॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय १४ वा



Download mp3

दो० :- भक्तिपक्षिं धरिला हठ झाला महर्षिशाप ॥
मुनि दुर्लभ वर पावलो भजनीं पहा प्रताप ॥ ११४म ॥

भक्तीपक्षाचा हट्ट धरला म्हणून महर्षीचा शाप झाला. मुनींनाही दुर्लभ असे वर मिळाले हा भक्तीचा प्रताप तर पहा ! ॥ दो० ११४ म ॥

अशी भक्ति जाणुनि परिहरती । ज्ञाना केवळ जे श्रम करती ॥
ते जड गृहिं सुरधेनू त्यजिती । दुधासाठिं अर्कांस धुंडिती ॥
श्रुणु खगपति हरिभक्ति त्यागिति । अन्य साधनीं सुख जे इच्छिति ॥
ते शठ महासिंधु विण तरणी । तरुनि पार कांक्षिति जड करणी ॥
श्रवुनि भुशुंडीवचन भवानी ! । वदे गरुड हर्षे मृदु वाणी ॥
प्रभो ! प्रसादें तव, हृदयीं मम । संशय शोक न मोह नसे भ्रम ॥
पावन रामगुणग्रामां श्रुत । चित्त तवकृपें विश्रामें युत ॥
प्रभु पुसतो आपणां कृपाकर । गोष्ट एक मज वदा सविस्तर ॥
वेद पुराण संत मुनि सांगति । ज्ञानासम जगिं दुर्लभ ना अति ॥
मुनिनें तेंच तुम्हांला कथिलें । तुम्हिं न भक्तिसम तें आदरिलें ॥
ज्ञानभक्ति यांमधिं किति अंतर । सकल सांगणें प्रभो ! कृपाकर ॥
उरगारीवचनें सुख झालें । सादर काक सुजाण म्हणाले ॥
भक्तीज्ञानामधिं नहिं भेद । उभय हरिति भवसंभव खेद ॥
नाथ ! कथिति मुनि काही अंतर । सावधान तें श्रुणु विहंगवर ॥
बोध विराग नि योग विबोधहि । श्रुणु हरियान पुरुष हे सर्वहि ॥
पुरुषप्रताप सगळा प्रबलहि । सहज जातिजड अबला अबलहि ॥

दो० :- शके पुरुष अबले त्यजूं जो विरक्त मति धीर ॥
न तु कामी विषयां वश विमुख चरण रघुवीर ॥ ११५रा ॥
सो० :- मुनि ते ज्ञाननिधान मृगनयनी विधुमुख बघुनि ॥
विवश होति हरियान नारि विष्णुमाया प्रगट ॥ ११५म ॥

रामरहस्य (भक्तीमहिमा) - भक्ती अशी प्रभावी आहे हे जाणून सुद्धा जे तिचा त्याग करतात, ते केवळ ज्ञानासाठी श्रम करतात, ते पढत मूर्ख होत ते घरी आलेल्या कामधेनूचा त्याग करुन दुधासाठी रुईची झाडे शोधीत भटकतात ॥ १-२ ॥ खगेश ! ऐक, हरीभक्तीचा त्याग करुन जे इतर साधनांनी सुख मिळविण्याची इच्छा करतात, ते शठ होत ते नावेशिवायच वेड्यासारखे पोहून महासागराच्या पार जाण्याची इच्छा करतात ॥ ३-४ ॥
श्रीभुशुंडी गीता (भाग १) - भवानी ! भुशुंडीचे वचन ऐकून गरुड हर्षाने व मृदु वाणीने म्हणाला की ॥ ५ ॥ हे प्रभो ! तुमच्या कृपेने माझ्या मनात संशय, शोक, मोह, वा भ्रम नाही ॥ ६ ॥ रामचंद्रांचे पावन गुण समूह श्रवण केले आणि तुमच्या कृपेने माझ्या मनाला विश्राम मिळाला ॥ ७ ॥ हे प्रभु ! कृपासागरा ! मी आपणास एक गोष्ट विचारीत आहे, तिच्याबद्दल मला सविस्तर सांगावे. ॥ ८ ॥ वेद, पुराण, संत व मुनी असे म्हणतात की ज्ञानासारखे अति दुर्लभ जगात काही नाही. ॥ ९ ॥ तेच ज्ञान लोमश मुनींनी तुम्हांला सांगीतले तथापी तुम्ही त्याला भक्तीसारखा आदर दिला नाहीत ॥ १० ॥ (म्हणून विचारतो की) हे प्रभो ! कृपाकरा ! ज्ञान आणि भक्ती यांत अंतर किती ते सगळे मला सविस्तर सांगावे ॥ ११ ॥ उरगारी गरुडाच्या वचनाने भुशुंडीला सुख झाले आणि तो सुजाण म्हणाला की ॥ १२ ॥ भक्ती आणि ज्ञान यांत कांही भेद नाही; कारण की संसारजनित दु:खाचे हरण दोन्हीही करतात. ॥ १३ ॥ तरी पण नाथ ! मुनी म्हणतात की काही अंतर आहे ते हे खगश्रेष्ठा ! अवधान देऊन ऐका. ॥ १४ ॥ विराग, योग, बोध (ज्ञान) व विज्ञान हे सर्वच हरिवाहना ! पुरुष आहेत ॥ १५ ॥ पुरुषांचा सगळाच प्रताप प्रबल असतो आणि अबला स्वभावताच अबल आणि जन्मत:च मूर्ख असतात (हे खरे असले तरी -) ॥ १६ ॥ जो पुरुष वैराग्यसंपन्न आणि सात्विक धृतीसंपन्न असेल (आणि रघुवीर चरण विमुख नसेल) तो अबलेचा त्याग करुं शकतो. पण कामी, विषयांना वश झालेला, आणि भक्तीहीन असलेला पुरुष (स्वभावताच प्रबल प्रतापी असला तरी) अबलेचा त्याग करु शकत नाही ॥ दो० ११५ रा ॥ (फार कशाला) ते भक्तीहीन ज्ञाननिधान मुनीसुद्धा हरिणाक्षी चंद्रमुखी स्त्रीला वश होतात, कारण हे हरिवाहना ! स्त्री म्हणजे प्रगट दिसणारी विष्णूची माया होय. ॥ ११५ म ॥

पक्षपात मुळिं इथें न करतो । वेदपुराणसंतमत वदतो ॥
मोहे नारि न नारी रूपा । पन्नगारि ही रीति अनूपा ॥
माया भक्ति ऐक या दोनी । नारिवर्ग जाणे ही कोणी ॥
प्रिय रघुवीरा भक्तिच भारी । माया खलु नर्तकी बिचारी ॥
सानुकूल भक्तिस रघुराया । म्हणुन घाबरे निज अति माया ॥
निरुपम निरुपाधिक हरिभक्ती । सदा अबाधित हृदिं करि वस्ती ॥
तया बघुनि माया संकुचते । प्रभुता कार्य न निज करुं शकते ॥
हे समजुनि मुनि जे विज्ञानी । याचिति भक्ति सकल सुखदानी ॥

दो० :- हें रघुनाथरहस्य ना कळतें शीघ्र कुणास ॥
जो जाणे रघुपतिं कृपें स्वप्निंहि मोह न त्यास ॥ ११६रा ॥
ज्ञानभक्तिभेदा दुजा ऐका अती प्रवीण ! ॥
तो ऐकुनि रति रामपदिं होइ सदा अक्षीण ॥ ११६म ॥

मी इथे पक्षपात मुळीच करीत नाही. वेदपुराण व संत यांचे मत सांततो ॥ १ ॥ हे पन्नगारी ! अशी अनुपम रीत आहे की नारी नारीच्या रुपावर मोहित होत नाही. ॥ २ ॥ हे लक्षांत घ्या की माया आणि भक्ती या दोन्ही स्त्री वर्गातील आहेत हे सर्व जाणतात. ॥ ३ ॥ त्यांत रघुवीराला भक्तीच भारी प्रिय आहे. माया बिचारी नटी आहे. (भगवान नाचवतील तसे तिला नाचावे लागते) ॥ ४ ॥ रघुराया भक्तीलाच अनुकूल असल्यामुळे माया तिला घाबरते. ॥ ५ ॥ निरुपम व उपाधीरहित अशी भक्ती ज्याच्या हृदयात सदा अबाधितपणे राहते ॥ ६ ॥ त्याला पाहूनच माया लाजते आणि आपल्या प्रभुतेचे कार्य करुं शकत नाही ॥ ७ ॥ हे रामरहस्य समजल्यावर जे मुनी विज्ञानी (ब्रह्मलीन, ब्रह्मपर) असतात ते सुद्धा पूर्ण सुख देणारी भक्तीच मागतात ॥ ८ ॥ परंतु हे रघुनाथाचे रहस्य कोणालाच लवकर कळत नाही जो कोणी रघुपतीच्या कृपेने हे रहस्य़ जाणतो त्याला स्वप्नातही मोह होत नाही ॥ दो० ११६ रा ॥ अहो प्रवीण पक्षीराज ! ज्ञान आणि भक्ती यातील आणखी एक भेद सांगतो तो ऐका त्याच्या श्रवणाने श्रीरामचरणी कधीही क्षीण न होणारी भक्ती प्राप्त होते ॥ दो० ११६ म ॥

अकथ कहाणी तात ! ऐकणें । शक्य समजणें शक्य न वदणें ॥
ईश्वरसंश जीव अविनाशी । चेतन अमल सहज सुखराशी ॥
तो प्रभु मायेला वश झाला । शुकमर्कटसम बंधनिं पडला ॥
जडचेतनिं पडली ग्रंथि जी । जरी मृषा सुटणें कठिण ती ॥
तैंहुनि जीव होई संसारी । ग्रंथि सुटे न, सुख न लवभारी ॥
श्रुतिपुराण बहु उपाय वदती । न सुटे, अधिकाधिक च घट्ट ती ॥
जीवहृदयिं तम विशेष मोहो । ग्रंथि सुटे कशि, शके न पाहों ॥
ईश असां संयोग आणि जैं । शके कदाचित सुटूं ग्रंथि तैं ॥
श्रद्धा सात्विक धेनु शोभना । करि हरिकृपें हृदयिं जर सदना ॥
व्रत जप तप यम नियम अपार । वेदविहित शुभ धर्माचार ॥
तें तृण हरित गाय जैं चरते । भाव वत्स भेटत पान्हवते ॥
रज्जु निवृत्ति पात्र विश्वास । निर्मळ मन गौळी निज दास ॥
परम धर्ममय पया काढुनी । तापवि अनल अकाम बनवुनी ॥
क्षमा तोष मरुतें तें निववी । करि दधि धृति सम विर्जण लावी ॥
रवि विचार, मुदिता माथणीं । दम धारण, गुण सत्य सुवाणीं ॥
मंथुनि काढुनि घे नवनीत । विमल विराग सुभग सुपुनीत ॥

दो० :- प्रगटुनि योगाग्नी, द्विविध कर्म शुभा लाऊन ॥
बुद्धि निवविते ज्ञान घृत ममता मल हि जळून ॥ ॥ ११७रा ॥
तैं विज्ञानरूपिणी मति घृत विशाद मिळून ॥
चित्त पणति भरि ठेवि दृढ समता ठाण करून ॥ ११७म ॥
तीन अवस्था त्रिगुण त्या काढि कपासींतून ॥
तूल तुरीया पिंजुनी जाडी वात वळून ॥ ११७चं ॥
सो० :- असा पेटवी दीप तेजराशि विज्ञानमय ॥
जातां ज्या समीप जळति मदादिक शलभ सब ॥ ११७द्र ॥

भाग २ ज्ञानदीप – हे तात ! अकथनीयाची कहाणी ऐक, हिच्यामुळे त्याचा (ब्रह्म) समज होणे शक्य आहे पण शब्दाने सांगता येण्यासारखे नाही ॥ १ ॥ जीव ईश्वराचा (ब्रह्माचा) अंश असल्याने अविनाशी, चेतन, अमल व सहज सुखराशी आहे ॥ २ ॥ तो प्रभु असून मायेला वश झाला आणि शुक – मर्कटांप्रमाणे बंधनात अडकला. ॥ ३ ॥ जड आणि चेतन यांची जी गाठ पडली ती जरी खोटी आहे तरी ती सुटणे (फार) कठीण आहे ॥ ४ ॥ (जेव्हा पासून ही गाठ पडली) तेव्हापासून जीव संसारी झाला गाठ काही केल्या सुटत नाही, व जीवाला लेशमात्रही सुख मिळत नाही. ॥ ५ ॥ वेद पुराणादिकांनी पुष्कळ उपाय सांगीतले आहेत पण त्यांनी ही गाठ सुटत तर नाहीच, उलट ती अधिकाधिक घट्टच होत जाते. ॥ ६ ॥ जीवाच्या हृदयात मोहरुपी अंधारच विशेष असतो, व त्यामुळे तो त्या ग्रंथीला पाहू शकत नाही (त्याला जर गाठ दिसलीच नाही) तर मग ती सुटणार कशी ? ॥ ७ ॥ ईश्वर जेव्हा केव्हा असा संयोग जुळवून आणतो तेव्हाच कदाचित ती ग्रंथी सुटूं शकते (याचा अर्थ ज्ञानमार्गातही ईश्वरकृपा पाहीजेच) ॥ ८ ॥ प्रत्यक्ष ज्ञानदीप रुपक – सात्विक श्रद्धारुपी व्यायलेली सुंदर गाय जर श्रीहरीच्या कृपेने हृदयांत राहीली ॥ ९ ॥ व अपार व्रत, जप, तप, यम, नियम आणि वेदांनी सांगीतलेले शुभ (सात्विक) धर्माचरण हे हिरवे ओले गवत त्या गाईला पोटभर चरण्यास सापडले तर मग ती भावरुपी वत्स भेटल्यावर पान्हवते. ॥ १०-११ ॥ निवृत्ती ही भालेदारी (गायीचे मागचे पाय बांधण्याची दोरी), विश्वास हे दूध काढण्याचे पात्र (चरवी), आणि आपला दास झालेले निर्मल मन हा गौळी (दूध काढणारा) असला पहीजे ॥ १२ ॥ परमधर्ममय दूध काढून अकाम अग्नी सिद्ध करुन त्यावर ते तापवितो ॥ १३ ॥ (अकाम अग्नीने तापविलेल्या दुधाला) क्षमा व संतोषरुपी वात्याने निववितो आणि धृती (धैर्य) रुपी विरजण सारखे लाऊन त्याचे दही करतो ॥ १४ ॥ (वस्तु नित्यानित्य विवेक) विचाररुपी रवीने मुदितारुपी माथणीत दमरुपी आधारस्तंभाच्या सहाय्याने सत्य आणि सुवाणी रुपी घुसळ दोरीने ते दही मंथन करुन, घुसळून निर्मल, सुंदर व अति पवित्र वैराग्यरुपी लोणी काढून घेतो ॥ १५-१६ ॥ (लोणी काढून घेतल्यावर) मग योग रुपी अग्नी प्रगट करुन द्विविध (शुभ, अशुभ) कर्मे रुपी शुभा (शेणी – गवर्‍या) इंधन लावून (त्यावर वैराग्य लोणी उकळले) ममतारुपी मल जळून गेल्यावर बुद्धी त्या लोण्याचे तयार झालेले ज्ञानरुपी तूप निवविते (तेव्हा ते घट्ट होते) ॥ दो०११७ रा ॥ तेव्हा मग विज्ञानरुपीणी बुद्धी ज्ञानरुपी निर्मल घृत मिळताच चित्तरुपी पणती त्याने भरुन समता ठाणवई करुन ती पणती अचल (स्थिर) राहील अशी त्या ठाणवईवर ठेवते ॥ दो० ११७ म ॥ त्या साधकाच्या देहरुपी कापसातून तीन अवस्था व त्रिगुण यांना बाहेर काढते आणि तुरिया अवस्थारुपी कापूस पिंजून चांगली जाडी घट्ट वात (वळून ती विज्ञानरुपिणी बुद्धी) वळते आणि मग ॥ दो० ११७ चं ॥ अशा प्रकारे दैदिप्यमान (तेजोराशी) विज्ञानमय दीप पेटवावा की त्याच्या जवळ जाताच मद वगैरे सर्व पतंग जळून जातील ॥ दो० ११७ द्र ॥

सोहमस्मि ही वृत्ति अखंडा । दीपशिखा ती महाप्रचंडा ॥
आत्म-अनूभव सुख प्रकाश । भेदम्रम भवमूल विनाश ॥
प्रबल अविद्यच्या परिवारा । नाश तमा मोहादि अपारा ॥
तैं बुद्धि तो प्रकाश मिळुनी । सोडी ग्रंथि हृदयगृहिं बसुनी ॥
ग्रंथिभेद ती करूं शके जर । होइ जीव मग कृतार्थ हा तर ॥
सोडत गाँठ बघुनि खगराया । विघ्न अनेक करी तै माया ॥
ऋद्धि सिद्धि बहु दे बा ! धाडुनि । मतिला प्रलोभ दाविति येउनि ॥
कळ बळ छळ करि समीप जाते । विझवी दीपा अंचल वातें ॥
असे बुद्धि जर परम शहाणी । तिज न लक्षिते अहित जाणुनी ॥
त्या बुद्धिस जर विघ्न न बाधी । तर नंतर सुर करिति उपाधी ॥
गोगोलकें झरोके नाना । स्थिर तेथें सुर मांडुनि ठाणा ॥
येतां पाहुनि विषय समीरण । बळें उघडिती द्वारें सुरगण ॥
जैं उरगृहिं तो घुसे प्रभंजन । तदा दीप विज्ञान विभंजन ॥
ग्रंथि न सुटली तेज हरपलें । होइ विकल मति विषयवादळें ॥
करणसुरानां ज्ञान नावडे । विषयभोग अति सदा आवडे ॥
विषयसमीरें बुद्धि बावळी । तसा दीप मग कोण पाजळीं ॥

दो० :- जीव पुन्हां तैं विविधविध भोगि संसृती क्लेश ॥
हरिमाया अति दुस्तर तरवे ना विहगेश ॥ ११८रा ॥
वदत कथिण समजत कठिण साधत कठिण विवेक ॥
घुणाक्षरें न्यायें घडे तरि विघ्नें हि अनेक ॥ ११८म ॥

‘ते (ब्रह्म) मी आहे’ ही जी अखंड वृत्ती तीच या दीपाची प्रचंड ज्योत (दीपशिखा) होय. ॥ १ ॥ आत्मानुभवाचे सुख हाच या ज्योतीचा प्रकाश होय. (या प्रकाशाने) संसृतीचे मूळ जो भेदरुपी भ्रम त्याचा नाश होतो ॥ २ ॥ अत्यंत प्रबल अशा अविद्येच्या परिवाराचा म्हणजे मोह आदि अपार अंधाराचा नाश होतो. ॥ ३ ॥ तेव्हा ती विज्ञानरुपिणी बुद्धी प्रकाश मिळाल्यावर हृदयरुपी घरात बसून जडचेतन ग्रंथी सोडवूं लागते ॥ ४ ॥ ती बुद्धी जर ग्रंथीभेद करुं शकली तर हा जीव कृतार्थ होतो. ॥ ५ ॥ परंतु हे पक्षीराज ! गाठ सोडली जात आहे असे जेव्हा मायेला दिसते, कळते तेव्हा ती अनेक विघ्ने निर्माण करते ॥ ६ ॥ अरे बाबा ! ती अविद्या माया पुष्कळ ऋद्धि आणि (अणिमादिक) पुष्कळ सिद्धि यांना धाडून देते, आणि त्या बुद्धीजवळ येऊन प्रलोभ दाखवितात ॥ ७ ॥ मग नाना युक्त्या करुन बळाने किंवा छळाने स्वत: (दिपाजवळ) जाते व पदराच्या वार्‍याने तो दिवाच मालवून टाकते ॥ ८ ॥ ती बुद्धी जर अत्यंत शहाणी असेल तर अहित जाणून तिच्या (मायेकडे) कडे लक्षच देत नाही (तिच्याकडे लक्ष न देता आपल्या सुखातच मग्न राहते) ॥ ९ ॥ त्या बुद्धीला जर हे विघ्न बांधू शकले नाही तर मग देव उपाधी करतात ॥ १० ॥ इंद्रियांची द्वारे या अनेक खिडक्या आहेत तेथे देव ठाण मांडून बसलेले असतात ॥ ११ ॥ विषयरुपी जोराचा वारा येत आहे असे पाहून ते देवगण त्या खिडक्यांची (बंद दारे) एकदम बळाने उघडतात ॥ १२ ॥ त्यातून तो सोसाट्याचा वारा जेव्हा हृदयरुपी घरात घुसतो तेव्हा तो विज्ञानदीप मालविला जातो. ॥ १३ ॥ ग्रंथी तर नाहीच सुटली पण प्रकाशही नाहीसा झाला व विषयरुपी वादळाने बुद्धी व्याकुळ झाली ॥ १४ ॥ इंद्रियांच्या देवतांना ज्ञान आवडत नाही आणि विषयभोग सदा आवडतात. ॥ १५ ॥ विषयरुपी वार्‍याने बुद्धी बावळी झाल्यावर तशा प्रकारचा ज्ञानदीप पुन्हा कोण प्रज्वलित करणार ! (पुन्हा ही समग्र सविस्तर प्रक्रिया घडणे अशक्य !) ॥ १६ ॥ ज्ञानदीपाचा असा विनाश झाला म्हणजे जीव पुन्हा जन्म-मरण परंपरेचे क्लेश भोगीत राहतो अहो पक्षीराज ! श्रीहरीची अविद्या माया अशी दुस्तर आहे जीवाला (या ज्ञानमार्गाने) तरुन जाता येत नाही ॥ दो० ११८ रा ॥ ज्ञान समजावून सांगणे कठीण, (ते सांगणारा मिळणे कठीण), ते समजणे कठीण (आणि शब्दांनी समजले तरी) तो विवेक साधणे त्याहून कठीण ! जरी भुणाक्षर न्यायाने कोणाला सहजी ज्ञान झाले तरी ते झालेले ज्ञान टिकेल असे नाही कारण यात विघ्ने अनेक ! ॥ दो०११८ म ॥

ज्ञानाचा पथ कृपाणधार हि । पडत खगेश ! न लागे वार हि ॥
निभावतो निर्विघ्न कैवल्य परमपद । संत पुराण निगम आगम वद ॥
स्वामी ! राम भजत मुक्ती ते । न इच्छितां जबरीनें येते ॥
स्थलविण जल कधिं राहुं न शकतें । यत्‍न कोटिहि करुन विविध ते ॥
तसें मोक्षसुख बघ खगराया । टिकुं न शके हरिभक्ति विना या ॥
हें समजुनि हरिभक्त सुज्ञ जे । मुक्ति अनाद्रिति भक्तिलुब्ध ते ॥
भक्ति करत यत्‍नां विण कष्टां । संसृतिमूल अविद्या नष्टा ॥
तृप्ति हितास्तव करिति भोजना । पचवि जसें जठरानल अशना ॥
तशि हरिभक्ति सुगम सुखदाती । कोण असा जड न रुचे ज्या ती ॥

दो० :- सेवक सेव्यभाव विण भवतरण न उरगारि ॥
भजा रामपदपंकजा हा सिद्धान्त विचारिं ॥ ११९रा ॥
चेतनास जो करी जड जडा करी चैतन्य ॥
अशा समर्था रघुपतिसि भजति जीव ते धन्य ॥ ११९म ॥

अहो पक्षीराज ! ज्ञानमार्ग म्हणजे दुधारी तलवारीची धारच आहे; त्यामुळे अध:पात होण्यास जरासुद्धा वेळ लागत नाही ॥ १ ॥ जो या मार्गाला निर्विघ्नपणे निभावून जाईल तो कैवल्य मोक्षरुपी परम पद पावतो ॥ २ ॥ (मध्येच पडला की गेला रसातळाला) म्हणून संत, पुराणे, वेद, व इतर शास्त्र रुपी वक्ते म्हणतात की कैवल्य परमपद अति दुर्लभ (दुष्कर) आहे. ॥ ३ ॥ भक्ती चिंतामणी (भाग ३) - अहो स्वामी ! श्रीरामचंद्राचे भजन करीत राहील्याने तीच (अति दुर्लभ) कैवल्यमुक्ती न इच्छितांही बळजबरीने (जवळ) येते (पाठीस लागते) ॥ ४ ॥ नाना प्रकारे कोटी यत्न केले तरी स्थलावाचून जसे जल राहू शकत नाही ॥ ५ ॥ तसेच हे खगराया ! या हरिभक्तीवाचून मोक्षसुख टिकूं शकत नाही. (हरिभक्तीचा आश्रय असेल तरच टिकते) ॥ ६ ॥ हे समजून जे शहाणे हरिभक्त असतात ते मुक्तीचा अनादर करुन भक्तीवर लुब्ध होतात ॥ ७ ॥ (कारण) भक्ती करीत राहील्याने यत्नांवाचून व कष्टावाचून संसृतीचे मूळ जी अविद्या ती नष्ट होते ॥ ८ ॥ तृप्तीसाठी व हितासाठी भोजन करतात पण ते अन्न जठरानल जसे पचवितो तशी हरिभक्ती सुगम आहे आणि सुख देणारी आहे असे असून असा कोण मूढ असेल की ज्याला ती आवडत नाही ? ॥ ९-१० ॥ अहो उरगारी (गरुड) ! मी सेवक असून भगवान सेव्य (स्वामी) आहेत अशा भावावाचून भवसागर तरुन जाणे शक्य नाही. या सिद्धान्ताचा विचार करुन श्रीरामचरण कमलांचे भजन करा ॥ दो० ११९ रा ॥ जो चेतनाला जड करतो व जडाला चेतन करतो अशा समर्थ रघुपतीला जे भजतात ते जीव धन्य होत. ॥ दो० ११९ म ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP