॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ११ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

ऐकुनि वदली हसुनि भवानी । उचित वदां मुनिवर विज्ञानी ॥
दग्ध काम आतां, मत अपलें । शंभु आजवरि कामी ठरले ॥
अमचे मतें सदाशिव योगी । अज अनवद्य अकाम अभोगी ॥
मी कृत शिव सेवा भावें या । प्रेमें जर मन वाणी-कायां ॥
तर ऐका अमचा पण मुनिवर! । करितिल सत्य कृपानिधि ईश्वर ॥
कथित तुम्हीं हर मारा जाळति । तो अपला अविवेक महा अति ॥
तात अनलिं सहज हा स्वभावो । हिम न शके कधिं समीप जावों ॥
नष्ट निकट जातांच अशेषीं । न्याय तोच कीं, मदनमहेशीं ॥

दो. :- वचनें मुनि मनिं हर्षले प्रीति बघुनि विश्वास ॥
जाति भवानिस नमुनि शिर जिथें गिरीशनिवास ॥ ९० ॥

त्यांचे बोलणे ऐकून भवानी हसून म्हणाली, अहो विज्ञानी मुनिवर आपण म्हणता ते योग्यच आहे ॥१॥ आपल्या मताने आता काम जाळला गेला म्हणजे आजपर्यंत शंभू कामी होते हे ठरले ॥२॥ आमच्या मते तर शिव सदाच योगी, अजन्मा, अनिंद्य, कामरहित आहेत ॥३॥ मी जर या भावनेने शिवाची सेवा (तप) मनाने – वाणीने व देहाने प्रेमाने केली असेल ॥४॥ तर अहो मुनिश्रेष्ठ ऐका ! कृपानिधी ईश्वर आमचा पण सत्य करतील ॥५॥ तुम्ही जे म्हणालात की हरांनी मदनाला जाळला, तो तुमचा अति महा अविवेक आहे ॥६॥ तात ! अग्नीचा सहज स्वभाव आहे की हिम त्याच्याजवळ कधी जाऊ शकत नाही ॥७॥ जवळ गेले की ते नि:शेष नष्ट होतेच, तसाच न्याय मदन व महेश यांत आहे ॥८॥ दो.- भवानीचे बोलणे ऐकून व तिचे प्रेम व विश्वास पाहून मुनी मनात हर्षित् झाले व भवानीला मस्तक नमवून गिरीशाच्या – हिमालयाच्या घरी गेले ॥दो. ९०॥

वृत्त सकल गिरिपतीस सांगति । मदन दहन ऐकुनि दुःखी अति ॥
मग कथिले रति वरदानाला । ऐकुनि सुख बहु हिमवानाला ॥
शंभूप्रभुता चित्तीं आणुनि । घे सादर मुनिवर बोलावुनि ॥
सुदिन सु-घटि-नक्षत्र बघवुनी । वेगिं वेदविधिं लग्न ठरवुनी ॥
सप्तर्षिस पत्रिका समर्पिति । धरुनि पदांस हिमाचल विनविति ॥
जाउनि विधिला ऋषि देती ती । वाचित मनिं ना मावे प्रीती ॥
विधि वाचुनि पत्रिका दाखवति । हर्ष सकल मुनि सुरगण पावति ॥
पुष्पवृष्टि नभिं बाजे वाजति । दश दिशिं मंगल कलशां साजति ॥

दो. :- सजूं लागले सकल सुर वाहन विविध विमान ॥
होति शकुन मंगल शुभद करिति अप्सरा गान ॥ ९१ ॥

सगळी हकीकत सप्तर्षींनी गिरीपतीस सांगीतली (तेव्हा) मदन – दहन ऐकून त्याना फार दु:ख झाले ॥१॥ मग त्यांनी रतिवरदानाची हकीकत सांगीतली व ती ऐकून हिमवंताला फार सुख झाले ॥२॥ शंभूचा प्रभाव मनात आणून त्यांनी मुनीश्रेष्ठास आदराने बोलावून आणले ॥३॥ त्या कुलपुरोहीतांकडून शुभ दिवस, शुभ नक्षत्र, शुभ घटिका इ. पाहून त्वरेने वेदविधी प्रमाणे लग्न मुहूर्त ठरविला ॥४॥ लग्न पत्रिका सप्तर्षींना समर्पण केली व त्यांचे पाय धरून हिमाचलाने त्यास विनंती केली ॥५॥ ब्रह्मदेवाकडे जाऊन ऋषींनी ती लग्नपत्रिका त्यास दिली ती वाचित असता विधीच्या मनात प्रीती मावेनाशी झाली ॥६॥ विधीने ती पत्रिका वाचून दाखविली, ती ऐकून सर्व मुनी व देवगण यांना हर्ष झाला ॥७॥ आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली व वाद्ये वाजू लागली आणि दशदिशांत मंगल वस्तु व मंगल कलश सजविले गेले ॥८॥ दो.- सर्व देव आपाआपली वाहने व विमाने सजवू लागले सर्वांना मंगलकारक शुभदायक शकुन होऊ लागले. व अप्सरा गायन करू लागल्या ॥दो. ९१॥

शिवगण शिवशृंगारा करिती । जटामुकुटिं अहिमौर सजविती ॥
व्याल-कुण्डले-कंकण घालिति । व्याघ्राजिन पट विभूति लाविति ॥
शशि ललाटिं, गंगा शिरिं सुंदर । नयन तीन उपवीत सर्पवर ॥
गरळकंठ, उरिं नृ-मुंड-माला । अशिव वेष शिवधाम कृपाला ॥
करीं त्रिशूळ नि डमरु विराजे । निघति बसुनि वृषिं वाजति बाजे ॥
बघुनि शिवा सस्मित सुरललना । जगिं वर लायक वधू प्राप्त ना ॥
विष्णुविरंचि आदि सुर-जाती । निज निज वाहनिं वर्हासडि जाती ॥
सुरसमाज अनुपम नानापरिं । वर अनुसार वर्हा ड नसे परि ॥

दो. :- विष्णु हसुनि वदलें असें बोलावुनि दिग्‍राज ॥
अलग अलग व्हा चला सब निज निज सहित समाज ॥ ९२ ॥

शिव पार्वती विवाह -
शिवगण शिवांचा शृंगार करू लागले जटांचा मुकुट करून त्यावर मौर हे शिरोभूषण घातले ॥१॥ कानांत सर्पांची कुंडले घातली व हातात भुजंगाची सलकडी (कंकणे) घातली कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळले व सर्व शरीराला चिताभस्म लावले ॥२॥ सुंदर कपाळावर अर्धचंद्र, मस्तकावर गंगा शोभत आहे, तीन डोळे असून श्रेष्ठ नागांची जानवी घातली आहेत. ॥३॥ कंठात गरळ असून गळ्यात नरमुंडांची माळ आहे. कृपाळू कल्याणधाम शिवाचा वेष अमंगल आहे ॥४॥ एका हातात त्रिशूळ असून दुसर्‍या हातात डमरू आहे. शिव बैलावर स्वार होऊन निघाले व विविध वाद्ये वाजू लागली ॥५॥ शिवास पाहून देवस्त्रिया सस्मित झाल्या. या वराला अनुरूप वधू जगात नाही मिळ्णार ॥६॥ विष्णू, ब्रह्मदेव, आदिकरून सर्व देवांच्या जाती आपआपल्या वाहनावर बसून वर्‍हाडी म्हणून गेले - चालले ॥७॥ देव समाज सर्व परींनी अनुपम आहे पण वर्‍हाड व मिरवणूक नवरदेवाला अनुरूप नाही. ॥८॥ तेव्हा विष्णूंनी सर्व दिक्पालांना बोलावले व हसून सांगीतले की सर्वांनी आपआपल्या समाजासह वेगवेगळे होऊन चालावे. ॥ दो० ९२ ॥

वर‍अनुसारी वर्‍हाड हें ना । परपुरिं जाउनि होइ हसें ना! ॥
विष्णुवचें सुर हसुनि निराळे । निज निज सेने सहित निघाले ॥
सस्मित होति महेश मनोमन । व्यंग्य भाषणा हरिच्या खंड न ॥
प्रियवच कानीं प्रिय अति पडलें । भृंगी प्रेरुनि गणां बाहले ॥
शिवशासन परिसुनि गण जमले । प्रभुपदपद्यिं तिहीं शिर नमलें ॥
नाना वाहन वेषां नाना । शिव हसले बघुनी स्वगणांनां ॥
कुणी मुखहीन कुणा बहु आनन । पद बहु बाहु कुणा कर पाय न ॥
कुणा चक्षु बहु कुणा नसे ही । धष्ट पुष्ट कुणि अति कृश-देही ॥

छं. - कृश-देहि अति कुणि पीन पावन कुणि अपावन गति धरी ।
भूषण कराल कपाल करिं, सब सद्यशोणित तनुवरी ॥
खर-कुकर-शुकर-शृगाल-मुख गण वेषही अगणित तसे ॥
बहु जाति भूत पिशाच जोगि जमात वर्णन करुं कसें ॥ १ ॥
सो. - नाचति गाती गीत परम तरंगी भूतगण ॥
दिसती अति विपरीत किति विचित्र वदती वचन ॥ ९३ ॥

हे वर्‍हाड आणि ही वरघोड्याची मिरवणूक वराला योग्य अशी नाही.( अशाने ) दुसर्‍यांच्या नगरात जाऊन हसे होईल नां ! ॥ १ ॥ विष्णू वचनाने देव हसले व आपापल्या सेनेसहित वेगवेगळे निघाले. ॥ २ ॥ महेश मनातल्या मनात हसून ( म्हणतात की ) हरीच्या व्यंग्य ( विनोदी ) भाषणाला खंड पडत नाही. ॥ ३ ॥ आपल्या प्रियाचे अति प्रिय वचन ऐकून शिवानी भृंगीला पाठवून सगळ्या गणांना बोलावले. ॥ ४ ॥ शिवांची आज्ञा ऐकून सगळे गण जमले व त्यांनी आपल्या प्रभूच्या चरणकमलांना नमस्कार केला. ॥ ५ ॥ विविध वाहने व विविध प्रकारचे वेष वा रुप असलेल्या आपल्या गणांना पाहून शिवांना सुद्धा हसू लोटले. ॥ ६॥ त्या शिवगणांत कोणाला तोंडच नाही, तर कोणास पुष्कळ तोंडे, कोणास हात नाहीत पाय नाहीत, तर कोणास कितीतरी हात व पाय आहेत. ॥ ७ ॥ कोणास पुष्कळ डोळे आहेत, तर कोणास मुळी डोळाच नाही, कोणी चांगले चांगले गलेलठ्ठ तर कोणी नुसते हाडांचे सापळे आहेत ॥ ८ ॥ कोणी अगदी कृश तर कोणी खुप लठ्ठ, कोणी पावन गती (दशा) धारण केली आहे तर कोणी अति अपावन स्थिती, अंगावर घोरभुषणे घातली आहेत; हातात नरकपाल आहे. अंग ताज्या रक्ताने भरले आहे, कोणाला गाढवाचे मुख, कोणाला कुत्र्याचे तर कोणाला डुकराचे, तर कोणाला कोल्ह्याचे तोंड आहे हे गण व त्यांचे वेष सुद्धा अगणित आहेत; त्यातही भूत पिशाच्यांच्या कितितरी जाती आहेत. योगी शंकरांच्या या समाजाचे वर्णन कसे करता येईल ! ॥ छंद ॥ हे परम लहरी भूतगण गाताहेत, नाचताहेत, अति – ओंगळ अति विचित्र दिसत आहेत व नाना प्रकरे विचित्र बोलत आहेत. ॥ सो० ९३ ॥

जसा वर तसें वर्‍हाड आतां । कौतुक विविध होति पथिं जातां ॥
इथें हिमाचल रचिति विताना । अति विचित्र ये वर्णाया ना ॥
शैल सकल जगिं जितके असती । लघु विशाल करवे ना गणती ॥
वन सागर सब नद्या सरांना । धाडिति हिमगिरि निमंत्रणांना ॥
कामरूप सुंदर-तनु-धारी । सहित समाज सहित वरनारी ॥
सकल तुहिनगिरिगेहा जाती । स्नेहें मंगल गीतें गाती ॥
प्रथमच गिरि बहु गृह शृंगारी । तिथें उतरलें यथाधिकारीं ॥
बघता पुरशोभा अनुपमता । विरंचिची लघु गमे निपुणता ॥

छंद. :- लघु भासली विधिनिपुणता निरखून पुरशोभा खरी ॥
वन बाग सरिता कूप सर सब सुभग वर्णि किं कुणि तरी ॥
मंगल विपुल तोरण पताका ध्वज घरोघरिं शोभती ॥
नरनारि सुंदर चतुर छवि बघुनी मुनी मनिं मोहती ॥ १ ॥
दो. :- जगदंबा जिथं अवतरे कोण वर्णि पुर तें हि ॥
ऋद्धि सिद्धि संपत्ति सुख नित्य अधीक नवें हि ॥ ९४ ॥

आता ( मात्र ) जसा वर तसं वर्‍हाड झालं ! जाता जाता वाटेत नाना प्रकारचे थट्टा विनोद करीत चालले ॥ १ ॥ इकडे हिमाचलांनी असा विचित्र मंडप घातला की त्याचे वर्णन करता येणे अशक्य आहे ॥ २ ॥ जगात जितके म्हणून लहाने मोठे अगणित पर्वत आहेत त्यांना ॥ ३ ॥ व वने, सागर, नद्या व तलाव या सर्वांस हिमगिरींनी आमंत्रणे पाठविली ॥ ४ ॥ शैलादिक सर्व मंडळी आपाअपल्या इच्छेप्रमाणे सुंदर शरीर धारण करुन सहकुटुंब सहपरिवार हिमालयाच्या घरी गेले. व ( त्यांच्या सुंदर स्त्रिया ) स्नेहाने मंगल गीते गाऊ लागल्या. ॥ ५-६ ॥ गिरिराजाने आधीच पुष्कळ घरे शृंगारुन तयार ठेवली होती तेथे जे ते आपल्या अधिकारा प्रमाणे उतरले ॥ ७ ॥ त्या नगरीची अनुपम शोभा पाहील्यावर ब्रह्मदेवाची निपुणता त्यांना तुच्छ वाटली ॥ ८ ॥ त्या पुराची शोभा अवलोकन करून विधीची रचना कुशलता खरोखर तुच्छ वाटली. बने, बागा विहिरी, तलाव, आदि सर्वच सुंदर ! त्यांचे वर्णन करील तरी कोण ? नाना प्रकरची मंगल रचना, तोरणे, पताका, व ध्वजा घरोघरी शोभत आहेत आणि पुरूष व स्त्रिया चतुर व इतक्या सुंदर आहेत की त्यांचे रुप पाहील्या बरोबर मुनींचे मन सुद्धा मोहीत होईल. ॥ छंद १॥ जगदंबाच जेथे अवतरली आहे त्या नगरीचे वर्णन कोण करुं शकेल ? ( कारण ) त्या नगरीची समृद्धी, संपत्ती, सुख यांची नित्य नवीन अधिकाधिक वृद्धी होत आहे. ( कारण ) सर्व ऋद्धि सिद्धी तेथे आहेत. ॥ दो. ९४ ॥

नगर निकट ये वर्‍हाड, कळलें । पुरिं खळबळ सौंदर्य वाढलें ॥
कृत सुवेष बहु वाहन सजती । स्वागति सादर अणण्या जाती ॥
हर्षति हृदिं सुरसेना बघुनि । सुखी होति अति हरिस निरखुनी ॥
शिवसमाज जैं बघूं लागती । सकल वाहनें बुजून पळती ॥
धीर धरुनि परि सुजाण राहति । बाल जीव घेउनि सब धावति ॥
जातां भवनि वडील विचारति । वदति, भयें तनु थरथर कापति ॥
काय सांगुं की जाइ न वदलें । धाड यमाची वर्‍हाड कुठलें ॥
वर वेडा बसला बैलावर । व्याल कपाल राख भूषण वर ॥

छंद - वर भस्मनागकपालभूषित नग्न जटिल भयंकर ।
सप्रेत भूत पिशाच जोगिणि विकटमुख रजनीचर ॥
जो जीता राहि वर्‍हाड पाहुनि पुण्य त्याचें अति खरें ।
तो पाहि पार्वतिलग्न वदती घर-घरीं पोरें भरें ॥ १ ॥
दो. :- जाणुनि शंभुसमाज हा हसें मायबापांस ॥
बहुपरि समजविति मुलां भ्या ना ठाव भयास ॥ ९५ ॥

वर्‍हाडी नगराच्या जवळ आले असे कळताच नगरात विशेष गडबड सुरु झाली व सौंदर्य वाढले ॥ १ ॥ स्वागती उत्तम वेष करुन आपापली वाहने सजवून वर्‍हाडास आदराने घेऊन येण्यासाठी गेले . ॥ २ ॥ देवांच्या समाजाला पाहुन त्यांस हर्ष झाला. विष्णूला पाहून सर्व अतिसुखी झाले. ॥ ३ ॥ ( पण ) शिव समाजाकडे पाहू लागले तोच सर्व वाहने बुजली व घाबरुन अस्ताव्यस्त पळूं लागली. ॥ ४ ॥ जे समजूतदार व वयाने मोठे होते ते कसातरी धीर धरुन राहीले बाल होते ते जीव मुठीत घेऊन धूम पळत सुटले. ॥ ५ ॥ घरी गेल्यावर त्यांना वडिलांनी विचारले तेव्हा बालके बोलली पण त्यांचे अंग भयाने थरथर कापत होते. ॥ ६ ॥काय सांगांवं ! काही सांगवतच नाही. कुठंलं वर्‍हाड अन् कुठला वर, यमाची धाड आली न् काय ! ॥ ७ ॥नवरा मुलगा तर काय वेडा पीर ! बैलावर स्वार झाला आहे, मोठमोठे साप, डोक्याच्या कवट्या, भस्म हे नवर्‍या मुलाचे अंलंकार.......! ॥ ८ ॥ वराच्या अंगाला भस्म फासलं आहे, नाग – साप व कपाल हे त्याचे अलंकार, नागडा, मोठमोठ्या जटा असलेला अगदीच भयंकर वर आहे. बरोबरचे वर्‍हाडी तर भुते, प्रेते, पिशाचे, जोगिणी, अक्राळविक्राळ तोंडाचे राक्षस आहेत. ( म्हणून ) म्हणतो कि तो वर नी ते वर्‍हाड पाहिल्यावर जो जिवंत राहील तो खरा पुण्यवान ! व तोच पार्वतीचा लग्न सोहळा पाहील. आशा गोष्टी मुले घरोघरी सांगू लागली. ॥ छंद १॥ हा शंभु – समाज आहे असे जाणून आई बापांस हसू आले व त्यांनी नाना प्रकारांनी मुलांची समजूत घालून सांगीतले की तुम्ही मुळीच भिऊ नका, भिण्याचे कारण नाही. ॥ दो० ९५ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP