॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय २६ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

श्रवुनी स्नेहल पुरजन-वाणी । निंदिति योग-विराणां ज्ञानी ॥
नित्यकर्म याप्रीं करुनि जन । रामाला प्रणमुनि पुलकित तन ॥
उच्च नीच मध्यम नर नारी । घेती दर्शन यथाधिकारी ॥
सावधान सकलां सन्मानिति । सकलहि कृपानिधाना वानिति ॥
रघुवर-बाणा आबालकपण । प्रीति ओळखुनि नीति सुरक्षण ॥
राम शील संकोच सागरहि । सुमुख सुलोचन ऋजू स्वभावहि ॥
वदत राम गुणगण अनुरागति । निज भाग्या सगळे स्तवुं लाग्ति ॥
पुण्य पुंज आम्हांसम थोडे । ज्यांस राम मानिति ’मम’ कोडें ॥

दो० -: प्रेम मग्न त्या समयिं सब; श्रवुनि येत मिथिलेश ।
सभे सहित सत्वर उठति रविकुल कमल दिनेश ॥ २७४ ॥

अयोध्यावासी लोकांची ती स्नेहपूर्ण वाणी ऐकून ज्ञानी मुनी आपल्या योगाची व वैराग्याची निंदा करु लागले ॥ १ ॥ याप्रमाणे पुरवासी लोक ( प्रात:काळचे) नित्यकर्म करुन पुलकित शरिराने रामचंद्रास प्रणाम करतात ॥ २ ॥ उच्च, नीच व मध्यम ( वर्गाचे) स्त्रीपुरुष आपापल्या अधिकारा प्रमाणे रामाचे दर्शन घेतात ॥ ३ ॥ प्रभु सावधानपणे सर्वांचा ( यथायोग्य) सन्मान करतात; व सर्वच कृपानिधानाची प्रशंसा करतात ॥ ४ ॥ बालपणा पासूनच रघुवराचा हा बाणा आहे की प्रीती ओळखून नीतीचे उत्तम रक्षण करावयाचे ॥ ५ ॥ राम शील व संकोच याचे सागर आहेत सुंदर मुखांचे व सुंदर नेत्रांचे आहेत व स्वभावही सरळ आहे ॥ ६ ॥ ( याप्रमाणे) रामचंद्रांच्या गुण समूहाचे वर्णन करता करता अनुरागयुक्त झाले व सर्वच लोक आपल्या भाग्याची प्रशंसा करु लागले की ॥ ७ ॥ ज्यांस राम प्रेमाने ‘ माझे ’ म्हणून मानतात असे आमच्यासारखे पुण्यराशी ( जगात) थोडेच असणार ! सर्व लोक असे प्रेममग्न झाले आहेत अशा समयी; मिथिलेश येत आहेत असे ऐकून रविकुलरुपी कमलांचे सूर्य ( राम) त्वरेने सभेसहित उभे राहीले ॥ दो० २७४ ॥

बंधु सचिव गुरु पुरजन साथ । पुढें गमन करिती रघुनाथ ॥
गिरिवर बघति जनकपति जेव्हां । नमन करुनि सोडिति रथ तेव्हां ॥
रामदर्शनोत्साह लालसें ॥ कुणा पथश्रम कष्ट लव नसे ॥
मन तिथं जिथं रघुवर वैदेही । विण मन तन सुखदुःख कसेंही ॥
येथाहेत असे मिथिलापति । सहित समाजा प्रेममस्त मति ॥
आले जवळ बघुनि अनुरागति । सादर भेटुं परस्पर लागति ॥
करिति जनक मुनिजनपदिं वंदन । प्रणमन करिति ऋषिंस रघुनंदन ॥
राम बंधुंसह भेटुनि राजा । घेउनि जाति समेत समाजा ॥

दो० :- आश्रम सागर शांतरस पूरित पावन पाथ ॥
सेना जणुं करुणासरित नेति सवें रघुनाथ ॥ २७५ ॥

जनकराजा गमन - बंधु, सचिव, गुरु वसिष्ठ, व पुरवासी लोक यांना बरोबर घेऊन रघुनाथांनी पुढे गमन केले ॥ १ ॥ जनकपतींनी ( कामद) गिरीवर पाहीला तेव्हा नमस्कार करुन रथातून खाली उतरले ॥ २ ॥ रामदर्शनाच्या लालसेने व उत्साहाने प्रवासाचे श्रम किंवा कष्ट कोणालाच होत नाहीत. ॥ ३ ॥ जिथे रघुवर वैदेही आहेत तिथे ( सर्वांचे) मन आहे ( मग) मनाशिवाय तनूचे सुख दु:ख कसे होणार ? ॥ ४ ॥ असे समाजासहित मिथिलापती चालत येत आहे व त्यांची बुद्धी प्रेम ( मदाने) मस्त झाली आहे ॥ ५ ॥ जवळ आले तेव्हा ( एकमेकांस) पाहून अनुरागाचे भरते सर्वांनाच आले व आदराने एकमेकांस भेटूं लागले ॥ ६ ॥ जनकराजांनी वसिष्ठादि मुनीजनांच्या पायांना वंदन केले व रघुनंदनाने ( बंधूसह) विश्वामित्रादि ऋषींना प्रणाम केला ॥ ७ ॥ भावासह राम जनकराजांना भेटले व त्यांच्या समाजासह त्यांना घेऊन आश्रमाकडे चालले ॥ ८ ॥ श्री रामश्रंम हा सागर आहे तो शान्तरसरुपी जलाने परिपूर्ण भरलेला आहे, जनकांची समाजरुपी सेना करुणा नदी आहे व रघुनाथ तिला बरोबर घेऊन जात आहेत ॥ दो० २७५ ॥

ज्ञान-विराग तटां बुडवी ती । शोकवचन नद नाले मिळती ॥
शोक उसासे समीत लाटा । पाडिति धैर्य विटपवर काठां ॥
विषम विषाद धार फोंफावत । भ्रम भय भंवरे चक्र न गणवत ॥
नाविक बुध विद्या बडि नावहि । नाहिं लोटवत अटकळ मुळिं नहिं ॥
वनचर कोळि किरात बिचारे । थकित पथिक हरुनी मनिं सारे ॥
आश्रम उदधिं मिळे जैं पोचुनि । व्याकुळ उठे सिंधु कीं क्षोभुनि ॥
शोकाकुल युग राजसमाज हि । ज्ञान न राही धीर न लाजहि ॥
नृपगुणरूप शील वाखाणति । रडति शोकसागरिं अवगाहति ॥

छं० :- बुदतात शोक समुद्रिं शोचति नारि नर विव्हळ महा ! ॥
बहु दोष देत सरोष बोलति वाम विधि करि काय हा ! ॥
सुर सिद्ध तापस योगि मुनि गति विदेहाची बघुनिया ॥
तुलसी न कोणि समर्थ जो तरुं शके स्नेह नदीस या ॥ १ ॥
सो० :- करिति अमित उपदेश मुनिवर लोकां ज्थ तिथें ॥
धरणें धीर नरेश वदति विदेहा रामगुरु ॥ २७६ ॥

ज्ञान व वैराग्यरुपी उंच उंच तटांना ती बुडवीत आहे व शोक व विलापरुपी नदी व नाले तिला मिळत आहेत ॥ १ ॥ शोकाने सोडले जाणारे दीर्घ उसासे याच जणूं जोराच्या वार्‍याने उठणार्‍या लाटा आहेत व त्या किना‍र्‍यावरील धैर्यरुपी मोठ्या वृक्षांना उलथून पाडीत आहेत ॥ २ ॥ दु:सह विषादरुपी धार फोफावत आहे आणि भय व भ्रम हे जणूं अगणित भोवरे व चक्रे आहेत ॥ ३ ॥ विद्वान पंडित हे जणू नावाडी असून ब्रह्मविद्या ही मोठी नाव आहे, पण ही नौका ( या नदीत) घालवत नाही व कशी घालावी चालवावी याची मुळीच अटकळ नाही ॥ ४ ॥ वनवासी कोळी भिल्ल बिचारे चकित होऊन मनात हरुन गेलेले सगळे प्रवासी ( पार जाऊ पाहणारे) आहेत ॥ ५ ॥ आश्रमरुपी उदधीपर्यंत पोचून त्याला मिळतांच जणूं समुद्र क्षुब्ध होऊन व्याकुळ होऊन गेला आहे ॥ ६ ॥ दोन्ही राजसमाज शोकाकुल झाले आहेत. ज्ञान राहीले नाही की धीर राहीला नाही की लाज उरली नाही ॥ ७ ॥ दशरथ राजांचे गुण, रुप, शील इ. वाखाणीत असे रडत आहेत की जणूं शोकसागरांत बुड्याच मारीत आहेत ॥ ८ ॥ स्त्रिया व पुरुष शोक सागरात बुड्या मारीत शोक करीत फार व्याकूळ झाले आहेत ( विधात्यास) दोष देत सर्वच रौषाने बोलत आहेत की दुष्ट विधीने हाय ! हाय ! काय केले हे ! देव सिद्ध तापस योगी मुनी इ. सर्व लोक विदेहाची ती दशा पाहून असे झाले की तुळसीदास म्हणतात या स्नेहनदीतून तरु शकेल असा कोणीच समर्थ ( उरला) नाही ( सर्वच त्या शोक समुद्रात मग्न झाले) ॥ छंद ॥ जिथे तिथे अनेक मुनीवर लोकांना अमित उपदेश करु लागले व रामगुरु वसिष्ठ म्हणाले की नरेश ! आपण धीर धरावा ॥ दो० २७६ ॥

यज्ज्ञानार्कें भवनिशिं नासत । वचन किरणिं मुनि कमल विकासत ॥
तयां समीप किं मोह नि ममता । ही सियरामस्नेह महत्ता ॥
विषयी साधक सिद्ध ज्ञानी । त्रिविध जीव जगतीं श्रुति वानी ॥
रामस्नेह रसाळ मनाचा । साधुसभें अति आदर त्याचा ॥
राम प्रेमविण शोभे ज्ञान न । कर्णधारविण जसं जलवाहन ॥
विदेहास मुनि बहु समजावति । रामघाटिं सर्वहि अवगाहति ॥
सकल शोक संकुल नर नारी । तो वासर सरला विण वारी ॥
करिति न पशु खग मृग आहारा । प्रिय परिवारा काय विचारा ॥

दो० :- निमिनृप रघुनृप संघ युग करिती प्रातः स्नान ॥
बसले सब वट विटप तळिं कृशतनु चितें म्लान ॥ २७७ ॥

ज्यांच्या ज्ञानसूर्याने भवनिशा नष्ट होते व ज्यांच्या वचनरुपी किरणांनी मुनीरुपी कमळे फुलतात ॥ १ ॥ त्यांच्या समीप का मोह आणि ममता येणार आहेत ? ही केवळ सीतारामस्नेहाची महती आहे ॥ २ ॥ विषयी, साधक व दृढज्ञानी ( ज्यांचे ज्ञान सिद्ध झाले आहे असे) असे तीन प्रकारचे जीव जगांत आहेत असे वेद वर्णन करतात ॥ ३ ॥ पण ज्यांचे मन रामस्नेह रुपी रसाने भरलेले असेल त्यांचा साधूसभेत आदर होतो ( त्याला विशेष मान देतात) ॥ ४ ॥ कर्णधाराशिवाय नौका वगैरे जलवाहन शोभत नाही ( निरुपयोगी), तसेच रामप्रेमाशिवाय ज्ञान शोभत नाही ॥ ५ ॥ वसिष्ठ मुनींनी विदेहास पुष्कळ समजावले. ( मग) सर्व लोकांनी रामघाटावर स्नान केले ॥ ६ ॥ सर्व स्त्रिया व पुरुष शोकाने अगदी व्यापले आहेत व तो सगळा दिवस ( रात्रसुद्धा) पाणी सुद्धा न पिता गेला ( शोक करण्यात दिवस व रात्र सुद्धा गेली) ॥ ७ ॥ पशु पक्षी व हरीणे यांनीसुद्धा काही आहार केला नाही; मग प्रिय परिवाराचे काय करता ? ॥ ८ ॥ निमिराजांचा व रघुराजांचा असे दोन्ही समाज प्रात:काळ होताच स्नान करु लागले, व नंतर शरीराने व कृश व चित्ताने उदास – खिन्न झालेले ते सर्व लोक ( रामपर्णकुटीजवळील) वडाच्या झाडाखाली येऊन बसले ॥ दो० २७७ ॥

जे महिसुर दशरथ पुर वासी । जे मिथिलापति नगर निवासी ॥
हंस वंश गुरु, जनक पुरोहित । जिहिं जगपथ परमार्थ हि शोधित ॥
करुं लागति उपदेश अनेक हि । सहित धर्म नय विरति विवेकहि ॥
कौशिक कथा पुरातन सांगति । बहु, मृदुवचनिं सभे समजावति ॥
मग रघुनाथ कौशिका सांगति । नाथ काल निर्जल सब राहति ॥
रघुपति उचित वदतु मुनि वदले । प्रहर आजही अडीच टळले ॥
ऋषि रुचि बघुनि वदति मिथिलापति । इथें अन्नखाणें अनुचित अति ॥
भलें भूप वच सकलां रुचलें । आज्ञेने स्नानास चालले ॥

दो० :- त्या समयीं फल फूल दल मूलां किती प्रकार ।
वनचर पुष्कळ आणिति भरुइ कावडी भार ॥ २७८ ॥

दशरथपुरीत राहणारे जे ब्राह्मण ( व मुनी) व मिथिला पतींच्या नगरात राहणारे जे ब्राह्मण व मुनी ॥ १ ॥ आणि सूर्यवंशाचे गुरु वसिष्ठ व जनकांचे पुरोहित शतानंद ज्यानी जगाचा मार्ग व परमार्थाचा मार्गही शोधून काढला आहे ते – सर्व धर्म, नीती, वैराग्य व ज्ञान यांनी युक्त असलेला उपदेश अनेक प्रकारे करुं लागले ॥ ३ ॥ कौशिक मुनींनी पुष्कळ पुरातन कथा सांगुन मृदु वाणीने सर्व सभेचे सांत्वन केले ॥ ४ ॥ मग रघुनाथ कौशिकास म्हणाले की नाथ ! काल सर्वलोक पाणी सुद्धा न पीताच राहीले ॥ ५ ॥ मुनी विश्वामित्र म्हणाले की रघुपती म्हणाले ते योग्य आहे. आज सुद्धा अडीच प्रहर उलटून गेले ॥ ६ ॥ ऋषींची इच्छा जाणून मिथिलापती जनक म्हणाले की येथे भोजन करणे अति उचित आहे ॥ ७ ॥ हे राजाचे चांगले वचन सर्वाना आवडले व आज्ञा घेऊन लोक स्नानास चालले ॥ ८॥ त्याच वेळी वनवासी लोक अनेक प्रकारची कंदमूलफळे, फुले, पाने यांच्या पुष्कळ कावडीच्या कावडी भारेच्या भारे घेऊन येऊ लागले ॥ दो० २७८ ॥

रामकृपें गिरि कामद बनती । अवलोकत खेदा अपहरती ॥
सर सरिता वन भूमि विभागां । जणूं पूर मोदा अनुरागा ॥
वेलि विटप सब फुलती फळती । खग मृग अलि अनुकूल बोलती ॥
तदा अधिक उत्साह वनाला । त्रिविध समीर सुखद सर्वांला ॥
वदवत मुळिं च मनोहरता नहिं । जनका पाहुणचार किं करि महि ॥
तैं स्नाना कर करुनि सर्वजण । घेउनि राम जनक मुनि शासन ॥
बघ बघुनी अरुवर अनुरागति । पुरजन तरुतळिं उतरूं लागति ॥
दल फल विविध मूल कंदानां । पावन सुंदर सुधां समानां ॥

दो० :- सादर सर्वां रामगुरु धाडिति बहु तात्काळ ॥
पुजुनि पितर सुर अतिथि गुरु करुं लागले फराळ ॥ २७९ ॥

रामकृपेने सगळे पर्वत मनोवाछित पुरविणारे झाले व पाहताच रेवेदाचा अपहार करु लागले ॥ १ ॥ तलाव, नद्या, वन व सर्व भूमी विभाग यांत जणू आनंदाला व प्रेमाला भरती पूर येत आहे ॥ २ ॥ सर्व लता व सर्व वृक्ष फुलले व फळले, पशूपक्षी व भुंगे सुखदायक ( अनुकूल) बोलूं लागले ॥ ३ ॥ त्यावेळी वनाला अधिक उत्साह वाटू लागला आणि त्रिविध वायू सर्वांना सुखदायक असा वाहू लागला ॥ ४ ॥ वनाची मनोहरता मुळीच वर्णन करवत नाही पण असे वाटले की जणू भूमी जनकराजांचा पाहुणचारच करीत आहे ॥ ५ ॥ इतक्य़ात लोक स्नान करुन क्रमाने येऊ लागले आणि राम, जनकराजा, व वसिष्ठ मुनी यांची आज्ञा घेऊन ॥ ६ ॥ सुंदर सुंदर वृक्ष बघून अनुरागयुक्त झाले व झाडाखाली उतरु लागले ॥ ७ ॥ तत्काळ श्रीरामगुरु वसिष्ठांनी नाना प्रकारची सुंदर व पावन दले व नाना प्रकारची सुंदर, पावन व अमृतासारखी कंदमूळ फळे सर्वांकडे आदराने पुष्कळ पाठवली तेव्हा पितर देव अतिथी आणि गुरु यांचे पूजन करुन लोक फराळ करु लागले ॥ ८ व दो० २७९ ॥

यापरिं चार संपले वासर । रामा निरखुनि सुखी नारि नर ॥
आवड उभय समाज मना ही । बरें गमन रामाविण नाहीं ॥
सितारामां सवें वास वनिं । कोटि अमरप्र समान कुखखनि ॥
त्यजुनि राम लक्षण वैदेही । ज्यां प्रिय गृह विधिवंचित ते ही ॥
होइ दैव उजवें पुरतें जैं । राम समीप वास विपिनीं तैं ॥
मज्जन मंदाकिनीं त्रिकालां । राम दृष्टि मुद मंगल माला ॥
अटन रामगिरि वन तापस थळ । अशन अमृत-सम कंदमूल फल ॥
सुख संयुत संवत हे चवदा । क्षणसम होति, न कळति गत कदा ॥

दो० :- सुक्खा योग्य या जन न सब भाग्य कुठें म्हणतात ॥
स्वभावें चि अनुरक्त उभ समुदय रामपदांत ॥ २८० ॥

याप्रमाणे चार दिवस निघून गेले. रामचंद्रांस निरखून पाहण्याने सर्व नर नारी सुखी आहेत ॥ १ ॥ दोन्ही समाजांच्या मनात अशी आवड आहे की रामचंद्राशिवाय परत जाणे बरे नाही ॥ २ ॥ सीतारामांच्या संगतीत वास करणे ( सुद्धा) कोटी स्वर्गा सारखे सुखाची खाण आहे ॥ ३ ॥ राम लक्ष्मण व सीता यांच्या वाचून ज्यांना घर प्रिय वाटत असेल त्यांना विधीने ठकविले असे समजावे ॥ ४ ॥ जेव्हा दैव पुरते अनुकूल असेल तेव्हाच रामाच्या समीप वनात राहण्यास सापडणार ! ॥ ५ ॥ मंदाकिनीत त्रिकाळी स्नान व आनंद मंगलांची मालिका असे रामदर्शन ॥ ६ ॥ रामगिरी, रामवन, तापसांची स्थळे पहात हिंडणे आणि अमृतासारख्या कंदमूल फलांचा आहात ॥ ७ ॥ यांत चौदा वर्षे सुखांत क्षणासारखी जातील; केव्हा गेली ते कळणार सुद्धा नाही ॥ ८ ॥ ( पण) या सुखाला योग्य सगळे लोक नाहीत, असे कुठे भाग्यांत आहे ? असे सर्व म्हणत आहेत दोन्ही समुदाय स्वभावताच रामपदीं अनुरक्त आहेत. ॥ दो० २८० ॥

यापरिं सकल मनोरथ करती । प्रेमळ वच परिसत मन हरतीं ॥
सीता-माता धाडी ज्यांसी । आल्या सुसमय बघुनी दासी ॥
सिता सासुनां अवसर, कळलें । जनकांतःओर आलें सगळें ॥
कौसल्या सादर सन्मानुनि । दे आसन समयोचित आणुनि ॥
स्नेह शील संपूर्ण उभयता । द्रवति कठिण पवि बघत ऐकतां ॥
पुलक, शिथिल तनु सजल विलोचन । कुरतडती महि करती क्रंदन ॥
राम सिता प्र्तीच्या मूर्ती । जणूं करुणा बहु वेषिं विलपती ॥
म्हणे सुनयना विधिमति कुटिला । क्षीरफेन पविघणें किं कुटिला ॥

दो० :- कानिं सुधा दिसतें गरळ करणी सकल कराल ॥
काक घुबड बक चहुंकडे मानसिं मात्र मराल ॥ २८१ ॥

याप्रमाणे सगळे लोक मनोरथ करीत आहेत, त्यांची प्रेमळ वचने कानी पडतांच मन चोरुन घेत आहेत ॥ १ ॥
सुनयनादि व कौसल्यादि भेट – सीतेच्या मातेने ज्यांना धाडल्या होत्या त्या दासी चांगली सवड ( आहे की नाही) पाहून आल्या ॥ २ ॥ सीतेच्या सर्व सासवांना सवड आहे असे कळले तेव्हा जनकराजांचा सगळा राणीवसा आला ॥ ३ ॥ कौसल्येने त्यांचा आदराने सन्मान केला व परिस्थितीस योग्य अशी आसने ( स्वत:) आणून दिली ॥ ४ ॥ दोहीकडे असलेले संपूर्ण शील व संपूर्ण स्नेह पाहतांच व ऐकताच कठीण वज्रांना सुद्धा द्रव फुटला ( असता) ॥ ५ ॥ देह पुलकित झाले असून हातपाय गळून गेले आहेत, नेत्रांत अश्रू आले आहेत व नखांनी जमीन कुरतडीत आक्रोश करीत रडत आहेत ॥ ६ ॥ सर्व रामसीता प्रेमाच्या मूर्ती असून जणूं करुणा अनेक रुपे घेऊन विलाप करीत आहे ॥ ७ ॥ सितामाता सुनयना म्हणाली की – विधीची बुद्धि कुटील आहे, कारण त्याने दुधाचा केस वज्राच्या घणाने की हो कुटून काढला ! ॥ ८ ॥ अमृत कानांनी ऐकण्यास सापडते पण दिसते मात्र वीष, कावळे बगळे व घुबडें चोहोकडे आहेत, पण हंस मात्र मानस सरोवरातच असतात ! अशी विधीची सर्व करणी कराल आहे ॥ दो० २८१ ॥

शोकें वदली देवि सुमित्रा । विधिगति अति विपरीत विचित्रा ॥
तो सृजि पाळी मग करि होळी । बालकेलि-सम, विधिमति भोळी ॥
म्हणे कौसल्या दोष कुणाअहिं । कर्में सुखदुःखें क्षति लाभ हि ॥
कठिण कर्मगति जाणि विधाता । जो शुभ अशुभ, सकलफल दाता ॥
ईश्वर आज्ञा शिरिं सर्वांचे । सृष्टि स्थिति लय विष अमृताचे ॥
देवि मोहवश शोक विफळ हा । विधि प्रपंच अनादि अटळ हा ॥
मनिं आणुनि नृप जीवन मरणें । निज हित हानि बघुनि सखि रडणें ॥
म्हणे सुनयना सत्य सुवाणी । सुकृति अवधि कोसलपति-राणी ॥

दो० :- लक्ष्मण सीता राम वनिं गत न अशुभ, शुभ अंतिं ॥
म्हणे कौसिला गहिंवरुनि भरतविषयिं मज खंति ॥ २८२ ॥

सुमित्रा देवी शोक करीत म्हणाली की विधीगती अति विपरीत आहे ॥ १ ॥ तो बाललीलांप्रमाणे उत्पन्न करतो, पालन करतो, व मग सर्वाची होळी करतो, विधीमती भोळी आहे ( काराल नाही) ॥ २ ॥ कौसल्या म्हणाली की दोष कोणाचाच नाही, सुख दु:खे लाभ हानी कर्मानुसार होत असतात ॥ ३ ॥ कर्मगती कठीण असून जो शुभ व अशुभ कर्माचे पळ सगळ्यांना देणार आहे तो विधाता तो जाणतो ॥ ४ ॥ सृष्टी, स्थिती, लय विष, अमृत इ. सर्वांच्या शिरावर इश्वराची आज्ञा चालते ॥ ५ ॥ म्हणून देवी ! आपण शोक करतो हा विफळ आहे, केवळ मोहाने करतो, विधीने निर्माण केलेला हा प्रपंच अनादि असून अटळ आहे ( त्यात कोणालाही बदल करता येत नाही) ॥ ६ ॥ सखि ! आपले रडणे, शोक करणे केवळ भूपतीच्या जीवनाचा व मरणाचा विचार मनात आणून स्वत:च्या झालेल्या हानीमुळे आहे ( ते शोचनीय नाहीत) ॥ ७ ॥ सुनयना म्हणाली की आपली वाणी सत्य व सुंदर आहे, कारण की अयोध्यापती पुण्यात्यांची सीमाच होते व आपण त्यांच्याच राणी आहांत ( तेव्हा हे बोलणे आपणास शोभते) ॥ ८ ॥ लक्ष्मण सीता व राम वनात गेले तर त्यात काही अशुभ होणार नाही शेवटी कल्याणच होईल पण ! कौसल्या गहिवरुन म्हणते की मला चिंता वाटते ती भरताविषयीच ! ( रामवियोगाने भरताचे काय होईल ! हिच भीती आहे.) ॥ दो० २८२ ॥

ईशकृपें तव आशिषिं भारी । सुत सुतवधू देवसरि वारी ॥
अराम शपथ घेतली कधीं नहि । सद्‌भावें वदुं ती घेऊन हि ॥
भरत शील गुण विनय महत्ता । श्रद्धाभक्ति भलाइ बंधुता ॥
वदत शारदा मतिहि कचरते । सागर शिंपी कधिंकिं उपसते ॥
जाणें सदा भरत कुलदीपक । कितिदां वदले मज नृपनायक ॥
कसें कनक मणि पारखि लाभत । स्वभावें चि नर समयिं परीक्षित ॥
अनुचित आज असें मम भूषण । शोकीं स्नेहीं अल्प चतुरपण ॥
श्रवुनि पूत गंगेसम वाणी । स्नेह विकल झाल्या सब राणी ॥

दो० :- वदे सधीरा कौसला श्रुणु देवी मिथिलेशि ॥
तुम्हा ज्ञाननिधि वल्लभे कोण काय उपदेशि ॥ २८३ ॥

शंकराच्या भारी कृपेने व आपल्या आशीर्वादाने पुत्रवधू देवनदी – गंगे सारखी व पुत्र गंगाजलासारखा आहे ॥ १ ॥ मी कधी रामाची शपथ घेतली नाही पण आज ती सुद्धा घेऊन सांगते की ॥ २ ॥ भरताचे शील, गुण, नम्रता, महत्ता, श्रद्धा, भक्ती, चांगुलपणा व बंधुभाव ॥ ३ ॥ यांचे वर्णन करण्यास सरस्वतीची बुद्धीही कचरते. ( तेथे माझी बुद्धी) शिंपी कधी सागर उपसून टाकू शकेल काय ? ॥ ४ ॥ भरत कुलदीपक आहेत हे मी सदा जाणतो असे महाराज माझ्यापाशी कितीक वेळां म्हणाले आहेत. ॥ ५ ॥ सोने कसाला लावण्याने व रत्‍न रत्‍नपारखी मिळाल्याने किंमत होते तशी पुरुषाची परीक्षा प्रसंगी त्याच्या स्वभावावरुन होते ॥ ६ ॥ आज मी असे बोलणे अनुचित आहे ( खरे), पण शोकात व स्नेहात चतुरपणा ( बुद्धि) कमी होतो ॥ ७ ॥ गंगेसारखी पवित्र वाणी ऐकून सर्व राण्या स्नेहाने व्याकुळ झाल्या ॥ ८ ॥ तेव्हा कौसल्या धीर धरुन म्हणाली की देवी ! मिथिलेश्वरी ! हे पहा की ज्ञानविधीच्या प्रिय पत्‍नीला तुम्हाला कोण काय उपदेश करणार ! ॥ दो० २८३ ॥

राणि ! नृपानां सुसंधि साधुनि । अपल्यापरि सांगा समजाऊनि ॥
फिरवा लक्ष्मण जाति भरत वनिं । जर हें मत मानेल भूप मनिं ॥
तर सुयर्‍न करणें सुविचारीं । मज चिंता भरताची भारी ॥
स्नेह सुगूढ भरत मनिं राही । राहत दिसत भलें मज नाहीं ॥
बघुनि सुभाव सुवाणी सरला । ऐकुनि, मग्न करुणरसिं सकला ॥
गगनिं सुमन झड धन्यधन्य रव । स्नेह शिथिल मुनि योगसिद्ध तंव ॥
राणिवसा सब थक्क बघतसे । धरुनि सुमित्रा धीर वदतसे ॥
देवि नाडियुग यामिनि टळली । प्रेमें राममाय तैं उठली ॥

दो० :- यावें लवकर अतां सखि ! वदली युत सद्‌भाव ॥
अम्हां अतां तों ईशगति साह्य किं मिथिला राव ॥ २८४ ॥

राणी ! चांगली संधी साधून तुम्ही आपल्या परीने राजांना समजावून सांगा की ॥ १ ॥ लक्ष्मणास परत फिरवावे ( ठेऊन घ्यावे) व भरतांस रामांबरोबर वनात जाऊं द्यावे जर हे मत राजांच्या मनाला मान्य असेल ॥ २ ॥ तर चांगला विचार करुन कसून प्रयत्‍न करावा कारण मला भरताची भारी चिंता वाटते ॥ ३ ॥ भरताच्या मनातला रामस्नेह अति गूढ आहे; भरत जर घरी राहीले तर चांगले होईल असे मला वाटत नाही ॥ ४ ॥ तो शुद्ध भाव व सरळ सुवाणी ऐकून सगळ्या राण्या करुण रसात मग्न झाल्या ॥ ५ ॥ आकाशातून पुष्पवृष्टीची झड लागली व धन्य धन्य असा स्वर ऐकू येऊ लागला, तेव्हा मुनी, योगी सिद्ध स्नेहाने शीथील झाले ॥ ६ ॥ सर्व राणीवसा थक्क होऊन बघत राहीला; तेव्हा धीर धरुन सुमित्रा म्हणाली की, ॥ ७ ॥ देवी ! दोन घटका रात्र उलटून गेली, तेव्हा ते ऐकून राममाता प्रेमाने उठली ॥ ८ ॥ व सद्‍भावाने म्हणाली की सखी आता लवकर यावं आम्हाला तर आता आधार ईशाचाच ( शंकराचा) आहे व मिथिलापती साह्य आहेत ॥ दो० २८४ ॥

स्नेह बघुनि वच नम्र ऐकुनी । जनक राणिपद पावन धरुनी ॥
वदे देवि ! तव उचित विनति ही । दशरथगृहिणी रामजननि ही ॥
प्रभु निज नीचासिहि आदरती । अग्नि धूम्र शिरिं गिरि तृण धरती ॥
सेवक राजे तन मन वाणीं । साह्य सदैव महेश भवानी ॥
अपणां कोण सहायक लायक । दीप कि शोभे भानु सहायक ॥
राम वनीं करुनी सुरकार्यहि । करिति अचल कोसलपुरिं राज्यहि ॥
रामभुजबळें अमर नाग नर । वसतिल निज निज लोकिं सुखी वर ॥
पूर्विच भाकति याज्ञवल्क्य, तें । मुनि-वच देवि मुधा ना ठरतें ॥

दो० :- मग नमुनी प्रेमें अति सीतेस्तव विनवून ॥
आज्ञा सीता-माय घे स-सिता जाइ निघून ॥ २८५ ॥

स्नेह पाहून व नम्र वचन ऐकून जनकराणी कौसल्येचे पाय धरुन म्हणाली की - ॥ १ ॥ देवी ! आपली ही विनंती आपल्या योग्यच आहे कारण आपण दशरथांच्या धर्मपत्‍नी व रामजननी आहांत ॥ २ ॥ समर्थ असतात ते आपला म्हंटलेल्या आपल्या नीचालाही आदर देतात, अग्नि धुराला आपल्या शिरावर घेतो, पर्वत तृणाला आपल्या मस्तकावर धारण करतो ॥ ३ ॥ राजे तनमनवाणीने आपले सेवक आहेत, सदा सर्वदा हितकर्ते – साह्य कर्ते महेशभवानी आहेत ( हे मात्र खरे) ॥ ४ ॥ आपणांस सहायक होण्यास जगात कोण पात्र आहे ? दोप कधी सूर्याचा साह्यकर्ता म्हणून शोभेल कां ? ॥ ५ ॥ राम वनात जाऊन देवांचे कार्य करुन अयोध्येचे राज्य अकंटक करतील ॥ ६ ॥ रामचंद्रांच्या बाहुबळाने देव, नाग, आपापल्या लोकांत उत्तम सुखात राहतील ॥ ७ ॥ हे सर्व भाकीत याज्ञवल्क्य ऋषींनी पूर्विच केले आहे, ते मुनीचे वचन हे दैवी ! कधीच खोटे ठरणार नाही ॥ ८ ॥ ( असे म्हणून) मग अति प्रेमाने नमस्कार करुन अति प्रेमाने सीतेसाठी विनंती केली व सीतेची माता सीतेला बरोबर घेऊन आज्ञा घेऊन गेली . ॥ दो० २८५ ॥

प्रिय परिजनांस मग वैदेही । भेटे ज्यां ज्यां योग्य जसें ही ॥
बघुनि जानकिस तापसवेषीं । व्याकुळ सकळ विषाद विशेषीं ॥
जनक रामगुरु आज्ञा घेउनि । निघति बघति सीते तळिं येउनि ॥
जनक धरिति हृदिं जानकि, जाणुनि । प्रेमा प्राणां पावन पाहुणि ॥
उरिं अनुराग अंबुधी उसळे । जणूं प्रयाग नृपति मन बनलें ॥
सीता स्नेह दिसे वट वाढत । राम प्रेम शिशू वर शोभत ॥
मुनि चिरजीवी ज्ञान विकल जणुं । पावे बुडत बाल अवलंबनु ॥
मोह मग्न नहिं कधिं विदेह मति । रघुवर सिता स्नेह महिमा अति ॥

दो० :- सीता पितर प्रेमवश विकल भुले तनु भान ॥
धरणि सुता धीरा धरी समय सुधर्म सुजाण ॥ २८६ ॥

सीता व परिजन जनकादि भेट - मग वैदेही आपल्या प्रिय नातेवाईकांना ज्यांच्या त्यांच्या योग्यते प्रमाणे भेटली ॥ १ ॥ जानकीला तापस वेषांत पाहून सगळे परिजन विशेष विषादाने अती व्याकुळ झाले ॥ २ ॥ श्रीरामगुरु वसिष्ठांची आज्ञा घेऊन जनक निघाले, व तळावर आले तो त्यांस सीता आलेली दिसली ॥ ३ ॥ आपल्या पवित्र प्रेमाची व प्राणांची पावन पाहुणी आहे असे जाणून जनकांनी जानकीला हृदयाशी धरली ॥ ४ ॥ हृदयात अनुरागसागर उसळला व राजाचे मन जणू प्रयाग बनले ॥ ५ ॥ ( तेथे) सीतास्नेहरुपी अक्षयवट वाढत असलेला दिसला व त्यावर रामप्रेमरुपी शिशु ( बालमुकुंद) शोभायमान झालेला आढळला ॥ ६ ॥ जनकराजांचे ज्ञानरुपी चिरजीवी मार्कंडेय मुनी व्याकुळ होऊन जणू बुडत असता त्यास त्या बालकाचा आधार मिळाला ॥ ७ ॥ विदेहाची मति कधी मोहमग्न होणे शक्य नाही, हा केवळ सीतारघुवर स्नेहाचा महा महिमा आहे ॥ ८ ॥ सीता मातापित्यांच्या स्नेहाला वश होऊन, व्याकुळ होऊन, देहभान विसरली. ( पण) समय व श्रेष्ठ धर्म उत्तम प्रकारे जाणणारी असल्याने धरणीसुतेने धीर धरला ॥ दो० २८६ ॥

दिसतां सीता तापस वेषीं । पित्या प्रेम परितोष विशेषीं ॥
पुत्रि पवित्रीकृत कुल उभयहि । सुयश धवल जग वदती सकलहि ॥
जिंकुनि सुरसरि तुझी कीर्ति सरि । कोटी ब्रह्मांडीं गमना करि ॥
करी ग्रथित गंगा त्रिस्थानां । ही करि साधु-समाजां नाना ॥
स्नेहें सत्य पिता शुभ वदले । सीते संकोचें जणुं गिळलें ॥
माता पिता पुन्हां हृदिं घेती । सदुपदेश शुभ आशिस देती ॥
वदे न सीता मनिं संकोचित । रात्रिं राहणें इथें किं अनुचित ॥
राणि ओळखुनि सांगे रावा । हृदयीं शीला स्तवी स्वभावा ॥

दो० :- सीते कितिदां भेटुनि बोळविती सन्मानिं ॥
सांगे सुसमयिं भरतगति राणि शहाणि सुवाणिं ॥ २८७ ॥

पित्याने ( जनकाने) जानकीला तापसवेषांत पाहीली व त्याचे प्रेम विशेष वाढले व विशेष परितोष झाला ॥ १ ॥ व म्हणाले की पुत्री ! तू दोन्ही कुळे पवित्र केलीस, व तुझ्या यशाने जग उज्वल झाले असे सर्वच म्हणतात ॥ २ ॥ देवसरितेला जिंकून तुझ्या कीर्ती सरितेने कोटी ब्रह्मांडात गमन केले ॥ ३ ॥ गंगेने ( या जगात) तीनच स्थाने प्रसिद्ध केली, पण तुझ्या कीर्तीसरितेने अनेक साधू समाजांना प्रतिष्ठित केले ॥ ४ ॥ पित्याने स्नेहाने सत्य व शुभ वर्णन केले ( खरे, पण) सीतेला जणूं संकोचाने गिळली ॥ ५ ॥ माता पिता यांनी तिला पुन्हा हृदयाशी धरली व उत्तम उपदेश करुन शुभाशीर्वाद दिले ॥ ६ ॥ सीता काहीच बोलत नाही पण ओळखून राजाला सांगितले व ते तिच्या शीलाची व स्वभावाची मनात प्रशंसा करु लागले ॥ ८ ॥ सीतेला कीतिदा तरी भेटून ( आलिंगन देऊन) दोघांनी तिला सन्मानाने निरोप दिला नंतर योग्य वेळी शहाण्या राणीने सुवाणीने भरताची दशा राजाला सांगितली. ॥ दो० २८७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP