॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १४ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

तरी अशंका कृता तुवां जी । श्रवणिं कथनिं हितकर सर्वा ती ॥
जिहिं हरिंकथा श्रुता नहिं कानां । श्रवणरंध्र अहिभवन हि माना ॥
नयनिं संत दर्शन ना करती । मोरपंखलोचन ते गणती ॥
तुलणें कडु तुंबडिशीं शिर तें । हरिगुरुपदमूलिं न जें नमतें ॥
हृदयीं हरिभक्ति न आणिति जे । जीत शवासम गणा प्राणि ते ॥
गान रामगुण जीभ करी ना । ती दर्दुरजिव्हाच खरी ना ॥
निष्ठुर कुलिशकठोरा छाती । हरिचरिता श्रवुनि न हर्षे ती ॥
गिरिजे श्रुणु रामाची लीला । सुरहित दनुजविमोहनशीला ॥

दो. :- रामकथा सुरधेनु सम सेवत सब सुखदनि ॥
सत्‌समाज सुरलोक हें कळुन न ऐके प्राणि ! ॥ ११३ ॥

तरीपण तुम्ही जी अति – शंका काढलीत तिच्या कथनाने व श्रवणाने सर्वांचे हित होईल ॥ १ ॥ ज्यांनी आपल्या कानांनी हरिकथा श्रवण केले नाही त्यांचे ते कान म्हणजे सापाची राहण्याची बिळे आहेत असे समजा ॥ २ ॥ जे डोळ्यांनी संतदर्शन करीत नाहीत ते मोराच्या पंखातील डोळ्यासारखे डोळे आहेत असे गणावे ( लेखावे ) ॥ ३ ॥ जे हरी ( राम, विष्णू इ. ) व गुरू यांच्या पदमूलाला नमत नाहीत त्यांचे डोके कडू दुध्या-भोपळ्यासारखे आहेत असे समजावे. ॥ ४ ॥ हरीभक्तीला आपल्या हृदयात जे आणीत नाहीत ( स्थान देत नाहीत ) ते प्राणी जिवंत असून शवासारखे गणावे . ॥ ५ ॥ जी जीभ रामगुणगान करीत नाही ती खरी जीभ नसून बेडकाची जीभ आहे असे समजावे ॥ ६ ॥ हरिकथा श्रवणाने जिला हर्ष होत नाही ती छाती वज्रासारखी कठोर आहे व निष्ठूर आहे असे समजावे ॥ ७ ॥ गिरीजे ऐका ! श्रीरामाची लीला सुरहित करण्यासाठी, दानवांना विमोहित करणारी आहे ॥ ८ ॥ रामकथा कामधेनू सारखी आहे, सेवा केल्यास सर्वांना सुख देणारी आहे. संतांचा समाज हेच सुरलोक होत, इतके कळल्यावर सुद्धा असा कोण प्राणी असेल की तो श्रवण करणार नाही ? ॥ दो० ११३ ॥

रामकथा सुंदर करटाळी । संशयविहगां दूर पिटाळी ॥
रामकथा कलिविटपकुठारी । सादर ऐक गिरीशकुमारी ॥
रामनाम गुण चरित्र शोभन । जन्म कर्म वदती श्रुति माप न ॥
अंत न जेविं राम भगवाना । तथा कथा कीर्तीस गुणांनां ॥
तदपि यथाश्रुत तुजसि यथामति । वदतो बघुनि तुझी प्रीती अति ॥
उमे प्रश्‍न तव सहज चांगले । सुखद संतसंमत मज रुचले ॥
एक गोष्ट मजला नहि रुचली । जरी मोहवश भवानि! कथिली ॥
तुम्हिं कथिलें जे राम दुजा कुणि । श्रुति गाती ज्या ध्याति महामुनि ॥

दो. :- श्रवति वदति असं अधम ज्यां लागे मोहपिशाच ॥
पाखंडी हरिपदविमुख जाणति मृषा न साच ॥ ११४ ॥

रामकथा सुंदर करटाळी आहे व ती संशयरुपी विहगांना दूर पिटाळून लावते. ॥ १ ॥ कलिरुपी विशाल वृक्षाला रामकथा कुर्‍हाड आहे, तरी हे गिरीराज कुमारी सादर श्रवण कर. ॥ २ ॥ रामचंद्रांची नामे, गुण, चरित्र, जन्म, व कर्म सुंदर व अमाप – अगणित आहेत असे वेद वर्णन करतात ॥ ३ ॥ भगवान राम जसे अंतरहित आहेत तसाच त्यांच्या कथा, कीर्ती व गुण यांना अंत नाही. ॥ ४ ॥ तथापि तुझी अतिप्रीती पाहून मी तुला यथाश्रुत यथामति सांगतो ॥ ५ ॥ उमे ! तुझे प्रश्न स्वाभाविक, सुंदर सुखदायक व संतांना मान्य होणारे असल्याने मला आवडले ॥ ६ ॥ भवानी ! जरी तुम्ही मोहवश होऊन म्हणाला असला तरी एक गोष्ट मला मुळीच रुचली नाही ॥ ७ ॥ ज्याला श्रुती गातात व महामुनी ज्यांचे ध्यान करतात तो राम कोणी निराळा आहे असे जे तुम्ही म्हणालात तेवढेच आवडले नाही, असे कोण म्हणतात ते ऐका ॥ ८ ॥ जे हरिपद विमुख पाखंडी मोहरुपी पिशाचाने झपाटलेले अधम असलेलेच असे बोलतात वा ऐकतात कारण ते मतिमंद असतात. ( असे असल्याने सत्य व मिथ्या काहीच जाणू शकत नाहीत) ॥ दो० ११४ ॥

अज्ञ अकोविद अंध अभागे । विषय बुरशि मन मुकुरीं लागे ॥
फार कुटिल लंपट कपटी ही । स्वप्निं न संतसभा दिसली ही ॥
वदति वाणि ते वेद विसंगत । लाभ हानि ना ज्यांना उमगत ॥
मुकुर मलीनां नयन विहीनां । रामरूप कसं दिसेल दीनां ॥
अगुण न सगुण विवेक जयांनां । ते जल्पति कल्पित वच नाना ॥
हरिमायावश विश्वीं भ्रमती । त्यां अघटित ना कांहिहि वदती ॥
वातुल भूतविवश मदमस्त । ते बोलति अविचारें ग्रस्त ॥
जिहिं कृत महामोहमदपाना । त्यांचे शब्द न घेणें कानां ॥

सो० :- असें स्वहृदिं सुविचारि, त्यज संशय भज रामपद ॥
शृणु गिरिराजकुमारि भ्रमतमरविकरवचन मम ॥ ११५ ॥

जे अज्ञ – अडाणी असतील ते मूर्ख, ज्यांना धर्मशास्त्रादिकांचे ज्ञान नाही असे अकोविद, जे आंधळे झालेले असतील व जे अभागी आहेत ( तेच असे बोलतात ऐकतात ) व विषयरूपी बुरशी ज्यांच्या मनरुपी आरशावर चढली आहे ॥ १ ॥ जे फार विषयलंपट कपटी व कुटील असतात, व ज्यांनी स्वप्नात सुद्धा संतसभा पाहीली नाही ॥ २ ॥ व ज्यांना लाभहानी उमगत नाही ते अशी वेदविसंगत भाषा बोलतात ॥ ३ ॥ ज्यांना लाभ वा हानी कळत नाही व ज्यांचा मनरुपी आरसा मलीन झाला आहे; व ज्यांना नयन नाहीत त्या दीनांना रामरुप दिसेल तरी कसे ? ॥ ४ ॥ ज्यांना निर्गुणाचा किंवा सगुणाचा विवेक नाही ते नाना प्रकारची वचने बडबडत असतात. ॥ ५ ॥ जे हरिमायेला वश होऊन जगात भ्रमण करीत असतात त्यांनी काहीही बोलणे अशक्य नाही ॥ ६ ॥ ज्यांना वात झालेला असतो, ज्यांना भूत लागलेले असते व जे मदाने धुंद झालेले असतात, ते अविचारग्रस्त होऊन बोलतात, सुविचाराने बोलत नाहीत. ॥ ७ ॥ ज्यानी महामोह रुपी मद्याचे पान केलेले असते, त्यांचे बोलणे कानावर घेऊ नये ॥ ८ ॥ हे भवानी ! तूं आपल्या हृदयात सुविचार कर आणि दे संशय सोडून आणि रामपदीं शरण जा. गिरिराज कुमारी ! आता भ्रमाचा व मोहाचा ( अंधार ) नाश करणारे माझे सूर्यकिरण रुपी वचन श्रवण कर ॥ दो० ११५ ॥

सगुणिं अगुणिं काहीं नहि भेदहि । गाती मुनि पुराण बुध वेदहि ॥
जो अलक्ष अज अरूप अगुणहि । भक्तप्रेमें होतो सगुणहि ॥
जो गुणरहित सगुण तो केवीं । जल जलगार अलग ना जेवीं ॥
नाम जयाचें भ्रमतमभानु । त्या विमोहसंबंध वदा नु ॥
राम सच्चिदानंद दिनेशीं । नाहीं मोहनिशा लवलेशीं ॥
सहज प्रकाशरूप भगवाना । अरुणोदयविज्ञान कदा ना ॥
हर्ष खेद नी ज्ञानाज्ञानहि । जीवधर्म मी हा अभिमान हि ॥
व्यापी ब्रह्म राम जग जाणें । परमानंद परेश पुराणें ॥

दो० :- प्रथित पुरुष जो प्रभानिधि प्रगट परावर नाथ ॥
रघुकुलमणि मत्स्वामि ते वदुनि नमिति शिव माथ ॥ ११६ ॥

सगुण व निर्गुण यात काहीही भेद नाही असे मुनी, पुराणे, ज्ञानीभक्त व वेदसुद्धा विस्तारपूर्वक वर्णन करतात. ॥ १ ॥ जो अलक्ष अजन्मा, अरुप, व अगुण आहे तोच ( परमात्मा, ब्रह्म ) भक्तांच्या प्रेमामुळे सगुण होतो. ॥ २ ॥ जो गुणरहित आहे तो सगुण कसा होतो ? ( तर ) पाणी व पाण्याची झालेली गार जशी भिन्न नसतात ( तसेच ) ॥ ३ ॥ भ्रमजनक अंधाराला ज्याचे नाम भास्करासारखे आहे, त्यांच्या ठिकाणी विमोहाचा संबंध आहे असे कसे म्हणता ? ॥ ४ ॥ राम सच्चिदानंदस्वरुप, दिनेश आहेत, त्यांच्या ठिकाणी मोहरूपी रात्रीचा लवलेश सुद्धा नाही. ॥ ५ ॥ राम सहज प्रकाशरुप ( स्वयंप्रकाशरुप ) भगवान आहेत, त्यांना विज्ञानरुपी अरुणोदय सुद्धा ( माहीत ) नाही. ॥ ६ ॥ हर्ष व खेद, ज्ञान आणि अज्ञान व मी हा अभिमान हे जीवांचे धर्म आहेत ॥ ७ ॥ रामचंद्र तर ब्रह्म, व्यापक, परमानंद स्वरुप, परेश व पुरातन आहेत व हे सर्व जग जाणते. ॥ ८ ॥ जो ( भ. गीतेतील १५ वा अ. उत्तम पुरुष ) पुरुष म्हणून प्रसिद्ध आहे, प्रकाशाचे भांडार ( निधी ) आहे. प्रकट आहे व परावर ( सर्वांचे नाथ आहेत ) नाथ आहेत तेच रघुकुलमणी माझे स्वामी आहेत असे म्हणून शिवांनी मस्तक नमविले. ॥ दो० ११६ ॥

अज्ञानी भ्रम निज न जाणती । प्रभुवर जड निज मोह लादति ॥
घन घनपटल बघुनि नभिं भारी । म्हणती छन्न भानु कुविचारी ॥
लोचनिं अंगुलि घालुनि पाही । इंदु दोन दिसती त्याला ही ॥
रामविषयीं उमे मोह ते । नभ जस तम रज धूम्रिं शोभतें ॥
विषय इंद्रियें सुर जीवांसी । एकें चेतनता दुसर्या॥सी ॥
सर्वां परम प्रकाशक हि जो । राम अनादि अयोध्यापति तो ॥
जगत् प्रकाश्य प्रकाशक रामहि । मायापति ज्ञानगुणधामहि ॥
यत्सत्यत्वें जड जी माया । गमे सत्यशी मोह सहायां ॥

दो. :- रजत शुक्तिमधिं भासतें यथा भानुकरि वारि ॥
मृषा त्रिकाळिंहि तरि कुणी शक्त न जो भ्रम वारि ॥ ११७ ॥

स्वत:सच भ्रम झालेला आहे, हे अज्ञानी लोक जाणत नाहीत व ते जड आपला मोह प्रभूवरच लादतात. ॥ १ ॥ आकाशात फार घनदाट मेघपटल पाहून कुविचारी लोक म्हणतात की सूर्य झाकला गेला ॥ २ ॥ स्वत:च्या डोळ्यात बोट खुपसून जो पाहतो त्यालाच दोन चंद्र प्रगट दिसतात. ॥ ३ ॥ आकाश जसे अंधार, धूर, धूळ, यांनी शोभा पावते तसेच उमे ! रामाविषयींचे मोह रामासशोभा आणणारेच असतात.॥ ४ ॥ विषय, इंद्रिये, इंद्रिय-देवता व जीव यांना चेतना मिळते ती क्रमश: एकापासून दुसर्‍यास अशी मिळते. सर्वांचा मुख्य – परम प्रकाशक जो अनादी राम तोच अयोध्यापती राम होय. ॥ ५ ॥ जग हे प्रकाश्य आहे ( प्रकाशित करण्याचा विषय ) व त्याला प्रकाशक रामच आहेत ते मायेचे स्वामी आहेत व ते ज्ञानाचे व गुणांचे धाम आहेत. ॥ ६ ॥ त्यांच्या सत्यतेने जड असणारी जी माया ती मोहाच्या साह्याने सत्य असत्या सारखी भासते (म्हणजेच सत्य नाही ) ॥ ७ ॥ शिंपीत जसे रुपे – चांदी भासते व सूर्य किरणात जसे पाणी भासते तसेच (रामाच्याठिकाणी जग भासते ) ते रुप व ते जल जरी तिन्ही काळी मृषा असते, मिथ्या असते, तरी तो भ्रम कोणी निवारण करुं शकत नाही. ॥ दो० ११७ ॥

राही हरिआश्रित जग यापरिं । जरि असत्य देतें दुःखा तरि ॥
स्वप्नी शिर जर कोणि कापलें । जागृतिविण कधिं दुःख हरपलें ॥
ज्यांची कृपा असा भ्रम हरते । गिरिजे! कृपालु रघुनायक ते ॥
कोणि यदन्त न आदि समजले । मतिअनुमानिं निगम असं वदले ॥
चळे अपद ऐके विण कानां । कर्म करांविण करि विध नाना ॥
भोगी सकल रसां मुख नाहीं । अति पटु वक्ता वाणिविना ही ॥
स्पर्शे तनुविण अचक्षु पाहे । घ्राण न, गंध अखिल घेता हे ॥
अशि सबपरीं अलौकिक करणी । कोण कसा तन्महिमा वर्णी ॥

दो. :- श्रुति बुध गाती ज्या असें मुनि धरिती यद्‌ध्यान ॥
ते दशरथसुत भक्तहित कोसलपति भगवान ॥ ११८ ॥

या प्रकारे सर्व जग हरीच्या आश्रयावर राहते. व जरी ते सत्य नाही ( असत्य – मिथ्या आहे ) तरी ते दु:ख देतेच ॥ १ ॥ जर स्वप्नात कोणी आपले मस्तक कापले तर ते दु:ख जागृती आल्याशिवाय नष्ट होत नाही ॥ २ ॥ अशा या भ्रमाला ज्यांची कृपा दूर करते ते हे गिरीजे ! कृपालु रघुनायकच ( दुसरे कोणी नाहीत; निर्गुण ब्रह्म नाही बरं कां ) ॥ ३ ॥ ज्याचा आदी किंवा अंत कोणालाच लागला नाही, त्यांचे आपल्या बुद्धीने अनुमान करून वेदांनी वर्णन केले आहे ते असे ॥ ४ ॥ पाय नसून हालचाल करतो व कान नसून श्रवण करतो हात नसून नाना प्रकारची कर्मे करतो ॥ ५ ॥ मुख नाही तरी सर्व रसांचा भोग भोगतो, चाखतो, वाणी नसून अति उत्तम वक्ता आहे. ॥ ६ ॥ त्वचा नसून स्पर्श करतो व नेत्र नसून पाहतो, नाक नसून सर्व प्रकारचे वास घेत असतो ॥ ७ ॥ अशी सर्वप्रकारे अलौकिक ज्याची करणी आहे त्याचा महिमा कोण कसा वर्णन करणार ! ॥८ ॥ वेद व बुध शेष शारदा ज्याचे असे वर्णन करतात व मुनी ( ज्ञानी ) ज्याचे ध्यान धरतात तेच भगवान भक्तांच्या हितासाठी कोसलपती झाले. ॥ दो० ११८ ॥

काशीं मरत जंतु जैं बघतो । नामबलें ज्या विशोक करतो ॥
ते प्रभु मम विश्वाचे स्वामी । रघुवर सकल हृदंतर्यामी ॥
यन्नामा नर विवशहि वदती । बहु जन्मार्जित अघगिरि दहती ॥
जे स्मरणा नर सादर करती । भववारिधि गोपद इव तरती ॥
तो परमात्मा राम भवानी! । भ्रम तिथं! अति अविहित तव वाणी ॥
हृदयिं आणतां संशय असले । ज्ञान विरति गुण पळती असले ॥
श्रुत्वा भवभंजक शिव-वचना । सकल विलयिं गत कुतर्करचना ॥
रघुपतिपदिं ये प्रतिती प्रीती । दारुण असंभावना गत ती ॥

दो. :- कितिदां प्रभुपद कमल धरि; पंकजपाणि जुळून ॥
बोले गिरिजा वचन वर प्रेमरसिं किं घोळून ॥ ११९ ॥

जीवजंतूंना काशीत मरताना जेव्हा पाहतो तेव्हा ज्यांच्या नामबलाने मी त्यांना शोकरहित ( मुक्त ) करतो. ॥ १ ॥ तेच प्रभू रघुवर माझे व सर्व विश्वाचे स्वामी आहेत व तेच सर्वांच्या हृदयात अंतर्यामी आहेत. ॥ २ ॥ विवश ( विकारवश ) होऊन सुद्धा ज्यांच्या नामाचा उच्चार केला की अनेक जन्मात जमविलेल्या पाप-पर्वतांचे दहन होते व जे नर आदराने नामस्मरण करतात, ते भवसागराला गो-पदाप्रमाणे तरुन जातात. ॥ ३ – ४ ॥ भवानी ! असा जो परमात्मा तेच रामचंद्र बरं ! त्यांना ( तिथे ) भ्रम झाला इत्यादी तू जे म्हणालीस ते सर्व तुझे म्हणणे अगदी वेदविरुद्ध आहे. ॥ ५ ॥ असले संशय मनात आणताच असलेले ज्ञान, वैराग्य व सर्व सदगुण पळून जातात. ॥ ६ ॥ शिवाचे भ्रमभंजन करणारे भाषण ऐकून ( पार्वतीच्या हृदयातील ) कुतर्काची सर्व रचना नष्ट झाली ॥ ७ ॥ रघुपतिपदांच्या ठिकाणी विश्वास उत्पन्न झाला व ( त्यामुळे ) प्रीती उत्पन्न झाली. व पूर्वीचा भयंकर असंभावना दोष गेला ॥ ८ ॥ ( असे याज्ञ० भर०स म्हणाले ) तिने प्रभूचे चरणकमल कितीदां तरी ( पुन: पुन्हा ) धरले व आपले कमळासारखे हात जोडून गिरीजा जणूं प्रेमरसात घोळून उत्तम वचन बोलली. ॥ दो० ११९ ॥

परिसुनि तुमचे वच सम शशिकर । फिटे मोह शरदातप अतितर ॥
तुम्हिं कृपालु सब संशय हरले । रामस्वरूप मज आकळलें ॥
नाथ! कृपें पळविले विषादा । अतां सुखी प्रभु-पद-प्रसादां ॥
आतां जाणुनि मज निज किंकरि । नारी सहज अडाणी जड जरि ॥
पुसिलें मी जें प्रथम वदा तें । प्रभु जर असती प्रसन्न मातें ॥
ब्रह्म राम चिन्मय अविनाशी । सर्वरहित सब उरपुरवासी ॥
नाथ! हेतु नरतनू धराया । मज वृषकेतु वदा समजाया ॥
श्रवुनि उमावच परम विनीत । रामकथेवरि प्रीति पुनीत ॥

दो. :- हृदिं हर्षति कामारि तैं शंकर सहज सुजाण ॥
उमे प्रशंसुनि बहुपरीं वदले कृपानिधान ॥ १२० रा ॥
सो. :- श्रुणु शुभ कथा भवानि! रामचरितमानस विमल ॥
जी भुशुंडिवाखाणि ऐके खगनायक गरुड ॥ १२० म ॥
तो संवाद उदार घडे कसा सांगेन मग ॥
ऐक राम‍अवतार चरित परम सुंदर अनघ ॥ १२० च ॥
हरिगुणनाम अपार कथा रूप अगणित अमित ॥
मी निजमति-अनुसार वदतो सादर उमे श्रुणु ॥ १२० द्रा ॥

आपले चंद्रकिरणां सारखे भाषण ऐकून माझा अतिशय मोहरुपी शरदातप नाहीसा झाला ॥ १ ॥ तुम्ही आपल्या कृपेने माझे सर्व संशय हरले व मला रामस्वरुपाचे ज्ञान झाले ॥ २ ॥ नाथ ! आपण आपल्या कृपेने माझा विषाद पळवून लावलात व मी आता आपल्या पायाच्या प्रसादाने सुखी झाल्ये. ॥ ३ ॥ आता मला आपली खरी दासी समजून, मी जरी स्त्री, स्वभावताच अडाणी व मुर्ख – मंदमती असले तरी - ॥ ४ ॥ प्रभू जर मजवर प्रसन्न असतील तर मी जे प्रथम विचारले तेच सांगावे ॥ ५ ॥ जे राम ब्रह्म, चिन्मय, अविनाशी, सर्वरहित पण सर्वांच्या हृदयरूपी पुरात निवास करून असतात ॥ ६ ॥ त्याने हे नाथ ! नरतनू धारण करण्यास हेतू काय तो मला समजेल अशा रितीने सांगावा. ॥ ७ ॥ उमेचे परम विनीत – नम्र वचन ऐकून व तिची रामकथेवरील पुनीत प्रीती पाहुन ॥ ८ ॥ कामारि हृदयात हर्षित झाले व मग स्वभावताच सुजाण असणार्‍या कृपानिधान शंकरांनी उमेची नाना परीनी प्रशंसा केली व म्हणाले ॥ दो० १२० रा ॥ भवानी ! रामचरितमानस नावाची विमल व मंगल कथा श्रवण कर; ती भुशुंडीने विस्तार पूर्वक सांगितली व पक्षिराज जो गरुड त्याने श्रवण केली ॥ दो० १२० म॥ तो त्यांचा उदार संवाद कसा घडला हे पुढे सांगेन ( प्रथम ) रामचंद्रांचा परम सुंदर व निष्पाप असा अवतार व अवतार –चरित्र ऐका ॥ दो० १२० चं ॥ हरीचे नाम, गुण कथा रुप इत्यादि सर्वच अपार अगणित व अमित आहेत; ( म्हणून ) मी आपल्या बुद्धीप्रमाणे आदराने सांगतो, तुम्हीही आदराने श्रवण करा ॥ दो० १२० द्र ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP