॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १८ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

गुरुनीं कृत उपदेश शुभ भला । प्रजा सचिव संमत तो सकला ॥
आई आज्ञापि समुचित जाणुनी । इच्छितोच करण्या शिरिं धरुनी ॥
गुरु पितृ मातृ स्वामिहित वचनें । मुदित मनें शुभ जाणुनि करणें ॥
उचित किं अनुचित करत विचारा । धर्मनाश, शिरिं पातक भारा ॥
तुम्हिं तर द्यां ऋजु उपदेशा, जो । करिल भलें मम आचरतां तो ॥
जरि हें मी जाणतों नीटसें । परि परितोष न जीविं होतसे ॥
अतां विनति मम ऐकुनि घेणें । मग मज-जोगी शिकवण देणें ॥
क्षमा ! देत उत्तर अपराधू । आर्त-दोष-गुण गणति न साधू ॥

दो० :- सिताराम वनिं नाकिं नृप म्हणां राज्य कर तात ! ॥
समजा मम हित होइ कीं महा कार्य निज यांत ? ॥ १७७ ॥

गुरुजींनी मला जो उपदेश केला तो चांगलाच आहे आणि तो प्रजा व सचिव या सर्वांनाच मान्य आहे ॥ १ ॥ तो उपदेश अगदी उचित आहे असे ठरवून आईने ( कौसल्या मातेने) पण आज्ञा दिली आहे व त्याप्रमाणे शिरसा वंदन करण्याची माझीही इच्छा आहे ॥ २ ॥ गुरुपिता माता व स्वामी यांचे वचन हितकारक असते, म्हणून ते शुभ मानून प्रसन्न मनाने करणे जरुर आहे ॥ ३ ॥ ते योग्य की अयोग्य असा नुसता विचार केला तरी सुद्धा धर्मनाश होतो व पातकांचा भारा डोक्यावर बसतो ॥ ४ ॥ तुम्ही तर जो उपदेश दिलात तो इतका सरळ आहे की त्याचे आचरण केले असता माझे बरे होईल ॥ ५ ॥ हे जरी मला चांगले कळत आहे तरी ( त्याने) माझ्या जीवाचे समाधान होत नाही ॥ ६ ॥ म्हणून आपण माझी विनंती आधी ऐकून घ्यावी व मग मला योग्य असा उपदेश द्यावा ॥ ७ ॥ मी उत्तर देत आहे हा अपराध आहे, पण आपण क्षमा करावी, कारण की साधू आर्ताचे दोषगुण पाहत नाहीत. ॥ ८ ॥ सीताराम वनांत आहेत, राजे स्वर्गात आहेत, आणि मला म्हणता की तात ! राज्य कर याने माझे हित होईल असे वाटते की तुमचे काही महत्कार्य याने साधणार आहे असे वाटते ? ॥ दो० १७७ ॥

सीतापति-सेवें अमचें हित । तें तों जननि कुटिलतेनें हृत ॥
मी विवरुनि पाहिलें मनां हि । अन्य उपायीं हित मम नाहीं ॥
शोक-समाज राज्य का गणना । दृष्टि राम-सिय-लक्ष्मण-पद ना ॥
वृथा वसनविण भूषण भारहि । वृथा विरतिविण ब्रह्मविचारहि ॥
सरुज शरीर वृथा बहु भोगहि । विण हरिभक्ति वृथा जप योगहि ॥
वृथा जिवाविण काया सुंदर । वृथा सर्व माझें विण रघुवर ॥
आज्ञा द्या जातों रामाप्रति । हा सिद्धांत एक हित मम अति ॥
मज नृप करुनी स्वहित वांछितां । तें स्नेहज-जडता-वश कथितां ॥

दो० :- कैकयीसुत कुटिल मति राम विमुख गत लाज ॥
तुम्हिं वांछां सुख मोह वश मज अधमा द्या राज्य ॥ १७८ ॥

सीतापतीच्या सेवेतच आमचे ( सर्वांचे) हित आहे, व ते तर जननीच्या कुटीलपणाने नाहीसे केले आहे ॥ १ ॥ मी मनात पुष्कळ विचार करुन पाहीला, तेव्हा ठरले की माझे हित अन्य उपायांनी होणे शक्य नाही ॥ २ ॥ जो पर्यंत राम सीता व लक्ष्मण यांच्या पायांचे दर्शन नाही तोपर्यत शोकसमाज राज्याची गणना ( किंमत) ती काय ? ॥ ३ ॥ वस्त्रांवाचून अलंकार भूषणे व्यर्थ व भारभूत होत वैराग्याशिवाय ब्रह्मविचार व्यर्थ होय. ॥ ४ ॥ शरीर रोगी असेल तर पुष्कळ भोग निष्फळ होत, आणि हरिभक्ती विरहित जपयोग इ. निरर्थक होत. ॥ ५ ॥ जिवावाचून सुंदर काया वाया होय, व रघुवरावाचून माझे सर्वच निरुपयोगी आहे. ॥ ६ ॥ मी रामाकडे जातो कारण हा एकच सिद्धांत आहे की हे एकच मोठे हित आहे ( म्हणून) आपण आज्ञा द्यावी ॥ ७ ॥ मला राजा करुन आपण आपले हित इच्छिता ते केवळ स्नेहाने उत्पन्न झालेल्या मोहाला वश होऊन आपण सांगता ॥ ८ ॥ कैकेयीचा मुलगा कुटीलबुद्धी, रामविरोधी व लज्जाहीन अशा मला अधमाला राज्य देता व मोहवश तुम्ही सुख इच्छिता ! ॥ दो० १७८ ॥

सत्य वदें विश्वासा धरिजे । धर्मशील नरनाथ पाहिजे ॥
हटें द्याल मज रज्यां जेव्हां । रसा रसातळिं जाइल तेव्हां ॥
पापनिवास ज्कोण कीं मजसा । ज्यास्तव सिताराम वनवासा ॥
रायें रामा कानन दिधलें । विरहिं अमरपुरिं जाइनि वसले ॥
मी शठ सकल अनर्थां कारण । गोष्टि ऐकतों बसुनि सचेतन ॥
विण रघुवीर बघुनि आवासा । जगले प्राण सहुनि उपहासा ॥
राम-पुनीत विषय-रसरुक्षू । लोलुप भूमी भोग-बुभुक्षू ॥
किती वदूण् मी हृदय-कठिणता । कुलिशा लाजवि मिळवि महत्ता ॥

दो० :- कार्य कठिण कारणाहुनि माझा दोष न लेश ॥
उपल-अस्थि-हुनि लोह-पवि कठिण करालविशेष ॥ १७९ ॥

मी सत्य सांगतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की नरनाथ धर्मशील असला पाहीजे ॥ १ ॥ तुम्ही ज्यावेळी हट्टाने मला राज्य द्याल त्याच वेळी ही रसा ( = पृथ्वी) रसातळाला जाईल ( हे लक्षांत असू द्या) ॥ २ ॥ ज्याच्यामुळे सिताराम वनवासास गेले, त्या माझ्यासारखा पापांचे निवासस्थान दुसरा कोण असेल ? ॥ ३ ॥ राजांनी रामास कानन दिले व विरहाने आपण अमरावतीत जाऊन राहीले ॥ ४ ॥ या सर्व अनर्थांचे मूळ ( हेतू, कारण) मी दुष्ट ( शठ) असून मी जिवंतपणे ( स्वस्थ) बसून सर्व गोष्टी ऐकत आहे ॥ ५ ॥ ( रामाचे) निवासस्थान ( आवास) रघुवीर विहीत पाहील्यावर ( या जगांत) उपहास सहन करुन सुद्धा माझे प्राण अजून जगले ( राहीले) आहेत ! ॥ ६ ॥ ( माझे प्राण) रामरुपी पवित्र विषयांच्या रसांत अगदी उदास ( रुक्ष) आहेत, आणि विषय लोलुप असून भूमी व भोग यांची भूक लागलेले आहेत ॥ ७ ॥ माझ्या हृदयाची कठिणता कोठवर सांगू ? वज्राला लाजवून ( त्याचा अनादर करुन) त्याने मोठेपणा मिळवला आहे ! ॥ ८ ॥ ( पण) यांत माझा जरा सुद्धा ( लेश) नाही ( कारण) कार्य आपल्या कारणापेक्षा कठीण असतेच ! ( उदा०) दगड व अस्थि यांच्यापेक्षा लोह व वज्र अधिक कठीण व विशेष भयंकर असतात ॥ दो० १७९ ॥

कैकेयी - भव - तनु - अनुरागें । पामर पुरते प्राण अभागे ॥
प्रियविरहीं प्रिय मला प्राण जर । पुढें दिसेल कळेल फार, तर ॥
लक्ष्मण-राम-सिते वन दिधलें । स्वर्गिं पाठवुनि परिहित केलें ॥
घे वैधव्या अयशा आपण । प्रजे शोक-संताप समर्पण ॥
दे सुख सुयश सुराज्य मला तरि । कैकयि सर्वांचे कार्या करि ॥
याहुनि भलें काय आ आतां । त्यावर अभिषेका करुं बघतां ॥
जन्मुनि कैक‍इ जठरिं जगामधिं । काहिं न मजला अनुचित यामधिं ॥
विधि रवि सगळ्या मम योगाला । प्रजा पंच मग साह्य कशाला ॥

दो०:- ग्रहगृहीत नी वातावश त्यंतहि इंगळीमार ॥
त्यास पाजणें वारुणी वदा काय उपचार ॥ १८० ॥

कैकेयीपासून उत्पन्न झालेल्या या तनूच्या अनुरागाने हे पामर नीच प्राण पुरते अभागी आहेत ॥ १ ॥ प्रिय रामाच्या विरहात सुद्धा मला माझे प्राण प्रिय वाटतात तर ( एवढ्याने काय झाले ?) पुढे अजून पुष्कळ पाहण्यास व ऐकण्यास सापडेल ! ॥ २ ॥ लक्ष्मण, राम व सीता यांना वन दिले, स्वर्गात पाठवून पतीचे हित केले ॥ ३ ॥ स्वत: वैधव्य व अपयश आपल्याला घेतले, प्रजेला शोक व संताप दिला ॥ ४ ॥ मला तर सुख, सुयश व सुराज्य दिले. ( त्या प्रमाणे) कैकेयीने सर्वांचीच कामे केली ॥ ५ ॥ यापेक्षा माझे आता अधिक चांगले ते काय व्हायचे राहीले आहे ! ( कीं) त्यावर ( भरीला) तुम्ही मला राज्याभिषेक करुं पाहतां ॥ ६ ॥ कैकेयीच्या उदरीं या जगात जन्मांस आलेल्या मला यामध्ये अनुचित असे काहीच नाही ॥ ७ ॥ माझा सर्वयोग विधात्यानेच जुळवून आणलेला असता प्रजा आणि पंच साह्य करण्यास पाहीजेत तरी कशाला ! ॥ ८ ॥ आधी ग्रहांच्या तडाक्यात सापडलेल्या ( ग्रहाने पछाडलेला) त्यांत वात झालेला, त्यातही इंगळीने नांगी मारलेली असे असता त्याला मदिरा पाजणे हा काय उपचार आहे ( त्यावर ?) सांगा पाहू ॥ दो० १८० ॥

कैकयिसूनु-योग्य जगिं जें ही । चतुर विरंचि मला दे ते ही ॥
दशरततनय राम-लघु-भाऊ । दिला विधीनें वृथा प्रभाऊ ॥
तुम्हिं म्हणतां कर राज्यारोहण । राजाज्ञा ती सर्वां शोभन ॥
उत्तर कैसें कोणा द्यावें । रुचें जयां जें सुखें म्हणावें ॥
मी नि कुमाता यां वाचोनी । कोण म्हणति कृत भले म्हणोनी ॥
मजविण सचराचरांत कोणहि । ज्या प्राणप्रिय सिताराम नहि ॥
हानि परम लाभ चि सब मानां । दुर्दिन माझे दोष कुणा ना ॥
प्रेम-शील-संशयवश आहां । उचित सर्व जें सब वदाअहां ॥

दो० :- राममाय अति सरलधी प्रेमा मजवरि भाति ॥
वदे स्वभावें स्नेह वश बघुनि दीनता सारि ॥ १८१ ॥

कैकेयीच्या सुताला जगात जे योग्य आहे तेच चतुर विरंचीने मला दिले आहे ॥ १ ॥ दशरथांचा पुत्र व रामचंद्रांचा धाकटा भाऊ हा मोठेपणा मात्र विधीने मला व्यर्थ दिला ॥ २ ॥ तुम्ही सर्व मला राज्यारोहण करण्यास सांगता आणि ती राजाज्ञा आहे व सर्वांना चांगली आहे ( असे तुम्ही म्हणतां) ॥ ३ ॥ तेव्हा आता मी कोणाला काय उत्तर देऊं ! ज्यांना जे वाटेल ते त्यांनी सुखाने म्हणावे ॥ ४ ॥ मी आणि कुमाता सोडुन इतर कोण म्हणतील की ( भरताने राज्यग्रहण केले) हे चांगले केले ? ॥ ५ ॥ चराचरांसह या सर्व जगांत माझ्याशिवाय असा कोण आहे की ज्याला सीता राम प्रिय नाहीत ? ॥ ६ ॥ जी परम हानी आहे त्याला तुम्ही परमलाभ मानतां ? पण यांत दोष कोणाचाच नाही, माझेच दिवस वाईट आहेत. ! ॥ ७ ॥ तुम्ही सर्व प्रेमशील व संशय यांना वश आहात म्हणून आपण सर्व जे बोलत आहात ते सर्व योग्यच आहे ॥ ८ ॥ राममाता अति सरल बुद्धीची आहे आणि माझ्यावर तिचे फार प्रेम आहे ( त्यामुळे) माझी सर्व दीनता पाहून ती सहजच स्नेहवश होऊन तसे म्हणाली ॥ दो० १८१ ॥

जग जाणें गुरु विवेक सागर । त्यांस बदरसम विश्व करावर ॥
तिलक-साज मज सजती तेही । जैं विधि विमुख, विमुख अवघेही ॥
या जगिं विना राम सीता ही । कोणि म्हणेना ’मम मत नाहीं’ ॥
सुखें सहित ऐकेन हि कानीं । अंति पंक कीं जेथें पाणी ॥
भय न मज किं जग म्हणेल खोटा । परलोकाचा नसे दुखोटा ॥
एकच दुःसह दाह मनाला । दुख मजमुळें सितारामांला ॥
जीवन-लाभ भला लुटि लक्ष्मण ।त्यजि सब लावी रामचरणिं मन ॥
मम जन्मच रघुनाथ-वनास्तव । कां अभागि पस्तावुं अवास्तव ॥

दो० :- माझी दारुण दीनता वदुं सकलां नमुं पाई ॥
ना दिसतं रघुनाथपद उरजळजळ ना जाइ ॥ १८२ ॥

गुरु ज्ञानसागर आहेत, हे सर्व जगाला माहीत आहे, व हे विश्व त्यांना तळहातावरील मोरासारखे आहे ॥ १ ॥ ते सुद्धा मला राज्यटिळक करण्याची तयारी करु लागले ! दैव उलटले की सर्वच उलटतात ॥ २ ॥ राम आणि सीता यांच्याशिवाय जगात कोणीही नाही की हे मला ( भरताला) संमत नाही असे म्हणेल ॥ ३ ॥ ( तरीपण) मी ते सुखाने ऐकेन आणि सुखाने सहन करीन ( कारण) जिथे पाणी आहे तिथे अंती ( तळाला) चिखल असावयाचाच ॥ ४ ॥ ( असे लोक म्हणणारच) जग मला खोटा - नीच म्हणेल याचे मला मुळिच भय वाटत नाही व परलोकाचा ( नाश होईल याचा) मला मुळीच शोक नाही. ॥ ५ ॥ मनात एकच दु:सह वणवा पेटला आहे की माझ्यामुळे सीतारामांना दु:ख भोगावे लागत आहे ॥ ६ ॥ जीवनाचा सुंदर लाभ लक्ष्मणाने लुटला ( कारण) सर्वस्वाचा त्याग करुन त्याने सीता रामचरणीं मन लावले ॥ ७ ॥ माझा जन्मच मुळी रघुनाथाला वनांत धाडण्यासाठी ! मग मी अभागी खोटाच - निरर्थक पश्चाताप कशाला करतो आहे ! ॥ ८ ॥ सर्वांना नमस्कार करुन मी आपली दारुण दिनता सांगतो की रघुनाथ चरणाचे दर्शन झाल्याशिवाय हृदयातील जळजळ जाणार नाही ॥ दो० १८२ ॥

अन्य उपाय न सुचे मला तर । जिविचें विदित कुणा विण रघुवर ॥
एकचि निश्चित दिसे मनासी । कीं प्रभातिं चलतो प्रभुपासीं ॥
यद्यपि मी वाइट अपराधी । जरी मजमुळें सर्व उपाधी ॥
अदपि शरण सन्मुख जईं बघतिल । क्षमुनि सकल बहु कृपा वर्षतिल ॥
शील भीड अति ऋजू स्वभाव । कृपा-स्नेह-सद्‌नचि रघुराव ॥
रिपु-अहितहि कधिं राम नाचरति । मी शिशुसेवक जरी वाम अति ॥
तुम्हिंहि पंच मानुनि मम हित पर । द्या निरोप आशीर्वच सुंदर ॥
जेणें श्रवुनि विनति जन गणुनी । येति राम नृपधानिं परतुनि ॥

दो० :- जन्म कुमाता जठरिं जरि मी शठ दोषि सदा हि ।
त्यजिति न मज रघुवीर निज गणुनी प्रतिति मलाहि ॥ १८३ ॥

मला तर दुसरा काहीच उपाय सुचत नाही, व रघुवराशिवाय माझ्या जीवीचे कोण जाणणार ? ॥ १ ॥ एकच उपाय मनाला निश्चित दिसतो की सकाळी मी प्रभुकडे चालू लागणार ॥ २ ॥ जरी मी अगदी वाईट आहे, अपराधी आहे, व माझ्यामुळेच सर्व अनर्थ झाले ॥ ३ ॥ तरी मला समोर शरणागत पाहतील तेव्हा सर्व काही क्षमा करुन माझ्यावर अपार कृपा करतील ॥ ४ ॥ शील, संकोच, अति ऋजू स्वभाव, कृपा व स्नेह यांचे माहेरघर म्हणजे रघुराज ॥ ५ ॥ रामचंद्रांनी कधी शत्रूचे सुद्धा ( तो समोर शरण आल्यावर) अहित केले नाही, मग मी जरी अति वाकडा असलो तरी त्यांचा शिशु व सेवक आहे ॥ ६ ॥ तुम्ही पंच सुद्धा परम हित समजून मला निरोप द्या. व असा सुंदर आशीर्वाद द्या की ॥ ७ ॥ जेणे करुन माझी विनंती ऐकून व मला आपला दास समजून राम राजधानीत परत येतील ॥ ८ ॥ माझा जन्म जरी कुमातेच्या पोटी झालेला असला व मी सदा शठ व दोषी असलो तरी आपला मानून रघुवीर माझा त्याग करणार नाहीत. असा मला भरवसा आहेच. ॥ दो०१८३ ॥

भरत वचन प्रिय सकलां गमलें । राम-स्नेह सुधें पाकवलें ॥
लोक वियोग-विषम-विषिं जळतां । जागति मंत्र सबीज ऐकतां ॥
माय सचिव गुरु पुर नर-नारी । स्नेहें विकल सकल तैं भारी ॥
मानिति भरता फार, वदति ही । साक्षात् राम प्रेम-मूर्ति ही ॥
तात भरत कां वदां न ऐसें । तुम्हिं रामप्रिय असं प्राणसे ॥
जो पामर अपल्या मति जडतें । लादि तुम्हांवर जननि-कुटिलते ॥
तो शठ पूर्वज कोटि समेतां । वसे कल्पशत नरक-निकेतां ॥
अहि-अघ-अवगुण मणि ना ग्रहतो । हरि विष दुःख अधनता दहतो ॥

दो० :- चला च वनिं रामाकडे भरत ! मंत्र शुभ फार ॥
दिला शोकसागरिं बुडत सकला तुम्हि आधार ॥ १८४ ॥

भरताचे भाषण सर्वांना इतके प्रिय वाटले की जणू रामस्नेहरुपी सुधेतच पाकवलेले आहे ! ॥ १ ॥ वियोगरुपी विषमविषाने जळत असलेले लोक जणू काय सबीज मंत्र ऐकल्याने सावध झाले ॥ २ ॥ तेव्हा माता, मंत्री, गुरु, पुर, नर नारी इ. सर्वच स्नेहाने व्याकुळ झाले ॥ ३ ॥ भरताची पुन:पुन्हा प्रशंसा करीत म्हणू लागले की ( भरत म्हणजे) जणू रामस्नेहाची साक्षात मूर्तीच आहे ॥ ४ ॥ तात ! भरत ! तुम्ही असे का म्हणू नये बरं ? तुम्ही रामाला प्राणांसारखे प्रिय आहात व तुम्हाला राम प्राणांसारखे प्रिय आहेत ॥ ५ ॥ जो नीच आपल्या बुद्धीच्या जडतेने मातेची कुटीलता तुमच्यावर लादील ॥ ६ ॥ तो दुष्ट आपल्या कोटी पूर्वजांसहित शंभर कल्पे नरकात वास करील ॥ ७ ॥ सर्पाचे पाप व अवगुण सर्पमणी घेत नाही ( उलट) विष नाहीसे करतो व दु:ख आणि द्रारिद्रय यांना झाळतो ॥ ८ ॥ वनांत रामाकडे अवश्यच चलावे भरत ! तुम्ही फार चांगला मंत्र ( सल्ला) दिलात, शोक सागरात बुडत असतां तुम्ही सगळ्यांना आधार दिलांत ॥ दो० १८४ ॥

मोद मनिं न थोडा सर्वांना । घनस्वप्नें चातक-मोरांनां ।
चलणें उदयिं कळत शुभ निर्णय । होति भरत सकलां प्राणप्रिय ॥
नमुनि मुनिंसि भरता शिर नमवुनि । सकल निघति घरिं निरोप घेउनि ॥
धन्य भरत जीवन या जगतीं । शीला स्नेहा वानित वळती ॥
कथिति परस्पर सुकार्य झाले । गमन तयारिस सकल लागले ॥
गेह-रक्षणा ज्यांस राखिति । त्यां वाटे जणुं गळां कांपिती ॥
’रहा न म्हणा न कुणां’ कुणि सांगत । जीवन-लाभ न कुणां आवडत ॥

दो० :- जळो संपदा सदन सुख सुहृद बंधु पितृ माय ।
रामपदोन्मुख होत जीं करिति न मुदा सहाय ॥ १८५ ॥

सर्वांच्या मनात थोडाथोडका आनंद नाही झाला ! जणूं मेघांचा ध्वनी ऐकून चातकांना व मोरांना व्हावा तसाच जणुं झाला ॥ १ ॥ सकाळी निघणारा हा शुभ निर्णय कळताच भरत सर्वांना प्राणप्रिय झाले ॥ २ ॥ वसिष्ठादि मुनींना वंदन करुन व भरताला मस्तक नमवून निरोप घेऊन मंडळी आपापल्या घरी जाऊ लागली ॥ ३ ॥ भरताच्या शीलाची व स्नेहाची प्रशंसा करीत चालले आहेत व आपसांत म्हणतात की भरताचे जीवन धन्य आहे. धन्य भरत, धन्य भरत ! ॥ ४ ॥ ‘ सपुरजन ! गेले भरत जिथे प्रभुसुखधन ’ १८५/५ लोक एकमेकांस सांगू लागले की मोठे कार्य झाले ( साधले) सगळे लोक गमनाची तयारी करु लागले ॥ ५ ॥ घर राखण्यासाठी रहा असे ज्यांस सांगीतले गेले, त्यांना वाटले की जणूं आपला गळाच कापला गेला आहे ॥ ६ ॥ ( हे पाहून) कोणी सांगू लागले की ‘ घरी रहा ’ असे कोणी कोणाला सांगू नका; कारण की जीवनलाभ ( मिळवणे) कोणाला आवडत नाही ? ॥ ७ ॥ आग लागो त्या संपत्तीला घराला, सुखाला, सुहृदांना, बांधवांना व आईबापाना जी कोणी रामपदांच्या सन्मुख होत असतां त्यास आनंदाने साह्य करीत नाहीत ॥ दो० १८५ ॥

सजिति घरोघर वाहन नाना । हर्ष किं उदयीं करूं प्रयाणा ॥
भरत जाइ घरिं करी विचारा । पुरिं हय जग गृह खजिना सारा ॥
असे सकल रघुपति-संपत्ती । त्यजुन जाउं जर विना यत्‍न ती ॥
तर परिणामिं भलेंपण मम ना । स्वामीद्रोह अघाग्रःइ गणना ॥
करी स्वामिहित सेवक तोहि । कोटि दोष कुणि मज देवो ही ॥
तैं शुचि सेवक बोलवि ते ही । स्वप्निं न चळले स्वध्रर्मिं जे ही ॥
मर्म धर्म सब उत्तम कथिलें । जे ज्या लायक तिथें राखिले ॥
करुनि यत्‍न सब रक्षक ठेवति । गेले भरत राम-मातेप्रति ॥

दो० :- जाणुनि जननी आर्त सब भरतें स्नेहसुजाण ॥
कथिल्या सजण्या पालख्या मेणे सौख्यद यान ॥ १८६ ॥

सर्व लोक घरोघरी नाना प्रकारची वाहने - याने सजवूं लागले व सर्वांना हर्ष झाला आहे की सकाळी ( रामाकडे जाण्यास) प्रयाण करणार ॥ १ ॥ भरताने घरी जाऊन विचार केला की, सर्व नगरी, हत्ती, घोडे, घरे सगळा खजिना ॥ २ ॥ वगैरे सर्व संपत्ती रघुपतीची आहे तिच्या संरक्षणाचा काही यत्‍न न करता ती तशीच टाकून गेलो ॥ ३ ॥ तर शेवटी त्यात माझा भलेपणा नाही, कारण तो स्वामी द्रोह होतो व तो सर्व पापांत अग्रणी म्हणून गणला आहे. ॥ ४ ॥ जो स्वामीचे हित करील तोच ( खरा) सेवक, मग ( त्यांस) कोणी दोष कां देईनात ! ॥ ५ ॥ तेव्हा मग भरताने असेच पवित्र (एकनिष्ठ) सेवक बोलावले की जे कधी स्वप्नांत सुद्धा स्वधर्मापासून वळले नव्हते ॥ ६ ॥ सर्व मर्म व सेवकधर्म यांचे उत्तम प्रकारे विवेचन करुन त्यांस सांगीतले व जे सेवक ज्या कार्याला योग्य होते तेथे त्यांना त्या त्या कार्यासाठी ठेवले ॥ ७ ॥ ( या प्रमाणे) सर्व व्यवस्था करुन सर्व ठिकाणी संरक्षक ठेवले व भरत राममातेकडे गेले ॥ ८ ॥ सर्व माता दु:खी व रामदर्शनार्थ उत्सुक आहेत असे जाणून प्रेमात सुजाण असणार्‍या भरताने पालख्या, मेणे वगैरे सुखदायक याने सजविण्याची आज्ञा केली ॥ दो० १८६ ॥

चक्र-चक्रि-सम पुरनर-नारी । वांचिति उदय आर्त उरिं भारी ॥
जागत रजनी सरली सगळी । भरत सुज्ञ सचिवां घे जवळी ॥
घ्या अभिषेक-वस्तु सब सांगति । पटतां रामा मुनि अभिषेकति ॥
चला शीघ्र; ते अमुनि परतले । त्वरें तुरगरथ नाग सजविले ॥
अरुंधत्ती नी अग्नि ससाजहि । प्रथम रथीं निघती मुनिराजहि ॥
नाना वाहनिं विप्र-संहती । सकल तेजतप-निधान निघती ॥
लोक सकल सज-सजुनी यानां । चित्रकूटिं करिति ही प्रयाणा ॥
शिबिका सुभग, न जाति वानिल्या । त्यांत सकल राण्याहि चालल्या ॥

दो० :- सोंपुनि पुर शुचिं सेवकां, सकलां पाठवितात ॥
स्मरुनि राम-सीता-चरण भरत बंधु चलतात ॥ १८७ ॥

सर्व पुर नरनारी चक्रवाक चक्रवाकी प्रमाणे मनात फार आर्त होऊन सूर्योदय होण्याची वाट पाहात जागत आहेत. ॥ १ ॥ जागत असतांच सर्व रात्र संपली ( उजाडले) व भरताने सुज्ञ सचिवांना जवळ बोलावले ॥ २ ॥ त्यांना सांगितले की राज्याभिषेकाच्या सर्व वस्तू बरोबर घ्या वनांतच मुनिश्रेष्ठ ( वसिष्ठ त्यांस) राज्याभिषेक करतील ॥ ३ ॥ लवकर निघा ते ( सचिव) नमस्कार करुन परत गेले व त्यांनी त्वरेने घोडे, रथ, हत्ती वगैरे सजविले ॥ ४ ॥ अरुंधती, सर्व सामानासह अग्नी व मुनीराज वसिष्ठ प्रथम एका रथांत ( सर्वांच्या पुढे निघाले) ॥ ५ ॥ ( त्यांच्या मागे) सगळेच तेजतपनिधान असलेले विप्रांचे समुदाय नाना वाहनांत बसून निघाले ॥ ६ ॥ ( त्यांच्या मागे) नगरातील सर्व लोकांनी आपापली वाहने सजवून चित्रकूटास ( जाण्य़ासाठी) प्रयाण केले ॥ ७ ॥ ज्या सुंदर शिबिकांचे वर्णन करता येणार नाही जशांमध्ये बसून सर्व राण्याही निघाल्या ॥ ८ ॥ नगर शुचि सेवकांच्या ताब्यांत देऊन व सर्व लोकांना आदराने पुढे करुन सीता - राम यांच्या चरणांचे स्मरण करून भावासह भरत चालू लागले ॥ १८७ ॥

राम-दर्शनोत्सुक नर नारी । जाति करिणि करि बघुनि किं वारी ॥
सीताराम वनीं मनिं जाणत । भरत बंधुसह जाती चालत ॥
बघुनी स्नेह लोक अनुरागति । त्यजुनि वाजि गजरथ, पदिं चालति ॥
ठेववि डोली जाउनि जवळीं । राम-माय मृदु वचना वदली ॥
सांगे ऐक रथीं बस बाळा ! । प्रिय परिवार दुःखि बघ झाला ॥
चालति तुम्हिं चालतां सकल जन । सकल शोक कृश चलण्या शक्त ना ॥
वचन धरुनि शिरिं चरणां नमुनी । बंधु उभय जाती रथिं बसुनी ॥
प्रथम दिनीं तमसा-तटिं वासा । करिति गोमतीं दुजा निवासा ॥

दो० :- पय-अहार, फल अशन कुणि नक्ताशन करतात- ॥
व्रत-नेमां, रामास्तव भोगादि त्यजतात ॥ १८८ ॥

सर्व स्त्रिया व पुरुष रामदर्शनासाठी असे उत्सुक आहेत की जणू काय हत्तीणी व हत्ती जलाशय पाहून तिकडेच जात आहेत ॥ १ ॥ सीताराम वनात आहेत हे जाणून भरत मात्र भावासह पायी चालत जात आहेत.॥ २ ॥ तो स्नेह पाहून लोक इतके अनुरक्त झाले की सर्व हत्ती, घोडे, रथ, इत्यादी आपल्या वाहनातून उतरुन सारे पायी चालू लागले॥ ३ ॥ राममातेने भरताजवळ जाऊन आपली डोली खाली ठेवविली, व ती मृदु वाणीने म्हणाली की ॥ ४ ॥ बाळ ! रथांत बस, बाबा ! ऐक माझं सर्व प्रिय परिवार किती दु:खी झाला आहे, बघ तरी ! ॥ ५ ॥ तुम्हीं चालतां त्यामुळे सगळे लोक चालू लागले आहेत, ते शोकाने आधीच कृश झालेले आहेत त्यामुळे चालण्याचे त्राण त्यांच्यात नाहीत ॥ ६ ॥ मातेचे वचन शिरसावंद्य मानून व तिच्या चरणांना वंदन करुन दोघे बंधू रथात बसून चालू लागले ॥ ७ ॥ पहिल्या दिवशी तमसातीरावर वस्ती केली, दुसरी वस्ती गोमतीच्या तीरावर झाली ॥ ८ ॥ कोणी दुग्धाहार करु लागले, कोणी फलाहारी बनले, कोणी नक्त भोजन करु लागले, या प्रमाणे रामदर्शनासाठी लोक नेम, व्रते इ. करुं लागले व भोगांचा त्यांनी त्याग केला.॥ दो० १८८ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP