|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय २४ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 प्रेम मग्न अति पुर नारी नर । निमिषासम सरती ते वासर ॥ दो० :- निशिं न नीज ना भूक दिनिं भरत विकल शिचि शोचिं ॥ ( याप्रमाणे) पुरवासी स्त्रिया व पुरुष अति प्रेममग्न झाले असून ( त्याचे) ते दिवस निमिषासारखे सरु लागले ॥ १ ॥ सीतेने सासूगणिक रुपे घेतली व सर्व सासवांची सेवा आदराने अगदी सारखी केली ॥ २ ॥ हे मर्म फक्त रामचंद्रांस कळले; इतर कोणालाही कळले नाही ( कारण) सगळ्या माया सीतेच्या मायेतच आहेत ॥ ३ ॥ सीतेच्या सेवेला त्या सर्व वश होऊन सुखी झाल्या व सगळ्या सासवांनी तिला शिकवण व आशीर्वाद दिले ॥ ४ ॥ सीता व दोघे भाऊ ( राम-लक्ष्मण) यांना अगदी सरळ स्वभावाचे पाहून कुटील राणीला पोटभर पश्चाताप झाला ॥ ५ ॥ कैकेयी अवनीला व यमाला प्रार्थना करुन मागू लागली पण मही आपल्या उदरांत ठाव देत नाही व विधी मरण देत नाही ॥ ६ ॥ लोकांत व वेदांत प्रसिद्ध आहे आणि सांगतात की रामविरोध करणार्याला नरकात सुद्धा स्थान मिळत नाही ॥ ७ ॥ सर्वांच्या मनांत संशय आहे व ( मनात म्हणतात की) हे विधी ! राम अयोध्या नगरांत परत येतात की नाही ? ॥ ८ ॥ भरत पवित्र चिंतेने व्याकुळ झाले असून त्यांना रात्री झोप नाही व दिवसा भूक नाही नीच चिखलांत अडकणारा मासा पाणी आटत चालले म्हणजे जसा व्याकुळ होतो तशी भरताची दशा झाली आहे ॥ दो० २५२ ॥ जननिमिषें करि काळ कुचाळी । ईति भीति जशि पिकतां साळी ॥ दो० :- गुरुपद कमलीं प्रणमुनी आज्ञेनें बसतात ॥ साळीचे पीक पिकण्याच्या वेळी जे ईतीचे भय ( एकाएकीच) उपस्थित व्हावे त्याप्रमाणे जननीला निमित्त करुन काळाने कुचेष्टा केली ॥ १ ॥ रामाला अभिषेक कसा होईल या विषयांच्या एकाही उपायाचे आकलन मला होत नाही ॥ २ ॥ गुरुजींचे वचन ( आज्ञा) मानून राम अवश्य परत येतील, पण गुरु रामाची रुचि जाणूनच बोलणार ! ॥ ३ ॥ कौसल्या मातेच्या सांगण्याने राम परततील, पण रामजननीच ती ! ती कधी हट्ट करील कां ? ॥ ४ ॥ मी तर एक सेवक, माझी पाड तो काय ? त्यांतही काळ प्रतिकूल, आणि दैव फिरलेले ! ॥ ५ ॥ मी हट्ट धरुन बसलो तर त्याच्यासारखे कुकर्म नाही, ( कारण) सेवकधर्म कैलासाहून अधिक भारी ( जड, वजनदार = गुरु) आहे ॥ ६ ॥ एक सुद्धा युक्ती मनात टिकली नाही व भरत चिंता करीत असताच रात्र संपली (उजाडले) ॥ ७ ॥ ( नंतर) स्नान वगैरे करुन प्रभूला प्रणाम केला व भरत बसतात तोच ऋषींचे (वसिष्ठांचे) बोलावणे आले. ॥ ८ ॥ वदले मुनिवर समय ओळखुनि । सभ्य, भरत घ्या सुजाण ऐकुनि ॥ दो० :- रामाज्ञा रुचि राखणें हितकर हें आम्हांस ॥ समय ओळखून मुनीश्रेष्ठ – वसिष्ठ म्हणाले की सुजाण सभासद सभ्य हो ! सुजाणा भरता ! मी सांगतो ते ऐका ॥ १ ॥ राम धर्मधुरीण, सूर्य कुलाचे सूर्य, राजा स्वतंत्र असून भगवान आहेत ॥ २ ॥ तो सत्यसंध, श्रुति सेतू पालक, आहे व रामजन्मच जगाचे मंगल करण्याच्या हेतूने झाला आहे ॥ ३ ॥ ते गुरु, पिता, माता यांच्या वचनानुसार वागणारे आहेत ( खरे) पण दुष्टांच्या समूहांचे संहारक व देवांचे हित करणारे आहेत ॥ ४ ॥ नीती, प्रीती, परमार्थ व स्वार्थ यांना यथार्थ जाणणारा रामासारखा दुसरा कोणी नाही ॥ ५ ॥ ब्रह्मा, विष्णू, महेश, चंद्र, सूर्य व सर्व दिकपाल, माया सर्व जिव, काळ, शेष पृथ्वीचे पालन करणारे राजे, योग व योगापासून मिळणार्या इतर सिद्धिंचे वेदशास्त्रांनी वर्णन केले आहे. त्या या सर्वाच्या ठिकाणी असलेली प्रभुता सामर्थ्य सत्ता – शक्ती इत्यादींचा मनाशी नीट विचार करुन पहा म्हणजे कळेल की रामाचीच आज्ञा सर्वांच्या शिरावर आहे ॥ ६–८ ॥ ( म्हणून मला वाटते की) रामाची आज्ञा व रुची ( इच्छा) राखणे हेच आम्हा सर्वांना हितकर आहे तरी आता आपण सर्व सूज्ञ मंडळींनी हे लक्षांत घेऊन सर्वानुमते जे ठरेल ते करावे ॥ दो० २५४ ॥ सकलां सुखद राम अभिषेकहि । मंगल मोद मूल पथ एक हि ॥ दो० :- पुसतां अतां उपाय मज हें मम अभाग्य भूरि ॥ श्रीरामास राज्याभिषेक करणे हा मंगल व मोद यांचे मूळ असलेला एक ( मुख्य) च मार्ग आहे ॥ १ ॥ रघुराज अयोध्यानगरीत परत कसे येतील याचा ( नीट) विचार करुन सांगा म्हणजे तो उपाय आपण करु ॥ २ ॥ नीतीने परमार्थाने व स्वार्थाने संयुक्त असे मुनिवरांचे भाषण सर्वांनी आदराने ऐकून घेतले ॥ ३ ॥ पण कोणाकडून काही उत्तर येईना ( उत्तर देता येई ना) सगळे स्तंभित झाले आहेत ( हे पाहून) मस्तक नमवून भरतानी हात जोडले ॥ ४ ॥ भानुवंशात असे कितीतरी भूप होऊन गेले की जे एकाहून एक मोठे होते ॥ ५ ॥ त्या सर्वाच्या जन्माचे निमित्त आईबाप होते; व कर्माचे शुभाशुभ फळ देणारा विधाताच होता ॥ ६ ॥ ( पण) दु:खांचा विनाश करुन ( सर्व) कल्याण करणारा आपलाच आशीर्वाद होता हे सर्व जगाला माहीत आहे ॥ ७ ॥ ज्यांनी विधीगतीला बाध आणला ते स्वामी आपणच आहांत ! आपण जर निश्चय केला तर त्याला कोण टाळू शकतील ? ॥ ८ ॥ ( असे असून) आता आपणच मला उपाय विचारता, तेव्हा हे माझे मोठे अभ्याग्यच ! या स्नेहमय वचनाला ऐकून गुरु अनुरागाच्या मोठ्या पुरांत सापडले ! हृदय प्रेमाने भरुन आले ॥ दो० २५५ ॥ रामकृपेंच तात तें सत्य हि । सिद्धि रामविमुखा स्वप्निंहि नहि ॥ दो० :- रामसिता हृदयस्थही तुम्हिं सर्वज्ञ सुजाण ॥ तात ! तुम्ही म्हणता ते सत्यच आहे, पण ते रामकृपेनेच ( घडले) रामविमुखाला सिद्धी स्वप्नांत सुद्धा मिळत नाही ॥ १ ॥ ( एक उपाय आहे, पण) सांगण्यास संकोच वाटतो, सर्व जात असता बुध ( ज्ञानी) अर्ध्याचा त्याग करतात ॥ २ ॥ तुम्ही दोघे बंधू वनात जा म्हणजे सीता, लक्ष्मण व रघुराज राम यांना परत फिरवूं ॥ ३ ॥ हे सुंदर वचन ऐकून दोन्ही भावांना हर्ष झाला व दोघांच्या काया ( देह) अति आनंदाने परिपूर्ण झाल्या ॥ ४ ॥ मन फार प्रसन्न झाले व देह तेजाने असे चमकू लागले की जणू दशरथ राजा सजीव झाले व राम राजे झाले ॥ ५ ॥ लोकांना फार लाभ झाला व ती हानि अल्प वाटली, राण्यांना सुख, व दु:ख सारखेच झाले व त्या रडू लागल्या ॥ ६ ॥ भरत म्हणाले की मुनींच्या सांगण्याप्रमाणे केल्याने जगांतील समस्त जीवांना इष्ट फळ मिळेल ॥ ७ ॥ ( १४ वर्षेच काय) मी जन्मभर अरण्यात राहीन ( कारण) यापेक्षा अधिक सुख, मला दुसरे नाही ॥ ८ ॥ राम व सीता माझ्या हृदयातच वास करतात व आपण सर्वज्ञ व सुजाण आहांत ( माझ्या हृदयातले जाणताच) तरी नाथ ! आपण सांगीतले ते खरेच सांगितले असेल तर आपण आपले वचन सत्य करावे ॥ दो० २५६ ॥ ऐकुनि वचन स्नेहा पाहुनि । होति विदेही सकलसभा मुनि ॥ दो० :- सकल हृदंतरिं वसतसां जाणां भाव कुभाव ॥ ( भरताचे) भाषण ऐकून व स्नेह पाहून सर्व सभा आणि मुनी वसिष्ठ विदेही झाले ॥ १ ॥ भरताचा महा महिमा महासागर आहे व वसिष्ठ मुनींची मती अबलेसारखी तीरावर उभी आहे ॥ २ ॥ पार जाण्य़ाचा उपाय शोधीत आहे, पण होडी, तराफा, जहाज इ. काही ( मिळत) नाही ॥ ३ ॥ भरताची महती दुसरा कोण वर्णन करील ? ( शक्यच नाही कोणाला) तलावातील शिंपीमध्ये सागर कधी साठवता येईल कां ? ॥ ४ ॥ आर्त कधीं न विचारें वदतो । डाव जुगार्या अपला दिसतो ॥ दो० :- भरत विनति घ्या ऐकुनी सादर करा विचार ॥ ( कारण) आर्त कधी विचारपूर्वक बोलत नाही व जुगार्याला आपलाच डाव दिसत असतो ( तसे आमचे सर्वांचे आहे) ॥ १ ॥ मुनींचे वचन ऐकले व रघुराज म्हणाले की नाथ ! उपाय ( तर) आपल्याच हातात आहे की ॥ २ ॥ आपली इच्छा रक्षण करणे व आज्ञा केली की ती आनंदाने पालन करणे यांतच सर्वांचे हित आहे. ॥ ३ ॥ प्रथम मला जी आज्ञा होईल ती मी शिरोधार्य मानून राजीखुषीने पाळीन ॥ ४ ॥ पुढे प्रभु ज्यांना जसे सांगतील त्याप्रमाणे सर्व लोक सर्व प्रकारे वागतील ॥ ५ ॥ मुनी म्हणाले की राम ! तुम्ही सत्यच सांगीतलेत; पण भरताच्या स्नेहाने माझी विचार शक्तीच शिल्लक ठेवली नाही ॥ ६ ॥ एवढ्याच साठीच मी पुन:पुन्हा सांगतो की मी माझी बुद्धी भरताच्या भक्तीला अतिशय वश झाली आहे ॥ ७ ॥ ( त्यामुळे) माझे मत असे आहे की भरताची रुची रक्षण करुन ( करण्य़ास) जे काही कराल तुम्ही ते शुभच आहे, याला साक्षीला शिव आहेत ॥ ८ ॥ म्हणून तुम्ही प्रथम भरताची विनंती आदराने ऐकून घ्या, ( मग) त्यावर विचार करा आणि मग साधुमत, लोकमत, राजनीती व वेद यांचे जे उत्तम सार म्हणून वाटेल ते करा ॥ दो० २५८ ॥ गुरु अनुराग पाहुनी भरतीं । राम हृदयिं आनंदा भरती ॥ दो० :- वदले मुनि भरता तदा त्यज संकोचा तात ॥ गुरुजींचा भरतावरील अनुराग पाहून राम हृदयांत आनंदाला भरती आली ॥ १ ॥ भरत धर्मधुरंधर असून तनमनवाणीने आपला अंतरंग उत्तम सेवक आहे ॥ २ ॥ हे जाणून गुरुवचनाला अनुकूल आणि सुंदर, मृदु व मंगलमूल अशी वाणी ( राम) बोलले ॥ ३ ॥ नाथ ! आपली शपथ आणि पितृचरणांची आण घेऊन सांगतो की भरता सारखा भाऊ चौदा भुवनात नाही. ॥ ४ ॥ जे गुरुपद कमलांच्या ठिकाणी अनुरक्त असतात ते लोकमत – वेदमतानुसार महा भाग्यवान होत ॥ ५ ॥ ( मग) आपले ज्यांच्यावर इतके अपार प्रेम आहे त्या भरतांच्या श्रेष्ठ भाग्याचे वर्णन कोण करुं शकेल ? ॥ ६ ॥ धाकटा भाऊ आहे असे पाहून भरताची प्रशंसा त्याच्या तोंडावर करण्यास बुद्धीला संकोच वाटतो ( पण) मनाला फार आवड आहे ॥ ७ ॥ भरत म्हणतील ते करणेच चांगले असे म्हणून राम स्तब्ध राहीले ॥ ८ ॥ ( राम स्तब्ध झाले व भरत बोलत नाहीत असे पाहीले) तेव्हा मुनी भरतास म्हणाले की तात ! सर्व संकोच सोडून जे काही हृदयात असेल ते आपल्या कृपासागर प्रिय बंधूला सांग ( की एकदा) ॥ दो० २५९ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |