥ ७ ॥ (मल्लयुद्ध सुरू झाले) त्याला गुद्दा मारून हनुमान झाडावर चढला. तो निशाचर क्षणभर मूर्छित पडला. ॥ ८ ॥ तो उठून नाना प्रकारची माया करू लागला. तरी तो प्रभंजन तनयाला जिंकू शकेना. ॥ ९ ॥ मेघनादाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, तेव्हा हनुमंताने विचार केला की, मी जर ब्रह्मास्त्राला मान दिला नाही, त्याची महती राखली नाही, तर अपार महिमा नष्ट होईल. (ब्रह्मदेवावर कोणी विश्वास ठेवणार नाही.) ॥ दो. १९ ॥

ब्रह्मबाण कपिला तो मारी । पडत पडत कटका संहारी ।
तो पाहे कपि मूर्छित पडला । नागपाशिं बांधुनि ने त्याला ॥
श्रुणु यन्नामा जपुनि भवानी । भव बंधन नर तोडी ज्ञानी ॥
बंधुनिं कीं तद्‌दूत सांपडे । प्रभुकार्यार्थी स्वयें कपि पडें ॥
कळत ’बद्धकपि’ निशिचर धावति । कौतुक पाहुं सभें सब पावति ॥
कपि गत दशमुख सभेस पाही । प्रभुता अति वदवे ना कांहीं ॥
जोडुनि कर सुर विनीत दिक्पति । भृकुटी सकल सुभीत विलोकति ॥
बघुनी प्रताप कीश न शंकित । जसा अहिगणीं गरुड अशंकित ॥


दो :- कपिला पाहुनि दशानन हसे वदुनि दुर्वाद ॥
स्मरे पुत्रवध तो, तदा उपजे हृदयिं विषाद ॥ २० ॥

इंद्रजिताने कपीला ब्रह्मास्त्रबाण मारला तेव्हा तो बाण लागून पडता पडता सुद्धा कपीने सैन्याच संहार केला. ॥ १ ॥ त्याने पाहिले की कपि मूर्छित पडला आहे, तेव्हा त्याला नागपाशात बांधून नेला. ॥ २ ॥ (महेश म्हणाले की) भवानी ! ऐक, ज्यांच्या नावाचा जप करून मनुष्य ज्ञानी होऊन भवबंधन तोडू शकतात, त्यांचा दूत बंधनात सापडेल काय ? (शक्यच नाही) प्रभूचे कार्य करण्यासाठी कपी स्वतःच बंधनात पडला. ॥ ४ ॥ कपीला बांधला असे कळताच निशाचर धावत निघाले व मजा पाहण्यासाठी सगळे सभेत आले. ॥ ५ ॥ कपी गेला व त्याने दशमुखाची सभा पाहिली. त्याची प्रभुता इतकी अतिशय आहे की वर्णन करणे शक्य नाही. ॥ ६ ॥ देव व दिक्पाल हात जोडून विशेष नम्रतेने उभे आहेत, ते सगळेच रावणाच्या भिवयांकडे भयग्रस्त होऊन पहात आहेत. ॥ ७ ॥ हा प्रताप पाहून कपीला जरादेखील भिती वाटली नाही. सर्पांच्या समुदायात गरूड जसा निर्भय असतो तसा रावण सभेत कपी होता. ॥ ८ ॥ कपीला पाहून दशानन अपशब्द बोलला व हसला. पुत्रवधाचे स्मरण होताच मात्र त्याच्या हृदयात विषाद उपजला. ॥ दो. २० ॥

’कपि तूं कोण’ पुसे लंकेश्वर । बळें कुणाच्या नाशित वन वर ॥
नाहिं ऐकला का कधिं मजसी । अति अशंक शठ तूं मज दिससी ॥
हत निशाचर कोण्या अपराधा । वद शठ तव ना प्राणां बाधा ॥
श्रुणु रावण विध्यंड-निकाया । यद्‌बल पावुनि विरची माया ॥
बळें जयाच्या विधि हरि ईश । पालति सृजति हरति दशशीस ॥
यस्य बळें दशशतमुख धरि शिरिं । अंडकोश समेत कानन गिरि ॥
धरि जो विविध देह सुरपाता । शठां तुम्हांसम शिक्षा दाता ॥
हर कोदंड कठिण जो भंजन- । करि तुजसह नृपदलमद-गंजन ॥
खर दूषण नी त्रिशिरा वाली । वधिले सब अतुलित बलशाली ॥

दो :- ज्याच्या बल-लवलेशिं तूं विजित चराचर सारि ॥
तद्‍दूत चि मी, त्वां हृता ज्यांची प्रिय अति नारि ॥२१ ॥

लंकापतीने विचारले - तूं कोण आहेस ? कोणाच्या बळावर माझ्या उत्तम वनाचा विनाश केलास ? ॥ १ ॥ माझी कीर्ति कधी ऐकली नाहीस का ? काय रे शठा, मला तर तू अगदी बेडर दिसतोस. ॥ २ ॥ कोणत्या अपराधासाठी तू निशाचरांना मारलेस ? अरे शठा, तुझे प्राण धोक्यात आहेत असे तुला नाही का वाटत ? (खरे सांगशील तर तुझ्या प्राणांना धोका नाही). ॥ ३ ॥ हे रावणा, ऐक, ज्याचे बळ पाहून अनेक ब्रह्मांडांची विशेष रचना माया करते; व हे दशानना ! ब्रह्मा विष्णु, महेश हे पालन सृजन व संहार ज्याच्या बळावर करतात; ॥ ४-५ ॥ ज्याच्या बळावर हजार मुखांचा शेष, पर्वत व अरण्यांसह हे सगळे ब्रह्मांड शिरावर धरतो, ॥ ६ ॥ जो तुमच्यासारख्या शठांना शिक्षा देणारा असून, देवांचा संरक्षक असून, विविध देह धारण करतो;॥ ७ ॥ ज्याने कठीण अशा शिवधनुष्याचे भंजन केले आहे व तुझ्यासह सर्व नृपसमूहाचा मद दूर केला आहे; ॥ ८ ॥ ज्याने खर-दूषण-त्रिशिरा व वाली सारख्या अतुलित बलशालीला वधले; ॥ ९ ॥ ज्यांच्या बळाच्या लवलेशाने तू सारी चराचर सृष्टी जिंकलीस व ज्यांच्या अति प्रिय नारीला तू चोरून आणलीस ना, त्यांचा मी दूत आहे. ॥ दो. २१ ॥

प्रभुता विदित असे तव मजसी । झालि लढाइ सहस्रभुजाशीं ॥
समरिं वालिशी सुयश लाभलें । परिसुनि कपिवच हसुनि टाळलें ॥
प्रभू ! क्षुधित अति कृत फल भक्षण । कपी-स्वभावें विटप-विभंजन ॥
सर्वां प्रिय तनु परमा स्वामी । मारिति मजला कुमार्ग गामी ॥
मज मारिति जे त्यां मी वधले । तुमच्या तनये मग किं बांधले ॥
बंधनिं मजला लाज न कांहीं । प्रभुच्या मम करणें कार्या ही ॥
विनति करूं कर जोडुन रावण । ऐका, त्यजुनि मान मम शिकवण ॥
स्वकुल विचार पहा तुम्हिं करुनी । भजा भक्तभयहा भ्रम तजुनी ॥
ज्याच्या भयें काळ अति डरतो । जो सुर असुर चराचर गिळतो ॥
वैर तयासी कधिंहि न कीजे । मम वचनें जानकी देइजे ॥

दो :- प्रणतपाल रघुनायक खररिपु करुणागार ॥
जात शरण राखिती प्रभु विसरुनि गुन्हे अपार ॥ २२ ॥

रावणा तुझा प्रभाव मला माहिती आहे. तुझी सहस्राजुनाशी झालेली लढाई; ॥ १ ॥ वालीशी युद्ध करताना तुला कसे व किती चांगले यश मिळाले ! कपीचे बोलणे ऐकून रावणाने ते हसण्यावारी नेले ॥ २ ॥ प्रभू ! मला अतिशय भूक लागली होती म्हणून मी फळे खाल्ली यात माझा दोष काय ? व कपी स्वभावानुसार वृक्षांची थोडीफार मोडतोड केली. ॥ ३ ॥ अहो स्वामी ! सगळ्यांनाच आपला देह प्रिय असतो, त्यामुळे कुमार्गगामी राक्षसांनी मला मारले, त्यांना प्रत्युत्तरादाखल मी मारले त्यात माझा काय अपराध ? त्यानंतर तुमच्या मुलाने मला बांधले. ॥ ४-५ ॥ बांधला गेलो यात काहीच लाज मला वाटत नाही, कारण प्रभूचे कार्य मला करावयाचे आहे. ॥ ६ ॥ हे रावणा मी हात जोडून विनंती करतो, मान सोडून माझी शिकवण ऐका. ॥ ७ ॥ तुम्ही आपल्या कुळाचा विचार करून पहा आणि भ्रम सोडून भक्तभयनाशकास भजा. ॥ ८ ॥ जो काळ सुर, असुर, चर व अचर या सर्वांना भक्षण करतो, तो ज्याच्या भयाने अति घाबरतो; ॥ ९ ॥ त्यांच्याशी कधीसुद्धा वैर करू नका व माझ्या सांगण्यावरून जानकी देऊन टाका. ॥ १० ॥ रघुनायक शरणागताचे पालन करणारे, करुणेचे सागर (आगर) असून खराचे शत्रू आहेत. तुम्ही शरण गेलात तर तुमचे सर्व अपार गुन्हे विसरून प्रभु तुमचे रक्षण करतील. ॥ दो. २२ ॥

रामचरण पंकज उरिं धरणें । लंका-राज्य अचल तुम्हिं करणें ॥
ऋषि पुलस्ति यश विमल मृगांकीं । तुम्हीं कलंक हि बनूं नका कीं, ॥
राम नाम विण शोभे न गिरा । त्यजुनि मोह मद कर किं विचारा ॥
वसनहीन शोभे न, सुरारी ! । सब भूषणभूषित वर नारी ॥
रामविमुख संपत्ती सत्ता । असली नसली प्राप्त सम गता ॥
सजलमूल नसती ज्या सरिता । शीघ्र सुकति त्या वर्षा सरतां ॥
सांगुं ऐक दशकंठ ! पणासी । त्राता कुणि न रामविमुखासी ।
शंभु सहस्र विष्णु चतुरानन । रामद्रोह्या रक्षूं शकत न ॥

दो :- मोहमूल बहु शूलद त्यागा तम अभिमान ॥
भजा राम रघुनायक कृपा सिंधु भगवान ॥ २३ ॥

मग रामचंद्रांचे चरणकमल हृदयात धारण करून तुम्ही लंकेचे राज्य अचल करावे. ॥ १ ॥ पुलस्ती ऋषींच्या निर्मल यशरूपी विमल चंद्रात तुम्ही कलंक बनूं नका. ॥ २ ॥ रामनामाविना वाणीला शोभा नाही. मद मोह सोडून हा विचार करा. ॥ ३ ॥ हे सुरारी, सर्व विभूषणांनी श्रृंगारलेली सुंदर स्त्री वस्त्राशिवाय शोभत नाही (किंबहुना अशुभ असते). ॥ ५ ॥ ज्या नद्यांचे मूळ समजत नाही, त्या पावसाळा संपताच सुकून जातात. ॥ ६ ॥ हे दशकंठा, मी सांगतो ऐक, अगदी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की रामविरोधकाचा कोणीही त्राता नाही. ॥ ७ ॥ हजारो शंकर, विष्णू, ब्रह्मदेव सुद्धां रामविरोधकाचे रक्षण करूं शकत नाहीत. ॥ ८ ॥ मोहापासून उत्पन्न होणार्‍या व पुष्कळ पीडा देणार्‍या भ्रमाचा व अभिमानाचा त्याग करा; व कृपासागर, षड्गुणैश्वर्यसंपन्न रघुनायक रामाला शरण जा. ॥ दो. २३ ॥

जरि कपि वदला वाणी अति हित । भक्ति-विवेक-विरति-नय-मिश्रित ॥
वदला विहसुनि महाभिमानी । मिळे अम्हां कपि गुरु सुज्ञानी ॥
मृत्यु निकट रे खल ! तव आला । अधमा शिकवूं लागसि माला ॥
वदला हनुमान् होइल उलटचि । तुला मतिभ्रम दिसतो प्रगटचि ॥
कपिवचनें अति चिडला रावण । शीघ्र हरां कां मूढ प्राण न ।
ऐकत निशिचर मारुं धावले । सचिवां सहित बिभीषण आले ॥
नमुनी शिर करि विनति बहूता । नीति विरुद्ध, न वधणें दूता ॥
दंड दुजा प्रभु ! कांहिं करावा । वदले सगळे मंत्र भला, वा ! ।
ऐकत हसुनि वदे दशकंधर । धाडा अंगा भंगुनि वांदर ॥

दो :- कपि ममता पुच्छावरी स्पष्ट सांगुं सकलांस ॥
तैलयुक्त पट बांधुनी द्या लावुनि अनलास ॥ २४ ॥

पुर जाळुनि लंघिला पयोधी -
जरी कपी भक्ती, ज्ञान, वैराग्य व नीति यांनी युक्त अशी हिताचे वाणी वदला, ॥ १ ॥ तरी महाअभिमानी रावण मोठ्याने हसून म्हणाला की आम्हाला आज हा अति ज्ञानी कपि गुरु लाभला आहे ! ॥ २ ॥ रे खला, तुझा मृत्यु जवळ आला आहे म्हणूनच अधमा तूं मला शिकवूं लागला आहेस. ॥ ३ ॥ हनुमान म्हणाला - त्याच्या उलटच होणार, कारण तुला बुद्धीभ्रम झालेला प्रगटच दिसतो आहे. ॥ ४ ॥ कपीच्या वचनाने तर रावण फारच चिडला व म्हणाला की या मूढाचे प्राण लवकर हरण का करत नाही (कोणी) ? ॥ ५ ॥ हे ऐकताच निशाचर त्याला मारायला धावले तोच बिभीषण आपल्या सचिवांसह आले. ॥ ६ ॥ मस्तक नमवून पुष्कळ विनंत्या करून सांगितले की नीति विरुद्ध असल्याने दूताला ठार मारूं नये. ॥ ७ ॥ प्रभू ! दुसरा काही दंड करावा. हे ऐकून सगळे सभासद् म्हणाले, वाहवा ! फारच योग्य सल्ला (राजनीतीचा मंत्र) आहे. ॥ ८ ॥ हे ऐकताच दशकंठ हसून म्हणाला - वानराला अंगभंग करून पाठवून द्या. ॥ ९ ॥ सगळ्यांना स्पष्ट सांगतो, कपीची ममता पुच्छावर असते, त्यालाच तेलात भिजवलेली वस्त्रे बांधून, द्या आग लावून शेपटाला. ॥ दो. २४ ॥

पुच्छहीन कपि तेथें जाइल । शठ मग निजनाथाला आणिल ॥
वर्णित अतिशय महत्त्व ज्यांचे । पाहिन पुरुषार्था मी त्यांचे ॥
परिसुनि वचना कपि मनिं सस्मित । साह्य शारदा मज मी जाणत ॥
राक्षस ऐकुनि रावण-वचना । मूढ लागले करुं ती रचना ॥
पुरीं उरे न वसन घृत तेल हि । वाढे पुच्छ करी कपि खेळ हि ॥
कौतुकार्थ जमले पुरवासी । मारिति लाथा अति उपहासीं ॥
पिटती टाळ्या ढोल वाजविति । धिंड नगरिं, पुच्छा प्रज्वाळिति ॥
भडकत पावक हनुमाना बघतो । त्वरित परम लघु रूपा धरतो ॥
सुटुनि चढे कपि कनककाट्टारीं । अति भयभीत निशाचर नारी ॥

दो :- प्रेरित हरि सुटले तदा मरुत ऊनपन्नास ॥
साट्टहास कपि गर्जे वाढे स्पर्श नभास ॥ २५ ॥

शेपुट तुटका, लांडा वानर मग तिकडे जाईल व मग आपला शठ नाथाला घेऊन येईल. ॥ १ ॥ याने ज्यांचे महत्त्व अतिशय वर्णन केले, त्यांचा पुरुषार्थ काय तो मी प्रत्यक्ष पाहीन. ॥ २ ॥ ते रावणाचे भाषण ऐकून हनुमान मनात स्मित करून म्हणाला की शारदादेवीच मला साह्य करीत आहे हे मी जाणले. ॥ ३ ॥ ती रावणाची आज्ञा ऐकताच मूढ राक्षस त्याप्रमाणे रचना करूं लागले. ॥ ४ ॥ नगरात वस्रे, तेल, तूप काहीही शिल्लक राहिले नाही. कारण पुच्छ वाढू लागले व कपीने खेळच सुरू केला. ॥ ५ ॥ मजा-गंमत पाहणासाठी लंकावासी राक्षस-राक्षसी जमू लागले व अति उपहास करीत लाथा, बुक्क्याही मारू लागले. ॥ ६ ॥ कोणी टाळ्या पिटू लागले तर कोणी ढोल वाजवू लागले व मग नगरात धिंड काढून पुच्छ ज्वाला निघेपर्यंत पेटवले. ॥ ७ ॥ पावक अग्नि भडकला आहे असे पाहून हनुमंताने त्वतित अतिलघुरूप धारण केले. (पुच्छाशिवाय सर्व शरीर लहान केले) ॥ ८ ॥ व बंधनातून सुटून सोन्याच्या गच्चीवर चढला त्याबरोबर राक्षसी भयभीत झाल्या. ॥ ९ ॥ त्याचवेळी हरी प्रेरणेने एकोणपन्नास (४९) वारे वाहू लागले. कपीने अट्टहास करून गर्जना केली व जो वाढला तो आकाशाला भिडला ! ॥ दो. २५ ॥

देह विशाल परम हलका, तो- । मंदिरिं मंदिरिं धावत चढतो ॥
जळे नगर जनता विव्हळ अति । ज्वाळा कोटी कराल भडकति ॥
आक्रोशति माते हा ! ताता । कोण अम्हां या समयीं त्राता ॥
आम्हीं कथित किं कपि न म्हणोनी ! । वानररूपें सुर तरि कोणी ॥
साधु-अवज्ञेचें फळ ऐसें । जळें अनाथाचें पुर जैसें ॥
एका निमिषीं नगर जाळिलें । एक बिभीषण-भवन राखिलें ॥
त्यांचा दूत सृजिति अनला जे । म्हणुनी ना तो गिरिजे ! भाजे ॥
उलट सुलट सब लंके जाळी । उडी सागरी नंतर घालीं ॥

दो :- पुच्छा विझवुनि हरी श्रम पुन्हा सान होऊन ॥
जानकि सन्मुख राही उभा पाणि जोडून ॥ २६ ॥

देह परत विशाल असून अत्यंत हलका आहे व तो कपी एक मंदिरावरून दुसर्‍या मंदिरावर या क्रमाने धावत चढू लागला. ॥ १ ॥ नगर जळूं लागले. तेव्हा नगरलोक विव्हळ झाले व आगीचा असंख्य विक्राळ डोंब उसळला. ॥ २ ॥ हाय हाय ! माते ! ताता ! याप्रमाणे लोक आक्रोश करूं लागले. याप्रसंगी आमचे रक्षण करणारा कोणी आहे का ? अशी हाकाहाक उडाली. ॥ ३ ॥ आम्ही म्हटले होते नां, हा कपी नाही म्हणून. हा कोणीतरी वानररूपाने आलेला देवच असला पाहिजे. ॥ ४ ॥ साधूच्या अवज्ञेने, अपमानाचे फळ असेच मिळायचे ! लंकानगर अनाथाच्या नगरासारखे धडाधड जळत आहे. ॥ ५ ॥ एका निमिषात सारे नगर जाळून टाकले. फक्त एका बिभीषणाचे घर तेवढे राखले. ॥ ६ ॥ गिरिजे ! जे अग्नीस उत्पन्न करणारे आहेत, त्यांचाच दूत असल्याने (तो पुच्छ तुटलेला असूनही कपी) जळला नाही. ॥ ७ ॥ सगळी लंका उलट सुलट जाळून मग सागरात उडी टाकली. ॥ ८ ॥ पुच्छ विझवून श्रमपरिहार केला व पुन्हा लहान होऊन जानकीच्या समोर येऊन हात जोडून उभा राहिला. ॥ दो. २६ ॥

आई ! मज दे काहिं खूण तरि । देति जशी रघुनायक मम करिं ॥
चूडामणि काढुनि मग देई । हर्षित पवन तनय करिं घेई ॥
तात ! सांग मम असा प्रणाम । सर्वपरीं प्रभु पूरित काम ॥
दीन दयाळू ब्रीद आठवा । संकट भारि नाथ मम हटवा ॥
सांग शक्रसुत-कथेस बापा ! । प्रभुस निवेद किं शरप्रतापा ॥
नाथ येति जर मासामधिं ना । तर मग जिवंत मज पावति ना ॥
प्राण कसे कपि ! राखुं वद अतां । जातो तात ! तुम्हींही म्हणतां ॥
शीतल झाली बघुनि तुज छाती । पुन्हां तेच दिन मज त्या राती ॥

दो :- जनकसुते समजाउनी देउनि बहु धीरास ॥
नमुनि कमलपदिं कपि निघे रामाप्रति जाण्यास ॥ २७ ॥

सीतेचा निरोप -
आई ! मला काहीतरी खूण दे गं ! जशी रघुनायकांनी मजकडे दिली तशी. ॥ १ ॥ तेव्हा सीतेने वेणीतून चूडामणी काढून आनंदाने दिला व पवनसुताने हर्षाने हातात घेतला. ॥ २ ॥ (सीता म्हणाली) बाळा ! माझा असा प्रणाम सांग आणि त्यांना सांग की प्रभू सर्वप्रकारे पूर्णकाम आहेत. ॥ ३ ॥ नाथ ! आपले दीन दयाळू हे ब्रीद आठवा आणि माझे भारी संकट दूर करा. ॥ ४ ॥ बाबा ! इंद्रपुत्र जयंताची कथा प्रभूला सांग व प्रभूच्या बाणांचा प्रताप निवेदन कर हं ! ॥ ५ ॥ नाथ जर महिन्याभरात आले नाहीत तर मग आल्यावर त्यांना मी जिवंत सापडणार नाही (असे सांग). ॥ ६ ॥ हे कपी तूच सांग बरं ! की मी आता या माझ्या प्राणांचे रक्षण कसे करूं ? कारण तात ! तुम्हीही ’आता जातो’ म्हणतां. ॥ ७ ॥ तुला पाहून माझी छाती शीतल झाली होती, पण पुन्हा मला आता तेच दिवस अन् त्याच रात्री (हाय रे दैवा). ॥ ८ ॥ जनकसुतेची समजूत घालून आणि तिला पुष्कळ धीर देऊन, तिच्या चरण-कमलांना स्पर्श करून कपी रामाकडे जाण्यास निघाला. ॥ दो. २७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP