|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ सुंदरकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय ७ वा Download mp3 राम स्वभाव वानिति उघडहि । प्रेमें अति, विसरुनि निज कपटहि ॥ दो :- मम संदेश उदार त्या मूढ-कानिं घालाल ॥ ते रावणाचे हेर रामस्वभावाची अति प्रेमाने उघड उघड प्रशंसा करू लागले. अति प्रेमामुळे ते आपले कपट विसलेच. ॥ १ ॥
तेव्हा वानरांनी ओळखले की हे शत्रूदूत आहेत तेव्हा लगेच त्या सर्वांना बांधून सुग्रीवाजवळ आणले. ॥ २ ॥
सुग्रीवाने सांगितले वनरांनो, ऐका. या निशाचरांची अंगे भंग करून द्या पाठवून. ॥ ३ ॥
सुग्रीवाची आज्ञा ऐकून वानर धावत आले व त्या निशाचरांना पक्के बांधून त्यांची सर्व कपि-सैन्यात धिंड काढली. ॥ ४ ॥
कपी त्यांना अनेक प्रकारे मारझोड करू लागले तेव्हा त्यांनी दीनवाणीने विनवण्या केल्या; तरी कपींनी त्यांना सोडले नाही (जाक, कान कापून द्या सोडून असे कोणी म्हणू लागले). ॥ ५ ॥
तेव्हा ते दूत म्हणाले आमचे नाक कान कापतील त्यांना कोसलपती रामांची शपथ आहे. ॥ ६ ॥
ते ऐकून लक्ष्मणाने हेरांना जवळ आणवले, (त्यांची केविलवाणी दशा पाहून) लक्ष्मणाला दया आली व हसून त्वरित त्यांना लक्ष्मणाने बंधमुक्त केले. ॥ ७ ॥
(व त्यांना म्हणाले की) हे पत्र रावणाच्या हाती द्या व तोंडी सांगा की, हे कुलघातक्या, लक्ष्मणाचे पत्र वाचून बघ. ॥ ८ ॥
आणि माझा उदार संदेश त्या मूर्खाच्या कानी घाला की, सीता परत देऊन येऊन भेट, नाहीतर सर्व निशाचरांचा काळ आला आहे असे समज. ॥ दो. ५२ ॥ त्वरें नमुनि लक्ष्मणपदिं माथा । निघति दूत वर्णित गुणगाथा ॥ दो :- झाली भेट किं गत मम ऐकुनि सुयश अपार । त्वरेने लक्ष्मणाच्या चरणांवर मस्तक नमवून ते दूत गुणगाथा वर्णन करीत परत निघाले. ॥ १ ॥
रामयशाचे गान करीत ते लंकेत आले व त्यांनी रावणास नमन केले. ॥ २ ॥
दशमुखाने मोठ्याने हसून हकीकत विचारण्यास प्रारंभ केला. हे शुक, तू आपली कुशलता का नाही सांगत ? ॥ २ ॥
ज्याचा मृत्यु अति जवळ आला आहे त्या बिभीषणाची हकीकत मला सांग. ॥ ४ ॥
(चांगले) राज्य करीत असता शठाने लंकेचा त्याग केला. आता अभागी यवातील किडा होईल (धान्यातील पोरकिड्याप्रमाणे भरडला जाईल - म्हणजे राम लक्ष्मण यवासारखे तुच्छ धान्य व त्यांच्या आश्रयाला गेलेला बिभीषण हा त्यातील किडा-कीटक). ॥ ५ ॥
कठीण काळाच्या प्रेरणेने आलेले ते ऋक्ष व वानर सैन्य कसे आहे सांग. ॥ ६ ॥
त्यांच्या जीवनाचे रक्षण करणारा कोमल चित्ताचा सागर आहे (म्हणून बरे). ॥ ७ ॥
ज्यांच्या हृदयात माझी भारी भिती असेल त्या तापसांची सर्व हकीकत मला सांग. ॥ ८ ॥
त्यांची भेट झाली की माझे अपार सुयश ऐकून गेले परत ? तू शत्रू, त्याचे सैन्य, तेज, बल इत्यादि विषयी काहीच कसे बोलत नाहीस. तुझे चित्त फार चकित झालेले दिसते, ते कां ? ॥ दो. ५३ ॥ नाथ कृपेनें पुसलें जेवीं । त्यजुनि कोप वच माना तेवीं । दो :- द्विविद मयंद नील नल अंगद गद विकटासि ॥ नाथ ! आपण कृपेने जसे विचारलेत तसेच क्रोधाचा त्याग करूनच माझे सांगणे माना, त्यावर विश्वास ठेवा. ॥ १ ॥
तुमचा अनुज जेव्हा जाऊन भेटला तेव्हाच रामाने त्याला लंकेचा राज्याभिषेक केला. ॥ २ ॥
आम्ही रावणाचे दूत आहोत असे कानी पडताच कपींनी आम्हाला बांधून नाना प्रकारे दुःख दिले. ॥ ३ ॥
ते आमचे नाक-कान कापू लागले होते पण आम्ही रामशपथ घातली तेव्हा आम्हाला सोडले. ॥ ४ ॥
नाथ ! तुम्ही ज्या कपी सेनेविषयी विचारलेत ती शतकोटी मुखांनीही वर्णन करता येणार नाही. ॥ ५ ॥
ती वानर-भल्लांची सेना अनेक रंगांची व श्रेष्ठ असून ते भल्ल विक्राळ मुखाचे, विशालदेही व भयानक आहेत. ॥ ६ ॥
ज्याने लंकापुरी जाळली, व तुमच्या पुत्राचा वध केला, तो सर्व कपीत कमीत कमी बळाचा आहे. ॥ ७ ॥
अगणित योद्धे, त्यांची अगणित नावे आहेत. ते कठीण कराल (भयंकर) असून अगणित हत्तींचे बळ असलेले व अति विशाल आहेत. ॥ ८ ॥
द्विविद, मयंद, नील, नल, अंगद, गद, विकटासी, दधिमुख, केसरी, निशठ, शठ आणि जांबवान हे सर्व बलवान आहेत. ॥ दो. ५४ ॥ सुग्रीवासम हे कपि जाणा । असे कोटि किति अगणित नाना ॥ दो :_ सहज शूर कपि भल्ल सब त्यांत शिरीं प्रभु राम ॥ हे सगळे कपी सुग्रीवासारखे आहेत. आणि त्यांच्यासारखे कितीतरी कोटी अगणित आहेत, आणि अनेक प्रकारचे आहेत. ॥ १ ॥
शिवाय त्यांना रामकृपेने अतुल बल मिळाले आहे; त्यामुळे ते त्रैलोक्याला तृणासमान गणतात. ॥ २ ॥
हे दशकंधरा ! माझे असे ऐकण्यात आले आहे वानर अठरा पद्मे आहेत. ॥ ३ ॥
नाथ ! कपी सैन्यात असा एकही कपी नाही की जो तुम्हाला युद्धात जिंकू शकणार नाही. ॥ ४ ॥
अतिशय क्रुद्ध होऊन सगळेच हात चोळत आहेत पण रघुनाथ त्यांना आज्ञा देत नाहीत. ॥ ५ ॥
व्याल, मत्स्य यांच्यासह सागर शोषून टाकू नाहीतर विशाल पर्वतांनी भरून काढू. ॥ ६ ॥
दशशीर्षाचे मर्दन करून त्याला धुळीत मिळवू; असे सगळे कपी बोलत असलेले मी ऐकले आहे. ॥ ७ ॥
ते गर्जतात, दटावीत असतात व स्वभावतःच ते निःशंक (निर्भय) आहेत व जणूं लंकेलाच गिळूं पहात आहेत. ॥ ८ ॥
सर्व भल्लुक व कपी स्वभावतःच शूर आहेत, आणि शिवाय त्यांच्या शिरावर सर्वसमर्थ प्रभू राम आहेत. म्हणून ते युद्ध करून रावणालाच काय, कोटी काळांना सुद्धा जिंकतील यांत नवल काय ? ॥ दो. ५५ ॥ रामतेज बल वुद्धि-विपुलता । शेष लक्षही थकतिल वदतां ॥ दो :- शठ शब्दीं मन रिझवुनी कर न कुळाचा घात ॥ रामचंद्रांचे तेज, बल, बुद्धी इत्यादिंची विपुलता वर्णन करताना लाखो शेष सुद्धां थकतील. (तेथे मी एकमुखाने त्यांचे काय वर्णन करणार !) ॥ १ ॥
त्यांचा एकच बाण या एका सागरालाच काय, शंभर सागरांना शोषून टाकील. पण ते नीतिनिपुण असल्याने त्यांनी तुमच्या भावाला (मत/सल्ला) विचारले. ॥ २ ॥
आणि त्याच्या शब्दाला मान देऊन सागरापाशी मार्ग मागत आहेत. कारण त्यांच्या चित्तात कृपा आहे. ॥ ३ ॥
हे ऐकताच दशशीर्ष खो खो हसत सुटला आणि म्हणाला अशी बुद्धी आहे म्हणून तर वानरे साह्यास घेतली आहेत. ॥ ४ ॥
आणि स्वभावतःच भित्रा असलेल्याचे वचन मानून सागरापाशी धरणे धरले आहे. ॥ ५ ॥
मूर्खा ! शत्रूची खोटी महती का गात बसला आहेस ? शत्रूचे बल व बुद्धी यांचा ठाव आम्हाला लागला बरं ! ॥ ६ ॥
भयभीत बिभीषण ज्याचा सचिव आहे त्याला जगात विजय व विभूती कुठुन मिळणार ? ॥ ७ ॥
दुष्ट वचन ऐकून दूताचा रोष वाढला व योग्य वेळ आहे असे पाहून त्याने ते पत्र काढले. ॥ ८ ॥
नाथ ! हे पत्र रामानुजाने दिले आहे, ते वाचून/वाचवून आपली छाती निववा. ॥ ९ ॥
मोठ्याने हसून रावणाने ते पत्र डाव्या हाताने घेतले व तो शठ त्याचे सचिवाकडून वाचन करवूं लागला. ॥ १० ॥
लक्ष्मण पत्रात म्हणतात - हे शठा ! नुसत्या शब्दांनी आपल्या मनाला प्रसन्न करून कुळाचा घात करू नकोस. रामविरोध करून तू ब्रह्मा, विष्णू व हर यांना जरी शरण गेलास तरी सुद्धां वाचणार नाहीस. ॥ दो. ५६ रा ॥
गर्व सोडून धाकट्या भावासारखा प्रभुचरणकमल भृंग हो किंवा रे खला ! तूं आपल्या कुळासहित रामबाणरूपी अग्नीत पतंग हो. ॥ दो. ५६ म ॥ श्रवत सभय मनिं, सस्मित आनन । सांगतसे सर्वांस दशानन ॥ दो :- विनति जलधि जड मानिना जरि गेले दिन तीन ॥ पत्रातील मजकूर ऐकताच मनात भिती वाटली पण मुखाने मंद हास्य करीत दशानन सर्वांना समजावून सांगतो की - ॥ १ ॥
जमिनीवर उताणा पडलेल्या माणसाने हातांनी जसे आकाश धरावे त्याप्रमाणे हा लघुतापस (लक्ष्मण) प्रलाप (मिथा बडबड) करीत आहे. ॥ २ ॥
ते ऐकून शुक म्हणाला की नाथ ! ती वाणी अगदी सत्य आहे, असे देहाभिमानी स्वभाव सोडून समजा - ॥ ३ ॥
व क्रोध न करता माझे चांगले ऐका (करा). नाथ ! रामविरोध करणे सोडून द्या. ॥ ४ ॥
रघुवीर जरी सर्व भुवनांचे राजे आहेत तरी त्यांचा स्वभाव अति कोमल आहे. ॥ ५ ॥
तुम्ही जाऊन भेटताच प्रभू तुमच्यावर कृपा करतील व तुमचा एकही अपराध मनात ठेवणार नाहीत. ॥ ६ ॥
म्हणून जनकसुता रघुनाथास द्यावी. हे स्वामी ! माझी इतकी विनंती ऐकावीच. ॥ ७ ॥
’वैदेही द्या’ असे जेव्हा म्हणाला तेव्हा त्या शठाने शुकाला लाथा मारल्या. ॥ ८ ॥
रावणाच्या चरणी मस्तक नमवून तो जिथे कृपासिंधु रघुनायक होते तेथे गेला. ॥ ९ ॥
प्रणाम करून त्याने आपली कथा निवेदन केली, व रामकृपेने त्याला आपली गती (पूर्वस्थिती) प्राप्त झाली. ॥ १० ॥
तो ज्ञानी मुनि होता पण अगस्ती ऋषींच्या शापाने राक्षस झाला होता. ॥ ११ ॥
पुन्हा पुन्हा रामचरणांना वंदन करून मग तो मुनी आपल्या आश्रमात गेला. ॥ १२ ॥
जरी तीन दिवस निघून गेले तरी जड सागर रामांच्या विनंतीस मान देईना, तेव्हा राम सकोप होऊन म्हणाले की, भितीशिवाय प्रीती उत्पन्न होत नाही. ॥ दो. ५७ ॥ लक्ष्मण आण शरासन सयक । सिंधु शोषितो विशिखें पावक ॥ दो :- कोटि यत्नि शिंपा कदली कापुनि फळते तीच ॥ लक्ष्मणा ! धनुष्य बाण आण पाहू, अग्नीबाणाने सागर शोषून टाकतो. ॥ १ ॥
शठाला विनंती करणे, कुटिलाशी प्रीती करणे, निसर्गतः कृपण असणार्याला नीती सांगणे, ॥ २ ॥
ममता निरताला ज्ञान कहाणी सांगणे, अतिलोभी माणसाला वैराग्याचा उपदेश करणे, ॥ ३ ॥
क्रोधी माणसाला शम शिकविणे आणि कामी व्यक्तीला हरिकथा सांगणे या सर्व गोष्टींचे फळ ऊखर (उजाड) भूमीत पेरलेल्या बीजाच्या फळासारखेच होय. ॥ ५ ॥
प्रभूंनी एक भयानक बाण धनुष्यावर लावला तोच सागराच्या पोटात आगीच्या ज्वाळा उठू लागल्या. ॥ ६ ॥
मकर, सर्प, मासे इ. जलचरांचे समुदाय विव्हळूं लागले. समुद्राने जेव्हा जाणले की आता सर्व जंतू जळणार - ॥ ७ ॥
तेव्हा त्याने सोन्याच्या ताटात नाना प्रकारची रत्ने भरली व अभिमान सोडून विप्ररूपाने आला. ॥ ८ ॥
केळीच्या झाडाला कितीही प्रकारे वाटेल तेथे पाणी घातले तरी ती कापल्यानेच फळते. तसेच हे खगेश ! ऐक, नीच विनंती मानीत नाहीत. ते धाकानेच नमतात. ॥ दो. ५८ ॥ सभय सिंधुनें प्रभुपद धरले । क्षमा नाथ ! अवगुण मम सगळे ॥ दो :- वच सुनम्र परिसुनि वदति सस्मित कृपा-अगार ॥ सागराने भयभीत होऊन प्रभूचे पाय धरले व म्हणाला की नाथ ! माझे सर्व दोष क्षमा करावेत. ॥ १ ॥
नाथ ! आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी यांची स्वाभाविकच जड करणी आहे. (ही पंचभूते स्वभावतःच जड आहेत). ॥ २ ॥
सद्ग्रंथात वर्णिले आहे की सृष्टी रचनेसाठी तुम्ही प्रेरणा दिलेल्या मायेने यांची निर्मिती केली आहे. ॥ ३ ॥
प्रभू ! ज्याला जशी तुमची आज्ञा आहे त्याप्रमाणे तो राहिल्याने वागल्याने सुखी असतो. हे जर स्वभाव सोडतील तर त्यांनाही दुःख, इतरांनाही दुःखच व अनर्थ ओढवतील. ॥ ४ ॥
हे प्रभो ! मला जे शासन केलेत ते योग्यच आहे. तरीपण आम्हाला जी मर्यादा घालून दिली आहे ती आपणच निर्मिलेली आहे. ॥ ५ ॥
ढोल, अडाणी मनुष्य, शूद्र, पशु आणि नारी हे सर्व ताडनाचे अधिकारी आहेतच. ॥ ६ ॥
प्रभू ! आपल्या प्रतापाने मी सुकून जाईन आणि सैन्य पार जाईल. तरीपण त्यात माझी महती (इभ्रत) राहणार नाही. ॥ ७ ॥
प्रभूच्या आज्ञेचा भंग कोणी करू शकत नाहीत असे श्रुति सांगतात. तरी आपण जे सांगाल, ते मी शीघ्र करीन. ॥ ८ ॥
अति नम्र वचन ऐकून कृपानिवास स्मित करून म्हणाले की तात ! असा उपाय सांगा की जेणे करून पुष्कळ कपिसैन्य उतरून जाईल. ॥ दो. ५९ ॥ नाथ ! नील नल कपि भावांला । बाल्यीं ऋषि-आशीस मिळाला ॥ छं :- निज भवनिं गत, मत सिंधुचें श्री रघुपतीनां मानले । सागर म्हणाला की नाथ ! नील व नल या दोघा कपिबंधूंना बालपणी ऋषींचा आशीर्वाद मिळाला आहे. ॥ १ ॥
त्यांनी स्पर्श केलेले मोठमोठे पर्वत तुमच्या प्रतापाने सागरात जलावर तरंगतील (बुडणार नाहीत). ॥ २ ॥
मी सुद्धा प्रभूचा प्रताप हृदयात धारण करून यथाशक्ती साह्य करून पाहीन. ॥ ३ ॥
नाथ ! या प्रमाणे सागराला असा बांधवा की जेणे करून त्रैलोक्य या सुयशाचे गान करील. ॥ ४ ॥
आणि नाथ ! या बाणाने माझ्या उत्तर तटावर राहणार्या पापी दुष्ट मनुष्यांचा वध करा. ॥ ५ ॥
सागराला होत असलेली पीडा कृपालु रणधीर रामचंद्रांनी जाणली आणि ती त्वरेने निवारण केली. ॥ ६ ॥
रामचंद्रांचे भारी बल व पौरुष पाहून सागर हर्षित होऊन सुखी झाला. ॥ ७ ॥
सगळे चरित्र प्रभुला सांगितले आणि पायांना प्रणाम करून सागर परत गेला. ॥ ८ ॥
सागर घरी गेला. सागराचे मत श्रीरघुपतींना आवडले, पसंत पडले. कलिमल हरण करणारे हे चरित्र तुलसीदासाने यथामति वर्णन केले. सुखाचे निवासस्थान असून संशयाचे शमन करणार्या, व विषादाचा विनाश करणार्या रघुपती गुण-समुहाला, हे शठ मना ! सर्व आशा व सर्वांचा भरंवसा सोडून सतत श्रवण कर व गा. ॥ छंद ॥
रघुनायकाच्या गुणांचे वर्णन सुमंगलास व सकल सुमंगलास देणारे आहे. जे कोणी त्याचे आदराने श्रवण करतील, ते जलयानावाचून (जहाजावाचून) भवसागर तरून जातील. ॥ दो. ६० ॥ इति श्रीमद् रामचरितमानसे सकल-कलि-कलुष-विध्वंसने श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |