॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय ३ रा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

बाल सखे परिसुनि हृदिं हर्षति । वृंद वृंद जाती रामाप्रति ॥
प्रेम पाहुनी प्रभु आदरती । क्षेम कुशल मृदुवचनें पुसती ॥
प्रिय निरोप पावुनी परततां । गाति परस्पर राम-महत्ता ॥
कोण रघुविरा-सम संसारां । शीला स्नेहा निभावणारा ॥
भ्रमूं योनि जे जे कर्मानें । तिथें अम्हां ईशें हें देणें ॥
दास अम्हीं स्वामी सीतापति । हें नांदो नाते अंताप्रति ॥
अशि अभिलाषा पुरिं सर्वां हो ! । कैकयसुता-हृदयिं अति दाहो ॥
कोण न नासे मिळुनि कुसंगति । नाहिं चतुरता उरत नीचमतिं ॥

दो० :- सांज-समयिं सानंद नृप जाती कैकयि-गेहिं ॥
निष्ठुरतेप्रति गमन करि जणुं कीं स्नेह सुदेहि ॥ २४ ॥

रामचंद्राच्या बालमित्रांना हा समाचार ( राज्याभिषेकाचा) समजताच ते हर्षित होऊन गटागटाने रामाकडे जाऊ लागले ॥ १ ॥ त्यांचे प्रेम पाहून ( ओळखून) प्रभू त्यांचा आदर सत्कार करुन गोड शब्दांनी क्षेमकुशल विचारीत आहेत ॥ २॥ प्रियमित्राचा निरोप मिळून ते परत जात असता आपापसात रामाचा मोठेपणा वर्णन करीत चालले आहेत ॥ ३ ॥ या संसारात शिलाचा व स्नेहाचा निर्वाह करणारा रघुविरासारखा कोण आहे ? ॥ ४ ॥ म्हणून शंकराने आंम्हास इतकेच द्यावे की आम्ही ज्या ज्या योनीत कर्मानुसार भ्रमण करुं ॥ ५ ॥ तिथे तिथे आम्ही दास व स्वामी सीतापती हे नाते अंतापर्यंत नांदावे ॥ ६ ॥ अशी अभिलाषा नगरातील सर्व लोकांना आहे हो ! पण कैकयसुतेच्या हृदयात अत्यंत दाह होत आहे ॥ ७ ॥ कुसंगती मिळाल्याने कोणाचा नाश होत नाही ? ( सर्वांचा होतो) नीचाच्या मताने ( चालल्याने) शहाणपणा उरत नाही. ॥ ८ ॥ संध्याकाळच्या वेळी दशरथ राजा आनंदित होऊन कैकयीच्या वाड्यात जाण्यास निघाले जणू उत्तम देहधारी स्नेह निष्ठुरतेकडेच जात आहे ( असे वाटते) ॥ दो० २४ ॥

परिसुनि कोपभवनिं भय राया । सुके, टाकवे पुढें न पाया ॥
ज्याच्या भुजबलिं सुरपति राहति । कल पाहुन नरपति मन राखति ॥
तो सुकला स्री रुष्ट परिसुनी । घ्या प्रताप कामाचा बघुनी ॥
शूल कुलिश असि अंगिं झेलती । ते रतिनाथ सुमन-शरिं झुरती ॥
प्रियेपाशिं नृप सुभीत येई । बघुनि दशा दुख दारुण होई ॥
जड जीर्ण पट भूवरि पडली । विविध भूषणें फेकुन दिधलीं ॥
गमें कुमतिला कुवेष केवीं । जणुं भावी वैधव्या सुचवी ॥
जाउनि जवळ पुसे मृदुवाणीं । रुसलिस कां प्राणप्रिय राणी ॥

छं० :- कां रोष राणी ? लावतां पति पाणि ती झिड्कारिते ॥
जाणीं सरोष भुजंग-भामिनि विषम-दृष्टीं निरखिते ॥
युग वासना रसना दशन वर मर्म-ठाया शोधिते ॥
तुलसी, नृपति भवितव्यता-वश काम-कौतुक मानि ते ॥ १ ॥
सो० :- नृपति वदति बहु वार सुमुखि सुलोचनि पिकवचनि ।
कां हा कोप अपार सांग किं गजवर-गामिनि ॥ २५ ॥

राणी कोपभवनात आहे असे कानी पडताच राजा भयभीत झाला भयाने सुकून गेला व पाऊल पुढे टाकवेना ॥ १ ॥ ज्याच्या बाहुबलाच्या आश्रयावर सुरपती निश्चिंत राहतो व ज्याचा कल पाहून नरपति मनासारखे वागतात ॥ २ ॥ तो आज बायको रुसली आहे हे ऐकून सुकून गेला, तेव्हा हा कामाचा ( मदनाचा) प्रताप पाहून घ्या. ॥ ३ ॥ जे शूल, वज्र व तरवार यांचे घाव आपल्या अंगावर ( फुलासारखे) झेलतात तेच रतिनाथाच्या फुलांच्या बाणांनी ( घायाळ होऊन) झुरतात ! ॥ ४ ॥ राजा अत्यंत भयभीत होऊन प्रिये पाशी आला व तिची ती दशा दिसताच त्यास दारुण दु:ख झाले ॥ ५ ॥ जाडीभरडी, जुनीपुराणी वस्त्रे नेसलेली असून नुसत्या जमिनीवर पडलेली आहे व अंगावरील भूषणे काढून फेकून दिलेली आहेत ( खोलीभर) ॥ ६ ॥ या दुर्बुद्धिला हा कुवेष कसा आवडला व कसा दिसला म्हणाल तर जणू भावी वैधव्याची सुचनाच तो देत आहे ॥ ७ ॥ अगदी जवळ जाऊन राजाने गोड शब्दाने विचारले की राणी ! प्राणप्रिये ! तू का रुसली आहेस ? ॥ ८ ॥ ( दशरथ विचारतात) राणी रोषाचे कारण काय ? असे म्हणून अंगाला हात लावताच तिने आपल्या पतीचा हात झिडकारुन टाकला; व जणू काय क्रुद्ध झालेल्या नागिणी प्रमाणे दुष्ट ( विषारी) नजरेने ती ( राजाकडे) निरखून पाहू लागली. दोन वासना याच तिच्या जिभा होत. दोन वर हेच जणूं दोन विषारी दांत होत आणि जणू काय डसण्या साठीच मर्म-स्थान शोधीत आहे. तुलसीदास म्हणतात - राजा भवितव्यतेला वश झाला असल्याने या सर्व चेष्टा त्याला प्रणयलीलाच वाटत आहेत. ॥ छं०१ ॥ राजा वारंवार म्हणाला की, हे सुमुखि ! हे सुलोचनि ! कोकिल वचनी ! गजवरगामिनी ! हा अपार कोप का ते मला सांग ना ( गडे एकदा) ॥ दो० २५ ॥

प्रिये अहित तव कोण करी तरि । द्विशिर कोण, यम कुणा पाशिं धरि ॥
रंक कोण वद करूं नरेशहि । कुणा नृपा वद देउं विदेशहि ॥
मारुं शकेन हि अमरा अव अरि । कोण कीट पामर मानव तरि ॥
मत्स्वभाव जाणसी वरोरू । जन तव आनन-चंदिं चकोरू ॥
प्रिये प्राणसुत सर्वहि मम जें । प्रजा सपरिजन तव वश समजे ॥
वदूं कांहिं कपटें जरि तुजसी । भामिनि ! राम शपथ शत मजसी ॥
विहसुनि घे इच्छित तें मागुनि । गात्रिं मनोहर भूषण घालुनि ॥
वेळ अवेळ पहा तरि कांहीं । प्रिये कुवेषा त्यज लवलाहीं ॥

दो० :- परिसुनि, चिंतुनि शपथ अति हसुनि उठे मति हीन ॥
सजिं भूषण बघुनी मृगा पाश जणुं भिल्लीण ॥ २६ ॥

प्रिये तुझे अनहित केले तरी कोणी ? दोन डोक्यांचा कोण आहे ? किंवा यमाने कोणाला पाशात धरले आहे ? ॥ १ ॥ सांग पाहू असा कोण रंक आहे की ज्याला राजा करु किंवा असा कोण राजा आहे की त्याला परदेशात हाकलून देऊ ? ॥ २ ॥ तुझा शत्रू देव जरी असला तरी त्याला सुद्धा मी मारु शकेन मग इतर पामर नरांची किड्यांची कथा ती काय ? हे वरोरु तूं माझा स्वभाव जाणतेसच की माझे मन तुझ्या या मुखचंद्रावर चकोर बनून राहीले आहे ॥ ४ ॥ प्रिये ! माझे प्राण, पुत्र आणि जे काही माझे आहे ते सर्व आणि प्रजा, सर्व प्रियजन इ. सर्व तुझ्या अधीन आहेत असे समज. ॥ ५ ॥ भामिनी ! मी जर तुझ्याशी काही कपटाने हे बोलत असेन तर मला रामाची शतश: शपथ आहे ॥ ६ ॥ एकदा पोटभर हंसून, मनोहर भूषणे अंगांवर घालून तुझी इच्छा असेल ते मागून घे ॥ ७ ॥ काही वेळ - अवेळ याचा विचार तरी कर आणि प्रिये, हा कुवेष ताबडतोब टाकून दे पाहूं ॥ ८ ॥ राजाचे भाषण ऐकून व फार मोठी शपथ घेतली हा विचार करुन, मोठ्याने हसून ती हीन - बुद्धी उठली व मृगाला पाहून भिल्लीणीने जणूं पाश सावरावे तशी ती अंगावर भूषणे घालू लागली ॥ दो० २६ ॥

मग राजा मनिं सुहृदचि मानुनि । मंजु मृदु वदे प्रेमें पुलकुनि ॥
भामिनि ! तूं इच्छिसि तें झालें । नगरिं घरोघर उत्सव चाले ॥
उद्यां करूं रामा युवराजा । सज किं सुलोचनि ! मंगल साजा ॥
हृदय कठोर परिसुनि भंगत । पक्व केस्तुडा धक्का लागत ॥
विहसुनि लपवी अशिहि तिडिक ते । चोर नारि जशि उघड न रडते ॥
नृपा कपट-चतुराइ न कळली । कोटि-कुटिल-मणि-गुरू-पढविली ॥
जरि नरेश अति नीति-निपुणधी । नारि चरित्र अगाध चि जलधी ॥
मग वर कपटी स्नेह वाढवुनि । विहसुनि वदे नयन-मुख मुरडुनि ॥

दो० :- माग माग मज म्हणां प्रिय ! दिलें घेतलें कांहिं ॥
दिधलें जे वरदान युग तेंच मिळेल किं नाहीं ॥ २७ ॥

तेव्हा मग राजाने आपल्या मनात तिला सुहृदय मानली आणि मृदु मंजुळ वाणीने, प्रेमाने रोमांचित होऊन म्हणाले ॥ १ ॥ भामिनी ! तुला जे मनापासून पाहीजे होते तेच झाले ( असे समज) नगरात, घरोघर ( त्या प्रीत्यर्थ) उत्सव सुद्धा चालू आहे. ॥ २॥ उद्यां रामचंद्राला युवराज करणार तरी हे सुलोचनी ! तू सुद्धा आता मंगलसाज सजवूं लाग ( पाहूं !) ॥ ३ ॥ हे ऐकून तिचे कठोर हृदय असे फाटले की जणू पिकलेल्या केसतुडालाच कोणी धक्का लावला ॥ ४ ॥ चोरनारी जशी उघड उघड रडत नाही त्याप्रमाणेच अशी तिडीक सुद्धा तिने मोठ्याने हसून लपविली ॥ ४ ॥ ( राणीला) कोटी - कुटिल - शिरोमणी असलेल्या गुरुने पढविली असल्याने भूपतीला तिचे कपट - चातुर्य कळले नाही. ॥ ६ ॥ नरेश दशरथ जरी नितिनिपुण बुद्धीमान आहेत तरी नारीचरित्र हा अगाध सागर आहे ॥ ७ ॥ मग वरवर कपटी स्नेह वाढवून मुख व डोळे मुरडित मोठ्याने हसून ती म्हणाली ॥ ८ ॥ प्रिया ! माग माग असे मला सांगता पण कधी दिलेत व मी कधी घेतले ? दोन वर दान दिलेले आहेत ते तरी मिळतील की नाही कोणास ठाऊक ? ॥ दो० २७ ॥

कळे मर्म नृप सस्मित सांगे । रुसणें भारी प्रिय तुजला गे ! ॥
मागितली कधिं ठेव किं ठेउनि ? । मी स्वभाव भोळा गत विसरुनि ॥
मिथ्या दोष अम्हां ना द्यावे । दोनच कां चारहि मागावे ॥
रघुकुल रीतिस कदा खंड ना । जावो प्राणहि वचन-भंग ना ॥
नहि असत्यसम पातक-पुंजा । गिरिसम होती कोटि किं गुंजा ॥
सत्यमूल सब सुकृत शोभती । वेद पुराणिं विदित मनु वदती ॥
त्यांत रामशपथा कृत नाना । स्नेह-सुकृत-सीमा रघुराणा ॥
कुमति हसुनि वच करवुनि गाढी । कुमत कुविहग-टोपि जणुं काढी ॥

दो० :- भूप मनोरथ सुभग वन सुख सुविहंग-समाज ॥
जशि भिल्लिण सोडूं बघे वचन भयंकर बाज ॥ २८ ॥

राजा हसून म्हणाला की कळले, सगळे मर्म मला कळले, अगं ! तुला रुसणे फारच प्रिय आहे ॥ १ ॥ तुम्ही ठेव ठेऊन कधी मागीतलीत कां ? ( मुळीच नाही) माझा पडला ( विसर) भोळा स्वभाव त्यामुळे विसरच पडला ॥ २ ॥ आंम्हाला खोटे दोष मात्र देऊ नका हं दोनच कां चार मागा हवे तर ॥ ३ ॥ प्राण गेला तरी चालेल पण वचनभंग होणार नाही या रघुकुलाच्या रीतीला कधी खंड पडला नाही ॥ ४ ॥ एका असत्यासारखा दुसरा पातकांचा पर्वत नाही; कोट्यावधी गुंजा जमविल्या तरी त्या पर्वतासारख्या होणार आहेत कां ? ( शक्यच नाही) ॥ ५ ॥ सत्यमूल असलेलीच सर्व सुकृते शोभतात असे वेदपुराणात प्रसिद्ध आहे व मनु राजानी सुद्धा सांगीतले आहे. ॥ ६ ॥ त्यातही श्री रामाच्या अनेक शपथा घेतल्या आहेत आणि राम - रघुराणा सर्व स्नेहाची व सुकृताची सीमा आहेत ॥ ७ ॥ राजाचे वचन प्रतिज्ञा दृढ करवून दुर्बुद्धि राणीने आपले दुष्ट मतरुपी दुष्ट पक्ष्याची टोपीच काढली जणू ॥ ८ ॥ व राजाचे मनोरथरुपी सुंदर वन असून त्यात सुखरुपी सुंदर विहंगांचा समुदाय आहे आणि जशी भिल्लीण ससाण्याला ( त्या पक्षांची शिकार करण्यास सोडते) तशी ती आपले भयंकर वचनरुपी ससाणा राणी सोडूं पहात आहे ॥ दो० २८ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP