|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ लंकाकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय २ रा Download mp3 दो० :- पवनतनयवच ऐकुनी विहसति राम सुजाण ॥ पवनतनयाचे वचन ऐकून सुजाण राम मोठ्याने हसले व नंतर दक्षिण दिशेकडे पाहून कृपानिधान प्रभु म्हणाले, ॥ दो० १२ म ॥ बघ किं बिभीषण दक्षिण आशे । घन घमंड दामिनी विलासे ॥ दो० :- छत्र मुकुट ताटंक तैं तोडी एकचि बाण । रावणसभेचा महारसभंग – बिभीषण ! ( जरा ) दक्षिण दिशेकडे बघ की, मेघांनी कशी गर्दी केली आहे, वीज चमकत आहे. ॥ १ ॥ आणि मोठ मोठे ढग कसे मधुर मधुर गर्जत आहेत कठीण गारांचा पाऊस न पडो म्हणजे झाले. ॥ २ ॥ बिभीषण म्हणाला हे कृपाला, ही वीजही नाही, व मेघमालाही नाही. ॥ ३ ॥ लंका शिखरावर एक मंदीर आहे व तिथे जलसा चालू आहे व दशानन तेथे तो पहात आहे. ॥ ४ ॥ रावणाच्या मस्तकावर जे मेघडंबरी छत्र आहे तीच जणूं मेघांची फार काळी श्रेष्ठ ढगांची रास आहे. ॥ ५ ॥ मंदोदरीच्या कानात जी कर्णफुले आहेत, त्या हे प्रभु ! त्या विजा चमकत आहेत. ॥ ६ ॥ टाळ, मृदुंग अनुपम वाजत आहेत तोच हे सुरश्रेष्ठा ! तो मधुर मधुर ध्वनि होय. ॥ ७ ॥ रावणाला अभिमान झाला आहे हे जाणून प्रभूंनी स्मित केले व धनुष्य सज्ज करुन त्यावर बाण लावून नेम धरला. ॥ ८ ॥ एकाच बाणाने छत्र, मुकुट व ताटंक तोडून टाकली सर्वांच्या देखत छत्रादि भूमीवर पडली पण त्यातले मर्म कोणालाच कळले नाही . ॥ दो० १३ रा ॥ अशी लीला करुन रामबाण परत आला व त्याने भात्याचा आश्रय घेतला. महारसभंग झालेला पाहून रावणाची सर्व सभा भयभीत झाली. ॥ दो० १३ म ॥ भूमिकंप नहि नसे प्रभंजन । अस्त्र शस्त्र बघती न विलोचन ॥ दो० :- विश्वरूप रघुवंशमणि धरा वचनिं विश्वास ॥ भूकंप नाही की सोसाट्याचा वारा नाही, व अस्त्रशस्त्रादिही कोणाच्या डोळ्यांना दिसले नाही. ॥ १ ॥ सभेतील सारी मंडळी आपापल्या मनात सचिंत आहेत, कारण फारच मोठा अपशकुन झाला. ॥ २ ॥ दशाननाने सर्व सभा भयभीत झाल्याचे पाहीले व मोठ्याने हसून तो युक्तीने भाषण करु लागला. ॥ ३ ॥ मस्तके गळून सुद्धा ज्याचे सदा सर्वदा शुभच झाले त्याला मुकुट पडल्याचा कसला अपशकुन ? ॥ ४ ॥ जा, आपापल्या घरी जाऊन झोपा. रावणाला मस्तक नमवून सगळे घरी गेले, जेव्हा कर्णफुले जमिनीवर गळून पडली तेव्हापासून मंदोदरीच्या हृदयात चिंतेने ( कायमचे ) घर केले. ॥ ६ ॥ पद पाताल शीर्ष अज धामहि । अंगिं इतर लोका विश्रामहि ॥ दो० :- अहंकार शिव, बुद्धि अज, मन शशि, चित्त महान ॥ प्रभु या ( विराट ) रुपाचे पाय पाताल-लोक, मस्तक ब्रह्मलोक व इतर अंगात अनेक लोकांचा निवास आहे. ॥ १ ॥ भृकुटीचा विलास हाच भयंकर काळ होय. केस ह्या मेघमाला असून सूर्य हे नेत्र आहेत. ॥ २ ॥ नाक अश्र्विनीकुमार असून दिवस व रात्र हे अपार निमेष म्हणजे पापण्यांचे खालीवर होणे आहे. ॥ ३ ॥ कान दश दिशा आहेत असे वेदच वर्णन करतात; ज्यांचा श्र्वास वायु आहे व श्र्वासापासून उत्पन्न झालेले जे वेद ती त्यांची वाणी आहे. ॥ ४ ॥ ओठ हा लोभ, कराल दाढा म्हणजे यम आणि हास्य माया आहे तर बाहू दिक्पाल आहेत. ॥ ५ ॥ मुख अग्नी, जिव्हा वरुण ( जल-देवता ) आहे उत्पत्ती – स्थिती व संहार ही सामान्य इच्छा आहे. ॥ ६ ॥ अंगावरील रोमावली ( लव ) या अठरा प्रकारच्या वनस्पती आहेत. हाडे पर्वत आहेत तर शिरांचे नसांचे जाळे या पुष्कळ नद्या होत. ॥ ७ ॥ पोट समुद्र आहे व खालची इंद्रिये यम – यातना आहेत. फार कल्पना कशाला ? प्रभु विश्वमय आहे. ॥ ८ ॥ अहंकार शिव ( रुद्र ), बुद्धी ब्रह्मदेव व मन चंद्र व चित्त विष्णू ( महतत्व ) आहे. मनुजरुप राम भगवान असून चराचराचा वास त्यांच्यात आहे व ते सचरांत व अचरांत ही वास करतात. ॥ दो० १५ रा ॥ प्राणपती ! अशा विचाराने प्रभूशी वैर सोडून रघुवीरपदीं प्रीती करा तर माझे सौभाग्य नाश न होता अबाधित टिकून राहील. ॥ दो० १५ म ॥ परिसुनि नारी वचन विहसला । अहो मोहमहिमा बलि कसला ! ॥ दो० :- करत विनोद असा बहु उजाडतां दशकंध ॥ स्त्रीचे भाषण ऐकून रावण खदखदा हसला व म्हणाला अहो ! केवढे आश्चर्य मोहाचा महिमा किती बलवान आहे ! ॥ १ ॥ कवी स्त्री-स्वभावाचे जे वर्णन करतात तेच खरे की स्त्रियांच्या हृदयात सदा आठ अवगुण निवास करतात. ॥ २ ॥ साहस, असत्य, माया, चपलता, भय, अपवित्रता, अविवेक आणि निर्दयता – ( हे ते आठ अवगुण होत ) ॥ ३ ॥ तू शत्रूचे सगळे वर्णन केलेस व मला फार मोठ्ठं भय घातलंस. ॥ ४ ॥ प्रिये ! हे सगळे तूं वर्णन केलेले रुप तर मला सहजच वश झालेले आहे ते तुझ्या प्रसादाने आता माझ्या ध्यानात आले. ॥ ५ ॥ प्रिये ! तुझी चतुरता मी ओळखली अशा रीतीने तू माझीच सगळी प्रभुता वर्णन केलीस ॥ ६ ॥ हे मृगलोचनी ! तुझी वाणी गुढ आहे हं ती कळली तर सुखदायक नाहीतर नुसत्या ऐकण्याने भयदायक आहे. ॥ ७ ॥ मंदोदरीच्या मनात हे ठसले की काळवश झाल्यामुळे पतीला बुद्धीभ्रम ( भ्रंश ) झाला आहे. ॥ ८ ॥ अशा प्रकारे रावणाने पुष्कळ विनोद केला. जेव्हा उजाडले, तेव्हा दशकंठ स्वभावताच निर्भय असणारा लंकापती मदांध होऊन सभेत गेला. ॥ दो० १६ रा ॥ मेघांनी जरी अमृताची वृष्टी केली तरी वेताला फुले किंवा फळे येणार नाहीत, तसेच ब्रह्मदेवासारखा गुरु मिळाला तरी मूर्खाला ज्ञान होत नाही. ॥ दो० १६ म ॥ प्रातरिथें उठलें रघुराव । पुसलें मत बोलावुनि सचिव ॥ सो० :- प्रभुपदिं ठेवी शीस शिरसा मानुनि वच, उठत ॥ अंगद शिष्टाई – ( प्रस्तावना ) नमुनि पदीं प्रभुला उरिं धरुनी । गेला अंगद सकलां नमुनी । दो० :- सभाद्वारिं गेला मग स्मरुनि रामपद कंज ॥ प्रभूच्या चरणांना प्रणाम करुन, व प्रभु-प्रताप हृदयात धारण करुन सर्वांना नमस्कार करुन अंगद गेला. ॥ १ ॥ सहज निधडा वालीतनय, गाढा रणपंडित आणि त्यातही प्रभूचा प्रताप ! ॥ २ ॥ शिरला लंकापुरीत तोच रावणाचा एक मुलगा खेळत असता त्याची अचानक गाठ पडली. ॥ ३ ॥ बोलता बोलता दोघांचे भांडण जुंपले, दोघेही अतुल बली व तरुण ! ॥ ४ ॥ त्याने अंगदास लाथ उगारली, त्याबरोबर अंगदाने पाय धरला, गरगर फिरवला व जमिनीवर आपटून मारला. ॥ ५ ॥ हा फार मोठा योद्धा आहे हे जाणून राक्षसांच्या झुंडी आरडा-ओरडा न करतां, पटापट तिथून निघून गेल्या. ॥ ६ ॥ काय झाले हे कोणीच कोणास सांगीतले नाही, रावण-पुत्राचा वध झाला हे मर्म समजून मनातच ठेऊन सर्व जण गप्प राहीले. ॥ ७ ॥ लंकेत सर्वत्र कोलाहल सुरु झाला की लंका जाळणारा कपी ( परत ) आला आहे ! ॥ ८ ॥ जे ते अति भयभीत होऊन मनात विचार करु लागले की आता विधी ( ब्रह्मदेव ) काय करतो कोण जाणे. ॥ ९ ॥ सगळेजण त्याने न विचारताच त्याला रावण-सभेची वाट दाखवूं लागले. अंगद ज्या कोणाकडे सहज म्हणून पाही, ( त्याला वाटे आपले मरण आले म्हणून ) तो सुकून जाई. ॥ १० ॥ मग अंगद रामचरणकमलांचे स्मरण करुन सभेच्या द्वारापाशी गेला व तो धीर वीर बलशाही सिंहाप्रमाणे सभोवार पाहू लागला. ॥ दो० १८ ॥ त्वरें निशाचर एक पाठवी । समाचार रावणास कळवी ॥ दो० :- यथा मत्तगज-गणिं शिरे पंचानन येऊन ॥ द्वारावरच्या निशाचरांपैकी एकाने रावणाला अंगद-कपि आल्याची वर्दी दिली. ॥ १ ॥ ते ऐकताच मोठ्याने हसून दशशीर म्हणाला या कुठला कपि आहे त्याला घेऊन या. ॥ २ ॥ आज्ञा मिळताच दूत धावले व कपिकुंजराला घेऊन सभेत आले. ॥ ३ ॥ जणूं सजीव काजळाचा पर्वत बसलेला असावा तसा अंगदास दशशीस दिसला. ॥ ४ ॥ भुजा हे वृक्ष, मस्तके ही शिखरे, आणि रोमावली या जणूं अनेक लता आहेत असे समजा. ॥ ५ ॥ तोंड, नाक, डोळे व कान या डोंगरातील दर्या व गुहा ! ॥ ६ ॥ अंगद सभेत शिरला, मनात जराही न कचरता( भिता ), कारण की वालीतनय अति जबर बलवान आहे. ॥ ७ ॥ कपीला पाहून सभासद ( आपसुकच ) उठले पण त्यामुळे मनांतून रावण फारच खवळला – चिडला. ॥ ८ ॥ मग हत्तींच्या कळपात सिंहाने प्रवेश करावा तसा अंगद शिरला, आणि मनात प्रभू-प्रतापाचे स्मरण करुन नमन करुन सभेत बसला. ॥ दो० १९ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |