॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ९ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

पावन जल सरिता सब वाहति । खग मृग मधुप सुखी सब राहति ॥
सहज वैर सब जीवीं त्यजिलें । प्रेम गिरीवर करिती सगळे ॥
शोभे गिरि गिरिजा गृहिं येतां । रामभक्ति जन जसा पावतां ॥
नित्य नवे मंगल गृहि त्यांचे । ब्रह्मादिक यश गाती ज्याचें ॥
वृत्त सकल नारदा मिळालें । कुतूहलें गिरि-गेहा आले ॥
करि गिरिपति सुस्वागत सादर । प्रक्षालुनि पद दे आसन वर ॥
मुनिपदिं पत्‍नीसह शिर नमवी । चरणसलिल सब भवनिं शिंपवी ॥
निज सौभग्या बहु गिरि गाई । आणुनि घालि मुलिस मुनि-पाईं ॥

दो० :- त्रिकालज्ञ सर्वज्ञ तुम्हिं गति सर्वत्र तुम्हांस ॥
वदा बघुनि मनिं मुनिवर तनयादोषगुणास ॥ ६६ ॥

त्या गिरीवरील सर्व सरिता पवित्र जलाने भरलेल्या वाहू लागल्या; पशु पक्षी, भृंग (मधुप) वगैरे सदा सुखी राहू लागले. ॥१॥ सर्व जीवांनी आपसातील स्वभाव वैर सोडले व सर्व त्या पर्वतावर प्रेम करू लागले. ॥२॥ रामभक्ती प्राप्त झाली. म्हणजे तो रामसेवक रामभक्त जसा शोभतो तसा गिरी गिरीजा घरी आल्याने शोभू लागला. ॥६॥ ब्रह्मदेवादि देव ज्यांचे यश गातात त्या पर्वताच्या घरी नित्य नवे मंगल कार्य होऊ लागले. ॥४॥ हा सर्व समाचार नारदास मिळाला तेव्हा ते कुतूहलाने गिरीच्या घरी आले. ॥५॥ गिरीराजाने आदर पूर्वक उत्तम स्वागत केले व मुनीचे पाय धुऊन त्यास बसावयास सिंहासन दिले. ॥६॥ पत्‍नीसह त्यांच्या पायांना वंदन केले व ते चरण सलील (चरणतीर्थ) आपल्या घरात सगळीकडे शिंपडले. ॥७॥ नंतर शैलराजाने आपल्या महद्‌भाग्याची पुष्कळ प्रशंसा केली आणि मुलीला बोलावून पायांवर घातली.॥८॥ दो. (शैलराज म्हणाले ) – आपण त्रिकालज्ञ व सर्वज्ञ असून आपली गती (गमन) सर्वत्र असते म्हणून हे मुनिश्रेठा, आपण विचार करुन या मुलीचे दोष-गुण काय असतील ते सांगावे. ॥दो. ६६॥

वदले हसुनि गूढ मृदुवाणी । तुमची तनया सब गुणखाणी ॥
सुंदर सहज सुशील शहाणी । नाम उमा अंबिका भवानी ॥
सब लक्षणसंपन्न कुमारी । होइ पतिप्रिय संतत भारी ॥
अचल सदा सौभाग्यहि राहिल । माय बाप यश हिनें पावतिल ॥
होइल पूज्य सकल जगता ही । हिज सेवत दुर्लभ ना कांहीं ॥
हिचें नाम जगिं नारी स्मरतिल । पतिव्रतीं असिधारीं चढतिल ॥
तुमची तनया शैल! सुलक्षण । श्रुणु अवगुण जे दोन चार पण ॥
अगुण अमान जननिपितृहीनहि । उदासीन सब शंकाक्षीणहि ॥

दो० :- जोगी जटिल अकाम मन नग्‍न अमंगल वेष ॥
स्वामि मिळेल असा हिला करीं असे अशि रेख ॥ ६७ ॥

नारदांनी हसून गुढ व कोमल वाणीने म्हटले की तुमची मुलगी सर्व गुणांची खाण आहे. ॥१॥ ती जातीचीच सुंदर, सहजच सुशील व शहाणी आहे. उमा, अंबिका, भवानी ही तिची नावे आहेत. ॥२॥ ही तुमची कन्या सर्व शुभलक्षणांनी युक्त आहे; यामुळे ही निरंतर पतीला प्रिय होईल. ॥३॥ हिचे सौभाग्य सदाच अचल राहील व हिच्या योगाने हिच्या आईबापांची कीर्ती पसरेल. ॥४॥ ही सर्व जगात पूज्य होईल व हिची सेवा केली असता (जगात) काहीच दुर्लभ (रहाणार) नाही. ॥५॥ (फार काय) ज्या स्त्रिया हिचे नामस्मरण करतील त्या त्या जगात पतिव्रत्यरूपी तलवारीच्या धारेवर (सहज) चढतील ॥६॥ शैला, तुमची तनया सुलक्षणी आहे. पण जे दोन चार (थोडे )अवगुण आहेत ते ऐका. ॥७॥ दो. – गुणहीन, मानविहीन, आई नाही – बाप नाही असा उदासीन, सर्व शंकारहित (निर्लज्ज, बेपरवा),॥८॥ जोगडा, मोठमोठ्या जटा असलेला कामवासनारहित, नग्न व अमंगल वेष करणारा असा पती हिला मिळणार आहे, अशी ही रेषा हिच्या हातावर आहे ॥दो. ६७॥

खरी मुनिगिरा परिसुनि गमली । दुःख दंपतिस, उमा हर्षली ॥
भेद नारदाहि न हा कळला । दशा एक परि भाव वेगळा ॥
सकल सखी गिरिजा गिरि मयना । तनु पुलकित जल भरलें नयनां ॥
मृषा नव्हें देवर्षीभाषित । उमा वचन तें दृढ मनिं राखित ॥
उपजे शिवपदपद्यीं स्नेहो । प्राप्तिं कठिण अति मनिं संदेहो ॥
लपवी प्रीतिस कुसमय जाणुनि । सखिउत्संगि बसे मग जाउनि ॥
देवर्षीचें वच मिथ्या नहि । सुज्ञ सखी दंपती सशोक हि ॥
वदे धीर धरुनी गिरिराया । नाथ! वदा करुं कवण उपाया ॥

दो० :- श्रुणु हिमवंता ! मुनि म्हणे ब्रह्मलिखित जें भाळिं ॥
देवदनुज नर नागमुनि कुणि न शक्त जो टाळि ॥ ६८ ॥

मुनींचे भाषण ऐकून (सर्वांस) ते खरे वाटले व दांपत्याला दु:ख झाले पण उमेला हर्ष झाला. ॥१॥ हा भेद नारदांनाही कळला नाही. कारण सर्वांची दशा सारखीच दिसत होती. परंतु भाव मात्र वेगळे होते. ॥२॥ सगळ्या सखी, गिरीजा, गिरी व मेना या सर्वांच्या अंगावर रोमांच उठले आहेत व डोळे पाण्याने भरले आहेत. ॥३॥ देवर्षी नारदांचे भाषण (भाकित) कधी असत्य होणार नाही (हे जाणून) उमेने ते वचन आपल्या हृदयात धारण करून ठेवले (निश्चय झाला की विवाह शिवाशीच होणार). ॥४॥ त्यामुळे शिवपद कमलांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले पण शिवाची प्राप्ती होणे अति कठीण आहे असे वाटून मनात संदेह उत्पन्न झाला. ॥५॥ ही कुवेळ आहे हे जाणून तिने ते प्रेम लपविले. आणि मग जाऊन सखीच्या मांडिवर बसली. ॥६॥ देवर्षीचे वचन कधी खोटे होणे शक्य नाही (हे जाणून) मेना व हिमवान शोकाकुल झालीच पण उमेच्या जाणत्या सखीही शोकाकुल झाल्या. ॥७॥ तेव्हा गिरीराज धीर धरून म्हणाले की नाथ ! आता उपाय काय करू ते सांगा ॥८॥ दो.- मुनी म्हणाले – हिमवंता ! हे पहा की ब्रह्मदेवाने लिहीलेली ललाटरेषा कधी पालटे ना, देव, दानव, मानव, नाग, मुनी इत्यादी कोणीही ब्रह्मलिखित टाळण्यास समर्थ नाहीत. ॥दो. ६८॥

तदपि सांगतो एक उपाया । होई, करी जर दैव सहाय ॥
तुम्हां कथित मी, वर तैसा ही । मिळे उमेला संशय नाहीं ॥
दोष वराचे जे सांगितलें । शिवापाशिं सब हें मज गमलें ॥
शंकारासि जर विवाह होइल । दोषहि गुणसम सर्वहि वदतिल ॥
जरि करि हरि अहिशेजे शयना । तरि बुध कांहीं देति दोष ना ॥
भानु कृशानु सकल रस खाती । कोणि न मंद तयां म्हणताती ॥
सलिल सकल शुभ अशुभ वाहतें । गंगे कुणि अपवित्र न म्हणतें ॥
दोष समर्था नहि हृषिकेशा । रवि-पावक-गंगे-सम लेखा ॥

दो० :- स्पर्धा जर अशि करिति नर जड अभिमानी ज्ञान ॥
पडती कल्पभर नरकिं ते जीव किं ईशसमान ॥ ६९ ॥

तरी मी एक उपाय सांगतो, जर दैव साह्य करील तर कार्य होईल, ॥१॥ पण उमेला मी जसा वर मिळेल म्हणून सांगीतले, तुम्हांस तसा मिळणार यात संशय नाही. ॥२॥ वराचे जे दोष सांगीतले ते सर्व शिवाच्या ठिकाणी आहेत असे मला वाटते ॥३॥ जर शंकरां बरोबर विवाह झाला, तर दोषांना सुद्धा सर्वच लोक गुण, सदगूण समजतील. ॥४॥ भगवान हरी शेष शय्येवर शयन करीत असले तरी शहाणे लोक त्यास दोष देत नाहीत. ॥५॥ सुर्य व अग्नी सगळे रस सेवन करतात तरी त्यास कोणी मुर्ख (मंद) म्हणत नाहीत. ॥६॥ गंगेत तर काय सर्व प्रकारचे जल चांगले, घाणेरडे, (अशुभ), वाहात असते, तरी गंगेला कोणी अपवित्र म्हणत नाहीत. ॥७॥ हृषिकेशाला, सूर्याला, पावकाला व गंगेला जसा दोष नाही तसा समर्थांना दोष लागत नाही. ॥८॥ दो.- मुर्ख माणसे ज्ञानाच्या अभिमानाने, स्पर्धेने अशा (समर्थांचे) चे अनुकरण करतील तर ते कल्पभर नरकात पडतील; जीव कधी ईश्वराचे समान होऊं शकतो कां ? (कधीच शक्य नाही) ॥दो. ६९॥

जाणुनि गंगाजलकृत वारुणि । पान करिति ना संत तया कुणि ॥
गंगे मिळतां पावन जैसें । ईश‍अनीशीं अंतर तैसें ॥
सहज समर्थ शंभु भगवान । या विवाहिं सर्वचि कल्याण ॥
दुराराध्य परि असति महेश्वर । करतां क्लेशां तोषति सत्वर ॥
जर तप तुमची करिल कुमारी । फिरवुं शकति भावीहि पुरारी ॥
जगामाजिं बहुवर विविधा जरि । शिवाहुनी हिज नहिं दुसरा तरि ॥
वरदाता प्रणतार्ति--विभंजन । कृपासिंधु सेवकमनरंजन ॥
इच्छितफळ विण शिव‍आराधन । देति न कोटि योगजपसाधन ॥

दो० :- मुनि असं वदुनी स्मरुनि हरि दे गिरिजे आशीस ॥
हें कल्याण घडे अतां शंका त्याजा गिरीश ॥ ७० ॥

दारू गंगेच्या पाण्याची केली आहे हे जाणून सुद्धा कोणीही संत तिचे पान करीत नाहीत. ॥१॥ पण तीच गंगेत मिळाल्याने पावन होते. तसे अंतर अनीश जीव व ईश यांच्यात आहे. ॥२॥ शंभु सहज समर्थ भगवान आहेत. (म्हणून) या विवाहाने सर्व प्रकारचेच कल्याण होईल. ॥३॥ (तथापि) महेशांची आराधना दुष्कर आहे; परंतु क्लेश केले असता सत्वर संतुष्ट (हि) होतात ॥४॥ तुमची कुमारी जर तप करील तर त्रिपुरारी भावी सुद्धां टाळूं फिरवूं शकतील. ॥५॥ या जगात नाना प्रकारचे पुष्कळ वर जरी असले तरी हिला मात्र शिवाशिवाय दुसरा वर नाही ॥६॥ शंकर वर देणारे, शरणागतांची दु:खे – क्लेश हरण करणारे, कृपासागर व सेवकांच्या मनाचे रंजन करणारे आहेत. ॥७॥ शिवाची आराधना न करता केलेले कोट्यवधी योग, जप इ. साधने ईच्छित फळ देऊं शकत नाहीत. ॥८॥ दो.- असे सांगून हरीचे स्मरण करुन नारद मुनींनी गिरीजेला आशीर्वाद दिला की, हे कल्याण आता होईल व म्हणाले की हे गिरीशा ! तुम्ही सर्व भीती (शंका) सोडा (व स्वस्थ रहा) ॥ दो. ७०॥

मुनि वदुनि विधिभवना वळले । ऐका चरित पुढें जें घडलें ॥
पतिस वदे एकांतीं मयना । नाथ न उमजें मी मुनिवचना ॥
जर घर वर कुल असेल अनुपम । द्यावि वरा अनुरूप सुता मम ॥
ना तर बरें कुमारी राही । प्राणप्रिय मम, कांत! उमा ही ॥
वर जर गिरिजे मिळेल योग्य न । गिरिजड सहज वदतिं जगिं लोक न ॥
हें समजुनि पति करा विवाहा । मग उरदाह न जेणें व्हावा ॥
वदुनि पडे शिर ठेवुनि पायां । सुस्नेहें वदले गिरिरया ॥
अग्नि निघे हिमकरिं जरि पाही । नारदवचन अन्यथा नाहीं ॥

दो० :- प्रिये शोक सब सोड हा स्मर कीं श्रीभगवान ॥
पार्वतीस जो निर्मि तो करिल सकल कल्याण ॥ ७१ ॥

असे सांगून नारदमुनी ब्रह्मलोकास गेले.
पार्वती तपस्या प्रकरण – (याज्ञवल्क्य भारद्वाजांस सांगतात) – आता पुढे जे चरित्र घडले ते ऐका - ॥१॥ मयना एकांतात पतीला म्हणाली की नाथ ! मुनींचं बोलण मला काही कळल नाही. ॥२॥ जर वर, घर, व कुळ अनुपम ( सर्वात उत्तम ) असेल तरच माझ्या मुलीला अनुरुप अशा वराला मुलगी द्यावी. ॥३॥ नाहीतर ती अविवाहित ( कुमारिका ) राहीली तरी चालेल ! प्रिया ! ही उमा मला प्राणप्रिय आहे. ॥४॥ गिरिजेला योग्य असा वर जर मिळाला नाही तर लोक सहजच म्हणतील गिरी सहज जड आहे, नाही का म्हणणार ? ॥५॥ पतीदेवा ! या गोष्टीचा विचार करूनच मुलीचा विवाह करावा म्हणजे मग पाठीमागून हृदयात जळजळ व्हायला नको. ॥६॥ असे म्हणून पायांवर डोके ठेऊन पडली; तेव्हा गिरीराज अतिस्नेहाने म्हणाले - ॥७॥ हे पहा, की एकवेळ हिमकरांतून अग्नी निघाला तरी सुद्धा नारदाचे वचन कधीही फिरवतां, टाळता येणें शक्य नाही. ॥८॥ दो. – प्रिये - ! हा तुझा सर्व शोक सोड पाहूं ! व श्री भगवंताचे स्मरण कर, ज्याने पार्वतीला निर्माण केली तो सगळे काही कल्याण करील ( अशी खात्री असूं दे ) ॥दो. ७१॥

स्नेह सुतेवर असे अतां जर । द्या जाउनि उपदेश असा तर ॥
करि तप जेणें महेश मिळती । अन्य उपायें क्लेश न टळती ॥
नारदवचन सगर्भ सहेतू । सुंदर सब गुणनिधि वृषकेतू ॥
अशा विचारें धर न आशंका । शंकरि जागा नाहिं कलंका ॥
हर्षें मनिं पतिवचन ऐकुनी । गत गिरिजेप्रति सत्वर उठुनी ॥
उमे बघुनि लोचनि जल येई । स्नेहें तिज मांडीवर घेई ॥
वारंवार धरी उरिं तिजला । कंठ दाटला शब्द नुमटला ॥
जगदंबा सर्वज्ञ भवानी । मातृसुखद वदली मृदुवाणी ॥

दो० :- पडले माते स्वप्न तें वदतें ऐक विशेष ॥
सुंदर गौर सुविप्रवर मज करि हा उपदेश ॥ ७२ ॥

जर मुलीवर तुमचा स्नेह असेल तर आता ( तिला ) जाऊन असा उपदेश करा की - ॥१॥ शंकरांची ( पती म्हणून ) प्राप्ती होईल असे तप ती करील – दुसर्‍या कोणत्याही उपायांनी क्लेश टळण्यासारखे नाहीत. ॥२॥ नारदांचे बोलणे भावगर्भित ( रहस्यपूर्ण ) व हेतूपूर्वकच होते ( त्यातले सार हेच की ), शंकर वृषकेतू असून सर्वस्वी सुंदर व सर्व सदगुणांचे निधान आहेत. ॥३॥ हा विचार करून तुम्ही शंकरां विषयी कोणतीही शंका धरु नका. शंकरांच्या ठिकाणी ( कोणत्याही ) कलंकाला जागाच नाही. (ते पूर्ण निष्कंलंक आहेत. ) ॥४॥ पतींचे वचन ऐकून मेनेला मनात हर्ष झाला व ती उठून ( सकाळी ) त्वरेने गिरीजेकडे जेली. ॥५॥ उमा दृष्टिस पडताच मेनेचे नेत्र पाण्याने भरले व तिने तिला उचलून चटकन स्नेहाने मांडीवर घेतली. ॥६॥ तिला वारंवार हृदयाशी ( धरून ) कवटाळली, कंठ दाटून आला व शब्द उमटेनासा झाला ॥७॥ जगन्माता सर्वज्ञ भवानी अत्यंत कोमल व मातेस सुखद अशी वाणी बोलली ॥८॥ दो०- आई, मला एक विशेष स्वप्न पडल बरं कां, ( रात्रीच्या ब्राह्ममुहूर्ती ) ते मी सांगते ऐक हं ! एका सुंदर गोर्‍यापान सुविप्रवराने मला असा उपदेश केला. ॥दो० ७२॥

कर तप शैल कुमारी जाउनि । नारद वचना सत्यचि जाणुनि ॥
रुचतें हें मत ताता माते । दोष दुःख हरि तप सुखदाते ॥
तपोबलें रचि विश्व विधाता । विष्णु तपबलें जगतां त्राता ॥
तपोबलें करि हर संहारा । शेष तपबळें धरि महिभारा ॥
सृष्टिस तप आधार भवानी । जाउनि तप करधर हें ध्यानीं ॥
माता विस्मित वचना ऐकुनि । सांगे स्वप्न गिरिस बोलावुनि ॥
समजाउनि बहु ताता माते । हर्षें गेली उमा तपातें ॥
प्रिय परिवार पिता नी जननी । होति विकल वच नुमटे वदनीं ॥

दो० :- समजाविति सकला मुनि वेदशिरा येऊन ॥
पार्वति-महिमा परिसुनी राहति बोध ठसून ॥ ७३ ॥

हे शैलकन्ये, नारदांनी सांगीतलेले अगदी सत्य आहे, हे जाणून तू वनात जाऊन तप कर ॥१॥ तुझ्या आईबापांना सुद्धा वाटते की तू तप करावेस कारण तप दु:ख दोषांचा नाश करून सुख देणार आहे. ॥२॥ तपाच्या बळावर विधाता विश्वाची रचना करतात, तपोबळानेच विष्णू सर्व भुवनांचे रक्षण – पालन करतात. ॥३॥ तपोबळानेच हर ( शंभु ) जगाचा संहार करतात. व तपोबळानेच शेष महीचा भार धारण करू शकतो ॥४॥ सृष्टी तपाच्या आधारावरच ( चालली ) आहे; म्हणून हे भवानी ! हे ध्यानात ठेवून तू जाऊन तप कर. ॥५॥ पार्वतीचे भाषण ऐकून तिची आई आश्चर्यचकित झाली. व गिरीला बोलावून आणून सगळे स्वप्न त्यांचे कानी घातले. ॥६॥ ( मग ) आईबापांची पुष्कळ समजूत घालून, हर्षित होऊन उमा तपासाठी निघून गेली. ॥७॥ सगळा प्रिय परिवार पिता व माता ( शोकाने ) व्याकूळ झाली व त्यांच्या तोंडातून शब्द सुद्धा निघेना. ॥८॥ दो०- तेव्हा वेदशिरा नावाचे मुनी तेथे आले व त्यांनी सर्वांची समजूत घातली. पार्वतीचा महिमा ऐकून, त्यांनी केलेला उपदेश सर्वांच्या हृदयात ठसला व सर्वजण ( घरी ) राहिले. ॥दो० ७३॥

धरि उरिं उमा प्राणपति-चरणां । गत वनिं लागे तप-आचरणा ॥
अति कोमल तनु योग्य तपा ना । स्मरुनि पतिपदां त्यजि भोगांनां ॥
नित्य अधिक मन पदिं अनुरागे । विसरे देह तपीं मन लागे ॥
बाइ मूल फल वर्षे दशशत । शाक खात संवत्सर शत गत ॥
किति दिन गेले जल-वातावर । करि उपवास कठिण किते वासर ॥
बिल्वपत्र पडलेलें वाळुनि । तें वर्षें त्रय सहस्त्र खाउनि ॥
पुन्हां त्यागि ती शुष्कहि पर्णा । उमे नाम तैं पडे अपर्णा ॥
क्षीण बघुनि अति उमाशरीरा । ब्रह्मगिरा गगनीं गंभीरा ॥

दो० :- सुफल मनोरथ होइ तव श्रुणु गिरि-राज-कुमारि ॥
क्लेशां दुःसह थांबवी मिळति अतां त्रिपुरारि ॥ ७४ ॥

उमा वनात गेली व आपल्या प्राणपतीच्या ( शिवाच्या ) चरणांना हृदयात धारण करून तपश्चर्या करुं लागली ॥१॥ तिची तनू अतिकोमल असल्याने तप करण्यास योग्य नव्हती तरी तिने पती – पदांचे स्मरण करून ( सर्व ) भोगांचा त्याग केला. ॥२॥ तिच्या मनात पतिपद प्रेम रोज अधीकाधीक वाढूं लागले व देहाचा विसर पडून मन अधिकधिक तपात लागू लागले.
पार्वती तपस्या वर्णन – तिने १००० वर्षे फळमुळे खाऊन काढली. (नंतर) १०० वर्षे भाजीपाला खाऊन संपविली ॥ ४ ॥ काही दिवस पाण्यावर काढले व काही दिवस वायुभक्षण करून राहू लागली, नंतर काही दिवस कठीण उपवास केले. ॥५॥ जमिनीवर पडलेले, सुकलेले बेलाचे पान खाऊन तिने तीन हजार वर्षे काढली. ॥६॥ पुन्हा तिने वाळलेले बिल्वपत्र खाण्याचेही सोडले तेव्हा उमेला ‘अपर्णा’ हे नांव पडले. ॥७॥ उमेचे शरीर तपाने अतिक्षीण झालेले पाहूने आकाशात गंभीर ब्रह्मवाणी झाली की, ॥८॥ दो० हे गिरिराज कुमारी ! ऐक तुझा मनोरथ पूर्ण झाला असे समज; व दु:सह क्लेश पुरे कर. आता तुला त्रिपुरारिंची प्राप्ती होईल. ॥ दो ० ७४ ॥

कोणि न कृत तप असें भवानी । बहुत धीर मुनि झाले ज्ञानी ॥
धर हृदिं अतां वर वाणी । सदा सतत शुचि सत्य जाणुनी ।
येइ पिता बोलावूं जेव्हां । हट्ट सांडुनी जा घरिं तेव्हां ॥
सप्त ऋषी भेटती तुम्हां जैं । सत्य गणावी श्रेष्ठ गिरा तैं ॥
श्रवुनि गिरा विधि गगनीं वर्णित । हर्षित गिरिजा शरीर पुलकित ॥
उमाचरित मी कथिलें सुंदर । ऐका शंभु-चरित्र मनोहर ॥
जाउनि सती तनू जैं त्यागी । तैं पासुनि शिवचित्त विरागी ।
जपती रघुपति नामा संतत । रामगुणगणां कुठेंहि ऐकत ॥

दो० :- चिदानंद सुखधाम शिव विगत मोहमदकाम ॥
महिवरि फिरती हृदयिं हरि सकल लोक अभिराम ॥ ७५ ॥

हे भवानी ! आजपर्यंत पुष्कळ धीर ज्ञानी मुनी होऊन गेले पण असे तप कोणीही केले नाही ॥१॥ आता ही ब्रह्माचीि श्रेष्ठ वाणी सदा सर्वदा पावन व सत्य जाणून मनात ठेव. ( विसरू नको. कोणास सांगू नको ) ॥२॥ व जेव्हा तुझे वडिल बोलावण्यास येतील तेव्हा हट्ट न करतां घरी जा. ॥३॥ ज्यावेळी सप्तर्षी तुम्हांस भेटतील त्यावेळी श्रेष्ठ वाणी सत्य मानावी. ॥४॥ आकाशात वर्णित विधी वाणी ऐकून गिरीजेला हर्ष झाला व तिच्या अंगावर रोमांच उभे राहीले. ॥५॥ असे उमेचे सुंदर चरित्र मी वर्णिले; आता शंभूंचे मनोहर चरित्र ऐका. ॥६॥
शंभू – चरित्र प्रकरण – जेव्हा सतीने जाऊन देहत्याग केला तेव्हा पासूने शिवाचे मन विरागी बनले. ॥७॥ ते सदा सर्वकाळ रघुपतीच्या ( राम ) नामाचा जप करुं लागले व कुठेही रामगुणगणांचे श्रवण करुं लागले. ॥८॥ दो० – चिदानंदस्वरुप सुखाचे माहेरघर मोहमदकाम विरहित असलेले व ज्यांच्या हृदयात सर्व लोकांना आनंद देणार हरी आहेत असे शिव पृथ्वीवर संचार करु लागले. ॥दो० ७५ ॥

कुठें प्रबोधिति मुनिनां ज्ञाना । कुठें वानिती राम-गुणांनां ॥
अकामही भगवान सुज्ञ जरि । भक्तविरहदुःखें दुःखी तरि ॥
बहुत काळ गेला या रीतीं । नित्य नवी रामांघ्रीं प्रीती ॥
शंकर नेमा प्रेमा पाहुनि । भक्ति चिन्ह अविचल हृदिं लक्षुनि ॥
प्रगटति राम कृतज्ञ कृपालू । रूपशीलनिधि तेज विशालू ॥
बहुपरि राम शंकरा वानिति । कोण तुम्हांविण हें व्रत पाळिति ॥
राम शिवा विविधा समजावति । जन्मकथा पार्वतिची सांगति ॥
करणी गिरिजेची अति पावन । विस्तारें वानिती कृपाघन ॥

दो० :- श्रुणु मम-विनती अतां शिव । स्नेह मजसि जर साच ॥
जाउनि गिरिजे उद्वहा हें मी मागत द्याच ॥ ७६ ॥

कुठे मुनींना ज्ञानाचा उपदेश करीत असत तर कुठे रामगुणांचे विस्ताराने कथन करीत असत. ॥१॥ जरी ते अकाम होते तरी भगवान व सुजाण असल्यामुळे भक्तविरह दु:खाने दु:खी होते ॥२॥ याप्रमाणे पुष्कळ काळ निघून गेला, व ( त्या काळात ) श्रीरामचंद्र चरणांच्या ठिकाणी नित्य नवी प्रीती होत गेली. ॥३॥ ( भगवान रामचंद्रांनी ) शंकरांनी चालविलेला नेम व त्यांचे प्रेम ( पार्वतीवरील ) जाणले – पाहीले, व हृदयातील निश्चल भक्तीचे लक्षण ( खूण ) ही ओळखले ॥४॥ ( तेव्हा ) कृतज्ञ, कृपालू, रुप व शीलाचे भांडार व अपार तेजस्वी राम शंकरांपुढे प्रगट झाले. ॥५॥ रामांची शिवाकडे मागणी - रामांनी नाना प्रकारे शंकरांची प्रशंसा केली व म्हणाले की अशा प्रकाराच्या व्रताचे पालन तुमच्या शिवाय कोण करणार ? ( अर्थात कोणीही नाही ). ॥६॥ रामांनी नाना प्रकारांनी शिवाची समजूत घातली व पार्वतीच्या जन्माची सर्व हकीकत सांगितली ॥७॥ अतिपावन अशा गिरीजेची अतिपावन करणी कृपाधनांनी सविस्तर वर्णन केली. ॥८॥ दो ० – हे शिव, आता माझी इतकी विनंती ऐका ! तुमचे माझ्यावर जर खरेच प्रेम असेल तर तुम्ही जाऊन गिरीजेशी विवाह करा, हे मागणे मी मागत आहे, इतके द्याचं. ॥ दो० ७६ ॥

शिव वदले हें उचित नसे जरि । नाथवचन मज न भंगवे तरि ॥
पालन आज्ञा धरुनी माथां । परम धर्म हा अमचा नाथा ॥
माता - पिता - गुरु - प्रभुवचनें । शुभ जाणुनि, विण विचार करणें ॥
तुम्हीं परमहितकारि सर्वपरिं । आज्ञा अपुली नाथ शिरावरि ॥
प्रभु वदले कृत पूर्ण हरा पण । कथित आम्हिं तें म्नीं धरा पण ॥
अंतर्धान वदुनि असं पावति । त्या मूर्तिस शंकर उरिं राखति ॥
तों ऋषि सप्त निकट शिव आले । प्रभु सुंदर अति वचन बोलले ॥

दो० :- प्रेम-परिक्षा पोचुनी पार्वतिपाशिं पहावि ॥
प्रेरुनि गिरि संशय हरुनि धाडुन सदना द्यावि ॥ ७७ ॥

शिव म्हणाले की जरी असे करणे उचित नाही तरी पण हे नाथ ! ( स्वामी ) आपल्या वचनाचा भंग करणे मला शक्य नाही. ॥१॥ कारण हे नाथ ! आपली आज्ञा शिरसावंद्य मानून पालन करणे हा आमचा सेवकांचा धर्म आहे ॥२॥ माता – पिता – गुरु व प्रभू यांचे वचन शुभच आहे असे मानून ( कोणताही ) विचार न करता पालन केले पाहीजे. ॥३॥ आपण तर सर्व प्रकारे परम हितकर्तेच आहात, म्हणून नाथ ! आपली आज्ञा मला शिरोधार्य आहे. ॥४॥ भक्ती विवेक व धर्मयुक्त रचना असलेल्या शंकरांच्या भाषणाने प्रभू संतुष्ट झाले ॥५॥ प्रभू ( राम ) म्हणाले, हे हरा ! तुमचा पण पूर्ण झाला, बरं, पण आम्ही जे प्रेमाने सांगीतले ते ( चांगले ) स्मरणात असू द्या ॥६॥ असे सांगून प्रभू अंतर्धान पावले. त्याच मूर्तीला शंकरांनी आपल्या हृदयात ठेवली. ॥७॥ तोच सप्तर्षी शिवाजवळ आले तेव्हा शंकर त्यांच्या जवळ सुंदर वचन बोलले. ॥८॥ दो ० – तुम्ही पार्वतीपाशी जाऊन तिच्या प्रेमाची परीक्षा पहा व गिरिराजाला प्रेरणा देऊन सर्व संशय निरसन करुन तिला घरी पाठवून द्या ॥दो० ७७॥

तैं ऋषी गौरीपाशी आले । बघुनि दशा ते विस्मित झाले ॥
गौरी दिसली ऋषींस कैसी । मूर्तिमंत तपस्या जैसी ॥
ऐक वदति मुनि शैलकुमारी । कारण कवण करां तप भारी ॥
कुणा उपासुनि काय इच्छितां । सत्य मर्म कां आम्हां न वदतां ॥
वदत मर्म अति मन संकुचतें । ऐकुनि हसाल अमचे जडते ॥
हट्ट धरी मन मानि न शिकवण । भिंत वारिवर बांधु पाहि पण ॥
नारद कथितचि सत्य मानतों । पंखाविण आम्हिं उडूं पाहतों ॥
पहा मूनी आमची मूर्खता । इच्छूं सदा शिवासी भर्ता ॥

दो० :-परिसुनि ऋषि वदले हसत गिरिसंभव तव देह ॥
नारद वचनां मानितां राहि कुणाचें गेह ॥ ७८ ॥

सप्तर्षीनी पार्वतीची घेतलेली ( प्रेम ) परीक्षा –
ते सप्तर्षी ( लगेच ) गौरीजवळ आले व तिची दशा पाहून ते आश्चर्य चकित झाले. ॥१॥ ऋषींना गौरी कशी दिसली म्हणाल तर ‘मूर्तीमंत तपस्याच’ ! ॥२॥ मुनी म्हणाले – शैलकुमारी ! ऐका, ही दारुण तपस्या कोणत्या कारणाने करीत आहांत ? तुम्ही कोणाची उपासना करीत आहांत व तुमची इच्छा काय आहे, याचे खरे खरे मर्म आंम्हाला कां सांगत नाही ? ॥४॥ ( आधी ) बोलण्यासच संकोच वाटतो व मर्म सांगण्याला तर या मनाला अतिलाज वाटत आहे. ( कारण ) तुम्ही ते ऐकलेत की आमच्या मूर्खपणाला हसालच. ॥ ५॥ ( पण काय करणार ) मन असं हट्टाला चढलयं की किती शिकवलं तरी मानीत नाही आणि पाण्यावर भिंत बांधण्याचा प्रयत्‍न मात्र करीत आहे. ॥६॥ नारदांनी जे कांही सांगीतले तेच आम्ही खरे मानतो व पंख नसून उडण्याची इच्छा करीत आहोत. ॥७॥ अहो मुनीश्रेष्ठ ! आमचा मुर्खपणा तर पहा की सदाशिवच भर्ता असावेत असी आमची इच्छा आहे. ॥८॥ दो० – पार्वतीचे भाषण ऐकून ऋषी हसत हसत म्हणाले की ( बोलून चालून ) तुझा देह पर्वतापासूनच झालेला ! नारदाचा उपदेश मानल्याने कोणाचे घर शिल्लक राहीले आहे सांग पाहूं ? ॥दो ० ७८ ॥

दक्ष सुतां उपदेशिति जाउनि । बघती ते न भवनमुख येउनि ॥
चित्रकेतुघर तेच भंगविति । कनककशिपुचि ती गति करविति ॥
मानिति नारदवच नरनारी । त्य्जुनि खचित घर बनति भिकारी ॥
मन कपटि वर सज्जन दिसतो । अपणांसम सकलां करुं बघ्तो ॥
तद्वचनीं ठेवुनि विश्वासा । करुं बघतां पति सहज उदासा ॥
अगुण अलज्ज कुवेष कपाली । अकुल दिगंबर अगृही व्याली ॥
वदा कवण सुख मिळुनि असा वर । ठकें ठकवितां बहु ठकलां बर ॥
शिवें पंचमतिं सती विवहित । फंदिं पाडुनी त्यजुनि मारवित ॥

दो० :- सुखें निजे शुच ना अतां भीक मागि भव खाइ ॥
सहज एकट्याचें गृहीं स्त्री कधिं टिकलीं जाइ ॥ ७९ ॥

नारदांनी स्वत: दक्षाच्या पुत्रांजवळ जाऊन त्यांस उपदेश केला; ( झाले ! ) त्यानी पुन्हा येऊन घराचे तोंड सुद्धा पाहीले नाही ॥१॥ चित्रकेतूच्या घराचा नायनाट त्यांनीच केला व हिरण्यकशिपुची काय गती करविले ती प्रसिद्धच आहे. ॥२॥ स्त्रिया असोत की पुरुष असोत जे कोणी नारदाचे वचन ऐकतात ते घर सोडून भिकारी बनतात हे नक्की आहे. ॥३॥ तो वरवर दिसायला मात्र सज्जन आहे पण त्याचे मन कपटी आहे. तो सगळ्यांना आपल्यासारखे ( भिकारी ) करुं बघत असतो. ॥ ४ ॥ त्याच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवलात व जो सहजच उदास आहे तो आपला पती व्हावा ही इच्छा बाळगंतां ? ॥५॥ ( याला काय म्हणावे ! ) गुणहीन, निर्लज्ज, कुवेष करणारा, प्रेताची कवटी हातात घेणारा, कुलहीन, नागडा घरदार नसलेला व मोठमोठे भुजंग अंगावर धारण करणारा ॥६॥ असा नवरा मिळून तुम्हांला कोणते सुख होणार ते सांगा; त्या ठकाने तुम्हांला ठकविल्या व तुम्ही चांगल्याच फसलांत बरं कां ! ॥७॥ शिवांनी सतीशी विवाह केला तोच पंचाच्या आग्रहाने, नि मग त्या सतीला काही तरी फंदात पाडली, त्याग केला नी ( शेवटी ) तिला ठार मारविली की हो ! ( तुम्हाला हे कळले नसावे बहुतेक ) ॥८॥ दो० – आता शोक ना चिंता, आता खुशाल झोपा ताणतात (शंकर ), भिक्षा मागतात व खातात. जे स्वभावताच एकलकोंडे आहेत त्यांच्या घरी स्त्रीचा टिकाव कधी तरी लागेल कां ? ( मुळीच शक्य नाही ). ॥ दो० ७९ ॥

अझुनि आमचें वच माना बरं । आम्हिं पाहिला तुम्हां बरा वर ॥
अति सुंदर शुचि सुशील सुखदहि । यद्यश लीला गाती वेदहि ॥
दूषणरहित सकलगुणरासी । श्रीपति पुर वैकुंठ निवासी ॥
तुम्हां असा वर देउं मिळवुनी । ऐकुनि वदे भवानी हसुनी ॥
सत्य वदां तनु ही गिरिभव खरि । हट्ट सुटेना सुटे देह जरि ॥
कनक पहा पाषाणिं जाहले । त्यजी स्वभाव न जरी जाळलें ॥
म्यां नारदवच नच परिहरणें । राहो गृह जावो ना डरणें ॥
विश्वास न गुरुवचनीं ज्यासी । स्वप्निं सुगम सुख सिद्धि न त्यासी ॥

दो० :- महादेव अवगुण भवन विष्णु सकलगुणधाम ।
ज्याचे मन रमलें जिथें त्याला तिथेंच काम ॥ ८० ॥

अजूनी तरी आम्ही बरं सांगतो ते माना, आम्ही तुमच्यासाठी एक चांगला वर योजला आहे. ॥१॥ तो अतिसुंदर अतिपावन, अति सुशील व अति सुखदायक सुद्धा आहे. वेद सुद्धा त्याचे यश व लीला गातात. ॥ २ ॥ तो पूर्ण दोषरहित असून सकाल सदगुणांची रास आहे, तो लक्ष्मी – पती असून वैकुंठ पुरीत निवास करतो ॥२॥ असा वर आम्ही देतो मिळवून तुम्हांला हे ऐकून भवानी हसली व म्हणाली - ॥४॥ आपण अगदी सत्य म्हणालात हा देह गिरीपासून झाला आहे हे खरंच आहे, ( आणि म्हणूनच ) हा देह जरी गेला तरी हट्ट मात्र सुटणार नाही. ॥ ५ ॥ असं पहा की सोनं पाषाणाच्या पोटी जन्माला येतं ( त्यामुळे ) त्याला कितिही जाळलं तरी ते आपला जन्मस्वभाव ( सहज कठिणता ) सोडीत नाही ॥ ६ ॥ मी नारदांच्या वचनाचा त्याग करणे शक्य नाही, मग घर वसो नाहीतर बसो, त्याला भिणे शक्य नाही. ( तुम्ही कां घाबरतां ? ) ॥ ७ ॥ ( कारण ) गुरुच्या वचनावर ज्याचा विश्वास नाही त्यास सुख व कार्यसिद्धी स्वप्नातही मिळणे शक्य नाही. ॥ ८ ॥ दो० – महादेव अवगुणांचे घर ( असतील ) व विष्णू सकल सदगुणांचे निवासस्थान ( असतील ) पण ज्याचे मन जेथे ( एकदा ) रमले, त्याला त्याच्याशीच काम ( तेथे इतरांचा काय उपयोग ? ) ॥ दो० ८० ॥

प्रथम मुनीश तुम्हीं येतां जर । धरत्यें तुमचें वचन शिरावर ॥
हरलें मी मम जन्म हरा जर । कोण दोष गुण बघे अतां तर ॥
जर मन तुमचें हठ सोडी ना । लग्न जमविल्याविण राहीना ॥
कौतुकि पुरुषां आळस नाहीं । अमित जगामधिं वर कन्या ही ॥
कोटि जन्म हठ करिन तपासी । राहिं कुमारि किं वरिन शिवासी ॥
त्यजीं कधिं न नारदवचना पण । शिव शतदां सांगति जरि आपण ॥
धरतें पाय वदे जगदंबा । धरिं जावें कां करां विलंबा ॥
प्रेम बघुनि मुनि वदले ज्ञानी । जय जय जगदंबिके भवानी ॥

दो० :- तुम्हिं माया भगवान शिव सकल विश्वपितृमाय ॥
निघति नमुनि मुनि शिरपदीं कितिदां हर्षित काय ॥ ८१ ॥

अहो मुनीश्रेष्ठ ! आपण जर प्रथम ( नारदांपूर्वी ) आला असता तर मी तुमचा उपदेश शिरसा मान्य केला असता. ॥१॥ मी जर स्वत:चा जन्म हरासाठी वेचला तर आता दोषगुणांचा विचार कोण करणार ? ॥२॥ आपल्या मनात लग्न जमविण्याचेच आले असेल व ते ( मन ) हट्ट सोडीत नसेल ॥ ३ ॥ तर कौतुकी पुरुषांना आळस माहीत नसतो जगात भरपूर वर आहेत व वाटेल तवढ्या कन्या आहेत ( बसा सर्वांची लग्ने जुळवीत ! ) ॥ ४ ॥ कोटी जन्म घ्यावे लागले तरी हा हट्ट व हे तप काही सुटणार नाही; विवाह करीन तर शंकरांशीच नाहीतर अविवाहित राहीन. ॥ ५ ॥ पण नारदांच्या उपदेशाचा त्याग कधीच करणार नाही ( मग ) स्वत: शंकरांनी शंभर वेळां सांगितलं तरी ते घडणार नाही ॥ ६ ॥ जगदंबा म्हणाली की मी ( आता ) आपल्या पाया पडते, आता आपण घरी जावे ( उगाच ) उशीर कां करतां ? ॥ ७ ॥ तिचे ते प्रेम पाहून ज्ञानी सप्तर्षी म्हणाले – ‘ जय जगदंबे, जय भवानी ’ ॥ ८ ॥ दो० – नंतर पुढे ते म्हणाले की – तुम्ही माया आहांत व भगवान शिव आहेत, तुम्ही तर विश्वाचे माता – पिता आहांत असे म्हणून त्यांनी तिच्या चरणांवर मस्तक टेकविले व ते निघाले ( तेव्हा ) त्यांचे देह कितीदां तरी रोमांचित झाले. ( आनंदाने ) ॥ दो० ८१ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP