॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ६ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

हृदिं शिवकृपें स्फुरण सुमतीसी । राम-चरित-मानसकवि तुलसी ॥
करी मनोहर मति अनुसारहि । सुजन सुधारुन सुमनें घ्यालहि ॥
सुमति भूमि थळ हृदय अगाधू । वेद पुराण उदधि घन साधू ॥
वर्षति राम-सुयश वर-वारी । मधुर मनोहर मंगलकारी ॥
विस्तृत लीला सगुण वानिती । करी स्वच्छता कलुषहानि ती ॥
प्रेम-भक्ति, शक्य न वर्णाया । ती मधुरता सुशीतलता या ॥
तें जल सुकृत-शालि - हितकर्तें । रामभक्त सेवक जीवन तें ॥
मेधा-महिगत तें जल पावन । जमुनी श्रुतिपथिं जाइ सुशोभन ॥
भरे सुमानस सुथळीं स्थिरलें । सुखद शीत रुचि चारू पिकलें ॥

दो० :- अति सुंदर संवाद वर विरचित बुद्धिविचारिं ॥
ते या पावन सुभग सरिं घाट मनोहर चारि ॥ ३६ ॥

शंकरांच्या कृपेने (प्रसाद) हृदयात सुमतीला स्फुरण चढत आहे. (त्यामुळे) तुलसीदास रामचरित मानसाचा कवि होत आहे.॥१॥ तो आपल्या बुद्धीप्रमाणे मनोहर करीत आहेच (तथापि) सज्जन ते शुद्ध मनाने सुधारून ग्रहण करतीलच.॥२॥
मानस सरोवर सांग रूपक — विमल बुद्धी भूमी आहे, हृदय हे अगाध स्थळ आहे, वेद-पुराण हे सागर आहेत व साधू हे मेघ आहेत.॥३॥ साधु-घन राम सुयश रुपी उत्तम, मधुर, मनोहर व मंगलकारी जलाचा वर्षाव करतात.॥४॥ भगवंताच्या सगुण लीलांचे जे सविस्तर वर्णन करतात तीच या जलातील निर्मलता आहे व ती मलनाश करते ॥५॥ अवर्णनीय अशी जी प्रेमभक्ती ती या जलाची मधुरता व सुशीलता आहे.॥६॥ ते (रामसुयश वर) जल सुकृतरूपी भाताच्या पिकाला हितकर्ते असते, रामभक्त सेवकांचे ते जीवनच होय.॥७॥ ते पवित्र व सुंदर जल मेघरुपी महीवर पडून एकत्र जमून श्रवण मार्गाने वाहू लागते. ॥८॥ की ते सुमानस रुपी सुस्थळात भरले व स्थिर झाले व (काही काळाने) ते मनोहर, मधुर, शीतल व स्वच्छ होऊन परिपक्व झाले.॥९॥ दो.-अति सुंदर व श्रेष्ठ अशा चार संवादांची रचना (मात्र) या बुद्धीच्या विचारानेच केली; व तेच या पावन व सुंदर सरोवराचे चार मनोहर घाट होत.॥दो. ३६॥

सप्त प्रबंध सुभग सोपान । ज्ञान-नयनिं निरखत मानी मन ॥
रघुपति महिमा अगुण अबाधित । अगाधता ती सुजला वानित ॥
रामसितायश सलिल सुधोपम । उपमा वीचिविलास मनोरम ॥
कमलिनि सघन चारु चौपाया । युक्ती मंजुल मणिशिंपा या ॥
छंद सोरढा दोहा मंजुल । शोभे बहुरंगी अंबुजकुल ॥
अनुपम अर्थ सुभाव सुभाषा । गणुं पराग मकरंद सुवासा ॥
सुकृतपुंज मंजुल अलिमालचि । ज्ञान विराग विवेक मरालचि ॥
ध्वनी व्यंग्य जाती गुण कविते । मीन मनोहर बहु शोभति ते ॥
अर्थधर्मकामादिक चारां । वदूं ज्ञानविज्ञानविचारा ॥
नव रस जप तप योग विरागा । ते सब जलचर चारु तडागा ॥
सुकृती - साधु - नामगुणगान । ते विचित्र जल-विहग-समान ॥
संतसभा चौदिशीं आम्रवन । श्रद्धा वसंत-ऋतु सम वर्णन ॥
भक्तिनिरूपण विविध विधानें । क्षमा दया द्रुमलतावितानें ॥
शम यम नियमचि फुलें ज्ञान फल । हरिपद रति रस वेद वदे कल ॥
अपर कथा ज्या विविध मनोरम । ते शुक पिक बहुवर्णविहंगम ॥

दो० :- पुलक वाटिका बाग वन सुख-सुविहंग-विहारु ॥
सुमनचि माळी स्नेहजल सिंचत लोचनिं चारु ॥ ३७ ॥

सात निबंध वा प्रबंध वा कांडे हेच सात सोपान आहेत. ज्ञान द्दष्टीने त्यांच्याकडे पाहील्यास हे (म्हणणे) मन मान्य करील.॥१॥ रघुपतीच्या अगुण स्वरूपाचा अबाधित महिमा वर्णन केला जाईल तीच या उत्तम जलाची अगाधता आहे.॥२॥ (यात) राम व सीता यांचे यशरूपी सलील अमृता सारखे आहे; व ज्या उपमा वापरल्या आहेत ती त्या जलावरील तरंगांची मनाला रमविणारी लीला होय.॥३॥ या तलावातील दाट असलेल्या सुंदर चौपाया म्हणजेच दाट कमल लता व मंजुळ युक्ती याच मंजुळ मोत्यांच्या शिंपा (शिंपले)! ॥४॥ सुंदर छंद सोरठे व दोहे हीच या मानसातील विविध रंगांची कमळे शोभत आहेत.॥५॥ उपमातील अर्थ, सुंदर भाव, व सुंदर भाषा म्हणजेच (त्या कमलातील) पराग, मकरंद व सुगंध होय.॥६॥ पुण्यराशी याच सुंदर भ्रमरांच्या रांगा होत आणि परोक्ष ज्ञान, अपर वैराग्य व विवेक (विचार) हेच हंस होत.॥७॥ काव्यातील ध्वनी, व्यंग्य, गुण व जाती हे या मानसात शोभणारे विविध मनोहर मासे आहेत.॥८॥ अर्थ, धर्म, काम व मोक्ष या चारांविषयी आणी ज्ञान व विज्ञान यांचा विचार, तसेच नऊ रस, जप-तप विराग व योग यांचा विचार हे सगळे या मानसातील जलचर आहेत.॥९-१०॥ पुण्यशील लोक, साधु व भगवन्नाम यांच्या गुणांचे केलेले वर्णन हे या मानसातील विचित्र जलविहंग होत.॥११॥ या मानसाच्या चारी दिशांस असलेली संतसभा ही आमराई (आम्रवन) असून तेथे श्रद्धा रूपी वसंत ऋतू (सदैवच) असतो.॥१२॥ विविध प्रकरच्या भक्तीच्या विविध विधानांचे निरूपण तसेच क्षमा, दया आदि द्रुमलता (झाडावर चढणार्‍या वेली) यांच्यामुळे या आमराईत लता-मंडप बनले आहेत.॥१३॥ शम, यम, नियम हीच फुले, ज्ञान हे फल व हरिचरणांचे ठायीं रती (दृढप्रेम) हा त्या फळांतील रस आहे असे सुंदर वर्णन वेदांनी केले आहे.॥१४॥(प्रसंगानुसार येणार्‍या) दुसर्‍या ज्या विविध मनोरम कथा तेच (या संतसभा आम्रवनातले) पोपट, कोकिळ व इतर चित्रविचित्र रंगांचे विविध पक्षी समजावे॥१५॥ दो.-(कथा श्रवण करताना) अंगावर उठणारे रोमांच याच पुष्पवाटिका, बागा व बने आहेत. सुखाचा विहार म्हणजेच सुविहंगांचा विहार आहे सुमन हा माळी आहे, ते तो नेत्ररुपी झारीने सिंचन करीत राहतो.॥दो.३७॥

सावधान गाती चरितातें । रक्षक चतुर तलावा या ते ॥
श्रवति सदा सादर नर नारी । ते सुरवर मानस‍अधिकारी ॥
बगळे काक विषयि अतिखळ, ते । जाति अभागि न सरा जवळ ते ॥
कालु भेक शैवालजंतुगण । विषयकथारस नाना अत्र न ॥
येत यामुळें हृदयिं कचरले । कामी काक बिचारे बगळे ॥
या सरिं येतां बहुत कठिणता । रामकृपेविण ये न पावतां ॥
कुपथ कराल कठीण कुसंगम । तद्वच हरि करि वाघ भुजंगम ॥
गृहकार्ये किति अति जंजाळहि । ते अति दुर्गम शैल विषाळहि ॥
मोह मान मद सुघोर कानन । सरिता नाना कुतर्क भीषण ॥

दो० :- श्रद्धा पथ-धन ना जयां नहि संतांची साथ ॥
त्यानां मानस अगम अति ज्यां प्रिय ना रघुनाथ ॥ ३८ ॥

हे जे रामचरितमानस सावधान पणे गातील ते या तलावाचे चतुर राखणदार होत.॥१॥ सदा आदराने श्रवण करणारे पुरूष वा स्त्रिया या मानसाचे अधिकारी सुखर मानावे.॥२॥ जे अती विषयी व अती खल आहेत तेच आहेत तेच बगळे व कावळे होत ते अभागी असल्यामुळे या सरोवराजवळ जातातच कशाला ! ॥३॥ कालवे, बेडूक, शेवाळातील जंतू-समुदाय रुपी विषय कथारस यात नाही ॥४॥ त्यामुळे ते येण्यास कचरतात व जे कामी काक बगळे बिचारे येऊ लागतात ते पण घाबरत, कचरतच ॥५॥ या मानस सरोवरापर्यंत येऊन पोचण्यास पुष्कळ अडचणी आहेत. रामकृपा झाल्याशिवाय येथे येऊन पोचवत नाही.॥६॥ कठीण कुसंगतीच भयंकर वाईट रस्ता आहे, त्यांचे भाषण म्हणजेच वाटेतील सिंह, हत्ती, वाघ, व नाग आहेत.॥७॥ कितीतरी गृहकार्ये व तसेच प्रपंचातील नाना जंजाळ हे अती दुर्गम व विशाल पर्वत आहेत्.॥८॥ मोह, मान व मद हेच अती भयाण अरण्य आहे, व नाना प्रकारचे भयानक कुतर्क याच अनेक भयानक नद्या आहेत. ॥९॥ दो.- ज्यांच्याजवळ श्रद्धारुपी शिदोरी नाही व ज्यांना संतांची साथ नाही व ज्यांना रघुनाथ प्रिय नाहीत, त्यांना मानस अतिशय अगम्य आहे. ॥दो. ३८॥

कष्ट करुनि जरि कोणि पावले । जातहि निद्राहिवें ग्रासले ॥
हुडहुडि जाड्य विषम उरिं लागे । जाउन न घडे स्नान, अभागे ॥
करवे ना सरिं मज्जन-पाना । परत येति घेउन अभिमाना ॥
मग जर येउन कोणि विचारिति । सरनिंदेनें त्यांस शांतविति ॥
त्या न सकल हीं विघ्नें व्यापिति । सुकृपें राम जयास विलोकिति ॥
तो सादर सरिं मज्जन करतो । घोर महा त्रयतापिं न जळतो ॥
त्यजति न ते नर कधीं सरा या । ज्यां सु-भाव रामाचे पायां ॥
ज्यामनिं या सरिं बुडवूं अंगा । करो सुचित्ते तो सत्संगा ॥
अस मानस मान्साक्षि पाहुनि । कविमति होइ विमल अवगाहुनि ॥
हृदिं उत्साहानंद पसरला । वाहे प्रेमामोद उसळला ॥
निघे सुभग कविता सरिता ती । रामविमलयशजलभरिता ती ॥
सरयू नाम सुमंगलमूला । लोकवेदमत मंजुल-कूला ॥
नदी पुनीत सुमानसनन्दिनि । कलिमलतृणतरुमूलनिकन्दिनि ॥

दो० :- त्रिविधा श्रोतृसमाज पुर ग्राम नगर युग कूलिं ॥
संत-सभा अनुपम अवध सकलसुमंगलमूलि ॥ ३९ ॥

(या तीन गोष्टी नसता) बाकीच्या सर्व अडचणीचे कष्ट सोसून यदा कदाचित कोणी (विरळा) गेलाच तरी जाता क्षणीच निद्रारुपी गारठ्याने ग्रासले जातात.॥१॥ महा जडता रुपी विषय थंडीने त्यांचे हृदय व्यापले जाते त्यामुळे त्या अभागी जनांस जवळ गेले तरी स्नान घडत नाही. ॥२॥ गेले तर खरे पण तलावात स्नान पान करवत नाही. मात्र एक अभिमान घेऊन परत येतात. ॥३॥ ते परत आल्यावर कोणी लोक त्यांस आपला अनुभव विचारण्यास आले तर ते मानसाची निंदा करून त्यांची समजूत घालतात (शांत करतात) ॥४॥ रामचंद्र ज्याच्याकडे विशेष कृपेने पाहतात त्याला ही कोणतीच विघ्ने व्यापत नाहीत. ॥५॥ व तोच मानस-सरोवरात आदराने स्नान करतो व महाघोर तापत्रयाने तो जळत नाही.॥६॥ श्रीरामांच्या पायांच्या ठिकाणी ज्यांचे चांगले प्रेम आहे ते नर या सरास कधीही सोडत नाहीत.॥७॥ (म्हणून) ज्याला असे वाटत असेल की या सरात आपण बुडी मारावी त्याने शुद्ध चित्ताने संतसंगतीत याचे श्रवण करावे.॥८॥ अशा या मानसाकडे मानस-नेत्रांनी पाहून कवीच्या बुद्धीने त्यात अवगाहन केले व ती विमल झाली.॥९॥ (त्यामुळे) हृदयात आनंद व उत्साह (स्फूर्ती) पसरला (त्याने) प्रेम व आनंद यांना उसळी येऊन त्याचा प्रवाह वाहेर पडूं लागला॥१०॥
शरयू-रुपक – त्या प्रेमानंद पुराचा जो प्रवाह निघाला तीच कवितारूपी सरिता (उगम पावली) व ती रामचंद्रांच्या विमल यशरूपी जलाने भरलेली आहे. ॥११॥ तिचे नांव सरयू, ती सुमंगलाचे मूळ असून लोकमत व वेदमत हे तिचे दोन किनारे आहेत.॥१२॥ ही नदी सुमानस-नन्दिनी (कन्या) असल्यामुळे पवित्र आहे व कलिमलरूपी गवत व वृक्ष यांचा समूळ नाश करणारी आहे.॥१३॥ दो.- तीन प्रकारच्या (उत्तम, मध्यम, कनिष्ठ) श्रोत्यांचा समाज हीच या नदीच्या काठची खेडी, कसबे व नगरे आहेत. संतसभा हीच अनुपम व सकल सुमंगलाची मुळी अयोध्या आहे.॥दो. ३९॥

जाउनि रामभक्ति सुरसरिते । शरयु सुकीर्ति मनोहर मिळते ॥
सानुज रामसमरयश पावन । मिळे महानद शोण सुशोभन ॥
उभयिं भक्ति सुरधुनी सुधारा । शोभे सहित सुविरतिविचारा ॥
त्रिका त्रासिका त्रय तापांतें । रामस्वरूपसिंधुस जाते ॥
मानसमूळ मिळें सुरसरिते । श्रवत सुजनमन पावन करिते ॥
मधिं मधिं कथा विचित्र विभाग । जणुं सरितीरिंतीरिं वन बाग ॥
जे वर्‍हाडि शिव‍उमाविवाहीं । ते जलचर अगणित विविधाही ॥
रघुवरजन्मिं मोद अभिनंदन । तें आवर्तवीचिसुंदरपण ॥

दो० :- बालचरित चौबंधुकृत वनज विपुल बहुरंग ॥
नृपराज्ञी - परिजनसुकृत मधुकर वारिविहंग ॥ ४० ॥

मनोहर सुकीर्ती शरयू पुढे जाऊन रामभक्ती गंगेला मिळते.॥१॥ बंधू लक्ष्मणासह रामचंद्रांचे रणांगणातील पावन यश हा सुंदर शोणभद्र नद (तेथेच) येऊन मिळाला ॥२॥ शरयू व शोणभद्र या दोघांच्या मधे भक्तीरुपी देवनदीची धारा उत्तम वैराग्य व सुविचार (विमल विवेक व विमल बोध वा ज्ञान) सह शोभते.॥३॥ त्रितापांस त्रास देणारी ही त्रिकरूपी गंगा रामस्वरूप सागराकडे वाहत जाते.॥४॥ या कीर्ती शरयूचे मूळ मानस असून ती सुर-सरितेला मिळाली आहे ती श्रवणाने मन पावन करील, सुजन करील, व सुजनांचे मन पावन करील ॥५॥ मध्ये मध्ये विचित्र कथाचे जे विभाग आहेत, ते जणू या शरायूच्या तीरातीराला असलेली वने व बागा आहेत. ॥६॥ उमा-महेश्वरांच्या विवाहासाठी (शिवासह) जाणारी जी वर्‍हाडी मंडळी ते सर्व या कीर्ती-शरयूतील अगणित व विविध प्रकारचे जलचर प्राणी समजावे ॥७॥ रघुवरांच्या जन्माच्या वेळचा आनंद व त्यानिमित्त अभिनंदनोत्सव हे शरयूतील भोवरे व लहरी यांचे सौंदर्य आहे.॥८॥ दो.- चारी भावांचे जे बालचरित ती विविध वर्णाची कमले होत राजा राण्या व पुण्यवान परिजन हे मधुकर व जलविहंग जाणावे. ॥दो.४०॥

सिता-स्वयंवर कथा मनोहर । व्याप्त नदीमधीं ती छवि सुंदर ॥
सरितीं नावा प्रश्‍न पटु खरे । पटु नाविक सविवेक उत्तरें ॥
ऐकुनि कथन परस्पर करती । सरि-तटिं ते बहु पथिक शोभती ॥
भृगुपतिकोप धार भयखाणी । घाट सुबंधुरामवर-वाणी ॥
राम-विवाहोत्सव भावांसह । सुभग पूर तो सकलसुखावह ॥
श्रवणिं कथनिं हर्षती पुलकती । ते सुकृती मन मुदित मज्जती ॥
सजिति राम‍अभिषेकमंगलां । पर्वकाळिं जणुं समाज जमला ॥
कैकयि-कुमति धरे शेवाळहि । जिचें फल पडे विपत्तिजालहि ॥

दो० :- शमन अमित उत्पात सब भरतचरितजपयाग ॥
कलि-अघ खल‍अवगुण कथन ते जलमलबककाग ॥ ४१ ॥

सीतेच्या स्वयंवराची मनोहर कथा आहे तीच या सुकीर्ती शरयूत व्यापून असलेली सुंदर छबी आहे ॥१॥ उत्तम पटु प्रश्न ह्याच या नदीतील नावा आहेत व विवेकाने दिलेली कुशल उत्तरे हेच नाविक आहेत.॥२॥ श्रवण केल्यानंतर त्या कथा-विषयाची आपापसात जी चर्चा चालते तीच नदीकिनार्‍यावरील प्रवाश्यांचा सुमुदाय होय.॥३॥ भृगुपती-परशुरामाचा भयंकर क्रोध ही या नदीची भयोत्पादक घोर धार आहे आणि सुबंधु लक्ष्मण व राम यांचे सुंदर भाषण हा घाट आहे.॥४॥ भरतादी तिन्ही रामचंद्राचा विवाह महोत्सव हा सुकीर्ती शरयूला आलेला सुभग व सर्वांना सुख देणारा पूर आहे.॥५॥ या कथेचे श्रवण कथन करताना ज्यांना हर्ष होतो व जे पुलकित होतात तेच या कीर्ती शरयूत प्रसन्न चित्ताने स्नान करणारे धन्य होत. ॥६॥ श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकासाठी मंगल वस्तूंची जी जमवाजमव केली गेली तोच जणू काय कीर्ती शरयूवर पर्वकाळी जमलेला यात्रेकरूंचा समुदाय आहे.॥७॥ कैकेयीची दुर्बुद्धी ही जणूं शेवाळ धरली व त्याचा परिणाम म्हणजे नाना प्रकारच्या विपत्तींचे जाळेच कोसळले ! ॥८॥ दो.-अमित उत्पातांचे शमन करणारे भरताचे सर्व चरित्रच जप, याग इ. आहे. कली, कलीची व खलांची पापे व अवगुण यांचे वर्णन हे सुकीर्ती शरयूतील बगळे व कावळे होत. ॥दो. ४१॥

कीर्तिसरित साहीं ऋतुं सुंदर । समयिं सुशोभन पावन बहुतर ॥
हिम हिम-गिरिजा-शंभु-विवाहू । शिशिर सुखद हरिजन्मोत्साहू ॥
वर्णित रामविवाहसमाजा । तो मुदमंगलमय ऋतु-राजा ॥
दुःसह ग्रीष्म राम-वन-गमनचि । पंथकथा खर आतप पवनचि ॥
वर्षा घोर असुररण भारी । सुर - कुल - शालि - सुमंगलकारी ॥
रामराज्य सुख विनय महत्ता । विशद सुखद ती शरदरम्यता ॥
सतीशिरोमणि सियगुणगाथा । तो गुण अमल अनूपम पाथा ॥
भरत सुभाव सुशीतलता ही । सदा एकरस वदवत नाहीं ॥

दो० :- दर्शनिं भाषणिं भेटिमधिं प्रीति परस्पर हास ॥
चौघामाजि सुबंधुता जलमाधुरी सुवास ॥ ४२ ॥

षड्ऋतूरूपक : ही कीर्ती सरिता सही ऋतूत सुंदर असते व विशेष समयी ही विशेष सुंदर व फार पावन करणारी आहे.॥१॥ हिमालय-कन्या पार्वती व शंकर यांचा विवाह हा हेमंत ऋतू होय व रामजन्माचा उत्सव हा सुखद शिशिर ऋतू होय. ॥२॥ रामचंद्रांच्या विवाहाची तयारी व विवाहातील समाजादिकांचे वर्णन-तो आनंद मंगलमय ऋतुराज वसंत होय.॥३॥ रामचंद्रांचे वनगमन हा ग्रीष्म ऋतू असून प्रवासाची कथा हे तीव्र ऊन्ह व तापलेला वारा होय. ॥४॥ घोर राक्षसांबरोबरचे घोर युद्ध हा वर्षा ऋतू असून तो सर्व देवसमाजरूपी साळीचे सुमंगल करणारा आहे. ॥५॥ रामराज्यातील सुख, विनय व महत्ता यांचे वर्णन हाच उज्वल, सुखदायक व रम्य असा शरद ऋतू आहे. ॥६॥ शरयू-रूपकसीतेच्या सदगुणांची गाथा हा या अनुपम जलाचा स्वच्छता हा गुण आहे.॥७॥ भरताचा सद्‌भाव ही या जलातील सुशीतलता असून ती सदा एकरस (सारखी) व अवर्णनीय आहे.॥८॥ दो.-पाहण्यात, भाषणात व भेटण्यात परस्परांविषयी प्रीती व चौघांमधील जी शुद्ध बंधुभावना ती या जलाची मधुरता आहे. व त्या चौघांचा ‍हास तो या जलाचा सुवास आहे.॥दो.४२॥

माझी आर्ती विनति दीनता । लघुता थोडि न सुजलीं ललिता ॥
अद्‍भुत सलिल श्रवणिं गुणकारी । आशातृषामनोमलहारी ॥
पोषि राम सुप्रेमा पाणी । हरी सकल कलि कलुषें ग्लानी ॥
शोषि भवश्रम तोषक तोषा । शमन दुरित - दुखदरिद्रदोषां ॥
कामकोपमद - मोह - विनाशक । विमलविवेकविराग - विवर्धक ॥
करतां सादर मज्जन पाना । पाप हृदयिं परिताप उरत ना ॥
जिहिं या जलिं मानसा ना क्षालित । ते कातर कलिकालें वंचित ॥
तृषित बघुनि रविकरभववारी । फिरतिल जिवमृग दुःखी भारी ॥

दो० :- गणुनि सुजलगुण यथामति मना घालुनी स्नान ॥
स्मरुनि भवानी-शंकरां वदे कथा कवि छान ॥ ४३ रा ॥
रघुपतिपदाब्ज धरुनि हृदिं पावोनियां प्रसाद ॥
अतां वदूं द्वयमुनिवरीं मिलन सुभग संवाद ॥ ४३ म ॥

माझा आर्तपणा, विनंती व दीनपणा हा या सुंदर जलाचा सुंदर हलकेपणा आहे व तो भरपूर आहे.॥१॥ हे जल अदभुत आहे, करण ते नुसत्या श्रवणाने अदभुत गुणकारी असून आशारुपी तृषा व मनोमल यांचा नाश करणारे आहे.॥२॥ हे पाणी राम सु-प्रेमाचे पोषण करते (कारण) ते कली व कलिजनित सकल कलुषांचे व ग्लानीचे हरण करते.॥३॥ ते भवश्रमाचे शोषण करणारे आहे व पाप, दारिद्र्य दु:खादि दोषांचे शमन करणारे आहे.॥४॥ ते काम क्रोध मद मोहादिकांचा विनाश करते आणि विमल ज्ञान व विमल वैराग्य यांची वृद्धी करते.॥५॥ सुकीर्ती शरयूच्या जलात श्रद्धेने आदराने स्नान करून, त्याचे पान करीत राहील्याने हृदयात पाप व परिताप उरत नाही.॥६॥ या जलांत ज्यांनी आपले मन धुतले नाही त्या भ्याडांनां कलिकालाने फसविले.॥७॥ पण ते जीव सुर्यकिरणात उत्पन्न होणार्‍या पाण्याच्या म्हणजे मृगजलामागे धावणार्‍या (मृगां) प्रमाणे भटकत राहून दु:खी होतील.॥८॥ दो.- या उत्तम जलाच्या गुणांची गणना यथामती करून व मनाला त्यात स्नान घालून आणि भवानी शंकरांचे स्मरण करुन आता कवी सुंदर कथा सांगेल.॥दो.४३ रा॥
भरद्वाज याज्ञवल्क्य संवाद – आता रघुपतीच्या पदकमलांना हृदयात धारण करून त्यांचा प्रसाद मिळाल्यावर उभय मुनिश्रेष्ठांची भेट व त्यांचा सुंदर संवाद सांगतो ॥दो. ४३ म॥

भरद्वाज मुनिवरां प्रयागीं । वस्ति, रामपदिं अति अनुरागी ॥
तापस शमदमदयानिधानू । परमार्थीपथिं परम सुजाणू ॥
माघिं मकरगत होतो रवि जैं । तीर्थपतिस येती सर्वहि तैं ॥
किंनर - नर - सुर - असुरश्रेणी । सादर सब मज्जती त्रिवेणीं ॥
माधव-पद-जलजातां पूजति । स्पर्शुनि अक्षयवट तनु पुलकति ॥
भरद्वाज‍आश्रम अति पावन । परम रम्य मुनिवर-मन-भावन ॥
तिथें जमति मुनि ऋषिगण नाना । तीर्थराजिं जे जाती स्‍नाना ॥
हर्षें प्रातःस्नाना सारति । हरिगुण कथा परस्पर सांगति ॥

दो० :- ब्रह्मनिरूपण धर्मविधि वर्णिति तत्त्वविभाग ॥
भगवद्‌भक्ती सांगती ज्ञानासह सविराग ॥ ४४ ॥

मुनिवर भरद्वाज प्रयागात निवास करीत असत व त्यांचे रामपदीं अती प्रेम होते.॥१॥ तपस्वी होते, शमदम व दया यांचा खजिनाच होते व परमार्थ मार्गात परम सुजाण होते.॥२॥ माघ महिन्यात ज्यावेळी सूर्य मकर राशीला येतो (मकर संक्रांत) त्यावेळी सर्व प्रकरचे लोक तीर्थपती प्रयागास येतात.॥३॥ देव, दानव, मानव, किंनर (आदि) यांच्या झुंडीच्या झुंडी येतात व सर्वजण मोठ्या आदराने त्रिवेणीत स्नान करतात.॥४॥ (नंतर ते सर्व) वेणीमाधवाच्या चरण कमलांचे पूजन करतात व अक्षय वटास भेटतात तेव्हा त्यांचे देह पुलकित होतात.॥५॥ भरद्वाजांचा आश्रम अती पावन व परम रम्य असल्यामुळे तो मुनिश्रेष्ठांच्या मनाला आवडणारा आहे.॥६॥ तीर्थराजात स्नान करण्यासाठी येणार्‍या मुनींचे व नाना ऋषींचे समाज तेथे जमतात.॥७॥ ते सर्व जाऊन (त्रिवेणीत) प्रात:स्नान हर्षाने उरकून आपापसांत हरिगुणकथा सांगतात॥८॥दो.- ब्रह्माचे निरुपण, धर्माचे विधिविधान व तत्वविभाग यांचे वर्णन करतात व वैराग्य ज्ञानासहित भगवद्‌भक्ती ते सांगतात.॥दो.४४॥

यापरिं माघीं करिती स्नाना । मग सब जाती निजाश्रमांनां ॥
हा दरसाल लुटिति आनंद । मज्जुनि मकरिं फिरति मुनिवृंद ॥
एक वेळ भरिं मकर मज्जले । सकल मुनीश निजाश्रमिं वळले ॥
परम विवेकी याज्ञवल्क्य मुनि । भरद्वाज राहवि त्यां प्रणमुनि ॥
सादर कृत चरणाब्ज क्षालन । बसवीले आसनिं अति पावन ॥
पूजुनि मुनिसुयशा वाखाणी । बोले अति पुनीत मृदु वाणी ॥
नाथ एक मज संशय भारी । करगत वेदतत्त्व तुज सारीं ॥
गमे लाज भय मज तो वदतां । बहु अकार्य घडतें न सांगतां ॥

दो० :- संत कथिति नीति ही प्रभु! श्रुति पुराण मुनि गात ॥
गुरुशिं कपट करतां नव्हे ज्ञान विमल हृदयांत ॥ ४५ ॥

प्रयागातील माघमास (कल्पवास) : याप्रमाणे माघस्नान करून मग सर्व आपाअपल्या आश्रमास जातात.॥१॥ असा हा आनंद दरवर्षी लुटून मकरस्नान पूर्ण करून मुनिसमाज आपाआपल्या आश्रमास जाण्यास परततात॥२॥ एके वेळी (या प्रमाणे) मकर भर स्नान केले व सर्व मुनीश्रेष्ठ आपापल्या आश्रमास परतले॥३॥ (त्या सर्व मुनीशांमध्ये) याज्ञवल्क्य मुनी परम विवेक संपन्न होते (म्हणून) त्यांच्या पाया पडून भरद्वाजांनी त्यांस ठेऊन घेतले.॥४॥ नंतर आदराने त्यांच्या पदकमलांचे प्रक्षालन केले व त्यास अती पवित्र आसनावर बसविले.॥५॥ त्यांची पूजा करून भरद्वाजांनी त्यांचे सुयश वाखाणले आणि अती पुनीत व अति मृदु वाणीने त्यांना म्हणाले.-॥६॥नाथ! मला एक मोठा संशय आहे आणि सर्व वेदतत्वे तर आपल्या मुठीत आहेत.॥७॥ तो संशय बोलून दाखविण्यासही मला लाज व भीती वाटते, (बरे) न सांगावा तर मोठी हानी घडते ॥८॥ दो.- हे प्रभो! संत अशी नीती सांगतात आणि श्रुती, पुराण, मुनी यानी पण सविस्तर वर्णिली आहे की गुरूशी कपट केल्याने हृदयात विमल ज्ञान होत नाही.॥दो.४५॥

प्रगटि नाथ! निज मोहा म्हणुनी । हरणें, दासा कृपाळु बनुनी ॥
रामनामिं जो प्रभाव मिति नहि । संत पुराण वदति उपनिषदहि ॥
संतत जपति शंभु अविनाशी । शिव भगवंत बोध-गुण-राशी ॥
आकरिं चार जीव जे जगतीं । काशी-मरणिं परमपद लभती ॥
तोहि राम‍महिमा मुनिवर्या । शिव उपदेशा करिति युत दया ॥
तुज पुसतो प्रभु कवण राम ते । वदणें विवरुनि कृपाधाम तें ॥
एक राम तों अयोध्येशसुत । संसारीं तच्चरित्र विश्रुत ॥
नारीविरहें दुःखी पार न । येइ रोष रणिं वधिला रावण ॥

दो० :- प्रभु तो राम किं कुणि दुजा ज्या जपती त्रिपुरारि ॥
सत्यधाम सर्वज्ञ तुम्हिं वदा विवेक-विचारिं ॥ ४६ ॥

म्हणून मी आपला मोह आता प्रगट करीत आहे. हे नाथ! या दासावर कृपा करून तो आपण नष्ट करावा॥१॥ रामनामाचा प्रभाव अमित आहे असे संत, पुराणे व उपनिषदे सुद्धा सांगतात॥२॥ स्वत: ईश्वर षड्गुणैश्वर्य संपन्न भगवान असून ज्ञानराशी, सर्व सदगुणराशी व अविनाशी असून शंभू सुद्धा रामनामाचा जप सतत करीत असतात.॥३॥ जगात जगणारे जे अंडजादि चार खाणीचे जीव आहेत, ते जर काशीत मरतील तर त्यांना परमपदाचा (मोक्षाचा) लाभ होतो.॥४॥ हे मुनि श्रेष्ठा! तो सुद्धा रामाचाच प्रताप आहे; व शिव स्वत: त्यावेळी दयायुक्त होऊन (राम-महावाक्याचा) उपदेश करतात.॥५॥ हे प्रभो ! मी तुला विचारतो की ते रामप्रभु कोणते? आपण कृपेचे माहेरघर आहात, तरी या प्रश्नाचे समाधान विस्ताराने करावे.॥६॥ (कारण) एक राम तर अयोध्या पतीचे पुत्र होते, व त्याचे सर्व चरित्र जगाला ठाऊक आहे.॥७॥ (ते हे की)पत्‍नीच्या विरहाने त्यांना अपार दु:ख झाले व क्रोध येऊन त्यांनी रावणाला युद्धात ठार केले ॥८॥ दो.- हे प्रभो! ज्यांच्या नामाचा जप त्रिपुरारी संतत करीत असतात ते राम व हे अयोध्याधीश राम एकच की तो राम कुणी निराळा आहे, हे आपण ज्ञानयुक्त विचाराने सांगावे, कारण आपण सत्यधाम व सर्वज्ञ आहांत. ॥दो. ४६॥

जाइल जेणें भ्रम मम भारी । प्रभु! अशि कथा वदा विस्तारीं ॥
याज्ञवल्क्य मग वदले सस्मित । तुम्हां रघुपती-प्रभुता सुविदित ॥
रामभक्त तुम्हिं मनवाक्कर्मीं । जाणे तुमची चतुराई मी ॥
गूढ रामगुण ऐकुं बघतसां । प्रश्‍न जणूं अति मूढ करितसां ॥
मन लाउनिं ताता ! श्रुणु सादर । सांगूं रामकथा अति सुंदर ॥
महामोह महिषेश विशालहि । रामकथा कालिका करालहि ॥
रामकथा शशिकिरण-समाना । संत चकोर करिति यत्पाना ॥
करि संशय ऐसेच भवानी । महादेव विस्तृत वाखाणी ॥

दो० :- अतां यथामति सांगुं तो उमा-शंभु संवाद ॥
कारण काळहि सांगतो श्रुणु मुनि, मिटे विषाद ॥ ४७ ॥

जेणे करून माझा भारी भ्रम जाईल अशी कथा हे प्रभू, आपण विस्तार पूर्वक सांगावी ॥१॥ मग याज्ञवल्क्य स्मित करुन म्हणाले की रघुपतिची प्रभुता तुम्हांला चांगली माहीत आहे ॥२॥ तुम्ही मनाने, कर्माने, व वाणीने रामभक्त आहात, मी तुमची चतुराई चांगली जाणली हं!॥३॥ रामगुणांच्या गूढ कथा ऐकण्याची तुमची इच्छा आहे म्हणून जणूं काय अगदी मूढासारखे प्रश्न विचारलेत.॥४॥ हे ताता ! मन लाऊन आदराने श्रवण करा. मी अति सुंदर रामकथा सांगतो.॥५॥ महामोह हा महिषासुर असून तो विशाल आहे व त्याला (मारण्यास) रामकथा ही कालिका देवी आहे आणि ती कराल आहे.॥६॥ रामकथा चंद्र किरणांसारखी आहे व संतरूपी चकोर तिचे पान करतात.॥७॥ भवानीने सुद्धा असेच संशय (प्रगट) केले तेव्हा महादेवांनी विस्तारपूर्वक कथन केले.॥८॥ दो.-तो उमा शंभू संवाद केव्हा झाला व कोणत्या कारणास्तव झाला हे सांगतो व तो संवाद मी आपल्या बुद्धीप्रमाणे सांगतो अहो मुनी ! तो ऐका, त्याने तुमचा विषाद नष्ट होईल.॥४७॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP