|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ लंकाकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय १० वा Download mp3 तदा रथा रघुनाथ चालविति । विप्रचरण पंकजिं शिर नमविति ॥ छं० :- बा ! सुयश नाश न कर किं जल्पुनि ऐक नीति करी क्षमा ॥ तेव्हा मग रघुनाथाने रथ चालू केला व त्यावेळी ( हृदयावरील ) विप्र चरण कमलाला नमस्कार केला. ॥ १ ॥ तेव्हा रावण अति रुष्ट झाला व गर्जना करीत दटावीत समोर आला. ॥ २ ॥ ( व म्हणाला की ) तापसा ऐक ! तुम्ही आजपर्यत ज्या वीरांना युद्धांत जिकलेत त्यांच्या सारखा मी नाही. ॥ ३ ॥ माझे नाव रावण आहे व सर्व जगात माझे यश भरले आहे, लोकपाल ज्याच्या बंदीखान्यात आहेत (असा मी आहे) ॥ ४ ॥ तुम्ही खर दुषण व विराध यांना मारलेस, बिचार्या वालीचा व्याधाप्रमाणे वध केलास. ॥ ५ ॥ मोठ्या मोठ्या राक्षस सुभटांना – त्यांच्या समुदायांसह मारलेस, व कुंभकर्ण मेघनाद यांचा वध केलास. ॥ ६ ॥ ऐक, नृपा ! जर युद्धातून पळून गेला नाहीस तर या सर्वांचे उट्टे आज काढतो. ॥ ७ ॥ आज या कठिण रावणाच्या तावडीत सापडला आहेस, आज तुला काळाच्या हवाली करतोच. ॥ ८ ॥ रावणाचे अपशब्द ऐकून, तो कालवश झाला आहे हे जाणून, कृपानिधान मोठ्याने हसून म्हणाले की, ॥ ९ ॥ तुझी सर्व प्रभुता सत्य आहे, अगदी सत्य आहे; बाबा ! पण वल्गना करु नकोस. (काय असेल तो) पुरुषार्थ प्रत्यक्ष दाखव. ॥ १० ॥ बाबा रे, क्षमा कर; पण मी नीती सांगतो ती ऐक वल्गना करुन् सुयशाचा नाश करु नकोस या जगात पाटल (गुलाब), आंबा व फणस यांच्या सारखे तीन प्रकारचे लोक असतात कोणी फक्त फळेच देतात, कुणी फुले व फळे देतात तर काही फक्त फळेच देतात तसेच कोणी नुसते बोलतात, पण करीत काही नाहीत, कोणी बोलतात व करतात तर कोणी करतात पण बोलत नाहीत. ॥ छंद ॥ श्रीराम वचन ऐकून रावण मोठ्याने हसला व म्हणाला की मला ज्ञान शिकवीत आहे ! वैर केले ( शूर्पणखा विटंबन ) तेव्हा भय नाही वाटले, आणि आता प्राण प्रिय वाटत आहे. ॥ दो० ९० ॥ दुर्वच वदुनि रुष्ट दशकंधर । सोडुं लागला कुलिशांसम शर ॥ छं० :- जैं क्रुद्ध युद्धिं विरुद्ध रघुपति तूणिं बाण अधीर ते ॥ दुर्वचने बोलून दशकंठ रुष्ट होऊन वज्रासारखे बाण सोडू लागला. ॥ १ ॥ विविध आकारांचे बाण सुटले व ते दिशा, उपदिशा, आकाश पृथ्वी भरुन राहीले. ॥ २ ॥ रघुवीराने एकच अग्नीबाण सोडला व क्षणात राक्षसाचे सर्व बाण जळले ॥ ३ ॥ त्याने फार चिडून एक तीव्र शक्ती सोडली, पण प्रभूंनी तिला आपल्या बाणाने परतविली. ॥ ४ ॥ त्याने कोट्यावधी चक्रे त्रिशूल मारले, पण प्रभूंनी ते सहजी तोडून निवारण केले. ॥ ५ ॥ दुष्टांचे सर्व मनोरथ जसे निष्फळ ठरतात तसे रावणाचे सारे बाण निष्फळ होऊं लागले. ॥ ६ ॥ ( मग रावणाने ) रामचंद्रांच्या सारथीला शंभर बाण मारले त्याबरोबर तो “ जय राम ” ओरडत भूमीवर पडला. ॥ ७ ॥ रामचंद्रानी कृपेने सारथीला उठविले आणि आता प्रभु भारी संकुद्ध झाले. ॥ ८ ॥ जेव्हा रघुपती कृद्ध होऊन युद्धांत विरोध करण्यास सिद्ध झाले तेव्हा त्यांच्या भात्यातले बाण अधीर होऊन बुळबुळ करुं लागले प्रभुंनी धनुष्याचा अति घोर असा टणत्कार केला त्या बरोबर राक्षस भयार्त होऊन पळत सुतले. मंदोदरीच्या छातीत कंप सुटला कूर्म व पर्वत कंपायमान झाले आणि भूमीही संत्रस्त झाली दिग्गज चीत्कार करीत आपल्या दातांनी पृथ्वीला धरुं लागले तेव्हा ते कौतुक पाहून देवांना हसू आले. ॥ छंद ॥ धनुष्य कानापर्यत ताणून रामचंद्रांनी कराल बाण सोडण्यास प्रारंभ केला. तेव्हा रामचंद्रांचे बाण समूह जणूं झगझगीत सर्पासारखे चालले ॥ दो० ९१ ॥ जाति बाण जणुं सपक्ष उरगहि । प्रथम मारिले सारथि तुरगहि ॥ छं० :- जणुं राहु केतु अनेक, मभ पथिं झरत शोणित धावती ॥ बाण चालले ते जणूं पंख असलेले सर्पच त्यांनी प्रथम सारथी व घोडे मारले. ॥ १ ॥ रथ, पताका, ध्वज यांचा चुराडा केला तेव्हा अत्यंत गर्जला पण त्याचे आत्मबल थकले. ॥ २ ॥ तो चटकन, दुसर्या रथात बसला व खवळून खूप शास्त्रास्त्रांचा ( एकदम ) मारा करुं लागला. ॥ ३ ॥ पण परद्रोह करणार्या माणसाचे प्रयत्न जसे विफळ होतात तसे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. ॥ ४ ॥ मग रावणाने दहा शूल सोडले व त्यानी चारी घोडे मारुन भूमीवर पाडले. ॥ ५ ॥ घोड्यांना उठवून रघुनायक कोपले व त्यांनी धनुष्य ओढून बाण सोडले. ॥ ६ ॥ रावणाची मस्तके रुपी कमल वनांत संचार करणारे रामबाणरुपी पुष्कळ भ्रमर निघाले. ॥ ७ ॥ दहा कपाळांवर दहा दहा बाण मारले व ते आरपार निघून गेले अन रक्ताचे ओघ वाहू लागले. ॥ ८ ॥ रक्ताचे ( दोनशे ) पाट वहात असताही तो बलवान धावला तेव्हा प्रभूंनी पुन्हा शरसंधान केले. ॥ ९ ॥ रघुवीराने ३० बाण सोडले आणि २० भुजां सहित १० शिरे जमिनीवर पडली. ॥ १० ॥ ( पण ) कापताच ती तत्क्षणीं ( भुजा व शिरे नवीन फुटली ( निर्माण झाली ), पुन्हा ती रामचंद्रांनी कापून काढली ॥ ११ ॥ प्रभूंनी कितीतरी वेळा शिरे व भुजा छाटली पण ती छाटताच पुन्हा नवीन फुटूं लागली. ॥ १२ ॥ प्रभूंनी पुन:पुन्हा बाहू व मस्तके कापली, असे कोसलाधीश अति कौतुकी आहेत ॥ १३ ॥ आकाशात बाहू व शिरे अशी पसरली की जणूं असंख्यात केतू, व राहूच ! ॥ १४ ॥ जणूं अनेक राहू केतू रक्त गळत असता आकाश मार्गाने धावत आहेत व रघुवीराचे प्रचंड बाण लागत असल्याने ते भूमीवर येऊं शकत नाहीत एका एका शरात छेदून भरलेले शिरांचे समूह आकाशात उडत असता असे शोभत आहेत की जणूं क्रुद्ध झालेले भगवान सूर्य आपल्या किरण समूहात जिकडे तिकडे चोहोकडे राहूंना ओवीत आहेत. ॥ छंद ॥ जसे विषय अधिकाधिक सेवन केल्याने दररोज काम अधिकाधिक वाढतो तसे प्रभु जसजशी त्याची शिरे हरण करतात तसतशी ती अपार उत्पन्न होत आहेत. ॥ दो० ९२ ॥ ( विधुंतुद = राहू ) दशमुख बघुनि शिरांची वाढ । विसरे मरण रोष ये गाढ ॥ छं० :- शिर राम कोठे वदत धावति, बघुनि कपि पळु लागती ॥ शिरांची वाढ पाहून दशमुख मरण विसरला व त्याला अतिशय राग आला. ॥ १ ॥ महाअभिमानी महामूढ गर्जू लागला व दाही धनुष्ये ताणून धावला. ॥ २ ॥ रणभूमीत दशकंठ कोपला आणि त्याने बाणांची वृष्टी करुन रघुपतीचा रथ लोपून टाकला. ॥ ३ ॥ एक घटकाभर रथ दृष्टीस पडला नाही जणू सूर्य धुक्यात लपून दडून राहीला. ॥ ४ ॥ जेव्हा देवांनी हाहाकार केला, तेव्हा प्रभूंनी क्रोधाने धनुष्य हाती घेतले. ॥ ५ ॥ शत्रूचे बाण निवारुन त्याची शिरे कापू लागले व त्यांनी दशदिशा आकाश व पृथ्वी व्यापली. ॥ ६ ॥ कापलेली मस्तके आकाशात धावू लागली व जय जयकार करुन भय उपजवू लागली. ॥ ७ ॥ लक्ष्मण कुठे आहे ? वानरराज सुग्रीव कुठे आहे ? व कुठे आहे कोसलाधीश्वर ? रघुवीर ॥ ८ ॥ राम कोठे असे ओरडत शिरे धावू लागलेली पाहून कपी पळत सुटले तेव्हा रघुवंश शिरोमणीने हसून पुन्हा शर संधान केले व ती सर्व शिरे शरांनी वेधली – ओवली मुंडमाळा हातात घेतलेल्या पुष्कळ कालिका थव्या थव्यांनी जमून रुधिर सरितेत न्हाऊन जणूं समर वटाचे पूजन करण्यासच निघाल्या आहेत. ॥ छंद ॥ पुन्हा दशकंठ क्रुद्ध झाला आणि मग त्याने एक प्रचंड शक्ती सोडली व ती जणूं काळाच्या दंडासारखी बिभीषणाच्या अंगावर आली. ॥ दो० ९३ ॥ येतां बघुनि शक्ति अति भीषण । प्रणतार्तीभंजन माझा पण ॥ छं० :- उरिं गदा मार कठोर घोर हि लागतां महिं कोसळे ॥ अति भयानक शक्ती येताना पाहीली ( आणि प्रभूंनी मनात म्हटले की ) शरणागतांचे संकट निवारण करणे हे माझे ब्रीद आहे. ॥ १ ॥ म्हणून त्वरेने बिभीषणाला आपल्या मागे सारला आणि रामचंद्रांनी ती शक्ती आपल्या अंगावर घेतली. ॥ २ ॥ शक्ती लागताच क्षणभर मूर्च्छा आली हा प्रभूचा खेळ झाला पण देव मात्र फार व्याकूळ झाले. ॥ ३ ॥ प्रभूला श्रम झाले असे पाहून बिभीषण क्रुद्ध होऊन हातात भयंकर गदा घेऊन रावणावर धावला. ॥ ४ ॥ आणि म्हणाला अरे मंदभाग्या, दुष्टा, मूढा, दुर्बुद्धी ! तू आजपर्यत सुर, नर, मुनी व नाग इ. सर्वांशी वैर केलेस. ॥ ५ ॥ परंतु आदराने आपली शिरे शिवाला वाहीलीस म्हणून एकेकाची कोटी कोटी शिरे झाली. ॥ ६ ॥ आणि म्हणूनच तू आजपर्यंत वाचलास ( पण लक्षात ठेव ) आता काळ तुझ्या शिरावर नाचतो आहे ! ॥ ७ ॥ अरे दुष्टा ! रामविरोध करुन संपत्ती इच्छितोस ? असे म्हणून बिभीषणाने रावणाच्या उरात छातीवर गदा मारली. ॥ ८ ॥ गदेचा घोर घाव उरात लागताच रावण धाडकन धुळीत कोसळला, व दाही तोंडानी रक्त ओकूं लागला पण उठून रोषाने अति जोराने बिभीषणावर धावला. ते दोघे अति बलवान मल्ल युद्धांत एकमेकांस तडाखे देऊं लागले पण रघुवीर बलाने मत्त झालेला बिभीषण त्याला पासंगासारखाही मानीत नाही. ॥ छंद ॥ उमे ! बिभीषण रावणासमोर ( वर मान करुन ) कधी पाहूं शकला काय ? पण आता हा बिभीषण जणूं काळासारखाच लढत आहे हा श्री रघुविरांचा प्रभाव ( दुसरे काय ? ) ॥ दो ९४ ॥ दिसला श्रांत बिभीषण भारी । हनूमान धावे गिरिधारी ॥ छं० :- रघुवीर चिंतुनि धीर कपि पाचारि हाणी रावणा ॥ बिभीषण फार थकलेला दिसला तेव्हा हनुमान पर्वत घेऊन रावणावर धावला. ॥ १ ॥ त्याने रथ्, सारथी घोडे यांचा चुराडा केला व रावणाच्या उरांत लाथा मारल्या. ॥ २ ॥ रावण उभा आहे, पण त्याच्या सर्वांगाला कंप सुटला आहे. बिभीषण सेवक रघुवीराकडे गेला. ॥ ३ ॥ रावणाने ललकारुन कपीला प्रहार केले तरी कपी पुच्छ पसरुन आकाशात उडाला. ॥ ४ ॥ रावण त्याचे पुच्छ पकडून त्याच्या बरोबरच उडत गेला तेव्हा हनुमान वळून उलट त्याच्याशी युद्ध करु लागला. ॥ ५ ॥ दोघे समान योद्धे आकाशात लढू लागले व एक दुसर्याला क्रोधाने तडाखे मारु लागले. ॥ ६ ॥ आकाशात शक्ती व युक्ती यांनी लढत असता जणूं कज्जलगिरी व सुमेरु पर्वत लढत असावेत असे ते दोघे शोभू लागले. ॥ ७ ॥ बुद्धीने व बळाने पाडून सुद्धा तो पडत नाही असे दिसले तेव्हा मारुतीने प्रभूंचे स्मरण केले. ॥ ८ ॥ रघुविरांचे स्मरण करुन धैर्यवंत कपीने ललकारुन रावणावर प्रहार केले, तेव्हा दोघेही पडतात, उठतात पुन्हा लढतात असे चालू झाले तेव्हा देवांनी दोघांचाही जयजयकार केला. हनुमंताचे संकट पाहून भल्ल कपी रावणावर रागाने धावले, पण रणमत्त रावणाने आपल्या प्रचंड भुजभळाने सर्वांचे मर्दन केले. ॥ छंद ॥ तेव्हा रघुवीराच्या प्रेरणेने प्रचंड कपी धावले प्रबल कपी सैन्य पाहून रावणाने कपट ( माया युद्ध ) करण्यास प्रारंभ केला. ॥ दो० ९५ ॥ अंतर्धान होइ पळ एक । मग खल रूपें प्रगटि अनेक ॥ छं० :- ज्यां विदित महिमा अभय राहति, सत्य रिपु कपि मानिती ॥ रावण एक पळभर अदृश्य झाला आणि मग त्या दुष्टाने अनेक खलरुपे प्रगट केली. ॥ १ ॥ रघुपतीच्या सैन्यात जितके कपी भल्ल आहेत तितके दशमुख चोहोकडे प्रगट झाले. ॥ २ ॥ कपींनी अगणित दशशीर्ष पाहीले तेव्हा भल्ल कपी जिकडे तिकडे पळत सुटले. ॥ ३ ॥ रक्ष लक्ष्मणा ! रक्ष रघुवीरा ! असे ओरडत वानरे पळूं लागली. त्यांचा धीर साफ सुटला. ॥ ४ ॥ घोर कठोर भयानक गर्जना करीत कोट्यवधी रावण दाही दिशांस धावू लागले. ॥ ५ ॥ सगळे सुर भयभीत होऊन घाईघाईने पळू लागले. ( व एकमेकांस म्हणाले ) बाबांनो ! आता जयाची आशा सोडा. ॥ ६ ॥ एका रावणाने सर्व देवांना जिंकले, आता तर अगणित झाले, म्हणून आता गिरिकंदरांचा रस्ता धरा. ॥ ७ ॥ ज्यांना प्रभुमहिमा माहित होता असे ज्ञानी मुनी, ब्रह्मदेव, आणि शंकर तेवढे राहीले. (आकाशात बाकी सर्व पळाले) ॥ ८ ॥ ज्यांनी प्रभूंचा महिमा जाणला ते निर्भय राहीले कपींना हे शत्रू खरे वाटले ( म्हणून ) भल्ल कपी सारे विचलित झाले व भयभीत होऊन कृपालु रक्षण करा असे प्रार्थू लागले, हनुमान, अंगद, नलनील, जांबवान इ. जे रणशूर आणि बलवान तेवढेच लढत राहीले व कपट रुपी भूमीतून उगवलेले जे भट होते त्यापैकी कोटी कोटी दशाननांचे मर्दन करु लागले. ॥ छंद ॥ सुर व वानर व्याकुळ झालेले पाहून कोसलधीश हसले व धनुष्यावर एकच बाण लावून त्यांनी ते सर्व दशशीर्ष मारले नष्ट केले. ॥ दो० ९६ ॥ प्रभु हरती माया एका क्षणिं । नष्ट जसा तम उगवत दिनमणि ॥ छं० :- पाडी महीवर लाथ ताडी वालिसुत गत प्रभुकडे ॥ सूर्य उगवताच जसा अंधार नष्ट होतो तशी प्रभूंनी एका क्षणात माया नष्ट केली. ॥ १ ॥ रावण एकच आहे हे पाहून देवांना हर्ष झाला व परत येऊन त्यांनी प्रभूंवर पुष्पवृष्टी केली ॥ २ ॥ प्रभूंनी बाहू वर उचलून कपींना ( खुणेने ) फिरवले व परत फिरणारे कपी इतरांना हाका मारु लागले. ॥ ३ ॥ प्रभु बलाने युक्त झालेले कपी धावतच निघाले व त्वरेने तडक रणभूमीतच दाखल झाले. ॥ ४ ॥ सुर रघुपतीची स्तुती करीत आहेत असे पाहून रावण म्हणाला की मी एकच उरलो असे सुरांना वाटते नां ? ॥ ५ ॥ शठांनो ! तुम्ही तर सदाच माझे मारखाऊ आहांत, असे म्हणून रावण रागाने आकाशात धावला तेव्हा ॥ ६ ॥ सुर हाहाकार करीत पळत सुटले. ( तेव्हा रावण त्यांना म्हणाला ) खलांनो, तुम्ही माझ्या पुढे कुठे जाल पळून ? ॥ ७ ॥ सुर व्याकुळ झाल्याचे पाहून अंगदाने उड्डाण केले व रावणाला त्याचा पाया पकडून पृथ्वीवर पाडला. ॥ ८ ॥ जमिनीवर पाडून त्याला लाथ मारली व वालिसुत प्रभुकडे गेला दशकंठ सावध होऊन उठला व घोर कठोर ध्वनीने मेघाप्रमाणे गर्जना करु लागला. दर्पाने दहा धनुष्ये सज्ज करुन वर बाण लावून वर्षाव करु लागला व सगळ्या कपी भटांना त्याने घायाळ व भय विव्हळ केले तेव्हा आपले बळ पाहून त्याला हर्ष झाला. ॥ छंद ॥ तेव्हा रघुपतींनी रावणाचि शिरे, भुज, शर, व धनुष्ये कापून टाकली तरी तीर्थात केलेल्या पापाप्रमाणे ती वाढू लागली. ॥ दो० ९७ ॥ रिपु शिर बाहु वृद्धि पाहिली । क्रुद्ध भल्ल कपि दळें जाहली ॥ छं० :- करिं लाथ घात प्रचंड लागत विकळ विरथ पडे नहीं ॥ शत्रूच्या शिरांची व बाहूंची वृद्धी पाहताच कपी भल्ल दले क्रुद्ध झाली. ॥ १ ॥ बाहू व शिरे तुटत असून सुद्धा मूढ मरत नाही असे पाहून कपियोद्धे व भल्ल योद्धे रावणावर धावले. ॥ २ ॥ अंगद, मारुती, नल, नील, सुग्रीव द्विविद वगैरे सर्व बलवान वीर त्याच्यावर वृक्षांचा व पर्वतांचा भारी मारा करु लागले, पण तेच वृक्षपर्वत धरुन तो कपींवर मारु लागला. ॥ ३-४ ॥ कोणी नखांनी त्याचे शरीर फाडून पळतात तर कोणी लाथा मारुन पळून जातात. ॥ ५ ॥ तोच नलनील डोक्यावर चढले व त्यांनी नखानी त्याचे कपाळ फाडले – चिरले ॥ ६ ॥ ( तरी त्याला कळले नाही ) रक्त पाहून त्याला फार विषाद वाटला आणि त्यांना धरण्यासाठी त्या सुरारीने भुजा पसरल्या. ॥ ७ ॥ पण ते त्याला सापडेनात कारण ते त्याच्या हातांवरच असे फिरुं लागले की जणूं कमलवनात दोन भुंगेच फिरत आहेत. ॥ ८ ॥ रावणाने रुष्ट होऊन उड्या मारुन दोघांना पकडले, आणि त्यांना जमिनीवर आपटीत असता ते त्याचे बाहू मुरगळून पळाले. ॥ ९ ॥ मग त्याने दहा धनुष्ये हाती धरली व बाण मारुन कपींना जर्जर केले. ॥ १० ॥ त्याने हनुमंतादि सर्व वानरांना मूर्च्छित केले व प्रदोषकाळ होताच त्या रावणाला हर्ष झाला. ॥ ११ ॥ सगळे कपी मूर्च्छित पडलेले पाहून रणधीर जांबवंत धावला. ॥ १२ ॥ वृक्षपर्वत धारण केलेले भल्ल व त्याच्या बरोबर आले व ते रावणाला ललकारीत फार मारु लागले. ॥ १३ ॥ बलवान रावणाला क्रोध आला व तो अनेक भटांना पाय धरधरुन जमिनीवर आपटूं लागला. ॥ १४ ॥ आपल्या सैन्याला मूर्च्छित पाहून भल्लपती जांबवंताने क्रोधाने रावणाच्या छातीत लाथ मारली. ॥ १५ ॥ लाथेचा प्रचंड तडाखा छातीत बसताच रावण व्याकुळ होऊन रथातून जमीनीवर त्याने वीसही मुठीत वीस ( अस्वले ) धरले आहेत ते जणूं रात्री कमळात राहीलेल्या मधुकरांसारखे वाटले. मूर्च्छित पाहून मग पुन्हा लाथ मारुन खराच मूर्च्छित पडला याची खात्री झाल्यावर भल्लपती जिथे प्रभु होते तेथे आला रात्र झालेली पाहून रावणाला रथात घालून सारथी तेथेच त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करुं लागला. ॥ छंद ॥ भल्लकपींची मूर्च्छा उडाल्यावर ते सर्व प्रभूपाशी आले व तिकडे सगळे राक्षस अति भयभीत होऊन रावणाला गराडा घालून राहीले . ॥ दो० ९८ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |